तीन टिपणे

शॉर्ट में निपटाओ! डार्विनच्या उत्क्रांतीच्या तत्त्वाचे एक त्रोटक वर्णन पाहा एखादी सजीव रचना टिकून राहते, कारण ती तिच्या परिस्थितीशी अनुरूप असते. ती परिस्थितीशी अनुरूप असण्याचा पुरावा हा, की ती टिकून राहते.

वरच्या परिच्छेदातले वर्णन हे वर्तुळाकार युक्तिवादाचे (circular argument) उदाहरण आहे. ते तर्कदुष्ट आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जीवजाती कशा घडल्या यावर ते काहीही प्रकाश टाकत नाही. पण थोडक्यात उत्क्रांती म्हणजे अशा प्रस्तावनेसकट ते बरेचदा पुढे केले जाते. कार्ल पॉपर हा विज्ञानामागचे तत्त्वज्ञान तपासणारा खंदा तत्त्वज्ञही एका यासारख्या युक्तिवादाने चकून म्हणाला, की डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्त्व हा एक आधिभौतिक संशोधन प्रकल्प (a metaphysical research program) आहे. पुढे आपली चूक उमगून पॉपर म्हणाला, “मी नैसर्गिक निवडीच्या तत्त्वाबद्दल, ते तपासण्यायोग्य असल्याबद्दल, त्याच्या तार्किक पदस्थितीबद्दल (logical status) माझे मत बदलले आहे. या मतपरिवर्तनाच्या कबुलीच्या (recantation) संधीमुळे मला आनंद झाला आहे.” दोन्ही संदर्भ विल्मा जॉर्जच्या डार्विन (१९८२, फाँटाना मॉडर्न मास्टर्ज) मधून) आहेत. का फसगत झाली पॉपरची?

बहुधा हे घडले तपशिलात न जाता चटपटीत लघुरूपच केवळ तपासण्याने! आपण आपल्याच (मानवाच्याच) इतिहासातला एक टप्पा तपासून सुरुवातीचे त्रोटक वर्णन फसवे का आहे ते तपासू.

काळ आहे सुमारे पावणेचार कोटी वर्षांपूर्वीचा. पृथ्वी आज आहे त्यापेक्षा बरीच गरम आणि दमट आहे. बहुतांश जमिनीवर अनेक थरांचा घनदाट फांदोरा असलेल्या झाडांचे आच्छादन आहे. सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोचतच नाही, या जंगलात. त्यामुळे गवत ही जमिनीलगत वाढणारी वनस्पती नाही; त्यामुळे गवतावर चरणारे खूर असलेले तृणाहारी नाहीत; त्यामुळे या हरिणवर्गाची शिकार करत जगणारे कुत्र्यामांजरांचे पूर्वजही नाहीत. सस्तन प्राणी या वर्णनात बसणारे तीनच प्राणिवर्ग प्रामुख्याने आहेत; देवमासे, वटवाघळे आणि माकडे.

माकडे अंधाऱ्या फांदोऱ्यात जगतात. अळ्या, किडे, सुरवंट, फळे, काहीच न जमल्यास पाने, असा आहार असतो. साप-अजगर आणि झाडाच्या वरच्या भागात गरुड-गिधाडे, यांच्यापासून स्वतःचे रक्षण करावे लागते. आता या आयुष्यक्रमाशी अनुरूप शरीररचनेचा विचार करू. अंधुक प्रकाशातही अन्न आणि भक्षक दिसायला डोळे मोठे हवेत, कमी प्रकाशातही पुढ्यातले चित्र दाखवणारे. तसे मोठे डोळे नसलेली माकडे परिस्थितीबद्दल अडाणी राहून उपाशी मरतील, किंवा अजगर-गरुडांच्या भक्ष्यस्थानी पडतील. वाचतील ती मोठ्या डोळ्यांची माकडे.

डोळे चेहेऱ्याच्या समोरच्या भागावर हवेत, कारण भक्ष्य पकडून तोंडात घालायचे असते, किंवा थेट तोंडाने खायचे असते. तोंड आणि डोळे जवळवळ नसतील तर उपासमार होईल. एकूण माकडवंशाच्या वैविध्यात वाचतील ती पुढ्यात डोळे असलेली माकडे.

दोन डोळे हवेत, कारण या दुनेत्री (binocular) रचनेनेच पुढ्यातला सुरवंट, पुढ्यातले बोर, पुढ्यातली अळी किती दूर आहे ते कळते. तसे नसणाऱ्या माकडांची उपासमार होईल. वाचतील ती, साधारणतः सारख्याच क्षमतेचे दोन डोळे असलेली माकडे.

