पूर्व विदर्भातील परंपरागत पाणी-व्यवस्थापन

पाण्याला आपण जीवन म्हणतो. पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच त्याला जीवन म्हणायचे काय? आपल्या देशात जेथेजेथे पाणी-व्यवस्थापनाच्या परंपरागत पद्धती विकसित झाल्या आहेत त्या पाहिल्या, तेथील लोकाचे त्या पद्धती विकसित करण्यामागील विचार आणि तंत्रे पाहिली, पाण्याचा वापर करण्याचे नीतिनियम पाहिले, तर पाण्याला जीवन का म्हणतात ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येते. अशीच पाणी व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आपल्या विदर्भाच्या झाडीपट्टीच्या भागात अस्तित्वात आहे. असा सर्वसामान्य समज असतो की जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या भागातील लोकांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे ही त्यांची अत्यंत तातडीची गरज असते. परंतु झाडीपट्टीतील पाणी-व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य म्हणजे विपुल पावसाच्या प्रदेशात ही पद्धत विकसित झाली व शतकानुशतके टिकून आहे.
विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याचा काही भाग, असा साडेचार जिल्ह्यांचा भाग हा झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. नावावरूनच लक्षात येते की हा जंगलव्याप्त प्रदेश असावा. गोंडवाना म्हणून जो भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीलगतचा प्रदेश ओळखला जातो, त्या प्रदेशातच हा झाडीपट्टीचा भाग येतो. म्हणजे कधीकाळी या भागावर गोंड लोकांचे राज्य होते. झाडीपट्टीचा जो प्रदेश आहे तो तीन गोंड राज्यांमध्ये समाविष्ट होता. मंडला, देवगड व चांदा. त्यापैकी मंडला व देवगड ही अनुक्रमे आजच्या मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये आहेत, आणि त्यांच्या राज्यांमध्ये काही भूभाग येत असला तरी त्या भागावर तुलनेने जवळ असणाऱ्या चांद्याच्या गोंड राज्याचा प्रभाव होता.
मोठ्या प्रमाणावर जंगलच जर एखाद्या राज्यात असेल आणि गावे वसलेली नसतील, तर तेथे राज्य करणाऱ्या राजाच्या दृष्टीने कठीण परिस्थिती राहील; कारण भूभाग मोठा असूनही राज्य चालवण्यासाठी आवश्यक महसूल काहीच नसेल. म्हणून या भागामध्ये नवीन गावे वसवली जावीत याकरिता सोळाव्या शतकातील हिरशहा नावाच्या चांद्याच्या राजाने, “जो जंगल कापून त्या ठिकाणी गाव वसवेल त्याला त्या गावाची सरदारकी बहाल केली जाईल.” असे एक फर्मान काढले होते.
परंतु फक्त गावेच वसत राहिली, आणि त्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना उत्पन्नाची शाश्वती नसली, तर जंगल साफ करून शेतीच्या ज्या जमिनी काढल्या त्यांचे उत्पन्न मर्यादितच राहून पुन्हा महसुलाची समस्या राहतेच. म्हणून मग “जो तलाव बांधेल त्याला, त्या तलावापासून ओलीत होईल तेवढी जमीन खुदकास्त म्हणून बक्षीस दिली जाईल” असे दुसरे फर्मानही या राजाने काढले. या संधीचा उपयोग करून घेत या भागामध्ये गावे तर वसलीच, सोबतच तलावांचे जाळेही निर्माण झाले.
तलावांचा इतिहास :
झाडीपट्टीतील कोहळी नावाच्या समाजाचे तलाव बांधणीतील योगदान फार मोठे आहे. या समाजातील लोक पाणी-व्यवस्थापनामध्ये तज्ज्ञ समजले जात होते. यांच्याबाबतीत असे म्हटले जाते की चांद्याचा गोंड राजा एकदा काशीला गेला असताना तेथे हे लोक व त्यांचे पाणी-व्यवस्थापनातील कौशल्य त्याने हेरले, आणि त्यांना आपल्या राज्यात त्यांचे कौशल्य वापरण्याकरिता आमंत्रित केले. (इ.स.1447 ते 1472 दरम्यानचा गोंड राजा सुरजा बल्लाळसिंह हा बनारसला गेला, व युद्ध आणि संगीतकला शिकण्याकरिता लखनौला दीड वर्षे होता. – चंद्रपूरचा इतिहास लेखक, अ.ज.राजूरकर. पृ.क्र.121. त्यानेच या कोहळी लोकांना या भागात आणले असावे. त्यानंतर त्याचा नातू हिरशहा याने तलाव बांधण्याबाबतचे फर्मान काढले होते.)
ते लोकही राजाच्या आमंत्रणाचा स्वीकार करून या भागात आले आणि जेथे जेथे शक्य असेल अशा सर्व ठिकाणी या लोकांनी तलाव बांधले. तलावांची जागा निवडण्यात हे लोक तरबेज होते. अशी जागा ते निवडत असत, की कमीत कमी लांबीची पाळ बांधून जास्तीत जास्त मोठा पाण्याचा साठा करता येईल. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या काठाने, भंडारा व गोंदिया जिल्हा आणि गडचिरोलीमधील वडसा तहसील व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कोहळी समाजाची वस्ती मर्यादित आहे. या समाजामध्ये तलाव बांधण्याशी सामाजिक मानाची संकल्पना जोडलेली होती. ज्याचे जास्तीत जास्त तलाव अथवा मोठे तलाव त्याचा समाजामध्ये मानही तेवढाच मोठा असायचा. राजाच्या फर्मानांचा फायदा घेत तलाव बांधण्याचे काम फक्त कोहळी समाजानेच नाही तर पोवार, गोंड, हलबा, कुणबी, ब्राह्मण अशा सर्वच समाजाच्या लोकांनी केले.
