पत्रसंवाद

राजीव साने, 2, स्नेह क्लासिक्स्, 7/1 एरंडवणे, पाडळे पॅलेससमोरील रस्ता, पुणे 411004 चौसाळकरांना उमजलेला मार्क्स : काही प्रश्न आजचा सुधारकच्या नोव्हेंबर 2010 च्या अंकात सुधीर बेडेकर यांनी लिहिलेले परीक्षण (मार्क्सवाद-उत्तरमार्क्सवाद ले. प्रा. अशोक चौसाळकर) वाचले. त्यातून बऱ्याच आशा पल्लवित झाल्या. परंतु पुस्तक वाचल्यावर मात्र निराशा झाली. पहिली दोन प्रकरणे खुद्द मार्क्सवर आहेत. या दोन प्रकरणात इतक्या घसरड्या जागा निघाल्या की त्यावर प्रश्न उपस्थित करण्यातच प्रस्तुत लेख खर्ची पाडावा लागला. पुस्तकाच्या पुढील भागातही आक्षेपार्ह असे बरेच काही आहे पण ते या लेखाच्या मर्यादेत घेणे शक्य नाही. चौसाळकरांनी अनेक ठिकाणी खुद्द मार्क्सचे चक्क चुकीचे प्रतिनिधित्व केलेले आहे व मार्क्सच्या गूढगुंजनात्मक वाटणाऱ्या विधानांचा उलगडा न करताच ती वारंवार उद्धृत केलेली आहेत व स्वतःच्या शब्दातही तेच तेच आणखीच गोंधळात टाकणाऱ्या पद्धतीने मांडले आहे. तसेच भांडवलशाहीमधील दुरिते दाखवताना जणू काही भांडवलशाही- पूर्व व्यवस्थांमध्ये ती दुरिते नव्हतीच असा भास ठायी ठायी निर्माण होईल अशी भरपूर विधाने केली आहेत. पहिल्या दोन प्रकरणांवरील माझे आक्षेप मी अवतरणांसह उपस्थित करीत आहे. (अवतरणांतील जाड ठसे माझे आहेत.)

श्रम नव्हे तर श्रमशक्ती कामगार हा भांडवलदाराला नेमके काय विकतो? चौसाळकर याचे उत्तर पुनःपुन्हा ‘श्रम विकतो” असे देतात. “कामगार फक्त आपले श्रम विकू शकतो. पण या श्रमाचा मोबदला कमीत कमी देण्याचा भांडवलदाराचा प्रयत्न असतो.” (पान 35 ). अतिरिक्त मूल्याची निर्मिती कशी होते याचा मार्क्सने मांडलेला सिद्धान्त ते पुढीलप्रमाणे सांगतात. “कामगारांना जास्त काम करायला लावून त्याला त्या कामाचे कमी वेतन देण्यातून मुख्यतः अतिरिक्त मूल्याची निर्मिती होते.” (पान 36). “त्याच्या (मार्क्सच्या) मते कामगाराचे श्रम विकत घेत असताना भांडवलदार त्याला पुरेसे वेतन देत नाही” (पान 36) जास्त म्हणजे कशापेक्षा जास्त? कमी म्हणजे कशापेक्षा कमी ? किती म्हणजे पुरेसे ? जणू, काही सांकेतिक मानकांचा भंग केला तरच शोषण होते व असे मार्क्सही मानत होता, अशी समजूत यातून होते.

