पुस्तक-परिचय समृद्धीची उत्क्रांती

प्रत्येक जातीमधील प्राणी बालपण, तारुण्य आणि म्हातारपण ह्या स्थितींमधून जाताना केवळ त्याच्या निसर्गदत्त क्षमतांचा वापर करतो. मनुष्य हा एकच प्राणी असा आहे की त्याच्या आयुष्याच्या काळात व्यक्ती आणि मानवजात ह्या दोन्ही पातळ्यांवर तो विकसित होत असतो. माणसाची प्रत्येक नवीन पिढी ही आधीच्या पिढ्यांनी रचलेल्या पायावर नवीन रचना करीत असते.
– अॅडम फर्ग्युसन
ॲन एसे ऑन द हिस्ट्री ऑफ सिव्हिल सोसायटी

आवडलेल्या पुस्तकाची सुबुद्ध मराठी वाचकांना ओळख करून द्यावी म्हणून लिहायला सुरुवात केली. परंतु पुस्तकाच्या शीर्षकाचे मराठी भाषांतर काय करावे येथपासून अडचण सुरू झाली. रॅशनल ह्या शब्दाचे भाषांतर विवेकवादी असे आहे. सबळ कारणे किंवा पुराव्यांच्या आधारे वर्तन करणाऱ्या माणसाला विवेकी म्हटले जाते. अशी माणसे सर्वसाधारणपणे ज्ञान-विज्ञानवादी असतात. ऑप्टिमिस्टचा अर्थ आशावादी माणूस. स्वभावतःच आशावादी माणसाला वाईटातही काही तरी चांगले दिसत असते. ह्याच्या उलट काही माणसे अशी असतात की त्यांना काही चांगले घडते तेव्हाही त्यात काही तरी निराशाजनक दिसते. काही विवेकी माणसे स्वभावतःच आशावादी किंवा निराशावादीही दिसतात. अविवेकी माणसांच्या आशा-निराशावादाची चर्चा तर निष्फळच आहे.

प्रस्तुत पुस्तकात आशावाद आणि निराशावाद ह्या दोन मानवी प्रवृत्तींच्या संदर्भात लेखकाने मानवाच्या समृद्ध होत गेलेल्या समाजाची चिकित्सा केली आहे. गेल्या दहा हजार वर्षांत माणूसप्राण्याची वाढत गेलेली समृद्धी हा खरा पुस्तकाचा विषय आहे. आज जगभरातील लोक रोज जे टी.व्ही.च्या पडद्यावर बघतात, वर्तमानपत्रांच्या बातम्यांमधून वाचतात ते अजिबात आनंददायक नसते. दहशतवाद्यांचे हल्ले, गटा-तटांच्या मारामाऱ्या, जातीय-वर्णीय धार्मिक-राजकीय पक्षांच्या सैद्धान्तिक मारामाऱ्या, जीवघेणी युद्धे, बलात्कार, भ्रष्टाचार, कटकारस्थाने, लूटमार आणि भयानक अपघात ह्यांच्या बातम्या सातत्याने कानावर पडत असतात. त्यात होणारा विनाश डोळ्यांना दिसत असतो. ह्याशिवाय लोकांच्या सामाजिक आर्थिक मागण्यांसाठी तसेच विकासविरोधी, पर्यावरणवादी शांतताचळवळी ह्यांच्यामुळेही लोकांना कोण बरोबर, कोण चूक हे कळेनासे होते. शिवाय नैसर्गिक भूकंप, पूर, दुष्काळ, त्सुनामी लाटा, वणवे आणि वादळे ह्या सर्वांचे तांडव आणि विनाश ह्याचे दर्शन आपल्या सर्वांना घरबसल्या होत असते. मानवसमाज कोणत्या दिशेने चालला आहे. ह्या आशंकेने कमी-जास्त प्रमाणात सर्वजण भयभीत होत असतात. अशा नानाविध कारणांमुळे निराशा येणे स्वाभाविक असले तरी मानवी समाजात काहीही सुधारणा होणे अशक्य आहे असाच सूर बहुसंख्य विचारवंतांच्या आणि भल्या भल्या संपादक-लेखकांच्याही लिखाणातून समाजात पाझरत असतो. कोणत्याही गोष्टीची शाश्वती वाटत नाही आणि कोणाचाही विश्वास वाटत नाही. अशी निराशा आता जागतिक झाली आहे असे मॅट रिडलेला जाणवले आणि ह्याच जागतिक, मानवी निराशेला आव्हान देण्याचे काम लेखकाने पुस्तक लिहून केले. २००८ साली अमेरिकेतील आर्थिक घोटाळ्यांमुळे जगाला जागतिक मंदीने घेरलेले असताना लेखकाने हे पुस्तक लिहिले हे विशेष. २०१० साली पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा जागतिक मंदीचा ज्वर काहीसा ओसरला होता. अशा दोलायमान आणि अस्थिर काळात विवेकी आशावादाचा पुरस्कार करणारे पुस्तक लिहिणे हे खरोखरच धाडसाचे काम आहे. जे लोक मानवजातीचा आणि जगाचा विचार करतात आणि स्वभावतःच आशावादी आहेत त्यांना ह्या पुस्तकातील विवेचन जास्त भावेल. जे लोक मानवजातीच्या, देशाच्या आणि जगाच्या भविष्याबद्दल निराश झालेले असले तरी जर ते विवेकवादी असतील तर त्यांनी हे पुस्तक जरूर वाचायला हवे. त्यामुळे त्यांची निराशा काही प्रमाणात तरी कमी होईल. बुद्धिवादी, विवेकवादी लोकांनी आपल्या आशा-निराशा बाजूला ठेवून हे पुस्तक जरूर वाचावे. मानवजातीच्या विकासाची दिशा शोधणाऱ्यांनाही हे पुस्तक महत्त्वाचे वाटेल. आज महाराष्ट्रातील सुशिक्षित, पुरोगामी, प्रागतिक, सुबुद्ध लोकांमध्ये एक प्रकारचा हताशपणा आला आहे. अशा वेळी निराशा कमी व्हायला ह्या पुस्तकाची कदाचित मदतच होईल.

व्हेन आयडियाज हॅव सेक्स
ह्या प्रकरणाच्या सुरुवातीला दोन वस्तुचित्रे आहेत. एक आहे ते अश्मयुगात माणसाने घडविलेल्या, हाताच्या पंजामध्ये मावणाऱ्या टोकदार दगडी हत्याराचे तर दुसरे चित्र आहे ते आधुनिक संगणकासाठी वापरल्या जाणाऱ्या, पंजामध्ये धरून वापरल्या जाणाऱ्या माऊसचे. आधुनिक माहिती युगातील शक्तिशाली आयुधाचे. पाच लाख वर्षांच्या कालावधीमध्ये माणसाचे विश्व कसे बदलले आहे ते ह्या चित्रातून लेखकाने प्रभावीपणे दाखविले आहे.

मॅट रिडले हे पुस्तकाचे लेखक एक जीवशास्त्रज्ञ आहेत, मात्र त्यांच्या ह्या पुस्तकात त्यांनी माणूसजातीच्या आर्थिक समृद्धीचा आढावा घेतला आहे. काही माणसे स्वभावतःच विवेकवादी असून आशावादीही असतात आणि अशांच्या मूलभूत नवनिर्मितीच्या आधारानेच मानवजातीला आज अनन्यसाधारण अशी समृद्धी प्राप्त झाली आहे हे ह्या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे. मात्र लेखकाला त्याच्या अभ्यासातून जाणवलेला असा विवेकवादी आशावाद वास्तवात मात्र सहजपणे अनुभवाला येत नाही ही त्याची खंत आहे.

