ग्रामीण संस्कृती

‘संस्कृती’ हा मोठा सर्वसमावेशक शब्द आहे! त्यात काय काय अंतर्भूत होते हे एखाद्या व्याख्येत बसविणे कठीण! तरीपण हा शब्द सर्रास वापरला जातो व बहतेक ठिकाणी त्याचा उपयोग योग्य त-हेनेच झालेला असतो. एका मताप्रमाणे या शब्दाचे अनेक अर्थ संभवतात व संदर्भाने त्याचा अर्थ लावला जातो! साधारणपणे संस्कृती म्हणजे ‘कोणत्या प्रसंगी कोणा व्यक्तीने कसे वागावे, बोलावे विचार करावा या बाबतीत असलेले संकेत’ अशीही या शब्दाची व्याख्या होऊ शकेल! आता ग्रामीण संस्कृती अथवा ग्रामीण सांस्कृतिक जीवन यात अनेक भाग येऊ शकतात, धार्मिक, शैक्षणिक, श्रमिक, संगीतविषयक खेळविषयक, शेती-विज्ञानविषयक, राजकारणाविषयक इत्यादी. ह्या आणि इतर अनेक विषयांची मिळून ग्रामीण संस्कृती तयार होते. पूर्वीच्या व आताच्या ग्रामीण सांस्कृतिक जीवनातला फरक जाणून घ्यायचा असला तर प्रथम आपल्याला पूर्वीच्या ग्रामीण संस्कृतीविषयी जाणून घेतले पाहिजे.
आपल्याला कायम कुतूहल असते की पूर्वीचा समाज कसा होता? आपल्याला शिवकालीन किल्ले, लढाया, राजघराण्यांतील कलह, सैन्याची रचना यांविषयी माहिती असते. पण त्याकाली समाजरचना कशी होती? एखाद्या सामान्य मावळा असलेल्या व्यक्तीचे जीवन कसे होते? ती व्यक्ती वर्षभर सैन्यातच असे का? त्याचे ‘पोस्टिंग’ कसकसे होत असे? अथवा ती व्यक्ती लढाईच्या वेळेस फक्त सैन्यात जायची, इतर वेळी आपला व्यवसाय, शेती वगैरे करायची? त्यांना मेहनताना कशा प्रकाराने मिळायचा? फक्त काम केलेल्या, म्हणजे लढाईवर गेलेल्या दिवसांचा, की वर्षभराचा?
सामान्य मावळ्यांसाठी विरंगुळ्याची साधने काय होती? चैन करण्याचा प्रकार काय होता? रोजच्या जीवनात धर्माचे स्थान काय होते’. देव-देव किती प्रमाणात असायचा? हेवेदावे भाऊबंदकीतच असायचे, की जातीवर, धर्मावर आधारितपण असायचे? प्रत्येकाला कायदेशीररीत्या आपापली संपत्ती वाढविण्याचा अधिकार होता का? संपत्ती वाढविण्याची संकल्पना होती का? कुमारवयातल्यांच्या शिक्षणाची पद्धत व स्वरूप काय होते? सगळीच मुले शिकत असत का? काय शिकत? हा समूह समाज म्हणून कधी एकसंध होता का? केव्हापासून?