पण निष्ठावान मार्क्सवादी कमी/जास्त / पुरेसे अशी भाषा करणारच नाही. मुळात कामगार श्रम विकतो असे तो चुकूनही म्हणणार नाही. कारण असे बोलल्याने मार्क्सच्या वरकड मूल्याच्या सिद्धान्तातले व शोषणाच्या कल्पनेतले मुख्य इंगितच हरवले जाते. मार्क्सच्या सिद्धान्तानुसार, भांडवलशाहीतले शोषण हे श्रमाला कमी किंमत देऊन नव्हे तर श्रमशक्तीला (मूल्याच्या श्रम- सिद्धान्तानुसार) रास्त किंमत देऊनच होत असते. कारण श्रमशक्ती निर्माण करायला लागणाऱ्या श्रमांपेक्षा श्रमशक्ती कार्यान्वित केल्याने उपलब्ध होणारे श्रम हे नेहमीच जास्त असतात. कामगार श्रम विकत नसून श्रमशक्ती विकतो व त्यामुळेच भांडवलदाराला श्रमशक्तीत दडलेले वरकड श्रम हिरावण्याची संधी मिळते. श्रम नव्हे तर श्रमशक्ती हा मंत्र मार्क्सवादाच्या अभ्यासवर्गात सुधीर बेडेकरांनीच आमच्याकडून घोटून घेतला आहे. चौसाळकर हा मंत्र कसा विसरले व ते तो विसरलेत हे बेडेकराच्या लक्षात कसे आले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. हा घोटाळा केल्यामुळे माक्सय अर्थाने जे अति-शोषण ठरते ते चौसाळकरांच्या मांडणीनुसार नुसते शोषण ठरेल आणि माक्सय अर्थाने जे शोषण ठरायचे ती शोषणरहितता ठरेल!

शोषण ही गोष्ट काहीतरी अनियमितता आहे ही समजूत चौसाळकरांच्या दुसऱ्याही एका वाक्याने पडताळली जाते. “बाजारात वस्तूंचे व लाभांचे वाटप व्यक्तीच्या कुवतीप्रमाणे, योगदानाप्रमाणे होत असते. ” (पान 16) असे चौसाळकर म्हणतात. म्हणजे समाजसत्तावादाचे (पहिल्या टप्प्याचे) तत्त्व (पान 44) हे बाजारपेठेतच अवतरलेले असते की काय?

श्रमविभागणी हेच दुरित? श्रमविभागणी हा शब्द चौसाळकरांनी सतत दुरित अर्थानेच वापरला आहे. 1. “श्रमविभागणीमुळे माणसाची उपक्रमशीलता नष्ट झाली.” (पान 23 ) 2. “श्रमविभागणीमुळे संपत्तीची साठवण सुरू झाली.” (पान 22 ) 3. “अशा प्रकारे श्रमविभागणी, वस्तूंची क्रयशीलता आणि खासगी मालमत्ता यांच्यामुळे व्यक्तीच्या मनात परात्मभाव उत्पन्न झाला.” (पान24) 4. “समाजात ज्याप्रमाणात श्रमविभागणी होते त्या प्रमाणात समाजाचे वर्गीय विभाजन होते.” (पान 34) 5. ” श्रमविभागणी झाल्यानंतर प्रत्येकास काम दिले जाते आणि ते काम त्याला इच्छा असूनही सोडता येत नाही.” (पान24) 6. “माणसाचा हा जो कम्युनिस्ट इसेन्स आहे तो सध्याच्या श्रमविभागणीमुळे हरवला आहे.” (पान 40 ) 7. आता हे इतके तापदायक असे श्रमविभागणी हे प्रकरण उद्भवले कुठून? तर चौसाळकर सांगतात, “उत्पादनाच्या प्रक्रियेत श्रमविभागणीचे तत्त्व स्वीकारण्यात आले कारण माणूस समाजाच्या गरजा भागविण्यासाठी उत्पादन करत होता.” (पान 22) हे कोणत्या व्यवस्थेत घडले? आतापर्यंत ‘समाजाच्या गरजा भागविण्यासाठी’ उत्पादनाची व्यवस्था उदयास आली आहे काय? आणि आली तरी त्या ध्येयासाठी श्रमविभागणीची गरज लागणारच. मग इतके अनर्थ एका श्रमविभागणीने केले (‘अविद्येने केले’च्या धर्तीवर) म्हणण्यात काय अर्थ आहे?