तलावांचे जाळे :
झाडीपट्टीच्या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, 1100 ते 1300 मि.मी. पावसाचा हा प्रदेश आहे. असे असतानाही गावात पडणारे जास्तीत जास्त पाणी साठवण्याचा व जास्त जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला जात होता. याकरिता पाणी वाहून जाणारे त्याचे रस्ते शोधून त्या मार्गात तलाव बांधण्यासाठी जागा निवडली जायची. तलाव पूर्ण भरून पाणी त्याच्या सलंगवरून पुढे जात असेल, तर त्याच्या खाली दुसरा तलाव बांधला जायचा. पुन्हा पाणी पुढे जात असेल, तर तिसरा, अशा पद्धतीने तलावांची साखळी तयार व्हायची. या भागामध्ये जे पारंपरिक तलाव आहेत त्यांची रचना पाहिली तर अनेक तलाव अशा कुठल्यातरी साखळीचा भाग आहेत. अशा एकापेक्षा जास्त तलावांच्या साखळ्या असणारीदेखील काही गावे आहेत. तेथे तर अक्षरशः तलाव आणि त्यांच्या पाटांचे जाळेच विणलेले आहे.
या तलावांच्या जाळ्याचे सर्वांत उत्तम उदाहरण भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी नावाचे गाव, हे आहे. या हजार हेक्टरचे क्षेत्रफळ असणाऱ्या गावामध्ये लहानमोठ्या तलावांच्या तीन साखळ्या मिळून 76 तलाव आहेत. पाटांचे जाळे असे विणलेले आहे की गावाच्या वरच्या भागातील तीन मोठ्या तलावांमधून सोडलेले पाणी गावाच्या कुठल्याही भागामध्ये कोणत्याही प्रकारची ऊर्जा न वापरता पाटांद्वारे पोहचते. गावातील प्रत्येक घराच्या समोरची नाली ही या पाटाच्या व्यवस्थेचा भाग आहे. या गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे उसाचे उत्पादन घेऊन गावातच घरोघरी गु-हाळांमधून गूळ तयार केला जातो. त्यामुळे गावात कधीकधी आग लागण्याच्या घटनाही घडतात. अशा वेळी पाणी उपलब्ध असलेल्या वरच्या तलावातून पाणी सोडून त्या घरासमोरच्या नालीत आणून आग विझवण्याचे काम केले जाते. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे हे सर्व नियोजन आणि बांधकाम त्या काळात झाले आहे, जेव्हा आजच्यासारखी आधुनिक जमिनीचे उतार मोजण्याची यंत्रणा अस्तित्वात नव्हती. लोकांनी त्यांचे पारंपरिक ज्ञान व अनुभव यांच्या आधारावर या भागात हजारो तलाव बांधले आहेत.
तलावांची तांत्रिक वैशिष्ट्ये : वर्गीकरण
लोकांनी तलावांना पाच प्रकारात विभागले आहे.
• संख्येने फार कमी पण आकाराने सर्वांत मोठा तलाव म्हणजे बांध. हा तलाव अनेक गावांना पाणी पुरवतो व मोठ्या प्रमाणावर ओलिताची सोय करतो.
• यानंतर तलाव किंवा वस्तीजवळ असेल तर गाव-तलाव. हा एका गावापुरताच किंवा त्यापेक्षाही कमी क्षेत्राचे ओलीत करतो. गावाजवळ असेल तर गुरांना पाणी, कपडे धुणे, आंघोळ अशा कामांकरिता वापरला जातो म्हणूनच त्याला गाव-तलाव नाव पडले.
• संख्येने सर्वांत जास्त असणारा तिसरा प्रकार बोडी. तलावाच्या ओलिताच्या क्षेत्रात अनेक बोड्या असू शकतात. यांच्यामध्ये वर्षभर पाण्याचा साठा राहात नाही. बोडीचा वापर हा धानाचे पन्हे भरण्यासाठी केला जायचा. या कामाकरिता तलावाचे पाणी देत नसत. त्यामुळे जास्त जमीन असणाऱ्या कास्तकारांच्या एकट्याच्या मालकीच्या बोड्या असत किंवा काही कास्तकारांच्या मिळूनही बोड्या असत. पर्ह्यासाठी पाणी वापरल्यावर रिकामी झालेली बोडी तलावाचे पाणी सोडल्यानंतर त्या पाण्याने पुन्हा भरून घेतली जाई. कारण तलावाचे पाणी हे पाळीने ठरल्याप्रमाणेच देण्यात येई. आपल्या पिकाला पाण्याची गरज आहे, पण आपली पाळी आलेली नाही, अशा वेळी या बोडीचे पाणी पिकाला पुरवून ताण हलका केला जायचा. पावसाळ्यातील पिकानंतर बोडीत पाणी राहत नसे, पण ओल असायची. तेथे मग ओलाव्यावर येणारा गहू, चना अशी पिके घेतली जायची, पावसाच्या प्रमाणावर बोड्यांची संख्या अवलंबून असायची. पाऊस जास्त असेल, तर त्या जागेचा शेत म्हणून वापर केला जायचा. पाऊस कमी पडणार असा अंदाज आल्यास पाणी अडवून बोडी केली जायची. यामुळे यांची संख्या दरवर्षी बदलती असायची.
