उत्क्रांतिवाद, जाणीव आणि ब्रह्म 

प्रथम काही गोष्टी स्पष्ट करणे योग्य ठरेल. 

1. उत्क्रांतिवाद आणि ब्रह्माबाबतचा विचार (आणि अनुभव?) या दोहोंतही मी तज्ज्ञ नाही. 

2. मी उत्क्रांतिवाद मानतो, किंबहुना सर्वच आधुनिक विज्ञाने मानतो. 

3. एका वेगळ्या पातळीवर मी अद्वैत तत्त्वज्ञानही मानतो. हे मानणे श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना अनुसरून आहे. म्हणजे त्यात सगुण ब्रह्माला व ईश्वरालाही स्थान आहे. अनेक मार्गांनी आपल्याला ब्रह्माचा व ईश्वराचा साक्षात् अनुभव घेता येतो. 

4. अद्वैताचे हे रूप आणि उत्क्रांतिवाद यांचा परस्परसंबंध हाच खरा या लेखाचा विषय असायला हवा. परंतु हे विवेचन एका लेखात होणार नाही व मी ते करू शकणार नाही.. 

5. या लेखातील ब्रह्म म्हणजे ‘सत्, चित् व आनंद या शब्दांनी ज्याचे वर्णन केले जाते; जे या भौतिक विश्वाचा व त्यात आढळणाऱ्या चैतन्याचा आधार आहे; हे भौतिक विश्व व त्यातील चैतन्य ज्यातून निर्माण होते व हे भौतिक विश्व व त्यातील चैतन्य अंतिमतः ज्याच्याशी एकरूप आहे ते होय. 

6. या लेखात जे तथ्य आहे ते इतरांचे आहे, अपुरेपणा व चुका माझ्या आहेत. 

माणसाला अनेक प्रश्न पडतात. या प्रश्नांचे दोन गट आपण पाहू. 

अ गट :- हे विश्व का अस्तित्वात आहे? ते बदल का पावत आहे? त्यात जाणीव (जाणीव असलेले जीव) का आहे? मानवी जीवनाचा व माझ्या जीवनाचा अंतिम हेतु कोणता? सौंदर्य म्हणजे काय? 

ब गट – अ गटातील प्रश्नांना अनुसरून काही प्रश्न येतात. हे विश्व कसे निर्माण झाले? त्यात बदल कसा घडत आहे? त्यात जाणीव कशी निर्माण झाली? मी जीवन कसे जगावे म्हणजे मला माझे हेतू पूर्ण करता येतात? 

अ गटातले पहिले तीन प्रश्न एखादी गोष्ट मुळात अस्तित्वातच का आहे अशी विचारणा करतात. ब गटातले प्रश्न अस्तित्व दिलेले आहे हे मान्य करून त्याविषयीचे इतर प्रश्न उभे करतात. ब गटातल्या प्रश्नांना आपण वैज्ञानिक किंवा व्यावहारिक उत्तरे देऊ शकतो. एखादेवेळी आज ती उत्तरे माहीत नसतील, पण जास्तीतजास्त योग्य उत्तरे मिळविण्याची वैज्ञानिक पद्धत आमच्याकडे आहे; असे आपले म्हणणे असते. अ गटातील प्रश्नांबाबत आपण वेगवेगळ्या भूमिका घेऊ शकतो. उदा. “हे खऱ्या अर्थाने प्रश्नच नाहीत”, “हे विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे प्रश्न आहेत”, “विज्ञान पुरेसे प्रगत झाल्यावर यांच्यावरही प्रकाश पडेल'”, “या प्रश्नांचे उत्तर द्यायला अतीताचा (अलौकिकाचा, पारलौकिकाचा) आधार घ्यावा लागेल” इत्यादी भूमिका घेतल्या जातात. मला स्वतःला ब्रह्माचा आधार घेणे योग्य वाटते. 