आजचा काळ हा जागतिक मंदीचा काळ आहे. जागतिक वित्तव्यवस्था कोसळून भविष्यात काय होईल ह्या चिंतेने जगाला ग्रासले आहे. उत्पादन कमी होते आहे. कर्जबाजारी झालेले देश संकटामधून बाहेर पडण्यासाठी अधिकच कर्ज काढीत आहेत. ऊर्जासंकट दाराशी उभे आहे. पुढील पिढ्यांचे भवितव्य अंधकारमय भासते आहे. भांडवल आणि मालमत्तेच्या बाजारव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास पुरता उडाला आहे. भांडवलबाजारातले फुगे फुटल्यानंतर सार्वत्रिक निराशावाद अधिकच जोमाने फोफावला आहे. सट्टेबाजी, गटबाजी, अवास्तव आशावाद, फुकट नफा कमावण्याची हाव, भ्रष्टाचार आणि वित्तीय गैरव्यवहार ह्यांचा अनुभवही ह्याच काळात येतो आहे. ह्या सर्व अनागोंदीला वेसण घालण्याचे उपायही दृष्टिपथात दिसत नाहीत. गेल्या दहा वर्षांत अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातील अर्थव्यवस्थांनी जागतिक उत्पात घडविले आहेत. ह्या सर्वांच्या मागे भू-राजकीय कारणे आहेत आणि परिणामी जगातील सर्वच देशांमधील लोकांचा सरकार ह्या संस्थेवरचा विश्वास कमी झाला आहे. अशा जागतिक मानसिकतेच्या काळात लेखकाने विवेकवादी आशावादाचा पुरस्कार करणे हे एक धाडसच आहे. ह्या धाडसी नजरेनेच लेखक एकूणच बाजार ह्या संस्थेकडे बघतो आहे. भांडवल आणि मालमत्ता ह्या दोन्ही बाजारव्यवस्थांवरचा लेखकाचाही विश्वास उडालेला असला तरी वस्तूंचे उत्पादन, सेवा आणि मानवाच्या संकल्पनांची देवाणघेवाण होतच आहे. भांडवलबाजार कोसळला म्हणून ही देवाणघेवाणीची मूलभूत मानवी प्रेरणा आणि प्रक्रिया नाहीश्या झालेल्या नाहीत आणि होणारही नाहीत असे लेखकाचे प्रतिपादन आहे. मानवी समाजात कामाची वाटणी करण्याची आणि एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती मूलभूत आहे. आणि त्या आधारावरच मानवाचा आर्थिक विकास होत आलेला आहे आणि पुढेही होत राहणार आहे हा लेखकाचा विश्वास आहे.
लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे मतभेद हे तीन रंगांच्या राजकीय प्रतिक्रियावादी, (आणि निराशावादी?) लोकांबरोबर आहेत. निळ्या रंगाचे प्रतिक्रियावादी सांस्कृतिक बदलांची, लाल रंगाचे राजकारणी आर्थिक बदलांची तर हिरव्या रंगाचे राजकीय प्रतिक्रियावादी तांत्रिक बदलांची उपेक्षा करतात, त्यांना कमी महत्त्वाचे मानतात. लेखकाचा आशावाद हा त्याच्या स्वभावातून किंवा नैसर्गिक प्रेरणेमधून आलेला नाही तर प्रत्यक्ष पुराव्यांच्या अभ्यासावर आधारलेला आहे आणि ही भूमिका वाचकांना अनेक उदाहरणांच्या विवेकवादी विश्लेषणाच्या मदतीने पटवून देण्यासाठी लेखकाने पुस्तकाची रचना केली आहे. मानवजातीची प्रगती अधिक चांगल्या आयुष्याच्या दिशेने झाली आहे. कालच्या समाजापेक्षा आजचा मानवी समाज अधिक समृद्ध, आरोग्यपूर्ण आणि सहिष्णु आहे आणि हीच मानवी विकासाची दिशा आहे हे पुस्तकाचे मुख्य सूत्र. लेखकाचा आशावाद हा ह्याच कारणामुळे आला आहे.

कालच्यापेक्षा आज चांगला आहे!
गेल्या दहा हजार वर्षांमध्ये मानवी समाजाचा विकास झाला आहे ह्यावर बहुतेकांचे एकमत असते. परंतु हा काळ टिकणार नाही ह्याची भीतीही वाटते. कारण ह्या काळात मानवजातीवर अनेक संकटेही आलेली आहेत. असे असूनही मानवजातीच्या उपक्रमशीलतेमुळे मडीहा जातीच्या वाट्याला आली आहे. मानवाची वाढती सामूहिक बुद्धिमत्ता हे त्या सुबुत्तानिर्मितीचे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे.

मानवी उत्क्रांतीसाठी व्यापार आणि विशेष क्षमतावाढ (स्पेशलायझेशन) ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरल्या आहेत. पाच लाख वर्षांपूर्वी त्यांची चाहूल समाजाला लागली असावी. दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी समाजात त्यांच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष पुरावे सापडले आहेत. मानववंशशास्त्रज्ञांना मानवाच्या ह्या दोन पैलूंबाबत पडलेले कोडे अजून संपूर्णपणे सुटलेले नसले तरी त्यावर प्रकाश टाकणारे अनेक धागेदोरे त्यांना सापडले आहेत. काळाच्याओघात काही कारणांमुळे मानवी मेंदूच्या आकारात वाढ झाली आणि त्या अनुसंगाने त्याचे वर्तन बदलले. त्यामध्ये मानवी समाजाला मिळालेल्या अन्नघटकांचा वाटा मोठा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते. आज संख्येने वाढलेल्या मानवी समाजाला नानाविध खाद्यपादार्थाचे पर्याय उपलब्ध असूनही भविष्यातील अन्नाबाबतची सुरक्षितता ही मोठी समस्या लोकांना भेडसावते. लाखो वर्षांपूर्वी तर मानव निसर्गात तयार मिळणाऱ्या मर्यादित अन्नावर सर्वस्वाने अवलंबून होता. परंतु त्या काळातही दोन मानवी जमातींमध्ये प्राणी, कातडी दगडी हत्यारे, फळे ह्यांची देवाण-घेवाण केली जात होती. त्यामधूनच माणसांना मिळणाऱ्या अन्नाची आणि अन्नघटकांच्या विविधतेची वाढ झाली. मानवाचा आहार बदलत, सुधारत गेला. पुढे शिकारीचे तंत्र सुधारले, अन्न साठवणुकीचे मार्ग विस्तारले, आणि साठवनुकीतून अधिक मोठी देवाण-घेवाण शक्य झाली. ह्या सर्वांमुळेही मानवी मेंदूचा विकास झाला. हा देवाण-घेवाणप्रक्रियेची संथपणे उत्क्रांती होत होतच आजही जागतिक व्यापारी व्यवस्था निर्माण झाली. आज मानवी अस्तित्वासाठी व्यापार हा अत्यावश्यक बनला आहे. ह्याच व्यापाराच्या गरजेमधून वाहतुकीची साधने, तंत्रे, पैसे, उत्पादन, गणित आशा अनेक उपक्रमाची वाढ, विस्तार आणि विकास झाला.साधारण पन्नास हजार वर्षांपासून व्यापारामुळे समाजात विश्वाश आणि व्यापारवाढीसाठी नियम घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ह्याचा स्वातनाटल्या परिणाम म्हणजे समाजातील हिंसा कमी होत गेली. चौदाव्या शतकात दर लाख लोकमागे ३५ ते ४० खून होण्याचे प्रमाण असे. २००० साली हे प्रमाण १.५ ते २ इतके कमी झाले. अर्थात लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे खुनांची संख्या मोठी आहे.