साधारण दोन-अडीच हजार वर्षांचा विचार केला तर लक्षात येईल की हा समाज फारच थोडा काळ स्वतंत्र होता. आधी मुस्लिम राजवटी, नंतर ब्रिटिश, इत्यादी. दोन बादशहांमध्ये किंवा सल्तनतींमध्ये कुठेतरी लढाई व्हायची. तमुक राज्य किंवा अमुक प्रदेश त्याचेकडून जायचा. तिथल्या प्रजेचा काही संबंधच नाही. फक्त राजवट बदलायची बाकी सर्व तेच. ‘हे आपले गाव आहे, हा प्रदेश आपला आहे, हे कोण दोघे त्याच्यासाठी युद्ध करणार? आपण सर्वांनी मिळून काहीतरी केले पाहिजे’, अशी भावनाच नव्हती. ती नंतर शिवाजी महाराजांच्या काळात प्रथम आली असावी. म्हणून तर शिवाजीराजांना अद्वितीय मानायचे! ज्याच्या वडिलांनी, नातेवाईकांनी आयुष्यभर मुसलमानांची सरदारकी केली; त्यात मिळणाऱ्या मान-सन्मानांवर समाधान मानले; अशा एका छोट्या जहागिरीतल्या तरुण मुलाला; आपण स्वतः राजा व्हावे असे वाटले. त्याने त्यासाठी युद्धातले नैपुण्य, लोकसंग्रह, बुद्धिचातुर्य इत्यादी गुणांची जोपासना केली हे शिवाजी राजांचे मुख्य वैशिष्ट्य. असे सुचणे हेच किती अलौकिक आहे! व त्याहीपेक्षा ते साध्य करणे!
तेव्हा आपला हा समाज कित्येक शतके पारतंत्र्यात, पराभूत मनोवृत्तीनेच राहत होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास मात्र समाज जागा होऊ लागला व कला, क्रीडा इत्यादी विषयांत प्रगती सुरू झाली. तरी पण सुरुवातीच्या 40-50 वर्षांत ती नागरी वस्त्यांतील समूहांपुरतीच होती. नंतर ती खाली झिरपून लहान गावात अथवा खेड्यापर्यंत, पोहोचायला सुरुवात झाली, पण तेही कमीच. उदा. — नृत्य हा प्रकार सर्वसामान्य जनतेने निषिद्ध मानला होता. काही ठराविक जातीच ते करत असत. त्याचबरोबर विविध वाद्ये वाजविणे. गाण्यांत भजने, भारुडे, देवीची गाणी मात्र सर्वसामान्य लोक म्हणत असत. नंतर शिक्षणाचा प्रसार झाल्यावर शाळांमधून म्हटली जाणारी देशभक्तिपर गीते, काही कविता गायल्या जाऊ लागल्या. चित्रकलेचाही फारसा प्रसार नव्हता. शिल्पकला कुंभार जमातीपुरतीच होती, गणपती, देवी, लक्ष्मी यांच्या मूर्ती करणे, मातीची भांडी करणे इत्यादी. दगडाची मूर्ती घडविणे या इकडच्या काळ्या पाषाणात फार अवघड! त्यामुळे दगड हे मोठ्या वाड्यांचे फास्टी-कोपरे, विहिरींच्या पायऱ्या यांपुरतेच मर्यादित राहिले. मोठी देवळे, भव्य ओवऱ्या, सभामंडप, कळस इत्यादी गोष्टी परप्रांतातील कारागीर येऊनच करत असावेत.
देवीची गाणी हा एक स्वतंत्र प्रकार आहे. त्याला आराध्याची गाणी असेही म्हणतात. ही गाणी फार सुरचित वगैरे नसतात. शब्दाला शब्द लावून केलेली व जमल्यास यमक साधलेली अशी ही रचना असते. त्याची चाल म्हणजे असलेल्या वाद्यवृंदाला त्यांच्या मेळातून जमणारी अशी असते. झांज, दिमडी, हलगी इत्यादी वाद्यांच्या एका लयीत वाजवून तयार होते ती. शब्द हे बहुतेक इतर आरत्यांप्रमाणे देवीची, देवीच्या स्थानाची स्तुती करणारे असतात. प्रत्येक गावात नवरात्रात म्हणजे दसऱ्याच्या आधीचे दहा दिवस ही गाणी म्हटली जातात. एक ठराविक गट देवीसमोर बसून गाणी म्हणतो. त्यांना आराधी म्हणतात. त्यांत सर्व जातिजमातीचे लोक असतात. ते आठ दिवस उपवास करतात. दुपारी गावातून फेरी काढतात. भाविक त्यांना उपवासाच्या पदार्थाची भिक्षा घालतात. कोणी सावकार अथवा सधन माणूस त्यांना पूर्ण उपवासाचे पदार्थ करून फराळ वाढतो. ही मंडळी नवमीला हा उपवास सोडतात. काही भागात अष्टमीला देवीच्या मिरवणुका काढतात. ‘छबिना’ हा एक देवीच्या भक्तांचा संप्रदायच असतो. शिवाय जेथून तुळजापूरसारखी देवीची स्थाने जवळ आहेत, (60-70 कि.मी.च्या आत) तेथे दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला भाविक आपल्या गावातून तुळजापूरला चालत जातात.