• यानंतरचा प्रकार कुटन. कुटनमध्येही दोन प्रकार आहेत. मोठ्या तलावाच्या तुडुमातून (तलावातून पाणी सोडण्याचे दार) सोडलेले पाणी सरळ पाटात गेले तर त्या पाण्याला जो वेग असतो त्यामुळे मातीचा पाट फुटून नुकसान होईल म्हणून मोठ्या तलावाच्या पाळीला समांतर असा तीन ते चार फुट उंचीचा मातीचा एक बांध पाळीपासून काही अंतरावर पाटाच्या आधी बांधला जायचा. तुडुममधून सोडलेले पाणी या कुटनमध्ये आल्यावर ते त्यामध्ये सगळीकडे पसरल्यामुळे त्याचा वेग नष्ट व्हायचा, व मग ते पाणी हळूच पाटात जायचे. धानाची शेती करताना समांतर जमीन उपलब्ध व्हावी म्हणून बांध्या केल्या जातात. शेतातील सर्वांत वरची बांधी ही कुटन म्हणून वापरली जाते. त्यामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवतात. तेथे पीकही घेतले जाते. बोडी नसेल, व तलावातील पाणी मिळेपर्यंत पिकाला ताण पडत असेल, तर कुटनचे पाणी खालच्या बांध्यांमध्ये सोडून पिकाचा ताण हलका करत असत. पुन्हा तलावाचे पाणी आल्यावर ही कुटन भरून घेत असत.

येथून तलावाचे पाणी कुटनमध्ये सोडले जाते.
येथे पाणी पसरून वेग कमी होतो.
तलावाची पाळ
कुटनची पाळ
अंतर – 50 ते 60 फूट
पाट
आकृती-1 : तलावाखालची कुटन’
• शेतामध्ये फक्त कुटन करूनच थांबत नसत, तर सर्व बांध्यांमध्ये पाणी दिल्यावर जास्तीचे पाणी वाहूनही जाते, किंवा धानाच्या शेतीमध्ये बांधीतले पाणी वेळप्रसंगी कमीदेखील करावे लागते. तेव्हा शेताच्या खालच्या भागामध्ये एक गड्डा करून त्यामध्ये हे वाहून जाणारे पाणी साठवले जायचे. वरच्या बांध्यांमध्ये पाण्याची आवश्यकता असल्यास हे पाणीदेखील वापरता येत असे. या पाणी साठवून ठेवण्याच्या गड्डयाला डोब म्हणतात.
तलावाचे भाग व त्यांचे तंत्र –
तलाव म्हटला की आपोआपच त्याचा येवा (पाणलोट), पाळ, तुडूम (पाणी सोडण्याचे दार), सलंग किंवा फरस (वेस्ट वेअर), पाट हे सर्व भाग आलेच. पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये या सर्व भागांचे व्यवस्थापन समाविष्ट आहे.
• येवा : तलावामध्ये ज्या भागातून पाणी येते तो येवा. पाण्याला येण्यात काही अडथळे असतील, अटकाव होत असेल, तर त्याला तलावाच्या दिशेने येण्यासाठी रस्ता करून द्यावा लागतो. हे पाण्याचे रस्ते दरवर्षी पावसाच्या आधी साफ केले जात असत. कधीकधी याकरिता नांगराचा वापरही केला जाई.
•पाळ : तलावाची पाळ तयार करताना मातीचा पोत पाहून पाळीची जाडी, व जागेनुसार उंची ठरवली, की प्रत्येक थरानंतर त्यावरून बैल चालवून व पाणी टाकून माती ठोकली जात असे. पाण्याचा दाब जास्त पडत असेल आणि पाळीची माती पावसाळ्यात थांबत नसेल, तर त्या ठिकाणी चुना, गूळ आणि मातीचे मिश्रणही काही ठिकाणी वापरल्याची उदाहरणे आहेत. आज तलाव बांधताना पाळीवरची माती वाहून जाऊ नये म्हणून दगडाचे पिचिंग करतात व पाळीवर झाडे असली, तर ती पाळीला कमकुवत करतात म टाकली जातात. याकरिता खसच्या गवताची जुडे पाळीच्या दोन्ही बाजूच्या उतारावर लावत असत. आणि आंबा, शिंदी, चिंच अशी झाडे पाळीवर मुद्दाम लावली जात असत. यामुळे तलावाच्या पाळीला आणखी जास्त मजबुती येते. आजही अनेक गावांच्या चांगल्या आमराया या तलावांच्या पाळीवर आहेत.