फांद्यांवर पळताना तोल सांभाळायला शेपटी उपयोगी पडते. पण शरीरातला प्रत्येक अवयव घडायला, कार्यक्षम राहायला ऊर्जा लागते आणि ती कमवायला अन्न लागते. फार आखूड शेपटीची माकडे तोल जाऊन धडपडतील. फार लांब शेपटीची माकडे शेपट्या सांभाळण्यातच थकून जातील, आणि त्यांच्यापाशी जोडीदार शोधून प्रजोत्पादन करण्याइतकी ऊर्जाच उरणार नाही. वाचतील ती संतुलित लांबीच्या शेपट्यांची माकडे.

हातांना बोटे हवीत, कुत्र्यामांजरांसारखे पंजे नकोत. सुटी बोटेच फळे-अळ्या पकडून तोंडात घालू शकतात. जुळलेली बोटे उपासमार घडवतील. वाचतील ती सुट्या बोटांची माकडे.

फांद्यांवर चतुष्पाद म्हणूनच वावरायचे असते. मागच्यापुढच्या पायांचे मुख्य शरीराशी असलेले सांधे साधेसे असणे पुरते. हात शरीराच्या मागे नेण्याची गरज नसते. तसली मोकळीक देणारे खांदे ऊर्जेच्या हिशोबात महाग असतात. तश्या खांद्यांना वागवायला अन्न जास्त लागते. तेच अन्न जोडीदार शोधणे-प्रजोत्पादन यांसाठी लागी लागून हवे असेल, तर खांदे साधे हवेत. वाचतील ती साध्या खांद्यांची माकडे.

मोठे, चेहेयाच्या पुढ्यातले, दुनेत्री दृष्टी पुरवणारे डोळे; आणि सुटी बोटे आणि साधे खांदे असलेली माकडेच वाचली एवढीच कहाणी – आणि हो, संतुलित लांबीची शेपूट असलेली! पचनसंस्था, श्वसनसंस्था, साऱ्यांबद्दल असे सांगता येईल. पण ही होईल “अस्संच झालं म्हणून तसंच झालं’ छाप कहाणी; ती सांगितली तर तो पॉपरने हिणवलेला अधिभौतिक संशोधन प्रकल्प ठरेल.

पण पृथ्वी बदलत होती. थंड आणि कोरडी होत होती. जंगले विरळ होती, विशेषतः सागरकिनाऱ्यावर. खंडही सुटे होत होते आणि किनारपट्ट्या वाढत होत्या.

आता जंगलकडांच्या भागात तरी नुसते फांद्यांवरून पळता येणे पुरेसे नव्हते. फांद्यांना लटकून झोके घेऊन दूरवर उड्या मारणे जास्त गरजेचे होते. हालचालींच्या या ‘शाखाचर’ (लीरलहळरींळेप) पद्धतीत शेपटाची अडचण होत होती. खांदे मोकळे असणे गरजेचे होते. जास्त प्रकाश असलेल्या परिस्थितीत वावरायला डोळ्यांची विश्लेषक क्षमता जास्तजास्त महत्त्वाची होत होती. ज्या माकडांमध्ये स्वैरपणे हे गुण उद्भवले, ती विरळ जंगलांशी अनुरूप झाली. शेपटी नाही, खांदे जास्त हालचाल करू देणारे, डोळे जास्त नेमकेपणाने रंगरूप ओळखू देणारे ; हे सारे वर्णन आहे कपींचे (apes). आपण माणसे या कपि-वर्गात मोडतो.

ज्या माकडांमध्ये हे बदल झाले नाहीत, ती हळूहळू घटत्या जंगलांमध्येच राहू शकत. तिथेही त्यांच्या क्षमतांपैकी जास्त अनुरूप संच असणारी माकडेच वाचत; कमी अनुरूप ती मरत, आणि मागे फारशी प्रजाही ठेवत नसत.

परिस्थितीशी जुळणे, जुळत जाणे, ही एक प्रक्रिया आहे; स्थिर चित्र नाही, चलचित्र आहे. अधल्यामधल्या टप्प्यांचा पुरावा जीवाश्मांमधून मिळतो. कधीकधी पुरावा कमी असतो, कधी नसतोच. पण अनुमानाने तुटक रेषांमधून पूर्ण चित्राची कल्पना करता येते.

वर आपण काळासोबत बदलत गेलेल्या एका प्राणिवर्गाचे उदाहरण पाहिले. भौगोलिक फरकानेही एका जीवजातीतून वेगवेगळ्या जीवजाती घडतात. स्टीफन जे गूल्ड एका ज्वालामुखीतून घडलेल्या बेटाची कहाणी नोंदतो. बेट साधारणपणे गोलसर आकाराचे आहे. मध्यावर एका डोंगराचे शिखर आहे. त्यापासून खाली उतरत जाणाऱ्या सूर्यकिरणांसारख्या फाकलेल्या डोंगररांगा आहेत. दर दोन डोंगररांगांमध्ये नद्याओढ्यांची खोरी आहेत. आणि अशा सर्व दऱ्यांमध्ये सरड्यांच्या वेगवेगळ्या उपजाती आहेत. प्रत्येक जात आपापल्या परिस्थितीशी कसकशी अनुरूप होत गेली ते जीवाश्मांचा अभ्यास सांगतो. सतत ठसणारा मुद्दा हाच, की मुळात एक असलेल्या जीवजाती परिस्थितीशी जुळत जाताना सुट्यासुट्या जीवजातींमध्ये परिवर्तित होत असतात. ही संतत, अखंडपणे चालणारी क्रिया आहे. एक न बदलणारी परिस्थिती आणि तिच्याशी जुळलेला एक सजीवांचा संच, असे कुठेही घडू शकत नाही.

