संपादकीय तुमच्याशिवाय नाही (भाग 3)

समाजाच्या एका भागाला लाभदायक आणि आवश्यक वाटणाऱ्या कृती दुसऱ्या एखाद्या भागाला जाचक ठरतात. दुसऱ्याला त्रास देणे, हा पहिल्या गटाचा हेतू नसतो. पण तो अटळ उपपरिणाम मात्र असू शकतो. असे विषमतेला जन्म देणारे, तीव्र करणारे उपपरिणाम अखेर मुळात कोणाला तरी लाभदायक वाटणाऱ्या हेतूंनाच बहकावून नेतात. हे ओळखून असे घातक उपपरिणाम टाळून मूळ हेतू जास्त व्यापक करणे, हाच दूरदृष्टीचा स्वार्थ. यालाच नीतीने वागणे, असेही म्हणतात; आणि विवेकाने वागणे, असेही म्हणतात.

आपण असे समजतो की ही दूरदृष्टी, ही नीतीची जाण, हा विवेक शासनयंत्रणा दाखवेल परंतु दूरदृष्टीने कृती निवडणे सोपे नसते. विशेषतः किचकट, गुंतागुंतीच्या, व्यामिश्र नातेसंबंधांवर रचलेल्या व्यवस्थांमध्ये ते फारच कठीण असते. एका जरा विक्षिप्त उदाहरणातून हे दाखवायचा प्रयत्न करतो.

1950-60 च्या काळात बोर्निओतील मलेरियाचे नियंत्रण करायला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ने) डीडीटीची फवारणी करायचे सुचवले. डांस मेले. मलेरियाचे प्रमाण कमी झाले आणि झोपड्यांची छपरे कोसळू लागली! छपरांमध्ये गवत खाणारे सुरवंट असत, आणि एक प्रकारच्या गांधीलमाश्या हे सुरवंट खाऊन जगत. डीडीटीने गांधीलमाश्या मेल्या आणि सुरवंट माजले. छते कोलमडू लागली म्हणून सरकारने झोपड्यांवर घालायला जीआयचे पत्रे दिले. पण त्या पत्र्यावरच्या पावसाच्या आवाजाने लोकांना झोप लागेनाशी झाली. बरे, डीडीटीने मेलेले कीटक खाऊन पालीही मरू लागल्या, आणि पाली खाणाऱ्या मांजरीही मरू लागल्या, मांजरी मेल्याने उंदीरघुशी माजल्या, आणि त्यामुळे टायफॉईड आणि प्लेगसारखे काही रोग पसरू लागले. WHO ने यावर उपाय म्हणून इंग्लंडच्या रॉयल हवाईदलाच्या मदतीने पंधरा हजार मांजरे पॅराशूटने बोर्निओत उतरवली!

गुंतागुंतीच्या व्यवस्थांबाबत तुकडे न पाडताच विचार करायला हवा. जे तुकडे पाडणे भौतिकी आणि रसायनशास्त्रात खपून जाते, ते पर्यावरणशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांत अनर्थकारी ठरू शकते.

भारतातल्या शेतीक्षेत्राचे प्रश्न अत्यंत व्यामिश्र आहेत. त्यांच्या सोडवणुकीत आपल्याला घोर अपयश येत आहे. एकूण समाजाचे या अपयशाकडे, शेतीक्षेत्राकडे होणारे दुर्लक्ष एकीकडे शेतकऱ्यांना आत्महत्यांकडे नेत आहे, आणि दुसरीकडे नक्षलवादासारख्या हिंसक चळवळींना जन्म आणि बळ देत आहे.

आत्महत्या जास्त असलेल्या भागांवर पॅकेजेसचा मारा करणे निष्फळ ठरले आहे. एकतर जी मदत दिली जाते, ती योग्य जागी न पोचता मधल्या, आधीच खात्यापित्या लोकांना पुष्ट करते. दुसरे म्हणजे, पॅकेजेस हा तात्कालिकच उपाय असू शकतो; दीर्घकालीन नाही. “तू मरायला टेकला आहेस का? मग वाड्यावर येऊन मापटंभर धान्य घेऊन जा, की!”, हा बंधुभाव नव्हे. हा आढ्यताखोर सामंतशाही प्रकार आहे. तो उपाय सुचवणारे अप्रत्यक्षपणे मदत घेणाऱ्याला गुलामगिरीत ढकलत आहेत, मग ते मनमोहनसिंग असोत, की नरेंद्र जाधव.

