पुस्तक परीक्षण : विसाव्या शतकातील मार्क्सवाद

अशोक चौसाळकर यांचे ‘मार्क्सवाद उत्तरमार्क्सवाद’ हे पुस्तक विसाव्या शतकातील मार्क्सवादी विचारांचा विस्तृत पट आपल्यासमोर उलगडून ठेवते. विशेषतः आजच्या घडीला याचे विशेष महत्त्व आहे व उपयोग आहे. भारतात व महाराष्ट्रात मार्क्सवादावर आधारलेल्या चळवळी आज बऱ्याचशा मंदावलेल्या आहेत व कुंठित अवस्थेला आलेल्या आहेत. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व इतर काही देश वगळता जगभरसुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. केवळ या ना त्या नेतृत्वाच्या चुकांमुळे किंवा अमुक अपप्रवृत्तींची लागण झाल्यामुळे हे घडलेले नाही. तसेच, जणू काही एक अमोघ व परिपूर्ण असे मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धान्तन तयारच आहे; फक्त त्याच्या चुकीच्या उपयोजनामुळे हे घडत आहे असे म्हणणेही बरोबर नाही. मुळातच मार्क्सवादी विचारांत सैद्धान्तिक पातळीवरच अरिष्ट निर्माण झालेले आहे हे लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रश्न आहे. आजवर पडलेल्या चाकोऱ्यांतून बाहेर पडून, सगळी झापडे व जोखडे टाकून देऊन, मार्क्सवादी विचारांचा साचलेला प्रवाह परत मोकळा व खळाळता झाला पाहिजे. समग्र मानवमुक्तीची व क्रांतिकारक समाजवादाची कास धरून खुल्या, मुक्त व सर्जनशील पद्धतीने विचार व्हायला पाहिजे, अशी आज गरज आहे.

अर्थातच, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे करायचे म्हटले, तर विसाव्या शतकातील मार्क्सवादी विचार व व्यवहाराचा चिकित्सक लेखाजोखा घेणे प्रथम आवश्यक आहे. चौसाळकरांचे पुस्तक हेच काम करण्याचा एक प्रयत्न आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचे लेखन फारसे नाही, हे लक्षात घेऊन या पुस्तकाचे स्वागत करायला हवे.

या पुस्तकातील विवेचन चौसाळकर यांनी तीन भागांत विभागले आहे. त्यांतील पहिल्या भागात मार्क्सच्या मानवी जीवनविषयक चिंतनाचा विचार त्यांनी केला आहे. आर्थिक व राजकीय विचार म्हणून आपल्याकडे मार्क्सवाद काही प्रमाणात परिचित आहे; पण मानवी जीवनाच्या आत्मिक पैलूवर मार्क्सने अतिशय मूलगामी चिंतन केले आहे. मानवाचा मानवीपणा मुळात काय आहे, त्याच्या जीवनाचे स्वरूप काय व श्रेयस काय, माणूस स्वतःच्या माणूसपणाला कसा पारखा होतो व या परात्मभावाचा निरास कसा होईल, स्वातंत्र्याचा अर्थ काय, व्यक्तित्त्व व सामाजिकता यांचे कोडे कसे समजावून घ्यायचे, यांसारख्या प्रश्नांवर मार्क्सने एक नवीन दृष्टी दिली. आणि त्याचे हे तत्त्वचिंतन म्हणजे केवळ आकाशातले अध्यात्म नाही, तर भांडवलशाहीवरील त्याच्या टीकेशी व समाजवादाच्या उभारणीतील व्यावहारिक प्रश्नांशी या चिंतनाचा आंतरिक संबंध आहे. उदाहरणार्थ, मुक्ती म्हणजे काय व परात्मभाव ही काय संकल्पना आहे याचा साक्षात संबंध सोविएत युनियनमधील लोकशाहीचा अभाव व सक्रिय आणि जिवंत जनजीवनाचा अभाव यांच्याशी आहे. किंबहुना, मार्क्सचा समाजवादाचा प्रकल्पच मुळात यांत्रिकपणे व उथळपणे समजावून घेतल्यानेच ही शोकांतिका घडून आली, असेच म्हणावे लागते.

