अंधश्रद्धानिर्मूलनार्थ (भाग २)

[ श्री सीताराम दातारांचे अन्धश्रद्धाविनाशाय हे विवेकवादी भूमिकेचे पद्यरूप आपण गेल्या अंकापणून क्रमशः देत आहोत. पहिल्या भागात 56 कडव्यांमधून (1) मानवाची वैशिष्ट्ये, (2) मानवांपुढील समस्या, (3) मानवाची उपाययोजना, (4) मानवाने कल्पिलेले ईश्वराचे स्वरूप, (5) ईश्वरविषयक सत्याची विस्मृती, (6) जनमानसावर ईश्वरकल्पनेचा प्रभाव, (7) सत्यवाद्यांचा पक्ष, (8) नास्तिकांच्या मतें सृष्टीतील विषमतेचे स्पष्टीकरण, (१) आस्तिकांचे कर्मसिद्धान्ताद्वारे स्पष्टीकरण, (10) नास्तिकांचा आक्षेप, (11) आस्तिकांचे उत्तर, (12) यावर नास्तिकांची प्रतिक्रिया. (अंक 21.9, डिसेंबर 2010.) आता वेगवेगळी प्रमाणे तपासून दातार अंधश्रद्धा या मुख्य विषयाकडे वळत आहेत. – संपादक ]

13) प्रत्यक्षप्रमाण व अनुमानप्रमाण इंद्रियें वस्तुजाताचा बोध प्रत्यक्ष होत जो पुरावा अन्य ना लागे त्याते सिद्ध करावया ॥57 असे प्रमाण प्रत्यक्ष, सर्वां प्राप्य, अजोडही मुख्य साऱ्या प्रमाणांत मान्य सर्वांस सर्वथा ॥58 साऱ्या वस्तू न कळती इंद्रियांनीच सर्वदा अनुमानप्रमाणें त्यां जाणे मानव तेधवा ॥59 गोलाकार ग्रहांचा वा त्यांची सूर्यप्रदक्षिणा जाणिती अनुमानें त्यां ‘पर्वतीं अग्निला’ जसे ॥60

14) प्रत्यक्षप्रमाणाविषयी शंका ज्ञानेंद्रियेही सर्वांची कार्यक्षम न सारखी इंद्रियज्ञान कोणाचे समजावे प्रमाणवत् ? ॥61 द्रष्ट्यांस दिसते काही दूरचे भव्य-दिव्यसे सामान दृष्टिच्या लोकां तसे ते न दिसे परी ॥ 62 ‘का ज्ञान द्रष्ट्या लोकांचे मानावे अप्रमाण ते? पूर्वग्रह असे होती सत्यशोधास बाधक’ ॥63

15) शंकेचे निरसन यावरी म्हणतो आम्ही ‘पूर्वग्रह असा नसे परि येथे तर्कमात्रे घ्यावा निर्णय, हे बरे ॥ 64 देखिले जे जसे ज्याने भव्य-दिव्य असो नसो त्या च्यासाठी तेच सत्य, यात शंका मुळी नसे ॥65 न पाहताच परि ते सत्य व्हावे परां कसे? ‘अदर्शनामुळे सत्य’, ऐसे कोण म्हणू शके ? ॥66 विवाद्य होता प्रत्यक्ष, मतभेदांत गुंतता, अनुमानप्रमाणेच सत्यनिर्णय होतसे ॥67 गोलाकार धरित्रीचा तिच्यावरच राहुनी पाहणे चर्मचक्षूंनी शक्य कोणासही नसे ॥68 खगोलशास्त्रवेत्त्यांनी पृथ्वीची गोल आकृती प्रयोगें इंद्रियां गम्य सिद्ध केली म्हणोनिया ॥69 प्रयोगें, अनुमानांनी होतसे जर सिद्ध ते शास्त्रास मान्य होईल, द्रष्ट्यांनी जे विलोकिले ॥70 प्रत्यक्ष, अनुमानें वा, सिद्ध नाही विधान जे कोणतेही, कुणाचेही ग्राह्य ना सत्यशोधनी ॥71

