जनुकी आणि नीतितत्त्वे

23 जून 2009 ह्या दिवशी ‘रीथ लेक्चर्स’ ह्या भाषणमालिकेचा भाग म्हणून हार्वर्ड महाविद्यालयाचे प्रो. मायकेल सँडल् हे आनुवंशिकी-जनुकी म्हणजेच ‘जेनेटिक्स’ – आणि नैतिकता ह्या विषयांवर बोलले. व्याख्यानाच्या सुरुवातीला प्रास्ताविक म्हणून स्यू लॉली ह्या संयोजिकेबरोबर पुढीलप्रमाणे चर्चा झाली.

स्यू लॉली : मायकेल, तू प्रेसिडेंट जॉर्ज बुशच्या जैविक नैतिकता समितीवर – Bioethics commitee वर चार वर्षे होतास. त्या समितीत बऱ्याच उलटसुलट चर्चा व्हायच्या, की ते तसे रूढिवादी लोक होते?

मायकेल सँडल् : प्रे. बुशनीच त्यांचे नियोजन केलेले असल्यामुळे ते रूढिवादीच होते. म्हणूनच मला त्यांनी बोलावल्याचे मला आश्चर्य वाटले. मी प्रे. बुशच्या पुरस्कर्त्यांमध्येही नव्हतो. पण त्यांना खरेच सगळ्या बाजूंची मते हवी होती. त्या समितीवर बरेच वेगवेगळ्या धार्मिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेले लोक होते. धर्मशास्त्र, विज्ञान, न्यायशास्त्र, सरकारी धोरण, तत्त्वज्ञान सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ होते.

लॉली : पण तू तिथे एका दृष्टीने अल्पसंख्येतच मोडत होतास, नाही का? सँडल : सहा महिने चाललेल्या त्या वादाच्या काही भागात मी खरेच अल्पसंख्येत होतो. राजकीय वर्तुळातला सगळ्यांत गाजलेला हा वाद cloning, तंत्रज्ञान वापरून बीजांकुरातील (embryonic) Stem cell संशोधनाविषयी होता. मी ह्या प्रकारचे संशोधन होऊ देण्याच्या बाजूने होतो, तर बहुमत ते संशोधन करणे पुढे ढकलण्यासाठी किंवा पूर्णपणे बंद करण्यासाठी होते.

लॉली : तू असे म्हणाला आहेस की जॉर्ज बुश Embryonic stem cell वरील संशोधन हे “निष्पाप मानवाचा जीव घेण्यासारखे” आहे, असे समजतो; म्हणूनच त्याला लोकांचा पैसा त्यात घालणे बरोबर वाटत नाही. पण खाजगी पैशाचा त्यासाठी वापर मात्र त्याने थांबवला नाही. ह्याबद्दल नैतिक तत्त्वज्ञाचे काय म्हणणे आहे?

सँडल् : अनेक लोकांना मनापासून असे वाटते, की बीजांकुर (early embryo) हे नैतिकदृष्ट्या माणूस आहे. Embryonic stem cell संशोधनाला सरकारी अनुदान न देण्यामागे तुमचा विचार हाच आहे का? हे जर तुमचे मत असेल, तर ते संशोधनच बंद करायला हवे, नुसते त्यासाठीचे अनुदान थांबवून होणार नाही.

लॉली : मायकेल, आता जेनेटिक्स आणि नैतिकतेबद्दलचे तुझे विचार आम्हाला ऐकवायला मी तुला आमंत्रित करते :

सँडल : आज मी बोलणार आहे. ‘Genetic Engineering (GE) चा वापर आणि नैतिकता’ ह्या विषयावर. GE वापरून “सुधारलेले’ खेळाडू निर्माण करणे हे नीतीला धरून होईल का?

सुरुवात मी आई-वडील आणि मुले ह्यांच्यापासून करतो. काही वर्षांपूर्वीची गोष्ट एका जोडप्याने ठरवले, की त्यांना एक मूल हवे – शक्यतो एक एक बहिरे मूल. जोडप्यातले दोघेही बहिरे होते. बहिरेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या ‘Deaf Pride’ समाजाचे होते. ह्या समाजातील इतर लोकांप्रमाणेच हे जोडपेही बहिरेपण हे अपंगत्व नसून त्यांची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे, असेच मानत. आता, हे जोडपे होते दोन समलिंगी स्त्रियांचे. मूल होण्यासाठी त्यांना तसाही एक शुक्राणु दाता (sperm donor) शोधावा लागणारच होता. बहिऱ्या मुलाला जन्म देण्याच्या आशेने त्यांनी ज्याच्या कुटुंबातल्या पाच पिढ्यांमध्ये बहिरेपणा आहे, असा sperm donor शोधला, आणि खरेच, त्यांचा मुलगा बहिरा जन्मला.. ही गोष्ट पसरल्यावर सगळ्या बाजूंनी झालेल्या निंदेमुळे दोन्ही आया बुचकळ्यात पडल्या. त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या अपत्यावर अपंगत्व लादल्यामुळे समाजाने त्यांना दोष दिला होता, पण त्यांच्यासाठी तर ते अपंगत्वच नव्हते. आपल्यासारखेच मूल आपल्याला व्हावे, अशी त्यांची साधी सरळ इच्छा होती.

