गुणवत्तापूर्ण शिक्षण व वैज्ञानिक पद्धत

प्रत्येक मूल शिकले पाहिजे व प्रत्येक मुलाला चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे ह्याची चर्चा शिक्षण हक्क कायदा येण्याआधीच अनेक वर्षे शिक्षणक्षेत्रात चालू होती. शिक्षण हक्क कायद्यामुळे ह्या चर्चेला एक नवीन चौकट मिळाली. माध्यमांमधून चर्चा होऊ लागल्या, लेख छापून येऊ लागले.

ह्या कायद्याचे अनेक पैलू आहेत. वेगवेगळ्या चर्चा व लेखांमध्ये ह्या पैलूंपैकी वेगवेगळ्या पैलूंवर भर दिला गेला आहे. खाजगी शाळांमध्ये २५% जागा गरिबांच्या मुलांसाठी ठेवणे कितपत परवडू शकेल ह्यावर कोणी भर दिला, पालकांचा सहभाग असलेल्या व्यवस्थापन समितीकडे नक्की कुठले अधिकार असायला हवेत ह्याचा ऊहापोह काही ठिकाणी मुख्यतः झाला. कोणीही विद्यार्थी आठवीपर्यंत नापास होणार नाही अशा मूल्यमापनामुळे हानीच अधिक होईल; आठवीपर्यंत शिकूनही निरक्षर राहिलेली, साधी आकडेमोडही न येणारी मुले दिसू लागतील; ही चिंता काही ठिकाणी दिसली. राष्ट्रीय अभ्यासक्रम-आराखडा २००५ अनुसार राज्यांतील कार्यक्रमाची आखणी केल्यास राज्यांच्या स्वायत्ततेला धोका पोहचेल अशा निराधार भीतीभोवती काही ठिकाणची चर्चा रेंगाळत राहून बराचसा वेळ गेला.

अशा तुकड्यातुकड्यांनी होणाऱ्या चर्चांमध्ये एक विखुरलेपणा जाणवतो. ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कामाचे नियोजन करायचे असेल तर अनेक पैलूंपैकी नेमक्या कोणत्या पैलूंना अग्रक्रम द्यावा हे लक्षात येत नाही. जिथे अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारी चर्चा झाली आहे तिथेही शिक्षणक्षेत्रातील संस्थांना, कार्यकर्त्यांना समजेल असे नेमके कृती-नियोजन (action plan) काय असावे ह्याबाबत फारसे विवेचन झालेले नाही. ह्यादृष्टीने, असे कृतिनियोजन करताना ज्यांचा अग्रक्रमाने विचार केला पाहिजे अशा निवडक पैलूंचा थोडक्यात आढावा मागील लेखांशामध्ये घेतला होता. ह्यानंतरच्या दोन लेखांशांमध्ये पुढील चार मुद्द्यांचा विचार मांडलेला आहे.

• गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय?
• वैज्ञानिक पद्धतीनुसार शिक्षणक्षेत्रात प्रयोग करण्याची आवश्यकता.
• चांगला शिक्षक कोण होऊ शकतो? चांगला प्रशिक्षक कोण होऊ शकतो?
• अधिक संख्येने चांगले शिक्षक, प्रशिक्षक मिळावेत ह्यासाठी काय केले पाहिजे?
• शिक्षण हक्क कायद्याच्या महाराष्ट्रातील यशस्वी अंमलबजावणीचे कृतिनियोजन

ह्यांपैकी पहिल्या दोन मुद्द्यांचा विचार ह्या लेखांशात केलेला आहे व उरलेल्या दोन मुद्द्यांचा विचार पुढील लेखांशांमध्ये होईल.

