गावची जत्रा

प्रत्येक गावाला यात्रा किंवा उरूस दरवर्षी असतो. आपल्याकडे मुसलमान राज्यकर्त्यांचा अंमल सुमारे 1000-1200 वर्षे तरी होता. तेव्हा बऱ्याच ठिकाणी राज्यकर्त्यांचा धर्म पाळण्याच्या इच्छेने तेथे देवळांच्या ऐवजी दर्गे वगैरे झाले असतील. अगदी देवळांचेच दगड वापरून दर्गे बांधले, अशा कडवेपणाने नसले तरी नवीन दर्गे झाले असतील. मुस्लिम राजवटीने त्यांना वतने दिली असतील, व मग देवाचा उरूस करणे ओघाने आलेच! नंतर जरी इतर धर्मांच्या राजवटी आल्या तरी सहिष्णुतेच्या मानसिकतेतून त्या राजांनी ती धर्मस्थळे व त्यांची वतने तशीच ठेवली असतील. नंतर ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या राजवटीत तर धर्मस्थळांचे नीट जतन करून, समाज एकसंध राहू नये या धोरणामुळे सर्व धर्मस्थळे सांभाळली गेली असतील. त्यामुळे वतने व उत्सव हे जनता बहुसंख्यक नसून सुद्धा चालूच राहिले असावेत.

आपल्या समाजाची पूर्वीपासून एक मानसिक गरज दिसते ती म्हणजे एखादा नेता पाहिजे, व ‘नवसाला पावणारा देव पाहिजे’. त्यामुळे आपल्याकडच्या गावात देवाचे देऊळ अथवा दर्गा नाही, अशी पोकळी फार काळ राहू शकत नाही.

बऱ्याच गावांत देवस्थान असे नसतेच, व त्याला इनाम जमिनी व इतर उत्पन्न काही नसते. गावकरीच वर्गणी जमवून देवाची यात्रा वर्षातून एकदा करतात, गावकऱ्यांच्या हौशीसाठी. ही यात्रा म्हणजे दोन-तीन दिवस असते. काही मोठ्या देवस्थानांची यात्रा 5- 6 दिवससुद्धा असू शकते. यात्रेचे स्वरूप हे प्रामुख्याने उत्सवी असते, धार्मिक नसते. पोथ्या, पुराणे, कीर्तने, प्रवचने इतर वेळी! यात्रा म्हणजे दोन दिवस मजा करणे. आपली नेहमीची विवंचना काळज्या विसरून दोन दिवस आनंदात घालवणे अशी भावना असते. साधारणतः तरुण वर्ग यात जास्त भाग घेतो व वयस्करसुद्धा तरुण होऊन भाग घेतात. या दोन दिवसांत वर्षभर दारू न पिणारे दारू पितात, भरपूर जुगार खेळतात.

यात्रेसाठी पैसे गोळा करण्याच्या दृष्टीने गावाचे ढोबळ मानाने 4-5 भाग पाडलेले असतात. खालची आळी, मधली आळी, वरची आळी, ओढ्याकडची आळी, इत्यादी. आता हे खालचे व वरचे दिशा दर्शविणारे शब्द समजून घेऊ. काहीजणाना खालची आळी म्हणजे कमी उंचीची किंवा उताराकडची आळी असे वाटण्याचा संभव आहे. पण ते तसे नसून खालची दिशा म्हणजे पूर्व दिशा व वरची म्हणजे अर्थातच पश्चिम दिशा. तसेच दक्षिण-उत्तर दिशांविषयी. दक्षिण म्हणजे राकीसाकडची (राक्षसाकडची) व उत्तर म्हणजे गंगेकडची ! तेव्हा असे गावचे भाग सोयीसाठी पाडले जातात. नंतर त्या त्या आळीतील पतवान व उत्साही लोक एकत्र येतात. ते वर्गणी जमविण्यापासून ती खर्च करण्यापर्यंत सर्व कामे पार पाडतात. त्यातल्या त्यात लिहिणारा इसम त्या कमिटीचा हिशोबनीस असतो. त्याच्याजवळ एका वहीत सर्व टिपण असते. पट्टी, (वर्गणी) त्या त्या घरच्या आर्थिक परिस्थितीवर अथवा त्यांना किती एक जमीन आहे त्यावर ठरविलेली असते. मग एखाद्याला कमी जमीन असूनसुद्धा त्याचे उत्पन्न चांगले असेल तर तो जास्त पट्टी हौसेने देतो अथवा एखादा खर्चाचा आईटेम उचलतो! समजा एखाद्या घरात वाटण्या झाल्या तर जितक्या संपत्तीच्या वाटण्या तितक्याच पट्टीच्यापण वाटण्या करायच्या, अशी प्रथा. शिवाय एखाद्याकडे जास्तीचा उद्योग असला तर त्याला त्याबद्दल जास्त पट्टी द्यावी लागते. म्हणजे ट्रॅक्टर, ट्रक, मळणी मशीन, गाळ काढण्याची मशीन, किराणा दुकान, मटणाचा व्यवसाय, इ. पट्टी गोळा करण्याचे बाबतीत यात्रा कमिटीचे व करांच्याबाबतीत केंद्रसरकारचे धोरण सारखेच असते. जास्त उद्योग करणाऱ्याला पर्यायाने जास्त पैसे मिळवणाऱ्याला जास्त टॅक्स! विजेचे बिल जास्त युनिट वापरणारासाठी जास्त प्रति युनिट दर व कमी वापरणाऱ्यासाठी कमी प्रति युनिट दर !