16) प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांनी ईश्वरादि कल्पनाचे परीक्षण- प्रत्यक्ष-अनुमानांनी पाहूया पारखूनिया सिद्ध होतात का देव, आत्मा, ब्रह्मादि कल्पना ॥72 न दिसे, ऐकता ना ये, देव तो स्पर्शिता न ये चव ना गंध ना त्याला, इंद्रियां देव नाकळे ॥ 73 ज्ञानेंद्रियांनी देवाचे अस्तित्वच न जाणवे न प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध ईश्वर होतसे ॥74 प्रत्यक्षाधार नसता टिकते अनुमान ना म्हणून अनुमानेंही देव सिद्ध न होतसे ॥ 75 म्हणून देव, देवाचे लीला, कोप, अनुग्रह जीवात्मा, परमात्मा वा नरक-स्वर्गवास ही ॥ 76 पूर्वजन्म, पुनर्जन्म, फल वा पूर्वकर्मज चक्र वा जन्ममृत्यूचे मुक्ती जीवास त्यातुन ॥ 77 तथापि सर्व या भव्य, रम्य, केवळ कल्पना सत्य हे गोपिले मात्र लोकांपासून सर्वथा ॥78 चाणाक्ष धूर्त लोकांनी जाळे हे विणले असे शठाहाती तेचि होई जनशोषणसाधन ॥ 79

17) शब्दप्रमाणपरीक्षा तपासून आता पाहू प्रमाणा शब्दनामका ज्यामुळे झाकले जाते असत्ये सत्य कैकदा ॥80 लिखितोक्त विधानाचे, अथवा पठित, श्रुत सत्यासत्यत्व असते स्वयंसिद्ध असंशय ॥81 कशासाठी, कुणी केले, ते विधान कुटे, कधी सत्यासत्यत्व त्याचे ना ठरे या माहितीवरी ॥82 ‘सपाट आहे धरणी’, बायबलस्थ विधान हे सत्य मानत होते जे बायबलाचे उपासक ॥83 पृथ्वीचा गोल तज्ज्ञांनी ब्रूनो – गॅलिलिओसम अनुमानें, प्रयोगांनी सिद्ध केला निखालस ॥84 तथापि संशोधन हे, बाय्बलाशी विसंगत म्हणून धर्माचार्य त्या दिले देहान्तशासन ॥ 85 ‘नरें ना निर्मिले वेदां’, ‘स्वातंत्र्या पात्र ना स्त्रिया’ ‘वेदाधिकार ना शूद्रां’, ‘जन्माने जात ती ठरे’ ॥86 ‘मरतो देह ना आत्मा’, ‘नित्य आद्यन्तमुक्त तो’ ‘शरीर त्यजुनी जीर्ण, शिरे देही नवीन तो’ ॥87 ‘ब्रह्म सत्य जगत् मिथ्या’, ‘जीव ब्रह्मच ना दुजा’ ‘मृताला जन्म ठरलेला’, घोषणा या निरर्थक ॥88 श्रुति स्मृति पुराणांत विधाने ही अशी जरी केली मुनींनी अथवा ईश्वराने तथोक्त त्या ॥89 तेवढ्यानेच ती सिद्ध, सत्य ना ठरती मुळी न प्रत्यक्ष न वा तर्क प्रमाणे सिद्ध होत ती ॥90 शब्दप्रमाण ही बाधा सत्यनिर्णय साधता अंधश्रद्धाच ते पोशी म्हणोनी त्याज्य सर्वथा ॥91

18) श्रद्धा, अंधश्रद्धा व डोळस श्रद्धा अंधश्रद्धा आणि श्रद्धा, श्रद्धा डोळस या अशा संकल्पना भिन्न भिन्न, नोंद ही घ्यायला हवी ॥ 92 श्रद्धा विश्वास वस्तूत, इंद्रियें नानुभूत जी अनुमानें ज्ञात होता श्रद्धा तीवर डोळस ॥93 जी प्रत्यक्ष प्रमाणें वा अनुमानेहि ना कळे अशा वस्तूत विश्वास, अंधश्रद्धा मला गमे ॥94 व्यवहारास नित्याच्या श्रद्धा जी लागते सदा तर्काधिष्ठित असल्याने तियेला नाव डोळस ॥ 95

19) काही अंधश्रद्धा ‘जीवात्मा परमात्मा वा सृष्टिकारक ईश्वर चक्र, जन्म नि मृत्यूचे, दैव, मुक्ती चमत्कृती’ ॥96 ‘गुणरूपस्वभावादि प्राण्यांचे जीवनक्रम या गोष्टी ग्रहनक्षत्रस्थितीनेच नियंत्रित’ ॥97 ‘जपयज्ञस्तोत्रपाठें ग्रहपीडानिवारण गुरुकृपें लाभतात यश, पुत्र, तसे धन’ ॥98 प्रत्यक्ष अनुमानें वा या साऱ्या फोल कल्पना विश्वास त्यांवरी अंधश्रद्धा हे स्पष्ट होतसे ॥99

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.