आणि ही प्रक्रिया आनुवंशिकतेतल्या स्वैर गुणांवर चाळण्या लावत नवनव्या शरीररचना, नवनव्या शारीरक्रियांना जन्म देते. मूळ त्रोटक वर्णन वाचून घडलेले मत पॉपरने जास्त अभ्यासानंतर बदलले, ते बहुधा नैसर्गिक निवडीतून नवसर्जनाच्या आकलनानेच ; तपशील तपासण्यानेच.

पण एखादे मोठे तत्त्व शॉर्ट में सांगण्याचा मोह अनेकांना होतो. हर्बर्ट स्पेन्सरच्या सहायव्हल ऑफ द फिटेस्ट ने माजवलेला गोंधळ प्रसिद्ध आहेच. त्यामानाने पॉपरसारख्यांची फसगत ही नव्या संकल्पनांच्या प्रसारात बरेचदा घडणारी बाब आहे .

उत्क्रांतीतून सामाजिकता मुंग्या, वाळवी (उधई), मधमाश्या, अशा जीवांमध्ये अनेक शरीररचनांचे कीटक एकाच मादीपासून उत्पन्न होतात. नंतरही हे वेगवेगळ्या शरीररचनांचे कीटक एकत्रपणे काम करतात. कामकरी कीटक अन्नाची नेआण करतात, वारुळे खोदतात आणि रचतात, मादीची अंडी सांभाळतात. इ. इ. लढाऊ कीटक एकूण वारुळाचे रक्षण करतात. मादी अंडे देते. नर मादीला फळवतात. हे सर्व प्रकारचे कीटक एकमेकांना काही माहिती देऊ शकतात किंवा इतरांकडून माहिती घेऊ शकतात. सगळे कीटक आपल्या वारुळातल्या इतर सदस्यांना ओळखू शकतात. अशा अनेक व्यवस्थांमधून एकूण वारूळ, ही व्यवस्था चालवली जाते. या सर्व वर्णनात जरी ‘वारूळ’ म्हटले आहे तरी मधमाश्यांची पोळी, काही गांधिलमाश्यांची घरटी वगैरे रचनाही साधारण अशाच वर्णनात बसतात. या प्रकारे वागणाऱ्या कीटकांना सामाजिक कीटक म्हणतात.

वाळवीच्या सुरुवातीच्या अभ्यासकांपैकी यूजीन मारे (Eugene Marais) याने एक मजेदार संकल्पना मांडली. कामकरी कीटक, लढाऊ कीटक, यांना स्वतःचे प्रजनन करता येत नाही; तरीही ते इतर कामगार, सैनिक, नरमादी यांची देखभाल का करतात? या प्रश्नाचे उत्तर शोधताना मारेला सुचले, की काही बाबतींत कीटक सुट्या व्यक्ती म्हणून जगतात, आणि इतर काही बाबतींत मात्र संपूर्ण वारुळ, पोळे, घरटे यांनाच सुटी व्यक्ती मानणे योग्य ठरते!

याच्याच जवळचा विचार माणसांबाबतही करता येतो. आपल्या शरीरांतल्या अब्जावधी पेशी अन्न खातात, अन्नापासून ऊर्जा घेतात, विष्ठा बाहेर टाकतात, प्रजनन करतात, इ. इ. असे करताना त्या सुट्या व्यक्ती असतात. पण ‘संपूर्ण माणूस’ जिवंत असेपर्यंतच हे चालू राहते. संपूर्ण माणूस मेल्यावर सुट्या पेशीही मरतात. म्हणजे संपूर्ण माणूस ही व्यक्ती आहे, आणि तिच्यातल्या पेशी या एकूण रचनेला दुय्यम अशा व्यक्ती आहेत.

सामाजिक कीटकांचा एक अग्रगण्य अभ्यासक ई. ओ. विल्सन याला या साऱ्यांतून एक वेगळीच पण पूरक बाब जाणवली. शरीरचना आणि शारीरक्रियाच नव्हेत, तर सामाजिक वर्तणूकही आनुवंशिक असते. जर असे असेल, तर ती बाबही नैसर्गिक निवडीतून घडत जायला हवी! प्राण्यांमध्ये असे घडते, सामाजिक वागणूकही उत्क्रांत होत जाते, हे विल्सनने १९७५ साली सोशिओबायॉलजी या पुस्तकाद्वारे मांडले. अर्थातच माणसांनाही हे लागू पडते, कारण माणसेही प्राणी आहेत. आपल्या काही भावना, काही विचार, काही सामाजिक संस्था, या आनुवंशिक आहेत, ही मांडणी अनेकांना पटली नाही – पचली नाही, म्हणा, हवे तर!