या विचारसरणीत काहींना भारतीय समाजाची सहिष्णुता दिसते. या विचारसरणीत फक्त यशस्वी लोकांनाच संधी आहे असे नाही, तर सर्वांना संधी आहे! पाश्चात्त्य विचारसरणीत (विशेषतः अमेरिका) जास्त काम करणाऱ्याला, जास्त पैसे मिळवणाऱ्याला जास्त उत्तेजन दिले जाते व अयशस्वी होणाऱ्या, कमी काम करणारांना तेथे फारसे स्थान नाही. कोणी म्हणतील त्यामुळेच तेथे जास्त भरभराट दिसते ! म्हणेनात! यानंतर पट्टी गोळा करण्याचा चौथा विभाग म्हणजे हरिजन, बलुतेदार व वरील पट्ट्यांमध्ये जे सामील झाले नाहीत ते!

आजही अस्पृश्यता फारशी कमी झालेली नाही, निदान खेड्यांत तरी. कायदे आहेत. आरक्षण ठेवले आहे. आरक्षण अमलात यावे म्हणून कायदे केले आहेत. तरी सरकारला वा समाजाला वर्णव्यवस्था पूर्णपणे मोडीत काढता आलेली नाही. तिचा प्रभाव 10-20% टक्क्यानेसुद्धा कमी करता आला नाही. ‘जात नाही ती जात’ वगैरे म्हणी चांगल्याच प्रचारात आहेत! हा भेदाभेद व्यक्तीच्या सोयीनुसार वापरला जातो. सरकारच्या कायद्यामुळे व आरक्षणामुळे काही मागास जातीतील लोकांना लोकप्रतिनिधी होता आले तर काही जणांना मोठी सरकारी अधिकाराची पदे मिळाली. पण त्यातील जे मुख्य उद्देश, की या नव्याने ‘क्रीमीलेयर’चे सदस्य झालेल्यांनी आपल्या ज्ञातिबांधवांसाठी काही काम करावे, व राहिलेल्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न करावा; फारसा सफल होताना दिसत नाही.

शहरी अथवा निमशहरी भागांत हा भेद फारसा जाणवत नाही. पण ग्रामीण भागात हा भेद मुळीच कमी झालेला नाही. गावातल्या सार्वजनिक विहिरींवर दलितांना पाणी भरू दिले जात नाही. त्यांना काही ठिकाणी स्वतंत्र छोटी विहीर (आड) बांधून दिली जाते. या संदर्भात एक गोष्ट सांगावीशी वाटते. एका गावात देवाची पालखी या जत्रेच्या समाप्तीपासून पुढच्या यात्रेच्या वेळेपर्यंत पाटलाच्या वाड्यात ठेवलेली असायची. हा मान वगैरे नसावा पण खूप वर्षांची प्रथा होती. मुख्य कारण तिथे तिची नीट निगा राखली जायची. पण काही काळाने पाटलाचा कारभारही जातीने चांभार असलेला झाला, तेव्हा काही सवर्णांनी तक्रार केली की, पाटलाच्या वाड्यात पालखी ठेवायला नको, कारण पालखीला व इतर साहित्याला चांभार शिवतो. पालखी विठोबाच्या देवळात ठेवायला सुरुवात झाली! अस्पृश्यता मनातून गेली नाही. जेवढा कायदा आहे तेवढाच पाळायचा. आता अस्पृश्यांना आर्थिक विवंचना जवळजवळ नाहीच. स्वतःचे शेत नसले तरी रोजगार खूप मिळतो. त्यांना कोणा सवर्णाकडे ज्वारीसाठी हात पसरवण्याची जरुरी नाही. जवळजवळ सर्वांना सिमेंटने बांधलेली स्लॅबची घरे आहेत. ज्यांना जमिनी आहेत, त्यांना त्यात सरकारकडून विहिरी खोदून मिळाल्या आहेत. या विभागातील पट्टीमध्ये जत्रेच्या वेळी येणारे दुकानदार, पटवाले (जुगारवाला) गावात नोकरी करणारे कर्मचारी सामील असतात. एक भक्कम पट्टी तयार होते. कुस्त्याच्या फडासाठी ती वापरली जाते.

पट्टी गोळा करण्याचे काम यात्रेच्या आधी 15 दिवसांपासून चालू असते व ते यात्रेनंतरसुद्धा काही काळ चालू असते. कारण यात मनोरंजन करणारांचे बरेच आधी बुकिंग करावे लागते! वाजंत्री, बँड, ढोलक्यांचा ताफा, ऑर्केस्ट्रा, शोभेची दारूवाले इत्यादि त्यांना आधीच ‘सुपारी’ द्यावी लागते.

आता आपण प्रत्यक्ष यात्रेच्या दोन दिवसांत काय घडते याचा तपशील बघू. प्रत्येक आळीने एक देवाची काठी तयार केलेली असते. साधारण 25-30 फूट उंच. ती सजवलेली असते, बेगड इत्यादी चकचकीत गोष्टीने. बेगड म्हणजे व्यापारी भाषेत ‘मेटालाईज्ड पॉलीएस्टर’. शहरात घरच्या गणपतीसाठी आरास करण्यासाठी जे साहित्य वापरले जाते ते सर्व वापरले जाते. या काठीचा तोल सांभाळण्यासाठी मागे दोन दोर लावलेले असतात. काठी देवापर्यंत नेण्यासाठी कोणातरी भक्कम माणसाची व्यवस्था करावी लागते. क्वचित हा घराण्याचाही मान असतो, पण काठी पेलणारा माणूस चांगला ताकदवान लागतो. त्याला दोन दोर धरणाऱ्या माणसांची मदत असते. या काठीची सवाद्य मिरवणूक काढून देवाला जातात, व शेवटी त्या छबिन्याच्या अथवा पालखीच्या मिरवणुकीचा एक भाग होतात. देवाच्या काठीच्या पुढे वाजंत्री किंवा बँड असतो. त्याच्यापुढे सोंगाच्या गाड्या. त्यांच्यापुढे ढोलक्याचा ताफा व त्याचेपुढे गजराज, असा क्रम सहसा असतो. प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी असते. काही वेळा एखाद्या आळीची रुंदी खूप लहान असते. त्यातून सोंगाच्या गाड्या जाऊ शकत नाहीत, तेव्हा ती आळी सोंगाच्या गाड्या काढू शकत नाही. मग ती मंडळी ढोलक्याचे ताफे जास्त आणतात, किंवा वाजंत्री आणि बँड दोन्हीही आणतात.