• तुडूम : तलावातील पाणी पाटात सोडण्यासाठी तुडूम वापरले जायचे. हे तुडूम लाल, मुरमाडी दगडापासून बनवले जायचे, कारण हा दगड जमिनीतून काढला जातो तेव्हा तो नरम असतो आणि त्याला पाहिजे तसा आकार देता येतो, हवेच्या संपर्कात आल्यावर तो कडक होत जातो. (हा कोकणातील जांभा दगडासारखा lateritic हवा). तलावातील आतल्या बाजूला पायरीसारखी रचना असते, आणि प्रत्येक पायरीवर एक छिद्र असते. ज्या पायरीवर पाणी असेल त्या पायरीवरील छिद्र उघडून पाणी सोडले जाते. पावसाळ्यापूर्वी चपटा दगड ठेवून वरून काळी माती लिंपून हे छिद्र बंद केले जाते. यातून पाण्याचा एक थेंबही पाझरत नाही. समजा काही बिघाड होऊन पाणी पाझरलेच, तर गावातील प्रत्येकाला त्याची दुरुस्ती कशी करायची हे माहिती असे.

मातीची पाळ पाळीच्या आतील तुडूम संरचना
तुडूमची पायरी
पाणी सोडण्याचे छिद्र दगडावर माती लिंपून बंद केलेले छिद्र मुरखांड (पाणी सोडण्याचे सर्वांत खालचे छिद्र)
आकृती-2 : पारंपरिक दगडी तुडूम
• सलंग किंवा फरस : तलावातील जास्तीचे पाणी वाहून जाण्याकरिता सलंग असायची. या सलंगचे वैशिष्ट्य म्हणजे या बहुतेक वेळेला जमिनीला समांतर, अथवा जर उंच करायची गरज पडलीच तर बाहेरच्या बाजूने उतार असणाऱ्या असत. त्यामुळे प्रजनन काळात जेव्हा नदी-नाल्यांतून मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहून येत, तेव्हा या उताराच्या सलंगवरून त्यांना तळ्यात येणे सहज शक्य होई व पुढे त्यांचे तलावांत, किंवा त्याच्या पाणलोटातील प्रवाहांत प्रजनन झाल्यामुळे त्यांची अंडी तलावातच राहत असत.
सामाजिक वैशिष्ट्ये:
तलावांच्या या तांत्रिक अंगांएवढेच महत्त्वाचे होते त्याचे सामाजिक अंग. तलावात पाणी येणारे रस्ते स्वच्छ करण्याचे काम जे लोक त्या तलावाचे पाणी वापरत ते सर्व करीत असत. पोटातील गाळ काढणे, पाळीची डागडुजी करणे, पाटांची सफाई व दुरुस्ती करणे, ही सर्व कामे याच लोकांच्या द्वारे केली जात असत. तलावातील पाकण (गाळाची माती) खत म्हणून शेतात टाकण्याकरिता वापरली जायची. पाकण न्यायची असल्यास निर्णय सामूहिकपणेच घेतला जायचा. दर दोन ते तीन वर्षांनी गाळ काढण्याचे काम केले जात असे.
तलावांबाबतीतील निर्णय सामूहिकपणे त्या तलावाचा वापर करणारे लोक घ्यायचे. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन प्रत्येकाला किती वेळ पाणी द्यायचे, हे ठरवले जायचे. पाणी-वाटपाचे निर्णय अंमलात आणण्यासाठी गावात पाणकर ठेवले जात. या पाणकरांनाच तलावाचा पाट उघडून पाणी देण्याचे अधिकार होते. इतर कुणी पाट फोडल्यास त्याला पाणी न देण्याचा दंड असे. समजा त्याची पाण्याची पाळी झाली असेल, तर पुढील वर्षी त्याला पाणी न देण्याचा दंड भोगावा लागे.
तलाव व गावसंबध :
तलावाची निर्मिती ही मुख्यतः शेतीकरिता पाण्याची सोय करण्यासाठी केली गेली. पुढे हे तलाव फक्त शेतीकरिता सिंचनाची सोय, यापलीकडे जाऊन वेगवेगळ्या कामांकरिता उपयोगात येऊ लागले. अनेक वर्षांपासून या तलावांमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे या पाण्याच्या आधाराने एक परिसंस्था (ecosystem) अस्तित्वात येई. या तलावांमध्ये मासोळ्या, बेडूक, साप, कीटक, पक्षी, प्राणी, अनेक प्रकारच्या पाणवनस्पती यांचीही वाढ होई. या जल जैवविविधतेमधील अनेक घटक गावांमधील अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने असत. तलावाच्या आधारे सिंचन, मासेमारी, खस उद्योग, कमळ-कंद, शिंगाडा उत्पादन, यांसोबतच काठावरील गवत हे गुरांचा चारा, झाडू बनविणे, छप्पर करण्याकरिता अशा विविध उपयोगात येऊ लागले. सिंचनाशिवायचे तलावाचे इतर उपयोग हे मुख्यतः ज्या लोकांकडे अल्प किंवा अत्यल्प जमिनी आहेत किंवा जमीनच नाही, त्यांना जगण्याचा किमान आधार पुरविणारे घटक आहेत.
यावरून एक बाब स्पष्ट होते की या भागातील तलाव हे फक्त सिंचनाकरिता आवश्यक पाण्याचे व्यवस्थापन एवढ्यापुरते मर्यादित न राहता ते पाण्याच्या सभोवती एका जीवनपद्धतीची गुंफण कशी असते, याचे एक उदाहरण म्हणून विकसित होत गेले.
