पॉपरचा खंडनक्षमता हा निकष

‘विवेक व विज्ञान’ ‘श्रद्धा व अध्यात्म’ हा वाद अनेक शतकांपूर्वी चालू झाला व अजूनही चालू आहे. या प्रक्रियेमध्ये पाश्चात्त्य-भारतीय हा फरक स्पष्ट दिसतो. युरोप अमेरिकेतील वादांत लोक केवळ पुरातन तत्त्वज्ञानावर विसंबून राहत नाहीत. दोन्ही पक्षाचे लोक विरुद्ध पक्षातील आजच्या नवीन विचारांचा संदर्भ लक्षात घेऊन वाद-प्रतिवाद करतात. भारतात ही स्थिती नाही. उदाहरणार्थ, श्रद्धा-धर्म-अध्यात्म मानणारे लोक विवेकी साहित्य वाचत नाहीत. एवढेच नव्हे तर अशा साहित्यात नवनवीन विचारांची भर पडत आहे, हेही त्यांना माहीत नसते, व माहीत करून घ्यायचे नसते. गेल्या सहासात दशकांत नव्याने आलेल्या तत्त्वांची संक्षिप्त माहिती सोप्या शब्दांत देण्याकरिता हा लेख लिहीत आहे. इहवादी (secular), विवेकी वाचकांनासुद्धा ही माहिती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
विज्ञानासारख्या इतर विवेकी प्रणाली असल्या तरी साधारण जन ‘विज्ञान’ या शब्दाशीनिदान परिचित असतात. (या शब्दाचा व त्याच्या पार्श्वभूमीचा सुयोग्य अर्थ त्यांना कळला आहे का हा प्रश्न वेगळा!) म्हणून या लेखात ‘विज्ञान’ हेच उदाहरण घेतले आहे.
गेल्या शतकातील एक प्रमुख सर्जनशील तत्त्वचिंतक म्हणजे कार्ल रेमण्ड पॉपर. त्याचे द लॉजिक ऑफ साएन्टिफिक डिस्कव्हरी हे पुस्तक अनेक दृष्टींनी प्रमाण मानले जाते, विशेषतः विज्ञान कशाला म्हणावे?’ या प्रश्नाच्या उत्तराकरिता. वेदांना, भगवद्गीतेला, अध्यात्माला, आजच्या आयुर्वेदाला, होमिओपॅथीला, मनगटात तांब्याचे कडे घालण्याला, खिशात लोहचुंबक ठेवण्याला, विपश्यनेला, रेइकीला, … वाटेल त्या प्रणालीला विज्ञान’ संबोधणे समर्थनीय आहे का, याचा विचार न करता काही तथाकथित विचारवंत तसे दावे करतात. वास्तविक विज्ञान कशाला म्हणावे (विज्ञान म्हणजे काय?) याचे निकष आधुनिक विज्ञानाच्या पाचसहाशे वर्षांच्या कार्यपद्धतीतून निर्माण झाले.
विज्ञानाची पद्धत ‘विवेक’ अशीच आहे. विज्ञानात श्रद्धा व श्रद्धेमध्ये विज्ञान बसत नाही. “बसतात” असे म्हणणाऱ्या व्यक्तींची वचने सवंग लोकप्रियतेकरिता, अनभ्यस्ततेमुळे किंवा अपसमजामुळे केलेली असतात, मग त्या व्यक्ती अध्यात्मवादी असोत, वेदशास्त्रसंपन्न असोत, नेतेमंडळी असोत, संतसाहित्य अभ्यासक मंडळी असोत, ‘विचारवंत’ असोत व्यावसायिक वैज्ञानिक असोत, वा संगणक तज्ज्ञ असोत. विचारप्रणालींना विवेकी वा
वैज्ञानिक संबोधण्यासाठी निकष असणे व ते माहीत असणे महत्त्वाचे आहे. कोणीही उठावे आणि स्वतःच्या प्रणालीला ‘विज्ञान’ संबोधावे हे तर्कदुष्ट व सामान्य जनतेची दिशाभूल करणारे आहे. विज्ञानाची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतात. ती नसतील तर त्या संकल्पनेला, विचाराला, सिद्धान्ताला, प्रणालीला ‘विज्ञान’ म्हणणे चूक आहे.
