पुस्तक-परीक्षण : इट टेक्स अ व्हिलेज…..

जगाच्या पाठीवरचे कुठलेही मूल आईबापांच्या वाटेनेच जगात आलेले असले तरी तेवढ्यावरच वाढत नाही. त्याच्या वाढण्यात भोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा – माणसांचा जनावरांचा घरांचा – बागांचा रस्त्यांचा पुलांचा संस्थांचा व्यवस्थांचा – संशोधनांचा – बाजारांचा जाहिरातींचा त्यामागे असणाऱ्या मानवी मेंदूंचा – त्यांच्या क्षमतांचा, कमीअधिक समजुतदारीचा परिणाम असतो. आणि ह्या सगळ्यांमुळेच मुलांची जी काय व्हायची ती वाढ होत असते.

हेच सांगणारे एक पुस्तक – इट टेक्स अ व्हिलेज…. (लिहिले आहे, श्रीमती हिलरी रोधाम क्लिंटन ह्यांनी (रोधाम हे बाईंच्या माहेरचे आडनाव आहे, तर क्लिंटन हे सासरचे). लेखिका सामान्य नाहीत हे तर स्पष्टच आहे. त्या स्वतः अमेरिकेतल्या नामवंत वकील, मुरब्बी राजकारणी, जागतिक महासत्तेच्या एके काळच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी, स्वतः ही राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या, ते साधले नसले तरी आताच्या मंत्रिमंडळातही अत्यंत महत्त्वाच्या अशा खात्याच्या मंत्रिपदावर आहेत.

इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाईल्ड हा एक आफ्रिकी वाक्प्रचार आहे. मूल वाढवण्याच्या प्रयत्नात सगळ्या गावाच्या साहाय्याची गरज असते, असा त्याचा अर्थ आहे. त्याचाच वापर हिलरी क्लिंटन ह्यांनी पुस्तकाचे शीर्षक म्हणून केलेला आहे.

पुस्तकाचा विषय, शीर्षकामधून व्यक्त होणारी मध्यवर्ती संकल्पना आणि ते लिहिणाऱ्या लेखिका पाहता त्यांना अभिप्रेत असलेले व्हिलेज हे विश्वरूप असणार, त्यात जगणाऱ्या गरीब देशातल्या मुलांचा देखील त्यांनी विचार केलेला असणार, असेही आपल्याला वाटेल. मात्र पुस्तकात तसे दिसत नाही. मांडणीमागे जी परिस्थिती गृहीत धरलेली आहे ती संपूर्णपणे अमेरिकेतीलच. तरीही मूल वाढण्यासारख्या एका अर्थी घरगुती मानाव्या अशा विषयाला महत्त्व देऊन त्या प्रक्रियेतल्या अनेकविध घटकांचा नेमका वाटा स्पष्ट करण्याचा प्रयत्न जागतिक पटलावरच्या एका महत्त्वाच्या माणसाने करावा, ही पुस्तकाची जमेची बाजू आहे, पण विषय उलगडत नेण्याची, एका टप्प्यापर्यंत तरी वाचकाला विषयाशी गुंतवून ठेवण्याची क्षमता या पुस्तकात दिसत नाही.

