आपल्या भाषा पुरेश्या विकसित आणि समर्थ आहेत

कित्येक लोकांच्या मनात असा भ्रम आहे की आपल्या भाषा पुरेश्या समर्थ नाहीत आणि आजच्या जमान्यात सर्व व्यवहार आपल्या भाषेत चालू शकणार नाहीत. हा भ्रम पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. हे मी आपल्या भाषेच्या अभिमानामुळे केवळ सांगत नाही; परंतु हीच खरोखर वस्तुस्थिती आहे.
खरे पाहता आपल्या भाषा खूपच विकसित भाषा आहेत. शेकडो वर्षांपासून आपल्या सर्व भाषांचा विकास होत आला आहे. आजपर्यंत त्यांचा खूपच विकास झाला आहे व पुढेही तो होणार आहे. पाहा, कन्नड भाषेत एक हजार वर्षांपासून उत्तम साहित्य लिहिले जात आहे. त्यांत ज्ञान काही कमी नाही. खरे पाहिले म्हणजे एक हजार वर्षांपूर्वी इंग्रजी भाषा नव्हती. मी पाहिले की तामिळ भाषेत केवढे प्राचीन साहित्य आहे! कदाचित संस्कृत वगळता एवढे विशाल साहित्य हिन्दुस्थानच्च कोणत्याही प्रचलित भाषेत नाही. आणि असे असूनही आपण असे मानतो की आमची भाषा पुरेसी विकसित नाही किंवा पुरेशी समर्थ नाही.
दुसरे एक उदाहरण देतो. ‘कॅन्टरबरी टेल्स्’ हा इंग्रजीतील बाराव्या शतकातील ग्रंथ आहे. त्याच वेळी लिहिलेला ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ’ हा मराठीत आहे. दोन्ही पुस्तके मी वाचली आहेत. दोघांचाही मी अभ्यास केला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढे शब्द आहेत, त्याच्या एकचतुर्थांशदेखील शब्द ‘कॅन्टरबरी टेल्स्’ मध्ये नाहीत. आणि ‘ज्ञानेश्वरी हा काही मराठीमधील पहिला ग्रंथ नाही. त्याच्यापूर्वीही पुस्तके लिहिली आहेत. मला हे सांगावयाचे आहे की आपल्या सर्व भाषा फार विकसित भाषा आहेत. त्यांत संस्कृत तर फारच समृद्ध आहे.
ही गोष्ट खरी आहे की, आपल्या भाषेत एवढ्या विज्ञानाच्या गोष्टी नाहीत. परंतु हे आधुनिक विज्ञानाचे साहित्य किती वर्षांचे आहे? फार फार तर शंभर-दोनशे वर्षांचे आणि हे सर्व लिखाण आपल्या भाषेत न आल्याने साध्या विज्ञानाचे साहित्य इंग्रजीतच अधिक आहे. परंतु जसजसे आपल्या भाषेत विज्ञान अंतर्भूत होईल तसतसे विज्ञानाच्या बाबतीतही आपल्या सर्व भाषांचा अवश्य विकास होईल ह्यात शंका नाही.
ह्या गोष्टीकडे जरा दुसऱ्या दृष्टीने पाहा. विज्ञानाचा प्रसार आपल्याकडे विशेष न झाल्याने त्याचे शब्द आपल्या भाषेत आज नाहीत. परंतु तशीच स्थिती इंग्रजी भाषेची दुसऱ्या क्षेत्रात आहे. माझेच उदाहरण देतो. एकदा बुनियादी शिक्षणाची एक समिती दिल्लीत एकत्र आली होती. डॉ. झाकीर हुसेनही त्यात होते. इंग्रजी भाषेत चर्चा चालली होती. त्यात शब्द आला ‘कोरीलेशन’. मी म्हणालो, मी कोरीलेशन जाणत नाही. पण ‘समवाय’ जाणतो. आणि समवायला इंग्रजीत काय म्हणतात ते मी जाणत नाही.
‘समवाय’ मी जाणत आहे, कारण ती माझ्या शिक्षणाची पद्धती आहे. ती बाहेरून आली नाही, तर ती माझ्या जीवनाशी निगडित आहे.
