जगण्याचा हक्क

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या मेळाव्यात एक पारदर्शिका झळकली – “Women are dying not because we cannot treat the diseases they have, but they are dying because we still don’t think their lives are worth living !”
संवेदनशून्यतेची कमाल असणारे हे वाक्य. आज 21 व्या शतकातही आपण हे बोलत आहोत !
स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबद्दल आजही जर ही परिस्थिती असेल तर गर्भलिंग-निदान करून स्त्री-लिंगी गर्भाचा गर्भपात करणे हा सामाजिक रोग दूर करण्याचे आपले उपाय किती तोकडे असू शकतील याची कल्पना येईल.
2011 च्या जनगणनेच्या प्राथमिक अहवालानुसार महाराष्ट्रात दर हजार मुलांमागे 883 मुली आहेत. हेच प्रमाण 2001 मध्ये दर हजार मुलांमागे 993 होते.
कमी होणाऱ्या मुलींच्या संख्येबाबत अनेक कारणे दिली जातात – ज्याला आपण ‘विकास’ किंवा ‘प्रगती’ म्हणतो त्याचे हे एक विषारी फळ आहे. शास्त्राने हाती दिलेल्या तंत्रज्ञानाच्या भस्मासुराचा स्त्री-गर्भावर आपण प्रयोग करत सुटलो आहोत. सोनोग्राफीसारखे तंत्रज्ञान वापरून स्त्री-लिंगी गर्भ असेल तर गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता – आर्थिक फायद्याचा हव्यास हे प्रथमदर्शनी कारण झालं. पण ह्याची आणखी खोलात जाऊन चर्चा होते तेव्हा इतरही पुष्कळ मुद्दे पुढे येतात.
‘मुलगाच हवा ही पुरुषप्रधान संस्कृतीची गरज, स्त्रीचे कुटुंबातील दुय्यम स्थान, समाजामधील तिच्या स्थानाचे, कर्तृत्वाचे अवहेलन, गर्भलिंग-निदान करून घेण्यासाठी नकार देण्याची तिची असमर्थतता, कितीही आरक्षणाच्या, समानतेच्या गप्पा मारल्या तरी तिच्या वाट्याला येणारा दुय्यमपणा ही सर्व कारणे पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. ह्यातील सर्वच चर्चा, वाद फोल किंवा निरुपयोगी ठरतात असे म्हणता येणार नाही. समाजमन, वृत्ती बदलण्यासाठी मोठा लढा, मोठा काळ, आणि वाट पाहाण्याची सहनशक्ती असावी लागते. तरीसुद्धा पूर्वीच्या काळातील स्त्रियांचे प्रश्न – बालविवाह, विधवाविवाह, सतीची प्रथा – हे जसे समाजमनाच्या विचार करण्याच्या वृत्तीला आवाहन करीत हळूहळू काही प्रमाणात का होईना कमी होताना दिसले तशी चिह्न अजून तरी स्त्री-लिंगी गर्भ शरीरातून काढून टाकण्याच्या वृत्तीमध्ये दिसत नाहीत. तीस वर्षांपूर्वी ज्या गर्भलिंग निदानावर आम्ही चर्चा करत होतो तीच आजही चालू आहे. किंबहुना सुधारलेल्या तंत्रज्ञानामुळे ते आणखी सुलभ झाले आहे. सामाजिक, आर्थिक, वैचारिक स्तरांवर आपण प्रातीच्या पथावर आहोत असे जर आपल्याला वाटत असले तर समाजाच्या सर्व थरांमध्ये होणाऱ्या स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे, सर्व थरांमध्ये दिसणाऱ्या हुंडाबळींचे प्रमाण कमी झाल्याचे मात्र अद्याप जाणवत नाही.