पाणी व्यवस्थापन व जैवविविधता :
तलावांच्या सहाय्याने उभी झालेली जैविक विविधता ही फक्त लोकांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच नाही, तर पाणी-व्यवस्थापनाच्या कामातही उपयुक्त असे. या सर्व काठावरील आणि पाण्यातील वनस्पतींची एक भूमिका असते, असे या भागातील स्थानिक लोकांचे निरीक्षण व अनुभव आहे. कमळ (पोवन) ज्या तलावात असेल, तेथे कमळाच्या सभोवती पाणी थंड असते व उन्हाळ्यात सर्व प्रकारचे मासे या पोवनच्या सभोवताल आढळून येतात. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे छोट्या मासोळ्यांना मोठ्या मासोळ्यांपासून संरक्षण देऊन त्यांच्यासाठी लपण (लपण्याची जागा) म्हणूनही पोवन फार महत्त्वाची ठरते. त्याच्या दाट जाळीत मोठ्या मासोळ्यांना प्रवेश करणे सहज शक्य होत नाही. याशिवाय खेड्या, वटवाघूळ अशा पक्ष्यांपासूनही हा पोवनचा तलावातील पसारा मासोळ्यांचे रक्षण करतो.
तलावाच्या पोटाकडच्या भागात पाणी संपते तेथून जमिनीच्या दिशेने पाहिले, तर पहिला पट्टा गादचा दिसतो. या पट्ट्याच्या नंतर परसूडचा पट्टा असतो, त्यानंतर उरसुडीचा पट्टा असतो आणि त्याच्या मागे तलावाचा येवा (जंगल किंवा शेत) असतो. येव्यातून तलावात येणारे पाणी सरळ तलावात शिरले तर त्याच्या बरोबर मोठ्या प्रमाणात गाळही येईल, पण ही वनस्पतींची चाळणी जर त्या तलावाच्या पोटात असेल, तर गाळाला तलावात येण्यापासून अटकाव होतो. सर्वांत उंच आणि मातीला घट्ट धरून ठेवण्याची उरसुडीच्या गवताची विशेषता आहे. पण ही जडाच्या स्वरूपात उगवणारी वनस्पती आहे, आणि त्यांच्या दोन जुडांमध्ये अंतरही असते.
या चाळणीतून सुटलेला गाळ परसूडच्या चाळणीत येतो. परसूड ही त्यामानाने दाटीने उगवणारी वनस्पती. तिच्या चाळणीतून गाळ सुटणे कठीण, पण मातीचे अगदी बारीक कण सुटलेच तर ते गादच्या चाळणीत जाऊन अटकतात. यामुळे मोठ्या प्रमाणात गाळाला तलावात शिरण्याच्या अगोदरच अटकाव होऊन त्याठिकाणी सुपीक गाळाची माती पाण्याच्या काठाने गोळा होते. ज्यावर पुढे कठाणाचा गाळपेरा होतो.
पूर्वी जेव्हा लोक खस काढायचे काम करीत तेव्हा उरसडीचा पट्टा पाण्याच्या साठ्याला समांतर अशा दोन ते तीन भागांमध्ये विभागत असत, आणि एका वर्षी एकपट्टा, तर दुसऱ्या वर्षी दुसरा पट्टा असे खस काढत असत. यामुळे उरसुडीची चाळणी त्याठिकाणी राहतच असे व नवीन उगवणारे जूड वाढत असताना नवी येणारी गाळाची माती बांधून ठेवण्याचे काम करीत असे.
उदाहरणादाखल हे दोन दाखले दिले. अशा कितीतरी वनस्पती आणि त्यांची पाणीव्यवस्थापनामधील भूमिका, यांच्या माहितीचा खजिना स्थानिक लोकांकडे आहे.
या माहितीमधील काही माहितीच्या आधारावर स्थानिक पातळीवरच्या महाविद्यालयांमधील काही वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापक मंडळींसोबत जेव्हा चर्चा केली तेव्हा असे दिसले की लोकांनी निरीक्षण आणि अनुभवांच्या आधारावर मिळवलेली माहिती ही शास्त्रीय माहितीशी सुसंगतच नाही, तर त्याच्या पुढे आहे. या माहितीचा आपल्या जगण्यासाठी वापर करायच्या पद्धतींपर्यंत लोकाचे ज्ञान पुढे गेले आहे.
नवे पर्व :
1951 मध्ये कायद्याने मालगजारी व जमीनदारी संपष्टात येऊन हे तलाव सरकारने ताब्यात घेतले याचे परिणाम असे —
* पाणी व्यवस्थापन : सिंचन-विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडे ताबा आल्यानंतर तलावांची सिंचनक्षमता वाढविण्याकरिता तलावांचे सांडवे उंच केले गेले. तलावांच्या पाळीवर माती टाकून ती मजबूत करण्याचे काम केले. तलावांचे तुडूम काढून त्याठिकाणी धातूची दारे लावली गेली. सिंचन-विभाग व जिल्हा परिषदेकडील तलावांच्या बाबतीत, ग्रामपंचायतींनी तालावापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे साधन म्हणून खस काढण्याचे ठेके कंत्राटदारांना देणे सुरू केले.