त्यानतंर त्या लोकांनी मला सांगितले की तुम्ही समवायचा जर इंग्रजी पर्याय सांगू शकत नसाल तर त्याचा अर्थ समजून द्या. तेव्हा मी त्यांच्यासमोर समवाय पद्धतीवर एक व्याख्यानच देऊन टाकले. मातीचा घडा बनविला. मातीपासून घडा वेगळा आहे किंवा नाही? जर तुम्ही सांगाल की वेगळा आहे तर मी सांगेन माझी माती मला द्या व तुमचा घडा तुम्ही घेऊन जा! आणि दोन्ही एक आहेत असे जर सांगाल तर मी सांगेन, पाहा ती माती! ती घ्या आणि दोन्ही जर एक असतील तर त्यांत माती भरून दाखवा.तात्पर्य असे की, ते दोन्ही एक आहेत असेही सांगता येणार ही आणि वेगळे आहेत असेही सांगता येणार नाही. त्याच रीतीने ज्ञान आणि कर्म वेगळे आहेत असे सांगता येणार नाही आणि एकही आहे असे सांगता येणार नाही हा आहे समवाय. त्याला ह्यासाठी एखादा इंग्रजी शब्द असेल, पण तो मला कुठे येतो?
अश्या रीतीने शब्दांच्या बाबतीत असे आहे की ज्या क्षेत्राचा प्रसार झाला असेल त्या क्षेत्राचे शब्द त्या भाषेत असतात. इंग्रजीत विज्ञानाचा प्रसार झाला आहे; त्यामुळे त्यासंबंधीचे शब्द आणि त्याची परिभाषा त्या भाषेत आहे. परंतु ज्या क्षेत्राचा प्रसार त्यांत अंतर्भूत झाला नाही त्याचे शब्द त्यात फार कमीच असतील. उदाहरणार्थ, अध्यात्माचा प्रसार आपल्याकडे जेवढा झाला आहे तेवढा तेथे नाही. म्हणून मला अनेकदा वाटते की कृष्णमूर्तीची व्याख्याने तेथील लोकांना कशी समजत असतील? ते भारती भाषेत नव्हे तर इंग्रजीत व्याख्याने देतात. ज्या शब्दांच्या बरोबर विचार जोडलेला असतो त्यांना खास ‘कोनोटेशन’ असते. परकीय भाषेत जे कोनोटेशन असतात ते बऱ्याच वेळेला आपल्या शब्दांच्या कोनोटेशनबरोबर मिळतेजुळते नसतात. पाहा, इंग्रजीत ‘माइन्ड’ म्हणतात. माइन्ड म्हणजे तुम्ही काय समजलात? आपल्याकडे तर किती विविध अर्थाचे शब्द आहेत – मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण. कारण की आपल्याकडे अध्यात्माचे क्षेत्र फार रुजलेले आहे आणि प्रत्येक बाबतीत फार सूक्ष्म विचार झालेला आहे. म्हणजे विविध अर्थाचे अनेक शब्द तयार झालेले आहेत. तसे शब्द जे अध्यात्मात मिळतात तसे इंग्रजीत नसतात.
मला तर असे वाटते की मानसशास्त्राच्या बाबतीतही आपल्याकडे अत्यंत सखोल असा विचार झालेला आहे. आपले शब्द पाहा. चित्तशुद्धी अथवा चित्तवृत्ति निरोध असे शब्द इंग्रजीत सापडणार नाहीत. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अथवा सामाजिक क्षेत्रातही ही स्थिती आहे. समाजशास्त्र व राज्यशास्त्रही याला अपवाद नाही. म्हणन या सर्व क्षेत्रांत जर आपण इंग्रजीवर अवलंबून राहिलो तर आपली विचार करण्याची पद्धती गोंधळात पडेल. इंग्रजीत ह्या सर्व बाबतींत सूक्ष्म विचारासाठी पुरेसे शब्द नाहीत. थोडक्यात, विज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या भाषेत पुरेसे शब्द नाहीत म्हणून आपली भाषा पुरेशी समर्थ नाही असे मानणे पूर्ण अवास्तविक आहे. आपल्या भाषा तर अतिशय विकसित भाषा आहेत. आपल्याकडे विज्ञानाचा जसजसा अभ्यास होईल तसे त्या क्षेत्रातही आपल्या भाषा समृद्ध होतील आणि तोपर्यंत आपण इंग्रजी शब्द वापरू. असे शब्द वापरण्यात काय चूक आहे व काय कठीण आहे? एक भाग ऑक्सिजन आणि दोन भाग हायड्रोजन मिळून पाणी तयार होते असे सांगता येणार नाही? तश्याच रीतीने लाऊडस्पीकर हा शब्द आहे. तो आपला कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्यांच्यावर परिणाम केल्याशिवाय वाक्यरचनेत बसत असेल तर तो शब्द स्वीकारण्यात कोणतेच नुकसान नाही. असे शब्द सरळ इंग्रजीत आपणाकडे चालू शकतील. मोटर, स्टेशन, टेबल वगैरे शब्द पण आपण स्वीकारले तर त्यात काही हरकत नाही.