मुलाला जाणून-बुजून बहिरे बनवणे हे चूक आहे का? जर असेल, तर नक्की चूक काय आहे? त्या मुलाचे बहिरेपण, की त्याला तसे बनवण्यामागची जाणीव? क्षणभर असे मानूया की बहिरेपण हे खरेच अपंगत्व नसून एक माणसाची ओळख आहे. असे असेल, तर मग आई-वडिलांनी आपल्याला हवा तसा मुलगा मिळवण्यात चुकले कुठे? आजकाल अशा निवडी आपण नेहमीच करत नाही का – जोडीदार निवडताना किंवा मूल होण्यासाठी सहाय्य लागणार असेल, तर ते कोणत्या प्रकारचे सहाय्य /तंत्रज्ञान वापरावे ते ठरवताना ?

जेनेटिक्समधले नवे शोध जसे भविष्यासाठी आशेचे किरण ठरू शकतात, तसेच त्याच्यामुळे आपल्यापुढे काही बिकट आणि विचित्र प्रश्नही उभे राहतात. आशा म्हणाल, तर ही, की लवकरच आपण काही व्याधींवर उपाय शोधून त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करू शकू. पण तेच ज्ञान वापरून स्वतःलाच अंतर्बाह्य बदलून टाकले तर? त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपले स्नायू, स्मरणशक्ती किंवा आपले ‘मूड्स’ सुधारायला करायला लागू का? त्याने आपल्या मुलांचे लिंग, उंची आणि इतर काही ठरवायला, निवडायला लागू का? जवळ जवळ प्रत्येकाला G.E. ची कोणती ना कोणती शक्यता अस्वस्थ करते; पण ती नक्की का, हे समजावून सांगणे सोपे नाही.

आजच्या जगाच्या जाणिवेतून जात चाललेल्या काही प्रश्नांचा विचार जनुकीय सुधारणेच्या बाबतीत बोलताना आपल्याला करावा लागणार आहे. माणसाची आपल्या जगाकडे बघण्याची, त्याच्याशी वागण्याची योग्य पद्धत कशी असावी? हा प्रश्न धर्मशास्त्राकडे कलत असल्याने बहुतेक आधुनिक तत्त्वज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ त्याचे उत्तर द्यायला कचरतात. पण जैविक तंत्रज्ञानामुळे येणारी नवी ताकद, नवी शक्ती आपल्याला ते उत्तर शोधायला भाग पाडते.

आता जरा स्नायूंचा विचार करू. Muscular Dystrophy ह्या स्नायू अशक्त करणाऱ्या व्याधीशी लढायला जीनोपचार वापरता येईल. असा वापर करायला कुणाचीच ना नाही. पण हीच पद्धत जर ‘सुधारलेले’ खेळाडू बनवण्यासाठी वापरली तर? वैज्ञानिकांनी एक अशी कृत्रिम जीन बनवली आहे, जी उंदराच्या स्नायू-पेशींमध्ये इंजेक्शनच्या सुईने. घातली तर त्यांचे स्नायू वाढतात, इतकेच नाही तर वयाप्रमाणे अशक्तही होत नाहीत. प्रयोगाकडे खेळाडूंचे लक्ष आकर्षित झालेच आहे. जरी अजून माणसात असे प्रयोग झाले नसले तरी जीनोपचाराने सुधारलेले सायकलस्वार, शर्यतीत पळणारे किंवा वजने उचलणारे पहेलवान डोळ्यापुढे आणणे आज जड नाही.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने अशा जीनांद्वारा सुधारलेल्या खेळाडूंना खेळांमध्ये भाग घेण्याला मज्जाव करावा काय, आणि काय कारणाने करावा? अंमली पदार्थांच्या वापरालाही ऑलिंपिक्समध्ये परवानगी नाही. ड्रग्जच्या ह्या मज्जावाला दोन कारणे आहेत -खेळाडूंच्या शरीरांवरील त्यांचा वाईट परिणाम, आणि न्याय्यतेचा प्रश्न. सहज, वादासाठी असे समजू, की ह्या स्नायू बळकट करणाऱ्या जीनोपचारांचा खेळाडूंच्या तब्येतीवर काहीही अपायकारक परिणाम होत नाही. असे असताना तिच्या वापरावर बंदी आणण्याचे कारण उरेल काय? सुधारलेले पहेलवान भल्यामोठ्या गाड्या लीलया उचलताहेत, किंवा धावपटू तीन मिनिटांत मैलभर पळताहेत, अशी कल्पनाच कशीशी वाटते. पण खरेच असे काय आहे एवढे अस्वस्थ होण्यासारखे? त्या अतिमानवी शक्तीच्या कल्पना असल्यामुळे आपल्याला त्रास होतो, की त्यात काही अनैतिक आहे म्हणून?