पण विल्सनला अनुयायी मिळाले. त्यांमध्ये होता रिचर्ड डॉकिन्स, ज्याने द सेल्फिश जीन (१९७६) या पुस्तकातून उत्क्रांतीचा पाया आणिकच इहवादी केला. व्यक्ती नैसर्गिकरीत्या निवडल्या जातात, आणि जीवजात उत्क्रांत होते, ही मांडणी डॉकिन्सने बदलली. त्याच्या मांडणीनुसार आनुवंशिकतेचे मूळ वाहक, जीन्स, हे निवडले जातात. व्यक्ती या केवळ जीन्सच्या वाहक म्हणून मानल्या जाव्या. कधीकधी जीन्समधील स्पर्धा ते जीन्स बाळगणाऱ्या व्यक्तींनाच मारक ठरू शकतात, हेही डॉकिन्स दाखवून देऊ शकला.

यामुळे जीनदत्त स्वभाव (nature) महत्त्वाचे, की पालनपोषण (nurture) महत्त्वाचे; या वादाने नव्याने जोर धरला. यिा अंकात आनुवंशिक स्वभाव आणि पालनपोषण यांना एकमेकांचे पर्याय न मानता सहकारी मानावे, असे सुचवणारे लेख आहेत-स. त्यातही उत्क्रांती म्हणजे प्रगती का, हा प्रश्नही चर्चेत आला. एकीकडे विल्सन-डॉकिन्सपंथी, दुसरीकडे लेवाँटिन आणि स्टीफन जे गूल्ड, अशांमध्ये हे वाद झडू लागले. आजही वाद आहेत, पण ते पंथभेद आहेत, आणि दोन्ही पक्ष डार्विनची मांडणीच मानतात. ख्रिस्ती धर्मप्रेमींचा निर्मितिवाद (creationism) आणि त्याची नव्याने फॅशनेबल केलेली इंटेलिजंट डिझाइन ही मांडणी दोन्ही पक्ष नाकारतात.

पण स्वार्थी जीन मांडणीने माणसांमधील स्वार्थत्यागी, परोपकारी वृत्तीची स्पष्टीकरणे पुरवली. उत्क्रांतिमानसशास्त्र (evolutionary psychology) या सोशिओबायॉलजीतून जन्मलेल्या शास्त्राने मानवी स्वभावातील अनेक खाचाखोचांवर प्रकाश टाकला. अखेर आज स्वार्थी जीन-सोशिओबायॉलजी पंथाच्या संकल्पना मानव्यशास्त्रांमध्येही वापरल्या जाऊ लागल्या आहेत. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, साऱ्यांमध्ये नैसर्गिक निवडीतून संस्थांची जडणघडण होते, हे मान्य होऊ लागले आहे. तसाही जीवशास्त्रज्ञांमधील स्वार्थी जीन-सोशिओबायॉलजीला विरोध हा “तुम्ही जरा जास्तच करता आहात!” या नमुन्याचा होता. आता तर नेचर श्रू नर्चर हा समन्वयही प्रस्थापित होतो आहे.

याचा एकच उपार्थ इथे ठसवायचा आहे. तो म्हणजे व्यक्तिपातळीवरची उत्क्रांती घडूनच भागत नाही. सामाजिक संस्थांची उत्क्रांतीही महत्त्वाची असते. माणसाची कुटुंबव्यवस्था, नीतिकल्पना, समाजधारणा, या साऱ्यांमध्ये माणसाच्या उत्क्रांतीचे पडसाद दिसतात.

जसे – नर-मादी, स्त्री-पुरुष यांचे माणसांमधले युगुलबंध (रिळी लेपव) इतर कोणत्याही कपिजातीतील बंधांपेक्षा सबळ आहे. याचे कारण असे सांगता येईल की माणूस हा कपी गर्भधारणेपासून स्वावलंबी होण्याचा काळ इतर कोणत्याही कपीच्या बाबतीत असणाऱ्या काळापेक्षा जास्त आहे. या प्रदीर्घ काळात स्त्री-पुरुषांनी एकमेकांची मदत घेणे अत्यावश्यक आहे. तसे सहकार्य नसते तर मनुष्यजात घडलीच नसती. माणसांमध्ये नर सौम्यसे बाहेरख्याली असतात; पण मूळ एकपतिव्रत-एकपत्नीव्रत जगण्यातगण्याला पूरकच नव्हे, तर आवश्यक आहे. त्यामुळे माणसांमध्ये युगुलबंध पाळणारे जीव नैसर्गिक निवडीत बहुसंख्य झाले आहेत. उत्क्रांती म्हणजे स्पर्धा, निर्मम स्पर्धा, हे आज खरे मानले जात नाही, सहकार्य, नीती, हेही नैसर्गिक क्रियांमधूनच उपजतात, असे मानले जाते.

