पुस्तक-परिचय : पुकारा

श्री. नानक रामटेकेंनी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत काम करताना आलेले अनुभव ‘पुकारा’ या पुस्तकात लिहिले आहेत. 1965 ते 2001 ह्या 36 वर्षांच्या कालावधीत त्यांनी ज्या वेगवेगळ्या पदांवर काम केले त्यात जिल्हाधिकारी (वर्धा), आयुक्त (नागपूर महानगरपालिका) ह्या मुख्य नेमणुका आहेत. 1965 ला ते उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले व 1983 ला ते आय.ए.एस. झाले.
विदर्भाच्या ग्रामीण भागात काम करताना, ते बौद्धधर्माचे असूनदेखील त्यांची पूर्वीची हिंदु-महार जात नेहमीच त्यांच्या आड आली. कुठे त्यांना घर मिळेना, कुठे त्यांना पाण्याची टंचाई सोसावी लागली, तर कुठे त्यांची भांडी घासणारी बाई काम सोडून गेली. अश्या प्रकारच्या हीन दर्जाच्या वागणुकीशी सामना देत त्यांनी आपले काम फार चोख बजावून महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना प्रामाणिकपणे राबविण्याचा प्रयत्न केला.
लेखकाला झालेला 1960-1980 च्या कालखंडातील बौद्ध (पूर्वीचे महार) धर्मीयांचा द्वेष आता 30-40 वर्षांनंतर कसा असेल हे माझ्यासारख्यांना, 45 वर्षे अमेरिकेत राहन, समजायला मार्ग नसला तरी इथे भारतीय लोकांची वागणूक पाहून तो द्वेष अजून फार मावळला नसावा असे वाटते. इथे अमेरिकेत आम्ही दरवर्षी करत असलेल्या ‘आंबेडकरजयंतीस बोलवूनदेखील भारतीय हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन येत नाहीत. मी बौद्ध (पूर्वीचा महार) आहे हे माहीत झाल्यावर बरेचसे भारतीय महाराष्ट्रीय आता दूरच राहतात. हे पुण्या-मुंबईकडील लोक कुठे अचानक मला भेटलेच तर “काय? काय म्हणता?” असे काहीसे पुणेरी बोलून पुढे चालू लागतात. त्यांची महाराष्ट्रीय मंडळे भली आणि गणपतिपूजा भली! महारांचा द्वेष/विटाळ ते भारतातूनच इथे अमेरिकेत घेऊन येतात. त्यांच्यापैकी थोडे जातीला मानत नाहीत हे खरे. पण बहुतेक मराठी लोक महारांबरोबर भारतात मिसळतच नसावेत, नाहीतर महारांची प्रगती त्यांना दिसली असती. त्यांच्यापैकी काही जाणकार मराठी बंधू महारांनी बौद्ध व्हायला नको होते म्हणून त्यावर वाद घालतात. पण काही का असेना आता बौद्ध झालेल्या महारांनी बरीच प्रगती केली व ती डोळे उघडणारी आहे. धर्मांतरात त्यांच्याबरोबर न आलेल्या चांभार, मांग, ढोर, मेहतर इत्यादि जातींना महारांनी मागे टाकले आहे. डॉ.वा.ना.कुबेर आपल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकात यावर भाष्य करताना म्हणतात, “महारांना मोठ्या प्रमाणावर वैयक्तिकगतिक्षमता आली. जातिबद्ध (हिंद) समाजाचा संपूर्ण त्याग म्हणून बौद्ध धर्मांतर व तसेच उच्चशिक्षण व शैक्षणिक पात्रता मिळवून, आणि राजकारणात सहभागी होऊन हितसंबंधांचे निराळेपण करून, महारांनी धर्मनिरपेक्ष आंस (चाकांना जोडणारा आधार) निवडला आहे, असा निष्कर्ष काढता येईल. बौद्ध धर्मांतर…… त्याचाच विस्तार होता.”