या लेखाच्या दृष्टीने विचार केल्यास “या विश्वात जाणीव कशी निर्माण झाली?” हा ब गटातील प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर तिचा विकास कसा झाला हा प्रश्न उपस्थित होतो. मुळात “या विश्वात जाणीव निर्माणच का झाली?” याबाबतही उत्क्रांतिवादाला काही सांगायचे आहे का, हेही पहायला हवे. त्यानंतर ब्रह्म हे गृहीतक मानून आपण अधिक चांगली उत्तरे देऊ शकतो का याचा विचार करता येईल. अनुमानांना व निरीक्षणांना दिलेले तार्किक रूप म्हणजे विज्ञान होय. एखाद्या तार्किक रचनेत एखादी गोष्ट गृहीतक ( axiom ) म्हणून मानायची असेल तर त्या गोष्टीने पुढील अटी पूर्ण करणे जरूर असते. 

1. त्या गृहीतकाशिवाय ती रचना अपूर्ण ठरते. 

2. त्या गृहीतकाने ती रचना पूर्ण होते. 

3. त्या गृहीतकाने त्या तार्किक रचनेत अंतर्गत विसंगती निर्माण होत नाहीत. 

या पार्श्वभूमीवर आपण उत्क्रांतिवाद, चैतन्य / जाणीव आणि ब्रह्म यांचा विचार करू. या ठिकाणी consciousness ला चैतन्य किंवा जाणीव हे प्रतिशब्द वापरले आहेत. अद्वैत तत्त्वज्ञानाच्या संदर्भात चर्चा करताना मुख्यतः चैतन्य हा शब्द वापरला आहे. इतर वेळी जाणीव हा शब्द वापरला आहे. चैतन्याचे इंग्रजीत भाषांतर करताना consciousness 

असे करतात. या दोन शब्दांच्या अर्थच्छटेत फरक आहे. तो पुढे स्पष्ट केला आहे. 

उत्क्रांतिवाद 

आपल्या सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार एका महास्फोटातून हे विश्व निर्माण झाले. प्रचंड वेगाने आणि काही मूलभूत नियमांना अनुसरून त्यात बदल घडत गेले. यामुळे अधिकाधिक गुंतागुंतीच्या व वेगवेगळे गुणधर्म असलेल्या रचना निर्माण झाल्या. विकासाच्या या संकल्पनेत कोणताही व कोणाचाही हेतू अभिप्रेत नाही. सजीव सृष्टी निर्माण होईपर्यंतचा सृष्टीचा विकास आपण पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांच्या नियमानुसार समजावून घेऊ शकतो. सजीवांमध्येही या नियमांचा पाया असतोच. 

कालांतराने या निर्जीव सृष्टीतून सजीव सृष्टी निर्माण व विकसित झाली. सोप्या रचनेपासून गुंतागुंतीच्या रचनेपर्यंत (आरएनए व डीएनएपासून मानवापर्यंत) अशी या बदलाची एक दिशा आहे. भिन्नलिंगी पुनरुत्पादन आणि मज्जासंस्थेचा विकास यांमुळे या बदलाला मोठा वेग मिळाला. काही तत्त्वांच्या आधारे (natural selection, mutation, genetic drift, population genetics इ.) उत्क्रांतिवाद हे सर्व बदल कमी-अधिक प्रमाणात विशद करू शकतो. या उत्क्रांतिवादात तपशिलांचे व काही तत्त्वांचे मतभेद जरूर आहेत. परंतु या लेखाच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व परिवर्तनात कोणत्याही दैविक इच्छेचा, दैविक प्रयत्नांचा वा दैविक हस्तक्षेपाचा सहभाग मानण्याची अजिबात गरज नाही; याबाबत उत्क्रांतिविज्ञानही ठाम आहे. अगदी, या भौतिक विश्वाच्या अतीत असे तत्त्व असते, त्या तत्त्वावर हे विश्व अवलंबून आहे, या भौतिक विश्वाचे नियम त्या तत्त्वास लागू होत नाहीत; असे मानणारा वैज्ञानिकही जेव्हा एखाद्या प्रयोगाचा आराखडा करतो किंवा भौतिक विश्वातील एखाद्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो त्यात अतीताला स्थान ठेवत नसतो. 