लढाई आणि मांडवळी आजकाल जीवशास्त्रात गणिती तंत्रांचा, गणित क्षेत्रातल्या संकल्पनांचा प्रभाव वाढतो आहे. याचे एक टोकाचे उदाहरण म्हणजे स्टुअर्ट कॉफमनची जीवाच्या अचानक उद्भवाची मांडणी. कॉफमन हा नाट्यलेखन, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत भटकून अखेर संगणकशास्त्री झाला आहे. अनेक रसायनांचे रेणू एकत्र आले, तर त्यांच्यातून चयापचयासारख्या (अन्न खाणे, ऊर्जा कमावणे, विष्ठा टाकणे) आणि स्वतःच्या प्रतिकृती बनवणाऱ्या क्रियांची जंजाळे उद्भवू शकतात, ही कल्पना कॉफमनच्या आधीही काही जणांना सुचली होती. डीएनए, आरएनए, प्रथिने, ही सारी रसायने तीसेक रेणूंपासून बनतात. एकूण रसायनांच्या संख्येत चिमूटभर संख्या आहे ही. कॉफमनने अश्या चयापचय-स्वयंनिर्मितीच्या क्रियांचा संगणकाच्या मदतीने अभ्यास केला. त्याचा निष्कर्ष असा, की योग्य रसायनांचा संच असेल तर त्यातून जीव उद्भवणे शक्यच नव्हे, सोपे नव्हे, अटळ आहे! आणि एकदा रासायनिक प्रक्रियांची जंजाळे कार्यरत झाली, की त्यांचे प्रकार घडणेही अटळ आहे (ॲट होम इन द युनिव्हर्स, ऑक्सफर्ड, १९९५).

जर असे असेल, तर जीवजातींच्या उगमात, Origin of Species मध्ये नैसर्गिक निवडीचे स्थान काय ? एक वर्णन असे – रॉजर ल्युविन हा एक प्रसिद्ध विज्ञान वार्ताहर आहे. त्याने कॉफमनच्या एका मित्राला एकदा विचारले, की कॉफमनचा नैसर्गिक निवडीवर किती विश्वास असेल. कॉफमनची जंजाळातून स्थैर्याची मांडणी एका अर्थी नैसर्गिक निवडीला असंबद्धच ठरवते, म्हणून हा प्रश्न. मित्र म्हणाला, “एक ते दहाच्या पट्टीवर स्टु नैसर्गिक निवडीला ‘एक’ गुण देईल!”

पुढे ल्युविनने हाच प्रश्न खुद्द कॉफमनला विचारला, एक ते दहाच्या पट्टीचा उद्धार करून. कॉफमन म्हणाला, “पाच”! एक गंमत आहे, परिस्थित्यनुरूपता उर्फ ‘फिटनेस’ ही कल्पना कॉफमन वारंवार वापरतो. सर्व स्व-रचित क्रांतिकतेच्या विवेचनात कॉफमन म्हणतो की सर्व रचना नैसर्गिक निवडीने काट्याच्या अणीकडे सरकत जातात. गुण देताना मात्र दहापैकी पाचच ! बरे, कॉफमन स्वतःच म्हणतो, “मी डार्विनवादी आहे.

‘ स्टीफन जे गूल्ड पुराजीवशास्त्रज्ञ आहे. त्याने एका सहकाऱ्याबरोबर एक तत्त्व मांडले, की जीवजाती खूप काळ बदलत नाहीत, आणि मग एकाएकी बदलतात. या तत्त्वाला ‘विरामित समतोल’ (पंक्च्युएटेड इक्विलिब्रियम, punctuated equilibrium) म्हणतात. ताबडतोब हाकाटी सुरू झाली, की गूल्डने डार्विनची हळूहळू बदलाची मांडणी चुकीची ठरवली. मग गूल्डनेच एक लेख लिहून, त्यात डार्विनच्याच लेखनातले उतारे देऊन ‘सिद्ध केले’, की विरामित समतोलही डार्विनच्या मांडणीत बसतोच!

शास्त्रज्ञांचा वैयक्तिक इतिहास आणि त्यांनी सुचवलेली तत्त्वे, यांच्या संबंधावरची एक ‘भानगड’ सांगतो – राहवत नाही, म्हणून ! ल्युविनने जॉन मेनार्ड स्मिथ (John Maynard Smith) या उत्क्रांतिवादी शास्त्रज्ञाला विचारले, कॉफमन-डार्विनवाद संबंधाबद्दल. कॉफमनही होता. स्मिथ म्हणाला, “नैसर्गिक निवडीला उत्क्रांतीत महत्त्वाचे मानणारे बहुशः इंग्लिश ग्रामीण भागातले ‘जेंटलमेन’ होते, आणि – माफ कर, स्टुअर्ट – महत्त्व नाकारणारे बहुतेक शहरी ज्यू होते.