(1) इहवाद : विज्ञान इहवादी आहे. ‘इह’ म्हणजे ‘आपण आहो त्या जगात, आताच्या काली’, ‘वाद’ म्हणजे ‘विचारप्रणाली’ (शब्दशः ‘वाद’ म्हणजे ‘अमक्या गोष्टीविषयी बोलणे’), ‘भांडण’ नव्हे. आपले जग आपण केवळ पंचेंद्रियांनी जाणू शकतो. त्याव्यतिरिक्त ‘अंतर्ज्ञान’ आपल्याला नसते व आपण मिळवू शकत नाही, इहलोकाव्यतिरिक्त (म्हणजे आपल्याला जाणवणाऱ्या आधिभौतिक जगाव्यतिरिक्त)अन्य लोक (उदाहरणार्थ, परलोक, स्वर्ग, नरक, पाताळ, रसातळ) अस्तित्वात नाहीत, आपल्या जीवनाचे नियंत्रण आपणच करतो, मृत्यूनंतर आपण अस्तित्वात नसतो, आपले विचार स्पष्टपणे आपल्या निसर्ग अवलोकनावरच आधारले पाहिजेत, इत्यादी प्रतिपादन करणारी प्रणाली म्हणजे इहवाद. विज्ञान प्रायोगिक अवलोकन करते ते आधिभौतिक वास्तवतेवर, म्हणजे आपल्याला इंद्रियांनी किंवा साधन-उपकरणांच्या साहाय्याने जाणविणाऱ्या वस्तूंवर.
(2) बुद्धिप्रामाण्य : विज्ञानाला व्यक्तिप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य मान्य नाही, भूतपूर्व विचार व कार्य काय होते हे विदित होण्यासाठी व त्यांची आलोचना करण्यासाठी पूर्वीच्या कार्यांचे संदर्भ देणे, एवढाच त्या ज्ञानभांडाराचा उपयोग. पूर्वीच्या वैज्ञानिकाचे किंवा पूर्वीच्या ग्रंथांतील विचार व तत्त्वे आता व भविष्यात तशीच राहतील, असे विज्ञान मानत नाही. प्रतिपादन अवलोकनक्षम असेल व बुद्धीला पटत असेल तरच ते मानायचे हे विज्ञानाचे तत्त्व आहे.
(3) ज्ञात-अज्ञाताच्या सीमांचा विस्तार : म्हणजे असे, की निसर्गातील पुष्कळ घटनासंबंधी आपले ज्ञान अधिकाधिक वाढत असून अज्ञाताचे क्षेत्र कमी होत आहे; अवलोकनाने, विचारमंथनाने, नवनवीन प्रयोग करत राहून, स्पष्टीकरणे शोधून, एकसंध तत्त्वप्रणाली रचून, ज्ञात-अज्ञातातील सीमांची निश्चिती या पद्धतीने करणे शक्य आहे; एवढेच नाही तर मानवी संस्कृतीच्या समृद्धीसाठी ते आवश्यकही आहे; हे विज्ञान गेली पाचएक शतके दाखवीत आले आहे. तथापि विज्ञानाला जाणीव आहे की अजून पुष्कळ पुढे जायचे आहे. जसजसे ज्ञान वाढते तसतसे मानवाला अधिकाधिक प्रतीत होते, की आपले अज्ञान अगाध आहे. ‘ज्ञात-अज्ञाताच्या सीमांचा विस्तार’ ही संकल्पना अध्यात्मात व धर्मात नाही.
