प्रकाशित झाले मेंदूच्या अंतरंगात,

[ एक साक्षात्कारी अनुभवकथन या नावाने चित्रा बेडेकरांचा लेख आसुच्या —– अंकात छापला गेला होता. बेडेकरांनी आता ती पूर्ण कहाणी तपशिलात पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्याचा हा त्रोटक परिचय. – सं. ]
माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, अनाकलनीय मन, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व, त्याचं अवघं अस्तित्व हे सर्व कशात सामावलंय याचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याचं मूळ मेंदूत सापडतं. ‘मी’ म्हणून आपण अस्तित्वात असतो, आपल्याभोवती जग असतं, ते जग आपल्याला कसं वाटतं, कसं जाणवतं किंवा कसं भासतं हे आपल्या मेंदूतल्या क्रियाप्रकियांवरून ठरत असतं.
कॉर्पस कॅलोजमने जोडले गेलेले मेंदूचे दोन अर्धगोल बाहेरच्या जगाचं आपल्याला एकसंध आकलन करून देण्यात वाकबगार असतात. प्रत्येक क्षणी मेंदूकडे येणाऱ्या कोणत्या माहितीवर कशा प्रकारे संस्करण करायचं याची प्रत्येक अर्धगोलाची आपापली वेगळी तन्हा असते. परंतु प्रत्येक कामात हरघडी ते एकमेकांना पूरक पद्धतीने सहभागी असतात.
भाषा आणि बुद्धीचा वापर हे मानवप्राण्याचं वैशिष्ट्य. माणसाच्या बौद्धिक क्षमतेचं अधिष्ठान त्याच्या मेंदूच्या सर्वांत बाहेरच्या थरांमध्ये म्हणजे कॉर्टेक्समध्ये असतं. भाषेशी संबंधित व्यवहार आणि आपली स्वतःविषयीची जाणीव मुख्यत्वे डाव्या अर्धगोलाच्या नियंत्रणात असतात. डॉ. जिल टेलर या न्यूरोसायाण्टिस्टला ब्रेनस्ट्रोकमुळे नेमकं हेच सर्व गमवावं लागलं.
आपल्यापैकी कुणालाही एरवी कधीही न मिळू शकणारा अनोखा अनुभव डॉ. जिलला त्या स्ट्रोकमुळे मिळाला. डाव्या अर्धगोलाचं वर्चस्व लोप पावल्यामुळे तिच्या उजव्या अर्धगोलाच्या एरवी दडपल्या गेलेल्या क्षमता मुक्तपणे व्यक्त झाल्या. त्यामुळे स्वतःविषयी एक नवं भान तिला आलं. स्वतःला मनाजोगतं घडवण्याची संधीसुद्धा ब्रेनस्ट्रोकमुळेच तिला मिळाली.
एखाद्या विशिष्ट गोष्टीवर किंवा विचारावर लक्ष केंद्रित करता येणं हे मानवी मनाचं वैशिष्ट्य आहे. सबंध विश्वात मानवाच्या हाती असणारं तेच प्रभावी साधन आहे. अशा मनाच्या जोडीला भाषेचा वापर करून माणूस आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकतो. शांततामय आनंदी जीवनाची हीच खरी गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्ली मिळविण्यासाठी लहानपणापासूनच मनाची योग्य दिशेने मशागत करण्याची गरज असते.

आजचा सुधारक चा मराठीकारण विशेषांक
[ मराठीकारण या विषयावर अनुराधा मोहनी विशेषांक घडवीत आहेत. तो ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित व्हावा, असा प्रयत्न आहे. त्यानिमित्ताने लेख मिळविणे सुरू आहेच, परंतु वाचकांपैकी कोणांस लिहावयाचे असेल तर अंकाचे स्वरूप कसे असेल हे सांगणारे खालील टिपण पहावे. -सं. ]
मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी संस्कृती ह्या विषयांवर सध्या खूप चर्चा झडत आहेत. मराठीच्या मुद्द्यांवर राजकीय पक्ष स्थापन होत आहेत. दुसरीकडे मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. आपली मातृभाषा मराठीच आहे याबाबत आजच्या बालकांना खात्री नाही. शासनव्यवहार, न्यायव्यवहार आणि उच्च शिक्षण यांचे माध्यम मराठी असणे लोकशाहीच्या संवर्धनासाठी आवश्यक आहे. पण सर्वसामान्य जनतेला त्याची गरज वाटते असे दिसत नाही. थोडक्यात, मराठी भाषेची पीछेहाट, दुसऱ्या कुठल्याही भाषेने तिची जागा घेण्याची असंभाव्यता आणि मराठी भाषिकांच्या मानगुटीवर बसलेला न्यूनगंड अशी ह्या भाषाहीन समाजाची दिशा-हीन अवस्था आहे.