” ल्युविनने या वाक्याचे स्पष्टीकरण मागितले. स्मिथचे म्हणणे असे की डार्विन, त्याचा उत्क्रांतीच्या मांडणीतला साथीदार वॉलेस, हे सगळे शेतीप्रधान घरा-गावांमधून आले होते. त्यांची निसर्गाशी थेट ओळख होती. परिस्थितीशी जुळवून घ्यायला उपजणाऱ्या चित्रविचित्र शरीरचना आणि आयुष्यक्रम त्यांच्या रोजच्या पाहण्यातले होते. त्यांना नैसर्गिक निवड महत्त्वाची वाटली यात आश्चर्य नाही.

याउलट कॉफमन खराच शहरी ज्यू आहे -‘निसर्ग’ फार वर्षे प्राणिसंग्रहालयांच्या गजांमधून पाहिलेला. त्याला वैश्विक सत्ये मोहवतात. अशी सत्ये शोधायची इच्छा हीच त्याच्या विज्ञानामागची प्रेरणा. त्याला नैसर्गिक निवडीत संधिसाधू बदल आणि अनुरूप होणेच फक्त दिसते. – वैश्विक सत्य नाही.

स्मिथला काय वाटते? “माझ्या दृष्टीने निसर्ग तसाच आहे-संधिसाधू बदलांमधून अनुरूपता घडवणारा.” आता मागच्या टिपणात ओझरता उल्लेख आलेला रिचर्ड डॉकिन्स (१९४१, सध्या हयात) आणि स्टीफन जे गूल्डमधला (१९४१-२००२) ‘वाद’ पाहू. हा वाद वास्तवात होता त्यापेक्षा मोठ्या रूपात दाखवला तो दोन पुस्तकांनी (डॉकिन्स व्हर्सस गूल्ड, किम स्टेरायनी; द डार्विन वॉर्स, अँड्र ब्राऊन). यातल्या दुसऱ्या पुस्तकाने तर आधुनिक डार्विनवाद्यांचे दोन पंथ मानले, गूल्डियन आणि डॉकिन्सियन!

वाद कशाबाबत आहे हे सोडून देऊ, कारण तो बराच तांत्रिक आणि तात्त्विक आहे. जनसामान्यांना ज्यात रस यावा असे फारसे नाही. आहे मात्र उच्च दर्जाचा! गूल्ड भूशास्त्र-पुराजीवशास्त्र या वाटेने डार्विनमध्ये गुंतत गेला. डॉकिन्स प्राणि-पक्ष्यांच्या वर्तणुकीच्या अभ्यासातून उत्क्रांतीत येऊन ठेपला. गूल्ड अमेरिकन आहे, तर डॉकिन्स इंग्रज. दोघेही अनेक लोकप्रिय पुस्तकांमधून सामान्य लोकांसाठी उत्क्रांती तपासत होते – डॉकिन्स आजही तपासतो. दोघांमध्ये मतभेद तर होतेच, पण एक संघभावनाही होती; कारण दोघेही निर्मितिवादाचे (creationism) कट्टर विरोधक होते/आहेत. एका मजेदार वाक्यातून डॉकिन्स ही संघभावना मांडतो – तो (गूल्ड) आपल्या विनयहीनतेची लाज बाळगत नसे, पण एकदा त्याने त्यात माझाही समावेश करून घेतला. ते उदाहरण मी वाचकांपुढे मांडतो – “रिचर्ड आणि मी उत्क्रांतीबद्दल लिहिणाऱ्यांपैकी दोन सर्वोत्कृष्ट माणसे आहोत.”

८ डिसें. २००१ ला डॉकिन्सने गूल्डला एक पत्र लिहिले. त्याच्या काही भागाचा स्वैर अनुवाद असा – “तुझे मत आहे की निर्मितिवाद्यांशी जाहीर वादविवाद करू नये. तसा वादविवाद झाल्याने काही तरी वाद घालण्याजोगे आहे, असा भ्रम अडाणी बघ्या लोकांमध्ये उपजेल. तुझे मत मान्य करून व उद्धृत करून मी अनेकदा या लोकांशी वाद टाळला आहे….. “तुझे मत जर आजही तेच असेल, तर मी एक सूचना करतो. आपण दोघे मिळून न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सला एक छोटेसे पत्र लिहू, आपण निर्मितिवादी (आणि त्यांची छुपी आवृत्ती ‘इंटेलिजंट डिझाइन’वादी) लोकांशी जाहीर वाद का टाळतो, याबद्दल.

११ डिसेंबर २००१ गूल्डने उत्तर दिले – ” Excellent idea – आणि आपण दोघेच सह्या करू. कच्चा खर्डा मला पाठव. छोटा आणि नेमका. न्यूयॉर्क रिव्ह्यू ही सर्वांत चांगली जागा.” डॉकिन्सने कच्चा खर्डा १४ डिसें. २००१ ला गूल्डकडे पाठवला. पण गूल्ड त्यावेळी मृत्यूशी झुंजत होता. तो २० मे २००२ रोजी वारला. दोन खऱ्याखुऱ्या विचारवंतांमधला हा मतभेद आणि एकीकडे लढत असताना खरा शत्रू ओळखून केलेली ही मांडवळी !

