पुस्तक-परिचय : द प्रेग्नंट किंग

डॉ. देवदत्त पट्टनाईक यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे (पेंग्विन, 2008).
पुस्तकाच्या नावात जितका सरळपणा आहे तितक्याच सरळ भाषेत लिहिलेली, महाभारताच्या काळातली आणि महाभारताला समांतर जाणारी ही कथा आहे. कथेत काही महाभारतातली पात्रे गोवलेली आहेत.
कथा दोन पातळ्यांवर लिहिली आहे. एक म्हणजे मुख्य कथेचा धागा जो पुढे सरकतो आणि दुसरी म्हणजे, मुख्य कथेच्या अंगाने येणाऱ्या अनेक उपकथा, दंतकथा आणि त्या काळातल्या संस्कृतीतल्या संकल्पनांची लेखकाची स्पष्टीकरणे.
थोडे कथेबद्दल
इलवृत्त नावाच्या राज्याच्या युवनाश्व नावाच्या राजाची ही गोष्ट आहे. युवनाश्वाचे वडील प्रसेनजित त्याच्या जन्माच्या आधीच मरतात. शीलवती, युवनाश्वाची आई तेव्हा गर्भवती असते. प्रसेनजित लवकर मरणार हे भविष्य आधीच वर्तवलेले असते. तेव्हा त्याचा होणारा मुलगा मोठा होईपर्यंत राजगादीचा सांभाळ समर्थपणे करेल अशाच मुलीशी प्रसेनजितचे लग्न लावले जाते. ती म्हणजे शीलवती. त्या काळी युवराजाचे लग्न होऊन त्याला मुलगा झाल्याशिवाय त्याला राजा होण्याचा अधिकार मिळत नसे. युवनाश्वाचे लग्न होईपर्यंत शीलवतीने राजगादी सांभाळणे अपेक्षित असते. तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाला ती पुष्कळ अंशी न्याय देते.
युवनाश्व योग्य वयात आल्यावर त्याचे लग्न लावतात. आणि मग सुरू होते एक जीवघेणी प्रतीक्षा. त्याला मुलगा होण्याची. तीन लग्ने लावूनही त्याला मूल होत नाही. आणि धर्मात सांगितल्याप्रमाणे मुलगा झाल्याशिवाय त्याला राजगादीवर बसता येत नाही. अस्वस्थ असा युवनाश्व शेवटी मुलगा व्हावा म्हणून एक यज्ञ करायचे ठरवतो. यज्ञात तयार झालेले रसायन त्याच्या पत्न्यांनी प्राशन केल्यावर त्या गर्भवती राहतील, असा यज्ञ सांगणाऱ्या सिद्धांचा दावा असतो. युवनाश्वाने अशा रीतीने पुत्रप्राप्ती करून घ्यावी याला त्याच्या आईचा, शीलवतीचा विरोध असतो. सगळा विरोध मोडून काढत यज्ञ चालू
असतानाच युवनाश्व जबरदस्तीने राजगादीवर बसतो.
प्रत्यक्षात मात्र यज्ञात अनेक विघ्ने येतात. आणि तयार झालेले ते रसायन चुकून युवनाश्वाकडून प्यायला जातो. त्याच्या मांडीवर एक फोड येतो. काही कळायच्या आत तो फोड वाढायला लागतो. राजा गरोदर राहिलेला असतो. त्या फोडाच्या आत त्याचा गर्भ असतो. राजवैद्य शीलवतीला त्याची कल्पना देतात. आपला मुलगा, इलवृत्ताचा राजा, गरोदर राहिला आहे ही कल्पनाच तिच्या सहनशक्तीच्या पलिकडची असते.
खुद्द युवनाश्वला त्याच्या गरोदरपणाबाबत अंधारात ठेवले जाते. शीलवती गर्भपात करायचा हुकूम सोडते. तो करायच्या वेळी आम्हाला राजाच्या जवळ असू द्या असा आग्रह युवनाश्वच्या तीनही राण्या करतात. आणि त्या बाळाला मांडीतून बाहेर काढल्यावर त्याला मारण्यापासून शीलवतीला त्या परावृत्त करतात.