श्रीमती हिलरी ह्यांनी हे पुस्तक लिहिणे ही ह्या पुस्तकाची मुळातच जमेची तशीच कमतरतेचीही बाजू आहे. काही अपवाद वगळता ह्या पुस्तकात मांडलेले विचार हे तसे सर्वसामान्य आणि बरेचसे सर्वमान्य असेच आहेत. मुलांना पालकांच्या प्रेमाची खूप गरज असते. कुठलेही मूल पुढे काय करणार आहे, कसे वागणार आहे हे आधीपासून ठरलेले असत नाही. प्रेमळ वातावरणात वाढणाऱ्या मुलांची भावनिक प्रज्ञा अधिक असते. आणि प्रेमळ वातावरण मिळण्यासाठी सर्वांत चांगले ठिकाण असते, ते घर. पाळणाघरेही चांगली असावीत. शाळाही चांगल्या असाव्यात. प्रेमळ वातावरण न मिळालेल्या, त्यामुळे असुरक्षित जगणाऱ्या मुलामुलींच्यातच बालगर्भवती होण्याची किंवा मादक द्रव्यांचा वापर करण्याची किंवा अतिरेकीपणे खूनखराबा करण्याची शक्यता जास्त असते. तरुण पिढी हिंसत होण्याइतके दुर्दैवी दुसरे काहीही नाही. उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम, असे सहजी पटणारे मुद्देच ह्यात आहेत. तरीही हे विचार कुणी ऐऱ्यागैऱ्याने नाही तर स्वतः हिलरी क्लिंटन ह्यांनी मांडले असल्याने त्यांना मान्यतेसोबत महत्त्वही मिळण्याची शक्यता साहजिकच जास्त आहे. पण त्याचबरोबर इतर एखाद्या लेखकाला आपण उदारपणे दिली असती अशी सूटही ह्या लेखिकेला द्यायला कुणीही, विशेषतः तिसऱ्या जगातला वाचक, तयार होत नाही. टीव्ही आणि माध्यमांच्या मधून येणाऱ्या फॅशनच्या कपड्यांबद्दल तक्रार करून “बरं बाई, माझी चेल्सी (मुलगी) लहान होती तेव्हा ह्या माध्यमांचं स्तोम एवढं बोकाळलं नव्हतं. आताच्या पालकांचं कठीण आहे ग.” असा नशिबाला जबाबदार धरणारा सूर लेखिका काढते तेव्हा आपल्या मनात ह्या बाई खरे बोलत आहेत की आपली चेष्टा करताहेत, असा प्रश्न उभा राहतो. जगातल्या सर्वांत शक्तिमान राष्ट्रातली ही अत्यंत प्रभावी बाई जर नशिबाला जबाबदार धरत असेल तर आमच्यासारख्या गरीब परिस्थितीतल्या कुणाच्या हातात तर पालकत्वच काय, कशातलेच काही नाही.

कुठलेही पुस्तक वाचणे म्हणजे समोर नसलेल्या तरीही संनिध असलेल्या लेखकाशी समग्र संवाद करणे असते. सातत्याने अश्या शंका- असे प्रश्न उभे राहू लागले, आणि त्यांची उत्तरे मिळत नसली, की आपल्याला ते पुस्तक नीट वाचता येत नाही.

पालकत्वाबद्दलचे लिखाण असल्याने असेल, पण व्यक्तिगत अनुभवांचा संदर्भ दिल्याशिवाय मांडणी करणे लेखिकेला अवघड वाटलेले असावे. प्रत्येक प्रकरणात मी, माझे घर – माझा नवरा – माझे माहेर – माझी लेक ह्यांचे कौतुक – वर्णन मांडलेले आहे. आपल्या पक्क्या कुटुंबव्यवस्थेबद्दलही खूप अभिमानाने लिहिले आहे.

असे असले तरी त्या स्वतः पुस्तकाबद्दल म्हणतात, “ही काही आठवणींची गाथा नाही. हे क्रमिक पुस्तक नाही, हा ज्ञानकोशही नाही. ही माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनांची मांडणी आहे. मूल ह्या विषयावर मी सातत्यानं करत असलेलं चिंतन आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटो वा न पटो, ह्यातून आपल्यातला प्रामाणिक संवाद बहरेल एवढं निश्चित!” (पान क्र. 10, परि. 3 रा) आठवणींची गाथा नसली तरी पहिल्या चार प्रकरणांत लेखिकेचे बालपण, तिच्या पतीचे बालपण, आई-वडिलांचे, शिवाय सासूचे जीवन, त्यांच्या पालकत्वाबद्दलच्या कल्पना, असे सगळे आहे. ते वाचताना पालकत्वाबद्दल काही नवे शिकायला मिळत नसले तरी मजा येतेच. ते त्याच काळातल्या भारतातल्या मध्यमवर्गीय घरातल्या मुलीचे बालपण म्हणून सहज खपवता येईल.

“वडिलांचा लहानसा खाजगी धंदा. आई गृहिणी. शेजारपाजारची खूप मित्रमंडळी, दिवसभर खेळत असायचो. उन्हाळ्याच्या रात्री आम्ही एकमेकांच्या अंगणात बसायचो, पत्ते खेळायचो. कुणी आजोबा गोष्टी सांगायचे, कुणी काका भुताचं सोंग करून भिववायचे… पण भलतेसलते लाड नाहीत. कुणी मूल वेड्यासारखं वागलं तर कुणीही दटावायचं.