गुणवत्तापूर्ण शिक्षण व वैज्ञानिक पद्धतीनुसार शिक्षणक्षेत्रात प्रयोग करणे ह्या दोन्ही संदर्भात जाणवणारी अडचण ही तात्त्विक भूमिकेची आहे. अशाप्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या मुळाशी असलेले तात्त्विक प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना स्पष्टपणे जाणवतच नाहीत. काही वेळा ते जाणवले तरीही उगाच विचार करत बसण्यापेक्षा काहीतरी काम करत राहणे महत्त्वाचे ह्या वृत्तीमुळे असा विचार करणे पुढे ढकलले जाते. समविचारी लोकांची एकजूट महत्त्वाची न ठरता वेगवेगळ्या कारणांनी का होईना पण अनेक माणसे एकत्र आली आहेत ह्याचेच समाधान वाटत राहते. ह्यातून पुढे बरेचदा गोंधळ, मतभेद होऊन जे काहीतरी काम चालू असते ते थांबते. ह्या लेखामुळे असे काही विपरीत घडणे टळेल व काही महत्त्वाचे तात्त्विक प्रश्न अधिक स्पष्टपणे समजतील अशी आशा आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय?
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार दोन गोष्टींच्या संदर्भात करावा लागेल. विचारपूर्वक ठरवलेल्या अध्ययन-निष्पत्ती (learning outcomes) ही त्यातली पहिली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांचे वय, स्थानिक परिस्थिती व समाजाची गरज लक्षात घेऊन अध्ययन-निष्पत्ती
ठरवणे अपेक्षित असते.

उदा. इयत्ता आठवीपर्यंत शहरातील विद्यार्थ्याला महानगरपालिकेची व गावातील विद्यार्थ्याला ग्रामपंचायतीची रचना व जबाबदाऱ्या माहीत असणे व जिथे शक्य आहे तिथे त्या माहितीचा उपयोग करता येणे.

प्रत्यक्षात घडून आलेल्या अध्ययन-निष्पत्तीचा दर्जा ठरवण्याचे उचित व वस्तुनिष्ठ असे निकष ही दुसरी गोष्ट आहे.

ह्या दोन्ही बाबींवर जे वैविध्यपूर्ण व विपुल लेखन देशी-परदेशी भाषांमध्ये झाले आहे ते पाहता आता अधिक तात्त्विक चर्चेची गरज (किंवा उपयोग!) काय आहे असे वाटू शकेल. माझ्या मते इतके वैविध्यपूर्ण व विपुल लेखन हीच खरी अडचण आहे कारण अशा विविधतेचा मेळ घालून एका जिल्ह्यासाठी किंवा शाळेसाठी उपयुक्त ठरेल असा एकसंध व स्पष्ट असा दृष्टिकोण रचणे कठीण होते.

अध्ययन-निष्पत्ती ठरवताना येणारी दुसरी अडचण म्हणजे शिक्षणाचा मुख्य हेतू काय असावा? ह्या मूलभूत प्रश्नावर तज्ज्ञांमध्येही मतभेद असतात. सर्जनशीलता, जे आवडेल ते शिकण्याचे स्वातंत्र्य, समाजाला उपयुक्त होईल असे काम, वैज्ञानिक-तंत्रज्ञ होण्यासाठी आवश्यक अशी विज्ञान-गणिताची समज, समता-स्वदेशी अशी मूल्ये शिकवणारे शिक्षण अशा अनेक हेतूंपैकी वेगवेगळे हेतू मध्यवर्ती मानणारी माणसे एकत्र येतात व गणित, इतिहास असा एकेक विषय घेऊन त्याच्या अध्ययन-निष्पत्ती व अध्ययनपद्धती ठरवतात तेव्हा मतभेद होऊ लागतात. अशा विषयवार स्वतंत्रपणे ठरवलेल्या अध्ययन निष्पत्तींचा मिलाफ होऊन शिक्षणाचा मुख्य, मध्यवर्ती असा हेतू साध्य होत नाही असे काहींना वाटू लागते.

उदाहरणादाखल समजा चार व्यक्तींनी प्रामाणिकपणे शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी एकत्र काम करायचे ठरवले. हे सहज शक्य आहे की ह्या चारांपैकी प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळ्या लेखनाचा, विचारांचा प्रभाव असू शकेल. प्रत्येकाच्या दृष्टीने वेगवेगळा प्रश्न महत्त्वाचा असू शकेल. उदा.:
i. कोणती शिक्षणपद्धती भारतीय संस्कृतीशी सुसंगत ठरेल?
ii. जागतिकीकरणाच्या लाटेत भारताने व प्रत्येक भारतीयाने टिकून राहायचे असेल तर कशाप्रकारचे शिक्षण आवश्यक आहे?
iii. व्यक्तीचा व समाजाचा जो खरा, पर्यायी विकास आपल्याला अभिप्रेत आहे त्यासाठी कशाप्रकारचे शिक्षण दिले पाहिजे.
iv. गांधीजी, टागोर ह्यांच्या विचारानुसार आजच्या काळात शिक्षण कसे देता येईल?