युवनाश्व शुद्धीवर आल्यावर त्याला हे सांगत नाहीत की त्याला मुलगा झाला आहे. पण त्याच्यात जागी झालेली मातृत्वाची भावना त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या छातीतून बाहेर येणारे स्तन्य त्याला सत्य सांगून जातेच.
आपल्याला आपल्या मुलाने आई म्हणावे असा त्याचा आग्रह असतो. पण त्याची पहिली राणी, सीमंतिनी त्याला सांगते की त्याला राजा व्हायचे असेल तर आई होता येणार नाही. नाइलाजाने राजगादीची निवड केलेला युवनाश्व स्वतःला विचारायला लागतो, मी नक्की कोण आहे? स्त्री की पुरुष? त्याचा ‘स्व’चा एक नवीन शोध सुरू होतो.
लेखकाला जे सांगायचे ते येथून पुढे कळत जाते. आपण स्वतःला इतकी लेबले लावतो, इतक्या बाहेरच्या गोष्टींमध्ये स्वतःला शोधायचा प्रयत्न करत राहतो की मुळात आपण एक जीव आहोत, चैतन्य आहोत. सगळ्या बाहेरच्या, जड गोष्टींपेक्षा वेगळे असे आपले अस्तित्व आहे, हेच आपण विसरतो. या अस्तित्वाला खरे तर कसल्याच ओळखीची गरज नसते.
प्रसेनजिताच्या मृत्यूपासून सुरू झालेला कथेचा हा प्रवास खूप आडवळणांनी जातो आणि जाता जाता त्या काळच्या समाजव्यवस्थेतल्या अनेक पैलूंवर, कंगोऱ्यांवर प्रकाश टाकत जातो. महाभारताच्या काळातली, म्हणजे साधारण 5000 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे.
एकाच पात्राची अनेक रूपे
या कादंबरीत मानवी मनाचे पदर उलगडून दाखवलेले आहेत. कोणीच संपूर्ण चांगला आणि संपूर्ण वाईट नसतो. प्रत्येक माणूस चांगला पण असतो आणि वाईट पण. मानवी मन म्हणजे प्रेम, राग, द्वेष, मत्सर, करुणा अशा अनेक भावनांचे घट्ट विणलेले वस्त्र असते. एखादा माणूस एखाद्या क्षणी कसे वागतो, काय निर्णय घेतो यामागे ही वीण कारणीभूत असते. लेखकाने प्रत्येक पात्र खूपच सुंदर आणि गुंतागुंतीचे रचले आहे. प्रत्येकच पात्राच्या स्वभावात अनेक रंग आहेत.
प्रसेनजिताच्या मृत्यूच्या वेळी शीलवती गरोदर असते. मुलाच्या मृत्यूनंतर खचलेला पृथलाश्व नातवाचा जन्म व्हायच्या आतच वानप्रस्थाश्रम स्वीकारतो. गरोदर शीलवतीच्या राज्याभिषेकाच्या वेळी तिच्या कपाळावर टिळा न लावता पोटावर लावला जातो. हे दाखवून द्यायला, की हे स्थान तिचे नाही, तिच्या मुलाचे आहे. एक कुशल राज्यकर्ती असूनही केवळ एक स्त्री म्हणून वेळोवेळी अपमानास्पद वागणूक मिळते. सतत अपमानामुळे दुःखी झालेली शीलवती, पतीच्या विरहाने व्याकुळ होणारी शीलवती, पतिनिधनानंतर खंबीरपणे राज्य सांभाळणारी शीलवती, युवनाश्वला त्याला मूल नाही म्हणून राजगादीवरचा अधिकार नाकारणारी शीलवती, अशी अनेक रूपे आपल्याला कादंबरीत दिसतात. तसेच आईचा भक्त युवनाश्व, मूल होत नसल्यामुळे अगतिक युवनाश्व, चिडून विरोध मोडून काढत बळजबरी राजगादीवर बसलेला युवनाश्व, सत्तेमुळे आंधळा होऊन आपल्याच बायकोचा भर सभेत विनयभंग करणारा युवनाश्व, आई बनलेला युवनाश्व, मुलाने आपल्याला आई म्हणून स्वीकारावे यासाठी तळमळणारा युवनाश्व आणि शेवटी ‘स्व’च्या शोधाचा ध्यास घेतलेला युवनाश्व अशी एकाच पात्राची अनेक रूपे उलगडत जातात.