तात्कालिक उपाय टाकाऊच असतात, असे नाही. जेव्हा दूरदृष्टीचे उपाय सुचत नसतात, तेव्हा तात्कालिक उपाय प्राणवायूचे काम करतात. भारतातील 1970 नंतरची हरित क्रांती हा असा प्राणवायूसारखा परिणामकारक तात्कालिक उपाय होता. स्वातंत्र्यानंतरची पस्तीसेक वर्षे भारत अन्नधान्याबाबत परावलंबी होता. पाऊसपाणी जरा जरी प्रतिकूल झाले, तरी मोठ्या प्रमाणात अन्न, विशेषतः धान्य, आयात करावे लागे. लालबहादुर शास्त्रींनी यावर उपाय म्हणून आठवड्यातले एक जेवण (तरी) धान्य खाऊ नका, असे आवाहन केले. हे 1964 च्या आसपास सुरू झालेले शास्त्री सोमवाराचे व्रत नंतरही तीसेक वर्षे काही भारतीय पाळत असत.

पण 1972-74 च्या दुष्काळाने हा तुटपुंजा नैतिक उपाय फोल ठरवला. धान्याच्या आयातीची, स्वस्त धान्याच्या आयातीची भीक मागत भारतीय शासन जगभर फिरू लागले. अमेरिका त्यांच्या सार्वजनिक कायदा – 480 (PL – 480) योजनेखाली धान्य द्यायला तयार झाली. ते धान्य नेहेमीच भारतीयांच्या सवयीचे नसायचे. मायलो (milo) माहीत नव्हता. पण हा सौम्य प्रकार. काही अमेरिकन धान्यात अर्गट (ergot) नावाची बुरशी मिसळलेली होती, कारण ते धान्य गाईगुरांना देण्यासाठीचे होते, आणि अर्गटने गाई दूध जास्त देतात (म्हणे). तर हे अमेरिकन पशुखाद्य खाऊन भारतीय पोटे बिघडत असत. एकूणच या काळात भारताला तीव्र मानहानीला सामोरे जावे लागले.

यापासून सुटका मिळावी म्हणून अनेक प्रयत्न मनापासून केले गेले, आणि त्यांपैकी बहुतेक सारे शासकीय प्रयत्न होते. सिंचनाच्या योजना, हा त्यांपैकी एक महत्त्वाचा प्रयत्न. 1970 मध्ये सुमारे 3 कोटी हेक्टर सिंचित होते, ते 2000 मध्ये 5.5 कोटींना गेले. (अर्थातच या काळात सीमेंट व लोखंडावर नियंत्रणे होती, आणि निवास बांधकामांचे अग्रक्रम घसरलेले होते.)

जास्त उत्पादक बियाणे विकसित करून, उपलब्ध करून देणे, हेही जोमाने केले गेले. नॉर्मन बोलौंग यांचे गव्हाबाबतचे काम तर पुढे शांतीसाठीच्या नोबेल पारितोषिकाने नावाजले गेले. (अर्थातच यामुळे स्थानिक वाणांकडे दुर्लक्ष झाले आणि पीकरचनेत एकसुरीपणा आला.)

रासायनिक खते आणि औषधे (कीटकनाशके, तणनाशके) यांचा वापरही वाढला. याने उत्पादन वाढून काही शेतकरी श्रीमंत झाले, आणि पुढे अधिकस्य अधिकं फलं हा मंत्र जपत रसायनवापर गरजेपेक्षा बराच जास्त होऊ लागला. (अर्थातच याचे भीषण दुष्परिणाम आज दिसू लागले आहेत. रसायनांना न जुमानणाऱ्या कीटकांच्या आणि तणांच्या जाती, नैसर्गिक पोषणक्षमता गमावलेली पंजाबातली जमीन, कर्करोगादि आजारांमधली वाढ, वगैरे उदाहरणे स्वतःच तपासावी.) पण एकत्रित परिणामांत मात्र या हरित क्रांतीला यश मिळाले. 1971 मध्ये 54.8 कोटी लोकसंख्या आज (2006-07) 112.2 कोटी, म्हणजे दुप्पटीपेक्षा जास्त होऊनही अन्नाबाबत आपण जवळपास स्वावलंबी आहोत. (अर्थातच यामुळे लोकसंख्या वाढण्याचा दर कमी करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आणि होत आहे.)