हल्लीच्या दहा वर्षांत एक नवीन प्रथा सुरू झालेली दिसते. प्रत्येक खेड्यात एक तरी सार्वजनिक नवरात्र-मंडळ असते. ही मंडळी नवरात्र स्थापनेच्या अथवा आदल्या दिवशी तुळजापूरला जातात. तेथल्या देवीच्या देवळातल्या होमातील अग्नीने मशाल पेटवून ती, वाहनात न बसता पळत, पळत आपल्या गावापर्यंत आणून गावातील देवीची स्थापना झालेल्या मंडपातील मशाल पेटवितात. देवीच्या देवळापासून आपल्या गावापर्यंतचे अंतर कार्यकर्ते आळीपाळीने पळत असतात.
गावाकडच्या लोकांना आणखी एका संदर्भात गाण्याचा संबंध येतो. तो म्हणजे सुगीत! कामे फार असतात. गावचा शब्द म्हणजे ‘ओव्हरलोड’! सुगीत सर्वांत कष्टाचे काम म्हणजे (व वेळ खाणारे) ज्वारी गहू यांचे काढणीचे. त्यामुळे शेतकरी जेव्हा शक्य आहे तेव्हा रात्रीसुद्धा हे काम करू पाहतात. शुक्लपक्ष असला व चांदण्याचे दिवस असले म्हणजे ज्वारी काढणारे लोक तीनचार तास तरी काम करतात, व त्या वेळी गाणी म्हणतात. ही गाणी फार अर्थपूर्ण नसतात! एक सूर पकडायचा, मधेच त्यात बैलांची नावे घालायची. जसे इतिहासात टप्पे असतात तशा टप्प्याच्या भाषेत बोलायचे. तर 1972 च्या आधी. 1972 साली आमच्या पिढीला माहिती असलेला व जाणवलेला मोठा दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ सरकारी कारभाराच्या दृष्टीने पडलेला अकस्मात दुष्काळ होता. सरकारची काहीच तयारी नव्हती. त्यामुळे अधिकारी गडबडून गेले होते. दुष्काळ म्हणजे काय असते? आपल्याला काय काय करावे लागते? लोकांच्या अपेक्षा काय असतात? याची काहीच माहिती नव्हती. आता 2011 सालच्या मे महिन्यातली परिस्थिती अशी आहे की सरकारने दुष्काळी कामासाठी मंजूर केलेले पैसे खर्च होईनात त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच तहसील कार्यालयांमधील काही अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. आता दुष्काळी परिस्थिती नसताना सरकारी कामाच्या दुप्पट मजुरी जर शेतकरी देत असतील, तर दुष्काळी कामावर येणार कोण?’ असो तर आपण 1972 च्या दुष्काळी टप्प्याबद्दल बोलत होतो. 1972 मध्ये खेड्यातली मानसिकताच बदलली. चांगल्या चांगल्या घरातल्या पुरुष-बायांना दुष्काळी कामावर जावे लागले. खडी फोडावी लागली, हजेरी लावण्यासाठी मुकादमाची हांजी हांजी करावी लागली. कित्येक मुकादमांनी घरे बांधली, गाड्या घेतल्या.