पण पूर्वीच्या महारांनी बरीच प्रगती जरी केली तरी त्यांचा विटाळ स्पृश्य व शूद्र धर्मीय हिंदू पूर्वीइतकाच किंवा जास्त करत आहेत, हे समाजाला हानिकारक आहे. ह्या संबंधात लेखकांच्या काही आठवणी सामाजिक अंतरंग स्पष्ट करतात. “धर्म बुडाला ह्या आठवणीत ते लिहितात. — “… माझी उपजिल्हाधिकारी या पदावर नेमणूक चंद्रपूर (जिल्ह्यात) ब्रह्मपुरीला डिसेंबर 1965 ला झाली. तिथे मार्च 1966 ला पाण्याची टंचाई भासू लागली. श्रीमंत लोकांकडे भोई (कोळी) हे कावडीने पाणी घालत असत. माझ्याकडेही श्री इंगोले गुरुजींनी त्यांच्या भोयांना दोन कावडी पाणी घालावे असे ठरवून दिले. कावड घालण्याचे काम दोन तीन दिवस सुरळीत सुरू होते, पण तिसऱ्या दिवशी तो भोई रागारागाने माझ्या दारात आला व खांद्यावरील कावड माझ्यापुढे जोराने आपटत ओरडला, “अहो साहेब, तुम्ही माहा धरम बुडवला. तुम्ही महार आहात हे मला सांगितलेच नाही. आता माही जात पंचायत माही दाढी-मिशी घेईल आणि मले जात-पंचायतले कोंबडं आणि दंड भरावा लागेल. अरे रामा, आता मी काय करू? माहा तर धरमच बुडाला.”
आता 40 वर्षानंतर ब्रह्मपुरीतील भोई महारांच्या — आता बौद्धांच्या घरी पाणी भरत असतील काय? गांधी-आंबेडकर गेल्यानंतर अस्पृश्यतानिवारणाच्या मोहिमेत उदासीनता आली. देशाच्या फाळणीपूर्वी डॉ.आंबेडकरांच्या 1935 च्या घोषणेने महार जर मुसलमान झाले तर प्रश्न पडेल म्हणून गांधी/काँग्रेस अस्पृश्यांकरिता काही करू लागले. महार मुसलमान न झाल्यामुळे फाळणीच्या वाटाघाटीतील तेवढी गुंतागुंत कमी झाली, पण आता पाकिस्तान झाल्यानंतर महारांच्या उन्नतीकडे लक्ष देण्याची स्पृश्य समाजाला व त्यांच्या सरकारला काही गरजच उरली नाही. तसेच भारताला भांडवलशाही (capitalism) कडे नेऊन, Social welfare ला बाजूला सारल्यामुळे, ब्रह्मपुरीच काय पण साऱ्या देशात अजूनही महारांकडे पुष्कळ भोई पाणी भरत नसावेत असे वाटते.
असल्याच प्रकाराच्या आपल्या दुसऱ्या आठवणीत लेखक सन 1976 साली दारव्हा, जिल्हा यवतमाळ, येथे शिक्षक अस्पृश्य विद्यार्थ्यांना इतर स्पृश्य मुलांबरोबर न बसवता बाहेर दूर धुळीत कसे बसवत याबद्दल लिहितात. ते वाचून बाबासाहेब आंबेडकरांना 1902 साली ते विद्यार्थी असताना तसल्याच प्रकारची वागणूक मिळत होती ह्याची आठवण होते. आज पंचाहत्तर वर्षानंतर तीच स्थिती आहे हे वाचून मनाला खिन्नता येते. डॉ. वा.ना.कुबेर लिहितात : ”डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्माने अस्पृश्य असल्याने त्यांना शाळेत निराळे बसावे लागे. इतर मुलांत ते मिसळू शकत नव्हते, किंवा त्यांच्याबरोबर खेळू शकत नव्हते. त्यांच्या टिपण वह्यांनाही शिक्षक शिवत नसत. त्यांना वर्गात कविताही म्हणायला लावत नसत किंवा प्रश्नही घालत नसत. अस्पृश्यांच्या मुलांना तहान लागली तर ती त्यांची तोंडे वर करत व कोणीतरी दयाळू होऊन त्यांच्या तोंडात पिण्याचे पाणी ओतीत….” मलादेखील 1950 च्या दरम्यान पुलगावला शाळेत असताना तसाच अनुभव आला. मी शाळेच्या घड्यातले पाणी पिऊ शकत नव्हतो. कोणी तरी-माझा घोरपडे नावाचा मित्र-मला दुरून पाणी टाकायचा. ‘मारोतीच्या पारावर’ या कथेत रामटेके लिहितात त्यात व 75 वर्षांअगोदरच्या भेदभावात बरेच साम्य आहे. ते लिहितात:
…… हा सन 1976 च्या हिवाळ्यातील प्रसंग आहे. दिग्रसपासून अंदाजे पंधरा वीस किलोमीटरवर असलेल्या एका गावास मी भेट दिली. त्या गावात एक हनुमानाचे देऊळ होते. देवळाच्या सभोवती सिमेंटचा मोठा पार बांधण्यात आला होता. त्या पारावर प्राथमिक शाळेचा वर्ग सुरू होता. पारावर बसून पंचवीस-तीस मुले शिक्षण घेत होती पण आठदहा मुले त्या मारोतीच्या पाराखाली धुळीने भरलेल्या व आजूबाजूस शेण पडलेल्या जागेवर बंसले होते. ह्या मुलांनाही पारावर बसवून का शिकवत नाही? असे मी गुरुजींना विचारले. ते स्वतःला सावरून धिटाईने म्हणाले, “आम्ही उच्चजातीच्या मुलांना पारावर बसवतो व खालच्या जातीच्या मुलांना पाराखाली बसवतो. हीच प्रथा अनेक, अनेक वर्षांपासून इथे सुरू आहे. त्याबद्दल कुणी अजून तक्रार केली नाही. खाली बसलेल्या मुलांना मी वर पारावर बसविले तर गावांत भयंकर प्रसंग निर्माण होईल.” माझ्या अधिकाराने मी ती प्रथा बंद केली, असे लेखक लिहितात.
अजूनही बऱ्याच गावी अस्पृश्य व बौद्ध मुलांना निराळेच बसवीत असतील काय? यांची महाराष्ट्र सरकारने पाहणी करून तसा आढावा जनतेसमोर मांडावा व परिस्थिती ठीक करावी. नाहीतर अशा सरकारवर कोण विश्वास ठेवणार? अस्पृश्याच्या शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांप्रमाणेच आज गरीब लोकांच्या मुलांचे कसे हाल मुंबईतच होत आहेत याचा वृत्तांत ‘The Hindu’ या इंग्रजी वृत्तपत्रात नुकताच वाचला. त्या गरीब लोकांत झोपडपट्टीत राहणाऱ्या मुसलमान, हिंदू लोकांचादेखील समावेश आहे. कोण म्हणतो भारतात शिक्षण हा पूज्य (Pious) शब्द आहे? तिथे तर श्रीमंतच शिक्षण घेऊ शकतात असे दिसते. ‘हिंदू’ पैपर आपल्या, नोव्हें.2010 अंकात लिहितो : “मुंबईत demolition squad गरिबांच्या झोपडपट्टीत जाऊन शाळेकरी मुलांबद्दल विचार न करता झोपडपट्ट्या तोडून तेथे राहणाऱ्या शाळेकरी मुलामुलींच्या शिक्षणावर गदा मारते. सरकार त्याकडे मुळीच पाहत नाही. घरे तोडताना demolition squad विद्यार्थ्यांची पुस्तके, नोट्स, पेन्सिली वगैरे बाहेर कचऱ्यात फेकून देतात. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या शाळा सुटतात व ती पोट भरण्यासाठी बीडी-व्यवसाय, हॉटेल वगैरे इतर अनेक छोट्या व्यवसायांत ओढली जातात.” यांमध्ये अस्पृश्य व बौद्ध मुलांचा भरणा असतो हे सांगायला नकोच. Cast आणि Class हे दोन्हीही भारतीय समाजाला पोखरत आहेत; Caste (अस्पृश्यता) जास्त! 1956 साली डॉ.