* मत्स्य उत्पादन : यानंतर पाण्यातील मासेमारीपासन मिळणारे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त उत्पन्न देणाऱ्या काही प्रजाती या भागात आणण्यात आल्या. सुरुवातीला या तलावांमध्ये जी अनेक वर्षांपासून तयार झालेली वनस्पतींची विविधता होती, त्या आधारे मासोळ्यांचे उत्पादन एकदम वाढलेले दिसले. जास्त उत्पन्न देणाऱ्या नव्या प्रजाती या शाकाहारी होत्या, व त्यांच्या वाढीसाठी आवश्यक नैसर्गिक खाद्यही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. या प्रजाती तीन स्तरांमध्ये वावरणाऱ्या होत्या, वरचा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचा स्तर, मधला स्तर आणि पाण्याच्या तळाजवळचा स्तर, यामुळे या प्रजातींची वाढीच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा नव्हती. या सर्व कारणांमुळे या नव्या प्रजातींपासून भरपूर उत्पन्न मिळत असलेले दिसले.
याऊलट, स्थानिक मासोळ्यांच्या प्रजाती या मांसाहारी किंवा दोन्ही प्रकारचे आहार घेणाऱ्या जाती होत्या. जास्त उत्पन्न देणाऱ्या मासोळ्यांच्या जातींचे बीज जेव्हा तलावात सोडण्यात येई, तेव्हा या स्थानिक मासोळ्या त्यांच्या नैसर्गिक शत्रू ठरू लागल्या. उत्पादन वाढवायचे असेल तर या शत्रूला संपवण्याची गरज वाटायला लागली. ही गरज मत्स्य विकास-विभागानेही अधोरेखित केली आणि लोकांना तसे सांगायलाही सुरुवात केली.
* वन व्यवस्थापन : तलावांप्रमाणेच जंगलही सरकारच्या ताब्यात गेले. जंगलाच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन वनविभागाने जंगलाचे मुक्त चराईपासून संरक्षण करण्यासाठी, आणि स्वतःची हद्द स्पष्ट करण्यासाठी खोल खंदकासारखे चर सरहद्दीवर खोदले.
* शेती उत्पादन : शेतीच्या माध्यमातून घेतले जाणारे उत्पादन वाढविण्याकरिता वेगवेगळ्या तंत्रांचा व पद्धतींचा अवलंब या काळात केला गेला. नव्या प्रकारची खते, कीटकनाशके यांच्या वापराला चालना देऊन पिकांचे नवे वाण विकसित केले गेले.
उत्पादन वाढविण्याची आणि नैसर्गिक संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याची जी लाट आली, तीमध्ये त्या संसाधनांचे संरक्षण, संवर्धन व विकास करण्याची जबाबदारी ज्या शासकीय विभागांकडे होती त्या प्रत्येक विभागाने आपला विभाग हा स्वयंपूर्ण व स्वतंत्र विभाग आहे, या पद्धतीनेच कामांची व कार्यक्रमांची आखणी केली.
सद्यस्थिती :
या सर्व उपायांचे फलित आज पाहिले तर काय चित्र दिसते? वन विभागाच्या खोदलेल्या चरांनी तलाव आणि त्याचा येवा यांचा संबंधच तोडून टाकला. जंगलातून तलावांमध्ये येणारे पाणी आपला रस्ता बदलून, तो चर घेऊन जाईल त्या दिशेने जाऊन कुठेतरी एखाद्या नाल्याला जाऊन मिळते. पाण्यासोबत जो पालापाचोळा वाहून तलावात यायचा व पाण्यामध्ये कुजून पाणवनस्पतींच्या वाढीला पोषक वातावरण तलावात निर्माण करायचा, तो पालापाचोळाही या चरांच्या माध्यमातून वेगळ्या दिशेने जाऊ लागला.
शेतीमध्ये वापरली गेलेली रासायनिक खते व कीटकनाशके पावसाच्या पाण्यासोबत वाहत येऊन पाण्यामध्ये साठायला लागली. परिणामी त्या पाण्यात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंच्या अस्तित्वावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले.
सांडव्यांची उंची वाढविताना जुने सलंग मोडीत काढून उभ्या भिंतींसारखे सांडवे तयार केले. विणीच्या काळात मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत येतात व अंडी घालतात, या बाबीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे जे मत्स्यबीज नैसर्गिकपणे उपलब्ध झाले असते ते न होता बीज-खरेदी व मत्स्य-उत्पादनाचा खर्च वाढलेला आहे.