तुम्ही म्हणाल, सुधारित खेळाडूला न सुधारलेल्या त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त फायदा (advantage) असेल पण, जर त्यात बाधाकारक काही नसेल, तर सगळेच खेळाडू जनुक उपचारपद्धती वापरू शकतील, नाही का? मग अन्यायाचा प्रश्नच उद्भवणार नाही.

स्नायूंचे जाऊ द्या. शास्त्रज्ञांनी स्मरणशक्ती वाढवणारी जनुके घालून सुपर-हुषार उंदीरसुद्धा निर्माण केले आहेत. हे उंदीर पटकन शिकतात आणि जास्त काळ गोष्टी लक्षात ठेवतात. जीवतंत्रज्ञान कंपन्या माणसांत वापरता येईल अशा स्मरणशक्ती वाढवणाऱ्या रसायनाच्या शोधात अनेक वर्षे आहेत. अशा औषधांचा उपयोग अल्झायमर्स किंवा डिमेन्शियासारख्या मेंदूशी संबंधित व्याधींसाठी होऊ शकणारच आहे पण ह्या कंपन्यांचे डोळे त्याच्या ‘इतर’ उपयोगांकडेही लागले आहेत मग ती विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरी सुधारण्याची सोय असो, नाहीतर सामान्यपणेच वयाबरोबर कमी होत जाणाऱ्या स्मरणाची घसरण थांबवण्याची सोय असो.

पण जो प्रश्न स्नायूंचा आहे तोच मेंदूचा/अकलेचाही. माणसाचे हे जैविक तंत्रज्ञानावरचे प्रभुत्व रोग बरे करण्यासाठी आणि दुखापती दुरुस्त करण्यासाठीच वापरण्यात यावे, की आपण आपली शरीरे आणि मेंदू ह्यांची पुनर्रचना करून ती सुधारण्याचाही घाट घालावा?

जैविक तंत्रज्ञानाचा सगळ्यात भुरळ पाडणारा आणि वैद्यकशास्त्राशी ज्याचा खरा संबंध नाही, असा वापर म्हणजे नवजात बाळाच्या लिंगाची निवड. शेकडो वर्षे आईबाप आपल्या मुलांची लिंग-निवड करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पुरुषांना मुलगा हवा आहे त्यांनी संभोगाच्या वेळी स्वतःचे डावे वृषण बांधून ठेवावे, असा सल्ला ॲरिस्टॉटल देतो. इतर काही मतांप्रमाणे गर्भधारणेच्या वेळच्या चंद्राच्या कलेचा बाळाच्या लिंगाशी संबंध आहे. आज जिथे हे सगळे जुने लोकाचार निरुपयोगी ठरले आहेत तिथे जैविक तंत्रज्ञान मात्र पूर्णपणे सफल झाले आहे. गर्भातील आनुवंशिक विकृती तपासण्यासाठी विकसित केलेल्या तंत्रांपैकी एक म्हणजे गर्भजल परीक्षा (amniocentesis). विकृतींबरोबरच गर्भाचे लिंगही ह्या तंत्रामुळे समजते आणि त्याचा उपयोग (दुरुपयोग?) गर्भपातासाठी केला जाऊ शकतो.

शुक्राणू (sperm) आणि अंडे (Oocyte) ह्यांच्या शरीराबाहेर करण्यात येणाऱ्या युतीच्या वेळी (In-vitro fertilisation – IVF) देखील गर्भ-निवड करता येऊ शकते. अशाप्रकारे तयार झालेल्या बीजांडांचे (embryo) लिंग काय असणार आहे ह्याची चाचणी याचे स्त्रीच्या गर्भाशयात रोपण करण्याआधीच करून नंतर हव्या त्याच लिंगाच्या बीजांडांचे रोपण करणेही शक्य आहे. आणि सगळ्यात अलिकडचे तंत्रज्ञान वापरून तर ह्याच्याही एक पायरी आधीच लिंग निवड करता येते. बाळाचे लिंग (किंवा, बीजांडाचे लिंग) हे बीजात असलेल्या गुणसूत्रावरून ठरते. X गुणसूत्र असलेल्या शुक्राणूची अंड्याशी युती झाल्यास बीजांड स्त्री-लिंगी होते, तर Y गुणसूत्राशी युती पुरुषलिंगी बीजांड तयार करते. हे नवे तंत्र वापरून X किंवा Y गुणसूत्रे असलेली बीजे त्यांच्या वजनांप्रमाणे वेगळी- वेगळी करता येतात. अशा प्रकारे हव्या त्या शुक्राणूची अंड्याशी युती होऊ देणे आता शक्य आहे. अमेरिकेत असलेल्या एका नफ्यासाठीच चालवल्या जाणाऱ्या जनन- क्षमताकेंद्रात (Fertility Clinic) हे तंत्र (ज्यांना ते परवडते त्यांना) देऊ केले जाते. तंत्र वापरायची परवानगी ह्या केन्द्राने अमेरिकेच्या कृषी विभागाकडून मिळवली आहे. कृषी विभागाने हे तंत्रज्ञान गुरांच्या पैदाशीसाठी विकसित केले होते.

