पुस्तक-परिचय : लंडननामा शहरे कशी घडतात

अनेक जण असे मानतात, की भारत हा देश खेड्यांमध्येच वसलेला आहे. वास्तव मात्र असे नाही. आज देशातील चाळीसेक टक्के प्रजा नागर आहे. महाराष्ट्रात तर आज नागर प्रजा आणि ग्रामीण प्रजा यांच्या संख्या जवळपास सारख्याच आहेत. हा नुसता आकड्यांचा खेळ नाही. यामागे जीवनदृष्टी, विकासातले अग्रक्रम अशा अनेक मूलभूत बाबी आहेत.
जसे, गांधीवादी-सर्वोदयवादी “खेड्यात जा”, असा संदेश देतात, तर आंबेडकर “शहरांत जा”, असे म्हणतात. गांधीविचारांत पंचायत-राज, विकेंद्रीकरण महत्त्वाचे आहे. आंबेडकर असे मानतात की कृषिप्रधान, जातींच्या उतरंडीने निबद्ध अशा खेड्यांमध्ये संख्येने भरपूर असलेल्या दलितांना न्याय मिळणार नाही; त्यासाठी औद्योगिक, केंद्रीभूत परस्परावलंबनावर बेतलेली शहरेच उपयोगी ठरतील. आजचे राजकीय पक्ष (प्रादेशिक पक्ष सोडून) काँग्रेस, भाजप, कम्यूनिस्ट, सारे केंद्रीभूत, नागर समाज घडवायलाच धडपडताना दिसतात; भलेही खेड्यांबाबत तोंडदेखली आस्था त्यांच्या जाहीरनाम्यांमधून व्यक्त होत असते.
मूल्यवृद्धी, value added, असा निकष वापरायचा झाला तर शहरांचे महत्त्व अधिकच जास्त दिसते. किती प्रजेचे पोटपाणी कोणत्या धंद्या-पेशांवर अवलंबून आहे, असा निकष वापरायचा झाला तर मात्र आजही ग्रामीण, शेतीवर चालणारी अर्थव्यवस्था औद्योगिक-सेवा औद्योगिक अर्थव्यवस्थेइतकीच महत्त्वाची आहे. प्रश्न असा, की आपण कोणता निकष वापरावा.
वास्तवातल्या, प्रत्यक्ष स्थितीतल्या व्यवस्थापनाचा विचार करायचा, तर भारतात, महाराष्ट्रात ना ग्रामीण व्यवस्थापन धड आहे, ना नागर व्यवस्थापन, आणि साक्षर, सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारी माणसे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यवस्थापन आवश्यक असते, याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. असे व्यवस्थापन सरकारने करायचे असते, त्यात नागरिकांनी लक्ष घालायचे कारण नाही; अशीच भूमिका दिसत असते. यावर एक उपाय म्हणजे प्रौढ सुशिक्षण, तेही मुळात सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या बुद्धिजीवींचे! तर असे शिक्षण सोप्या, वाचकस्नेही (मराठीत reader friendly!) रूपांत करायचा एक प्रयत्न म्हणजे सुलक्षणा महाजनांचे लंडननामा हे पुस्तक (रोहन प्रकाशन, 2010, पृष्ठसंख्या 244, छायाचित्रे 14 पाने, किंमत रु.295/-).
कुमार केतकरांच्या प्रस्तावने नंतर व लेखिकेच्या मनोगता नंतर लंडन शहराच्या इतिहासाची एक रूपरेषा भेटते. त्यानंतर सात प्रकरणांमधून या इतिहासाचे विस्तृत वर्णन येते.
जरी हा वरकरणी लंडन शहराचा इतिहास असला, तरी यांत इतरही दृष्टिकोनांना वाव आहे. सामंती समाजव्यवस्थेतून लोकशाही कशी घडली? औद्योगिक क्रांतीचे कारक कोणते होते? औद्योगिक जीवनपद्धती शेतीवर आधारित पद्धतीपेक्षा कोणकोणत्या दृष्टीने वेगळी होती? या वेगळेपणाचे सामाजिक परिणाम कोणते? कायदेपालन व न्यायदानाच्या यंत्रणा कशाकशा बदलत गेल्या? ते बदल का घडले? वसाहतवाद कशातून उद्भवला व त्याने कोणकोणती रूपे घेतली? अशा अनेक प्रश्नांची उकल लंडनच्या इतिहासाच्या मदतीने करता येते. आणि अशा प्रश्न-उकलीला आवश्यक असा खूपसा तपशील लंडननामा या पुस्तकात भेटतो.