“तुम्हाला कळत नसेल, पण आमच्या मानानं तुम्ही किती नशिबवान आहात” वडील सतत म्हणायचे. हज्जारदा मी हे त्यांच्याकडून ऐकलं असेल. पण जर का पॉकेटमनी मागायला गेलं की म्हणणार, पैसे काय झाडाला लागत नाहीत! (Money doesn’t grow on trees!) पण काय प्रेमळ होती सगळी माणसं त्या काळातली, माझा भाऊ आजारी होता तेव्हा आजोबा स्वतःचा आवाज कायमचा बंद होईपर्यंत त्याला पुस्तकं वाचून दाखवायचे, किंवा त्याच्याशी पत्ते खेळायचे.

“काय दिवस बदलले पहा!! त्या काळी 3-4 घरांमध्ये मिळून एखादा फोन असे. मी पहिल्यांदा विमानात बसले ती माध्यमिक शाळेत असताना. माझी भाचरं तान्ही असल्यापासून विमानात बसत आहेत. पण त्या काळी माणसाला माणूस असायचा. कुणा एकावर संकट आलं तर बाकीचे मदतीला धावायचे, आणि आजच्या जगात इतकं एकटं वाटतं कुणाही माणसाला की घराबाहेर आपल्याशिवाय कुणी ह्या जगात आहे ह्याचीही आठवण राहत नाही.’ (पान क्र. 16 ते 21)

समजूतदार सुरात लिहिलेल्या ह्या पुस्तकात सुमारे पंधरा प्रकरणे आहेत. प्रकरणांची नावे वेधक आहेत. उदा. सिक्युरिटी टेक्स मोर दॅन अ ब्लॅकेट, किंवा एज्युकेशन एक्स्पेक्टेशन वगैरे. शिवाय एक चांगले वाक्य सुरवातीला दिलेले आहे. प्रत्येक प्रकरणाची सुरवात एका फोटोने होते. त्यातले बहुतेक स्वतः लेखिकेच्या आणि तिच्या कुटुंबातलेच आहेत. प्रत्येक प्रकरणात घरगुती प्रसंग, त्यात स्वतः, आई, सासू, वडील, नवरा, मुलगी वगैरेंनी कसे काय केले, किती चांगले, जबाबदारीने आम्ही वागलो, असे संदर्भ सतत येत राहतात. त्या विषयाच्या आसपासचा एखादा अभ्यास, किंवा संशोधन मांडलेले असते. कधीकधी हे इथे का मांडले असावे असा प्रश्नसुद्धा पडतो. लेखिकेने जगभर प्रवास केलेला आहे, वेगवेगळ्या परिस्थिती त्यांना बघायला मिळालेल्या आहेत, हे वाचताना जाणवते. प्रत्येक प्रकरणाचा शेवट करताना अशा परिस्थितीत समाजाची म्हणजे व्यापक गावाची काय जबाबदारी असते, आणि ती जर गावाने उचितपणे घेतली तर प्रश्न सहज सोपा होऊन जाऊ शकतो, असे ध्रुवपद मांडलेले आहे. पालकत्व, शिक्षण ह्या विषयातली भावनिक प्रज्ञा, विविधा प्रज्ञा अशी काही जानीमानी संशोधने ह्यात उल्लेखली आहेत. त्या संशोधनांवर लेखिकेचे स्वतःचे काही वेगळे विशेष म्हणणे आहे, असे नाही. अमेरिकेत राबवल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे संदर्भ आहेत. पंधरा प्रकरणे एका अर्थी सामान्य दर्जाचे स्वतंत्र लेख म्हणू छापावेत अशी आहेत. मागच्या लेखाचा पुढच्याशी तसा संबंध नाही. एकानंतर एक मुद्दा उलगडत वाचकाला विचारात पाडत विषयाची मांडणी व्हावी, असे जे कुठल्याही बऱ्या पुस्तकाकडून अपेक्षित असावे तसे इथे घडल्याचे निदान मला तरी जाणवले नाही.

