स्मिथ, मार्क्स आणि गांधी

अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ याला नुसते अर्थशास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा अर्थतत्त्वज्ञ म्हणणे जास्त उचित ठरेल. राजसत्ता आणि अर्थकारण यांचा अन्योन्यसंबंध तपासण्याची त्याला अठराव्या शतकातच गरज भासली. त्याच्या दूरदर्शीपणाचा हा पुरावा आहे.
अँडम स्मिथ ग्रेट ब्रिटनचा नागरिक होता आणि ‘औद्योगिक क्रांती’चे जन्मस्थान इंग्लंड मानले जाते. याच इंग्लंडात पुढे कार्ल मार्क्स हाही अर्थतत्त्वज्ञ येऊन राहिला होता आणि भांडवलाची चिकित्सा करणारा आपला ग्रंथ त्याने औद्योगिक क्रांतीच्या वाढत्या पडछायेत लिहिला. ज्या लंडन शहरात अॅडम स्मिथ आणि कार्ल मार्क्स यांनी आधुनिक संस्कृती आणि अर्थकारण यांचे परस्परसंबंध मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच लंडन शहरात मोहनदास करमचंद गांधी ह्या – महात्मा म्हणून ओळखल्या गेलेल्या – भारतीयाला पाश्चात्त्य संस्कृतीचे जवळून दर्शन घडले. अठराव्या शतकाच्या मध्यापासून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत स्मिथ, मार्क्स, आणि गांधी यांनी आधुनिक पाश्चात्त्य अर्थकारणाचा राजकारणावर पडणारा प्रभाव किती निर्णायक आहे, याचा मुळापासून वेध घेतला.
सरकार किंवा शासन अथवा राजसत्ता यांना आपण नागरी व्यवस्थापन म्हणू अॅडम स्मिथच्या मते त्याचे स्वरूप असे आहे : “नागरी राजसत्ता आणि तिचे प्रशासनही जोवर मालमत्तेच्या रक्षणासाठी उभारण्यात आली असे म्हटले जाते, तोवर प्रत्यक्षात मात्र ती गरिबांपासून श्रीमंतांचे संरक्षण करण्यासाठी, किंवा थोडीफार मालमत्ता असलेल्या लोकांचे ज्यांच्याकडे मालमत्ताच नाही अशा लोकांपासून रक्षण करण्याचे काम करताना दिसते.” स्मिथच्या मते राजसत्ता आणि शासनाचे कार्य कर वसूल करणे आणि अभिजनवर्गाला आर्थिक पाठबळ देणे, बाजारपेठांवरची त्यांची मक्तेदारी सुरक्षित ठेवणे, असे आहे. स्मिथच्या या समीक्षेकडे आजचे मुक्त बाजारपेठेचे पुरस्कर्ते मुद्दामच कानाडोळा
करतात. जेव्हा सरकारने अर्थव्यवहारात हस्तक्षेप करू नये असे स्मिथ सांगतो तेव्हा सरकारी हस्तक्षेप अभिजनांनाच धार्जिणा असतो, गरिबांना नव्हे या त्याच्या इशाऱ्याचा त्यांना विसर पडतो.
मालमत्ता आणि भांडवल यांचा विचार करताना मार्क्सने मानवी श्रमाचे स्थान केंद्रीभूत मानले. मजुरीचे मोल वाजवीपेक्षा नेहमीच कमी देण्याची भांडवलदारांची प्रवृत्ती त्याने अधोरेखित केली आणि भांडवल किंवा मालमत्ता श्रमिकांच्या पद्धतशीर फसवणुकीतून, लुबाडणुकीतून, आणि पिळवणुकीतून निर्माण झालेली आहे आणि श्रमिकांना ह्या मालमत्तेचा न्याय्य हिस्सा दिला जात नाही याकडे लक्ष वेधले.
गांधी हे काही अॅडम स्मिथ किंवा कार्ल मार्क्ससारखे पाश्चात्त्य संस्कतीतच जन्मून वाढलेले अर्थतत्त्वज्ञ नव्हते. औद्योगिक क्रांतीच्या केंद्राजवळ गांधी आले ते आपल्या ग्रामीण भारतीय संस्कृतीतून. गुजराती मातृभाषा असलेला हा काठेवाडी वाणी पोरबंदरहून लंडनपर्यंत आला तो ब्रिटिशांचा कायदा आणि न्यायपद्धती शिकून वकिली करायला. इंग्लंडात बॅरिस्टर झाल्यानंतर वकिली करायला गांधी दक्षिण आफ्रिकेत पोचले. पाश्चात्त्य संस्कृती इतर वंशांशी आणि तथाकथित ‘मागासलेल्या लोकां’शी कसा जुलमी व्यवहार करते आणि न्यायाला धाब्यावर बसवते याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि ह्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते मायदेशी परतले.
गांधी हे तुकोबांच्या अर्थाने ‘वैष्णव’ होते. आणि भारतीय संतांच्या परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय आविष्कार करणारे, वैश्विक मानवतावादावर अढळ श्रद्धा ठेवणारे आधुनिक महापुरुष होते. गांधींचे हे वेगळेपण पाश्चात्त्यांनीही पढे ओळखले.
हिंद स्वराज’ या आपल्या छोट्याशा पुस्तकात गांधींनी इंग्लंडची तत्कालीन स्थिती ‘दयनीय’ आहे असे म्हटले आहे आणि ‘पाश्चात्त्य संस्कृती’ला त्यांनी स्वार्थप्रेरित आणि बेजबाबदार, देहसुखाला महत्त्व देणारी आणि इहलोकापलिकडे पाहू न शकणारी व्यवस्था ठरवले आहे. ‘हिंद स्वराज’ चा मराठी अनुवाद सहज उपलब्ध होणारा आहे. त्यातले पाचवे आणि सहावे प्रकरण मुळात वाचून पहावे म्हणजे गांधींची संस्कृतिसमीक्षा ही निखळ मानवतावादावर कशी आधारलेली आहे, हे कळेल.