ह्या चार माणसांमध्ये मुख्य प्रश्नांबाबतच जर अशी मतभिन्नता असेल तर अपेक्षित असलेल्या अध्ययन-निष्पत्ती व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे स्वरूप ह्यावर त्यांचे एकमत होणार नाही. ह्यातून मार्ग काढण्यासाठी ह्या चार माणसांना त्यांच्या मनातील विविध हेतूंचा व त्यामागील गृहीतकांचा, विचारसरणींचा मेळ घालावा लागेल. हे करताना त्यांना जाणवेल की अशाप्रकारे अनेक स्रोतांमधून मिळालेल्या दृष्टिकोणांचा, शहाणपणाचा सुसंगत असा मेळ घालून गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाचे एक निश्चित असे उत्तर ठरवणे ही एक बऱ्यापैकी गुंतागुंतीची तात्त्विक भानगड आहे.

ह्यासंदर्भात विज्ञानाच्या इतिहासात आढळणाऱ्या एका बाबीचा उल्लेख करावासा वाटतो. विज्ञानाच्या इतिहासात अनेकदा असे दिसून येते की अनेक घटनांपैकी एकेका घटनेचे स्वतंत्रपणे स्पष्टीकरण करू शकणाऱ्या अनेक नियमांपेक्षा एकच अधिक व्यापक असा नियम शोधून काढला जातो व मग केवळ त्याच्याच सहाय्याने अशा सर्व घटनांचे सुसंगत स्पष्टीकरण करता येते. शिक्षणक्षेत्रात गुणवत्तेसारख्या काही संकल्पनांबाबत हे घडवून आणायची गरज आहे. काही मोजक्याच (शक्यतो एक-दोनच) व्यापक अशा तत्त्वांचा आधार घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत उपलब्ध असलेल्या अनेक दृष्टिकोणांचा मेळ घालता आला पाहिजे.

एक विचार ह्यासंदर्भात उपयुक्त ठरू शकेल का ते बघूया. तो विचार असा : जगताना येणाऱ्या विविध अनुभवांचा अन्वय अधिक चांगल्याप्रकारे लावता येण्याची कुवत शिक्षणाने विकसित केली पाहिजे. हाच मूलभूत असा हेतू मानून शिक्षणाच्या प्रकारांचा, पद्धतींचा व गुणवत्तेचा विचार करावा.

अन्वय लावणे ही क्रिया इथे व्यापक अर्थाने वापरलेली आहे. ती अधिक नेमकेपणे स्पष्ट करताना असे म्हणता येईल की इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या विविध प्रकारच्या संवेदना व पूर्वी घेतलेल्या अनुभवांची स्मृती ह्यांच्यावर एक प्रकारची प्रक्रिया मेंदूकडून केली जाते व त्यातून काही निष्कर्ष व कल्पनाचित्रे निर्माण होतात. ही जी प्रक्रिया आहे तिला अन्वय लावणे असे म्हणता येईल. ह्या निष्कर्षांना व कल्पनाचित्रांना अनुसरून भावना निर्माण होतात व त्यांचा प्रभाव वर्तनावर पडतो. रॅशनल-इमोटिव्ह बिहेविअर थेरपी (REBT) ह्या मानसोपचारपद्धतीत अशा प्रकारच्या अन्वयांत सुधारणा घडवून संबंधित भावना, वर्तनात सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न केला जातो.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की कधीही शाळेत न गेलेल्या निरक्षर माणसाकडेही अन्वय लावण्याची कुवत असतेच. अशी कुवत निसर्गतःच मिळते. ती मिळावी म्हणून, अनुभवाचा अन्वय लावणे शिकावे म्हणून शाळेत जायची गरज नाही. शिक्षणामुळे अनुभवाचा अन्वय लावण्याची कुवत अधिक विकसित झाली पाहिजे, बहरली पाहिजे अशी अपेक्षा आहे.