लिंग-निवडीचा परिणाम हा लिंगभेदातच होणार, आणि तोही स्त्रियांविरुद्ध, हा त्याबद्दलचा एक आक्षेप आहे. आज चीनमध्ये 120 मुलग्यांमागे 100 मुली आहेत. उत्तर भारतातल्या काही भागांमध्ये 140 मुलग्यांमागे 100 मुली आहेत. पण अशी कल्पना करा, की लिंग-निवडीच्या तंत्रांच्या वापरामुळे कुठल्याही एका लिंगाला झुकते माप मिळत नसून उलट ह्या परिमाणात समतोलच साधला गेला. असे असेल तरीही त्यांचा उपयोग आक्षेपार्हच ठरतो का? आणि लिंगच नाही, तर उंची, डोळ्यांचा रंग, त्वचेचा रंग, हेही निवडता आले तर? आणि हुषारी, गोड गळा आणि खेळातली गती? ह्या सगळ्याच जनुकीय लुडबुडीच्या, नाक खुपसेपणाच्या देखाव्यांमध्ये काहीतरी खटकतं.

पण नक्की काय खटकतं? एक मत असे आहे, की GE मुळे मानवी प्रयत्नांचे, खटाटोपांचे महत्त्व कमी होईल. मानवी प्रयत्नांना दुय्यम ठरवण्याचा तो सोपा मार्ग ठरेल. ह्या मताप्रमाणे जो खेळाडू जनुकोपचाराचा आधार घेतो, तो आपोआपच कठोर, नियमित तालीम टाळू पाहतो. समजा, आपल्या आवडत्या फुटबॉलपटूचे सगळे पराक्रम त्याच्या सुधारलेल्या जीन्समुळे आहेत असे आपल्याला समजले, तर आपले त्याच्यावरचे प्रेम आणि त्याच्याबद्दलचा आदर कमी झाल्याशिवाय राहणार नाही.

जनुकीय सुधारणेला आक्षेप फक्त ती मानवी प्रयत्नांना दुय्यम ठरवेल म्हणूनच नाही. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या गरजा आणि लाड पुरवण्यासाठी निसर्ग आणि स्वतःचे माणूसपणही बदलण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, ह्याचे ते चिन्ह आहे. हाच जनुकीय सुधारणेमागचा सगळ्यात मोठा धोका आहे. परिस्थितीवर प्रभुत्व मिळवण्याची ही इच्छा माणसाला त्याच्या शक्ती आणि पराक्रमांचे खरे स्वरूप जाणून घेण्यापासून वंचित ठेवतात. देणगीस्वरूप असलेल्या ह्या गोष्टींची खरी पारख त्याला होत नाही.

जीवनातल्या ह्या ‘देणग्या’ मान्य करणे म्हणजेच आपल्या शक्ती आणि गुण हे सर्वस्वी आपल्या कर्तबगारीचा परिणाम नाहीत, ह्याची जाणीव असणे; मग त्या आपण प्रयत्नपूर्वक कितीही विकसित केलेल्या असोत. जीवनाच्या ह्या ‘देणगीपणाची’ जाणीव सगळ्या राक्षसी महत्त्वाकांक्षांना लगाम घालून माणसाला नम्रता शिकवते. ही कल्पना थोडी धार्मिक वाटत असली, तरी ती धर्माच्याही पलिकडे जाते.