मानवी श्रमात परस्परपूरक असे श्रमप्रकारांचे जे वैविध्यीकरण होते ते सरसहा दुरितच असते काय? चौसाळकर श्रमविभागणी हा शब्द श्रम करणारे आणि श्रम न करणारे, अशी जी विभागणी (वर्गविग्रह) होते तिला उद्देशून वापरत आहेत की काय? खरेतर मार्क्सने ‘तांत्रिक श्रमविभागणी’ आणि ‘सामाजिक श्रमविभागणी’ यांत भेद केला आहे. अंतिम मनोराज्यात “सकाळी तो मासे पकडील” (पान 43) वगैरे जे आहे त्यात मुळात “पण म्हणून तो कोळी बनणार नाही. समीक्षक बनणार नाही…..” अशी उपवाक्ये आहेत. त्यांचा उल्लेखही चौसाळकर करत नाहीत. दुसरे असे की यांत्रिकीकरणाच्या एका टप्प्यावर श्रमाचे जे अति-लहान तुकडे बंद स्वरूप येते त्याचाही उल्लेख चौसाळकर करत नाहीत. त्यांनी श्रमविभागणी खाजगी मालमत्ता => परात्मभाव असा एकच उद्घोष चालू ठेवला आहे. कधी कधी ते श्रमविभागणीला ‘सध्याची’ असे म्हणतात. पण मग भांडवलपूर्व व्यवस्थांत सारे आलबेल होते की काय? असा प्रश्न पडतो.

राज्यसंस्था : वर्गीयतेची निर्मिती की निर्माती राज्यसंस्थेला स्वतःचेच वर्गीय हितसंबंध निर्माण होतात, ती आश्रय देऊन वर्ग निर्मिते, हा बाकुनिन या विचारवंताचा मार्क्सवर त्याच्या जीवनकालातच आक्षेप होता व मार्क्सने तो नुसताच धुडकावून लावला होता (मार्क्सचे प्र.भ. ग. बापट लिखित चरित्र).

समाजसत्तावादाच्या प्रकल्पातच. राज्यसंस्थेला साधनमात्र मानायचे व तिचे वर्गीय चरित्र ती कोणाच्या ताब्यात आहे यावर ठरवायचे, हा महा-दोष राहण्यात मार्क्सची महान चूक कारणीभूत होती. चौसाळकरांनी ह्यावर स्पष्ट मांडणी केलेली नाही. परंतु त्यांना राज्यसंस्था ही वर्गीयतेची निर्मातीसुद्धा असते हे मान्य आहे की काय असे वाटायला लावणारे एक विधान मात्र अनपेक्षितपणे येते. “राज्यसंस्थेने उत्पादनव्यवस्था व उत्पादनसंबंध तयार केलेले असतात.” (पान 16) लगेचच उलटे वाक्यही येते. “राज्यसंस्थेची निर्मिती त्यातून होते.” ही उभयपक्षी द्वंद्वात्मकता असू शकते. पण हे ॥ वाक्य वगळता चौसाळकर राज्यसंस्थेविषयीची सनातनी (ऑर्थोडॉक्स) भूमिका रेटत राहताना दिसतात. “राज्यसंस्था ही सत्ताधारी वर्गाचे हत्यार असते.” (पान 16) “नागरी समाजाचा खासगी मालमत्ता व तद्विषयक अधिकार हा पाया होता. आता तो पाया नष्ट करून त्यापलिकडे जाणारी समाजव्यवस्था साम्यवादी समाजात निर्माण होते. त्याबरोबर राज्यसंस्थाही बरखास्त होते. कारण राज्यसंस्था ही शोषण व दमन यावर आधारित असते. मूलभूत बदलांमुळे तिची गरजच भासणार नाही व ती अप्रस्तुत बनेल.” (पान 41 ) ‘विदरिंग अवे ऑफ स्टेट’चे बरखास्त हे भाषांतर (?) प्रथमच केले गेलेले दिसते आहे. या सगळ्यात, “समाजात निर्माण होणारी कोणतीही सार्वजनिक सत्ता राज्यसंस्थेचे स्वरूप धारण करते.” या वाक्याचा काय अर्थ लावायचा? कामगारक्रांतीतून निर्माण होणारी सत्तादेखील शोषण व दमन करेलच असा ?