बीजगणितातील पदावल्यांचा गुणाकार, भागाकार शिकताना जो विचार करावा लागतो त्याच्या मुळाशी तर्कसंगत विचार करणे, विश्लेषण करणे ह्या कुवती आहेत ज्यांचा उपयोग मुख्यतः जगताना येणाऱ्या अनुभवांचा अन्वय लावण्यासाठीच होतो. त्या कुवतींचे बीजगणितातील उपयोजन हेसुद्धा विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये मिळणाऱ्या अनुभवांचा अन्वय लावण्याचेच उदाहरण आहे.

एखादे इंद्रधनुष्य पाहिल्यावर जो अनुभव व अन्वय एखाद्या बालकाच्या मनात घडून येतो त्यात कुतूहल व सौंदर्यानुभव ह्यांचा मिलाफ झालेला असतो. इंद्रधनुष्य का दिसते हे विज्ञानाच्या तासाला समजून घेणे व इंद्रधनुष्यावरील कवितेचा आस्वाद भाषेच्या तासाला घेणे हा शाळा चालवण्याच्या दृष्टीने कदाचित सोईचा भाग असू शकेल पण मुळात अनुभवांचा अन्वय लावण्याच्या एकाच क्रियेचे हे दोन पैलू आहेत व विद्यार्थ्यांच्या मनात ते स्वतंत्र कप्प्यांमध्ये राहू नयेत ह्याचे भान बाळगले पाहिजे.

अधिक आनंदाने जगायचा प्रयत्न करता येणे, भोवतालच्या जगाला व स्वतःला समजून घेणे, स्वतःहून काही नैतिक मूल्ये मानणे व त्यानुसार जग बदलायचा प्रयत्न करणे, सौंदर्यानुभव व त्याची अभिव्यक्ती ही व अशाप्रकारची उद्दिष्टे कला-शिक्षण, विज्ञान-शिक्षण व मूल्यशिक्षण ह्यांत महत्त्वाची मानलेली असतात. ह्या उद्दिष्टांच्या मुळाशी अशाप्रकारची अन्वय लावण्याची विकसित अशी कुवत असते हे लक्षात घेतल्यास अनुभवांचा अन्वय अधिक चांगल्याप्रकारे लावता येण्याची कुवत शिक्षणाने विकसित केली पाहिजे हा मूलभूत असा हेतू का मानावा हे समजून घेता येईल.

वर उल्लेख केल्याप्रमाणे शिक्षणातील गुणवत्तेबाबतच्या विविध दृष्टिकोणांचा एका व्यापक तत्त्वानुसार मेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. ह्यामुळे एक चांगली चर्चा घडावी, इतर एखाद्या मार्गाने अधिक चांगला मेळ घालता येत असेल तो मार्गही समजावा व शिक्षणातील गुणवत्तेबाबत चित्र स्पष्ट व्हावे अशी इच्छा आहे.

अशी स्पष्टता नसल्यामुळे एका टोकाला इयत्ता सहावी ते आठवीसाठीही केवळ साक्षरताप्रसार करणारे व साधी आकडेमोड शिकवणारे कार्यक्रम हे गुणवत्ताविकासाचे कार्यक्रम मानले जातात. आनी-पानी ऐवजी आणि-पाणी लिहिता येणे म्हणजे गुणवत्ताविकास झाला असे मानले जाते. दुसऱ्या टोकाला पालकांच्या, संस्थाचालकांच्या इच्छेखातर स्पर्धापरीक्षांचे वर्ग चालवून त्यांत पदके मिळाली की शिक्षणातील गुणवत्ताविकास झाला असे मानले जाते. शहरातील सुशिक्षित पालकांमध्येही मोठमोठे गुणाकार चटकन करता आले की गणिताच्या आकलनाची गुणवत्ता वाढली अशी समजूत आढळते. विचारपूर्वक ठरवलेल्या अध्ययन-निष्पत्तीचा आणि प्रत्यक्षात घडून आलेल्या अध्ययन-निष्पत्तींचा दर्जा ठरवण्याचे उचित व वस्तुनिष्ठ निकष ह्यांची गरज जाणवत नाही असे दिसून येते.