ढोलक्याच्या ताफ्यात एकदोन किंवा अधिक नाचणाऱ्या बाया असतात. त्यांना साथ देण्यासाठी एक बाईसोबत दोन ढोलकी असतात. एक झांज वाजवणारा असतो व एक ताशावाला असतो. ढोलकी बहुतेक गावातील लोक वाजवतात. सध्याच्या काळात या झांज, ताशा, ढोलकी या वाद्यांची बहुतेकांना माहिती नसेल पण टी.व्ही. वर जेव्हा संगीतकारांचा लाइव्ह शो असतो तेव्हा ही सर्व वाद्ये त्यांच्या वाद्यवृंदात दिसतात. या नाचणाऱ्या बाया बहुतेक कोल्हाटी समाजाच्या असतात. त्यांना नाचण्याचे, हावभाव किंवा अभिनय करायचे शिक्षण बहुतेक त्यांच्या जमातीतील पूर्वी हे काम केलेल्या बायाच देत असतात. या बहुतेक वर्षभर व्यस्त असाव्यात. वर्षातील 5-6 महिने यात्रेचे गावोगावचे काम असते. व नंतर काही विशेष प्रसंगी त्यांना सुपारी असते, म्हणजे पोळ्याला बैल मिरवण्यासाठी, दिवाळीत रेडे मिरवण्यासाठी, निवडणुकीतील विजय साजरा करण्यासाठी वगैरे. या बाया पूर्वी पारंपरिक लावण्या त्यांच्या आवाजात व चालीत म्हणायच्या पण हल्ली प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांना हिंदी, मराठी सिनेमातील लोकप्रिय गाणी म्हणावी लागतात. चाल त्यांनी लावायची, ढोलकीवाल्याने संगीत द्यायचे व यातून जे निर्माण होईल त्याच्यावर त्यांनी नाचणे बसवायचे. या नाचगाण्याला, वाजविण्याला प्रेक्षक बक्षीस देऊन दाद देत असतात. त्यातूनही त्यांना बरीच मिळकत होत असते. पण हाच ताफा छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास सारखा नाचत असतो. मोठे श्रमाचे काम! एका जाणकाराने माहिती पुरवली की त्यांची सुपारी प्रत्येकी 1000 रुपयाची व बक्षीसही साधारण 5 ते 6 हजारांचे एका दिवसाला व रात्रीला अशी मिळकत असते. गावात जेवढे हौशी लोक, तेवढे बक्षीसही जास्त.

या ताफ्याच्या गाणे वाजविण्याला पांढरपेशे लोक फारशी दाद देत नाहीत. कारण या पांढरपेशांनी मूळ गाणे, त्याचे संगीत, अद्यावत स्टुडिओत केलेले त्याचे एडिटिंग, म्हणणाराचा मूळ आवाज, असे ऐकलेले असते. त्यामुळे ते या दोन्ही सादरीकरणांची नकळत तुलना करू पाहतात. पण त्याची ताफ्यातील लोकांना व त्यांच्या प्रेक्षकांनासुद्धा पर्वा नसते. ते जे काही सादर करतात, त्याला खूप प्रेक्षक गावोगावी असतात.

ढोलकीच्या एकाच ठेक्यावर प्रेक्षकांना पाहिजे ते गाणे नाच करत करत म्हणणे हा निराळा प्रकार आहे हे सर्वांना मान्य करावे लागते. परवा टी.व्ही. वर एका रियालिटी शोचा एक एपिसोड पाहात होतो, नाचाच्या स्पर्धेचा. त्यामध्ये एका नाचणाऱ्या जोडीने जोरदार नाचकाम केले. नाच संपल्यावर अँकरबाईंनी त्या नाचणाऱ्या बाईंना काहीतरी विचारले, तर बाईंना एवढी धाप लागली होती, की अर्धा मिनिट त्यांना उत्तर देता आले नाही. ताफ्यातील बायांना तासन् तास नाचत गाणी म्हणावी लागतात, तेही उघड्यावर !

जरा निराळा प्रकार म्हणजे संगीत बारी. या ताफ्यातील किंवा जरा आवाज चांगला असणाऱ्या बाया जेव्हा स्टेजवर आपली कला सादर करतात तेव्हा त्याला बारी म्हणायचे. स्टेजवर साथ संगीत चांगले असते. ढोलकी, पेटी किंवा पायपेटी, तबला, सनई, दिमडी किंवा तत्सम वाद्ये असतात. दोन गाण्यामध्ये काही विनोदी किस्से सांगितले जातात, किंवा टिंगल टवाळी असते, ती संगीत बारी बारी साधारणपणे पालखी देवळात परत गेल्यावर दोन वाजता वगैरे सुरू होते.

