डाळरोटी

एकूण घरखर्चापैकी किती प्रमाण अन्नावर खर्च होते, या अंगाने काही देशांची आकडेवारी यूनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरने तपासली. या प्रमाणानुसार चार वर्ग पाडले गेले.
ज्या देशांत अन्नखर्च एकूण घरखर्चाच्या 15% किंवा कमी असतो, ते सुस्थित देश. या वर्गात कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, इंग्लंड, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, दक्षिण कोरिया व थायलंड येतात. अमेरिका सर्वांत सुस्थित आहे. तेथील लोकांच्या घरखर्चात केवळ 7% खर्च अन्नावर होतो.
यांच्याखाली घरखर्चाच्या 16% ते 25% भाग अन्नावर खर्च करणारे देश येतात. यांत मेक्सिको, चिले, ब्राझील, आर्जेटिना, दक्षिण आफ्रिका, पुर्तुगाल, सौदी अरेबिया, मलेशिया, तुर्कस्थान, जॉर्डन व इस्राएल हे देश येतात.
यानंतर 26% ते 35% घरखर्च अन्नावर होणारे देश आहेत. यांत जुन्या सोविएत रशियातील सर्व देश, चीन, भारत, इराण, परु, इक्वाडोर व ग्रीस हे देश येतात.
शेवटी 36% किंवा जास्त खर्च अन्नावर करणारे देश आहेत. नायजीरिया, केनिया, इजिप्त, मोरोक्को, लिबिया, ट्युनिशिया, बहुतांश ईस्ट इंडीज व पाकिस्तान या देशांमध्ये अन्नखर्चाची ही पातळी दिसते. पाकिस्तानात प्रमाण सर्वांत जास्त आहे. एकूण घरखर्चाच्या तब्बल 46% भाग अन्नावर खर्च होतो! पण अमेरिकेच्या कृषी खात्याला बांगलादेश व बहुतांश आफ्रिका खंडासाठीची आकडेवारी मिळवता आलेलीच नाही.
अमेरिकन अर्थशास्त्री हे का तपासत आहेत? एक म्हणजे आजची अरब देशातील प्रस्थापितविरोधी लाट थेटपणे अन्नखर्चाच्या जास्त प्रमाणाशी निगडित आहे. गरिबी आणि बंडखोरी नेहेमीच एकत्र असतात. दुसरी बाब अमेरिकन निर्यात धोरणाशी निगडित आहे. गरीब देश अन्नाखेरीज खर्च करत नाहीत त्यामुळे अमेरिकेची अन्नेतर निर्यात थंडावणार आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.