(4) अविरत परिवर्तनशीलता : ज्ञात-अज्ञाताच्या सीमांचा सदोदित विस्तार होण्याची प्रक्रिया विज्ञानाच्या कार्यपद्धतीत आपोआप निर्माण झाली, असे नसून वैज्ञानिकांनी ती जाणीवपूर्वक आणली, कारण त्याविना मानवी प्रगती अशक्य आहे. ह्या प्रक्रियेसाठी परिवर्तनशीलता पाहिजे. गतिविषयक व गुरुत्वाकर्षणासंबंधी न्यूटनने म्हटले तेच, वा अणुसंबंधी रदरफर्डने मांडलेल्या कल्पना हेच अंतिम सत्य, व पूर्वीच्या वैज्ञानिकांचे विचार जसेच्या तसेच राहिले पाहिजेत; ही विज्ञानाची धारणा नाही. कोणत्याही धर्माचे परंतु विशेषतः भारतीय सनातन धर्माचे अभिमानी म्हणतात, “विज्ञानात अक्षर असे काही नाही. आमचे तत्त्वज्ञान मात्र जसे पूर्वी होते तसेच आहे”. आपापल्या तत्त्वज्ञानासंबंधी इतर अध्यात्म प्रणालींचे हेच प्रतिपादन आहे. वास्तविक हा गुण नसून अवगुण आहे. मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये विचारधारणांतील परिवर्तनशीलता हे अविभाज्य अंग असायला पाहिजे.
(5) आत्ममंथन व स्वमर्यादांची जाणीव : पूर्वापार चालत आलेल्या सिद्धान्तांचे चिंतन करीत राहणे, असे चिंतन करून ते सिद्धान्त जसेच्या तसे त्रिकालाबाधित सत्य आहेत हे नवीन शब्दांत प्रतिपादत राहणे (उदाहरणार्थ, वेदान्त-गीता-ज्ञानेश्वर-तुकाराम-अलिकडील अभ्यासक अशी मालिका), त्या संकल्पनांचा व (अंध)श्रद्धांचा प्रचार करायला नवीन पद्धती शोधत बसणे, हा धर्मांचा व तत्सदृश प्रणालींचा मार्ग आहे. याला ‘आत्ममंथन’ म्हणता येत नाही. आत्ममंथन म्हणजे विचारविश्व ढवळून निघाले पाहिजे. विज्ञानाचा मार्ग तसा आहे. प्रयोगान्ती व विचारमंथनान्ती एखाद्या वैज्ञानिकाला प्रचलित सिद्धान्तांच्या उलट काही सापडले तर अशा संशोधनाला उत्तेजन मिळते. केवळ एका विसाव्या शतकामध्ये विज्ञानाची व त्यासह मानवी संस्कृतीची प्रचंड वैचारिक व भौतिक प्रगती झाली, याचे गमक हे आहे. विज्ञान ही एकच विचारप्रणाली आहे की जिला स्वतःच्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही एका काली सर्व काही ज्ञात आहे, त्रिकालाबाधित सत्ये माहीत आहेत, असे विज्ञान मानत नाही.
(6) स्वयंनियंत्रण : स्वाभाविकच विज्ञानाच्या एकूण पद्धतीमध्ये ‘स्वयंनियंत्रक यंत्रणा’ उत्पन्न झाली आहे. अर्थात् पूर्वग्रहदूषितता, असूया, स्पर्धावृत्ति, अनभ्यस्तता, अनाकलन, इत्यादि वैयक्तिक दोषांमुळे कधी कधी प्रगती खुंटणे संभवते. व्यावसायिक वैज्ञानिक ही या मानवी दोषांपासून अलिप्त असतात असे समजण्याचे कारण नाही. त्यांच्यात मानवी गुणदोष असतातच. आत्ममंथनातून निर्माण झालेली त्यांची स्वयंनियंत्रक यंत्रणा सदोदित जागरूक असते. काही काळाने तिचा प्रभाव पडून पूर्वग्रहदूषितता विरून जाते व नवीन शोधलेले सिद्धान्त शुद्ध रूपाने प्रस्थापित होतात. या प्रकारे एकोणिसाव्या शतकात डॉल्टनचा अणुवाद (Atomic theory) व डार्विनचा उत्क्रान्तिवाद (Theory of evo lution), तसेच विसाव्या शतकात आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद (Relativity theory) व प्लांक-बोहर-डिराक इत्यादींचा ऊर्जापुंजवाद (Quantum theory) प्रस्थापित झाले.