बारी म्हणजे तमाशा नसतो, पण काही ठिकाणी तमाशाचाही कार्यक्रम असतो. गावाशेजारच्या मोकळ्या शेतात स्टेज उभारलेले असते. खूप दिवे लावलेले असतात. समोरच्या पटांगणात खूप लोक बसू शकतात. तमाशा म्हणजे गण गवळण, बतावणी, वग वगैरे सर्व आले. सोंगाड्या, नाच्या, मावशी वगैरे पात्रे असतात.

पूर्वी गावातले शिकलेले हौशी लोक नाटक करायचे. गावातल्याच लोकांनी स्त्रियांची व पुरुषांची कामे करायची. स्त्री पार्टी म्हणजे तिला चष्मा हवाच. हातात भलीमोठी पर्स, एका हातात रुमाल व मनगटावर घड्याळ असायचे. त्यावेळी लाऊडस्पीकर वगैरेचा एवढा सर्रास वापर नसायचा. त्यामुळे मोठ्याने संवाद म्हणावे लागायचे. त्यांचे हातखंडे, नेहमीचे यशस्वी नाटक असायचे ‘मुंबईची माणसं’. त्यालासुद्धा प्रेक्षक गर्दी करायचे. गावातला दगडामातीचा उंच कट्टा म्हणजे स्टेज. त्याला दर्शनी पडदा व बाजूचे आडोसे असायचे. पडदा उघडू शकणारा असायचा. आपापल्या लोभाच्या माणसाला प्रेक्षक प्रोत्साहनपर बक्षीस द्यायचे. सर्वसाधारणपणे 2रु, 5रु, क्वचित 10 रु. वगैरे. ते मोठ्या आवाजात जाहीर केले जायचे. हे सर्व कार्यक्रम दिवस फटफटेतोपर्यंत चालायचे.

सगळ्याच गावांत यात्रांमध्ये सोंगांच्या गाड्या काढण्याची प्रथा नसते. त्यामुळे जेथे सोंगाच्या गाड्या असतात, त्या यात्रेचे आसपासच्या गावांतल्या लोकांना खूप आकर्षण असते. बैलगाडीच्या साठीवर फळ्या टाकून प्लॅटफॉर्म तयार केलेला असतो. चार बाजूला चार वासे बांधून त्याला धोतरे किंवा साड्या बांधून स्टेज तयार केलेले असते. त्याच्या पुढच्या बाजूचा पडदा मधून मधून वर करता येतो. पुढच्या गाडीचा मागचा पडदा व मागच्या गाडीचा पुढचा पडदा वर करून सोंग दाखवायचे असते. त्यासाठी दोन्ही गाड्यांवर कडेच्या वाशाला धरून दोन-दोन माणसे व्यवस्थित मेकअप करून उभी असतात. सोंगांनी संवाद म्हणायचे असतात. सोंगे बहुतेक रामायण, महाभारत अशा थोर ग्रंथांतील पात्रे असतात. पुढच्या गाडीतील अर्जुन कृष्णाला साक्षी ठेवून मागच्या गाडीतील कर्णाची निर्भत्सना धनुष्याला बाण लावून करत असतो, तर मागच्या गाडीतील कर्ण त्याचा सारथी शल्य राजा, याच्या साक्षीने त्याला उत्तर देत असतो. “तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?” वगैरे प्रसिद्ध संवाद तेव्हा म्हटले जातात. सर्व पात्रांनी अगदी जोरदार मेकअप केलेला असतो. त्यांची वस्त्रे पण भरजरी दिसावीत अशी असतात. त्यांचे टोप, चिलखते, तलवारी, गदा, धनुष्यबाण वगैरे सर्व व्यवस्थित असते. कित्येक वेळा ही मंडळी संवाद म्हणण्याच्या ऐवजी नुसतेच एकमेकाच्या अंगावर तलवारीचे वार केल्याचा अविर्भाव करत एकमेकांच्या अंगावर “हो…हो…” करून ओरडतात. या फिरत्या नाटकात संवादाचे महत्त्व अगदीच नगण्य असते, कारण वाद्ये, सनई, ढोल, ताशे, बँड, ढोलकी, माणसे, फटाके, दारूकाम यांच्या कोलाहलात ते कोणी ऐकावेत अशी अपेक्षा फारशी नसते. नाट्यव्यवसाय वा त्याचा अभ्यास या क्षेत्रांशी संबंधित वाचकांना सीन ची चांगली कल्पना करता येईल. त्यांनी तो सीन नजरेपुढे आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याची रंगत आणखी वाढेल. प्रसंग एवढा नाट्यपूर्ण, कथानक सर्वांना माहीत असलेले, पात्रे एवढी पराक्रमी व प्रसिद्ध, लेखन एवढे पल्लेदार, तेव्हा या प्रसंगाचे नेपथ्य, वस्त्रे,दागिने, टोप, तलवारी, शेले, धनुष्यबाण वगैरे शस्त्रे यांसह तो बैलगाड्यांवरचा संवाद, टेंभ्याच्या प्रकाशात व वाद्यांच्या कल्लोळात कसा रंगत असेल! संबंध जत्रेत लहान मुलांचा तर तो आवडता आयटेम असतो.