मार्क्सवादातल्या या महत्त्वाच्या भागाचा परिचय करून देणारे लिखाण मराठीत फारच कमी आहे. प्रस्तुत पुस्तकात चौसाळकरांनी एका प्रकरणामध्ये मानवी स्वातंत्र्याची भांडवली-उदारमतवादी संकल्पना आणि हेगेलची स्वातंत्र्याची संकल्पना या दोन्हीपेक्षा मार्क्सची स्वातंत्र्याची संकल्पना कशी वेगळी आहे, हे स्पष्ट केले आहे. मार्क्सची संकल्पना एकीकडे माणसाच्या श्रेयसशी जोडलेली आहे; स्वतःची मानुषता गमावून बसलेल्या माणसाला परात्मभावाचा निरास होऊन माणूसपणा कसा लाभेल व तो मुक्त कसा होईल, याच्याशी जोडलेली आहे; तर दुसरीकडे ती श्रम, शोषण, विषमता व उत्पादनसंबंध यांच्याशी आंतरिकपणे जोडलेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे केवळ औपचारिक हक्क, घटनात्मक तरतुदी, निवडणुकीतले मतदान यांच्यापुरते राहत नाही; तर स्वातंत्र्याचा लढा दारिद्र्य, शोषण व विषमता नष्ट करून प्रेम व सहकार्यावर आधारित समाजवादी समाजाच्या प्रस्थापनेपर्यंत जाऊन पोचणारा बनतो. दुसऱ्या प्रकरणातील समता या मूल्याविषयीच्या मार्क्सच्या विचारांचे विवेचन याच स्वरूपाचे आहे. केवळ औपचारिकपणे समतेची संकल्पना समजून घेण्याऐवजी तिला वर्गीय संबंध, स्त्री-पुरुष व शहर-खेडे संबंध, जातिव्यवस्था इत्यादी ठोस प्रश्नांशी जोडून घेण्याचा मार्ग मार्क्सने मोकळा करून दिला.

मराठी वाचकांच्या दृष्टीने या पुस्तकातला सर्वांत महत्त्वाचा भाग माझ्या मते नवमार्क्सवादावरचे चौसाळकर यांचे दोन लेख हा आहे. साधारणतः मार्क्सवाद व त्याचा विकास म्हटला की, आपल्यासमोर मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ अशी नावे येतात. ते साहजिकही आहे. परंतु गेल्या शतकामध्ये पाश्चात्त्य जगातील इतर अनेक प्रतिभावान भाष्यकारांनी व विचारवंतांनी मार्क्सवादी विचारांचा विकास केला व त्यात मोलाची भर टाकली. चौसाळकरांनी यातील खालील विचारवंतांचा नवमार्क्सवादाच्या विवेचनात समावेश केला आहे.

1) सन 1930 च्या आगेमागे होऊन गेलेले ग्राम्शी, ल्युकाश, कॉर्श इत्यादी. 2) फ्रँकफुर्ट स्कूल या नावाने प्रसिद्ध असलेले हॉर्कहायमर, अडॉनों, बेंजामिन, एरिक फ्रॉम, हाबरमास हे विचारवंत. 3) 1967 च्या आसपास चर्चिले गेलेले मार्क्यूज, सार्त्र, अल्थूझर इत्यादी. 4) फ्रान्स, स्पेन व इटली येथील कम्युनिस्ट पक्षांमध्ये जन्मलेला युरोकम्युनिझमचा प्रवाह. 5) चीनमधल्या सांस्कृतिक क्रांतीच्या प्रभावाने जन्मलेले युरोप- अमेरिकेतले माओवादी गट. 6) पूर्व युरोपातले 1980 च्या सुमारासचे रुडॉल्फ बाहरो व तत्सम विचारवंत. (यामध्ये तिशीच्या दशकातले ख्रिस्तोफर कॉडवेल, जॅक्सन, पोस्टगेट या व साठीच्या दशकातल्या रेमंड विल्यम्ससारख्या ब्रिटिश मार्क्सवादी विचारवंतांचा उल्लेख असायला हवा होता.)