सजीवाची निर्मिती व उत्क्रांती समजावून घेण्यासाठी निसर्गनियम व परिस्थिती याखेरीज कोणत्याही गोष्टीचा आधार उत्क्रांतिवाद घेत नाही. कारणे विशद करून मागणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे कार्य विज्ञान व उत्क्रांतिवाद अधिकाधिक समर्थपणे करीत आहे. “अमुक एका गोष्टीचे कारण ईश्वर आहे”, याला विज्ञानात स्थान नाही. “भौतिक गोष्टींचे मानवाला जेवढे ज्ञान होणे शक्य आहे तेवढे वैज्ञानिक पद्धतीनेच होईल”, या विधानावर वाद घालता येईल, पण भौतिक ज्ञान मिळविण्याचा अन्य मार्ग विरोधकांकडे नाही. याशिवाय वैज्ञानिक पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, उत्क्रांतिविज्ञान यांच्या घट्ट परस्परसंबंधांचे एक जाळे बनलेले असते. त्यामुळे काही कच्चे दुवे असले तरी जाळे मजबूत आहे आणि त्याची व्याप्ती आणि मजबुती वाढत आहे. त्यामुळे कारणे पुरविण्याच्या कामातून विज्ञानाने ईश्वराला केव्हाच रिटायर केले आहे. 

चैतन्य / जाणीव 

जाणीव हा पूर्णपणे व्यक्तिगत आणि अत्यंत मूलभूत अनुभव असल्याने त्याची नेमकी व्याख्या करणे अशक्य आहे; म्हणजे अशी व्याख्या, की जिचा वापर करून आपण एखाद्या गोष्टीला जाणीव आहे की नाही हे ठामपणे ठरवू शकू. या जाणिवेचा अनुभव (निदान) सर्व माणसांना असतो अशी आपली खात्री असते. अद्वैत तत्त्वज्ञानानुसार सर्वसामान्य माणसाला जाणिवेच्या तीन अवस्था अनुभवास येत असतात – – जागृती, स्वप्नावस्था व गाढ निद्रा, या तीनही अवस्थांचा अनुभव कोणाला तरी येत असतो. हा जो अनुभव घेणारा (साक्षी) त्याला तुरीया (चवथा या तीन अवस्थांपासून वेगळा) असे म्हणण्यात येते. साक्षी किंवा तुरीया ही जाणिवेची चौथी अवस्था नव्हे. तो म्हणजेच चैतन्य होय. अद्वैतानुसार “मी आहे आणि माझे अनुभव आहेत” हा व्यक्तिगत अनुभव ज्याच्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म होय. आपल्या अनुभवात हे चैतन्य मीपणाशी अतूटपणे जोडलेले आहे. म्हणजे कोणतीही जाणीव ही मला किंवा जिला मीपणा आहे अशा गोष्टीलाच असू शकते. 

आधुनिक पाश्चात्त्य विचारांत जाणीव म्हणजे मुख्यतः जागृतावस्था असे मानलेले आढळते. गाढ निद्रा किंवा स्वपणाची जाणीव (self awareness) ही अनेकदा जाणिवेपासून (consciousness) वेगळी केलेली आढळते. तुरीया ही संकल्पना आधुनिक पाश्चात्त्य विचारांत नाही. या जाणिवेचे (आणि मनाचे) मज्जासंस्थेशी नेमके नाते कोणते याबद्दल काही सिद्धान्त पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी व तत्त्वज्ञांनी मांडले आहेत. बुद्धी, मन, जाणीव या क्षेत्रांत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांत पुढील दोन सिद्धान्तगट मुख्यतः मानलेले आढळतात. 1) Identity Theory यानुसार जाणीव ही मेंदूची एक कार्यात्मक अवस्था (functional state) आहे, याशिवाय जाणिवेला व मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही. या क्षेत्रात काम करणारे अनेक वैज्ञानिक हा सिद्धान्त मानतात. 2) सजीव (त्यांची मज्जासंस्था) उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर आल्यावर जाणीव, अ) अचानक पण अपरिहार्यपणे उगम पावते (emerge), ब) किंवा त्या मज्जासंस्थेच्या जोडीने जाणीव ही ज्यादा गोष्ट घडून येते (supervene), गट 1 किंवा 2 मधील सिद्धान्त मानणारे लोक असेही मानतात की हे असे होते, कारण हे भौतिक जगच असे आहे (Brute fact of life). यासाठी वेगळे स्पष्टीकरण किंवा अतीताचा आधार देण्याची गरज नाही. या भूमिकांनुसार जाणिवेविषयी जे व जेवढे कळण्यासारखे आहे व करण्यासारखे आहे ते मेंदूच्या संशोधनाने व वैज्ञानिक मार्गानेच होणार आहे. या क्षेत्रात आत्मचिंतनाने साक्षात ज्ञान होणार नाही. 