खरे पाहता प्रश्न सुरू झाला तो ह्या लिंगाधारित गर्भपाताच्याच निमित्ताने. त्यामुळे त्या परिस्थितीची एक पार्श्वभूमी प्रथम सांगितली. गर्भलिंगनिदान करून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांपासून ते स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या पुरुषप्रधानसंस्कृतीत तिला अनेक अधिकार नाकारणाऱ्या समाजापर्यंत सर्व पातळीवर याचा विचार सर्व बाजूंनी सतत होत राहिला पाहिजे. त्यावरची उपाययोजना सगळ्या प्रकारांनी करत राहिले पाहिजे.
यासाठी सध्या चालू असलेला उपाय – सोनोग्राफीचा दुरुपयोग करून स्त्री-लिंगी गर्भ असेल तर गर्भपात करणाऱ्या काही डॉक्टरांवर कारवाई करणे, त्यासाठी सोनोग्राफीच्या मशिनांवरती नियंत्रण ठेवणे. पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे ही कारवाई परिणामकारकरित्या होऊ शकत नाही, कारण तसे झाले आहे, केले गेले आहे ह्याबद्दलचा पुरावा गोळा करण्याचे काम फार अवघड आहे, त्यातून पळवाटा शोधता येतात. अर्थात कायद्याचा फायदा काही काळापुरता तरी मिळालाच असणार. कडक कारवाईच्या भीतीने काही दिवस तरी सोनोग्राफी मशीने बंद राहत असणारच. काही डॉक्टर थोडा काळ का होईना ह्या प्रवृत्तीपासून दूर झाले असतीलही. याचा अर्थ सरसकट सगळेच डॉक्टर हे गैरकृत्य करत होते, किंवा असतात असे नाही. मूठभर स्त्री-रोगतज्ञ, रेडिऑलॉजिस्ट ह्या गैरवर्तनामध्ये आहेत. तरीही ही कीड निपटण्याच्या दृष्टीने समाजातील ही अपप्रवृत्ती आणि डॉक्टरांचा त्यातील सहभाग यावर अधिक खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे असे वाटते.
या निमित्ताने गर्भपाताच्या कायद्याकडेही पाहायला हवे. कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे. वैद्यकीय गर्भपाताच्या नियमांप्रमाणे ठराविक परिस्थितीमध्ये, ठराविक कारणांसाठी गर्भपात करून घेण्याचा स्त्रीला हक्क आहे. वीस आठवड्यांच्या आत असलेल्या गर्भपातासाठी ती डॉक्टरांच्या मदतीने सुरक्षित उपाययोजना करून घेऊ शकते. याच कायद्याचा वापर करून सोनोग्राफीमार्फत गर्भाचे लिंग कळल्यावर स्त्री-लिंगी गर्भ पाडून टाकला जातो आणि समाजमनात आजही स्त्रीच्या आयुष्याचे मूल्य नगण्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होते.
ह्या गोष्टीला आळा बसावा यासाठी स्त्री-गर्भ पाडला गेला तर तो मनुष्यवध समजून 302 कलमाखाली तो गुन्हा मानला जावा असा एक विचार मांडला गेला आहे. हा विचार अतिशय चांगला असला तरी त्यात मोठीच अडचण आहे. समजा, व्यंग असलेल्या गर्भाचे निदान सोनोग्राफीद्वारा झाले तर वीस आठवड्यांच्या आत गर्भपात करून घेणे हे आज नियमबाह्य ठरत नाही, तेही या नव्या कायद्यात गैर ठरू शकेल.