चौसाळकरांनी म्हटल्याप्रमाणे नवमार्क्सवाद ही संज्ञा तशी फारशी सुस्पष्ट नाही. पेरी अँडरसनसारखा लेखक या सगळ्यांचा पाश्चात्त्य मार्क्सवाद असा निर्देश करतो. नवमार्क्सवाद ही संज्ञा साधारणतः 1967 नंतरच्या काळातील विचारांना काहीजण वापरतात. पण, हा केवळ नामांकनाचा प्रश्न झाला.

साहजिकच दोन लेखांच्या मर्यादित या सर्व विचारवंतांचा स्थूलमानाने परिचय करून देणे व त्यांनी मांडलेल्या नव्या आणि महत्त्वाच्या संकल्पना नमूद करणे एवढेच शक्य झालेले आहे. परंतु यावरूनदेखील विसाव्या शतकातील मार्क्सवादी चिंतनाचे विराट दर्शन आपल्याला घडते आणि त्यातील विविधतेने व समृद्धतेने चकित व्हायला होते. चौसाळकरांनी यांपैकी एका लेखात सरसकट नवमार्क्सवादी विचारप्रवाहाची ओळख करून देऊन त्याची चिकित्सा केली आहे, तर दुसऱ्या लेखात यातल्या काही निवडक विचारवंतांच्या संकल्पनांचा परिचय करून दिला आहे.

सोविएत मार्क्सवादाच्या यांत्रिक व ठोकळेबाज प्रवृत्तीविरुद्ध मार्क्सच्या हेगेली बाजूवर, म्हणजे द्वंद्वात्मकतेवर यातील काहींनी भर दिला. काहींनी इतिहासाच्या जडवादी मीमांसेमधील पाया व इमला या प्रतिमानाची परखड चिकित्सा करून, त्याचा खरा मार्क्सप्रणीत अर्थ पुढे आणला. मार्क्सच्या प्रारंभीच्या काळातील चिंतनामधील परात्मभाव या संकल्पनेचे महत्त्व इतरांनी प्रकर्षाने पुढे आणले. समाजातील सांस्कृतिक जीवन, माध्यमांचे स्थान, भाषाव्यवहार व संप्रेषण, कला-साहित्य अशा विषयांचे सखोल चिंतन यात झाले. ग्राम्शी या इटालियन कम्युनिस्ट विचारवंताने प्रॅक्सिस, हेजिमनी, ऑर्गनिक इंटलेक्चुअल अशा समर्थ व चळवळीच्या धोरणनिश्चितीला उपयुक्त अशा संकल्पना पुढे मांडल्या.