जाणीव उत्क्रांतिवाद 

जाणिवेबाबत उत्क्रांतिविज्ञानापासून काय माहिती आपल्याला मिळते? 

काही शास्त्रज्ञ असे मानतात की जाणिवेचे कार्य आणि तिचा मज्जाशास्त्रीय पाया जसजसा समजू लागेल तसतसा जाणीव का आहे याचा काही उलगडा करता येईल. उदा. ज्या प्राण्यास जाणीव असते तो जिवंत राहण्यास, पुनरुत्पादन करण्यास, अपत्यांना वाढविण्यास, स्वजातीय प्राण्यांना मदत करण्यास अधिक सक्षम ठरेल आणि त्यामुळे जाणीव असलेल्या प्राण्यांचे प्रमाण वाढत जाईल. हळूहळू जाणिवेचीही उत्क्रांती होत जाईल. या युक्तिवादास पाठिंबा देण्यासाठी जनुके आणि जाणीव यांचा संबंध प्रस्थापित करावा लागेल. हे नजिकच्या भविष्यकाळात होणार नाही. परंतु जनुक – मज्जासंस्था – जाणीव या संबंधीचे संशोधन प्रगत झाल्यावर जाणिवेचा उलगडा होऊ शकेल. या माहितीने एकदा जाणीव निर्माण झाल्यावर ती कशी विकसित झाली हे कळेल; पण मुळात जाणीव निर्माणच का व कशी झाली या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. परंतु एखाद्या गोष्टीची भौतिक कारणमीमांसा अधिकाधिक स्पष्ट होत गेल्यावर बहुसंख्य माणसांना ती निर्माणच का झाली हा प्रश्न तितकासा सतावत नाही, हे मान्य करावे लागेल. 

सजीवांच्या उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर जाणिवेस सुरुवात झाली, तिचा विकास कसा झाला, याबाबत उत्क्रांतिविज्ञानाने आपणास बरेच काही सांगणे अपेक्षित आहे. आज उत्क्रांतिविज्ञान याबाबत फारसे सांगत नाही (परंतु सध्या मेंदूच्या उत्क्रांतीबाबत जोरात संशोधन चालू आहे. आणि ते पुढे जाणिवेपर्यंत पोचणे अपेक्षित आहे.) आधी चर्चा केलेल्या तात्त्विक अडचणींशिवाय इतरही अडथळे आहेत. माणसाचा अभ्यास करताना self report चा वापर संशोधक करतात. प्राण्यांबाबत ते शक्य नाही. त्यामुळे फक्त प्राण्यांच्या वर्तणुकीची उत्क्रांती कशी झाली याबाबतचेच संशोधन झालेले आढळते. शिवाय पाश्चात्त्य विचारपरंपरेत मनुष्येतर प्राण्यांना मन / जाणीव नसते असे मानणारा मोठा प्रवाह आहे. त्यामुळे या परंपरेतील शास्त्रज्ञांना, मज्जासंस्था असलेल्या प्राण्यांना प्राथमिक अवस्थेतील मन असू शकेल असे कदाचित वाटेल; पण एकपेशीय प्राणी व वनस्पती यांना मन / जाणीव असेल का, असा प्रश्न त्यांना पडणे कठीण आहे. परंतु या संदर्भात काहीच संशोधन होत नाही असे नाही. अशा प्रयोगांमागील दृष्टिकोनही अर्थातच अतीत मानणारा नसतो. 