एक अडचण हे पुस्तक वाचताना मला सतत आली. पुस्तक नेमके कुणासाठी लिहिले गेलेले आहे ते आपल्याला कळत नाही. पालकत्वावरचे पुस्तक म्हणून भाषा कळत असणारी कुणीही व्यक्ती ह्या पुस्तकाची वाचक असायला हवी. शिवाय त्याचे शीर्षक आफ्रिकी, आणि लेखिका सगळ्या जगभराची माहिती असणारी, असे मानून हे आपल्यासाठीही आहे असे मनात आणावे, तर जागोजागी आपण असे करायला हवे, तसे करायला हवे, असे म्हणताना मनात धरलेली परिस्थिती आणि वाचक अमेरिकन नागरिक आहेत, हे स्पष्ट जाणवते. अभ्यासपूर्ण पुस्तक मानावे तर तेही नाही, सामान्य वाचकासाठी मानावे तर अनावश्यकपणे कुठलीकुठली आकडेवारी येत राहते. कुठल्या घटकांवर सरकारचे किती पैसे खर्च केले जायला हवेत, ह्यावरसुद्धा बरीच जागा गेलेली दिसते. तेव्हा हे पुस्तक एखाद्या नवशिक्या संशोधिकेचे वाटू लागते. असो.

कौटुंबिक व्यवस्थेला लेखिकेच्या जीवनात फार मोठे महत्त्व असल्याचे दिसते. कौटुंबिक घट्टपणा, नवराबायकोच्या नात्याला तडा जाऊ न देणे, पुन्हा पुन्हा मांडले आहे. त्यांच्या स्वतःच्या आजीआजोबांनी घटस्फोट घेतलेला होता, हे सोडले तर त्यांच्या लहानपणात, म्हणजे शालेय काळात एकही घटस्फोटित घरातले मूल त्यांना भेटलेले नव्हते. पण आता मात्र घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे, स्वतः बिलचे लहानपण अशाच ताणाच्या परिस्थितीतून पार झालेले आहे. घटस्फोटामुळे आणि विवाहबाह्य अपत्यजन्मांमुळे मुलांचे आयुष्य किती त्रासाचे बनते हे संशोधनांनी सिद्ध केलेले आहेच. ते थांबायला हवे. असे अनेकदा मांडलेले आहे.

रोज रात्री घरी, एकत्र आणि एकमेकांशी गप्पा मारत, टीव्ही न बघता जेवणे सर्वांनी साधायला हवे, देवावर विश्वास असायला हवा, आणि चर्चशी जोडलेली मुले ड्रग्ज घेण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासातून दिसून आलेले आहे, असेही एक संपूर्ण प्रकरण देऊन म्हटले आहे.

लैंगिकता – शिक्षणाबद्दलही बाईंनी आपले विचार नोंदवले आहेत. लैंगिकता शिक्षण दिले जावे, हे आता संशोधनांने सिद्ध केलेले असल्याने त्यांचेही मत तसेच आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत लैंगिक अनुभवाच्या वाटेला जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. ह्या म्हणण्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, अनेक आयांना, बापांना आपल्या मुलामुलींबद्दल असेच वाटत असते, फक्त अमेरिकेसारख्या देशात मध्यवर्ती पदावर असलेल्या माणसाने परिस्थिती पाहायचीच नाकारली आहे की तशी नाकारण्यामागे काही राजकीय वगैरे कारण आहे, असा प्रश्न पडतो.

एकंदरीने हे पुस्तक मला फारसे आवडलेले नाही हे सरळच आहे, त्याचे कारण एका महत्त्वाच्या माणसाने, तेही महत्त्वाच्या विषयावर ते लिहिलेले असल्याने ते किमान चांगलेच असावे अशी अपेक्षा मी ठेवली होती. असे न करता उगाच गटातले एक पुस्तक म्हणून वाचाल तर कदाचित त्यातल्या वेगळ्याच चांगल्या गोष्टींकडे तुमचे ध्यान अधिक जाऊ शकेल. तशा गोष्टी ह्या पुस्तकात आहेत. उदाहरणार्थ बाईंची लेखनशैली गप्पा मारत जात असल्यासारखी आहे. ती वाचकाला अधूनमधून मज्जा आणते.

एक उदाहरण : स्वतः लेखिका गर्भवती असताना बाळंत होण्यासाठी नेल्या जात असताना त्यांना गाडीमध्ये बर्फाची एक मोठी लादी चढवली जात असल्याचे दिसले. हे काय असे पाहताना त्यांना कळले की कळा देताना तोंड ओले करायला थोडासा बर्फ हवा असतो, त्याची सोय नवऱ्यानं करायची, असे यादीत लिहून दिलेले होते. बिल क्लिंटन त्यावेळी आर्कन्सासचे गवर्नर होते. त्यांनी बर्फ हवा असे सांगितल्यावर हा बर्फ गाडीत चढवला जात होता. “हे पाहिल्यावर मला टायटॅनिकमधल्या त्या बाईची आठवण आली. ती म्हणाली होती, मला बर्फ हवा असं मी सांगितलं होतं खरं, पण हे म्हणजे काहीच्या काहीच आहे.’