हाच विचार थोडा आणखी पुढे नेऊन पाहू. व्यंग असलेले मूल इतर सर्वसाधारण माणसांच्या समाजामध्ये जगण्यासाठी लायक ठरत नाही असे ठरवले जाते; हेही माणुसकीला धरून नाही, असा युक्तिवादही जर कुणी करेल तर त्याला आपण काय उत्तर देणार? गर्भपाताच्या नियमानुसार स्त्रीला हा निर्णय घेण्याचा हक्क दिलेला आहे, त्याच्या मागे स्त्रीचा आपल्या जनननिर्णयावरील अधिकार गृहीत आहे. मग ज्या मुलीच्या जन्मामुळे तिला स्वतःला कुटुंबात कमी लेखले जाणार आहे आणि जन्मलेल्या बालिकेलाही कदाचित अवहेलना भोगावी लागणार आहे. त्यातून पुढचा मुलगा होईपर्यंत गरोदरपण-बाळंतपण ह्या चक्रातून तिला जावेच लागणार आहे. जन्माला आलेल्या त्या बालकाचे संगोपन तिला अधिकाधिक अवघड जाणार आहे – अशा वेळी स्त्री-लिंगी गर्भाला जर तिने नाकारायचे ठरवले तर काय बिघडले? वरवर पहाता हा युक्तिवाद बरोबर वाटू लागतो. पण विचार केला तर स्त्री-लिंगी गर्भाचा अशा प्रकारे घात करणे ही समाजमनाची फार मोठी विकृती आहे असे लक्षात येते. निसर्गाचा, समाजाचा समतोल बिघडवून टाकणारी क्रूर कृती आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा स्त्री अक्षरश: बळी ठरते आहे. मुलीच्या जन्मानंतरचे सध्याचे भोग तिला आणि मुलीलाही भोगायला लागणार नाहीत असा आश्वासक आधार समाजाकडून – समाजाच्या वागणुकीतून – त्या स्त्रीला मिळाला तर कुणीही आई असा लेकीचा गर्भ म्हणून गर्भपात करून घेण्यास पुढे येणार नाही. ‘दासी म्हणून त्यागणे किंवा देवी म्हणून भजणे’ या दोन्हीच्या मधली ‘माणूस’ म्हणून स्त्रीचे जगणे हे समाजाच्या निरामय आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
या लिंगाधारित गर्भपाताबाबत एक गोष्ट निश्चितपणे दिसून येते की शहरी, सुसज्ज समाजामध्ये ह्याचे प्रमाण जास्त आहे. एका बाजूला स्त्रीशिक्षणाची आणि समाजाची शैक्षणिक पातळी वाढली, लेखन वाचन करणाऱ्यांची टक्केवारी वाढली तर तो समाज प्रगत होतो असे समजले जाते. पण वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करणारा समाजच या गर्भपातांमध्ये अग्रेसर आहे असेही लक्षात येते.
ग्रामीण भागामध्ये मुलामुलींचे प्रमाण जन्मतः शहरीभागापेक्षा बरे आहे पण त्या भागात नवजातशिशू मृत्यूचे प्रमाण, 5 वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यातही मृत्यू पावणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त आहे !
ह्या अशा आपल्या सामाजिक रोगावर उपाय तरी काय? तातडीच्या, जागच्या जागी लगेच करायच्या उपायांची गरज आहे. तशीच सर्वदूर सामाजिक सुधारणांच्या कार्यक्रमांचीही गरज आहे. ताबडतोब करण्याचे उपाय म्हणून डॉक्टरांवर करण्यात येत असलेल्या कारवाईचा उल्लेख करता येईल. सुरवातीला म्हटलं तसं अशा डॉक्टरांना पकडणे सोपे नाही पण
• सोनोग्राफी केंद्राची वेळोवेळी तपासणी
• आवश्यक कागदपत्रांची तपासणी
• शक्य असल्यास, अशा डॉक्टरांविरुद्ध स्टिंग ऑपरेशन व कारवाई
• सहज ने-आण करता येण्याजोग्या मशिन्सना परवानगी नाकारणे – अशी मशिन्स फक्त हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक परिस्थितीतच वापरणे.
• प्रत्येक सोनोग्राफी मशीन संगणकीकरणातून एका केंद्राला जोडणे की ज्यामुळे ह्या सर्व सोनोग्राफी मशिन्सवरच्या सर्व तपासण्या या केंद्रात आपोआप नोंदल्या जातात.
या सर्व उपायांमध्ये अनेक तांत्रिक व नैतिक अडचणी आहेत यातूनही काही महाभाग मार्ग शोधतीलच तरीही काही प्रमाणात ह्याचा उपयोग होऊ शकेल.