कामावर जाणाऱ्या मजुरांना कामावर जाऊन दिवसात एवढे काम करावे लागते, तर रोजगार एवढा पडतो. अशा शिवाय आणखीही काही गोष्टी समजल्या. मुकादम, इंजिनीअर यांची मर्जी राखणे आवश्यक आहे. ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे असे निरीक्षण आहे की तेव्हापासून मजूरवर्गात आपण पैसे घेतो, आपण काम केले पाहिजे, हा विचार राहिलाच नाही. मुकादमांची दिशाभूल केली म्हणजे झाले! त्यामुळे शेतीतील श्रमसंस्कृती फार बिघडून गेली. काम न करता किंवा अगदी कमी काम करून भरपूर रोजगार कसा पाडावा (मिळवावा), याची काही तंत्रे निर्माण झाली, व ती खेड्यातील लोकांनी चांगलीच आत्मसात केली! गँग, गँगर, वगैरे अनेक शब्द नव्याने प्रचलित झाले.
त्यावेळेस एका एका रोड कारकुनाला 5-8 हजार लोकांना कामावर लावावे लागे. त्यांच्या हजेऱ्या भरायच्या, हिशेब करायचे, आठवड्याच्या आठवड्याला पगार करायचा. सर्वांचे हिस्से बरोबर हिशेबाने पोचते करायचे! फार काम असायचे. पगार रोजाच्या हिशोबाने करायचा पण एकूण काम घन-फूट मोजायचे, व त्याचा रेट सँक्शन रेटप्रमाणे द्यायचा! असा बराच द्राविडी प्राणायाम होता! कधी कधी यातून गंभीर परिस्थिती तयार व्हायची. आताची गोष्ट समजण्यासाठी वाचकांना हे मापे, घेणे हजेऱ्या भरणे वगैरे प्रकरण थोडेसे समजून घ्यावे लागेल.
दुष्काळी काम म्हणजे माळावर खडी फोडणे अथवा माळावरच्या घळीत पाझर तलाव टाकणे, इत्यादी. आधीच दुष्काळ, रणरणते उन, माळावर काटेरी झाडांची सावली नाही. फक्त लहान मुलांसाठी तट्ट्याचे छप्पर असलेली सावली. त्याच्या चारी बाजू मोकळ्या व आत एक पत्र्याचे बॅरल पाण्यासाठी. एखादी म्हातारी तेथे मुलांच्या जवळ बसलेली. ब्रिटिश फॅमीन कोडप्रमाणे सर्व कामकाज. ब्रिटिशांनी त्यांच्या नेहमीच्या काटेकोर व अभ्यासू पद्धतीने याच्या पूर्वीच्या दुष्काळात तयार केलेले 50-75 वर्षांपूर्वीचे नियम! फक्त तेच उपलब्ध असल्याने त्यांचेप्रमाणेच कामकाज चाललेले. इतक्या मजूर बायांना इतक्या आकाराच्या इतक्या शेड वगैरे. खूप लोक कामावर असल्याने त्यांची दोन वेळा हजेरी घेणे म्हणजे मोठाच व्याप होता. त्यामुळे कारकुनाने मजुरांचे गट तयार केले होते. गँग व त्याचा प्रमुख गँगर! त्यांच्या मदतीने हा सर्व कारभार चालायचा. दुष्काळामुळे तयार झालेला एक नवीन अधिकारी! प्रत्येक खेड्यात या मजुराची हजेरी घेतली जायची, व अमक्याने आठवड्यात दिवस वगैरे रेकॉर्ड तयार केले जायचे. पण हे सर्वजण किती काम करतात हे घनफुटावर मोजले जायचे व त्याला शासकीय दराने त्या गँगला पैसे मिळायचे. समजा एका गँगमध्ये 10 मजूर आहेत. तर सहा दिवसांत त्यांचे 60 मजूर दिवस झाले. त्यांनी 6 दिवसांत 400 घ.