या संदर्भात प्रा. सेथ ग्रँट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनाचा उल्लेख करावासा वाटतो. मेंदूच्या कार्यासंदर्भात चेतासंधी (synapses) महत्त्वाचे आहेत. सस्तन प्राण्यांत या चेतासंधींशी संबंधित अशी सुमारे 600 प्रथिने आढळून आली आहेत. अपृष्ठवंशीय प्राण्यांत यांतील 50% प्रथिने आढळून येतात तर एकपेशीय प्राण्यांमध्ये यांतील 25% प्रथिने सापडतात. यांखेरीज चेतासंधींमध्ये होणारे संदेशवहन, शिकणे व स्मरण या संदर्भातली काही प्रथिने यीस्ट मध्येही आढळली आहेत. यीस्टमध्ये ही प्रथिने वातावरणातील ताणाला (अन्नाची कमतरता, तापमानातील बदल इ.) प्रतिसाद देण्याच्या कार्याशी संबंधित आहेत. एकपेशीय प्राण्यांना व अनेकपेशीय प्राण्यांतील एकेका सुट्या पेशीला काही स्वरूपाची जाणीव असू शकेल असे काही संशोधक मानतात. तिला वरील प्रकारच्या संशोधनातून आधार मिळू शकतो. पेशींना जाणीव आहे असे म्हणणारे संशोधक प्रत्यक्ष निरीक्षण करता येणाऱ्या गोष्टींसंदर्भात (उदा. पेशीची अंतर्गत स्थिती व बाह्य वातावरणास तिने दिलेला प्रतिसाद यांतील परस्परसंबंध) जाणिवेची व्याख्या करत असतात. जाणिवेच्या व्यक्तिगत (subjective) भागाबद्दल अर्थातच अशा प्रयोगांमधून उलगडा होणार नाही. परंतु जाणिवेच्या निरीक्षणात्मक अंगांची उत्क्रांती रेणुपातळीवर व मज्जापातळीवर कशी होत गेली हे जेव्हा कळू लागेल तेव्हा जाणिवेचे वैयक्तिक अंगही याबरोबरच विकसित झाले असेल, हे मान्य करावे लागेल.. 

येथे माझी भूमिका सांगणे योग्य ठरेल. जाणिवेच्या क्षेत्रात जे अनुभव माणसाला येतात त्यांच्याशी संबंधित अशी मज्जासंस्थेची कार्यस्थिती (functional state) असणारच. जागृती, स्वप्न, गाढ निद्रा यांचा पाया मेंदूची विशिष्ट स्थिती हाच आहे. किंबहुना समाधीचाही (चित्ताच्या वृत्तींचा निरोध केला आहे, अशी स्थिती) पाया मज्जासंस्थेची विशिष्ट स्थिती हाच असणार. परंतु या स्थितींना जे चैतन्याचे अंग असते त्याचा या स्थितींशी संबंध कोणता, हा कळीचा मुद्दा आहे. त्याची चर्चा करणाऱ्या आधुनिक सिद्धान्तांचे दोन गट आपण याआधीच पाहिले आहेत. त्यांच्यात वाद चालूच आहे आणि अंतिम उत्तर आपणाकडे नाही. सिद्धान्तांचा तिसराही एक गट आहे. त्यांच्यानुसार मेंदूची काही कार्ये चेतनास्वरूप भासतात याचे या स्थितीपेक्षा वेगळे अतीत कारण असते. त्याचे विवरण अनेक प्रकारे करण्यात आले आहे. उदा. God, पुरुष, ब्रह्म, मी ब्रह्म मानतो. 

ब्रह्म, जाणीव आणि उत्क्रांतिवाद 

अशा प्रकारे जाणीव (वमन) यांबाबत अनेक भूमिका आहेत. यांतील कोणतीही एक भूमिका सर्वमान्य नाही. ब्रह्म हे गृहीतक मानून चैतन्याचा अधिक समाधानकारक उलगडा आपण करू शकतो का? 

आपण पाहिलेल्या पहिल्या दोन गटांतील भूमिका मज्जासंस्थेवर आधारित आहेत. सजीवांच्यामध्ये विशिष्ट टप्प्यांपर्यंत मज्जासंस्थेचा विकास झाल्यावर जाणीव उद्भवते, हा विचार या भूमिकांमागे आहे, परंतु असे सिद्ध झालेले नाही. हा मुद्दा अर्थातच उत्क्रांतिविज्ञानाच्या कक्षेत येतो. परंतु उत्क्रांतिविज्ञानातील संशोधन असा दावा करताना आढळत नाही. उत्क्रांतिविज्ञानाच्या मान्यताप्राप्त पाठ्यपुस्तकांमध्ये जाणिवेची चर्चा नसते किंवा जुजबी विवरण असते. या लेखात आधी निर्देश केलेले संशोधन तर एकपेशीय प्राण्यांना जाणीव नाही असे का मानायचे, असा प्रश्न उपस्थित करते. अमीबांसारखे एकपेशीय प्राणी इतर प्राण्यांप्रमाणे अन्नग्रहण, श्वसन, उत्सर्जन, हालचाल व पुनरुत्पादन करतात. शिवाय सस्तन प्राण्यांच्या मज्जासंस्थेतील चेतासंधी, शिकणे, स्मरण यांच्याशी निगडित असलेल्या प्रथिनांपैकी काही प्रथिनेही त्यांच्यात कार्यरत असण्याची शक्यता आहे. असे जर असेल तर त्यांना प्राथमिक स्वरूपाची जाणीव असू शकेल, असे म्हणणे विचारात घ्यावे लागेल. हे भौतिक विश्व ब्रह्मापासून निर्माण झाले आहे. ब्रह्म मुळातच चैतन्यस्वरूप आहे. त्यामुळे भौतिक विश्वाचा भाग असलेल्या सजीवांत साहजिकच चैतन्य आढळते, हे चैतन्याचे एक उत्तर होऊ शकते. 