आंबेडकरांनी जातिविरहित बौद्ध धर्मात धर्मांतर करून महाराष्ट्रातील 5% लोकसंख्या असलेल्या अस्पृश्यांना बौद्ध बनवून हिंदू धर्माची साहायता केल्याबद्दल त्यांचे व जे बौद्ध झालेत त्यांचे आभार न मानता पुन्हा या लोकांना, अस्पृश्य-हिंदू म्हणून आपल्या धर्मात खेचून, हिंदूधर्मीय आपली संख्या वाढवीत आहेत. हिंदू धर्माची लोकसंख्या भारतात खाली पडू नये असा राजकीय अजेंडा म. गांधींचाही होता. म. गांधीचे 1935 चे त्याबद्दलचे विचार पुन्हा वाचणे जरूरीचे वाटते. 13 ऑक्टोबर 1935 ला येवले (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलितवर्गीय परिषदेत आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. त्यावर महात्मा गांधी म्हणाले होते की, “अस्पृश्यता आज मरणोन्मुख अवस्थेत आली आहे. अस्पृश्यांना धर्मांतर करण्याची
जरुरी नाही. धर्माची आवश्यकता मानवी जीवनात आहे आणि धर्म बदलणेशर्ट बदलण्याइतके सोपे नाही.” यावर डॉ.आंबेडकरांनी मत प्रदर्शित केले की “धर्माची आवश्यकता गांधी सांगतात ते मला मान्य आहे. पण धर्म सर्व मानवांना समान वागविणारा असला पाहिजे. हिंदू धर्माची बैठक असमानतेवर आहे म्हणून हिंदु धर्म अस्पृश्यांना त्याज्य वाटतो.” (डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, खंड 6, चांगदेव भवानराव खैरमोडे, पृ.69)
म.गांधी 1935 साली अस्पृश्यता मरणोन्मुख आहे म्हणाले तरी आज 75 वर्षांनंतर ती जिवंत कशी? बरीच वर्षे आफ्रिकेत राहून हिंदुस्थानात आल्यावर सन 1935 पर्यंत गांधींना येथील अस्पृश्यता किती भयंकर आहे याची कल्पना कदाचित नसावी. अस्पृश्यतेला ते आफ्रिकेतील काळ्या लोकांच्या गुलामगिरीसारखीच समजत असावे. काळ्या लोकांची गुलामगिरी गोऱ्या लोकांनी स्वतःच्या आर्थिक लाभाकरता लादली होती पण भारतीय अस्पृश्यतेची मुळे हिंदू धर्मात खोलवर गेलेली आहेत. हे म. गांधी कसे विसरले? लेखकाची ‘मी राजगोंड हो’ ही आठवण अनुसूचित जमातींमधील गोंडदेखील अस्पृश्यता पाळतात हे दाखवते. ‘सन 1969. गांधीजींची जन्मशताब्दी सर्व देशभर साजरी करण्याची शासकीय स्तरावर अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यावेळी नागपूरवरून यवतमाळ येथे माझी उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली… (मोठ्या मुश्कीलीने) खूप प्रयत्न करून एका पांढरपेशा वस्तीत घर भाड्याने मिळाले. (शेजारच्या) प्राध्यापक महोदयांकडे भांडी घासावयास येणारी बाई ही माझ्याकडेसुद्धा भांडी घासत असे. अंदाजे एक आठवडा माझ्याकडे काम केल्यानंतर एक दिवस त्या बाई सकाळी अत्यंत रागाने व त्वेषाने पदर खोचून माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, “काय हो साहेब, तमी आपली जात लपवून मला कामाला लावले काय? शेजाऱ्याने मला तुमची जात सांगितली. जात पंचायतीत आता मले जुर्माना भरावा लागेल, कोबडं खाऊं घालावं लागेल. मी राजगोंड हो, महाराच्या घरी आमी कधीच भांडे घासत नाही.”‘ अस्पृश्यांना हीन लेखण्याच्या वरील आठवणींशिवाय रामटेकेंनी जे 28 अनुभव लिहिले आहेत. त्यांत इतरही विषय हाताळताना त्यांनी आपले administrative skill कसे वापरले क्षुब्ध जमावाला कसे शांत केले, याची माहिती आहे. लेखकाची प्रतिभा पाहून वाचक फार प्रभावित होतो.