यातल्या बहुतेकांना राजकीय प्रश्नांबाबतसुद्धा लक्षणीय काही म्हणायचे होते. स्थूलमानाने सांगायचे, तर विज्ञान-तंत्रज्ञानाचे व भौतिक विकासाचे स्तोम माजवणे नवमार्क्सवाद्यांना मान्य नव्हते. स्टॅलिनच्या कारकीर्दीतल्या दडपशाहीच्या अनुषंगाने, यांच्यापैकी बऱ्याचजणांनी लेनिनवादी राजकीय विचारांना व त्यांमधील वर्ग-पक्ष-राज्यसंस्था यांसंबंधीच्या मांडणीला विरोध केला. निदान पाश्चात्त्य जगात तरी औद्योगिक कामगारवर्ग आता क्रांतिकारक उरलेला नाही असे काहींनी मांडले. चौसाळकरांनी या सर्व मांडणीनंतर नवमार्क्सवाद्यांच्या त्रुटी व दोष यांचीदेखील चर्चा केलेली आहे. ग्राम्शी, ल्युकाश अशांसारखी काही माणसे वगळली, तर यांपैकी बहुतेक विचारवंत प्रत्यक्ष क्रांतिकारक चळवळीत वा समाजवादी शासन राबवण्यात सहभागी नव्हते. त्यांचा भर मुख्यतः तरुण मार्क्स च्या मानवचिंतनावर, परात्मभाव व स्वातंत्र्य यांसारख्या विचारांवर होता आणि भांडवलशाहीचे. आर्थिक विश्लेषण किंवा राजकीय समस्या यांची फारशी मीमांसा त्यांनी केली नाही. प्रस्थापित कम्युनिस्ट चळवळीवर टीका करताना, पर्यायी राजकारण व लोकशाही कारभार, आर्थिक विकासाचा पर्यायी मार्ग याची काहीच मांडणी त्यांच्याकडून झाली नाही. साम्राज्यवाद व अविकसित देशांच्या समस्यांकडे त्यांचे लक्षच नव्हते, कारण त्यांची दृष्टी युरोपकेंद्रित होती. असे महत्त्वाचे मुद्दे चौसाळकरांनी या संदर्भात मांडले आहेत.

तिसऱ्या जगातील अर्थव्यवस्थांबद्दलच्या गोपाळ राणे यांच्या नववसाहतवाद आणि आधुनिक भारत या पुस्तकावरील परीक्षणलेखाचा या भागात समावेश आहे. परंतु, साम्राज्यवादाचे नव्या तऱ्हेने विश्लेषण करणाऱ्या, परिघ व केंद्र या कल्पनेचे विवेचन करणाऱ्या आंद्रे सुंदर फ्रँक, वॉलरस्टाइन, समीर अमीन आदि लेखकांचा परिचय नवमार्क्सवादाच्या आशयसूत्राच्या दृष्टीने अधिक समुचित झाला असता.

सत्ताधारी मार्क्सवादातले वादविवाद पण मार्क्सच्या विचारांनी केवळ जगाचे वैचारिक-सांस्कृतिक आकाशच भारून टाकले असे नाही, तर मानवजातीच्या इतिहासात जमीन हादरवून टाकणाऱ्या उलथापालथी मार्क्सवादाने विसाव्या शतकात घडवून आणल्या. सन 1917 मधल्या रशियातील क्रांतीपासून सुरू झालेल्या प्रक्रियेने, चिनी क्रांतीचा टप्पा घेत, पुढच्या पन्नास वर्षांत एकतृतीयांश जग भांडवलशाहीच्या कचाट्यातून मुक्त केले आणि समाजवादाच्या उभारणीचे प्रयत्न तेथे सुरू झाले. या शतकातच वसाहतवादाच्या जोखडाखाली जगणारी जगातली सत्तर टक्के जनता स्वतंत्र झाली आणि त्यांतही देशोदेशींच्या कम्युनिस्ट पक्षांचा लक्षणीय सहभाग होता. मध्यंतरी भांडवलशाहीतल्या अरिष्टामुळे निर्माण झालेल्या फॅसिझमच्या राक्षसाला नेस्तनाबूत करण्याची मुख्य जबाबदारीही सोविएत युनियन व कम्युनिस्ट आंदोलनाने पार पाडली. आणि शतकाची अखेर होईपर्यंत सोविएत सत्ता कोसळून पडली होती, चीनची वाटचालसुद्धा समाजवादी म्हणता येईल अशा दिशेने चाललेली नव्हती. सगळीकडे डावी चळवळ मंदावली होती आणि नव्या वित्तभांडवलशाहीचा वरवंटा अमानुषतेचे जागतिकीकरण करत फिरू लागला होता.