समाजाची रूपे
पुरुषप्रधान समाजाच्या मानसिकतेचे (पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही) प्रतिबिंब प्रत्येक प्रसंगात पडलेले दिसते. युवनाश्वाची तीन लग्ने होईपर्यंत कायम त्याच्या राण्यांनाच दोषी ठरवणे, मुलगा हवा असण्याचा अट्टाहास, त्याचे त्या राण्यांवर दडपण, त्याचा त्यांना होणारा त्रास, हे सगळे खूप प्रभावीपणे मांडले आहे.
लैंगिकता हा आपल्याकडे उघडपणे न बोलला जाणारा विषय. पण त्याचे अस्तित्व मात्र वेगवेगळ्या पद्धतीने जाणवत राहते, मग ते स्त्रियांवरचे बलात्कार असोत की प्रत्येक जाहिरातीत ओढून ताणून आणलेल्या कमी कपड्यातल्या मुली असोत. समाजाच्या नीतिमत्तेला आह्वान देणारा असा हा विषय लेखकाने खूपच सुंदर हाताळला आहे. नवीन लग्न झाल्यावर उलगडत जाणारे नाते, एखाद्या क्षणी परस्त्रीचे किंवा पु षाचे अभावितपणे वाटणारे आकर्षण, असे अनेक पैलू सहजपणे डोकावतात.
त्या काळी असणारी वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, ह्या समाजाची घडी बसवण्यासाठीच्या व्यवस्था होत्या. पुढे त्यात कर्मकांड घुसले ही गोष्ट वेगळी. या व्यवस्थेमुळे एकंदर समाजव्यवस्था सुरळीत राहायला जरी मदत होत असली तरी त्यात व्यक्तिस्वातंत्र्यावर काहीशी गदा येते, असे चित्र कथेत दिसते. राजाचा मुलगा हा राजाच झाला पाहिजे या आग्रहामुळे कंटाळलेला, राज्यकारभारापेक्षा शिकारीत रस असलेला प्रसेनजित, त्याच्या मृत्यूनंतर कंटाळून शेवटी आश्रमव्यवस्थेची परवानगी नसताना वानप्रस्थ स्वीकारणारा पृथालाश्व, हे या व्यवस्थांबद्दल खूप काही बोलून जातात.
वर्णव्यवस्थेतील उतरंड, तिचा विवाहसंस्थेवरचा परिणाम, नगररचनेवरचा परिणाम, अशा अनेक गोष्टींवर लेखक प्रकाश टाकतो.
‘स्व’चे रूप
हा या पुस्तकातला सगळ्यांत महत्त्वाचा आणि फारसा इतर ठिकाणी न मांडला जाणारा विषय. स्त्री असो वा पुरुष, मुळात तो एक जीव आहे. आपल्या संस्कृतीत जड आणि चेतन हे वेगवेगळे मानले गेले आहेत. सगळे जीव ही त्या चेतनाचीच रूपे मानली गेली आहेत. स्त्री-पुरुष ही आपण चिकटवलेली लेबले आहेत. या लेबलांमध्ये किती अडकायचे? आणि प्रत्येक जण शेवटी माणूस असताना अपेक्षांमध्ये आणि वागणुकीत फरक का करायचा? माणसाची माणूस म्हणून असलेली ओळख यापेक्षा खूप वेगळी आणि मोठी आहे. हा विचार मांडताना लेखक तृतीय-पंथीयांबद्दल फार मार्मिक भाष्य करतो. मुळात आपल्या पुराणातल्या वाङ्यात त्यांचा उल्लेख असणे, त्यांच्याबद्दलच्या कथा असणे, ही खूप प्रगल्भ गोष्ट आहे. समाजात त्यांचे असलेले स्थान मान्य करणे ही त्यांना स्वीकारण्याची पहिली पायरी आहे. त्या काळात कृष्णासारख्या व्यक्तिमत्त्वाने त्यांना समाजात स्थान मिळवून द्यायसाठी केलेले प्रयत्न यासारखे संदर्भ कथेत डोकावतात.