या सोंगाच्या दोन गाड्यानंतर एक गाडी “घिसाड्याचा कालवा” (गोंधळ) दाखविणारी असते त्यात थोडा हलका मेकअप केलेले 5-7 लोक असतात, लहानथोर. ते नुस्ता गोंधळ करत असतात. एकमेकांना शिव्या देत असतात, ढकलत असतात, मारत असतात. कुणाच्या हातात खेटर असते तर कुणाच्या हातात केरसुणी. ह्या गोंधळाचे कारण कोणालाच समजत नाही. खरे तर असा गोंधळ बऱ्याच घरांत असू शकतो, पण घिसाड्याच्या घरात जास्त वेळा असेल, म्हणून त्याला ते नाव. त्या आळीतील लोकांनी आपापले चांगले शहाणे बैल सजवून रंग लावून आणलेले असतात. गोंधळाला, आवाजाला बुजणारे बैल आणून चालत नाही.

या सर्व सोंगाच्या पुढे एक हत्ती असतो. हा हत्ती जुना फाटका बारदाना (पोती) व साळीचे तणस यांपासून बनविलेला असतो. 7-8 फूट उंचीचा रंगाने काळा, करडा किंवा निळा. याच्यावर दोघेजण बसलेले असतात. अगदी भडक मेकअप, ही या सोंगाची प्रमुख खूण. या हत्तीचे कानही सुपासारखे मोठे असतात, म्हणजे दोन सुपेच रंगवून बांधलेली असतात. व हत्तीवरच्या सोंगाला ते कान त्याच्या पायांनी हलवायचे असतात. या हत्तीच्या अवाढव्य शरीरातला एवढाच भाग फक्त हलत असतो! वर बसलेले हे त्यातल्या त्यात ज्यूनियर आर्टिस्ट. दोघांनाही काळे गॉगल्स, डोक्यावर पदर असतो. ते एका हातातल्या छोट्या रुमालाने वारा घेत असतात, व दुसऱ्या हातातल्या घड्याळाकडे मधून मधून बघत असतात. यांना संवाद वगैरे काही नसतात. फक्त हत्तीचे कान दोन्ही सारखे हलले म्हणजे झाले.

कधी कधी एखाद्या गाडीत देवी असते. तिचे दोन हात हालत असतात. तिने नुकताच पराक्रम करून एका दैत्याला मारलेले असते व त्याला पायाखाली तुडविलेले असते. हे उघडच आहे की सर्व देवांना हा राक्षस भारी झालेला असतो त्यामुळे देवीची म्हणजे कदाचित पार्वतीची प्रार्थना करून तिच्याकरवी याचा वध झालेला असतो. हे बेशुद्ध झालेल्या राक्षसाचे पात्र आहे व त्याला देवीने पराभूत केलेले आहे, याचा उलगडा बरीच वर्षे होत नव्हता. कदाचित तो बेशुद्ध राक्षस कोणी शापित गंधर्व, यक्ष किंवा ज्युनिअर देव असेल, व त्याला असे पडण्याचा शाप असे. आपल्या पुराणांचे काही सांगता येत नाही!

तसेच देवीला नैवेद्य दाखविताना थोडे मांसाचे कालवण व एका छोटी वाटीत दारूपण असायची, हेही लक्षात येत नव्हते. नंतर कोणीतरी सांगितले की दारू व मांस देवीने निःपात केलेल्या राक्षसांसाठी आहे. इकडे भक्त मंडळी देवीच्या वारी म्हणेज मंगळवारी, शुक्रवारी यथेच्छ पिऊन व मांसाहार करून आपण जणू देवीची पूजाच करतो असा अविर्भाव आणतात. सहिष्णुता, सहिष्णुता म्हणतात ती हीच का? पूर्ण हरलेल्या शत्रूलासुद्धा त्याच्या आवडीचे जेवण द्यायचे!

मला स्वर्गाची व इंद्रदेवाची मोठी गंमत वाटते! स्वर्गाचा राजा इंद्रदेव तो देखणा असणारच. सदासर्वकाळ सुंदर अप्सरांच्या घोळक्यात प्यायला अमृत, पंचपक्वान्नांचे जेवण, हिशोब त्याला कोण मागणार! पण त्यासाठी एक हुशार हिशोबनीस. काही प्रश्न निर्माण झाला तर ब्रह्मा, विष्णू, महेश व त्यांच्या बायका पाठीशी आहेतच. दोन-चार देवांना घेऊन शिष्टमंडळ शंकराकडे निघाले, “याचा निःपात करा”. समजा शंकरानेच वर दिला असेल एखाद्या दैत्याला, तर पार्वती बाईकडे आराधना. “भगवानना सांगा रक्षण करा!” असे राज्य करणे. उगीच नाही, पृथ्वीतलावरील प्रत्येकाला स्वर्गात जावेसे वाटते, व त्यासाठी या जन्मात प्रत्येक जण अनेक प्रकारे पुण्य कमावण्याचा प्रयत्न करत असतो! हे सर्व प्रतिपादन कोणत्याही धर्माच्या टिंगलटवाळीसाठी नसून सामान्य माणसाच्या कुतूहलापोटी लिहिलेले आहे, याची कृपया जाणकारांनी नोंद घ्यावी.

देवाच्या पालखीच्या वेळेस आणि एक घटना घडण्याची खूप शक्यता असते. जागा कमी असल्याने सोंगाच्या गाड्यांनी एकमेकांशी सहकार्य केले, तरच त्या गाड्या सुरळीत जाऊ शकतात. एखादी गाडी जरी आडवी-उभी राहिली तरी सर्व मिरवणूक खोळंबते व यावेळेस गाड्या पुढे घेण्यावरून वाद होऊ शकतो. किंवा एखादा ढोलक्याचा ताफा आडमुठेपणामुळे पुढे सरकत नाही. त्यांना कोणी म्हणायला गेले, तर ते त्या निमित्ताची वाटच पहात असतात व भांडण सुरू होते. या सर्व सीनवर जेमतेम दोन पोलीस असतात, व तेही भांडणाच्या ठिकाणी असतात असे नाही. मग गावातल्या सिनिअर लोकांनाच पुढे होऊन दादापुता करावे लागते, व मिरवणूक मार्गी लागते.