मुळात हे समजले पाहिजे की भाषेतील शब्द व्यवहारातून वाढतात. एका यंत्राच्या भागाची नावे अलगअलग असतात. ते यंत्र नीट समजून घ्यावयाचे असेल तर अशी शंभर-दीडशे नावे माहिती करून घ्यावी लागतील. अशा नावांतून मोठा शब्दकोश तयार होतो. परंतु केवळ त्याने मात्र भाषेची शक्ती वाढत नाही. तसेच काह शब्द आपल्या भाषेत नसले तरी त्यातून भाषेचे काही कमी होत नाही. एक तर व्यवहार वाढतो आणि शब्दही वाढतात. खरे पाहाता भाषेचे अस्सल सामर्थ्य तर धातु-सामर्थ्य आहे. भाषेची शक्ती धातूची शक्ती आहे. कोणत्या भाषेत किती धातू आहेत त्यावर तिची अवलंबून आहे. जास्तीत जास्त धातू लॅटिन व संस्कृतमध्ये आहेत. आपल्या भाषेत तुलनेने धातू कमी असतील, परंतु ते आपणास संस्कृतमधून सहजगत्या घेता येतात. म्हणजे संस्कृत व आपली हल्लीची भाषा दोन्ही मिळून काही कमी सामर्थ्य आपल्या भाषेत आहे असे आपणास जाणवणार नाही. म्हणून आपली भाषा समर्थ नाही हा विचार मनातून काढून टाका. आपल्या भाषेत काही कमी नाही, किंबहुना आपल्या भाषा तर फारच विकसित व समर्थ भाषा आहेत.
त्यामुळे आपल्या भाषेतून आजचा सर्व व्यवहार होऊ शकणार नाही ही गोष्ट चुकीची आहे. किंबहुना सर्व व्यवहार आपल्या भाषेतच झाला पाहिजे. विज्ञानसुद्धा आपल्या भाषेतून स मान्यजनांपर्यंत पोहचविले पाहिजे. ही बाब निश्चित समजून घ्या; की जोपर्यंत विज्ञान मातृभाषेतून लोकांसमक्ष ठेविले जात नाही तोपर्यंत ते व्यापकपणे पसरू शकणार नाही. ह्यासाठी ते आपल्या सर्व भाषेतून आणणे अनिवार्य आहे.
ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो की जे सर्व सुशिक्षित लोक आपल्या भाषेत विज्ञान नाही अशी जी ओरड करतात त्याऐवजी विज्ञान आपल्या भाषेत आणण्यास काहीतरी योगदान करतील तर बरे होईल. इंग्रजीत विज्ञानाची चांगली पुस्तके आहेत. ती सर्व आपल्या भाषेत आणली पाहिजेत. परंतु ह्यासंबंधी कुणी विचारच करत नाहीत. खरे पाहता ज्यांनी स्वतः इंग्रजीचे ज्ञान मिळविले त्यांनी व्रत घेतले पाहिजे की मी मरण्यापूर्वी एका चांगल्या इंग्रजी पुस्तकाचा माझ्या मातृभाषेत अनुवाद करीन. असा अनुवाद केल्याशिवाय मला मरण्याचा अधिकार नाही. असे झाले तरच आपल्या नंतरची पिढी इंग्रजीच्या ओझ्यातून वाचू शकेल. पितृ-धर्माची ही जरुरी आहे. हे तर सहजपणे होऊ शकेल. त्यासाठी राज्याचीही मदत घेता येईल. असे झाले तर सुमारे दहा वर्षांत विज्ञानाविषयीचे इंग्रजी ज्ञान आपल्या भाषेत येऊ शकेल व त्याविषयी नंतर कुणाला तक्रार करण्यास जागा राहणार नाही.