(7) कर्मकाण्डाचा निषेध :(no rituals) कर्मकाण्ड’ घरामध्ये वैयक्तिक व पूजा-प्रार्थनास्थानांत सामूहिक असते. विविध धर्मांत, त्यांच्या विविध पंथांत, राममोहन रॉयांच्या ब्राह्मोसमाजात, विपश्यनेत, सुदर्शन क्रियेत, बुवाबाजीत, सर्वत्र कर्मकाण्ड या ना त्या स्वरूपात आहे. विज्ञान त्याच्या उपयोजनात कर्मकाण्डाचा संपूर्ण निषेध करते. ‘कर्मकाण्ड ही संकल्पनाच विज्ञानात नाही कारण ते कोणा काल्पनिक अस्तित्वाला खुश करायला (propitiation करिता) असते.
यापुढील अतिमहत्त्वाचे लक्षण पॉपरचे खंडनक्षमता (falsifiability) हे.
(8) खंडनक्षमता : मानवी संस्कृतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अवलोकनावर आधारलेली तत्त्वप्रणाली, मार्ग, पद्धती, आलोचना करण्यासाठी निकष, इत्यादी सर्व आवश्यक आहे. ज्ञानविज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांसाठी वेगवेगळे निकष असू शकतात. विवेकी प्रणालींकरिता निकष काय असावे हे आपण पाहत आहोत. इतिहासात दिसते असे की, अनेक प्रणाली निर्माण होऊन तेथेच थांबल्या, व पुढे जाण्याची, त्यांमध्ये सुधारणा/बदल करण्याची आवश्यकता नाही, आतापर्यंत शोधले वा चिंतिले तेच अंतिम सत्य होय, हा दुराग्रह (‘डॉग्मा’) चालू झाला. विशेषतः धर्मांच्या बाबतीत तसे झाले हा इतिहास आहे. इस्लामचा प्रसार होऊन अरब विज्ञानाची व वैचारिक प्रगती खुंटायला दोनएक शतके लागली, युरोपातील विज्ञान ख्रिस्तधर्माच्या प्रसारानंतर दोनतीन शतकांत विलयाला गेले, ते जवळजवळ एक सहस्र वर्षे. भारतीय सनातन धर्माला अशीच काही शतके लागली. केव्हा ना केव्हा प्रगती खुंटविणारा दुराग्रह चालू झाला, हेच प्रत्येक धर्मातील ‘अंतिम सत्य’ दिसते. अशाप्रकारे धर्माधर्मामुळे विज्ञान नष्ट झाले, एवढेच नाही तर अध्यात्माला-धर्मालाच ‘विज्ञान’ म्हणण्याची प्रथा चाल झाली. भारतामध्ये. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ‘वेदविज्ञान’ ही संज्ञ अतिशय लोकप्रिय आहे!
या पार्श्वभूमीवर सर कार्ल रेमण्ड पॉपर या ऑस्ट्रियन-ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने साठ सत्तर वर्षांपूर्वी विज्ञानाकरिता दिलेला ‘खंडनक्षमता’ हा निकष महत्त्वाचा आहे. शब्दशः अर्थ हा, की कोणत्याही प्रणालीचे खंडन होऊ शकते. या संकल्पनेचे पुढे जरा सखोल विवेचन केले आहे.