व्यापाराच्या विस्तारामुळे मानवी समूहांमधील सहकार्य आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षमता ह्यांना अतिशय महत्त्व आले. हर्ब गनिट ह्या शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की ज्या समाजात बाजारव्यवस्थेचा विस्तार होतो त्या समाजात सहकार्य वाढते आणि अन्याय कमी होतो. व्यक्तीचा आदर करण्याची वृत्तीही वाढते. आफ्रिकेतील विविध टोळ्यांच्या आर्थिक व्यवहारांच्या अभ्यासातून त्यांना हे दिसून आले. व्यापार करताना अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करावे लागतात आणि कालांतराने विश्वास वाढतो. प्राणिजगतामध्ये विश्वासाचे पहिले वर्तुळ हे कुटुंबाचे असते; त्यानंतर जात, टोळी अशा क्रमाने संबंधांचे वर्तुळ विस्तारते. माणसांच्या समाजात मात्र अनोळखी व्यक्तींशीही विश्वासाने व्यवहार करण्याची परंपरा आहे. विशेषतः व्यापार करणारे गुजराती, फूजी, ज्यू, अरबी, पारशी, अरमेनीयाचे व्यापारी युरोपमधील देशांशी व्यापार करताना पूर्वी केवळ स्वतःच्या कुटुंबांतील माणसांचीच मदत घेत. कालांतराने व्यापाराच्या उलाढालीमध्ये अनोळखी लोकांनाही सामावून घेतले जाते.

माणसे स्वार्थी असतात की परोपकारी हा प्रश्न अर्थशास्त्रामध्ये आजकाल चर्चिला जातो. अॅडम स्मिथ ह्या अर्थतज्ज्ञालाही तो पडला होता. दुसऱ्याला मदत केली की ज्या माणसाला अतीव आनंद होतो, त्या व्यक्तीला स्वार्थी म्हणायचे की परोपकारी? असे प्रश्न गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे झाले आहेत. जेव्हा काही विपरीत अनुभव येतात तेव्हा त्या माणसांवरचा विश्वास उडतो आणि त्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये आणि नात्यांमध्ये दुरावा, ताण आणि अविश्वास निर्माण होतो. मानवी विश्वासाच्या वृत्तीचे अर्थशास्त्रज्ञांना कोडे वाटते आणि ते उलगडण्यासाठी ते अनेक प्रयोग करतात. अर्थशास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेत चाललेल्या संशोधनातून मानवाच्या आर्थिक वृत्तीवर चांगलाच प्रकाश पडतो आहे. त्याची अनेक उदाहरणे लेखकाने दिली आहत. त्या आधारेच मानवी समाजात विश्वासाची वाढ संथगतीने पण निश्चित अशा दिशेने होते आहे असे लेखकाचे आग्रही प्रतिपादन आहे. विकीपीडिया, ई-बे आणि इंटरनेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांचे आणि संस्थांचे प्रमाण वाढते आहे. कधीही न बघितलेल्या, दूरदूरच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांमध्ये व्यापारी देवाणघेवाणीची रोज भर पडते आहे. अशा लाखो व्यवहारांचा अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना संशोधनामधून हे दिसते आहे. इंटरनेटच्या माध्यमातून काही वेळा फसवणूक होते आणि होऊ शकते हे माहीत असूनही रोज लाखो अनोळखी लोक एकमेकांशी आर्थिक व्यापार करीत आहेत ते विश्वासवाढीचेच लक्षण आहे.

विश्वासाच्या आधारे देशोदेशींच्या आर्थिक व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणात कार्य करीत आहेत असे असले तरी ह्या देवाणघेवाणीतून, जागतिक बाजारपेठेतील क्रियाशील सहभागातून, जागतिक पातळीवर विश्वास वाढून देशांमधील लढाया आणि भांडणे कमी होतील का? ह्या महत्त्वाच्या प्रश्नाची चर्चा नैतिकतेचे उत्पादन (द मॅन्युफॅक्चर ऑफ व्हर्च्यु) ह्या प्रकरणात लेखकाने केली आहे.

जगातील नऊ अब्ज लोकांच्या उदरभरणाचा प्रश्न
ह्या प्रकरणात गेल्या दहा हजार वर्षांत वाढलेली लोकसंख्या आणि अन्नोत्पादन ह्यांचा संबंध लेखकाने तपासला आहे. सामाजिक शांतता प्रस्थापनेच्या अगोदरही भाकरी बनविण्याची कला स्त्रियांनी विकसित केली होती. जंगलामध्ये सापडणारे धान्य बारीक कुटून त्यापासून रोट बनविण्याची सुरुवात सुमारे 23000 वर्षांपूर्वी झाली. याउलट शेतीची कला मात्र फक्त आठ हजार वर्षांपूर्वी सुरू झाली. गोळा केलेल्या धान्याची देवाणघेवाण सुरू झाल्यावर अन्नसुरक्षा वाढते हे लक्षात आले आणि त्यातूनच पुढे शेती करून धान्य पिकविण्याची कला वृद्धिंगत झाली. अगोदरच सुरू असलेल्या व्यापाराने शेतीला चालना मिळाली, लोकांना मिळणारे अन्न वाढले, त्यामुळे लोकसंख्याही वाढायला लागली. शेतीची सुरुवात झाली तो काळ वातावरण-बदलाचाही काळ होता आणि नैसर्गिकपणे मिळणारे अन्न कमी कमी होत होते. अपुऱ्या अन्नसंकटाच्या छायेमुळे शेती करण्यायोग्य जमीन, पाणी आणि हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये मानवाने स्थलांतर केले. मध्यपूर्वेमध्ये असा सुपीक प्रदेश सापडला आणि तेथे शेतीकला फोफावली. शेतीपूर्व काळात व्यापाराची पद्धत विकसित झालेली असल्यामुळे दुष्काळी प्रदेशातील इतर वस्तूंच्या बरोबर धान्याची देवाणघेवाण करणाऱ्या माणसांच्या टोळ्यांनाही अन्न मिळाले. शेतीपूर्वीही व्यापार निर्माण झाला ह्यावर अजूनही सामान्यपणे लोकांचा विश्वास नसला तरी पुरातत्त्व शास्त्राला ह्या विकासक्रमाबद्दल आता शंका नाही. सिरॅमिक, धातू आणि इतर वस्तूंच्या जगभरात सापडलेल्या पुराव्यांनी ह्या विकासक्रमाला दुजोरा मिळाला आहे.

येणाऱ्या काळात मानवी समाजाला अन्नधान्याच्या कमतरतेचा धोका आहे असे आज अनेकांना वाटते. खरे तर ही भीती आदिमानवाच्या काळापासूनची आहे. आणि त्यावर मात करण्याची धडपडही तितकीच पुराणी आहे. आज तर मोठ्या प्रमाणात अन्नोत्पादन करण्याची असंख्य तंत्रे मानवाने विकसित केली आहेत. व्यापार आणि स्पेशलायझेशन ह्याच दोन मानवी प्रेरणांची कारणे त्यामागे होती आणि आजही आहेत. उलट त्यात अधिकाधिक प्रमाणात अजूनही वाढ होते आहे. दुर्दैवाने अनेक नवीन तंत्रांना, विशेषतः जेनेटिक्सच्या मदतीने अन्नोत्पादन वाढविण्याच्या तंत्राला, अतिशय कमी जमीन-पाणी वापरून जास्त उत्पादन देणाऱ्या शेतीतंत्रांना होणारा विरोध हा दुर्दैवी आहे असे लेखकाला वाटते. व्यापार, बाजारव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान ह्याबद्दल अज्ञान किंवा जुन्या तात्त्विक समजुतींमधील आकस अशा प्रवृत्ती एकूणच माणसांच्या कल्याणामध्ये अडथळे उभे करीत आहेत.

शहरांचे यश
2008 साली जगातील निम्मी लोकसंख्या नागरी भागात एकवटली. ह्या अगोदर नागरी लोकसंख्या अतिशय मर्यादित असे. व्यापार आणि स्पेशलायझेशन ह्याच्या आकर्षणाने त्यात भाग घेण्यासाठी आणि इतर अनेक कारणांमुळे गेल्या शतकात सर्व देशांमध्ये नागरी लोकसंख्येमागे झपाट्याने वाढ झाली. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोप आणि अमेरिका खंडांमध्ये हे घडले होते. त्या काळात शहरांमधील लोकांचा मृत्युदर हा जन्मदरापेक्षा जास्त असे. त्यामुळे नगरात नवीन येणाऱ्यांना कायमच मागणी असे. परंतु त्यानंतरच्या काळात झालेल्या आरोग्य, पाणी-सांडपाणी तंत्र आणि औद्योगिक क्रांतीमुळे, नागरी सुधारणांमुळे मृत्युदर झपाट्याने कमी झाला. जन्मदर तसाच राहिला व लोकसंख्या झपाट्याने वाढली. गेल्या शतकात जगातील सर्वच देशांमध्ये हे घडले. भारत आणि चीन येथील लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली. ग्रामीण लोकांचे स्थलांतर घडून आल्यामुळे शहरे फगली.