हे सर्व सहजगत्या होणार नाही, त्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल. आज अनेक क्षेत्रांत इंग्रजीशिवाय चालत नाही असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचबरोबर असा आपण विचार करीत नाही की इंग्रजीला हे स्थान मिळाले कशामुळे? काही आपोआप तर मिळाले नाही? त्यासाठी इंग्रजांनी केवढा मोठा पुरुषार्थ केला आहे. त्यामुळे आज तर परिस्थिती अशी आहे की आपल्या स्वतःच्या देशामधील भाषा जर आपणांस शिकावयाच्या असतील तर त्या इंग्रजीमार्फत शिकाव्या लागतात. समजा मला बंगाली भाषा शिकावयाची असली तर मला मराठी गुजराथी किंवा कन्नड भाषेमार्फत ती शिकता येईल का? नाही. कारण मराठी, गुजराथी, कन्नडमध्ये मला बंगाली भाषाकोश मिळणार नाही. तो इंग्रजीत मिळेल. त्यामुळे मला इंग्रजीमार्फतच बंगाली शिकावी लागेल.
असेच बाहेरच्या भाषांबाबतही आहे. मध्यंतरी मी चिनी भाषा शिकत होतो. त्यासाठी माझ्याकडे जी पुस्तके आली ती इंग्रजीतच होती. म्हणजेच येथील व बाहेरची भाषा आपणांस इंग्रजीमार्फतच शिकता येईल अशी परिस्थिती आहे. कारण की इंग्रजी भाषेत प्रत्येक भाषेसंबंधीचा कोश मिळू शकतो. हे कोश असेच विनासहायच बनले असतील का? त्यासाठी त्या लोकांनी किती मेहनत केली असेल? खूप मेहनत करून त्या लोकांनी आपली इंग्रजी भाषा संपन्न बनविली आहे. ह्यासाठी त्यांच्याकडून बोधपाठ घेऊन आपणसुद्धा खूप मेहनत करून आपली भाषा संपन्न केली पाहिजे. असे काही करण्याऐवजी, बस, इंग्रजीशिवाय चालणार नाही; असे जर आपण रडगाणे गात बसलो तर ते उचित होणार नाही. हे तर आपल्या आळसाचे आणि आपल्या पुरुषार्थहीनतेचे लक्षण गणले जाईल. आपल्या गुलामीची मानसिक निशाणी गणली जाईल. आपल्या भाषेलादेखील आपण संपन्न बनवू या, ही ईर्षा शिकलेल्या सवरलेल्यांना चढली पाहिजे.
परंतु अशी ईर्षा कुठे आहे? त्यासाठी तर अध्ययनशील बनावे लागेल. व्यापारी, इंजिनियर वगैरे बनण्यास विज्ञान वाढवावे लागेल. विविध सामाजिक शास्त्रे शिकवावी लागतील. हे सर्व करावे लागेल. परंतु आज तर शाळा-कॉलेज सोडल्यानंतर आपले अध्ययन समाप्त होत असते. तर हे सर्व कसे होईल?
ह्यासाठी मला हे सांगावयाचे आहे की आपल्या भाषा पुरेश्या समर्थ आहेत. एवढेच नव्हे, तर इंग्रजीच्या तुलनेत फारच विकसित आहेत. त्यात विज्ञानाची जी कमतरता आहे त्याची पूर्तता आपण सर्वांनी केली पाहिजे आणि त्या बाबतीत आपल्या सर्व भाषा संपन्न होतील असे पाहिले पाहिजे. ह्यासाठी फार मोठा पुरुषार्थ करावा लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.