वैज्ञानिक दृष्टिकोन
एकोणिसाव्या शतकातल्या लंडनच्या उत्क्रांतीतून (प्रकरण : महानरक ते महानगर (इ.स.1800-1900)) आज खास नागरी समजल्या जाणाऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित होते. नगररचना, नगरविकास या संकल्पना शास्त्रशुद्ध रूपांत मांडल्या जाण्याचा हा काळ. आज व्हिक्टोरियन युग म्हटले जाते, तोही साधारणपणे हाच काळ. नगरांचे, विशेषतः महानगरांचे प्रश्न वेगळे असतात याची जाणीव या काळात झाली. आणि ती प्रथम झाली लंडनमध्ये. तीव्र विषमता, अपार बकाली, बदलत्या उत्पादनपद्धती, या साऱ्यांचा परिणाम लंडनने जेवढा भोगला तेवढा बहुधा इतर कोणत्याच शहराने भोगला नसेल. या खळबळत्या काळाचे तपशीलवार वर्णन इथे भेटते.
हा इतिहास वाचताना एक जाणवते, की खऱ्या अर्थाने पहिले महानगर असण्याचे फायदेही आहेत, आणि तोटेही. “पूर्वी काय केले होते, इतर ठिकाणी?”, असे प्रश्न विचारता येत नाहीत. मूलभूत विचारांपासूनच सुरुवात करावी लागते. योगायोगाने लंडन शहराचा विकास आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा काहीसा शिस्तबद्ध विकास, या दोन गोष्टी एकाच वेळी घडत गेल्या. त्या काळी सर फ्रान्सिस बेकनप्रणीत प्रत्यक्षदर्शी (empiri cal) पद्धत हा विज्ञानाचा पाया मानला जाई. महानगरातले प्रश्न सोडवायलाही त्याला समांतर पद्धती वापरल्या जात. यांपैकी रॉबर्ट पीलची पोलीस-दलाची रचना (आजही लंडनमधल्या पोलिसांना बॉबी म्हणतात, ते रॉबर्ट पीलमुळे!), सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, ह्या सुधारणांचा उगमच लंडनमध्ये झाला. आणि या साऱ्यांचा पाया नव्याने रुजत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनात होता. त्या संदर्भातील काही भाग तर मुळातूनच वाचायला हवा –
विज्ञानाच्या प्रसारासाठी रॉयल सोसायटी 1660 मध्येच लंडनमध्ये स्थापन झाली होती. त्यांची सदस्यसंख्याही मोठी होती. परंतु त्यांच्या चर्चा मुख्यतः आपापसातच चालत. याबद्दल बॅबेज (संगणकाची मूळ संकल्पना मांडणारा वैज्ञानिक) याने नाराजी दाखवली होती. 1847 सालानंतर त्यात थोडी सुधारणा झाली. 1799 साली काही जमीनदारांनी एकत्र येऊन रॉयल इन्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली होती. माहिती आणि उपयुक्त तंत्रज्ञान यांचा प्रसार करणे हा तिचा उद्देश होता. या मार्गाने राजकीय क्रांती टाळता येईल असेही संस्थेला वाटत असे. 1801 ते 1820 या काळात लंडनमध्ये भाषणे देऊन विज्ञान-प्रसार करण्यासाठी या संस्थेने हंफ्रे डेव्ही या शास्त्रज्ञाची नेमणूक केली. 1825 ते 1861 या काळात यासाठी मायकेल फॅरडे या शास्त्रज्ञाचीही नेमणूक संस्थेने केली. त्यांची भाषणे त्या काळात फार यशस्वी ठरली होती. पैसे देऊन ही भाषणे ऐकायला लोक गर्दी करीत. या उपक्रमातून संस्थेला इतके उत्पन्न मिळत असे की जमीनदारांकडून देणग्यांचीही गरज पडत नसे. सर्वसाधारण लोकांना ज्ञान विकण्याचाच या संस्थेचा उद्देश होता. याबरोबरच सरकार आणि उद्योजक यांना तांत्रिक सल्ले देण्याचेही काम संस्थेचे सभासद करी.
