पत्रसंवाद

आशुतोष दिवाण, कोल्हापूर
मी आपला एक नियमित वाचक आहे. आजकाल मला एक अडचण जाणवत आहे ती आपणास कळवतो. माझ्या असे लक्षात आले आहे की बरेचसे लोक (जवळजवळ सगळेच) सामाजिक, राजकीय, वैचारिक चर्चामध्ये वेगवेगळ्या संज्ञा फारच अंदाजे आणि भोंगळ स्वरूपात वापरत असतात. म्हणजे समजा, समतावादी लोक म्हणजे कोण? ते मार्क्सवादी लोकांपासून वेगळे कसे? समाजवादी विचार म्हणजे काय? तो गांधीवादा पासून वेगळा कसा? मार्क्सवादी आणि कम्युनिस्टांत फरक काय? परवा एक डावे विचारवंत दुसऱ्या एका डाव्या विचारवंतांबद्दल कडवट तुच्छतेने “तो मासिस्ट नाही, समाजवादी आहे!” असे उद्गारताना ऐकले. जावडेकर, भागवत, देव, लोहिया वगैरेंचे विचार काय? त्यांत फरक कोणता? वगैरे अनेक बाबींबद्दल बऱ्याच, अगदी भरपूर वाचन असलेल्या लोकांच्या कल्पना फारच धूसर असतात. तसेच जनसंघ, रास्वसं, हिन्दुमहासभा, सावरकर, जयप्रकाश, विनोबा, रणदिवे, डांगे वगैरे वगैरे; सी.पी.आय.एम. रिपब्लिकन्स, पॅन्थर, द्रमुक वगैरे.
आता या सगळ्या गोष्टी नव्याने एखाद्याने मुळातच वाचून समजावून घेणे अवघड’ आहे. वेळेचाही प्रश्न आहे आणि या सगळ्यांचे लिखाण सहजगत्या उपलब्ध होईल असे वाटत नाही. लहान लहान गावांत तर नाहीच. आता या विषयांची नक्की माहिती असणाऱ्या व्यक्ती असतील, पण समजा 15-20 वर्षांनी ते सगळे मेले की फारच अडचण होईल. तरी या विषयातील तज्ज्ञ अधिकारी व्यक्तींना सांगून या सर्व गोष्टींवर समीक्षात्मक असे लेखकाचे व्यक्तिमत्त्व आणि विचारव्यूह आड न येऊ देता, वादाचे प्रसंग टाळून एक सर्वमान्य असा सच्चा दस्तावेज तयार होणे पुढील पिढ्यांसाठी गरजेचे आहे. कमीत कमीत आताच्या वाचकांना वाचताना आपण काय वाचतो आहोत हे स्पष्टपणे कळले.
आजचा सुधारक सोडता हे काम दुसरा कोणी करू शकेल असे मला वाटत नाही. पहावे.

[आजचा सुधारकने क्रांती, दोन वाद या नावाने आपण सुचवता तसा एक प्रयत्न केला होता. आजचा सुधारक – वर्ष 19-अंक क्र.10,11,12 (जाने. ते मार्च 2009) तो प्रामुख्याने भांडवलवाद, समाजवाद, साम्यवाद यांबाबत होता. पण अजूनही या वा इतर वादांवर विवेचक लेखांचे स्वागत होईल. असे लेख पाठवण्याची येथेच विनंती करत आहोत. – संपादक ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.