जास्त उत्पादन देणाऱ्या मासोळ्यांच्या प्रजातींनी सुरुवातीला नैसर्गिक अन्न उपलब्ध असेपर्यंत उत्पन्न तर चांगले दिले, पण गेली तीस-चाळीस वर्षे सातत्याने उत्पादन घेण्यावरच लक्ष केंद्रित केल्यामुळे हळू-हळू या नव्या प्रजातींनी तलावांमधील सर्व वनस्पतींचा फडशा पाडला. जो मासा पूर्वी वर्षाला अर्धा-पाऊण किलोपर्यंत वाढायचा, त्याची वाढ आता शंभर ग्रॅम होणे कठीण असते. या वनस्पतींच्या नष्ट होण्यामुळे स्थानिक मासोळ्यांना घरटी करून अंडी घालण्यासाठी जो अधिवास लागतो, तोदेखील नष्ट झाल्यामुळे त्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली. अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पाण्यामध्ये वनस्पती असल्यामुळे पाण्याचे तापमानही कमी राखण्यास मदत होते. या वनस्पती नष्ट होण्यामुळे पाण्याचे तापमान वाढून बाष्पीभवनाची प्रक्रियाही वेग घेते. वनस्पतींच्या नष्ट होण्याने फक्त मासोळ्यांचाच नाही तर पाणपक्ष्यांचाही अधिवास आणि अन्न-उपलब्धता नष्ट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिवाळी पाणपक्षी स्थलांतर करून येणाऱ्या या भागातील पाणपक्ष्यांची संख्या कमी झाल्याचे हिवाळी पाणपक्षी गणनेच्या दरवर्षी होणाऱ्या नोंदीवरून दिसून येते.
एवढ्यावरच हे थांबले नाही तर मासोळ्यांच्या नव्या प्रजातीच्या बीजांबरोबर नको असलेल्या तिलापीया आणि कोई यांसारख्या प्रजातीही आल्या. या भागातील जलसाठ्यांमध्ये यांच्यावर नैसर्गिक नियंत्रण ठेवणारी कोणतीच प्रजाती नाही, आणि यांची संख्या सर्व गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यांच्यामुळे इतर आवश्यक अशा मासोळ्यांच्या प्रजातींच्या अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत. कोई मासोळीमुळे पाण्यातील धोंड्या जातीच्या सापांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होत असल्याचे दिसते आहे, ज्यामुळे शेतांमध्ये उंदरांचा प्रकोप वाढून पीक-उत्पादनावर परिणाम होतो, असे स्थानिक लोकांचे निरीक्षण आहे.
या नव्या प्रजातींच्या बीजाबरोबर महामारी क्षतरोगासारखा रोगही आला. एका मासोळीपासून दुसरीकडे हा संसर्गजन्य रोग पसरत जातो. शरीराच्या ज्या भागावर लाल चट्टा आला असेल तो भाग काही दिवसांनी सडन गळन जातो. जरी नव्या प्रजातीसोबत हा रोखा आला असला, तरी स्थानिक प्रजातींना या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. या रोगावरची उपाययोजना म्हणून जो चुना टाकण्याचा सल्ला दिला जातो, त्याची मात्रा एकरी दोन किंटल, व रोगाची तीव्रता जास्त असल्यास एकरी सहा क्विंटल. एवढा चुना त्या पाण्यात टाकल्यानंतर तेथे गवताचे पातेही शिल्लक राहणार नाही. सर्व काही जळून जाईल. त्यानंतर पुन्हा त्या तलावात अन्न उपलब्ध नसल्यामुळे मासे उत्पादन होणारच नाही.
पूर्व विदर्भात मोठ्या संख्येने पारंपरिक तलाव अस्तित्वात असल्यामुळे, परंपरेने मासेमारीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. मासेमारीच्या प्रांतात झालेल्या बदलांचे परिणाम कमी होते म्हणून की काय, तलावांच्या पोटात अतिक्रमणांची संख्या वाढून तलावाचे क्षेत्र कागदोपत्री जास्त, मात्र प्रत्यक्षात फारच कमी असल्याची उदाहरणे गावोगावी आढळून येतात.
या सर्व स्थितीचा विचार करता, स्थानिक लोकांनी आता राजकीय नेते व सरकारी व्यवस्था यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही, असेच दिसते.. तेव्हा आपल्या गावाची पाण्याची व्यवस्था आपणच हाती घेण्याची गरज आहे. तलावाच्या व्यवस्थापनाच्या कामांमध्ये आपण जर कुणावर विसंबून राहणार असू, तर ज्यांच्यावर अवलंबून राहू त्यांची त्या कामामागील गरज, दृष्टिकोन आणि आपली या व्यवस्थेकडे पाहण्याची दृष्टी, ह्या जुळतीलच असे नाही. तेव्हा पुढाकार आपण घेऊन एक दिशा ठरविण्याची व एक स्वप्न बघण्याची गरज आहे. हे एकदा ठरले की आपल्याच शासनातील वेगवेगळ्या विभागांची, आपल्या राजकीय व्यवस्थेची आपल्या गावात, आपल्या तलावांच्या व्यवस्थेत काय भूमिका असेल; ती कशी पार पाडून घेता येईल; याचा विचार करता येईल. कारण सरकार, प्रशासन व राजकीय व्यवस्था हेदेखील आपल्या समाजाचा भाग आहेत.
या पार्श्वभूमीवर तलावांच्या आधाराने उपजीविका असणाऱ्या लोकांची उपजीविका आणि एकूणच या भागातील तलावांची व्यवस्था टिकवून सर्वांनी मिळून पुढील बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे –
• लोकांकडे वनस्पतींच्या व तलावांतील मासोळ्यांसोबतच इतर जैविक घटकांच्या सह-संबंधांविषयी असणाऱ्या ज्ञानाला, तसेच तलावांच्या व्यवस्थेविषयी असणाऱ्या पारंपरिक ज्ञानाला, आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन पाण्याच्या या व्यवस्थेच्या संवर्धनाकरिता त्याचा वापर करण्यात यावा.