गीतेत सांगितलेल्या गोष्टींचे प्रतिबिंब
गोष्ट महाभारतकाळातील आहे. गीतेतील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब कथेत दिसते. मनाचे अनेक पैलू आणि त्यांचा परिणाम, त्यांची ताकद, धर्माची संकल्पना, सापेक्ष सत्य आणि केवल सत्य, जड आणि चेतन यांचा एकमेकांशी संबंध, कृष्णाचे समाजासाठी एक व्हिजन, आदर्श-चित्र असलेले व्यक्तिमत्त्व, त्याचा समाजावरचा प्रभाव, अशा अनेक संकल्पना कथेच्या अनुषंगाने येतात. त्यामुळे अर्थातच वाचनाचा अनुभव समृद्ध होतो.
लेखनाबद्दल
भाषा साधी, शब्दांचे फुलोरे नसलेली, कदाचित म्हणूनच प्रभावी आहे. लेखनाची शैली काहीशी बनगरवाडीची आठवण करून देते. प्रसंगामागून प्रसंग आपल्यासमोर येतात; कधी राजवाड्यातले, कधी त्यांचे नगरातले पडसाद अशा विविध रूपांत. रूपकांतून विचार समजवायचा, प्रश्न उभे करायचा प्रयत्न लेखक करतो. मला सगळ्यांत आवडलेली गोष्ट म्हणजे आपल्याला उत्तरे शोधायला जागा ठेवतो. हे एका चांगल्या कलाकृतीचे लक्षण आहे, असे मला वाटते. जेव्हा आपण मानवी भावभावना, नातेसंबंध यांचा विचार करतो, तेव्हा कुठल्याही प्रश्नाचे सरसकट चूक किंवा बरोबर असे उत्तर सापडत नसते. प्रत्येकासाठी उत्तरे वेगवेगळी असतात. त्याबद्दल अगदी गंभीरपणे विचार करायला हे पुस्तक भाग पाडते.
लेखक स्वतः त्याच्या कथेबद्दल असे म्हणतो, “At the end of my yagna, after long deliberations with many gods and demons, I find myself holding a pot : The narrative. Within the pot is a potion : a concoc tion of ideas, thoughts and feelings.
My patron, the Yajamana, can admire the pot. Or break it. Drink the potion. Or spit it out. Or may ask, as I often do, what matters more? The pot or the potion? Did events actually happen? Does it matter? Is it really about Shilawati, Yuwanashwa, Shikhandi or Somawati? Or is about love, law, identity, gender, power and wisdom? The impossibility of universal fairness? Who knows?’
आजच्यासाठी काय घ्यायचे
हे पुस्तक वाचून अनेक प्रश्न पडतात. सगळ्यांना अमर्याद स्वातंत्र्य दिले तर समाज नीट चालत राहील का? व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजव्यवस्था यांचा ताळमेळ कसा घालायचा? निदान आपल्यापुरते तरी समोरच्याला त्याने आपल्यासाठी किंवा समाजासाठी मन न मारता मोकळे जगता यावे म्हणून आपण अपेक्षांचे ओझे कमी करू शकतो का?
आज आपण माणसाची माणूस म्हणून ओळखच विसरत चाललो आहोत. त्याच्या लेबलांना त्याच्यापेक्षा जास्त किंमत आहे. मग ते त्याची जात असो, संपत्ती असो की सामाजिक स्थान असो. माणसाचा माणूस म्हणून जर आपण आदर करायला शिकलो, तर कदाचित जगणे बरेच सुसह्य होईल. इतके सगळे वाचून शेवटी आजच्यासाठी काय घ्यायचे? लेखकाने हे पुस्तक कोणत्या उद्देशाने लिहिले असावे त्याचे उत्तर लेखकाच्या मनोगतामध्ये सापडते.
“Within infinite myths lies the eternal truth
Who sees it all?
Waruna has but a thousand eyes
Indra a hundred
And I, only two”
आपल्या पुराणवाङ्मयातल्या अनेक गोष्टी आपण आज टाकून द्यायला निघालो आहोत. त्यांच्याकडे परत बघण्याची गरज आहे. त्यांत कदाचित तथ्य आहे, ते आपल्याला समजले नाही. त्यांचा अर्थ लावण्यात आपण कमी पडतो आहोत, असे हे पुस्तक वाचून राहून राहून वाटते.
5/6, अनंत अपार्टमेंट, 1206/ए/9, ऑफ आपटे रोड, पुणे 411 004

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.