आजचा सुधारक ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना ह्या राजकीय पक्षांना पाठवलेली प्रश्नावली

1. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या वेळी संपूर्ण मराठी जनतेने पाहिलेले संपन्न, समर्थ व कष्टकऱ्यांच्या राज्याचे स्वप्न साकार का होऊ शकले नाही? 2. महाराष्ट्रराज्यनिर्मितीच्या 51 वर्षांनंतरही त्यात मराठीपण कुठे दिसत नही, उलट मराठी भाषा दीनवाणी झाल्याचेच चित्र दिसते, ह्याला जबाबदार कोण? सरकारने जबाबदारी टाकली असे मानले, तरी सर्व राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व मराठी माणूस यांनी आपली जबाबदारी पार पाडली असे आपल्याला वाटते का?
3. आपल्या पक्षाने मराठी अस्मितेचे राजकारण केले. पण मराठी माणसासाठी काहीएक केले नाही असा आक्षेप घेण्यात येतो, याविषयी आपले काय म्हणणे आहे?
4. आपल्या पक्षाकडे आर्थिक विचार नाही, असलाच तर तो व्यापारी-भांडवलदार ह्यांच्याच हिताचा आहे, जागतिकीकरणात भरडले जाणारे मराठी भाषिक शेतकरी, मच्छीमार, गिरणीकामगार यांच्यासाठी आपला पक्ष लढला नाही ही टीका योग्य आहे काय?
5. मराठीकारणाच्या प्रश्नावर सक्रिय असणारे इतर पक्ष व आपला पक्ष यांमध्ये नेमका फरक कोणता? हा फरक केवळ व्यक्तिगत नेतृत्वाचा आहे की धोरणे व दृष्टिकोण यांचाही आहे? असल्यास कसा?
6. वेगाने बदलणाऱ्या सध्याच्या जगात मराठी माणसाचे स्थान काय? जागतिकीकरणाला आपल्या पक्षाचे उत्तर ‘वडापाव’ एवढेच आहे का? सविस्तर मांडणी करा.
7. मराठी समाजाचाच भाग असलेले दलित, स्त्रिया, भटक्ये-विमुक्त, बिगरहिंदू अल्पसंख्य यांच्याविषयी आपल्या पक्षाची भूमिका काय?
8. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू नयेत ह्यासाठी आपल्या पक्षाने कोणते प्रयत्न केले आहेत?
9. न्यायालयीन व्यवहारात व उच्च शिक्षणात मराठी भाषेचा वापर व्हावा. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी याबाबत आपल्या पक्षाची भूमिका काय आहे व त्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत?
10.प्रादेशिक भाषा व बोली भाषा यांच्या रक्षणासाठी आपला पक्षाची भूमिका काय? त्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले आहेत?
11. मराठी माणूस महाराष्ट्रातील अन्य भाषिकांपेक्षा आळशी व बेजबाबदार आहे असा अनुभव येतो. महाराष्ट्रात मराठी माणसाला प्राधान्याने नोकऱ्या मिळाव्यात असा आग्रह धरत असतानाच त्याला कष्टाळू व जबहाबदार नागरिक बनवण्यासाठी, स्वयंरोजगारास उद्युक्त करण्यासाठी आपल्या पक्षाने कोणते प्रयत्न केले आहेत?
12. दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे सत्ताकेंद्र आहे, परंतु तेथील राजकारणावर महाराष्ट्राचा प्रभाव नाही. तसेच सनदी अधिकाऱ्यांमध्येही मराठी टक्का फार कमी आहे. अशा परिस्थितीत मराठी माणसाला देशाचे नेतृत्व करण्याची प्रेरणा कशी देता येईल?
13. आपल्या पक्षाने ‘मराठीकारण’ सोडून हिंदुत्वाची कास धरली. त्यामुळे ‘मराठी’ माणसाचे व समाजाचे नुकसान झाले असे आपणास वाटत नाही का? 14.तेलगू देसम डी एम के किंवा ए आय ए डी एम के यांप्रमाणे यशस्वी प्रादेशिक पक्ष होणे आपल्या पक्षाला का जमले नाही?
(टीप : प्रश्न क्र.13 व 14 फक्त शिवसेनेसाठी आहेत.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.