एखाद्या प्रणालीचे, सिद्धान्ताचे, प्रतिपादनाचे समर्थन तथा मंडन’ करायचे म्हटले तर त्याला अनुसरून प्रयोग करता येतील. ‘प्रयोगा’साठी साधन-उपकरणयुक्त भौतिकी/ रसायन/जैव/भू-विज्ञानांसारखी प्रयोगशालाच पाहिजे, असे नाही. समाजविज्ञानाची प्रयोगशाला संपूर्ण समाजजीवन असेल, मनोविज्ञानाची प्रयोगशाला व्यक्ती-व्यक्तींचे अंतर्मन असेल, अर्थविज्ञानाची प्रयोगशाला देशाची व जगाची अर्थव्यवस्था असेल. अशा प्रयोगांचे निष्कर्ष सिद्धान्ताला अनुसरून असतील तर त्या सिद्धान्ताला सत्य मानायला प्रत्यवाय नाही. परंतु सिद्धान्ताला अनुकूल निष्कर्ष येण्यासाठी किती प्रयोग केले म्हणजे तो सिद्धान्त सत्य आहेच, असे म्हणता येईल? उघडच, असे अनंत प्रयोग करायला लागतील. याचा अर्थ असा की या पद्धतीने कशाचेही संपूर्ण मंडन होऊ शकणार नाही. साधारणतः प्रत्येक सिद्धान्तात व विचारप्रणालीत मंडनक्षमता स्वाभाविक असते, तथापि ते प्रतिपादन, तो सिद्धान्त वा ती विचारप्रणाली अंतिम सत्य असे म्हणता येणार नाही, कारण आपण (प्रत्यक्ष किंवा वैचारिक) अनंत प्रयोग करू शकत नाही. “डोमकावळे काळे असतात” हे निःसंदेह सिद्ध करायला जगातील सर्व डोमकावळे पाहायला लागतील, व ते अशक्य आहे. मग कोणतेही प्रतिपादन तात्पुरते तरी सिद्ध व्हायला काय केले पाहिजे? समजा आपण असे प्रतिपादन केले की डोमकावळा पांढरा असू शकेल. जोपर्यंत पांढरा डोमकावळा मिळत नाही तोपर्यंत ते प्रतिपादन अमान्य, व मुळातील “डोमकावळे काळे असतात” हेच सत्य मानायचे. यात अनुस्यूत असलेली “डोमकावळे काळे असतात’ हे प्रतिपादन चूक असण्याची शक्यता महत्त्वाची आहे.
हे साधे उदाहरण पॉपरच्या ‘खंडनक्षमता (falsifiability)’ या निकषानुसार आहे; असे प्रयोग वा अवलोकन आयोजित करायचे की ज्यांचा संभाव्य निर्णय प्रचलित सिद्धान्तसंहितेच्या किंवा तीमधील एखाद्या विशिष्ट सिद्धान्ताच्या विरुद्ध असेल. जोपर्यंत असे प्रयोग अयशस्वी होत असतील, तोपर्यंत ती संहिता, निदान तो सिद्धान्त, सत्य समजायचे. या प्रयोगांचे निर्णय प्रचलित सिद्धान्तसंहितेचे खंडन होईल असे मिळाले, म्हणजे प्रयोग यशस्वी झाले, तर ती संहिता, निदान तो विशिष्ट सिद्धान्त, त्याज्य असे समजायचे. असे ‘प्रयोग’ वैचारिक किंवा सैद्धान्तिकही असू शकतील, साधन-उपकरण-युक्त प्रयोगशालाच पाहिजे असे नाही. सिद्धान्तांचे व संहिताचे खंडन करण्याचा यत्न करणे शक्य व मान्य असावे, हे महत्त्वाचे. फलज्योतिष्य, मार्क्सवादाची इतिहासाची आलोचना करण्याची पद्धत, व फ्रॉइडच्या मनोविज्ञानाचा ‘सायकीॲट्री’ हा भाग, यांमधील खंडनक्षमतेच्या अभावावरून पॉपरने सिद्ध केले की त्यांना विवेकी प्रणाली किंवा ‘विज्ञान’ संबोधता येत नाही. ‘खंडनक्षमता’ हा निकष पॉपरने मूलतः ‘विज्ञान’ कशाला म्हणावे याकरिता दिला होता, तरी तो कोणत्याही प्रणालीचे विवेकत्व तपासायला उपयोजावा असे मी म्हणतो.