स्त्री- दास्य ही भांडवलशाहीची खासियत? आता चौसाळकरांना उमजलेल्या मार्क्सचे स्त्री-दास्याबाबत काय मत होते हे पाहू. 1. “भांडवलशाहीपूर्वीच्या सर्व समाजव्यवस्थांमध्ये स्त्री-पुरुष विषमता होती. कारण स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये करण्यात आलेली श्रमविभागणी पुरुषाच्या सोयीची होती. या श्रमविभागणीमुळे स्त्रियांना चूल आणि मूल यांच्यात बंदिस्त करण्यात आले. ” (पान 39 ) असे चौसाळकर म्हणतात (मार्क्सचे उद्धृत नाही). तीनच ओळींनंतर एंगल्सचे मत असे येते की “आदिम समाजात मालमत्ता नसल्यामुळे स्त्री पुरुष समानता होती. स्त्रियांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. परंतु समाजाच्या विकासाबरोबर श्रमविभागणी झाली. त्यातून खासगी मालमत्तेचा उदय झाला. ही मालमत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी कुटुंबसंस्थेचा उदय झाला. त्यानंतर स्त्रीवर पुरुषाने आपले वर्चस्व लादले.” (एंगल्स पान 39). मालमत्तादार नसलेल्या म्हणजेच श्रमिक वर्गांना कुटुंबसंस्थेची गरज का भासली? ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते त्यांच्याकडे वारसाहक्काने देण्यासारखे तरी काय असणार? हे प्रश्न एंगल्सबाबत उपस्थित करायला नकोत काय? पुढे चौसाळकर म्हणतात, “भांडवलशाहीत स्त्री हे उत्पादनाचे साधन बनले. ” (पान 39) म्हणजे काय? कच्चामाल म्हणून? यंत्रसामग्री म्हणून? माझ्या माहितीनुसार, कुटुंबात श्रमशक्तीच्या पुनर्भरणासाठी स्त्री जे श्रम घालते ते भांडवलदाराला फुकटात मिळतात अशी एक (समाजवादी स्त्रीवादात) धारणा आहे. (मार्क्सने मात्र वेतन हे कुटुंब-पोषणासकट मानलेले आहे.) तसेच ज्या स्त्री-कामगार असतील त्या कामगार या नात्याने वरकड देत असतीलच. परंतु स्त्री हे थेट उत्पादनाचे साधन कशी काय बनते? चौसाळकर लगेचच उत्तर देतात. “कारण भांडवलशाहीत स्त्री लैंगिक शोषणाची बळी असते.” (पान 39 ). म्हणजे भांडवलपूर्वकाळात स्त्री ही लैंगिक शोषणाची बळी नव्हती की काय? आणि असे बळी ठरण्याने ती ‘उत्पादनाचे साधन’ कशी काय बनते?

चौसाळकरांनी आणखी एक सुटसुटीत वाक्य टाकले आहे. “आपल्या उपभोगासाठी व एक वस्तू म्हणून भांडवलदार स्त्रीचा वापर करतो.” भांडवलदारच का? कामगार वेश्यांकडे जात नाहीत की काय? कामगार कुटुंबात स्त्री- दास्य (लैंगिकसुद्धा) नसते की काय?

पुढे साम्यवादी समाजात स्त्री-पुरुष विषमताच काय पण भेदही दूर होईल असे आश्वासन देऊन चौसाळकर म्हणतात, “खासगी नफा हा कुटुंबाचा पाया असणार नाही.’ (पान 42) नफाच का? वेतन हासुद्धा कुटुंबाचा ‘पाया’ नसतो काय?

“ (साम्यवादात ) स्त्री आर्थिक कारणांसाठी पुरुषावर अवलंबून असणार नाही.” (पान 42 ). स्त्रियांना घराबाहेरचे रोजगार मिळण्यासाठी पार साम्यवाद येईपर्यंत थांबावे लागते आहे की काय?