वैज्ञानिक पद्धतीनुसार शिक्षणक्षेत्रात प्रयोग करण्याची आवश्यकता
देशात-परदेशात शिक्षणक्षेत्रातील संशोधनसंस्था आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन तिथे चालू असते. प्रकल्पपद्धत, रचनावादी अध्ययन-अध्यापन, ताणविरहित मूल्यमापनाची नवी पद्धत अशा गोष्टींचा उगम अशा संशोधनांतून होतो. ह्यांच्या परिणामी शाळांमधले अध्यापन बदलणे, सुधारणे अपेक्षित असते. मात्र ह्या बाबतीत एक प्रकारचे कामाचे वाटप आढळते. तज्ज्ञांनी, संशोधकांनी संशोधन करायचे व जिल्हा, गावस्तरावरील अधिकारी, शिक्षक, कार्यकर्ते ह्यांनी त्याची फक्त अंमलबजावणी करायची असे हे वाटप आहे.

शिक्षणतज्ज्ञांनी, संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी अधिकारी व शिक्षकांनी आज्ञाधारकपणे कराव्यात व माहितीचे तक्ते भरून पाठवावेत एवढेच. बाकी सर्व विश्लेषण तज्ज्ञ संशोधकच करतील, तेच निष्कर्षही काढतील व शिक्षकांनी काय करावे हे सांगतील. ह्यातून बुद्धिजीवी संशोधक व कामगार शिक्षक अशी एक अलिखित वर्गव्यवस्था शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेली आहे. बहुतेक शिक्षकांची वृत्ती अशीच होऊ लागली आहे की दरवर्षी काहीतरी नवीन फतवे सरकारकडून निघतात, त्या त्या वर्षापुरते त्यानुसार सांगितलेले काम करावे, परत पुढच्या वर्षी हे जाऊन नवीन काहीतरी येणारच आहे. शाळेत करायचे कृति-संशोधन वगैरे गोष्टी शिक्षकांनी कधीतरी परीक्षेपुरत्या वाचलेल्या असतील, एखाद्या वर्षी उपक्रम केल्यासारख्या एक-दोन वेळा करून सोडून दिलेल्या असतील असेच महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी दिसेल.
“शिक्षकच विशिष्ट हेतूने आपल्या वर्गातच लहान प्रमाणात पण वैज्ञानिक पद्धत वापरून संशोधन करू शकतो व त्यातून जे निष्कर्ष निघतील त्यांचा इतर शाळांना फायदा होऊ शकतो, एखादा जिल्हास्तरीय अधिकारी वैज्ञानिक पद्धत वापरून एखाद्या प्रयोगाची अंमलबजावणी तपासू शकतो, सुधारू शकतो ह्याबाबत जाणीव फारशी दिसत नाही. ह्या परिस्थितीच्या मुळाशी वैज्ञानिक पद्धतीबाबत बेफिकिरी किंवा गैरसमज आहेत. पुढील विवेचनातून वैज्ञानिक पद्धतीच्या काही वैशिष्ट्यांचा महाराष्ट्रातील शिक्षणविषयक बदलांमध्ये कसा वापर करता येईल ह्याबाबतचे गैरसमज दूर होऊन एक सकारात्मक दृष्टिकोण निर्माण व्हायला मदत होईल अशी आशा आहे.

प्रयोगाचा हेतू व नियोजन
प्रयोग करताना त्याचा हेतू व त्या हेतूशी संबंधित असे इतर प्रयोग नाकारून हाच प्रयोग का निवडला हे स्पष्ट केले पाहिजे. अशा प्रयोगाला किती वेळ दिला पाहिजे, संसाधने किती लागतील, कुठल्या परिस्थितीत प्रयोग केला पाहिजे. ह्याबरोबरच प्रयोगाशी संबंधित नैतिकता, त्याचे संभाव्य दुष्परिणाम अशा सर्व बाबींचा विचार करून एक चौकट निश्चित केली पाहिजे. पुढे त्या प्रयोगाचे यशापयश हे ह्या चौकटीसंदर्भातच तपासावे लागते.