आता आई-बाप होणे म्हणजे काय, ह्याबद्दल बोलू. आपली मुले ही आपल्याला मिळालेली देणगी आहे असे समजणे, म्हणजेच ती आहेत तसा त्यांचा स्वीकार करणे. आपले मूल हे आपण घडवलेली एक वस्तू आहे, किंवा आपल्या महत्त्वाकांक्षेचे साधन आहे, असा समज न करून घेणे. आई-वडिलांचे प्रेम हे मुलाचे गुण किंवा वैशिष्ट्ये ह्यांच्यावर अवलंबून असू नये. आपल्या मित्रांची किंवा जोडीदाराची निवड ही थोड्याफार प्रमाणात आपल्याला आवडलेल्या त्यांच्या गुणधर्मांवर बेतलेली असते, पण आपण आपली मुले ‘निवडत’ नाही. त्यांच्यात येणारे गुण आणि त्यांच्या कुवती ह्यांचे भाकीत शक्य नसते. कुठलेही आई-बाप त्यांची मुले ज्या प्रकारची निपजतात त्याला पूर्णपणे जबाबदार असू शकत नाहीत. म्हणजेच, एका दृष्टीने मुले आई-बापांच्या अपेक्षांशी असंबद्ध असतात; अनाहूत, आगंतुक असतात. म्हणूनच विल्यम एफ. मे म्हणतो त्याप्रमाणे इतर कुठल्याही नात्यापेक्षा आई-वडिलांचे नाते हे माणसाला ‘अनाहूताकडे औदार्याने बघायला शिकवते. (Openness to the unbidden)

‘अनाहूताशी औदार्य’ ही कल्पना आपल्याला जीन सुधारणेबाबत असलेली आपली सगळ्यात मोठी तक्रार समजावून घ्यायला मदत करते. आपला आक्षेप जैविक तंत्रज्ञान जी परिपूर्णता, जो निर्दोषपणा मिळवण्याचा प्रयत्न करते त्याला नसून, ते जी मानवी वृत्ती व्यक्त करते, उघडी पाडते, ज्या वृत्तीला उत्तेजना देते, तिला आहे.

आईबाप ज्या मुलांचा ‘आराखडा’ तयार करतात, त्या त्यांच्या मुलांची स्वाधीनता, स्वातंत्र्य ते बळकावतात ह्याबद्दल वाद नाहीच, कारण मुले स्वतःचे आनुवंशिक गुण निवडू शकत नाहीत. तर प्रश्नाचे मूळ अशा आईवडिलांच्या हावरटपणात, गर्वात (Hubris) आहे.

ही वृत्ती त्यांना स्वतःच्या मुलांचे मालक/अधिकारी जरी बनवत नसली, तरी त्यामुळे मुले आणि त्यांच्यातले नाते विद्रूप होऊन जाते. त्यामुळे ‘अनाहूताशी औदार्य’ ज्या सर्वव्यापी मानवी स्वभावाला खतपाणी घालू पाहाते त्याला असे आईबाप मुकतात.

GE वापरून आपल्या मुलांच्या तब्येतीची काळजी घेणारे आईवडील स्वतःला त्यांचे ‘आराखडाकार’ समजत नाहीत, किंवा मुलांना स्वतःच्या मर्जीखातर बनवलेली एक वस्तूही मानत नाहीत. पण जे आईवडील भरपूर पैसा ओतून आपल्या मुलाचे लिंग ठरवतात किंवा GE वापरून त्यांची बुद्धी किंवा मैदानावरील क्षमता वाढवण्याची इच्छा बाळगतात त्यांच्याबद्दल आपण हेच म्हणू शकणार नाही.

आज मला जुन्या सुप्रजननशास्त्राबद्दलच्या (Eugenics) वादाची आठवण येते. तो माणसाचा आपल्यातला जीन्सचा साठा (gene pool) सुधारण्याचा एक बेकायदेशीर प्रयत्न होता. GE चे टीकाकार म्हणतात, सुधारित मुलांची आस असणे हे एक प्रकारचे ‘privatised’ किंवा ‘Free market’ सुप्रजननच आहे. जनुकीय सुधारणेच्या पुरस्कर्त्यांचे ह्याला उत्तर असे आहे, की कुठल्याही दबावाखाली न येता केलेल्या जनुकीय निवडी खऱ्या अर्थाने सुप्रजनन मानता येत नाहीत. पूर्वीची सुप्रजननशास्त्रीय धोरणे तिरस्करणीय होती, कारण ती लोकांवर लादण्यात आली होती. उदा. जबरदस्तीने नपुंसकत्व / वंध्यत्व करण्याबद्दलचे कायदे.

मला हा बचाव चुकीचा वाटतो. नाझींनी सुप्रजननाला बदनाम केले हे कबूल. पण जेव्हा ते लोकांवर लादलेले नसते किंवा त्याचा शेवट एखाद्या समाजातील असंख्य व्यक्तीनी आपला जीव गमावण्यात (genocide) होत नाही, तेव्हादेखील ते तितकेच तिरस्करणीय आहे.