समाजाला मात्र जागे करायला नगारेच वाजवायला हवेत. वेगवेगळ्या पद्धतींनी आणि वारंवार नाटके, पथनाट्ये, लेख, भाषणे, दूरदर्शन अशा सर्व माध्यमांचा उपयोग करून संवेदनाशून्य बनलेल्या ह्या समाजपुरुषाला जागे करण्याचे काम चालू ठेवले पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेल्या स्त्रीवर मात्र कायदेशीर कारवाई करण्यात अर्थ नाही.
दुसरी टोकाची भूमिका घेत स्त्रीलिंगी गर्भाचा गर्भपात हा गुन्हा – हत्या किंवा खून म्हणून त्याला इंडियन पीनल कोडच्या 302 कलमानुसार शिक्षा देण्यात यावी अशी सूचना महाराष्ट्र विधानसभेत मांडण्यात आली आहे, ती विचाराधीन आहे, ती मात्र नाकारली गेली पाहिजे. अन्यथा ‘कायदेशीर आणि सुरक्षित गर्भपात’ ह्या स्त्रियांच्या मूलभूत हक्कावरच गदा येईल. डॉक्टरांनी तर जबाबदारीनेच वागायला हवे आहे.
मुलाला ‘वंशाचा दिवा’ म्हणणारे आणि मुलीला ‘परक्याचे धन’ समजणारे सगळे सामाजिक, आर्थिक संदर्भ दूर झाले पाहिजेत. सामाजिक सुधारणांचे कार्यक्रम जोमाने राबवायला हवेत. स्त्रीचा ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क कुठल्याही परिस्थितीत नाकारला जायला नको.
आज संवेदनाशून्य झालेले समाजमन, डॉक्टरांच्या आणि इतर समाजाच्याही बोथट झालेल्या सामाजिक जाणीवा, पुरुषप्रधान संस्कृती, पैशाला आलेले अनन्यसाधारण महत्त्व ह्या सगळ्या गोष्टींमुळे समाजाचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडतच चालले आहे. आपल्या देशाची भ्रष्टाचाराबद्दल जगभर ख्याती असताना, आज देशभर गावागावातल्या नवतरुणांनी ‘भ्रष्टाचार नको’ म्हणून उठवलेला आवाज ही जर खरोखर संवेदनशीलतेच्या बहराची नांदी असेल तर आपणही आशा न सोडता प्रयत्न करायलाच हवेत. कधीतरी ते निश्चितच सफल होतील.
5 फेब्रुवारी 2003
अक्षयच्या कॉलेजमध्ये काही कारणाने गेले होते. सहज ऑफिसमधल्या एका नोटिसबोर्डाकडे लक्ष गेले. एक कविता लिहिली होती. कुणा भूगोलाच्या शिक्षकाने लिहिली होती.
कोलंबिया यानाची दुर्घटना घडली त्यात कल्पना चावला ह्या भारतीय वंशाच्या मुलीचा – बाईचा – दुर्दैवी अंत झाला. इतर सहाजणांबरोबर तीही अक्षरशः अनंतात विलीन झाली. त्या विषयावरची कविता होती. त्या सगळ्याच अंतराळवीरांबद्दल खरे तर साऱ्या मानवजातीला वाईट वाटले. कल्पना ह्या भारतीय नावाने आम्हाला जरा जास्त जवळ वाटते! का?
कवितेतील एका ओळीपाशी मात्र मी माझे विचार थबकले – कल्पना कशी मोठी होती – तिची अंतराळातील झेप ह्याबद्दल दोन चार ओळ्या होत्या. त्यानंतर तिच्या भारतीय असण्याबद्दल जणू पुरावा म्हणून काय लिहिले असावे?
ती भारतीय होती शेवटपर्यंत
कारण ती अहेवपणी गेली !