फू. कामे केले, व सरकारी दर 100 घ.फू.ला 200 रु. आहे. तर कामाचे मूल्य रु.600 झाले व 60 मजूर दिवस म्हणून एका दिवसाचा पगार (रोजगार) रु.13.33 असा झाला. आता प्रत्यक्षात अनेक मस्टर रोल असायचे. कारकुनाच्या हाताखालचे मुकादम त्या खेड्यातलेच थोडेसे शिकलेले मजूरच असत. ते कारकुनाने शिकवल्याप्रमाणे मस्टर तयार करत. व कारकुनाकडे सोपवत. कारकून त्यावरून त्याचा मस्टर तयार करत असे व ओव्हरसिअरकडे गठ्ठा सह्यांसाठी पाठवीत असे. नंतर सह्या होऊन तो गठ्ठा तसाच पुढे पुढे जाऊन डेप्युटी इंजिनीयरांच्या टेबलावर पडायचा. मग नेहमीप्रमाणे वेळ कमी. पगार करायच्या मस्टरवर साहेब लोकांच्या सह्या घेऊन चेकिंग होऊन मस्टर पास होऊन चेक निघायचा व त्याचे पैसे स्टेट बँकेतून आणून पगार व्हायचा. पगार तर वेळेवर व्हायला पाहिजे! असे प्रेशर असायचे. त्यामुळे प्रत्यक्ष काम करणारी मंडळी शॉर्टकट काढायच्या प्रयत्नात!
समजा कारकुनाने कामावर असलेल्या एकूण मजुरांचे चार प्रमुख विभाग पाडले आहेत. त्यातल्या एका विभागात 2000 मजूर आहेत. त्यांचे एकूण 20 मस्टर आहेत. एका मस्टरमध्ये साधारण 100 मजूर, त्यांनी एकूण मजुरी देणे 20 x 100 x 6 x 15 = रु.1,80,000. तितके रुपये एकूण 20 मस्टर मध्ये झाले पाहिजेत. त्यावरून कारकून प्रत्येक मस्टरवर पेन्सिलीने हा मस्टर किती रुपयांचा झाला पाहिजे ती रक्कम लिहितो. मग मुकादम गडबडीत एकूण मॅन डेज पाहतो व शेवटची बेरीज भागिले एकूण मॅनडेज असा भागाकार करून प्रत्येक दिवसाचा एका मजुराचा पगार काढतो. तो गडबडीत रु.150/ दर दिवशी प्रत्येक माणशी असा निघतो. तो मस्टरवर लिहिला जातो. चेकिंग, पुन्हा चेकिंगमध्ये सर्व बरोबर येते! येणारच. यात अंकगणिताची काही चूक नसते. ते मस्टर फायनल करतो. सर्व लिखापढी होऊन मस्टर गठ्यात गेला. नंतर प्रोसीजरप्रमाणे वरच्या अधिकाऱ्यांनी अकौंटंटनी सह्या केल्या व गठ्ठा डेप्युटी साहेबांच्या सह्याला ठेवला गेला. तेतेही सर्व सह्या शिक्के झाले व पगार निघाला, वाटला गेला. नंतर पूर्ण वाटप झालेल्या मस्टरांचा गठ्ठा डिव्हिजनला चेकिंगला गेला! स्वैर चेकिंग पद्धतीमध्ये नेमके हेच मस्टर चेकिंगला आले, चेकिंग झाले. एवडा रेट! रिपोर्ट झाला. विशेष बाब म्हणून क्वालिटी कंट्रोलच्या लोकांकडून शेवटी अँटिकरप्शनकडे प्रकरण गेले! व शेवटी एक-दीड वर्षाने मस्टर पास झाले होते, त्या सब-डिव्हिजनला चौकशीला आले. तेव्हा डेप्युटी इंजिनीयर साहेबांना व सर्वांना कळाले काय घोटाळा झाला होता.