या संपूर्ण गुंतागुंतीच्या घटनाक्रमाशी संलग्न जे मार्क्सवादी विचारमंथन व वादविवाद झाले त्यांचा आढावा चौसाळकरांनी पुस्तकाच्या दुसऱ्या भागातील चार लेखांमध्ये घेतला आहे. समाजवादी स्वप्नाची व डाव्या चळवळीची पुनर्मांडणी करण्याच्या दृष्टीने हा भागदेखील महत्त्वाचा आहे.

रशिया व चीनमधील सत्तास्थापनेनंतर मोठे गुंतागुंतीचे व प्रचंड आकाराचे काम तेथील मार्क्सवाद्यांवर येऊन पडले. तंत्रज्ञान व औद्योगिकीकरण यांच्याबाबत मागासलेल्या, शेतीप्रधान, जुनाट सरंजामी सामाजिक-सांस्कृतिक परंपरांचे ओझे वागवणाऱ्या व लोकशाहीची तोंडओळखही नसलेल्या देशांत हे कार्य करायचे होते. एकतर साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोर आक्रमकतेला तोंड देऊन स्वतःचे अस्तित्व टिकवायचे, भौतिक विकास घडवून आणायचा व नवी अर्थरचना स्थापित करायची, समाजवादी ध्येयाला अनुरूप अशी मानसिकता व सांस्कृतिक जाणिवा जनजीवनात फुलवायच्या, आणि या सगळ्यांना पूरक व पोषक अशी जनसहभागावर आधारलेली लोकशाही राज्यपद्धती विकसित करायची, असे हे गुंतागुंतीचे आह्वान होते.

पण या दोन्ही देशांमध्ये आधीच्या चढउतारांनंतर हळूहळू ज्या प्रक्रिया व प्रवृत्ती प्रस्थापित झाल्या, त्यांच्या परिणामी हे घडले नाही. आधी प्रचंड वैज्ञानिक-तांत्रिक व आर्थिक विकास झाला; पण त्याचा मूळ ढाचा असा रचला गेला की नंतर ही गती थंडावत गेली. पक्ष व शासन यांच्यातील अंतर्गत लोकशाही व जिवंतपणा नष्ट झाला. ही दोन्ही सत्ताकेन्द्रे जनतेच्या सहभागापासून दुरावत गेली व अलग पडली. वैचारिक-सांस्कृतिक जीवन एकसुरी व निष्प्राण झाले आणि सर्वसामान्य लोकांमधली राजकीय जागरूकता आणि सक्रियता लोप पावून, समाजवादी ध्येयाप्रति उदासीनता आली व क्रमशः भोगवादी व व्यक्तिवादी प्रवृत्ती प्रबळ झाल्या.

या सगळ्या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टॅलिन, ख्रुश्चेव्ह व माओ यांनी मांडलेल्या राज्यसंस्थाविषयक विचारांचा आढावा चौसाळकरांनी सहाव्या प्रकरणात घेतला आहे. विशेषतः वर्ग, पक्ष, शासनंयत्रणा यांच्या परस्परसंबंधांबद्दलची मांडणी हा येथे कळीचा मुद्दा होता. या परीक्षणपर लेखामध्ये पुस्तकातील तपशीलवार मांडणीचा आढावादेखील शक्य नाही, फक्त काही गोष्टींकडे लक्ष वेधणे शक्य आहे. स्टॅलिनच्या अनिर्बंध एकाधिकारशाहीला व जुलमी राजवटीला पोषक अशीच त्याची सैद्धान्तिक मांडणी होती. एकीकडे तिच्यात कामगार शेतकऱ्यांच्या लोकशाहीचा व तत्सम गोष्टींचा समावेश होता. परंतु दुसरीकडे शासनाकडे पक्षाच्या हातातले एक हत्यार म्हणून पाहणारा व जनतेच्या सक्रिय सहभागाला निर्णयप्रक्रियेत अजिबात स्थान न देणारा दृष्टिकोन त्यामागे होता. विसाव्या काँग्रेसमध्ये ख्रुश्चेव्हने स्टॅलिनच्या कारकीर्दीतील लोकशाहीच्या अभावांचा व जुलमांचा पाढा वाचला. परंतु, ख्रुश्चेव्ह व ब्रेझनेव्ह यांच्या राजवटीतही परिस्थितीत फारसा मूलगामी बदल झाला नाही.