पण त्यांची ‘नागोबा’ ही आठवण, त्यातील अंध-विश्वासाचा भाग सोडल्यास, विदर्भात व भारतात अगोदर असलेल्या ‘नाग’ लोकांवर अप्रत्यक्ष प्रकाश टाकते. ते मेहकर (जिल्हा-बुलढाणा) येथे उपविभागीय अधिकारी असताना त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर नाग बसलेला दिसतो. त्याला मारण्यासाठी रामटेके त्या नागाच्या मधल्या भागावर एक लठ (मोठे जाड लाकूड) ठेवतात व आपला मदतनीस (Helper) आनंद याला दुसऱ्या बाजूने नागास लठनी मारावयास सांगतात, आनंद नागाला न मारता खाली बसतो व नागाला दंडवत करतो. तो म्हणतो, की नाग आमचे दैवत आहे, आम्ही त्याला कधीही मारत नाही. या नागास मारल्यास माझ्या सात पिढ्या नरकात जातील. शेवटी रामटेकेच दुसऱ्या लठाने नागास मारतात. पण त्यामुळे आनंद फार काळजीत पडतो, त्याचे पुराण चालूच असते. आता नागद्वाराला जाऊन प्रायश्चित करावे लागेल असे.तो म्हणतो. यावरून, अंधश्रद्धेपेक्षा आनंदाचे पूर्वज खरेच नागभक्त नागलोक असावेत असे वाटते; म्हणूनच नागांना तो दैवत मानतो. डॉ. नवल वियोगी ‘Nagas : Ancient Rulers of India’ या पुस्तकात लिहितात को नागलोक सर्पाची पूजा करायचे व नाग-सर्प आपले सांभाळ करणारे देव आहेत असे ते मानायचे. ही सर्प-पूजा सिरीया, पॅलेस्टाईन, इराण इत्यादी देशांत होती व ती तिथूनच भारतात समेरीयन, द्राविडीयन लोकांनी आणली. सिंधू खोऱ्यामधून मिळालेल्या बऱ्या मुद्रा, नाणी इत्यादींवरून तिथे लोक नागाची पूजा करायचे असे दिसते. हिंदूच्या ऋग्वेदातही नाग लोकांचा (अही) अहीवित्र, जो इंद्राचा शत्रू होता, त्याचा उल्लेख आहे. ऋग्वेद सांगतो, हे नाग लोक संस्कृत न बोलणारे अनार्य होते. त्यांची भाषा ‘सौरासेनी’ होती, ज्याचा उल्लेख पुराणात म्लेंच्छ’ म्हणून आहे. ह्या लोकांना ऋग्वेदात ‘दास’ असे म्हटले आहे. आंबेडकरांनी ‘Who were the untouchables?’ या ग्रंथात नाग लोकांबद्दल बरेच लिहिले आहे. 1956 मध्ये नागपूरला आपल्या धर्मांतराच्या भाषणात जो नागलोकांचा उल्लेख केला त्यात ते म्हणतात : “भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली आहेत. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. त्याचेच आपण वंशज आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास नाग-पर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथन 27 मैलावर नागार्जनाची टेकडी आहे. नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नुदी ती नागनदी.”
India of Dark Ages’ हे पुस्तक मत्स्यपुराणाचा संदर्भ देऊन म्हणते, जरी नाग लोक भारतात राजे होते तरी त्यांना (हिंदू) जनता ते बौद्ध असल्यामुळे देशद्रोही, विश्वासघातकी व बंडखोर म्हणत असे. त्याला कंटाळून काही नाग लोकांनी हिंदूच्या वैष्णव शाखेत प्रवेश केला. डॉ. वियोगी लिहितात की बौद्ध धर्माच्या उतरत्या काळात बऱ्याच नाग राजांनी (श्रीमंतांनी) ‘हिरण्य-गर्भा’ हा खर्चिक विधी करवून घेऊन हिंदूंच्या उच्च जातीत प्रवेश केला व गरीब नाग लोकांना शूद्रांमध्ये टाकण्यात आले.
हा सारा इतिहास पाहून खात्री होते की ‘नागोबा’मधील आनंदाचे पूर्वज नाग लोकच असावेत. विदर्भात राहणारे बरेच लोक त्याप्रमाणे पूर्वीचे नागलोकच होते; नागपूजा, नागपंचमीसारखे सण त्याची साक्ष देतात.
रामटेकेंनी बौद्ध (पूर्वीचे महार) लोकांचा विटाळ मानणाऱ्या व्यक्तिसमुदायास न्यायालयाच्या शिपायाप्रमाणे पुकारा करून जनता–न्यायाधीशापुढे– हाजीर केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! समाजाचे डोळे उघडणारे हे लेखन वाचून लेखकाबद्दल हेच म्हणावे लागेल; तेथे पाहिजे जातीचे, येऱ्यागबाळांचे काम नोहे.
16802, Shipshaw River Dr., Leandev, TX, USA 78641

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.