विसाव्या शतकात मानवी समाज शेती, औद्योगिक क्रांतीनंतर अजून एका महत्त्वाच्या नागरी क्रांतीच्या टप्प्यावर पोचला. ही वाढ अशीच होत राहिली तर? लोकसंख्येच्या चक्रव्यूहातून मानवी समाज सहीसलामत बाहेर पडेल का, ही चिंता काही नवीन नाही. माल्थसने ते भविष्य वर्तविले होते. लोकसंख्यावाढीच्या सापळ्यातून माणूस यशस्वीपणे बाहेर पडेल का ह्याची चर्चा लेखकाने शहरांचे यश ह्या महत्त्वाच्या प्रकरणात केली आहे. आजच्या इराकमध्ये सर्वप्रथम व्यापारी नगरांची वाढ झाली आणि नंतरच्या काळात जगातील अनेक ठिकाणी शहरांची वाढ होत राहिली. शहरांची वाढ ही वणव्यांप्रमाणे असे. थोडाकाळ शहरे भरभराटीला येत आणि नष्ट होत. नव्या नव्या ठिकाणी त्यांची वाढ होत असे. मध्यपूर्व, ग्रीस, रोम, भारत, चीन हे प्रदेश त्यात आघाडीवर होते. त्यातही एखाद्या देशाची, शहराची मक्तेदारी निर्माण झाली तरी ती फार काळ टिकत नसे. आधुनिक वसाहतवादाच्या विस्ताराचा इतिहास बघितला तर व्यापार आणि शहरांच्या वाढीची असंख्य उदाहरणे दिसतात. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्व जगातच शहरांची वाढ फार झपाट्याने झाली आणि मानवी समाज नागरीकरणाच्या एका महत्त्वाच्या उत्क्रांती टप्प्यावर येऊन पोहोचला. परंतु गतकालातील शहरांप्रमाणे त्यांचा -हास होऊ नये म्हणून आता मानवाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वाढलेल्या शहरीकरणाबरोबर जगातील लोकसंख्यावाढीचा दर कमी होतो आहे. स्त्री शिक्षण, कुटुंबनियोजनाची साधने आणि अधिक सुखकारक दीर्घ आयुष्याच्या अपेक्षेने लोकसंख्यावाढ मर्यादित होत आहे. भारत आणि चीन ह्या देशांमध्ये हे बदल काही प्रमाणात दिसून येत आहेत. लोकसंख्यावाढीचा वेग असाच कमी होत गेला तर जगाची लोकसंख्या घटू लागेल. विशेष म्हणजे ह्याच काळात चीन आणि भारत ह्या दोन्ही देशांमध्ये 1970 सालानंतर अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आणि वाढलेल्या लोकसंख्येलाही अन्नपुरवठा करणे शक्य झाले.

असा विकासाबरोबरच मानवी समाजात व्यक्तीस्वातंत्र्याची झालेली वाढ हीसुद्धा अतिशय महत्त्वाची बाब आहे असे लेखकाला वाटते. एकेकाळी शेतीउत्पादनासाठी गुलामांचे श्रम वापरले जात. आधुनिक काळातील ऊर्जासाधनांमुळे गुलामाच्या श्रमांची आवश्यकता नष्ट झाली. औद्योगिक भांडवलशाहीने जमीनदारी काळातील गुलामगिरी नष्ट केली. ऊर्जासाधनांचे शोध आणि त्यांचे नानाविध प्रकार ह्या गोष्टी मानवी विकासात महत्त्वाच्या आहेत. शेतीची कला ही सूर्याची ऊर्जा जास्तीत जास्त अन्न उत्पादनासाठी वापरण्याची कला आहे. ऊर्जेची उपलब्ध साधने सक्षमपणे वापरण्यासाठीही अनेक तंत्रे विकसित झाली आहेत आणि त्यातून संपत्ती निर्माण करून समृद्ध होणे हे मानवाचे प्रयत्न राहिलेले आहेत. आज ऊर्जेचे प्रश्न बिकट वाटत असतानाच नवनवीन ऊर्जासाधनांचा शोध घेण्यासाठी अनेक लोक पुढे सरसावले आहेत. अशा प्रयत्नांची, ऊर्जासाधनांच्या संशोधनाची असंख्य उदाहरणे लेखकाने दिली असून त्यावरून येणारा काळ उजळ असेल अशी खात्री लेखकाला आहे.

असंख्य प्रकारचे संशोधनचक्र गतिमान करणारी मानवाची क्षमता ही अक्षय आहे आणि खरे तर तेच लेखकाच्या आशेचे मूलभूत कारण आहे. मानवाची कल्पनाशक्ती अदृश्य असली तरी तिचे महत्त्व खूप मोठे आहे. शिवाय कल्पनांची देवाणघेवाण करण्याची प्रवृत्तीही मूलभूत आहे. भौतिक साधनांचा उपभोग घेतल्यानंतर ती संपतात परंतु कल्पनाशक्तीच्या वापरणे, देवाण-घेवाणीने ती संपत नाही तर उलट वाढते. ज्ञानाच्या एका ज्योतीवर असंख्य दिवे पेटू शकतात. १८०० सालानंतर तर हे प्रकर्षाने घडले आहे. त्यामुळेच मानव समाज अधिक मोठा, अधिक संपन्न होत गेला आहे. त्याच काळात भौतिक साधनांच्या गुंतवणुकीवर मिळणारे लाभ घटण्याचे आर्थिक तत्त्व जेव्हा लक्षात आले तेव्हा अनेक अर्थशास्त्रज्ञांना साधनसंपत्ती संपण्याच्या भीतीने घेरले. अॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो आणि रॉबर्ट माल्थस बाना मानवी समाजाची सुधारणा प्रत्यक्ष अनुभवाला येत असतानाच ह्या सुधारणांचे चक्र बांबल. जीवनमानात सुधारणा करण्याची भौतिक क्षमता संपेल आणि समाज कुंठित होईल अशी भीती वाटत असे. मानव केवळ सुदैवी आहे म्हणून अर्थव्यवस्थेची सुबत्ता अनुभवतो आहे असा त्यांचा समज झाला होता. त्यांच्यानंतर स्पर्धेमुळे अनेक उत्पादक बाजारात येतात, प्रत्येकजण नफ्यामागे धावत असताना काही थोडे यशस्वी होतील, त्यांची मक्तेदारी निर्माण होईल, ते लोकांना पिळून देशोधडीला लावत स्वतः गलेलठ्ठ होतील आणि सामान्यलोक गरीब होत जातील हा अर्थशास्त्रातील समज अधिकच दृढ होत गेला.

