मुंबईचे सिंगापूर : पाणीवापराची किंमत

सिंगापूर हे बेट आहे. त्याच्या 699 चौ.कि.मी. क्षेत्रात अडतीस लक्ष माणसे राहतात. (तुलनेसाठी : पुण्याच्या 430 चौ.किमी. क्षेत्रात 2010 साली पंचावन लक्ष माणसे राहत असत), सिंगापूरला भरपूर पाऊस पडतो, 2,400 मि.मि. (सुमारे पंच्याण्णव इंच). तरीही सिंगापूरला आपली 40% गरज पाणी आयात करून भागवावी लागते, कारण त्यांच्या स्वतःच्या पाण्याची उपलब्धता दरडोई दरसाल 1,000 घ.मी.पेक्षा कमी आहे.
पाणी आयातीची गरज कमी राखण्यासाठी चार स्रोत धोरण (Four Taps Strategy) वापरले जाते.
1) पहिला स्रोत म्हणजे पावसाचे पाणी. पूर्वी जवळजवळ सर्व पावसाचे पाणी समुद्रात वाहून जात असे. आता मात्र पावसाच्या पाण्याचा 60% भाग चौदा तळ्यांमध्ये साठवला जातो. ही तळी कटाक्षाने भोवतालच्या सागरी खाऱ्या पाण्यापासून शुद्ध राखली जातात. या तळ्यांतले पाणी शुद्ध करून शहराला पुरवले जाते. पूर्वीची काँक्रीट गटारे जाऊन आता पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहांमधून तळ्यांत पोचते. यामुळे परिसर हिरवा होतो.
2) दुसरा स्रोत आहे आयात पाण्याचा. शेजारील मलेशिया देशाकडून दोन करारांमार्फत पाणी-पुरवठ्याची हमी घेतली गेली आहे.
3) सर्व सांडपाणी तीन प्रकारच्या प्रक्रिया करून पावसाच्या पाण्याच्या तळ्यांमध्ये सोडले जाते. 20,000 चाचण्या घेऊन या तीन प्रक्रियांची कार्यक्षमता तपासली गेली, व त्या केल्यानंतर पाणी पावसाच्या पाण्याइतके गुणवान होते, अशी खात्री करून घेतली गेली. रोज 9 कोटी लीटर पाणी अतिसूक्ष्म गाळणी (membrane-based ultra filtration), रिव्हर्स ऑस्मॉसिस (reverse osmosis) व अतिनील किरणांचा मारा करणे (ultra-violet treatment) या तीन प्रक्रियांमधून जाते. नंतर तळ्यांतल्या पाण्यासोबत ते नेहेमीच्या शुद्धीकरण संयंत्रांत जाते. या प्रक्रिया अर्थातच महाग आहेत.
4) शेवटचा (व सर्वात महाग!) जो स्रोत वापरला जातो, तो म्हणजे समुद्राच्या पाण्याचे निःक्षारीकरण (desalination). 2005 साली सुरू केलेले निःक्षारीकरण संयंत्र आज दररोज 12.6 कोटी लीटर पाणी पुरवते. हे एकूण वापराच्या दहा टक्के आहे.
एकूण पाणीवापर सुमारे 140 कोटी लीटर आहे, दरडोई दररोज सुमारे 370 लीटर! जर मुंबईचे सिंगापूर करायचे झाले, तर पाण्यासाठी किती खर्च होईल?
[द हिंदू मधील (12 एप्रिल 2008) एस. विश्वनाथ यांच्या वाईज वॉटर मॅनेजमेंट : लेसन्स फ्रॉम सिंगापूर या लेखाच्या आधाराने.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.