मागे एकदा अशीच यात्रेत भांडणे झाली. त्यानंतर काही दिवसांनी मी त्यातल्या एका भांडणाऱ्याला विचारले, “तुम्ही दोघे वर्षभर एकमेकांसमोरून, अनेकदा जात असाल मग भांडणाला हाच मुहूर्त का?” तर त्याने सांगितले, “ते तुमच्या लक्षात यायचे नाही. मी माळावर कोठेतरी त्याला एक ठोसा लगावला तर कोणाला कळणार आहे? पण यात्रेत त्याला नुसते ढकलले, तर सगळ्या गावाला, पाव्हण्या रावळ्यांना समजणार आहे. त्याचा अपमान झाला, म्हणून!”

खेड्यातल्या लोकांच्या समाजाच्या मानसिकतेबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी नमूद करता येतील पण तो फार पुढचा प्रश्न आहे. सध्या उदरभरण, रोजगार, कपडेलत्ते, शिक्षण इत्यादि गोष्टींना प्राधान्य आहे. प्रत्येक गरीब शेतकरी सज्जन असतो, अथवा प्रत्येक वारीला जाणारा वारकरी हा पापभीरू असतोच, असे नाही. ज्याप्रमाणे शहरात एखादा करोडपती भाऊ त्याच्या संपत्तीत वाटेकरी नको म्हणून आपल्या सख्ख्या भावाच्या खुनाचा प्लॅन करतो, त्याचप्रमाणे खेड्यात काटकसरीने प्रपंच करणाऱ्या व पैसे शिल्लक ठेवणाऱ्या बापाला त्याच्या पोटचा मुलगा चैन करायला पैसे देत नाही, म्हणून डोक्यात धोंडा घालून यमसदनाला पाठवितो. मानवी स्वभावाचे सर्व गुणदोष या समूहातपण असतात. असा हा समूह कोणत्या वेळी कसा वागेल ह्याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही.

त्यामुळेच कदाचित निवडणुकांमध्ये उमेदवारांचे बजेट वाढवावे लागते. पण एक मात्र नक्की की घटनाकारांना अथवा विचारवंतांना अभिप्रेत असणाऱ्या पद्धतीने हा समूह विचार करत नाही. मतदान तर नाहीच नाही! आपल्या लोकप्रतिनिधीने पाच वर्षांत किती संपत्ती गोळा केली हे जनतेला कळते पण त्यांना दरवेळा लोकप्रतिनिधीचा राग येत नाही, फारतर वैषम्य वाटते. उलट त्याचे कौतुक वाटते, “त्या एका आमदाराला संपत्ती गोळा करायला तीन वेळा निवडून यावे लागले. या पट्ट्याने पांच वर्षांतच एवढे केले!”, अशीही तुलना असते. मला वाटते असा विचार करण्यामागे त्यांची अगतिकता असते! आपण काय करू शकतो यात? सोडून द्या, असा विचार !

अशा तऱ्हेने सर्व आळ्यांचे लोक छबिन्याला, देवाच्या पालखीच्या मिरवणुकीला शोभा आणतात. त्यासाठी जिवापाड प्रयत्न करतात. साधारण दुसऱ्या तासानंतर पालखी परत देवळात येते. सोंगाच्या गाड्या त्यांच्या ठिकाणावर परत जातात. ढोलक्याचे ताफे पुढील कामासाठी रवाना होतात. बँण्डवाले व शोभेचे दारूकाम करणारे लोक करमणुकीच्या कार्यक्रमाकडे जातात, अथवा आपापल्या गावाकडे जातात. मग पहाटे पर्यंत बारी अथवा तमाशाचे फड उभे राहतात. हल्ली तरुण मुले सिनेमाच्या गाण्यांचे, ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ठेवतात. त्यात गाणी, वाद्य, मिमिक्री, विनोद वगैरे सर्व असते. हा कार्यक्रम तीन-साडेतीन तासाचा असतो. मग सकाळी आळसलेल्या शरीराने, जागरणाने तांबारलेल्या डोळ्यांनी सर्वांना उठावे लागते. पाहुणे-रावळे वाटे लावायचे असतात!

यात्रेतल्या आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे त्या म्हणजे कुस्त्याचा फड व भंडारा (प्रसाद). दिवसभर शेरण्या व नैवेद्य देवाला दाखविल्यावर लोकांचे पाय कुस्त्याच्या फडाकडे वळायला सुरुवात होते. साधारणपणे बशीच्या आकाराच्या 1-2 एकराच्या रानात किंवा जागेत कुस्त्या होतात. गावातल्या पैलवानांनी आदल्या दिवशी या मैदानाच्या मध्यावर तीस फूट व्यासाचा गोल आखून, त्यातली माती फावड्याने उकरलेली असते. ती सपाट मऊ झाली की झाला आखाडा तयार.