गांधीच्या विचारांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला महत्त्व नाही असे त्यांचे टीकाकार म्हणतात. पण ज्या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी आणि वंचितांना सक्षम करण्यासाठी उपयोग केला जाण्याऐवजी कोट्यवधी दुबळ्या आणि गरीब माणसांना हतबल आणि दिशाहीन जीवनाकडे नेण्यासाठी प्रयोग केला जातो, त्याच्याविषयीच गांधी संशय घेतात.
आधुनिकीकरणामुळेच सर्वच मानवजातीचे कल्याण होईल असे म्हटले जाते. पण असे कल्याण होण्यासाठी जी मानवतावादी आणि बहुमुखी, बहुधर्मी, समताधिष्ठित व्यवस्था आवश्यक आहे ती आज तरी अमेरिकेसारखी परमसत्ता आपल्याला देऊ शकते काय?
संयुक्त राष्ट्रसंघाचे सभासद असलेली सर्व राष्ट्रे जरी मानवी हक्कांना बांधील असली तरीसुद्धा प्रत्यक्षात आज जगातल्या सहा हजार कोटी माणसांपैकी बहुसंख्य माणसे गरीब, वंचित, मागासलेली अशी आहेत. इराकवर अमेरिकेने आक्रमण केल्यास सदाम हसेन यांची मानवी हक्कांची पायमल्ली करणारी राजवट जाऊन तेथे जास्त न्याय्य शासन येईल असे अमेरिका व ग्रेट ब्रिटन आपल्याला सांगत आहेत. दक्षिण अमेरिकेत, आफ्रिकेत किंवा आशियात इतरत्र असा लष्करी हस्तक्षेप आपण मान्य करू का? इराकी लोकांच्या स्वायत्ततेचे काय? इराक हा दहशतवादी मुस्लिमांचा अड्डा आहे म्हणून दहशतवादाविरुद्धच्या आमच्या जाहीर युद्धात आम्ही इराकला आमचा प्रमुख शत्रू मानतो असे अमेरिका जगाला सांगत आहे. मात्र हे युद्ध झालेच तर सर्वच अरबांच्या अस्मितेवर प्रहार होईल आणि जागतिक मुस्लिम समाजावर मानसिक आघात होईल. यातून हिंसेच्या आणि बदल्याच्या दुष्टचक्राला जास्तच चालना मिळेल. हिंसक आणि आक्रमक प्रवृत्ती चेववल्या जातील.
गांधी म्हणतात त्याप्रमाणे पाश्चात्त्य संस्कृतीकल्पनेतच तर मानवी हिंसेची बीजे नाहीत? व्यापारी किंवा आर्थिक स्पर्धेचीच तर ही अटळ परिणती नाही? अधाशी आणि अतृप्त जीवनशैलीमुळे मानवी व्यवहारांमध्येच वाढती हिंसा शिरल्याचा तर हा पुरावा नाही? जागतिकीकरण ही हिंसक, आक्रमक आणि प्रगत देशांनी ‘अविकसित’ जगावर लादलेली प्रक्रिया असली तर तिला थोपवण्याची एक दिशा गांधींनी दाखवलेली आहे. गांधींच्या विचारांमध्ये ‘अहिंसा’ आणि ‘सत्य’ ह्या तत्त्वांना मूलभूत कसोट्या मानण्यात आलेले आहे. नैतिकतेवर भर देणारी ही विचारसरणी आहे. इंग्रजांनी भारत बळकावण्यापेक्षा भारतीयांनीच तो त्यांना देऊन टाकला असे एके ठिकाणी गांधी म्हणतात.
गुजरातमध्ये धर्माच्या नावाने मुस्लिमांचे जे शिरकाण झाले आणि गुजरातेतल्या बहुसंख्य मध्यमवर्गाने त्याचे जे समर्थन केले ते बघता आज गुजरातेतसुद्धा गांधींचे संस्कार शिल्लक उरलेले नाहीत असे दिसते. हा गांधींचा पराभव असे जे मानतात त्यांना आपण एवढेच सांगू शकतो की मग तो ज्ञानदेवांच्या ‘पसायदाना’चा आणि तुकोबांच्या अभंगवाणीचाही पराभव मानावा लागेल. ‘स्वराज्या’ची गांधींची कल्पना ही आत्मनियंत्रणावर आधारलेली आहे. आत्मनिर्णयाच्या हक्कापासून गांधींनी आत्मनियंत्रणाची फारकत केली नाही. जोवर पाश्चात्त्य संस्कृती आत्मनियंत्रणाद्वारे दैहिक आणि ऐहिक चंगळवादापासून मुक्त होत नाही, तोपर्यंत ती आक्रमक, हिंसक, लोभी, जुलुमी, आणि अन्यायी संस्कृतीच ठरते असा गांधींचा इशारा आहे. हा इशारा जागतिकीकरणाच्या चर्चेत नजरेआड करून चालणार नाही.
(दिलीप चित्रेलिखित अगतिकांचे जागतिकीकरण मधून विजया दिलीप चित्रे यांच्या परवानगीने साभार)
हरमिस हेरिटेझ, फेज 2/सी-6/फ्लॅट 17, शास्त्रीनगर चौक, नगर रोड,येरवडा, पुणे-6.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.