उदा. पारंपरिक परीक्षापद्धत बंद करून ताणविरहित असे सर्वंकष व सातत्यपूर्ण मूल्यमापन सुरू करणे हा प्रयोग लक्षात घ्या. प्रयोग सुरू करतानाच अपेक्षित परिणाम दिसण्यासाठी किमान किती वेळ द्यावा, हे काही वस्तुनिष्ठ अशा आधारांवर ठरवायला हवे. असे न करता प्रयोग सुरू केला व काही काळानंतर बंद केला तर वैज्ञानिक पद्धतीकडे दुर्लक्ष करून केवळ लहरीपणे नवनवीन गोष्टी राबवल्या जातात असे वाटेल.

सक्षम असे मनुष्यबळ हा संसाधनांचा एक भाग आहे. ते उपलब्ध नसेल तर राज्यभरातील शाळांमध्ये दरमहा परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांचे विश्लेषण करून अहवाल बनवणे ह्या कामाच्या दर्जाचे नियमन करता येणार नाही व इतर बाबतींत चांगल्याप्रकारे नियोजन केलेला प्रयोगही सक्षम अशा मनुष्यबळाच्या अभावी फसेल.

प्रयोगातून काढलेला निष्कर्ष
सरकारने एखादा शैक्षणिक प्रयोग करून पाहिल्यावर सरकारतर्फे केवळ असे जाहीर करणे पुरेसे नसते की अमुक प्रयोग अमुक जिल्ह्यात फारच यशस्वी झाला आहे व आता तो राज्यभर सगळीकडे करावा.

वैज्ञानिक पद्धतीनुसार असे मानले जाते की वर उल्लेख केलेल्या चौकटीत कोणीही प्रयोग केला व तेच परिणाम दिसून आले तरच निश्चित असा निष्कर्ष व जर-तरच्या स्वरूपातील सैद्धान्तिक मांडणी करता येते. त्यासाठी अशा प्रयोगांचा तपशील खुला करून अनेक ठिकाणी प्रयोग करायला, मतभेदांची चर्चा करायला उत्तेजन दिले पाहिजे.

मोजमापातील वस्तुनिष्ठता
वस्तुनिष्ठ मोजमाप शक्य नसेल तर विज्ञानाची प्रगतीच खुंटेल इतके अशा मोजमापाचे महत्त्व आहे. उदाहरणार्थ, समजा स्वयं-अध्ययन-कार्डे वापरून शिकणे हे पारंपरिक खडू-फळा पद्धतीपेक्षा अधिक कार्यक्षम आहे असा काहीजणांचा अनुभव आहे. अशा वैयक्तिक अनुभवांवर विसंबून वैज्ञानिक निष्कर्ष काढता येणार नाहीत. त्यासाठी ही कार्यक्षमता वस्तुनिष्ठपणे कशी मोजायची? आणि अधिक कार्यक्षम म्हणजे नेमकी किती अधिक? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

हे खरे आहे की शिक्षणक्षेत्रातील मोजमाप हे सामाजिक शास्त्रातील मोजमापासारखे असते. म्हणजे भौतिकशास्त्रात जितक्या नेमकेपणाने मोजमाप करता येते तितके शिक्षणक्षेत्रात अपेक्षित नाही. मात्र, ह्या मुद्द्याचे भांडवल करून मोजमापाच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही किंवा केवळ काही व्यक्तींच्या वैयक्तिक अनुभवाला मोजमाप म्हणता येणार नाही. वस्तुनिष्ठ मोजमाप करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत, खुल्या चर्चेतून, इतरांची मदत घेऊन, त्यात सुधारणा केली पाहिजे.

वैज्ञानिक पद्धतीच्या काही साध्या वैशिष्ट्यांची चर्चा इथे केली आहे. महाराष्ट्रात अनेक वैज्ञानिक असे आहेत की ज्यांच्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. असे वैज्ञानिक सोप्या मराठी भाषेत हा विषय अधिक तपशीलवार समजावून सांगून शकतील. वैज्ञानिक पद्धतीचा वापर सरकार मनापासून करेल व सरकारी फतव्यांच्या लहरीनुसार शिक्षणक्षेत्रात बदल होतात असा गैरसमज निर्माण होऊ देणार नाही अशी आशा आहे.

५-ए, कीर्ति/४, प्लॉट क्र. १, नागरी निवारा वसाहत, सातपुडा सह. गृहनिर्माण सोसायटी, गोरेगाव (पू.) मुंबई ४०००६५.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.