कुस्त्या साधारण दुपारी 21 ते 3 वाजता सुरू होतात. दोन हलग्या लावून, गुलाल वगैरे लावून पैसे वाटणारे पंच फडात येतात. तिथल्या एका झाडाखाली घोंगडे अंथरून त्यांची बैठक केलेली असते. यासाठी निराळी पट्टी जमविलेली असते. गावातले सीनियर कुस्तीगीर आता वस्ताद पंच म्हणून नेमलेले असतात. त्यांच्यात एक दोन गावातले वचक असलेले लोकही असतात. प्रथम नारळावरच्या, म्हणजे लहान मुलांच्या कुस्त्या होतात व नंतर मोठ्या मुलांच्या, व नंतर तरुणांच्या कुस्त्या होतात. परगावाहून बरेच पैलवान आलेले असतात. हे पैलवान लोक गटागटाने यात्रांच्या मौसमात कुस्त्यांच्या फडावर फिरत असतात. त्यांना कोणत्या फडावर कोणकोण पैलवान येणार आहेत, कुस्त्याचे बजेट किती आहे वगैरे सर्व गोष्टी माहीत असतात. साहजिकच या पैलवानांची एकमेकांशी चांगली ओळख असते. हे एकमेकांच्या गावात एकमेकांना मदत करतात. सध्याच्या महागाईच्या दिवसात अशा फडाचे बजेट साधारण रु.50,000/- पर्यंत असू शकते. मोठ्या बागायत भागात, साखर कारखान्याच्या एरियात ते 10 लाखापर्यंत असू शकते! त्या भागातील जे नावाजलेले पैलवान असतात, त्यांच्या फक्त फडातील उपस्थितीसाठी त्यांना रु.5,000/- ते 10,000/- पर्यंत रक्कम मिळू शकते. त्यांनी फक्त लंगोट लावून आखाड्याला चक्कर मारायची. एक दोन वेळा शड्डू ठोकायचे. सध्या पैलवानकी पूर्वीसारखी उपेक्षित गोष्ट राहिली नाही. एखादा कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातील नावाजलेल्या पैलवानाचे वार्षिक उत्पन्न रु. 10 लाखापर्यंत असू शकते. या फडाचे बजेट करमणुकीच्या कार्यक्रमापेक्षा कितीतरी जास्त असते. गावातल्या प्रत्येकाला कुस्त्याचा नाद असतो, कदाचित तमाशा, बारी यांपेक्षा जास्त. कित्येक सधन लोक आपल्या तरुण मुलांना कोल्हापूरसारख्या ठिकाणी बराच खर्च करून कुस्ती शिकायला ठेवतात, 2-3 वर्षे. या लोकांची कुस्तीच्या पट्टीला वर्गणी देण्याव्यतिरिक्त इतर खर्चही करण्याची इच्छा असते. त्यामुळेच पैलवानाला विजयी झाल्यावर त्याच्या मगदुराप्रमाणे बक्षिसही बरेच मिळत असते. कुस्त्यांचा शौक, भजने म्हणण्याचा नाद, वगैरे खेड्यातल्या संस्कृती टिकविणाऱ्या प्रमुख गोष्टी आहेत. बरेच गावकरी आपापल्या ओळखीच्या किंवा पाहुण्याच्या गावच्या पैलवानांना आपल्या घरी चहापाणी, जेवण, नाष्टा यांसाठी घेऊन जातात!

फडाचा कार्यक्रम दिवस मावळेपर्यंत किंवा पट्टीचा पैसा संपेपर्यंत चालतो मग परत एकदा हलगी वाजते व फड मोडतो. मग पैलवान प्रेक्षक देवाच्या भंडाऱ्याचा लाभ घेतात व आपापल्या गावाला रवाना होतात. ज्यांचे गावात पाहुणेरावळे आहेत ते पालखीसाठी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी जातात.

भजने म्हणणारा गटसुद्धा एखादा गायनमास्तर ठेवून दर आठवड्याला 2-3 वेळा त्याच्याकडून भजने म्हणण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतात, पखवाज्याकडून शिक्षण घेतात. आपले कामकाज दिवसा सांभाळून रात्ररात्र भजनाची प्रॅक्टीस करतात. आणि भजनाचा नाद हा तमाशा बारीच्या नादाइतकाच जबर असतो.

पूर्वी शेतकरी लोकांची आपल्या शेतात आपल्याला घरी खाण्यासाठी लागणाऱ्या बहुतेक सर्व वस्तूंची लागवड करण्याची प्रथा होती. एखाद्या वर्षी एखाद्या पिकाला अनुकूल परिस्थिती नसली तरी निदान घरी खाण्यापुरते पावावे, अशा बेताने लागवड केलेली असायची. त्यामुळे गावकऱ्यांकडे ज्वारीबरोबरच गहूपण असायचा. त्यामुळे बरेच जण देवाच्या भंडाऱ्यासाठी गहू पायली दोन पायली, व गुऱ्हाळ असेल तर गूळ द्यायचे. मग देवळाच्या आवारातच चर खणून त्याच्यावर कढया चढविल्या जायच्या. त्याच्यासाठी सरपणाची व्यवस्था गावकीच्या महाराना करावी लागायची. त्या त्या आळीचे कार्यकर्ते खीर तयार करण्याचे काम करायचे, व फड संपला की सर्व मंडळी खीर खायला बसायची. पण आता काळ बदलला आहे. हल्ली खीर कोणी खात नाही. त्यासाठी लाडू, जिलेबी, मसालेभात, वांग्याची भाजी, असा मेन्यू असावा लागतो. अशा जेवणात चपाती नसते कारण चपात्या करणे हा एक मोठाच व्याप असतो. गावातले, पाहुणे, इतर आलेले सर्वजण जेवण करतात व भरल्या पोटाने छबिन्याला जातात!