हरित क्रांतीची ही कहाणी तपासून एक महत्त्वाचा निष्कर्ष काढता येतो. प्रत्येक अन् प्रत्येक क्रियेला काही अनपेक्षित, अनाहूत, नकोसे वाटणारे उपपरिणाम असतातच. प्रत्येक कृतीचे काहीतरी मोल द्यावे लागतेच. इंग्रजीत हे तथ्य There are no free lunches या रूपात मांडले जाते. काहीही फुकट मिळत नसते. द्यावे लागणारे मोल आणि साधला जाणारा परिणाम यांचा हिशोब सतत मांडावा लागतो, व ज्या क्षणी किंमत फार पडते आहे असे वाटेल, त्या क्षणी कृती थांबवावी, बदलावी लागते. तसे न केल्यास हानिकारक, महागडे उपपरिणाम कृतीला विफल करतात.

असा हिशोब नेहेमीच मांडता येतो, असे नाही. व्यामिश्र व्यवस्थांमध्ये हस्तक्षेपाचे परिणाम नेहेमीच अस्पष्ट असतात. एकूण व्यवस्थेचे भरपूर ज्ञान असले तरीही एका कृतीचे अनेक परिणाम असतात, आणि त्यांची नेमकी भाकिते वर्तवता येत नाहीत. इथेही मुद्दा ठसवण्यासाठी एक कहाणी सांगतो, ओ हेन्री या प्रसिद्ध लघुकथालेखकाची अ हार्लेम ट्रॅजेडी नावाची.

हार्लेम ही न्यूयॉर्क शहरातली काळ्या अमेरिकनांची वस्ती. तिथे दोन शेजारणींमध्ये मैत्री होते. एक मैत्रीण दर काही दिवसांनी नवनवे कपडे घालत असते, तर दुसरी, आपली नायिका, तेच ते कपडे रगडत असते. ती एकदा मैत्रिणीला नवनव्या कपड्यांचे रहस्य विचारते. मैत्रीण सांगते “नवरा घरी आल्यावर मी त्याच्यामागे खूप कटकट करते, की मला एकटीला सगळी धुणीभांडी करावी लागतात, तर तो बाहेर उंडारत असतो. मग तो चिडून मला एक थप्पड मारतो. काही वेळानं मी सुजट गालानं पुन्हा कटकट करून त्याला तो पापी आहे हे जाणवेल, असं वागते. दुसऱ्या दिवशी माफी मागत तो नवा ड्रेस आणून देतो!” जुनेच कपडे वापरणारीला ही युक्ती आवडते. दुसऱ्या दिवशी नवरा कामाहून आल्यावर ती एकटीलाच कसे सगळे घरकाम करावे लागते, यावरून त्याला छळते.

आणि जरा वेळानं रडत जाऊन मैत्रिणीला सांगते, “तो कपडे धुतो आहे!” म्हणजे माणसाचे मन या मराठी साहित्यात घासून गुळगुळीत झालेल्या व्यामिश्र रचनेने एकसारख्या दोन कृतींचे पूर्णपणे वेगवेगळे परिणाम दाखवले.

जर हे उदाहरण पोरकट वाटले असेल (तसे ते आहेच!) तर एक लक्षात ठेवावे, की जरा जराशा, नगण्य फरकांपासून अपार वेगवेगळे परिणाम कसे घडतात ते दाखवणारे नियतवादी कोलाहलशास्त्र (deterministic chaos theory) विकसित झाले आहे. ते वैज्ञानिक तत्त्वांच्या, ज्ञानाच्या भाकिते वर्तवण्याच्या क्षमतांच्या मर्यादा रेखून देते आहे. त्या शास्त्रातला एक मोठा तज्ज्ञ स्टुअर्ट कॉफमन (Stuart Kauffman) म्हणतो — अशा काट्यावरच्या जगात आपण दूरवरच्या भविष्यकथनाची ‘नाटके’ सोडून द्यायला हवीत. आपल्याला आपल्या सर्वोत्तम क्रियांचे खरे परिणाम समजू शकत नाहीत. आपण सर्व खेळाडू स्थानिक शहाणपण दाखवू शकतो, वैश्विक शहाणपण नाही. आपण एवढेच करू शकतो, सगळे जण एवढेच करू शकतात, की पँट सावरायची, बूट चढवायचे आणि उत्तमात उत्तम जे करू शकतो ते करत राहायचे. (In such a poised world, we must give up the pretense of Long-Term prediction. We cannot know the true consequences of our own best actions. All we players can do is be locally wise, not globally wise. All we can do, all anyone can do, is to hitch up our pants, put on our galoshes, and get on with it the best we can.)