ह्याचा विचार अर्थातच इतर भारतीय भाषांच्या संदर्भात करावा लागेल. आजही ह्या देशात विभिन्न संस्कृती नांदतात, त्या मुख्यतः आपापल्या भाषेला धरून. भाषा म्हणजे त्या संस्कृतीचा चेहरा, तिची अभिव्यक्ती आणि तिची शक्तीदेखील. प्रत्येकीला आपापला स्वतंत्र अवकाश हवाच असतो, पण सर्वांमध्ये एक समान सूत्र आहे आणि सुखाने जगण्यासाठी त्यांना राज्यसंस्थेची गरज आहे. या कारणांमुळे भारत हे एक राष्ट्र निर्माण झाले खरे, तरीही राष्ट्र ही काही झाले तरी कृत्रिम, लादलेली संकल्पना आहे. ती संस्कृतीवर कुरघोडी करू शकत नाही. द्वेषाधारित अस्मिता समाजात दुही माजवण्याचे कार्य करीत असली, तरी भाषा, अस्मिता ह्या गोष्टी अस्थानी नाहीत. उलट, आपल्या जगण्याला अर्थ व स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्याच त्या आहेत. त्यासाठी त्यांचा योग्य रीतीने विचार केला पाहिजे. संस्कृती (भाषा) ही देशापेक्षा अधिक व्यापक व मूलगामी संकल्पना असल्यामुळे भाषिक अस्मितेकडे देशद्रोह म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.
मराठी भाषिक आज अनेक खऱ्या खोट्या कारणांनी व्यथित आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठी अस्मितेला आलेला फुलोरा कोमेजून गेला आहे. कला, साहित्य, समाजकारण (चळवळी व जनआंदोलने), राजकारण सगळ्यातच साचलेपण आलं आहे. त्यातून नव्वदीच्या दशकात आलेले जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेने आणलेला चंगळवाद आणि व्यवस्थापनशास्त्राचे स्तोम वाढूनही चहूबाजूंनी ढासळणाऱ्या व्यवस्था यामुळे गोंधळात भरच पडते आहे.
महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय, तो कोणता? मराठी संस्कृती म्हणजे काय? मराठी भाषा म्हणजे काय? प्रमाण मराठी भाषा कोणती? प्रमाण-बोलीभाषांचा संबंध काय? मुख्य म्हणजे आजच्या आपल्या जगण्यात ह्या सर्वांची प्रस्तुतता काय?
हे प्रश्न आज आपल्याला सतावीत आहेत. ह्या प्रश्नांना, लोक तीन ठोकळेबाज प्रकारांनी तोंड देताना आढळतात –
1. पुराणगौरव : महाराष्ट्राची परंपरा फार थोर आहे. आजवर मराठीने कितीतरी आक्रमणे पचवली. मराठी संस्कृती कल्पान्तापर्यंत टिकाव धरून राहणार यात शंका नाही.
2. परिस्थितीशरणता : नव्या मनूच्या नव्या प्रवाहात आपल्याला सामील झालेच पाहिजे. नाहीतर आपण नामशेष होऊ.
3. असुरक्षितता : आज बदलत्या काळात जी मोठ्या प्रमाणावर घुसळण चालू आहे, तीमध्ये खूप मोलाचं असं काहीतरी आपल्याजवळून निसटून जातं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते धरून ठेवलं पाहिजे.
ह्या तीन्ही प्रकारांनी उत्तरे शोधणारे लोक स्वतःही त्यावर समाधानी नाहीत. कारण आपण मोलाचे काय गमावले आहे व आपल्याला आज नेमके काय हवे आहे, ह्याविषयी ह्या सर्वांच्या मनात संभ्रम आहे. मराठीकारणाचा अर्थही त्यामुळे नऊवारी, नथ, भगवा झेंडा व शिवाजी महाराज ह्या प्रतिकांपुरता संकुचित करण्यात आला आहे. ह्याउलट पुरोगामी मंडळींनी ह्या प्रश्नाचे अस्तित्वच नाकारून संकुचित राजकारण करणाऱ्यांना रान मोकळे केले आहे.
ही दोन्ही टोके नाकारून मराठीकारण ह्या विषयावर सम्यक व संतुलित विमर्श घडविण्याच्या उद्देशाने, आजचा सुधारक चा एक विशेषांक काढायचा आहे. त्यात पुढील अंगांनी विषयाची मांडणी केली जाईल.
1. मराठी राजकारणाचा आशय : महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी कोणती उद्दिष्टे होती? ती का सफल झाली नाहीत?
2. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणारे पक्ष : त्यांचे राजकारण मराठी समाजाला कुठे घेऊन जाईल?
3. मराठीचे अर्थकारण :
अ) मराठीतून शिकलेल्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न
आ) मराठी भाषाकौशल्याचा रोजगारासाठी वापर
इ) मराठी माणूस उद्योजकतेत मागे का?
4. मराठी संस्कृती म्हणजे मराठी माणसाची संस्कृती – कला, क्रीडा, साहित्य, रूढिपरंपरा, विद्वत्ता व्यासंग आणि मानसिकता
5. महाराष्ट्रातील विभिन्न जाति-धर्मीयांची मातृभाषा मराठी
6. प्रमाणभाषा – बोलीभाषा
7. ज्ञानभाषा मराठी
8. लोकशाहीची वाहक भाषा अर्थात् शासन व न्यायव्यवहारात मराठी
9. जागतिकीकरण आणि मराठी भाषा
10. प्रसारमाध्यमे आणि माहिती तंत्रज्ञान यांच्यासंदर्भात मराठी
वरील विषयांवर मांडणी करू इच्छिणाऱ्या लेखकांनी आपले लेख आसु कडे दि.20 ऑगस्ट 2011 पर्यंत पाठवावे ही विनंती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.