आता या यात्रेसाठी लागणाऱ्या, गोळा केल्या जाणाऱ्या वर्गणीविषयी थोडेसे. आपण पूर्वी पाहिले आहे की घरटी एक ठराविक रक्कम गोळा केली जाते. पण हल्ली प्रत्येक ठिकाणी यात्रेचा एक फंड तयार होतो. त्यातून यात्रा संपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी गरजू लोकांना पैसे व्याजाने 1 वर्षासाठी दिले जातात. शंभर रुपयांचे पुढच्या यात्रेच्या आधी दीडशे द्यायचे. त्याला खूप मागणी असते. वशिले वगैरे लावावे लागतात. असे प्रत्येक आळीच्या बाबतीत असते. याची वसुली वगैरे फार कडक असते. आणि पुन्हा देवाचे पैसे! बुडवायचे कसे? त्यामुळे प्रत्येक आळीकडे खूप पैसे जमतात. त्यांपैकी काही ठराविक रक्कम यात्रेला खर्च केली जाते, व बाकीची फंडात जमा होते, त्यामुळे दर वर्षी हा फंड फुगत जातो व गावकऱ्यांना वर्गणीही द्यावी लागत नाही. सुरुवातीला याबाबत थोडीशी चर्चा झाली, की गरजूंच्या व्याजातून यात्रा करणे योग्य आहे का, वगैरे. पण या सर्वांपेक्षा गावकऱ्यांना दरवर्षी वर्गणी न देणे सोयीस्कर वाटल्याने आता तीच प्रथा पडून गेली आहे.

अशीच गोष्ट शहरातल्या गणपती मंडळांची आहे. पूर्वी या मंडळांचे कार्यकर्ते सगळीकडे हिंडून, पावत्या फाडून वर्गणी गोळा करायचे. आता ते वर्षभर त्यांच्या गणपतीच्या मंडपातच अथवा इतर ठिकाणी पत्ते वगैरे खेळत त्याच्याद्वारे वर्षभर पैसे जमवतात. त्यामुळे गणपतीची वर्गणी जमविण्याचे फार मोठे टारगेट त्यांच्यापुढे नसते व त्याचे इतके प्रेशरपण नसते.

अशा प्रकारे खेड्यातील लोकांच्या आयुष्यातील दरवर्षी येणारा एक महत्त्वाचा सण अथवा इव्हेंट महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे अशा प्रकारे साजरा होतो. अर्थात यात तपशिलाचे फरक त्या त्या गावाच्या आकारमानावर, आर्थिक स्थितीवर, गावातील लोकांच्या शिक्षणावर, गावातील प्रथांवर असतील; पण साधारणपणे नमुना असाच असेल.

प्रत्येक गावकरी, लहान, थोर, स्त्री, पुरुष यात्रेची वर्षभर वाट पाहात असतो. त्यातून कोणाकोणाला काय मिळते? जो सामान्य माणूस आहे त्याला दोन दिवस निव्वळ करमणूक करायला मिळते; आपल्याच गावात कोणताही खर्च न करता. जे तरुण कार्यकर्ते असतात त्यांना सार्वजनिक कामाचे, जे थोडे सिनिअर असतात त्यांना हिशोब ठेवणे वगैरेचे शिक्षण मिळते अथवा अडजेस्टमेन्ट करण्याचे शिक्षण मिळते. याच जातकुळीतला आणि एक शब्द म्हणजे सेलिंग करणे. शब्द प्रामुख्याने सर्व थरातील सरकारी, निमसरकारी कंत्राटदार व इतर ठेकेदार यांच्यात फार लोकप्रिय असतो.

बायाबापड्यांना शहरात जाऊन सिनेमा वगैरे पाहायला जमत नसते. त्यांना गावातच करमणुकीची, निदान दोन दिवस तरी सोय होते. आता स्त्रियांचा सहभाग सार्वजनिक कामात खूप वाढला आहे. देवळात आतल्या बाजूला पूर्वी गुरविणींशिवाय कोणीही स्त्री नसायची. पण आता पालखी निघताना व परत आल्यावर निम्मे देवळाचे आवार स्त्रियांनी भरलेले असते. लेकीबाळींना माहेरी येण्याची संधी मिळते. पाहुण्यांच्या गाठी पडतात. कदाचित सोयरिकी जमतात. जर मिरवणुकीत काही वाद वगैरे झालेच, तर वर्षभर चघळायला विषय मिळतो.

आता कित्येक खेड्यात ज्यूनियर कॉलेजपर्यंत शिक्षणाची व कॉम्प्युटर शिक्षणाची सोय असते. त्याचे खाजगी क्लासेस पण असतात. विठोबाच्या देवळाच्या सारवलेल्या भिंतीवर कॉम्प्यूटर अॅकॅडमीची जाहिरात वाचून गंमत वाटते. आता खेड्यात जसाजसा शिक्षणाचा प्रसार होत आहे, तशी खेड्यात उच्चशिक्षित लोकांची संख्या वाढत आहे. या शिकलेल्या मुलांना राजकारणी लोकांचे खरे स्वरूप वरचेवर उघड होत असल्याने त्या विषयाचे तरुणांना आकर्षण कमी कमी होत आहे. आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असवा, गावातले वातावरण चांगले असावे, निर्भय असावे, पोरी बाळींना गावात हिंडताना अडचण भासू नये, गोरगरिबांवर अन्याय होऊ नये, अशा विचारांच्या तरुण सुशिक्षित लोकांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक पैशाचा अपहार करणे योग्य नाही, अशी भावना मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या पुढील काळात यांसारख्या सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप बदलून ते जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आशा आहे! पाहू या! द्वारा प्राध्यापक डी. टी. जाधव, 38, कर्मवीर हौ. सोसा. अलिपूर रोड, बार्शी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.