अॅडम स्मिथचा अदृश्य हात बाजारव्यवस्थेवर कब्जा करेल ही भीती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहे. ह्या निराशावादाशी लेखकाचे मूलभूत मतभेद आहेत. तो म्हणतो की अर्थव्यवस्था ह्या मुळातच सचेतन (डायनॅमिक) व्यवस्था आहेत. यंत्राच्या चाकाप्रमाणे ऊर्जाप्रवाह थांबताच त्या स्थिर होत नाहीत. अर्थव्यवस्था चाकाच्या स्वरूपात बघणे अजिबात बरोबर नाही. परफेक्ट मार्केट ही अर्थशास्त्रातील संकल्पना ही अर्थशास्त्रज्ञांची एक मोठी चूकच होती. लेखकाला तर आर्थिक संतुलन हा शब्दही धोकादायक वाटतो. कारण त्यामध्ये विरोधी तत्त्वांची स्पर्धा, अचूक ज्ञान, आणि त्यावर आधारित निखळ विवेकवाद ह्या गोष्टी गृहीतच धरल्या जातात. परंतु वास्तवात सजीव, सचेतन व्यवस्थांमध्ये असे काहीही असू शकत नाही. वास्तवात अर्थव्यवस्थेचे संपूर्ण नियोजन करण्याचा हेतू असेल तरच अचूक ज्ञानाची गरज असते. वास्तवातील बाजारव्यवस्थेमध्ये भाग घेणाऱ्यांना अचूक माहिती अशा कल्पनेशी काहीही देणेघेणे नसते. समाजामध्ये नवनवीन ज्ञाननिर्मितीची शक्यता असेपर्यंत कुंठित, स्थिर समाजस्थिती शक्यच नाही. वास्तव जगाच्या कोणत्यातरी कोपऱ्यातील माणसाला काही तरी कल्पना सुचते, त्यामधून अणूंची नवीन रचना करण्याचे, नवीन वस्तुउत्पादन करण्याचे मार्ग सुचतात आणि बाजारातील कमतरता हेरून लाभ घेण्यासाठी ती कल्पना वापरात येते. त्या कल्पनेचे ज्ञान काही काळातच सार्वत्रिक होते आणि सर्व समाजात फैलावते. केवळ एका ठिकाणी ते साचून राहू शकत नाही. जेव्हा बाजारव्यवस्था कोसळते अशी हाकाटी होते तेव्हा ते केवळ एखाद्या वस्तूच्या बाजाराबाबत होते किंवा एका ठिकाणाच्या बाजारापुरताच त्याचा प्रभाव असतो. एका लग्नाचे पर्यावसान घटस्फोटात झाले तरी लग्नसंस्था संपली असे कोणी मानत नाही, तसेच बाजार-व्यवस्थेच्या बाबतीत आहे.

अर्थव्यवस्था जोपर्यंत अपूर्ण आहेत तोपर्यंत कोणत्या ना कोणत्या ठिकाणी माणसाच्या मेंदूमधून कल्पना निघतच राहणार. त्यामुळे शोधाचे चक्रही कधी थांबणारे नाही. कल्पनांचा प्रवाह अखंडपणे वाहतच राहील. एका ठिकाणच्या समाजात जरी स्थैर्य अनुभवाला आले तरी संपूर्ण जगातील सर्व समाजांमध्ये एकाचवेळी ते येणे हे तर अशक्यच आहे. गेल्या पन्नास हजार वर्षांतील मानवाच्या शोधचक्रातून हेच दिसून येते आहे. कधी पूर्वेकडे, कधी पश्चिमेकडे तर कधी मध्यपूर्वेत तर कधी उत्तरेकडील थंड प्रदेशांतही. कोणत्या ना कोणत्या मानवी उपक्रमाच्या क्षेत्रामध्ये (उदा. शेती, व्यापार, विज्ञान, उत्पादन, वाहतूक, समाज, संस्कृती, कला) संकल्पना उद्भवतच असतात. नव्या शोधांमुळे काही काळ त्या समाजाचे वर्चस्व निर्माण होते पण टिकत मात्र नाही.

ज्ञान हे वणव्यासारखे आहे. एके ठिकाणी वणवा पेटतो-विझतो. पण त्याचवेळी तो दुसरीकडेही लागतो. कालांतराने तिसरीकडे पेटतो. मानवी लोकसंख्या आणि मानवाच्या विविध संस्था नावीन्यपूर्ण कल्पनांना जन्म देत असतात. सजीव सृष्टीमध्ये दोन सजीवांचे मीलन झाले की त्यातून नवीन, वेगळ्या आणि संमिश्र गुणधर्माचा जीव जन्मतो तसेच संकल्पनांचेही आहे. संकल्पना एकत्र येतात, फलित होतात आणि नवीन कल्पनांचे बीज निर्माण होते; त्या संकल्पनांचाही दुसऱ्या संकल्पनांशी संग होतो. असे चक्र हे अनंत काळ चालू राहते. दोन सजीव एकत्र येऊन फलित होत होत ज्याप्रमाणे सजीवसृष्टी निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे माणसांच्या अर्थसृष्टीतही शोधांमधून नवनवीन संकल्पनांचा, उत्पादनांचा आणि सेवांचा पुरवठा अक्षयपणे होत आला आहे.प्रचलित काळात वापरली जाणारी अर्थसृष्टीकडे बघण्याची चौकट किंवा चष्मे हे भौतिक शास्त्राच्या विकासकाळात, औद्योगिक क्रांतीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेले आहेत. याऊलट एकविसाव्या शतकातील मॅट रिडले ह्या जीवशास्त्रज्ञाची अर्थव्यवस्थेकडे बघण्याची चौकट ही सतत बदलणाऱ्या सजीवसृष्टीची आहे. त्या आधारेच त्यांच्या आशावादाला विवेकवादाची बैठक प्राप्त झाली आहे. ह्या पुस्तकातील शोधप्रक्रियेचा शोध हे प्रकरण सर्वात महत्त्वाचे आहे.

भविष्यातील दोन भयंकर संकटे
जग अधिक चांगले होते आहे असे मानणाऱ्या आशावादी अर्थशास्त्रज्ञांना दोन भावी संकटांचा धाक दाखवून वेडे ठरविले जाते. जग संकटात सापडल्याचे भाकीत बहुसंख्य लोकांनाही खरे वाटते. अशा निराशावादी शास्त्रज्ञांना नोबेलसारखे पुरस्कारही मिळतात आणि संशोधनासाठी मोठ्या रकमाही मिळतात. पुस्तकाच्या दुकानात दहापैकी नऊ पुस्तके ही निराशावाद्यांनी लिहिलेली आणि निराशावादाचाच प्रचार करणारी पुस्तके असतात. गरिबी, दुष्काळ, वाळवंटी प्रदेशांचा विस्तार, प्लेग, पाणीयुद्धे, खनिज तेलसाठे संपण्याची भीती, पुरुषांची जननक्षमता क्षीण होण्याची भीती, अॅसिडचा पाऊस, अणुहिवाळा, जागतिक ग्रीष्माचा दाह, समुद्र क्षारांची वाढ आणि धूमकेतूंशी टक्कर अशा नाना संकटांची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात आणि सामान्य नागरिक त्यामुळे भयभीत होतात. त्यातच आधुनिक प्रसारमाध्यमांच्या सनसनाटीपणाची भर त्यात पडते तेव्हा तर लोकांच्या भीतीला पारावार उरत नाही. हे काही केवळ आजच होते आहे असे नाही.

निराशावादाची फॅशन नेहमीच फोफावत असते, चलनात असते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र अशा जागतिक भीतीचे कारणे तेवढी बदलत असतात. १९६० साली लोकसंख्येच्या स्फोटाची ७० साली दुष्काळाची, ८० साली साधनांच्या समाप्तीची, ९० साली अॅसिडच्या पावसाची, तर २००० साली जागतिक तापमानवाढीच्या भीतीची फॅशन चलनात आली. ह्या सर्व काळातून मानवाजात बाहेर पडली ते काय मानव केवळ सुदैवी आहे म्हणून?