आता अर्थातच प्रश्न येतो, आपण उत्तमात उत्तम असे काय करू शकतो, हा. याची तात्कालिक उत्तरे दर प्रश्नासोबत आणि तो सोडवणाऱ्यांच्या कुवतीसोबत बदलतील. दूरदृष्टीचे उत्तर मात्र एकच असते, असे माझे मत आहे. ते उत्तर म्हणजे, ओळखीच्या परिस्थितीपासून फार दूर जाऊ नये, व तात्कालिक कारणांसाठी तसे जावे लागल्यास शक्य तितक्या लवकर परत यावे. याला सबळ कारण आहे. पृथ्वीवर जीव उद्भवल्यापासून कोट्यवधी जीवजाती घडल्या. आज यांपैकी एक टक्काही अस्तित्वात नाहीत. नव्याण्णऊ टक्क्यांपेक्षा जास्त जीवजाती परिस्थितीतल्या बदलांमुळे नष्ट झाल्या. जेव्हा बदल वेगवान, झटक्यांसारखे होते, तेव्हा जीवजाती नष्ट होण्याची प्रमाणेही प्रचंड होती, काही घटनांमध्ये तर 97% इतकी जास्त ! संथ बदलांमध्ये मात्र जीवजाती नष्ट होण्याचे प्रमाण सौम्य होते, कारण जीवांना नव्या परिस्थितीशी जुळते होत जाण्याला, उत्क्रांत होण्याला, वेळ मिळत होता. असा वेळ मिळत राहावा, यासाठी ओळखीच्या स्थितीजवळच राहायला धडपडणे विवेकी ठरते. माणसांच्या कृतींनीच परिस्थिती बदलत नसते. ती नैसर्गिक कारणांनीही बदलत असते; आणि यावर माणसांचे नियंत्रण नसते. पण मानवी परिणाम सौम्य, नगण्य ठेवणे, हा विवेक आहे.

सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते, रसायने व ऊर्जेचा जोमदार वापर करण्याला विरोध करणारे, लोकसंख्या मर्यादित ठेवायला सांगणारे, जंगलतोड थांबवायला सांगणारे, विषमता वाढवू नका असे म्हणणारे, हे सगळे लोक असा विवेक दाखवत असतात. त्यांची भाषा भावनाप्रधान असते, त्यांची आंदोलने टिपेचा सूर लावतात, हे सारे खरे आहे. पण त्यामुळे त्यांच्या मागण्यांमागचा विवेक लपत नाही.

आज जीन्स – बदललेल्या वाणांवरची चर्चाही या अंगाने पाहायला हवी. जीन्स- बदललेली वाणे नैसर्गिक निवडीपुढे फार काळ टिकणार नाहीत, असा माझा अंदाज आहे. त्यांच्या वापरातून मिळणारे फायदे काही पिढ्यांतच नष्ट होतील. आजही होत आहेत. त्यामुळे आज पोटे भरायला जीन्स-बदललेली वाणे वापरावीही. पण तो तात्कालिक, आपात्कालीन, आणीबाणीचा उपाय आहे, याची जाणही ठेवावी. नैसर्गिक वाणेही सांभाळावी. मानवी लोकसंख्या शाश्वततेच्या मर्यादा मागे टाकून सुजली आहे, याची जाण ठेवावी. विषमता वाढू देणे शाश्वतीला, स्थैर्याला मारक आहे, याची जाण जागती ठेवावी. संजय गणोरकर ज्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ इच्छितात, त्या घटकांची निवड मला असा दूरदृष्टीचा विवेक दाखवताना दिसते. त्यांच्या यादीची उजळणी करून हे लांबलेले संपादकीय संपवतो.

* आयुष्यभर केवळ नाइलाजाने शेती करणारे वडील. * जुन्या प्रचंड श्रीमंत खानदानी वाडा-संस्कृतीतून गरिबीत नेटाने संसार करणारी आई. गावातला सुशिक्षित, अल्पभूधारक, कोरडवाहू शेती वाहणारा बाल सवंगडी. * उंबरठा ओलांडलेली, शिकलेली संवेदनशील स्त्री. * आजच्या अर्थव्यवस्थेने नाकारलेले महात्मा गांधी यांचे “स्वावलंबी खेडे” अपूर्ण स्वप्न. * पुढचा जन्म तरी निदान चौपदरी हमरस्त्याचा किंवा त्यावरून पळणाऱ्या मोटारींचा मिळावा ही अंतिम इच्छा बाळगणारा स्वप्नाळू मनाचा आत्महत्या केलेला तरुण मित्र. * मूठभर दाणे फेकल्यावर खंडीभर परत करणारी विदर्भाची काळी माती – माय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.