जबरदस्तीच्या एकच पाऊल अलिकडे थांबणारे हे आजकालचेच एक सुप्रजननीकरणाचे धोरण बघा. 1980-90 मध्ये सिंगापूरचे पंतप्रधान ली क्वान यू ह्यांना काळजी वाटू लागली, की सुशिक्षित सिंगापुरी बायका अशिक्षित बायकांपेक्षा कमी मुले पैदा करतात. ह्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये गुणी मुलांची संख्या घटत जाईल, अशी भीती त्यांना वाटली. ही (त्यांच्या मते) भयंकर अशी परिस्थिती टाळण्यासाठी पंतप्रधान साहेबांनी कॉलेज शिक्षण पूर्ण केलेल्या स्त्रियांना लग्न करून मुलांना जन्म देण्यास उत्तेजन देणारी धोरणे आखली. उदा. सरकारने कॉम्प्युटर मित्र- निवड-सेवा चालवायला घेतली; शिकलेल्या बायकांना मुले होऊ देण्यासाठी सांपत्तिक प्रलोभने दाखवण्यात आली, पदवी शिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रेमाराधनाचे वर्ग आणि अजून ज्यांची लग्ने व्हायची आहेत अशा पदवीधरांसाठी बोटींमधून फुकट प्रेम यात्रांची योजनाही केली. ह्या सगळ्यांबरोबर कमी वेतनश्रेणीतल्या स्त्रियांनाही ते विसरले नाहीत. स्वतःवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्यास मान्यता देणाऱ्या प्रत्येकीला कमी किमतीच्या एखाद्या फ्लॅटसाठी सरकारकडून डॉलर 4,000 देण्यात येणार होते.

सिंगापूरच्या ह्या धोरणाने सुप्रजननाला एक मुक्त बाजारपेठी कलाटणी दिली. त्यांनी नापंसत नागरिकांचे वंध्यीकरण (sterilization) केले नाही पण ते करून घेणाऱ्यांना पैसे देऊ करायला सुरुवात केली. सिंगापूरचे हे स्वेच्छेने केलेले सुप्रजननही हरकत घेण्यासारखेच आहे. इथे उघड उघड जबरदस्ती नाही, पण पुढच्या पिढीच्या जीनरचनेवर नियंत्रण ठेवण्याच्या महत्त्वाकांक्षेत काहीतरी भयंकर आहे. आजकाल हीच महत्त्वाकांक्षा राज्य-स्तरावर (सरकारने दिलेल्या निधीतून पुढे आलेल्या धोरणांमध्ये) न दिसता आई- वडिलांच्या वंशवाढीच्या निवडीत दिसून येते.

आजच्या जेनोमच्या युगात सुप्रजननाचे टीकाकार तसेच पुरस्कर्ते त्याबद्दल पुन्हा बोलू लागले आहेत. अँग्लो-अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञांचा एक गट नव्या ‘उदारमतवादी सुप्रजननशास्त्राची मागणी करू लागला आहे. ह्याचा अर्थ मुलाच्या स्वायत्ततेला (au- tonomy) ज्यामुळे आळा बसणार नाही अशी न लादलेली जनुकीय सुधारणा. निकोलस एगार म्हणतो, “जुन्या पद्धतीच्या अधिकारशाही गाजविणाऱ्या (authoritarian) सुप्रजननशास्त्रज्ञांना एकाच मध्यवर्ती आराखड्याप्रमाणे बनवलेल्या ढाच्यातून नागरिक ‘बनवण्याची’ इच्छा होती. नव्या, उदारमतवादी सुप्रजननाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याची/ सरकारची, ह्या निर्णयाबाबतची अलिप्तता.” इथे कल्पना अशी आहे, की सरकार आईबापांना त्यांनी मुलांचा ‘आराखडा’ कसा करायचा हे सांगणार नाही, आईबापही मुलांचे तेच गुण घडवतील, ज्यांमुळे त्यांच्यातील ‘कुवती’ वाढतील; पण त्यांच्या जीवनविषयक निर्णयांवर मात्र परिणाम होणार नाही.

पण, जबरदस्तीचे धोरण बंद केले तरी नैतिक आक्षेप संपून जात नाहीत. GE आणि सुप्रजनन ह्या दोघांचीही एक गोची आहे. दोघेही एकतर्फी विजयाचे प्रतिनिधी आहेत. जीवनाचा देणगी म्हणून स्वीकार करण्याऐवजी दुराग्रहाने त्याच्यावर मात करण्याचा हट्ट ते पुरा करतात. तुम्ही म्हणाल, ह्याबद्दल एवढे त्रस्त होण्यासारखे काय आहे? ही जनुकीय सुधारणेबद्दल वाटणारी अस्वस्थता एक अंधश्रद्धा म्हणून आपण झटकून का टाकू नये? जैविक तंत्रज्ञानात आपली ती ‘जे आहे ते देणगी म्हणून मान्य करण्याची’ (giftedness) भावना वाटून गेली तर काय वाया जाते आहे?