स्टॅलिनच्या कारकीर्दीच्या मूल्यमापनावरून सोविएत नेते व माओ यांच्यात वाद झाला. एका स्वतंत्र प्रकरणात माओचे राजकीय विचार लेखकाने आपल्यासमोर मांडले आहेत. जनतेच्या विविध वर्गांमधले अंतर्विरोध कसे हाताळायचे, नोकरशाहीला माजू न देता जनतेच्या सक्रिय सहभागाने काबूत कसे ठेवायचे, आर्थिक विकासाच्या बरोबरीने नव्या राजकीय-सांस्कृतिक जाणिवा जनतेत सतत कशा जागृत ठेवायच्या, याबाबत माओने सर्जनशील चिंतन केले. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमागे याच प्रेरणा होत्या. स्टॅलिनच्या यांत्रिक जडवादी प्रवृत्तीऐवजी माओने द्वंद्वात्मक पद्धतीने विचार केला. शहरे व खेडी, आर्थिक जीवन व सांस्कृतिक जीवन, शासनव्यवहार व जनतेची मुक्त क्रियाशीलता, इत्यादींबद्दलच्या त्याच्या मांडणीवरून हे दिसून येते. तसेच राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रीयतावाद यांबाबतही माओची ही दृष्टी लक्षात येते.

सोविएत युनियन व चीन येथील कम्युनिस्ट पक्षांमधील मतभेद व संघर्ष यांना हा वैचारिक मतभेदांचा पैलू होता. तसेच, दोन्ही देशांचे आर्थिक व राजकीय हितसंबंधही वेगळे होते. त्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमध्येही वितुष्ट आहे. या साऱ्या संघर्षाचे विवेचन करणारे एक प्रकरण पुस्तकात आहे.

परंतु माओची समाजवादी लोकशाहीच्या जोपासनेविषयीची मांडणीदेखील सैद्धान्तिकदृष्ट्या पुरेशी सुस्पष्ट नव्हती. सांस्कृतिक क्रांतीला प्रत्यक्षात तर अतिरेकी वळण लागले. त्यामधून निर्माण झालेल्या अंदाधुंदीत अखेर डेंगसारख्या नेत्यांच्या हाती सत्तासूत्रे आली. तेव्हापासून चीनची आर्थिक प्रगतिपथावर घोडदौड आजतागायत चालू आहे. मात्र तिचे स्वरूप समाजवादी तर सोडाच, जनवादी तरी कितपत राहते आहे हा प्रश्नच आहे. आणि त्याचबरोबर चीनमध्ये खऱ्या समाजवादी लोकशाहीच्या विकासाची समस्यादेखील सुटलेली नाही.

लोकशाहीच्या अभावावर गोर्बाचेव्ह यांनी माओपेक्षा वेगळा असा पेरेस्ट्रॉइका चा व ग्लासनोस्त चा उपाय सुचवला व त्याची अंमलबजावणी सुरू केली. या घटनाक्रमाचा सविस्तर परिचय चौसाळकर नवव्या प्रकरणात करून देतात. हळूहळू भांडवली-उदारमतवादी राजकीय विचारांचा प्रभाव वाढत गेला. याचा फायदा जनतेमध्ये समाजवादी लोकशाहीच्या बाजूने उठावणी होण्यासाठी झाला नाही. कारण, यावेळपावेतो बहुतांश जनता राजकीयदृष्ट्या निष्क्रिय बनलेली होती. उलट, समाजातील मालमत्तेवर व यंत्रणांवर ताबा असलेल्या नवभांडवली वर्गांनी मात्र स्वतःची मांड बसवण्यात येल्त्सिन यांच्या नेतृत्वाखाली यश मिळवले व भांडवलशाहीची पुनःस्थापना केली.