खरे तर ह्या सर्वाला तंत्रज्ञान आणि विकासाबाबतचा दृष्टिकोन कारणीभूत आहे असे लेखकाला वाटते. वाईट बातमी दुःखद म्हणून दिली जाते. परंतु चांगली बातमीही क्खाच्या वेष्टनात बांधून दिली जाते. प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टीमागे कोणाचे तरी कारस्थान असते, असा पारंपरिक समज आहे. पूर्वी वाईट लोकांची दृष्ट लागते असा समज होता. आधुनिक काळात काही लोक इतरांवर संकटे लादतात असे मानले जाऊ लागले. पूर्वी वसाहतवादी देशांमध्ये परकीय सत्तेचे, तर देशात काही लोकांना देशोधडीला लावणे हे भांडवलशाहीचे कारस्थान मानले जात असे. आता चंगळवादात माणसे बुडून मारण्याचे कारस्थानही भांडवलशाहीच्या माथ्यावर मारले जाते. अशा संशयातून येणाऱ्या निराशावादाच्या झटक्यांना अनेक जीवशास्त्रज्ञही कधी कधी बळी पडतात. जगातील अर्ध्या जीवजाती येत्या फनास वर्षात नष्ट होतील असे रिचर्ड-डॉकिन्ससारखे जबाबदार शास्त्रज्ञ जेव्हा सांगतात तेव्हा लोकांचा त्यावर सहज विश्वास बसतो. परंतु अशा भीती-भाकितांना वास्तवात काहीही आधार सापडत नाही. अशा निराशावादी भविष्यकथनात संख्याशास्त्रज्ञांचाही मोठा वाटा दिसतो ह्याचे काही नमुने लेखकाने दिले आहेत.

वास्तवात माणसांचे आयुष्यमान वाढते आहे तसा निराशावाद वाढतो आहे. निराशावादामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळेही हे होत असावे. वर्तमानपत्रांचे मथळे सनसनाटी नसतील तर ते वाचले जाणार नाहीत. सगळे कसे आलबेल आहे असे दाखविले तर टी.व्ही. बघितला जाणार नाही. चांगली घटना ही बातमी होऊ शकत नाही आणि संकटाची भीती दाखविल्याशिवाय विरोधाच्या चळवळी करता येत नाहीत. अशा धाकांमुळेच मानवी समाजात निराशावाद फोफावला आहे. गेली दोनशे वर्षे हे चालू आहे. निराशावाद्यांच्या जुन्या फसलेल्या वक्तव्यांची किंवा चुकांची आठवण त्यांना कधीच करून दिली जात नाही. त्यांना आव्हानही दिले जात नाही. परंतु निराशावाद्यांच्या विचारांकडे संपूर्ण दुर्लक्षही केले जात नाही. कोणालातरी संकटाची चाहूल लागली आणि त्यासंबंधी कोणी लक्ष वेधले तर त्या संकटाचे निवारण करण्यासाठी अनेक मेंदू कामाला लागतात. ह्या प्रयत्नांमधून नानाविध शोध लागतात. ओझोनच्या थराला भोक पडण्याची हाकाटी झाली तेव्हा काही घातक मानवनिर्मित रसायनांवर बंदी घातली. खरे तर ओझोन थराला पडलेले भोक मानवनिर्मित होते असे सिद्धही झाले नसताना रसायनांवर बंदी घातली गेली. त्यामुळे तोटा निश्चितच झाला नाही उलट फायदाच झाला. जुन्या संकटांना उत्तरे शोधली जाताना किंवा संकटांना घाबरून उपाययोजना करताना नवीन अनपेक्षित संकटे आणि घातक समस्याही वाढतात. ती टाळताही येत नाही.

उदाहरणार्थ वाहतुकीची कोंडी किंवा लठ्ठपणाची समस्या ही अगोदरच्या कालातील काही शोधांमुळे वाढली हे नाकारता येत नाही. याउलट कधी कधी माणसाने खऱ्या संकटांकडे दुर्लक्ष करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. हिटलर, माओ, अल् कायदा आणि अलिकडच्या काळातील अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमधील सबप्राईमचा घोटाळा ही त्याची काही महत्त्वाची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे झालेले दुर्लक्ष महाग पडते आणि अनेकांना परिणाम भोगावे लागतात. संकटांची भाकिते ही मानवी उत्क्रांतीला मदतही करतात.

दोन मोठ्या जागतिक चिंता
२०१० साली आफ्रिकेतील समाजांची दुर्दशा आणि वातावरणातील बदल हे जागतिक निराशावादाचे विषय झाले आहेत. हा निराशावादही अविवेकी आहे आणि येणाऱ्या काळात आफ्रिका त्यातून बाहेर पडेल अशी लेखकाची आशा आहे. जगातील १०० कोटी सर्वांत गरीब लोकसंख्येपैकी ६० कोटी माणसे आज आफ्रिका खंडात आहेत. गेल्या वीस वर्षांमध्ये तेथील गरिबांची संख्या दुप्पट झाली. पश्चिम आफ्रिकेतील लढाया, पूर्वेकडील मानवी हिंसा, दक्षिणेकडील एड्सचे थैमान, उत्तरेकडील दुष्काळ, भूकबळी तर मध्यआफ्रिकेतील हुकूमशाही व्यवस्था असे आफ्रिकेचे चित्र अतिशय चिंताजनक आहे. अशाही परिस्थितीमध्ये होणारी लोकसंख्यावाढ ही सर्व आफ्रिकेतील मागे पडलेल्या समाजाची लक्षणे आहेत. असे असूनही काही आशेचे किरण आहेत. घटणारा जन्मदर आणि तरुण लोकांचे जास्त प्रमाण हे ते किरण आहेत. खरे तर आफ्रिकेला ह्या संकटातून बाहेर काढायचे असेल तर पाश्चात्त्य देशांनी दिलेल्या आर्थिक मदतीपेक्षा आफ्रिकेतील शेतीमाल विकत घेणे जास्त आवश्यक आहे. आणि त्यासाठी युरोप आणि अमेरिकेत शेतमालाला दिली जाणारी आर्थिक अनुदाने बंद करणे आवश्यक आहे. तसेच त्या देशांनी शेतमालाच्या जागतिक हिश्श्यामध्येही घट करायला हवी आणि आयातीवरील कर हटवायला हवेत. त्यामुळे आफ्रिकेशी होणारा व्यापार वाढेल. व्यापारी शहरे भरभराटीला येतील आणि लोक स्वातंत्र्य मागतील. असे झाले तरच परदेशी मदतीवर पोसलेल्या हुकूमशहांच्या तावडीतून लोकांची सुटका होईल. (इजिप्तमधील लोकांचे होस्नी मुबारक ह्यांच्या विरोधी लढे चालू आहेत!) १९७८ साली चीन आफ्रिकेइतकाच गरीब होता. व्यापारावरील बंधने चीनने उठवली आणि तेथे समृद्धी यावयाला लागली.

एकविसाव्या शतकाच्या आशा
अॅडम स्मिथ आणि चार्ल्स डार्विन ह्या दोन थोर विचारवंतांच्या सिद्धान्ताच्या आधारे लेखकाने हे पुस्तक लिहिले आहे. अॅडम स्मिथ हे मानवी समाजातील आर्थिक व्यवहारांचे निरीक्षण करून बाजारव्यवस्थेची आणि समृद्धीची मीमांसा करणारे वेल्थ ऑफ नेशन्स ह्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक, चार्ल्स डार्विन हे सजीव सृष्टीचा शोध घेणारे ओरिजिन ऑफ स्पिशीज ह्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक, नैसर्गिक निवड होत होत, छोटे छोटे बदल घडत सजीव सृष्टा उत्क्रांत झाली आहे हा त्यांचा सिद्धान्त. ह्या दोन महान विचारवंतांच्या सिद्धान्ताची सांगड घाला मॅट रिडले ह्यांनी मानवी समृद्धीही डार्विनच्या उत्क्रांतितत्त्वानुसार घडली आहे हे ह्या पुस्तकात गधारपणे मांडले आहे. माणसांची समृद्धी किंवा गरिबी ही काही कोणी निर्देश देऊन घडवून आणता येत नाही. आज जी काही समृद्धी दिसते आहे, ती लाखो स्त्री पुरुषांच्या असंख्य पिढ्यांच्या छोट्या छोट्या टप्प्यांतून झालेली आहे. लाख वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या मानवात काही जेनेटिक बदल झालेले नाहीत. पण मानवाच्या सामूहिक बुद्धिमत्तेचा साठा ह्या कालात फार मोठ्या प्रमाणात वाढत गेला आणि त्यातूनच मानवाचे आज दिसत असलेले जीवन समृद्ध होत गेले आहे. पर्यावरणाला साद-प्रतिसाद देत, कधी यश मिळवत तर कधी पराभव पत्करून मानवाची वाटचाल झाली आहे. सर्वसाधारणपणे मानव जात अधिकाधिक समृद्ध होत आहे. पडो झडो माल वाढो ही मानवी विकासाची दिशा राहिलेली आहे. आज भेडसावणारी लोकसंख्यावाढीची समस्या जुनीच आहे. पर्यावरणात जगण्याला आधार मिळाला की लोकसंख्या वाढते; आणि पर्यावरणातील साधने अपुरी पडली, संपून गेली की लोकसंख्यानाश होतो हे मानवाने अनेकदा अनुभवले आहे. काही वेळा संकटकाळात पर्यावरणातील पर्यायांचा शोध न घेता स्वयंपूर्णतेच्या कोशात जाऊन काही काळ तगून राहण्याचेही प्रयत्न झाले आहेत. संकटकाळात पळ काढणे किंवा धीराने सामोरे जाणे हेच दोन पर्याय मानवांपुढे असत. आजही आहेत. परंतु पळ काढून कोशात न जाता देवाणघेवाण आणि एकमेकांना मदत करण्याचे, संकटकाळात साथ देण्याचे पर्याय जास्त यशस्वी ठरले आहेत. अनेकवेळा सुबत्ता आल्यावर झालेल्या लोकसंख्यावाढीने मानवांना पुन्हा गरिबीतही ढकलले आहे. असे होत होत, सावरत, व्यापारवृद्धी करत, मानवांनी वसाहती, समाज, संस्कृती पुन्हा पुन्हा घडवली आहे.