परात्मभाव नेमका कशामुळे? परात्मभाव (एलियनेशन) हा नेमका कशातून उद्भवतो यावर फारच वैविध्यपूर्ण उपपत्तींचा शोध आपल्याला या ग्रंथातून लागतो. “समाजातील भौतिक समस्यांचा भाग त्याने (हेगेलने) नागरी समाजाकडे सोपविला आणि आध्यात्मिक भाग राज्यसंस्थेकडे सोपविला. नागरी समाज खासगी हितसंबंधांचे रक्षण करतो तर राज्यसंस्था सार्वत्रिक हिताचे रक्षण करते. या विभाजनामुळे माणसाच्या मनात परात्मभावाची, अलगपणाची भावना निर्माण झाली.” (पान 19 ). आता हेगेल कशावर काय सोपवतो त्यावर माणसांच्या भावना थोड्याच अवलंबून असतात? सार्वत्रिक हित हे आध्यात्मिक कसे ठरते? असो. स्वहित आणि सर्वहित यांच्यात ताण आल्याने परात्मभाव येतो, असा त्यातल्या त्यात आकलनीय अर्थ आपण घेऊ या.

“केवळ वस्तूंचे उत्पादन केल्यामुळे नाही. तर त्या वस्तू त्याच्यापासून हिरावून घेतल्याने व त्यांच्या विनिमयाचे स्वतंत्र नियम बनवून त्या नियमांनी मानवी व्यवहार नियमित केल्याने परात्मभाव निर्माण होतो.” (पान33) यातला हिरावून घेण्याचा भाग समजू शकतो. पण मग हिरावून घेणे हे गुलामगिरीतही असतेच. गुलामाकडून फटके मारून वस्तू बनवून घेतली व ती हिरावून घेतली तरी परात्मभाव निर्माण होणारच. त्यासाठी क्रयवस्तू व बाजार इ. आधुनिक गोष्टींची गरज नाही. असो. पण दुसरा भाग कमालीचा आहे. बाजारपेठ-भांडवलशाही यांत जे विनिमयाचे नियम बनतात ते गति-नियम असतात, विधिनियम नव्हेत. ‘बनवून’ हे क्रियापद विधिनियमांनाच लागू पडते. नियोजन-नोकरशाही या विनिमय पद्धतीत (उदा. समाजसत्तावाद) विधिनियमांनुसार मानवी व्यवहार नियमित करण्याचा प्रश्न येईल. त्यात अर्थातच परात्मभाव निर्माण होईल. पण ही समाजसत्तावादावरील टीका ठरते, भांडवलशाही- वरची नव्हे.

श्रमातील परात्मभावाचा संदर्भ जिथे जिथे येतो तिथे तिथे एक समज डोकावताना दिसतो. हा समज असा की मुळात मानवी श्रम हे “आनंददायी व सर्जनशील असेच असतात. पण भांडवलशाहीत परात्मभाव निर्माण होतो.” (पान 33) अशा अर्थाची वाक्यरचना पुनःपुन्हा येते. म्हणजे कोणे एके काळी मानवी श्रम हे आनंददायी व सर्जनशील असेच होते की काय? भांडवलपूर्व सगळ्या शाह्यांमध्ये परात्मभाव नव्हता की काय? की मानवी श्रम हे आदर्श व्यवस्था अवतरल्यानंतर तरी सततच आनंददायी व सततच सर्जनशील असणार आहेत की काय? श्रम हे कधी स्वरूपतःच कष्टप्रद किंवा कधी कधी घृणास्पदसुद्धा (शाहीनिरपेक्षपणे) नसतात काय? लादलेपणा हा क्रयवस्तू बनवितानाच असू शकतो असे आहे काय? या प्रश्नांना कोठेही उत्तर मिळत नाही. एरवी मानव म्हणजे एकदम आत्मावस्थेत! आणि भांडवलशाहीतच परात्मभाव! असे पानोपानी सूचित होते आहे. श्रम हा मुळात “एक प्रकारचा आत्माविष्कार असतो”, पण फक्त भांडवलशाहीतच ती “एक जाचक गरज बनते.” (पान 33) त्याने निर्माण केलेल्या वस्तूचा त्याच्या विरोधात वापर केला जातो” (पान 32).. वगैरे अनेक ठिकाणी ही नेमकी काय प्रक्रिया आहे याचा खुलासा होत नाही.