१९३, मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर-४४००१०. अधिक वाचनासाठी डार्विन व डार्विनवादावरील पुस्तकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सुट्या पुस्तकांचे संदर्भ देण्याऐवजी या विषयावर लोकप्रिय रूपात लिहिणाऱ्या काही महत्त्वाच्या लेखकांचा उल्लेख करत आहोत; त्रोटक परिचयासकटः i) हेलेना क्रॉनिन (Helena Cronin) स्त्रीवादी उत्क्रांतिवादी ह्या काहीशा विरोधाभासी वर्णनात बसणारी, द अँट अँड द पीकॉक ची लेखिका. ii) रिचर्ड डॉकिन्स (Richard Dawkins)(१९३७-) सेल्फिश जीन तत्त्वाचा प्रणेता. आजचा आघाडीचा कर्मठ उत्क्रांतिवादी. iii) डॅनिएल सी. डेनेट (Deniel C. Dennett)(१९४२-) जाणीव तपासणारा उत्क्रांतितत्त्वज्ञ. iv) जेरेड (जॅरिड) डायमंड (Jared Diamond)(१९४१-) उत्क्रांतीच्या कल्पना मानवी समाजांनाही लावणारा. ix) अर्स्ट मायर(Ernst Mayr)(१९०४-२००५) ह्या शतायुषी लेखकाने नवडार्विनवाद ही सध्याची आवृत्ती रुजवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. v) स्टीफन जे गूल्ड (Stephen Jay Gould)(१९४१-२००२) नॅचरल हिस्टरी, डिस्कव्हर इत्यादी मासिकांमधून विस्तृत लेखन, जे पुस्तकांच्या रूपातही उपलब्ध आहे. vi) डग्लस हॉफस्टाडर (Dougles Hofstadter)(१९४४-) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जाणीव तपासणारा. vii) लिन् मालिस (Lynn Margulis)(१९३८-) उत्क्रांतीच्या काही टप्प्यांवर तरी एका जीवजातीने वेगळ्या जीवजातीच्या जेनोमचे अंश स्वतःत सामावून घेतले, हे विवाद्य मत मांडणारी. vili) जॉन मेनार्ड-स्मिथ(John Maynard-Smith)(१९२०-२००४) याचे पेंग्विन प्रकाशनाचे द थिअरी ऑफ इव्होल्यूशन आजही एक चांगला संपूर्ण आढावा पुरवते. x) मॅट रिडली (Matt Ridley)(१९३८-) जेनोम व इतर पुस्तकांमधून उत्क्रांतिविचार माणसांना लावणारा. xi) ई. ओ. विल्सन (E. O. Wilson)(१९२४-) हा सामाजिक कीटकांचा सखोल अभ्यास करणारा जीवशास्त्रज्ञ प्रामुख्याने सामाजिक संस्थांचे मूळही जीवशास्त्रीय असते, असे मांडणाऱ्या सोशिओबायॉलजी चा जनक म्हणून ख्यातनाम आहे. या सर्वच लेखकांचे एकमेकांशी पटते असे नाही. विशेषतः विल्सन, डॉकिन्स, मालिस व गूल्ड यांच्या पंथिक वादां मधून उत्क्रांतीचे बरेच तरल विश्लेषण भेटते. पण सर्व जण कठोर प्रत्यक्षदर्शनांचाच आधार घेतात.