ह्या सर्व प्रवासात माणसाला प्राणी म्हणून मिळालेल्या काही सवयी तसेच कालक्रमात वर्तणुकीचे भाग झालेल्या सामाजिक सांस्कृतिक सवयी संपूर्णपणे नष्ट न होता मधून मधून उफाळून येत असतात. प्राणिजगताप्रमाणे असूयेतून जिवावर उदार होण्याची, लढाया आणि शिकार करण्याची, आक्रमकतेची वृत्ती वरचढ होते. तर काही वेळा बांडगुळे बनून दुसऱ्याच्या आधारे कसाबसा जीव जगवण्याची कृतीही दिसते. स्वतः संपत्ती निर्माणाच्या भानगडीत न पडता दुसऱ्यांची संपत्ती लुटण्याचे सोपे मार्गही अनेकदा काही समाजांनी अवलंबिले आहेत. आजही त्यात खंड पडलेला नाही. बळाच्या जोरावर आपल्याच बांधवांना गुलाम करण्याचे प्रयोगही झाले. आजही होत असतात. ह्या सर्व मानवाच्या घातक सवयी आहेत. अरेरावी आणि लाचारी अशा दोन टोकाच्या प्रवृत्ती वेळोवेळी डोके वर काढतात आणि समृद्धीच्या साधनेत मागे पडलेल्या लोकांना सामील करून घेण्यात अडथळे निर्माण करतात. कधी कधी संपत्तीचा विनाशही करतात. असे असले तरी अनेक वेळा चांगले शासक, प्रशासक आणि उत्पादक व्यापाराच्या आधारे शक्तिमान झालेले असूनही इतरांना मदत करतात. संकटांपासून लोकसमूहांचे रक्षण करण्यासाठी झटतात. रस्ते, कॅनॉल, शाळा, इस्पितळे बांधून लोकांना आश्वस्त, स्वतंत्र आणि समृद्ध करण्याचे प्रयत्नही सातत्याने होत आले आहेत. मनुष्यजातीचे आयुष्य अधिक सुखकारक करण्याचे प्रयत्न आजही होत आहेत. अशा लोकांना शिकारी किंवा बांडगुळांच्या प्रवृत्ती नष्ट करू शकत नाहीत असेही दिसते.

दहा हजार वर्षांपासून माणसांना तुलनेने खूप स्थैर्य येत गेले आहे. शेतकरी आणि उत्पादक श्रमविभागणीतून कौशल्ये, तंत्रे निर्माण करतात. आपल्या शेतमालांची, उत्पादनांची आणि कौशल्यांची देवाण-घेवाण करतात, वाटणी करतात. लढाया, मारामाऱ्यांच्या संकटांतही व्यापार आणि मानवी क्षमतांचा असा विकास होतच राहिलेला आहे. दहा हजार वर्षांचे हे चलत चित्र बघता माणसाला आशावादी व्हावयाला पुष्कळ कारणे आहेत असे लेखकाला वाटते. परंतु आशावादी लोकांनी जग चांगले होते आहे असे म्हटले की लगेचच जगातील कोट्यवधी भुकेकंगाल लोकांची आठवण त्यांना करून दिली जाते. शुद्ध पाणी, अन्न, शिक्षण आणि निवाऱ्यापासून वंचित माणसांची आठवण करून दिली जाते. आशावादी माणसे गरिबी आणि गरिबांबाबत बेपर्वा असतात अशी आवई उठवली जाते. आणि हे अजिबात खोटे आहे असे लेखकाला वाटते. कारण सर्वांना पुरेल इतके अन्न जगात निर्माण करण्याची क्षमता आज मानवात आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वांना देण्याची इच्छा आहे, आणि सहृदयताही आहे. शिवाय त्यासाठी नवे नवे तंत्रज्ञान निर्माण करण्याची ऊर्मी आहे. पण निराशावादी लोक काही ना काही संकटांचे भय उभे करून अशा समृद्धीच्या प्रयत्नांना हातभार लावण्यापेक्षा त्यात अडथळेच उभे करताना दिसतात. ज्यांच्या प्रयत्नांनी उत्पादन वाढले आहे, तंत्रज्ञान सुधारले आहे, देवाणघेवाण वाढते आहे आणि ज्ञानाचा प्रसार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत त्यांनाच बदनाम करण्याचा उद्योग करीत असतात. व्यापार आणि श्रमविभागणीतून मानवी क्षमता विकास ह्या दोन्हीबाबत ते साशंक असतात. मानवांच्या ह्या वृत्तीकडे केवळ नकारात्मक वृत्तीने बघून ते थांबत नाहीत तर हे करणाऱ्यांच्या विरोधात तरुण मुलांच्या हातात मशिनगन्स आणि तोफगोळेही देत असतात. आज नानाप्रकारच्या समृद्धीचा आस्वाद घेणारे लोक सरसकटपणे गरिबांचे शत्रू नाहीत. अफगाणिस्थानवर अमेरिकेचे सरकार तोफगोळे टाकत असताना तेथे शाळा चालवून मुलांना शिक्षण देणारेही नागरिक अमेरिकेचे असतात.