अशा सामान्य विज्ञानाबरोबरच विविध विषयांचा अभ्यास करणारे अनेक लोक होते. असे अभ्यासक आपल्या विषयातील विशेषज्ञ अभ्यासकांसाठी (स्पेशलिस्टांसाठी) वेगळ्या संस्था स्थापन करीत. भूगर्भ शास्त्र (1807), खगोल शास्त्र (1820) प्राणी शास्त्र (1826), हवामान शास्त्र (1836), रसायन शास्त्र (1841) या ज्ञानशाखांतील लोकांच्या संस्था याच काळात लंडनमध्ये स्थापन झाल्या होत्या. या संस्था आपल्या विषयातील अभ्यासकांची भाषणे लंडनमध्ये घडवून आणीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा संस्था आपल्या विषयातील संशोधन अधिक लोकांपर्यंत पोचावे या अपेक्षेने जर्नल्स, नियतकालिके प्रसिद्ध करीत. केवळ सभासद वर्गणीमधून त्याचे व्यवहार यशस्वीपणे चालवले जात. ही नियतकालिके विकण्यासाठी त्यांना व्यापारी मार्गांचा अवलंब करण्याची गरज भासत नसे, इतका त्यांचा वाचक वर्ग मोठा होता. त्यामुळे बाजारव्यवस्थेचा गैरदबाव त्यांच्यावर येण्याचा प्रश्न नसे. वैज्ञानिकांचे स्वातंत्र्य त्यामुळे अबाधित राहत असे. द लंडन झूलॉजिकल सोसायटीने रीजंट्स पार्क येथे, तर सरे लिटररी, सायंटिफिक अँड झूलॉजिकल सोसायटीने व्हॉक्सहॉल गार्डन येथे स्वतःची प्राणिसंग्रहालये स्थापन केली होती.
दगडी रस्ते आणि विटांच्या इमारती यांनी व्यापलेल्या लंडनमध्ये जीवशास्त्र आणि निसर्गशास्त्र यांची आवड निर्माण करण्याचे हे प्रयत्न अतिशय अभिनव ठरले. या प्राणिसंग्रहालयात जगभर पसरलेल्या विविध वसाहतींच्या देशांमधून विविध प्राणी आणण्यात आले होते.
ब्रिटिश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स (BAAS) ही संस्था लंडनमध्ये 1831 साली स्थापन झाली. विविध वैज्ञानिक विषयांमध्ये निर्माण होणाऱ्या ज्ञानाचा एकत्र विचार करण्याच्या गरजेमधून या संस्थेचा जन्म झाला. वैज्ञानिकांमध्ये संवाद घडवून आणणाऱ्या या संस्थेने सामान्य लोकांमध्येही विज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. विज्ञान विषयात काम करणाऱ्या लोकांना सायंटिस्ट्स म्हणण्याची प्रथा याच काळात लंडनमध्ये सुरू झाली. वैज्ञानिकांच्या या सामाजिक कामामळे त्यांच्याविषयी समाजात मोठा आदर निर्माण झाला होता. व्हिक्टोरियन लंडनमध्ये वैज्ञानिक हे ज्ञान मिळवण्याच्याच निखळ हेतूने प्रेरित होऊन अभ्यास करीत. आपल्या ज्ञानाचा समाजाला काय फायदा आहे, उपयोग आहे की नाही याचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटत नसे. सामाजिक उपयोगाला त्यांच्या दृष्टीने असलेले महत्त्व हे दुय्यम होते. आयमॅक न्यूटन हा वैज्ञानिकांचा आदर्श होता. असे ज्ञान हे केवळ स्वतःजवळ वा स्वतःच्या वर्गापुरते मर्यादित न ठेवता ज्या कोणाला हवे असेल त्या माणसाला मिळू देण्याचे सामाजिक स्वातंत्र्य लंडनमध्ये होते. विज्ञानाचा वापर लोक आपापल्या पद्धतीने करीत. या विज्ञान प्रसारामुळे समाजात असलेल्या धर्माच्या स्थानाला मात्र मोठे आव्हान निर्माण झाले.