“पृथ्वी गोल नाही, सपाट आहे’ हे दुसरे साधे प्रतिपादन घेऊ. आपल्या घरापासून आपण खूप लांब चालून गेलो नाही तर तेथून आपल्याला आपले घर दिसेलच; कोणत्याही दिशेने चाललो तरी घर दिसत राहील. आपण परत येऊन सांगू की, “पृथ्वी सपाट आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे”. एक तरतरीत मित्र म्हणेल, “आणखी एक प्रयोग करू या. सुदूर जाऊ व पाहू काय दृश्य दिसते. तसेच एखाद्या पर्वतावर चढून पाहू काय दिसते. वेगळे दिसणे शक्य आहे, त्यावरून ठरवू.’ यामध्ये आपले प्रतिपादन चूक असण्याची शक्यता गृहीत धरली आहे. पुकळ अंतर चालून गेल्यावर घर दिसेनासे होईल. खालून जितके दृश्य दिसते त्याहून किती तरी व्यापक दृश्य आपण पर्वत चढायला लागल्यावर दिसेल. या प्रयोगांच्या निर्णयाचा अन्वयार्थ हा की, मूळ प्रतिपादनाचे खंडन झाले. हे जे दोन प्रयोग आपण केले, तेव्हा मनात धरले होते की, “पृथ्वी सपाट आहे हे चूक असेल तर दृश्य वेगळे दिसेल.” दृश्य वेगळे नसते तर “पृथ्वी सपाट आहे’ हेच सिद्ध झाले असते.
ईश्वर, धर्म, अध्यात्म या संकल्पना या निकषाला उतरतात का? या संदर्भात एक उद्बोधक उदाहरण हे, की ‘ईश्वर’ या संकल्पनेचे खंडन करण्याला त्या संकल्पनेला अबाधित सत्य व पूज्य मानणाऱ्या कोणाचीच मान्यता नसते, तेव्हा कोणत्याही ईश्वरी-धार्मिक आध्यात्मिक प्रणालींना ‘विवेकी प्रणाली’ किंवा ‘विज्ञान’ म्हणता येत नाही. म्हणून धर्म व विज्ञान यांची सांगड घालण्याच्या यत्नांना अर्थ नाही, ते यत्न विफल होणारच. खंडनक्षमता
हा निकष येथे कसा उपयोजिता येईल ते पाहू.
‘ईश्वर’ या संकल्पनेची खंडनक्षमता पडताळण्यासाठी अवलोकन किंवा प्रयोग करायचा म्हणजे काय करायचे, हा प्रश्न स्वाभाविक आहे. एक असा करता येईल — ईश्वर आहे असे मानणाऱ्या, त्याची प्रार्थना-पूजा इत्यादी कर्मकांड करणाऱ्या काही श्रद्धाळू व्यक्ती घ्यायच्या. आपल्या जीवनातील चांगल्या घटना घडल्या, वाईट निवारल्या गेल्या त्या ईश्वरामुळे ही या व्यक्तींची श्रद्धा असते. प्रथम प्रत्येक व्यक्तीने आधीच्या पाच-दहा वर्षांतील प्रातिनिधिक घटनांविषयी स्पष्ट व बारकाईने तारीखवार आठवेल तसे लिहून ठेवायचे. कोणत्या घटना ईश्वरावरील श्रद्धेमुळे किंवा मंदिरात/घरात/आश्रमात केलेल्या कोणत्या नवस-पूजा-प्रार्थनांमुळे घडल्या वा निवारल्या गेल्या असे व्यक्तीला वाटते, हे या लेखनावरून इतरांना स्पष्ट समजले पाहिजे. “मी गणेशाची प्रार्थना केली म्हणून माझी पत्नी दुर्धर रोगातून बरी झाली”, असे ढोबळ विधान चालणार नाही. पत्नी केव्हा आजारी झाली, रोग काय होता, प्रार्थना कोणत्या दिवशी केली, कोणत्या डॉक्टरांनी काय उपाय केले, काय औषधे दिली, किती दिवस उपचार केले, पत्नी केव्हा बरी झाली, इत्यादीही सांगितले/लिहिले पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तींनी आपल्या श्रद्धेचा प्रामाणिक आढावा घ्यायचा. यापुढे मंदिरात, घरात, तीर्थक्षेत्री, कोठेही काहीही धार्मिक, आध्यात्मिक, इत्यादी, वैयक्तिक, पारिवारिक, सांघिकरीत्या करायचे नाही. शक्य तो आपल्या श्रद्धेला फाटा द्यायचा. मनातील इतर विचारांप्रमाणे, श्रद्धा मनातून तात्पुरती नष्ट होणे अशक्य आहे, व नष्ट करणे कठिण आहे. मनाची ग्वाही देता