अंतराळात झेप घेण्याच्या काळाबद्दल आपण बोलत आहोत. मानसिकता अगदी पूर्ण बदलणार नाही – पण अशा प्रकारच्या विचारांतूनही आम्ही बाहेर पडलोच नाही की काय? नवऱ्याचा मृत्यू बायकोच्या आधी झाला तर त्यात बायकोचा काही दोष अथवा पाप आहे असे समजणारा आपला अठराव्या शतकातील समाज अजून तसाच आहे?
कल्पना चावलाने अंतराळात झेप घेतली ह्यापेक्षा ती नवऱ्याच्या आधी मरण पावली आणि मृत्यूनंतरही सुवासिनी राहिली हेच तिचे मोठे कर्तृत्व की काय आणि असे समजण्यात – मानण्यात मोठेपणा वाटणे हेच भारतीयत्व की काय?
12 फेब्रुवारी 2003
अश्विनी जागडे, 3 फेब्रुवारीला आली नाही तेव्हाच आमच्या मनात आले होते. ही बाई घरीच प्रसूत होणार आणि बाळाला घेऊनच येणार. पहिल्या बाळंतपणात तिला खूपच त्रास झाला होता. रक्त द्यावे लागले होते. ती मरता मरता वाचली होती. ते मूल मात्र गेले. दुसरी मुलगी झाली तेव्हा ती घरीच बाळंतीण झाली होती. ह्या तिसऱ्या खेपेला मात्र ती अगदी नियमितपणे तपासायला येत होती, सांगितलेल्या सूचना पाळत होती. औषधे घेत होती. तेव्हा डिलेव्हरीसाठी आली नाही तेव्हा आम्हाला थोडे आश्चर्य वाटले.
आज ती ओ.पी.डी.मध्ये आली होती. बाळाला घेऊन त्याला तपासण्यासाठी. मी विचारले ‘घरीच झालीस का बाळंतीण? तेव्हा ती म्हणते,
“नाही. गुरुवारी 10 तारखेला माझ्या पोटात दुखायला लागले तेव्हा रिक्षात बसून दवाखान्यात यायला निघाले पण दांडेकरपुलाजवळ रिक्षातच बाळंतीण झाले तेव्हा मग रिक्षा परत फिरवली आणि घरीच गेले !”
“धन्य आहे तुझी !” एवढेच मी म्हटले. डिलेव्हरी झाल्यानंतर कशाला दवाखान्यात यायचे? हा तिचा विचार असणार. Infection / Bleeding वगैरे आमच्या मनातले प्रश्न. उगाच पैसे खर्च कशाला करायचे असा तिचा साधा हिशेब.
ओ.पी.डी. संपल्यावर ती मला परत भेटली. बाळाला दाखवून परत निघाली होती – परत जाताना जणू मागचे संभाषण पूर्ण करत ती म्हणाली, “पण काय उपयोग डॉक्टर, मुलगीच झाली परत – मुलगा असता तर….” म्हणजे मुलगा असता तर तिने रिक्षा परत घराकडे न वळवता हॉस्पिटलमध्ये आणली असती !
28 जून 2007
तारा क्षेत्री, 16 वर्षांची बारीकशी मुलगी. तिची आई तिला घेऊन आली होती. “पोटात दुखते तिच्या, खूप डॉक्टरांकडे जाऊन आलो, खूप औषधं केली, तरी गुण नाही.” म्हणून तिने अजून एक नवीन डॉक्टर – म्हणजे मी गाठला होता. ताराचे लग्न होऊन सात महिने झाले होते ! वय 16 वर्षे. तिची आईही लहानच दिसत होती – तिच्या मोठ्या बहिणी एवढीच. “ताराचं लग्न इतक्या लवकर का केलं” असे मी विचारले तर त्या म्हणाल्या, “तिच्या आत्यानं मागितलं, मग करून द्यावं लागलं.” कर्नाटकातल्या खेड्यात तिचे सासर. (म्हणजे तिच्या आतेभावाशी तिचे लग्न झाले.) “तुमचं लग्न लवकर झालं. मुलीचं लग्न करायची कशाला घाई केलीत?” “माझं लग्न तर खूपच लवकर झालं – मला तेराव्या वर्षीच ही तारा झाली. आता माझं वय 29 वर्षे आहे !”