शुद्धलेखन मुळाबरहुकूम]
व्हिक्टोरियन लंडनचा सारा नवनवोन्मेष केवळ विज्ञान-तंत्रज्ञानाने मात्र नव्हता.
ये शहर बडा अलबेला!
त्याचा मोठा भाग साम्राज्यवाद-वसाहतवादाच्या पायावर उभा होता. आणि हा पाया अन्यायावर-विषमतेवर उभा होता. बकाल लंडनपासून आजचे ये शहर बडा अलबेला, हर तरफ हसीनों का मेला लंडन घडण्यात वसाहतींच्या पिळवणुकीचाही भाग होता. आजही जेव्हा द सिटी हा शब्दप्रयोग मोठ्या सी ने लिहिला जातो (The City), तेव्हा संदर्भ लंडनच्या भांडवलबाजाराचा, the City of London चा असतो. लहान सी पासून सुरू होतात, त्या इतर सिट्या!
हे अटळ आहे. भांडवलबाजार नेहेमीच मोठ्या क्षेत्रातली संपदा टिपली जाऊन, तिला एकत्रित करून घडत असतात. पण असे आहे म्हणजे असे असणे इष्ट आहे, असे मात्र नव्हे.
लंडन हे नव्या फॅशन्सचे, नव्या सांस्कृतिक व कलाचळवळींचे क्षेत्र आहे. अगदी न्यूयॉर्क, पॅरिस, हाँग-काँग, शांघाय, मुंबई, दिल्ली या महानगरांच्या ते या बाबतींत पुढे असते. आणि हे सांस्कृतिक महानगरपण आर्थिक सत्तेतून घडत असते. लेखिका सुलक्षणा महाजन लंडनच्या जागतिक होण्यामागचे सेंद्रिय, उत्क्रांत, चुकतमाकत घडत जाणे उत्तम रीतीने वर्णितात. जगभर आणि विशेषतः भारतात नागरीकरण, नागरीभवनाकडे संशयाने, काहीशा भीतीने पाहिले जाते, हेही त्या नोंदतात. हा संशय, ही भीती कशातून येते, ते मी इथे नोंदत आहे; येवढेच. ती भीती is पासून ought to be हा निष्कर्ष काढण्या बाबत आहे.
म्हणून शेक्स्पीअर, मिल, डार्विन, डिकन्ससारखेच अॅडम स्मिथ, कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी हेही काही काळ लंडनकर होते, हे लक्षात ठेवायला हवे. या तिघांनीही इष्ट काय, अनिष्ट काय, याचा विचार करून मूलभूत नव्या विचारांना आणि कृतींना चालना दिली.
एका मोठ्या उदाहरणातून, केस स्टडी तून शहरे आणि त्याची जडणघडण लंडननामा पुरवतो. नागरी व्यवस्थापनाच्या यंत्रणा आज कशा असायला हव्या, यावर नववे प्रकरण, लंडन महानगरपालिका : कारभार आणि राजकारण बराच प्रकाश टाकते. पण यातून मिळणारे धडे, थेट रूपांतले किंवा नव्या वाटा सुचवणारे (heuristic); हे एका वेगळ्याच पुस्तकाचा विषय व्हायला हवेत.
मुळात ग्रामीण व नागरी क्षेत्रांचे एकमेकांवर अवलंबून असणे, एकाचा विकास दुसऱ्याच्या संगतीशिवाय, सोबतीशिवाय शक्य नसणे; हे आजकाल रूर्बन, Rurban, rural अधिक urban, या शब्दाने, संकल्पनेने ठसवले जाते. श्री. अ. दाभोलकर व इतरांनी ही संकल्पना लोकांपर्यंत पोचवायचे प्रयत्न केले आहेत. पण आजही मराठी भाषेतील बहुतांश लेखात ग्रामीण-विरुद्ध-नागर अशा सुरातलेच असते.
अशी आशा करू या, की ती घातक आणि काल्पनिक दुफळी मिटवण्याचे लंडननामा हे पहिले पाऊल ठरेल.
193, मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर 440010.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.