महाराष्ट्रातील मार्क्सवादी चिंतन पुस्तकाच्या तिसऱ्या भागात चौसाळकरांनी भारतातील लोकशाही समाजवादी व महाराष्ट्रातील मार्क्सवादी विचारमंथनाचा आढावा घेतला आहे. प्रथम ते आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, आचार्य जावडेकर व लोहिया आदी लोकशाही समाजवादी विचारवंतांचा परिचय करून देतात. प्रारंभीच्या काळातील नेहरूंच्या विचारांचा परामर्शदेखील या प्रकरणात त्यांनी घेतलेला आहे. या प्रवाहातील विचारवंतांचे मार्क्सवादाशी असलेले दुहेरी संबंध व त्यांनी मार्क्सवादावर घेतलेले आक्षेप, यांचा आढावा त्यांनी येथे घेतलेला आहे. स्टॅलिनच्या कालखंडातील कम्युनिस्ट राजवट व देशोदेशींच्या चळवळी यांच्यामध्ये लोकशाहीविषयी व साध्यसाधनविवेकाविषयी संदिग्धताच नव्हे तर सदोष कल्पना होत्या हे खरेच आहे. युरोपात या प्रकारच्या सोविएत मार्क्सवादा वर दोन प्रवाहांनी टीका केली. एक प्रवाह तिकडच्या लोकशाही समाजवाद्यांचा, सोशल डेमॉक्रसीचा होता, परंतु भारतात या प्रवाहास मान्यता मिळाली नाही. दुसरा प्रवाह आपण पाहिले त्याप्रमाणे नवमार्क्सवाद्यांचा होता. भारतातील लोकशाही समाजवाद्यांची धारणा मात्र या दोहोंपेक्षा वेगळी होती. त्यांच्या विचारांत मिलप्रभृतींचा उदारमतवाद, मार्क्सचा विचार आणि गांधीजींचे चिद्वाद व धर्मपरायणता यांवर आधारित विचार, या तीन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न दिसून येतो. परंतु हा प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही.

यानंतर चौसाळकर महाराष्ट्रातल्या मार्क्सवादी विचारांकडे वळतात. त्यामध्ये आधी दिनकरराव जवळकर, आचार्य जावडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा परामर्श ते घेतात. त्यानंतर दि. के. बेडेकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे विवेचन करून, नंतर प्रभाकर पाध्ये, शरद पाटील आणि एका स्वतंत्र प्रकरणात डी.डी. कोसंबी यांच्या लेखनाचा परिचय करून देतात. यामध्ये मुरलीधर पवार यांच्या मार्क्सचा मानवविचार या पुस्तकाचा ते महत्त्वाचे पुस्तक, असा उल्लेख करतात, हे अगदी रास्त आहे. मार्क्सचे मानवचिंतन समजून घेण्यासाठी मराठीतले ते चांगले व एकमेव पुस्तक आहे.

या विचारवंतांच्या योगदानाबरोबरच महाराष्ट्रातले दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, शेकापक्ष आदी पक्षनेत्यांकडून झालेल्या वैचारिक कार्याचे परखड मूल्यमापन चौसाळकर करतात. डांगे व रणदिवे यांच्यासारखे महाराष्ट्रीय पुढारी राष्ट्रीय पातळीवर कम्युनिस्ट चळवळीचे नेतृत्व करत होते. परंतु, त्यांच्याकडून झालेले वैचारिक योगदान मराठीत वा इंग्रजीत नगण्य म्हणावे असे आहे. या संदर्भात इ. एम. एस. नंबुद्रीपाद यांच्या विपुल वैचारिक लेखनाची आठवण होते. कदाचित याचाच संबंध आज केरळात डावी चळवळ मजबूत आहे पण महाराष्ट्रात दुबळी आहे या वस्तुस्थितीशी असावा काय?