ताराला मी तपासले. तपासणीत तर काही दोष आढळला नाही. तिचे सगळे तपासणीचे निष्कर्ष पाहिले सगळे व्यवस्थित होते. रक्त तपासणी, सोनोग्राफी सगळे Reports Normal पण आई सांगत होती, “ही खात नाही, चिडचिड करते पोटात सारखं दुखतं म्हणते. बसून रहाते.” काही नक्की कळत नव्हते. तितक्यात डॉ. भाग्यश्री आली आणि तिच्या आईला म्हणाली, “तिच्या सासूचं सांगितलंत का?”
ती एक कथाच होती लग्नाला 5-6 महिनेच झालेले. वय वर्षे 16 खरे तर 15 च पूर्ण. मासिक पाळीच्या वेळी ताराच्या पोटात खूप दुखू लागले. पाळीमध्ये पोटात दुखते आणि सहा महिने झाले तरी अजून दिवस राहिले नाहीत म्हणून ताराची सासू तिला एका देवर्षीकडे घेऊन गेली. त्या देवर्षीने ताराला पाहिले आणि सांगितले की ह्या मुलीला मूल होणार नाही. संतती होणार नाही ! त्याने तिला खाण्यासाठी एक लिंबू दिले. ताराने ते लिंबू घेण्यास नकार दिला. ताराची सासू संतापली. तिने ताराला माहेरी पाठवून दिले. ताराची पोटदुखी चालूच राहिली !
ताराचा नवरा गुरुवारी येणार होता. तोपर्यंत पोटदुखीवरच्या गोळ्या देऊन तिला मी पाठवले आणि तिच्या नवऱ्याबरोबर तिला परत बोलावले.
गुरुवारी ताराचा नवरा, आई, तारा सगळे आले. ताराचा नवरा 21-22 वर्षाचा मुलगा. आणि तो गावाकडे मेडिकल प्रैक्टिस करत होता! काय शिकलात? तर तो म्हणाला “RMP डाक्तर आहे.” “कुठे शिकलात?” “4-5 वर्षे शहरात एका डाक्तरकडे काम केलं. आता स्वतःच गावात पॅक्टिस करतो.”
“ताराच्या तपासण्या ठीक आहेत. तिला मोठा रोग कुठलाच नाही आणि खरे तर इतक्या लवकर तिला मूल होऊ देणे योग्य नाही 18 वर्षांची होईपर्यंत तरी थांबावं. “तो आता मेडिकल क्षेत्रात असल्यामुळे त्याला कळायला हरकत नाही…” वगैरे वगैरे गोष्ट मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापर्यंत किती पोहोचत होते कळत नव्हते.
सगळ्यात शेवटी दोन गोष्टी विशेष. स्वतःला 13 व्या वर्षी मूल झाले तरी किंवा म्हणूनच – ताराच्या आईचे उद्गार होते – “पण एक मूल होऊन गेलं – मूल झालं म्हणजे बरं” आणि ताराचा नवरा दोन दिवसांनी परत जाणार होता. त्याच्याबरोबर जायच्या आशेने तारा आनंदात दिसत होती!
ताराच्या सासूने बोलावल्याखेरीज ताराची आई मात्र ताराला परत सासरी पाठवणार नव्हती!
जुलै 2008
ताराची आई आज एका दुसऱ्या पेशंटला घेऊन आली होती. तिच काम झाल्यावर ताराच्या आईने सांगितले “तारा गरोदर आहे. सातवा महिना आहे.” आपली एक जबाबदारी संपली अशा आनंदात ती होती. 17 वर्षांच्या आपल्या मुलीच्या पदरात हे जबाबदारीचे ओझे घालून ती मोकळी झाली होती.
9-सुसंगत अपार्टमेंट, पांडुरंग कॉलोनी, एरंडवणे, पुणे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.