आनंद यादव यांच्या ‘नटरंग’ या ग्रामीण कादंबरीवर प्रदर्शित झालेला चित्रपट, तमाशा कलावंतांच्या जीवनाची शोकांतिका मांडतो. तमाशाकडे आजही टाकाऊ कला म्हणून पाहिले जाते. त्यात काम करणारे कलावंत उपेक्षित राहतात. त्यांची भटकंती चालूच असते. या कला व कलावंतांकडे बघण्याची दृष्टी बदलावी, असा संदेश हा चित्रपट देतो.
बाळू मांगाच्या पोटी जन्मलेला गुणा हा तमाशाच्या वेडाने झपाटलेला आहे. तमाशात राजा होऊन झकास वग लावावा, आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध करावे, हे त्याचे स्वप्न असते. परंतु त्याला नाच्या व्हावे लागते. नाच्या म्हणून त्याला लोकांनी स्वीकारल्यानंतर ते त्याला अर्जुनाच्या भूमिकेत स्वीकारत नाहीत. त्यांना तो बृहन्नडेच्या रूपातच हवा असतो. ते आह्वान तो स्वीकारतो. त्यातच त्याची शोकांतिका होते. कादंबरी वाचकांना अंतर्मुख करते. तमाशा कलावंतांचे जीवन, त्यांचे प्रश्न वाचकांना प्रश्नांकित करतात. गुणा आह्वान म्हणून ‘नाच्या’ होतो, परंतु त्याचा बाप बाळू आपल्या मुलाचे हे लक्षण पाहून म्हणतो, “सत्पनशील मांग कुणी तमाशात जाईन न्हाई. हे घर काय त्यांपैकी न्हाई…” कोल्हापूरच्या राजघराण्याशी जवळीक असलेल्या आपल्या घराण्यात गुणासारखा दिवटा निपजावा या दुःखाने तो आत्महत्या करतो. तरीही गुणा तमाशाचा नाद सोडत नाही. फड उद्ध्वस्त झालेल्या गुणाला, गुंडांच्या पाशवी वासनेला बळी पडावे लागते. शेवटचा आधार म्हणून तो दारकीकडे येतो. तीही त्याला जवळ करीत नाही. त्याचे पोरही ‘गावानं गांड मारलेल्या ‘बापाजवळ हाणार नाही’ म्हणून त्याला झिडकारते. गुणाच्या शोकांतिकेला आपणच जबाबदार आहोत असे पांडबाला वाटते. गुणा मात्र आपल्या नशिबाला दोष देतो. ‘नटरंग’ कादंबरी तमाशाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मांडते, परंतु असे घडत नाही.
अतुल कुलकर्णी या अभिनेत्याच्या माध्यमातून ‘गुणा’ची शोकांतिका ‘नटरंग’मध्ये साकारलेली आहे. अतुल कुलकर्णीचा अभिनय या चित्रपटात खूप महत्त्वाचा आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण परिसर, आणि ग्रामीण व्यवस्था आधुनिकीकरणामुळे कशी विस्कळीत होते, हे दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. ग्रामीण बोलीभाषा, वर्तन, पोशाख यांमधून ते सर्व कलाकार हे आपलेच वाटतात. गुणाचा बाप, त्याच्या स्वप्नांचा झालेला चुराडा, सुखी संसार सोडून नाच्या झालेल्या गुणाला पाहून झुरणे, हे सर्वांना पसंत पडते. गुणाची पत्नी मूकपणाने जगताना दिसते. गुणा शरीराने व मनाने पुरुष असून, त्याला पांडू या सोबत्याच्या सल्ल्यानुसार ‘नाच्या’ होऊन अपमान, अवहेलना व बलात्कार यांना सामोरे जावे लागते. तो नाच्या झाल्याने त्याच्या कुटुंबाची झालेली वाताहत चित्रपटात दिसते.
