पत्रसंवाद/प्रतिक्रिया

गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.]
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले. ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच! येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय. सुधारकसारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते. हे विषय चर्चेत येवूच नयेत यासाठी काही विशिष्ट मासिकांना/संपादकांना काही विशिष्ट धर्माच्या खास व्यक्तींकडून काही आर्थिक लाभ असावा का? अशी भाबडी शंकाही मला येऊन जाते. असे कदाचित काही नसेलही. त्यापेक्षा जीवाची भीति मोठी असावी, म्हणून जेथे मऊ लागते तेथेच खणायचे असे धोरण असावे असे वाटते. हे विषय चर्चेत नाहीत हे मात्र खरे!
मुळात माझे (कार्यकारी संपादकाचे) मत असे की अंधश्रद्धा निर्मूलन हे विवेकी वागणुकीचे एक अंग आहे. महाराष्ट्रात तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यरत आहे, व त्या समितीतर्फे एक पूर्णपणे त्या विषयाला वाहिलेली पत्रिका चालविली जाते. त्यामुळे आसु ने तेच काम करणे म्हणजे संसाधनांचा अपव्यय करणे. परंतु अंनिस, त्यांची पत्रिका, यांना मी साथीदार मानतो. ते चळवळीतले लोक आहेत. त्यांना तात्त्विक मदत करणे हे आसु चे काम, ज्याचा एक भाग मागील विशेषांकाद्वारे आसु ने पार पाडला.
आता पत्रातील विशिष्ट भागाबद्दल, किंवा स्पष्टपणे लिहायचे तर आसु हिंदुविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबद्दल. हे सुचवणेही दाखवते की गुंडोपंत ना बारकाईने आसु वाचतात, ना आसु बद्दल सद्भावना बाळगतात. आसु चे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला उत्तर दिले होते. त्याचा मला समजलेला गाभा असा – वाचकांपैकी, वाचक जेथून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदुधर्मात जन्मलेले आहेत. त्यांना जागे करण्याने इतर १५% किंवा कमी नाही जाग येईल, या धारणेतून मुख्यतः हिंदुधर्माच्या प्रत्यक्ष व्यवहारातील विकृतीवर आसु चा रोख असतो.
व्यक्तीनुसार अग्रक्रमांत फरक असणारच. मी एकूणच धर्मावर व धर्मांवर लिहिणे टाळून समाजाच्या इतर व्यवहारांना अग्रक्रमांत वरचे स्थान देतो. हिंदुधर्मावर टीका, पण इतर विशिष्ट व सामान्य धर्मांचा पुरस्कार, असे माझ्या संपादनकाळात, एकूण आसुच्या इतिहासात झालेले नाही, हे कोणीही तटस्थ निरीक्षक मान्य करेलच.
पण निनावी सायबरावकाशात, पदोपदी असे वाटते, कदाचित तसे नसेल वगैरे वकिली बचाव देत लिहिणारे तटस्थ नाहीत, हेही उघड आहे. तसे करणाऱ्या गुंडोपंतांनी आर्थिक लाभाची शक्यता सुचवली, ती मात्र केवळ हास्यास्पद या शब्दानेच वर्णिता येते.
अविवेक किती उच्च पातळी गाठू शकतो याचे एक उदाहरण दाखवण्यापुरती दखल घेत आहे. तशा हुच्चपणाने विचलित होण्याइतका अविवेक मात्र माझ्यापाशी नाही. – नंदा खरे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.