जगातील कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य, अज्ञान दूर करून त्यांना आर्थिक प्रगतीमध्ये सामील करून घेण्यासाठी त्यांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी, सुधारण्यासाठी धडपड आवश्यक आहे. व्यापार, तंत्रज्ञान, आणि कौशल्यांची देवाणघेवाण होण्यासाठी विश्वासार्हता आवश्यक आहे. समृद्धीची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापाराच्या विकासात अडथळे निर्माण करण्यात अर्थ नाही. परंतु आज पुस्तकाच्या दुकानात दहापैकी नऊ पुस्तके ही निराशावादी लोकांनी लिहिलेली दिसतात. ती मोठ्या संख्येने वाचलीही जातात. निराशावाद आणि अविश्वास निर्माण करून विकासाला विरोध करण्याचे मार्ग शोधले जातात. इतिहासात हे सुद्धा झालेले आहे. ११०० ते ११५० ह्या काळात तीन बलवान देशांत ते झाले होते. बगदादमध्ये अल् घजाली ह्याने विवेकवादी शोधवृत्तीचा अंत घडवून आणला. त्याजागी गूढवादी आणि असहिष्णुतेची निर्मिती केली. अरब जगाची पीछेहाट घडवून आणली. चीनमध्य स-संग ह्याने तयार केलेले त्या काळातले सर्वांत प्रगत असे आकाशस्थ ग्रहांचे घड्याळ राजकीय असूयेपोटी राज्यकर्त्यांनी नष्ट केले आणि हुकूमशाही परंपरांचे पुनरुज्जीवन केले. पॅरीसम, विद्यापीठात विवेकवाद रुजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पीटर एबेलार्डला चर्चने शिक्षा केली. धर्मयुद्ध आणि धर्मांधता देशावर लादली. ह्या सर्वांनी विवेकवादी ज्ञानमार्गाला विरोध करून स्वतःच्याच देशबांधवांना अज्ञानाच्या अंधारात आणि गरिबीत लोटले. मानवजातीच्या सुदैवाने इतर अनेक ठिकाणी विवेकवाद सातत्याने फुलत राहिला. ज्ञानाचे पलिते पेटत राहिले. त्यांनी मानवाच्या प्रगतीच्या वाटा उजळत ठेवल्या.
आज विज्ञानाच्या, संशोधनाच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या संपत्तीकडे, भविष्याकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांची कमतरता नाही. जनुकीय बदल केलेले बियाणे, स्टेम सेल तंत्रज्ञानाचे संशोधन ह्यांच्यावर बंधने घालायला काही राज्यकर्ते, नोकरशहा आणि दबावगट कार्यरत आहेत. असे प्रतिक्रियावादी गट काहीवेळा स्त्रियाच्या स्वातंत्र्यावर बंदी घालयाला बघतात, कधी व्यापारावर बंदी आणायला बघतात. त्यांच्या दबावाला अनेकदा स्थानिक पातळीवर यश येते. पण अजूनतरी जागतिक पातळीवर अशी बंदी घालणे त्यांना शक्य झालेले नाही आणि ते शक्यही होणार नाही असे लेखकाला वाटते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे दबाव जरी वरून आणण्याचा प्रयत्न होत असला तरी संशोधन हे तळागाळातून होत असते. अनंत लोक स्वयंस्फूर्त संकल्पनांतून नवनिर्मिती करीत असतात. आज संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून फैलावते. कदाचित अमेरिकेने किंवा युरोपने नावीन्यपूर्ण संशोधन प्रवृत्तीचे दमन सुरू केले तरी जगाचा इतर कोणत्या ना कोणत्या भागात ते सुरूच राहील. मानवाच्या सामूहिक बुद्धिमत्तेचे भांडवल अमर्याद आहे. नेत्यांनी प्रेरणा दिली किंवा दमन केले तरी ती विझत नाही. त्यामुळे जगातील गरिबी, अज्ञान कमी कमी होत राहील, तंत्रज्ञान विकसित होईल, रोगराईवर नियंत्रण येईल, आनंद वाढेल, हिंसा कमी होतील, स्वातंत्र्य वाढेल, ज्ञानविकास होत राहील कारण ती मानवाची मूलभूत प्रेरणा आहे. अत्यंत निराशेचा विचार फैलावण्याच्या ह्या काळात लेखक स्वतःला धाडसी आशावादी म्हणवून घेतो.

हे पुस्तक वाचल्यावर अनेक गोष्टी मनात आल्या. पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हा नेहमी पडणारा प्रश्न. तो विवेकवादाच्या आधारे सुटेल असे वाटत नाही. ही दोन्ही निरीक्षणे सत्यच आहेत आणि एकाच वस्तुस्थितीबाबत असतात. तसेच पेला आधी रिकामा होता आणि तो हळू हळू भरतो आहे हा झाला आशावाद. तर पेला भरलेला होता आणि माणूस तो रिकामा करतो आहे हा झाला निराशावाद. ह्या दोन्ही प्रवृत्ती प्रत्येक माणसामध्ये कमी-जास्त प्रमाणात असतात. काहींचा निराशावाद त्यांना घेरतो तेव्हा त्यांना काही करणेही दुरापास्त होते. ह्याउलट कठीण प्रसंगातून धीराने स्वतः बरोबरच इतरांनाही बाहेर काढणारे असतात. रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर म्हणजेच विवेकवादी भावनेतून होणारे माणसाचे वर्तन हे त्याच्या स्वतःच्याच मनामध्ये सतत चालत असलेल्या संवादामधून घडत असते. समाजात खूप निराशाजनक घटना घडत असतानाही काही माणसे आशावाद टिकवून मार्ग शोधत असतात. अशा शोधांमध्ये जेव्हा अनेक लोक सामील होतात तेव्हा नवे मार्ग सुचतातही. परंतु नवीन, अनघड वाटेने जाण्याचे धाडस सर्वांच्यात नसते. प्रयत्न करणारे आशावादी लोक हे दूत असले तरी सर्वच आशावादी नेहमी यशस्वी होतील ह्याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र निराशावाद सार्वत्रिक झाला तर त्यातून हिंसा घडते किंवा बाहेर पडण्याचे मार्ग शोधण्याचे प्रयत्न थांबतात. ह्यापैकी काही झाले तरी मानवाचा निश्चित घात होतो. म्हणूनच जाणीवपूर्वक आशावादाची जोपासना आवश्यक ठरते.

मानवी समृद्धीची उत्क्रांती ही संथपणेच होते. एका फटक्यात, क्रांती करून समृद्धी आणता येईल आणि सर्वांना समानपणे वाटता येईल असा आशावाद गेल्या शतकात जगभर दिसत होता. मात्र समृद्धीच्या क्रांति-संकल्पनेला अपयश आल्यानंतर अनेक जण संपूर्ण निराशावादी आणि सिनिकल बनले. प्रतिक्रियावादी बनले. कोणत्याही मानवी उपक्रमाबद्दल साशंक बनले. वसाहतींच्या जोखडातून मुक्त झालेल्या भारतातील अनेक लोकांना आधुनिक व्यापार आणि भांडवलदारी, विज्ञान-तंत्रज्ञान, नागरीकरण ह्याबाबत विशेष तिरस्कार आहे. मुक्त व्यापाराबद्दल जरासुद्धा सकारात्मक बोलणे त्यांना गैर वाटते. सर्व भांडवलदार आणि भांडवलवादी देश कारस्थानी आहेत असे त्यांना वाटते. परंतु कट-कारस्थानांचे नियोजन जागतिक किंवा देशाच्या पातळीवर करणे अशक्य आहे.

बळी तो कान पिळी हाच उत्क्रांतीचा नियम आहे अशीही एक मोठी चुकीची समजूत आहे. आधुनिक जगामध्ये कोणाही एका लोकसमूहाला किंवा देशाला अलग राहून जगणे, समृद्धी मिळवणे अशक्य आहे. त्यासाठी सहकार्य हे महत्त्वाचे तत्त्व आहे. उत्क्रांतीच्या क्रमात सहकार्याचे असलेले महत्त्व व्यापारातून जसे दिसते तसेच ते सजीव सृष्टीतही मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. परंतु प्रतिक्रियावादी लोक जसे आर्थिक व्यवहारांबाबत आंधळे असतात तसेच ते उत्क्रांतीबाबतही अनभिज्ञ असतात. त्यापायी अनेकदा पारंपरिक, कालबाह्य जमीनदारी, धार्मिक, हुकूमशाही गटांबरोबरही हातमिळवणी करतात. स्पर्धा, संघर्ष आणि हिंसाही करतात. एकेकाळी प्रगतिशील असणारे काही लोक काळाची पावले ओळखण्यात कमी पडले की निराशावादी आणि प्रतिगामी होतात. समाजात गरीब आणि वंचित राहिलेल्या समाजांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर सहकार्य आणि आशावाद ह्यांच्या आधारेच ते करता येईल असा विवेकवादी विचार आज समाजामध्ये रुजविणे आवश्यक आहे हे समजूनच मॅट रिडले ह्यांनी हे पुस्तक लिहिले असावे.

८, संकेत अपार्टमेंटस्, उदयनगर, पाचपाखाडी, ठाणे – ४०० ६०२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.