नाच्याच्या व्यथा, त्याचे पुरुष आणि स्त्रीपेक्षा वेगळे असणे, गाव, मित्र, त्याचा सासरा, त्याची बायको, त्याच्यासोबत तमाशात नाचणारी नयना कोल्हापूरकर त्याला पुरुष म्हणून स्वीकारत नाहीत. त्याचा मुलगाही त्याला बाप म्हणून स्वीकारत नाही. ‘फलक्या’ म्हणून, ‘नाच्या’ म्हणून त्याची अवहेलना होताना दिसून येते. ही त्याची व्यथा चित्रपटात आहे, परंतु ती प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही. ही एका नाच्याच्या जीवनाची शोकांतिका असून ती मनोरंजनप्रधान ठरते.
चित्रपटात शेवटी केलेला बदलही पचत नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, त्यांना आनंद देणे, हाच चित्रपटाचा उद्देश दिसतो. चित्रपटातील दृश्यांमध्ये ‘नयना’ ही नायिका पुरुषांच्या घोळक्यात, मिरवणुकीत नाचते. तमाशाच्या फडात, बोर्डात नाचते. गुणाचा नाच्या होण्याचे प्रसंग, आणि नाच्या झाल्यानंतरचे प्रसंग प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. गुणाचे दुःख, वेदना, वेदनेतून निर्माण झालेले त्यांचे शब्द, त्यांचे संवाद प्रेक्षकांना आनंद देताना दिसतात. ‘तुमच्या आया-बहिणींना माझ्याकडं पाठवा’ ही वेदनेतून फुटलेली ठिणगी आहे. तमाशातील ‘बाई’, ‘लावणी’ ही पुरुषांचे, मराठमोळ्या माणसांचे मनोरंजन करते. “जाऊ द्या ना मला, आता वाजले की बारा ॥” किंवा “अप्सरा आली’ या लावण्या हृदयाचा ठोका चुकवायला लावत वय विसरायला लावतात. ‘गुणा’वर बलात्कार होतो; आणि सर्व जवळची माणसे त्याला सोडून दूर जातात. ‘नयना’ त्याच्याबरोबर लग्न करण्यास नकार देणारी मात्र त्याच्यावर बलात्कार झाल्यावर त्याला साथ देते. पुन्हा ते नव्याने तमाशा सुरू करतात; त्यांच्या कलेचा गौरव होतो; त्यांना पुरस्कार मिळतो; हे अगदीच विसंगत वाटते. ही उपकथा आणून जोडल्यासारखी शोकांतिकेपासून दूर राहते. तोंडही दाखवण्याची हिंमत होणार नाही अशा अवस्थेत माणूस नव्याने उभा राहील कसा? यंत्रयुगामुळे ग्रामीण जीवन आणि संस्कृतीचा हास होत असताना, जगण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असताना, गुणा हा तमाशाकडे वाहवत जातो. त्यामुळे तो संकटे ओढवून घेताना दिसतो. पांडू हा गुणाला नाच्या करण्यास जबाबदार आहे. पण नाच्या होणे हे गुणावर लादलेले नाही. त्याच्यावर बलात्कार होतो, तो बदला म्हणून, द्वेषापोटी झालेला आहे.
पुरुषाने स्त्रीचे रूप घेणे, स्त्रीसारखे हावभाव करणे, ही एक कला आहे. मात्र या कलेमुळे अपमानास्पद जीवन जगावे लागते. माणूसपण नाकारले जाते. या अशा कला काळाच्या ओघात संपायला हव्यात. पण या चित्रपटात ती जोपासण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एकंदरीत प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार चित्रपटात बदल केला असल्यामुळे कलाकारांना कला जोपासण्याची नवी ऊर्मी मिळेल. अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने आणि मूळ कादंबरीने प्रेक्षकांचे मनोरंजन करून चित्रपटाच्या माध्यमातून कलावंतांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. कलाकाराने खचून न जाता, नव्याने, हिंमतीने उभे राहून कलेची विविधांगी जोपासना केली तर वैभव कलाकारांच्या पायाशी लोळण घेतील, हा तो संदेश. द्वारा – जयवंत शां. देसाई, मोरी रोड, टेलिफोन टॉवरशेजारी, (जाकादेवी-खालगाव), रत्नागिरी. (मोबा. 9960404108, 9021843816)
नटरंग चित्रपटा वरील परीक्षण पाठवा.
हो