धर्माच्या नजरेतून ह्याचे उत्तर स्वच्छ आहे. आपले गुण आणि कुवती ह्या पूर्णपणे आपल्या कर्तबगारीतून आल्या आहेत असे मानणे म्हणजे आपली ‘Creation’ मधली जागाच न ओळखणे. असे करणे म्हणजे आपल्या आणि देवाच्या भूमिकांमध्ये गफलत करणे आहे. पण धर्म ह्या एकाच कारणासाठी आपण जीवनाच्या देणगीस्वरूपाचा विचार करायला हवा, असे नाही. ह्या नैतिक प्रश्नाबद्दल धर्मनिरपेक्ष पद्धतीनेही विचार करता येईल. ह्या नैतिक प्रश्नाचे वेगळ्या प्रकारानेही विश्लेषण करता येईल. माणसाच्या शक्ती आणि मिळकती ह्याकडे त्या आपल्याला मिळालेले वरदान किंवा देणगी आहे असे बघण्याची क्षमता जर आपण जनुकीय उत्क्रांतीमुळे घालवून बसलो, तर आपल्या नैतिक भूदृश्यामधल्या तीन गोष्टी पूर्णपणे बदलून जातील: नम्रता, जबाबदारी आणि बंधुत्व (solidarity).

जरा समजावून सांगतो. आपल्या समाजात, जिथे प्रभुत्व आणि नियंत्रण ह्यांना बराच मान मिळतो, तिथे नम्रता शिकायला आई-वडील होण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पालकत्वासारखी शाळा नाही. आपल्याला कुठल्या प्रकारची मुले व्हावीत हे जरी आपण निवडले / ठरवले नाही, तरी जी मुले आपल्याला होतात त्यांच्याबद्दल आपल्याला जिवापाड प्रेम वाटते. ही परिस्थिती – न मागता मिळालेल्या अनाहूताला जवळ करण्याची – मान्य करण्याची शिकवण आई-वडिलांना आपोआप पसरलेल्या जगाबद्दलही अंगीकारणे महत्त्वाचे आहे. ही शिकवण आपल्याला अनपेक्षित घटनाना सामोरे जायला, न पटलेल्या गोष्टींना बरोबर घेऊन जगायला (dissonance) आणि परिस्थितीवर सतत नियंत्रण ठेवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालायला मदत करते.

कधीकधी असे समजले जाते की जनुकीय सुधारणा ही मानवी प्रयत्नांना दुय्यम ठरवत असल्यामुळे माणसांची जबाबदारीची जाणीवही कमी होत जाते. प्रयत्न करण्याची जबाबदारी घटत जाते. पण खरी काळजी ही जबाबदारी कमी होईल अशी नसून तिचा विस्फोट होईल ही आहे. जसजशी नम्रता मागे पडत जाते, तसतशी जबाबदारी भयंकर प्रमाणात वाढते. आपण योगायोगापेक्षा (chance) निवड करण्यावर (choice) जास्त भर द्यायला लागतो. मुलांसाठी बरोबर गुण निवडण्याची किंवा तसे करण्यात अयशस्वी ठरण्याची पूर्ण जबाबदारी आईवडिलांवर पडते. खेळाडूंवर त्यांच्या टीमला जिंकण्यासाठी आवश्यक असे गुण कमावण्याची किंवा ते कमावण्यात अयशस्वी ठरण्याची पूर्ण जबाबदारी पडते.

स्वतःकडे देवाचा किंवा निसर्गाचा किंवा नशिबाने निर्माण केलेला जीव म्हणून बघण्यात एक मोठा फायदा आहे, आणि तो म्हणजे आपल्यावर आपण जसे आहोत त्याची सगळी जबाबदारी पडत नाही. आपण आपल्यात असणाऱ्या जीन्सच्या संचावर जितके जास्त प्रभुत्व मिळवू, तितकी आपल्याकडे जे गुण आहेत किंवा नाहीत ह्याची जबाबदारी, आपण काय काय मिळवू शकलो आहोत आणि नाही ह्याची जबाबदारी, ह्यांचे आपल्या डोक्यावरचे ओझे वाढतच जाईल. आज जर एखाद्या बास्केटबॉल खेळाडूची बास्केट हुकली, तर कोच त्याला तो चुकीच्या जागी होता म्हणून रागावू शकतो. उद्या तोच कोच त्या खेळाडूला तो चुकीच्या उंचीचा होता म्हणून रागावेल.