आणखी एक उदाहरण : आर्कन्सासमध्ये असताना तुरुंगातल्या कैद्यांनी गवर्नरच्या घरात आणि बागेत काम करायचे असे. त्यावेळची आठवणही लेखिकेची समजदार आणि उत्कट विचारसरणी दाखवणारी आहे. “वकील म्हणून त्यांनी कोर्टात खुनाचा आरोप असलेल्यां- सोबत काम केले होते पण रोज सकाळी आपल्या स्वयंपाकघरात अशा माणसासोबत असताना मला जरा भीती वाटायची. पण माझी भीती त्या सर्वांनी खोटी ठरवली.”

तसेच, त्या उभयतांनी आपल्या मुलीला राजकारण आणि त्या निमित्ताने आयुष्यावर हावी होणारे माध्यम ह्यापासून लांब ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नही भले म्हणावे असेच आहेत. वडील प्रचारदौरा करतात, म्हणजे नेमके काय करतात, लोकांना काय सांगतात, ते 4-6 वर्षांच्या मुलीला सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही मनोज्ञ आहे.

ह्या पुस्तकाबद्दल असे म्हटले गेले आहे की स्वतः लेखिकेने लिहिलेले नसून कुणी दुसऱ्याच बाईने लिहिले आहे. पुस्तक लिहायला लागणारा वेळ त्यांना त्या काळात असूच शकत नव्हता, कारण त्यावेळी त्या व्हाईट हाऊसमध्ये फर्स्ट लेडी होत्या. 1997 साली निघालेल्या ह्या पुस्तकाची त्यानंतर 10 वर्षांनी आवृत्ती निघाली. ह्या नव्या आवृत्तीत काही भरही घालण्यात आली. पुस्तक नेमके कुणी लिहिले ह्याबद्दल आपण काहीच म्हणू शकत नाही. वाचताना हे पुस्तक व्यक्तिगत अनुभव आणि इतर अनेक ठिकाणाहून घेतलले संदर्भ ह्यांचे एकमेकांशी न जुळणारे मिश्रण असल्यासारखे जाणवते.

एकंदरीने हे पुस्तक हिलरी रोधाम क्लिंटन ह्या बाईंबद्दल थोडीफार माहिती देते. त्या सामान्यपणे घरगुती प्रकार, देवावर श्रद्धा असलेल्या, चार ठिकाणे फिरलेल्या पण सासर माहेरच्या कुटुंबाला धरून राहणाऱ्या बाई असाव्यात, असे सांगते. तश्या त्या खरोखर आहेत की नाही ह्याची मला माहिती नाही, पण तसे सांगण्यामागे राजकारणाची सूत्रे असावीत असा अंदाज आपण नक्कीच काढू शकतो. तेव्हा पालकत्व वगैरे बाजूला राहू दे, अमेरिकेतल्या राजकारणात नेत्यांना स्वतःची प्रतिमा कशी दाखवावी लागते, हे समजावून घेण्याच्या इच्छेने हवे तर हे पुस्तक वाचून काढायला काहीच हरकत नाही.

द्वारा प्रयास, अमृता क्लिनिक, लकडीपूल कोपरा, डेक्कन जिमखाना, पुणे 411004. प्रा. दि. य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानाची पुस्तके पुनः प्रकाशित 1) सांकेतिक तर्कशास्त्र – – किं. 250 रु. 2) तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या- किं. 200रु. 3) नीतिशास्त्राचे प्रश्न – किं. 100 रु. (टपालखर्च वेगळा) कृपया महाविद्यालये, संस्था, विद्यार्थी यांनी ग्रंथांच्या उपलब्धतेकरिता नजीकच्या ग्रंथविक्रेत्याकडे चौकशी करावी. काही अडचण उद्भवल्यास खालील पत्त्यावर संपर्क करावा. प्रकाशक : विनोद लोकरे, विसा बुक्स, ‘स्वागत’ 55 डागा ले-आउट, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर- 33. मो.: .: 9823287273, E-mail: veesabooks@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.