• मासोळीवरील महामारी क्षतरोगावर स्थानिक लोकांद्वारे केल्या जाणाऱ्या उपायांच्या बाबतीत शास्त्रीय संशोधन करून पाण्यातील जैव-विविधतेला पूरक अशी रोगनियंत्रणाची पद्धत वापरली जावी.
•स्थानिक मासोळ्यांच्या प्रजातींना संरक्षण देऊन त्यांचे उत्पादन वाढविण्यात यावे, कारण नव्या प्रजातीपेक्षा या मासोळ्याना मागणी जास्त आहे, आणि त्यांची किंमतही नव्या मासोळीच्या जातीपेक्षा दुप्पट ते तिप्पट आहे. प्रथिने व इतरही पोषक आहार म्हणून
या स्थानिक मासोळ्यांमधील अन्नघटकांचा शोध घेण्यात यावा.
• तलावांच्या क्षेत्रांतील सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या वापराबाबत जैव-विविधता- . व्यवस्थापनाचा दृष्टिकोन ठेवावा,
• आर्थिक उपयोगाकरिता वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या शास्त्रीय संकलन, प्रक्रिया व विक्रीचे अधिकार मासेमार सहकार संस्थेलाच देण्यात यावे,
• ज्या तलावांमधून पाणवनस्पती नामशेष झाल्या आहेत. त्या पाणवनस्पतींची लागवड करण्याकरिता प्राधान्याने निवड करावी, व टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम सर्व तलावांमध्ये राबविण्यात यावा. हे काम करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (मग्रारोहयो) उपयोग करावा.
• मग्रारोहयो कायद्याप्रमाणे 80% कामे ही जलसंधारणाची असावी अशी तरतूद आहे. तलाव खोलीकरण, व नवे तलाव तयार करणे, यापलीकडे फारशी जलसंधारणाची कामे होताना दिसत नहीत. मग्रारोहयोच्या आजच्या दर-पत्रकांत पाणवनस्पतींची लागवड करण्याच्या कामाचा मोबदला देण्यासंबंधीची काहीच तरतूद नाही. अशी तरतूद दरपत्रकांत करण्याकरिता आवश्यक असे प्रायोगिक तत्त्वावरील काम करून त्याचा दर ठरविण्यात यावा व त्याचा अंतर्भाव मग्रारोहयोच्या दरपत्रकात करण्यात यावा.
• तलावांचे खोलीकरण करताना मातीचा वरचा थर, ज्यामध्ये पाणवनस्पतींची बीजे असतात, ती माती तलावाच्या पाळीवर नेऊन टाकण्यात येते. त्यामुळे खोलीकरण करताना वरचा सहा इंचाचा थर काढून वेगळा ठेवला जावा, व खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर हा थर माती काढलेल्या भागात पसरविण्यात यावा.
• तलावाच्या पोटातील अतिक्रमणाचे क्षेत्र तलावाच्या लीज-रकमेसाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या क्षेत्रातून कमी न करता, अतिक्रमण काढण्यात यावे.
• अतिक्रमण केलेले शेतकरी त्यांची जमीन पाण्याखाली जाऊ नये म्हणून बरेचदा तलावाचा सांडवा फोडतात, किंवा खोल करतात. या संबंधात मासेमार सहकारी संस्थेने केलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
• तलावाच्या पोटात पाळीला समांतर असा गोलाकार बांध घातल्यास पाणवनस्पती-वाढ व मत्स्य-उत्पादनास फायदेशीर तर ठरेलच, शिवाय अतिक्रमणावरही निबंध येईल.
• तलावांचे पाट दुरुस्तीचे काम व पाटावरील अतिक्रमण काढण्याचे कामही प्राधान्याने केले जावे, कारण पाट नादुरुस्त असल्यामुळे अथवा त्यांच्यावर अतिक्रमण झाल्यामुळे ज्यांना निस्ताराचे पाणी लागू आहे असे जवळचे लोक तलावावर इंजन लावतात, व जबरदस्तीने आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरतात, दूर अंतरावर जमीन असणाऱ्या लोकांना तर पाणीच मिळत नाही. कागदोपत्री त्यांची ओलिताची शेती असते, परंतु प्रत्यक्षात कोरडवाहू.
• तलावांत ठेवावयाच्या किमान पाणीसाठ्याबाबतचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणा व तलावाचे पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावेत, व त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
• तलावांच्या व्यवस्थेवर ज्या शासकीय विभागांच्या कामांचा परिणाम होतो त्या प्रत्येकाने स्वतःचे कार्यक्रम व योजना स्वतंत्रपणे न ठरविता एकमेकांच्या समन्वयाने त्यांची आखणी करावी, जेणेकरून सर्वंकष असा तलावांच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार होईल व लोकांनी उभारलेली आणि एवढी वर्षे टिकवलेली ही व्यवस्था भविष्यातील पिढ्यांसाठीही सुरक्षित राहू शकेल.
मनिष राजनकर (भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ),
द्वारा श्री. एस.पी. कोल्हेकर, सिव्हील लाईन्स, नवेगाव बांध, ता. अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया.
ई-मेल : manishrajankar@gmail.com फोन : 9423118307

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.