विश्वाची उत्पत्ती 

पदार्थ व ऊर्जा (matter and energy) यांची वेगवेगळी रूपे पृथ्वी-सजीवांची उत्पत्ती व उत्क्रांती सजीवांच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर जाणीव अवतरली; यातील शेवटच्या भागाचे (जाणिवेचे) कारण “असे निसर्गात घडलेले आपल्याला प्रत्यक्ष आढळून येते त्यामुळे ती निसर्गातील वस्तुस्थिती मानायची. त्याला वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही”, असा युक्तिवाद मांडण्यात येतो. याऐवजी पुढील युक्तिवाद आपण करू शकतो ‘मुळात चैतन्यस्वरूप असलेल्या ब्रह्मातून हे विश्व व नंतर सजीव निर्माण होत असल्याने सर्व सजीवांच्यात (खरेतर सर्वत्रच) चैतन्य असणे हेच साहजिक आहे. ” चैतन्य आढळले नसते तर ते गेले कोठे याचे उत्तर आपल्याला द्यावे लागले असते. 

याखेरीज ब्रह्म हे गृहीतक तपासून पाहण्यासारख्या काही शक्यताही सांगते. समाधीच्या शेवटच्या अवस्थेत माणसाला ब्रह्माचा अनुभव येतो. हा अनुभव अनिर्वचनीय असला तरी सुस्पष्ट असतो, आणि समाधीतून बाहेर आल्यावरही त्या अवस्थेचे आपल्याला स्मरण असते. हे लक्षात घेता समाधीचा व मेंदूचा संबंध आहे हे स्पष्ट होते. निर्विकल्प समाधीच्या आधी समाधीचे काही टप्पे आहेत. समाधीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित अशी मेंदूची कार्यावस्था असली पाहिजे. या अवस्थेतील व्यक्तींच्या मेंदूचा अभ्यास केल्यास काही गोष्टी आपणास सापडल्या पाहिजेत. झेन बुद्धिझमच्या पद्धतीने ध्यान करणाऱ्या व्यक्तीवर असे तपास करण्यात आले आहेत. अशा स्थितींमध्ये मेंदूत निर्माण होत असलेल्या विद्युत् प्रवाहात काही बदल आढळतो. मेंदूचे काही भाग या अवस्थेमध्ये अधिक कार्यरत असतात असे सापडले आहे. असे संशोधन अजून खूपच खोलात जाऊन केले पाहिजे, या प्रकारच्या संशोधनाची एक अंतिम मर्यादाही आपण सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजे. ती अशी- मेंदूची समाधी अशी काही कार्यावस्था असते असे सिद्ध झाले म्हणजे त्या कार्यावस्थेत त्या व्यक्तीला येणारे अनुभव सत्य असतात असे सिद्ध होत नाही; आणि याउलट असे अनुभव म्हणजे फक्त मेंदूची एक कार्यस्थिती होय. सबब ते काल्पनिक आहेत, सत्य नाहीत; असेही सिद्ध होत नाही. 