येत नाही. तथापि जर हा प्रयोग प्रामाणिकपणे करायचा असेल तर निदान पूजा-प्रार्थना करणे, व्रते करणे, उपास करणे, भाबडेपणाने आध्यात्मिक व संतसाहित्य वाचणे, प्रवचनाला जाणे, तथाकथित दैवी लोकांना भेटणे, नवस बोलणे, कुंडल्या पाहणे, ज्योतिष्याचा सल्ला घेणे, इत्यादी सोडून देणे सहज शक्य आहे. व्यक्तींच्या जीवनात चांगल्या वाईट घटना घडत राहणारच. त्यांचा आढावा त्या त्या वेळी, परिचयाच्या निरीश्वरवादी आप्ताला/मित्राला साक्षी ठेवून घ्यायचा व लिहून ठेवायचा. येणाऱ्या अनेक निर्णयांचे विश्लेषण आधुनिक सांख्यिकीय (statistical) निकषांनी करायचे; यायोगे ‘काकतालीय न्याय’, ‘बोलाफुलाची गाठ’ अशा घटना बाजूला काढायच्या. काही वर्षांनी समजेल की
आधीच्या घटनांत ईश्वराचा किंवा कर्मकांडांचा हात होता की नाही. असा प्रयोग करण्याला मान्यता देणे याचा अर्थ हा की, आपल्या श्रद्धा तपासून पाहाव्या, इतका तरी विवेकी प्रामाणिकपणा आस्तिक, श्रद्धाळू व्यक्तींच्यात आहे.
अशा संभाव्य प्रयोगांचे आणखी उदाहरण हे – आजच्या कालात कोणत्याही वैद्यकपद्धतीवर विश्वास ठेवण्याआधी व ती उपयोजिण्याआधी तिला खंडनक्षमता हा निकष लावायला पाहिजे. आयुर्वेदाच्या त्रिदोष-तत्त्वाचे खंडन होईल असे प्रयोग आयुर्विद् वैद्य कधीही करणार नाहीत, व करायला मान्यता देणार नाहीत. निदान आयुर्वेदाची औषधे, ती बनविणे, त्यांचा उपयोग, त्यांचे परिणाम या गोष्टी तर आधुनिक पद्धतींनी तपासता येतील. परंतु त्यालाही आयुर्विदांची मान्यता नाही. हीच त्रुटी आहे पूर्वनिर्देशित फलज्योतिष, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी अशांमध्ये. अशा व्यक्तींचे प्रतिवाद असतात, “तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा; त्यात आम्हाला ओढू नका, आमची श्रद्धा आम्ही आमच्यापाशी ठेवणारच’.
या अविवेकी वृत्तीमुळेच अर्ध शतकापूर्वी एब्रहम कोवूर व आता नरेन्द्र दाभोलकरांची आह्वाने दैवी महाराजांनी व त्यांच्या श्रद्धाळू भक्तांनी स्वीकारली नाहीत, व स्वीकारली जात नाहीत. पुट्टपर्तीचा सत्य साईबाबा नुकताच मृत्यू पावला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या मातब्बर वृत्तपत्रातील एका लेखाचे शीर्षक होते ‘सत्य साईबाबांना आह्वान देणारे सर्व लोक त्यांच्या कितीतरी आधी मेले’! (त्यांत दाभोलकर नाहीत. ते अजून कार्यरत आहेत, तेव्हा हे प्रतिपादन खंडनक्षमता या विवेकाच्या निकषानुसार खोटे आहे!)
वर दिलेली विवेकाची आठ लक्षणे धर्म, श्रद्धा, अध्यात्म इत्यादींमध्ये नाहीत. आता हे खरे आहे की जगातील, भारतातील, महाराष्ट्रातील पुष्कळ लोक वैज्ञानिक आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की विज्ञानाला अध्यात्म मान्य आहे. उलट असे आहे की 99% वैज्ञानिक, जन्म व्यावसायिक विज्ञानात घालवूनसुद्धा, विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाकडे वळत नाहीत. बहुतेक वैज्ञानिक इतरांप्रमाणे बालपणापासून घरांत, विद्यालयांत, सार्वजनिक ठिकाणी, व प्रसिद्धिमाध्यमांतून झालेल्या संस्कारांमुळे मनात श्रद्धा ठेवून असतात. ब्रिटन-अमेरिकेतील अधिकांश वैज्ञानिक असे अंधश्रद्ध नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे.