आता विरोधाभास असा, की एका बाजूला मुलांच्या आपल्यावरच्या जबाबदारीचा विस्फोट होत असतानाच दुसऱ्या बाजूला आपल्याहून कमनशिबी असलेल्या इतरांची जी आपल्यावर जबाबदारी असते, तिची जाणीव मात्र कमी होऊ शकते. आपल्या नशिबाची योगायोगाशी असलेली जोड (नाते) जेवढ्या डोळसपणे आपण पाहू, तेवढेच इतरांशी ते नशीब जोडण्याचे महत्त्व आपल्याला जाणवेल. तसेही, समाजातल्या यशस्वी व्यक्ती त्याच समाजातल्या सगळ्यात कमनशिबी (least advantaged) व्यक्तींना कशासाठी काही देऊ लागतात? ह्या प्रश्नाचे एक उत्तर ‘देणगीच्या’ – giftedness च्या – कल्पनेकडेच झुकते. जे नैसर्गिक गुण यशस्वी व्यक्तीच्या भरभराटीला कारणीभूत ठरतात त्यांचे श्रेय त्या व्यक्तीला न जाता तिच्या चांगल्या नशिबामुळेच तिला ते मिळाले असतात याकडे जाते. ती एक जनुकीय लॉटरीच असते, जनुकीय मटका ! जर आपल्या जीनसंचाचे श्रेय आपल्याला न जाता ती आपल्याला मिळालेली एक देणगी असेल, तर ते गुण वापरून जागतिक बाजारपेठेत मिळवलेली सगळी लूट फक्त आपल्या मालकीहक्काची आहे, असे मानणे चुकीचे आणि गर्विष्ठपणाचे आहे. म्हणूनच, ही मिळकत जे त्यांची काहीही चूक नसताना आपल्यासारख्या चांगल्या नशिबाला मुकले आहेत अशा लोकांबरोबर वाटून घेणे ही आपली जबाबदारी ठरते.

आपल्याला मिळालेल्या देणग्या ह्या आपल्या चांगल्या नशिबामुळेच आहेत ह्याची जाणीव असणे, हाच बंधुत्व आणि giftedness ह्यांच्यामधला दुवा आहे. आपल्या यशाचे मानकरी केवळ आपणच नाही, ह्याची समज माणसाची किंमत त्याच्या सफलतेवर तोलणाऱ्या, श्रीमंत लोक श्रीमंत आहेत कारण त्यांची योग्यताच गरिबांपेक्षा जास्त आहे, असे समजणाऱ्या समाजाला ‘यश हा सर्वोच्च सद्गुण आहे’ अशा अहंमन्य निर्णयापर्यंत घसरण्यापासून वाचवते.

जर GE ने जनुकीय मटक्याला मागे टाकले, योगायोगाने एखादी गोष्ट मिळण्याऐवजी दरवेळी तिची निवड करता यायला लागली, तर मानवी शक्ती आणि कमाई ह्यांचे ‘देणगीपण’ कायमचे संपुष्टात येईल. परिणामी, आपण सर्वजण एका सामुदायिक नशिबाचे वाटेकरी आहोत हे बघायची नजरही आपण गमावून बसू. यशस्वी व्यक्तींचे स्वतःकडे स्वयंनिर्मित आणि स्वयंपूर्ण म्हणून बघण्याचे प्रमाण वाढेल. गुणवत्तेवरचा नशिबाचा, योगायोगाचा, लगाम जाऊन ती अजूनच कठोर आणि अनुदार होईल.

आजच्या चढाओढीच्या समाजात सफळ होण्यासाठी आपल्या मुलांना GE वापरून तयार करणे हा एक (व्यक्ती) स्वातंत्र्याचाच भाग आहे, असे मानण्याचा मोह होऊ शकतो. पण जगात राहायला लायक होण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्ती बदलणे ह्यासारखी लाचारी नाही. त्यामुळे आपण जगाकडे चिकित्सकपणे बघणे बंद करतो. आपली सामाजिक आणि राजकीय सुधारणा करण्याची इच्छा मरण पावते. म्हणूनच मला वाटते, आपल्याला आणि आपल्या मुलांना GE वापरून जगात चपखल बसवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्यासारख्या अपरिपूर्ण (imperfect) मानवप्राण्याच्या मर्यादा आणि गुण सामावून घेईल अशा समाजाची आणि राजकारणाची निर्मिती आपण करावी.

सूचना पहिल्या वीस वर्षांचे बांधीव अंक उपलब्ध झाले आहेत. संचाची किंमत रु.5000/- (पोस्टेजसह) (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) असेल. 15 व्या वर्षांपासूनचे पुढील खंड हवे असणाऱ्यांस ते प्रतिवर्ष (प्रतिखंड रु.250/- (पोस्टेज अतिरिक्त) (अक्षरी रुपये दोनशेपन्नास प्रतिखंड ) इच्छुकांनी कृपया डिमांड ड्राफ्टने किंमत पाठवावी. चेकने पाठविल्यास वटणावळीपोटी रु.50/- जास्तीचे द्यावे. – कार्य. संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.