ब्रह्म हे गृहीतक मानण्याचा आणखी एक फायदा आहे. आपण सुरुवातीला प्रश्नांचा अ गट बघितला होता (का प्रश्न). या गटातील प्रश्नांना विज्ञान उत्तरे देऊ शकत नाही. या प्रश्नांना ब्रह्म या संकल्पनेवर आधारित उत्तरे देता येतात. अर्थात यानंतरही हा प्रश्न उद्भवतो की, “काहीच नाही अशा स्थितीऐवजी ब्रह्म आहे असे का?” त्याचे उत्तर नाही. त्याठिकाणी आपणास थांबावे लागते. असे असेल तर “हे भौतिक विश्व आहे आणि त्यात निदान काही प्राण्यांत जाणीव आहे”, येथेच का थांबायचे नाही? याची कारणे तीन —

1) भौतिक विश्व व जाणीव येथेच थांबायचे झाल्यास भौतिक विश्व व जाणीव या दोन गोष्टी दिलेल्या आहेत असे आपल्याला म्हणावे लागते. ब्रह्मसिद्धान्तात आपण एकच गोष्ट मानतो. 

2) केवळ भौतिक विश्व व जाणीव यांच्या आधारावर आपण नीतिविषयक आणि सौंदर्यविषयक प्रश्नांचा उलगडा करू शकत नाही. 

3) ब्रह्म हे केवळ एक गृहीतक नाही तर ती सत् अशी वस्तुस्थिती आहे, असे म्हणणे आहे. 

आपण काही साधना केल्यास ब्रह्माचा साक्षात अनुभव येऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. ब्रह्म या गृहीतकाची सुरुवात जरी शब्दप्रामाण्यापासून झाली तरी त्याचा शेवट प्रत्यक्ष अनुभवात व्हावा, किंबहुना त्यानंतरच सर्व संशयांचे निराकरण होते, असे सांगितले आहे. अर्थात हा अनुभव एखाद्या गोष्टीचा पराकोटीचा ध्यास घेतल्यामुळे होणारा भ्रम किंवा स्वसंमोहनासारखा काल्पनिक अनुभव असावा, असे आक्षेप घेण्यात आले आहेत. असे होऊ शकते ही जाणीव हा साधनामार्ग (येथे राजयोग) सांगणाऱ्यांनाही आहे. भ्रांतिदर्शन हा या मार्गातील एक अडथळा आहे, हे पातंजल योगसूत्रांत नमूद केलेले आहे. आपल्याला भास तर होत नाही ना असा प्रश्न अनेक प्रकारची साधना करणाऱ्या साधकांना पडला आहे. आणि त्यापलिकडे जाऊन आपले “भ्रमाचे निराकरण झाले असा भ्रम होतो” असा मुद्दा उपस्थित करता येईल. पण मुळात असे अनुभव येणे ही मनोविकृती आहे असे मनोविकारशास्त्र म्हणत नाही. तरीही अशा अनुभवांत तथ्य व सत्य नाही असे प्रतिपादन करणारे अनेक शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग त्यांना, अनेक माणसांना असे अनुभव येतात आणि त्यासाठी आणि त्यानंतर ते विशिष्ट प्रकारे आपले जीवन व्यतीत करतात आणि बहुसंख्य माणसे त्यांना स्वतःला असा अनुभव नसताना अशा काही माणसांवर श्रद्धा ठेवतात, याही वस्तुस्थितीचा उत्क्रांतिविज्ञानाशी कसा मेळ घालायचा? या नवीन प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. 

हे ब्रह्म, जाणीव व उत्क्रांतिवाद यांबाबत थोडक्यात विवरण झाले. तेच भरपूर वादास पुरेसे आहे. अद्वैत तत्त्वज्ञानात ब्रह्माखेरीज इतरही गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. त्या विचारांत घेतल्यास हे वाद आणखीनच वाढू शकतात व अनेकदा त्यांचे विवादातही रूपांतर होते. विज्ञानाने व तंत्रज्ञानाने जी वस्तुस्थिती पुढे आली आहे ती पूर्ण स्वीकारणे, आणि त्यांबाबतचे सिद्धान्त वैज्ञानिक जेवढे स्वीकारतात तेवढे स्वीकारणे, याला पर्याय नाही. परंतु हे सर्व स्वीकारूनही विश्वाचे, मानवाचे व मानवी जीवनाचे एका वेगळ्या पातळीवरील (अतीताशी संबंधित) आकलन शक्य असते व ते सत्यही असू शकेल अशी भूमिकाही गांभीर्याने घेता येते. 

मनोविकासकेंद्र, 1, कांचनगंगा अपार्टमेंटस्, रामकृष्ण कॉलनी, सिव्हिल हॉस्पिटल रोड, 

सातारा 415 001. 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.