आता साहेब निवत्त होण्याच्या बेतात होते. अनभवी होते. ओळखी-पाळखी खप होत्या. त्यांनी पूर्वी अशी अनेक प्रकरणे मोठ्या रकमांची केली असतील. ती निरनिराळी असतील, व निस्तरलीही असतील. पण हे अत्यंत छोट्या रकमेचे प्रकरण मात्र सर्व बाजूंनी बांधलेले होते. कोठे सरकायला वाव नव्हता. आता दुरुस्तीच्या पलिकडे गेले होते. त्यांनी खूप प्रयत्न करून पाहिला पण व्यर्थ! साहेब, एक ओव्हरसिअर व एक कारकून सस्पेंड झाले! पुढे ती केस बरीच वर्षे कोर्टात चालली, रेंगाळली व हे सर्व अधिकारी शेवटी डिसमिस झाले.
आपल्या सिस्टिममध्ये सामान्य लोकांची कोणतीही एमर्जन्सी असो, ती काही अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची व कार्यकर्त्यांची कमविण्याची जणू संधीच असते. भीषण दुष्काळ असो, अतिवृष्टी असो, क्वचितच अनुभवाला येणारी भूकंपासारखी आपत्ती असो.
आता भूकंप काही नेहमी होणारी गोष्ट नाही, निदान आपल्याकडे तरी. पण भूकंप होतात. मदतीचा ओघ सुरू होताच, संधी शोधणाऱ्यांची फार कमी वेळात मोडस् ऑपरेंडी ठरते. त्याप्रमाणे साखळी तयार होते. व परदेशातून उघड्यावर पडलेल्या भूकंपग्रस्तांसाठी आलेली परदेशी ब्लँकेट्स 2-3 दिवसांत बाजारात येतात. इंपोर्टेड ब्लँकेट्स खपविणे सोपे! असो.
आपले खूप विषयांतर झाले! आपला विषय होता ‘ग्रामीण संस्कृती’. आपल्याला दुर्दैवाने ग्रामीण जनतेची मानसिकता फार बदललेली दिसते. आपल्यावर कोणी देखरेख करत नसेल तर चोरी करणे किंवा काम न करणे हा आपला हक्क आहे; असे काम करणाऱ्या मंडळींना वाटते. किंवा सार्वजनिक मालमत्ता किंवा पैसे ही अपहार करण्याची वस्तू आहे; असा समज होऊ पहात आहे. पूर्वीच्या काळात जसे ‘सत्यमेव जयते’ हे सुभाषित सर्वत्र असायचे तसे ‘राखेल तो चाखणारच’ हे सुभाषित सध्या त्याची जागा घेणार की काय असे वाटते. ही अॅटिट्यूडसुद्धा ग्रामीण संस्कृतीचाच एक भाग आहे.
द्वारा प्रा. बी.टी.जाधव, प्लॉट नं.38, कर्मवीर हा.सोसा., अलिपूर रोड, बार्शी.
बृहत्कथेची गरज
माणसांना एक बृहत्कथा (epic) आवश्यक असते; हे विश्व कसे अस्तित्वात आले आणि मनुष्यप्राणी त्यात कसा समाविष्ट झाला याबाबतचे एक तरल महाकाव्य म्हणा. धार्मिक बृहत्कथा एक वेगळी मूलभूत गरज पुरी करतात; आपण स्वतःपेक्षा मोठ्या कशाचा तरी भाग आहोत, हे दाखविण्याची. आपल्याला हवी असलेली बृहत्कथा रचताना माणसांची आध्यात्मिक विश्वभावना भंगली जायला नको, तर तिचे एकीकरण व्हायला हवे. यासाठी ती कथा अनुभवाधारित ज्ञानाच्या सर्वोत्कृष्ट रूपातून घडवली जायला हवी, आणि ते ज्ञान विज्ञान आणि इतिहासातूनच आलेले हवे.
– ई. ओ. विल्सन

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.