शेवटी, महाराष्ट्रातील एकंदर मार्क्सवादी विचाराबाबत डॉ. चौसाळकर म्हणतात, की वैचारिक लिखाणात परिचयात्मक, चिकित्सा करणारे आणि त्या विषयात भर घालणारे अशा तीन प्रकारचे लिखाण असते. त्यांच्या मते मराठीत पहिल्या प्रकारचे लिखाण बऱ्यापैकी झाले (खरे तर तेही बघावे लागेल), पण चिकित्सात्मक लिखाणात, दि. के. बेडेकरांचा अपवाद वगळता, फारशी खोली नव्हती आणि तिसऱ्या प्रकारचे लिखाण होण्याचा संभव कमीच होता. महाराष्ट्रातल्या मार्क्सवादी विचारांचे हे दारिद्र्य व दौर्बल्य जगभरच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या शेकडो पुस्तकांच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे उठून दिसतेच, पण भारतीय पातळीवरील याबाबतची परिस्थितीसुद्धा आपल्यापेक्षा खूपच जास्त चांगली आहे.

प्रस्तावनेत स्वतः चौसाळकर यांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक मार्क्सवादी तत्त्वविचारांचा ‘प्रामुख्याने परिचय करून देणारे व त्याची थोडीशी चिकित्सा करणारे आहे.’ पण हा परिचय होणेदेखील मराठीत महत्त्वाचे व उपयुक्त आहे. पूर्ण पुस्तक वाचले, की मनावर असा ठसा उमटतो, की गेले शतकभर चाललेल्या या सगळ्या विचारमंथनातून व प्रत्यक्ष व्यवहाराच्या अनुभवातून केवढेतरी अफाट धन गोळा झाले आहे. मार्क्सची द्वंद्वपद्धती, मानवचिंतन, समाज व इतिहासाकडे बघण्याची दृष्टी, जनवादी आर्थिक विकासनीती व खरेखुरे समाजवादी लोकशाही राजकीय जीवन इत्यादींबाबत अधिक प्रगल्भ व समृद्ध समज आज आली आहे. या पुस्तकात ज्यांचे फारसे विवेचन आलेले नाही अशा स्त्रीमुक्ती, पर्यावरणाचा प्रश्न, जात व धर्म, सांस्कृतिक जीवन यांचाही सखोल विचार गेल्या शतकाच्या अखेरच्या पंचवीस वर्षांत झाला आहे.

समाजवाद संपला असे म्हणून गाठीशी जमा झालेल्या या भांडवलाचे गाठोडे टाकून देऊन, किंवा ते नुसतेच सांभाळत बसूनही काही होणार नाही. ही शिदोरी घेऊन स्वतंत्रपणे सर्जनशीलपणे पुढची वाटचाल केली, तर मात्र एकविसाव्या शतकात क्रांतिकारक समाजवादी आंदोलनाची नव्याने उभारणी होईल. आज जागतिक भांडवलशाही धरतीमातेवर जे अत्याचार करत आहे आणि जगभरच्या कोट्यवधी माणसांना जे भोगायला लावत आहे ते बघता हे घडणार आहे यात शंका नाही. आणि नाही घडले तर मानवसंस्कृतीच नष्ट होणार आहे. पर्याय एवढेच आहेत. मार्क्सवाद – उत्तरमार्क्सवाद लेखक : डॉ. अशोक चौसाळकर, प्रतिमा प्रकाशन, पुणे. 13, गीताली, पी.वाय.सी. कॉलनी, पुणे 411004. (फोन 9423572560) [प्रबोधन प्रकाशन ज्योती, इचलकरंजी, यांच्या जून 2010 अंकातून, प्रकाशक व लेखक यांच्या सौजन्याने.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.