पत्रसंवाद

संजीवनी चाफेकर, ब-5, सुहृद सोसायटी, मेहेंदळे गॅरेजसमोर, एरंडवणे, पुणे 411004. Sanjeevani@gmail.com ज्या स्त्रियांवर बाळंतपण लादलेले असते (मग त्या विवाहित असोत किंवा बलात्कारित) त्या स्वतःच्याच (जनुकीय) अपत्याच्या सरोगेट मदर (सेल्फ सरोगसी) नव्हेत काय? लादलेले गर्भारपण असले तर, केवळ बीज स्वतःचे आहे म्हणून त्याविषयी आत्मीयता वाटणार नाही. भारतासारख्या देशात अशा गुलामी/दास्याने पीडित असणाऱ्या असंख्य स्त्रिया आहेत. सँडेल यांना कदाचित ही परिस्थिती माहीत नसावी. त्यामुळे ते दासी / गुलाम म्हणून अत्यंत वाईट स्थितीत असलेल्या सेल्फ सरोगेटचा विचार न करता फक्त करारान्वये सरोगसी करणाऱ्या स्त्रियांविषयी भाष्य करत आहेत.

प्रत्येकजण आपल्यातल्या कुठल्या न कुठल्या क्षमतेचा वापर अर्थार्जनासाठी करतच असतो. बुद्धिजीवी त्याच्यातील बौद्धिक क्षमता वापरतो तर श्रमजीवी त्याच्या शरीराची ! हमाल काय किंवा एखादा मॉडेल म्हणून काम करणारा देखणा पुरुष काय, ते स्वतःचे शरीर व्यापारी वस्तू म्हणूनच वापरत असतात. व्यावसायिक रक्तदाते, अवयवदाते समाजात आहेत ते आर्थिक गरजेपोटीच ना? आपल्या एकूण ‘स्व’चा काही भाग क्रयवस्तू म्हणून वापरताना एक प्रकारचा दुरावा जाणवेल हे खरेच. खास स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःच्या काही क्षमता वापरण्यात दुरावा नसेल हेही खरे. परंतु क्रयवस्त्वीकरण ही दुरावा निर्माण करणारी एकच प्रक्रिया नव्हे. तसेच क्रयवस्त्वीकरणातून येणारा दुरावा हा सर्वाधिक अमानवी दुरावा आहे असे सँडेल गृहीत धरत आहेत. परंतु परंपरांचे ओझे, धर्माज्ञा, गुलामी, पोकळ प्रतिष्ठेचे संकेत अशा गोष्टींनी अगतिक होणारी व्यक्ती ही क्रयवस्त्वीकरणापेक्षाही जास्त भीषण प्रकारचा दुरावा अनुभवते.

भारताच्या संदर्भात पाहिले तर सरोगसीला तयार होणारी स्त्री, बेजबाबदारपणे स्वतःची मुले जन्माला घालून दारिद्र्यात भर घालत नाही, हे समाजावर उपकारच आहेत. सरोगसीमध्ये अशी स्त्री कोणाच्याही हक्कांवर अतिक्रमण करत नाही, कुठल्याही प्रकारे फसवणूक, लुबाडणूकही करत नाही.

कुठल्याही बाजूने पाहता सरोगसीमध्ये मुले क्रयवस्तू बनतच नाहीत. यात क्रयवस्तू आहे तो फक्त सरोगेट मदरचा गर्भाशय. त्यामुळे मुले ही आपल्या प्रेमाचे निधान आहेत, जतन करून ठेवावा असा ठेवा आहेत या तत्त्वाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. दुसरे असे की उदा. प्रतिष्ठापना केल्यावर आराध्य बनणारा गणपती हा त्याच वेळी मूर्ती ह्या नात्याने क्रयवस्तूही असतो. खऱ्या भक्ताने स्वतःच मूर्ती बनवली पाहिजे असा संकेत तर कोठे दिसत नाही!