परात्मभावाचा विचार करताना, मानवी संबंध एकतर्फी, शत्रुत्वाचे असणे हे नेहमीच महत्त्वाचे मानले पाहिजे. बाजारपेठेतच ते काहीतरी विशेषत्त्वाने दुरितपूर्ण का बनतात याचा खुलासा मिळत नाही. बाजारपेठ या संस्थाप्रकाराबद्दल काहीतरी विशेष दुरित आहे, असे सतत मानले जाताना दिसते. पण इतर संस्थांशी तुलना करून ते सिद्ध केल्याचे आढळत नाही. हे पुढील वाक्याने अधोरेखित होते, “माणसाचे माणसावरील परावलंबन संपले पण तो आता बाजारपेठेवर अवलंबून राहू लागला.” यात मुळात माणसात उभयलाभकारक असे परस्परावलंबनही असू शकते व पारस्परिकतेने परात्मभाव जाऊ शकतो, याची कुठेही दखल घेतलेली दिसत नाही.

युक्तिवाद की गूढगुंजन ? आता काही गूढ वाक्ये पाहू. “माणसाच्या गरजा पूर्ण करणे हेच इतिहासाचे उद्दिष्ट नसून गरजांचा उदय व विकास यांचा अभ्यास करणे हे इतिहासाचे उद्दिष्ट आहे.” (पान 31) इतिहास हा शब्द विद्याशाखा म्हणून घेतला तर तो माणसाच्या गरजा भागवतो म्हणजे काय? इतिहास म्हणजे प्रत्यक्ष इतिहास असे मानले तर इतिहास कसलातरी अभ्यास करण्यासाठी चालत असतो म्हणजे काय?

“वस्तूंचे उत्पादन मुबलक प्रमाणात झाल्याने प्रत्येकजण त्याला आवश्यक तेवढ्याच वस्तूंचा उपभोग घेईल व त्यामुळे साम्यवादी समाजात प्रत्येकाला त्याच्या गरजेप्रमाणे वस्तू मिळतील” (पान 41 ) माणसातील लोभ हा दुर्गुण मुळात दुर्भिक्ष्यातून उत्क्रांत झाला असेलही पण केवळ मुबलकता आल्याने तो नष्ट होतो असे दिसत तर नाही. जर साम्यवादाद्वारे आलेली मुबलकता ही काहीतरी विशेष असते असे म्हणायचे असेल तर तसे म्हणावे. व का? तेही सांगावे.

“माणूस त्यावेळी खऱ्या अर्थाने मुक्त होईल की जेव्हा त्यास याचे भान येईल की आपणास मानवी जीवनाचे जीविततत्त्व साध्य करायचे आहे.” पण हे भान त्याला कधी येईल? साम्यवादानंतर जीविततत्त्वाची परिपूर्तीच होणार आहे. त्यामुळे नुसते भान येणे हे अगोदर होत असले पाहिजे. पण अगोदरच तो खऱ्या अर्थाने मुक्त असेलच कसा? आणि हे जीविततत्त्वाचे सत्व आहे तरी काय? सगळ्यांना त्यांच्या (भल्याबुऱ्या) सगळ्याच क्षमता पुरेपूर वापरायला मिळाव्यात, इतकेच ? हे क्षमतावापर एकमेकांना नष्टही करू शकतात.

“साम्यवाद म्हणजेच इतिहासातील कोडी सोडवणे होय आणि सर्व समस्यांवर साम्यवाद हेच उत्तर आहे हे त्यास ठाऊक असते” (पान 27 ) साम्यवाद ही व्यवस्था आहे की कोडी सोडवण्याचा उद्योग? त्यास ठाऊक असते म्हणजे कोणास ठाऊक असते? साम्यवादास, इतिहासास, की कोडी सोडविणाऱ्यास ? कोडे सुटण्याच्या अगोदरच उत्तर माहीत असणे हे धार्मिक दुराग्रहाचे लक्षण आहे, वैज्ञानिक विचारपद्धतीचे नव्हे.

(वरील लेखात सुधीर बेडेकरांनी या पुस्तकाविषयी जे दावे केले आहेत त्यांवर भाष्य केलेले नाही. कारण तो एक स्वतंत्र विषय आहे. फक्त त्यांनी पुरस्कृत केलेल्या पुस्तकातील पहिली दोन प्रकरणे लक्षात घेतली आहेत.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.