लेखक परिचय जनुकशास्त्री. पॉप्युलेशन जेनेटिक्स या ज्ञानशाखेत गणिताचा वापर करून रेण्वीय उत्क्रांती (molecular evolution) सिद्ध करणारा शास्त्रज्ञ. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड् स्टडीज (NIAS) येथे बोधनशास्त्राचा अभ्यासक. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) व जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रीसर्च येथे शास्त्रज्ञ. मनोविकारशास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक. द्य. बहुविध विषयांवर वाचन व लेखन. मेंदुविज्ञानावरील पुस्तक (सुबोध जावडेकरांसोबत) प्रकाशनाच्या वाटेवर. क्षणाने एंजिनीयर व समाजशास्त्रज्ञ. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक. कामगार संघटना व उत्पादकता यांतील संबंधांबाबत सल्लागार. वैद्य. उत्क्रांतीचे अभ्यासक. व्हिक्टोरियन (डार्विनच्या) काळाच्या अभ्यासक. वएना विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक. इव्होल्यूशनरी गेम थिअरीतील तज्ज्ञ. चक व अभ्यासक मित्र संस्थेचे संचालक, शेती व पर्यावरणतज्ज्ञ : जैवसांख्यिकीय तज्ज्ञ. उत्क्रांती जेनोमिक्सचा विशेष अभ्यास, कॅलिफोर्निया (सॅन फ्रान्सिस्को) विद्यापीठात प्राध्यापक. मेष्ठ विश्लेषक बोधनशास्त्री (Cognitive Scientist), द लँग्वेज इन्स्टिंक्ट या ग्रंथासाठी ख्यातनाम. -जी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे राज्यशास्त्राचे अध्यापक रुटगर्स विद्यापीठात स्त्रीवादी अभ्यासक. ॥ सुधारक चा कार्यकारी संपादक – रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ : शिरपूर (जि. धुळे) येथील (NMIMS-SPTM) या संस्थेत औषधिशास्त्री. या अंकाचे अतिथि-संपादक. लायसेंको आणि प्रयत्नवाद रशियन राज्यक्रांतीनंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांना जमीनदार (kulaks) ठरवून शेतीचे सामूहिकीकरण (collectivisation) केले गेले. लहान व मध्यम शेतकऱ्यांचीही मालकी संपुष्टात आली. असे दुखावलेले शेतकरी मनापासून शेती करेनात. जबरदस्तीने शेतीवर पाठवले गेलेले बेरोजगार शेतीबाबत अज्ञानी होते. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे १९३० च्या आसपास रशियात भीषण दुष्काळ पडला. यावर उपाय योजला गेला तो जबरदस्ती वाढविण्याचा. याने ना धान्यवसुली धड होई, ना उत्पादनात वाढ होई. रशियाचा सर्वेसर्वा स्तालिन कृषिक्रांतीच्या मसीहाच्या शोधात होता. मुळात शेतीचे उत्पादन इतके खालावले होते, की जराशाही चांगल्या पाऊसपाण्याने उत्पादनात प्रचंड वाढ दिसली. ह्या कृषिक्रांतीचे श्रेय घेतले ट्रोफिम लायसेंकोने (Trofim Lysenko – १८९८-१९७३) यावेळेपर्यंत मेंडेलच्या आनुवंशिकतेच्या नियमांच्या आधाराने डार्विनवाद बहुमान्य झाला होता. खरे तर मेंडेलचे नियम इहवादाला आधार देणारे होते. पण ही जाण ना स्तालिनला होती, ना लायसेंकोला. लायसेंकोने मेंडेलचे नियम अमान्य ठरवले, आणि डार्विनऐवजी लामार्कची मांडणी मान्य केली. लामार्कला वाटत असे की एखाद्या व्यक्तीने आयुष्यात जे गुण कमावले ते तिच्या संततीत उतरतात. उदा. मी मेहेनतीने संस्कृत शिकलो, तर माझ्या मुलांना ती भाषा शिकणे सोपे जाईल; आणि जर संस्कृत येण्याने परिस्थितीशी अनुरूप होता येत असेल (!) तर माझी मुले माझ्या मेहेनतीमुळे जास्त प्रमाणात परिस्थितीशी अनुरूप होतील. या इन्हेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरॅक्टरिस्टिक्स तत्त्वाला आजवर वास्तविक किंवा प्रायोगिक आधार मिळू शकलेला नाही. पण बर्गसाँ, बेट्सन इत्यादी अनेक विचारवंतांना डार्विनी स्वैरबदलांपेक्षा लमार्क चा प्रयत्नवाद जास्त पटण्याजोगा वाटत असे. यांचीच वाट चालत लायसेंकोने रशियन शेतीवर निराधार लामार्कवाद लादला. त्याला स्तालिनचे हुकुमशाही पाठबळही लाभले. १९४८ साली तर एका फतव्यातून लायसेंकोला विरोध करणे बेकायदेशीर ठरवले गेले! पिकांची नवी वाणे शोधणे, जनावरांच्या नव्या जाती विकसित करणे, या साऱ्याबाबत रशियन शेतीतंत्रांची पीछेहाट झाली. दुष्काळ आणि अन्नाची आयात सार्वकालिक झाली. लायसेंको रशियन जनुकशास्त्र संस्थेचा प्रमुख झाला. १९५३ साली स्तालिन मेल्यानंतरही कोणी लायसेंकोला विरोध करू धजत नसे. अखेर १९६४ साले आंद्रेई साखारॉव्हने जाहीरपणे लायसेंकोच्या अडाणी आडमुठेपणाला विरोध करून त्याची धोरणे बंद पाडली. (साखारॉव्ह उच्च दर्जाचा भौतिकशास्त्रज्ञ होता. मानवी हक्कांचा पुरस्कार केल्यामुळे त्याला १९७५ सालचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक देऊ केले गेले – पण सोविएत सरकारने ते घेऊ दिले नाही!) लायसेंको मरेपर्यंत कागदोपत्री उच्च पदावर राहिला. लामार्कवादाला वेळोवेळी पुरस्कर्ते मिळत राहिले, कारण तो वाद नैसर्गिक निवडीइतका इहवादी मानला जात नाही. रशियन शेतीक्षेत्राने मात्र साम्यवादाशी जुळता डार्विनीय इहवाद टाळल्याचे भरपूर मोल दिले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.