लोक मला नेहमी प्रश्न करतात, “हे सर्व ठीक असले तरी आम्हाला त्याचा दैनंदिन जीवनाकरिता काय उपयोग आहे?” तर याचे उत्तर असे.
हिंदू पंचांगाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही धार्मिक कार्य करायचे असते. विशेष तिथींना तर विचारायलाच नको, सहस्रावधी मंदिरांपुढे लक्षावधी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. अविवेकी कार्यांत अपरिमित वेळ घालविणाऱ्या लोकांचा भारत कधीही महासत्ता होणार नाही. फक्त ते स्वप्न पाहात बसेल. दोनशे वर्षे इग्लंड महासत्ता होता, कारण तेथे इहवाद वाढत होता. नंतर अमेरिका महासत्ता झाला, कारण ‘ईश्वरावर आमची श्रद्धा आहे’ हे बोधवाक्य असले तरी विकासामध्ये धर्माचा अडसर बाजूला केला गेला. सोविएट संघ महासत्ता झाला कारण त्याचे राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानच इहवादाला अनुसरून होते; आता विघटनानंतरसुद्धा रशिया पुढील दहापंधरा वर्षांत पुनः महासत्ता बनण्याची चिन्हे आहेत, आमचा भारत यात कोठेही नाही.
‘आजच्या शिक्षण पद्धतीत सुधारणा करायला पाहिजे’, हे सर्वजण सारखे म्हणत असतात, विशेषतः शैक्षणिक अधिकारपदावरून निवृत्त झालेले (व तेथे असताना विशेष पावले न उचललेले!) ‘तज्ज्ञ’. त्यांच्या दृष्टीने ‘सुधारणा’ या शब्दाचा अर्थ वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या कमी करणे, शिक्षकांपाशी विषयाच्या ज्ञानासह शिकविण्याचे कौशल्य निर्माण करणे, शिक्षक-विद्यार्थी सुसंवाद दृढ करणे, अभ्यासक्रम कालानुरूप, व्यवसायक्षम व समाजाभिमुख असणे, परीक्षांचे स्तोम नसणे, इत्यादी. हे बोलणे ठीक आहे, परंतु त्यासाठी कोणीही काहीही करत नाही हे वास्तव आहे. तथापि येथे माझा रोख वेगळा आहे. तो असा की विद्यालयांत त्याचे बोधगीत असेल तर ठीक, अन्यथा अदृश्य, अनाकलनीय, गूढ अस्तित्वाची प्रार्थना नसावी. समारोहाला दीप उजळणे ठीक परंतु पसायदान इत्यादी नसावे. मातापित्यांनी, वडीलधाऱ्यांनी, शिक्षकांनी “देवाला नमस्कार करून परीक्षेला जा’ असे मुलांना सांगणे बंद करावे. विद्यालयां-महाविद्यालयांमध्ये त्या त्या स्तरावर ‘विवेक’ म्हणजे काय, जीवनात त्याचे उपयोजन कसे करावे हे शिकविले पाहिजे. केवळ प्रार्थना, पारंपरिक बोधकथा नसाव्या. दूरचित्रवाणी मालिकांनी श्रद्धेला (म्हणजेच अंधश्रद्धेला) खतपाणी घालणाऱ्या मालिका बंद कराव्या.
दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वाचे हे की, काहीही करायच्या आधी, कोणताही निर्णय घेण्याआधी, प्रत्येक व्यक्तीने, परिवाराने, संघटनेने, शासन-प्रशासनाने वर दिलेले निकष लावावे. त्याकरिता जटिल तत्त्वज्ञान जाणण्याची व जगण्याची आवश्यकता नाही, केवळ विवेकी मार्गाने गेले म्हणजे पुरे.
एफ-17/18, चैत्रबन रेसिडेन्सी, 127/2, औंध, पुणे 411 007. संपर्कध्वनी : 98228 45029, (20) 2588 2287

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.