सरोगेट मदर गर्भारपणात पोटातील बाळाबरोबर भावनिक बंध निर्माण व्हावेत या समाजाने जोपासलेल्या संकेतापासून वंचित राहते हे असेच एक विधान ! मुळात समाजाने जोपासलेला संकेत म्हणून भावनिक बंध निर्माण होत असतील तर नक्कीच काहीतरी चुकते आहे. वाटणे आणि वाटवून घेणे यात सँडेलना दुरावा (एलियनेशन) का बरे दिसत नाही? अनेक चुकीच्या सामाजिक संकेतांमुळे कित्येक स्त्रिया विवाहापूर्वी झालेले मूल स्वतःच सोडून देतात हे सत्य आहे. म्हणजे भावनिक बंधापेक्षा सामाजिक संकेतांचे/प्रतिष्ठेचे पारडे जड ठरते आणि दुष्कृत्य करायला भाग पाडते.

गर्भाविषयी भावनिक बंध काही प्रमाणात असतात. पण खऱ्या अर्थाने ते बंध, मूल एक स्वतंत्र जीव म्हणून अस्तित्वात आल्यावरच, सहवासाने निर्माण होतात. एखाद्या जोडप्याचे मूल जन्मतःच गेले तर त्यामुळे होणारे दुःख हे 5/6 वर्षांचे मूल गेल्यास होणाऱ्या दुःखापेक्षा नक्कीच कमी असते; कारण त्या मुलाचा सहवास, त्याच्या आठवणी, त्याच्या भविष्याविषयी पाहिलेली स्वप्ने इत्यादींमुळे 5/6 वर्षांत भावनिक गुंतवणूक वाढतच गेलेली असते. जाणीवपूर्वक सरोगसीचा निर्णय घेतलेल्या स्त्रीला गर्भात भावनिक गुंतवणूक करू नये असा सल्ला देणे व तशी मानसिक तयारी करून घेणे यात काय चूक आहे?

ज्या देशात असंख्य लोक अर्धपोटी आहेत आणि जिथे प्रचंड शारीरिक श्रमाचा अत्यल्प मोबदला मिळतो अशा देशातल्या स्त्रिया सरोगेट मदर होण्यास तयार झाल्या तर त्यात नवल काय आहे? कित्येक स्त्रिया नाईलाजाने वेश्याव्यवसाय करतात. त्यापेक्षा कदाचित नाईलाजाने स्वीकारलेली सरोगसी ही कमी क्लेशकारक आहे. (वेश्याव्यवसायाला कमी लेखण्याचा मुळीच उद्देश नाही.) वेश्याव्यवसायात सतत नकोशा (किंवा घृणास्पद ) वाटणाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. यात संभाव्य असणारे शारीरिक आजार आणि मानसिक त्रास लक्षात घेतला तर त्यामानाने मिळणारा मोबदला हा अल्प असतो. सरोगेट मदरची गर्भारपणात, तिने स्वतःची कधी घेतली नसेल इतकी काळजी घेतली जाते. गर्भारपणाचा त्रास (जो स्वतःचे बीज असेल तर होईल इतका) सोसावा लागतो. पण त्याचा कालावधीही निश्चित असतो. या पार्श्वभूमीवर सरोगसीचा निर्णय हा विवेकपूर्णच नव्हे काय?

त्या संपूर्ण व्याख्यानात एक महत्त्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे नैतिक मूल्ये ही संकेताधिष्ठित मानली आहेत. हे फारच धोकादायक आहे. नीतिशास्त्र विवेकावर आधारित हवे. सन्मानाचे / प्रतिष्ठेचे समाजात पूर्वापार चालत आलेले संकेत मान्य केले तर सतीसारख्या भयंकर चालींनाही प्रतिष्ठा द्यावी लागेल. मानवी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात सँडेल मानवाला पुन्हा परम्परावादाला नेऊन जुंपत आहेत असे म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.