विज्ञान व इंग्रजी

विज्ञान व इंग्रजी
अत्यंत अस्वाभाविकरीत्या येथे इंग्रजी भाषा लादण्यात आली. त्यामुळे हे इंग्रजी शिक्षण फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकले. दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये फक्त 10 टक्केच लोक हे शिक्षण घेऊ शकले आणि 90 टक्के लोक त्यापासून वंचित राहिले. सामान्य जनतेचे अशा रीतीने दोन विभाग पडले. काही शिक्षित झाले आणि बाकीचे अशिक्षितच राहिले. परिणाम असा झाला की शिक्षित आणि अशिक्षित ह्यांच्यामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली. ह्यामुळे हिन्दस्थानचे खूपच नुकसान झाले आहे. खेड्यापर्यंत कोणतेच ज्ञान पोहचू शकले नाही. शिकलेल्या लोकांच्या मनात असे आले की जी विद्या ते शिकले आहेत ती इंग्रजीशिवाय दुसऱ्या भाषेत बोलता येऊ शकणार नाही. ह्या कारणाने हिन्दुस्थानात विज्ञान फार कमी पसरले. कारण विज्ञान सर्व इंग्रजी पुस्तकांतच बंदिस्त राहिले. विज्ञानाचा तर सृष्टीशी संबंध आहे. शेतीमध्ये विज्ञान असते. पाकशास्त्रात विज्ञान आहे. सफाईमध्येही विज्ञान आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाची जरुरी आहे. परंतु इंग्रजांच्या राजवटीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की विज्ञानाच्या माहितीसाठी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक झाले आणि सामान्य लोक व येथील बहुजनसमाज ह्यांना तर इंग्रजी भाषेचे ज्ञान नव्हते, त्यामुळे करोडो लोकांना विज्ञानाचे ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही. आता इतक्या वर्षांनंतर आपण ओरड करीत आहोत की मातृभाषेत विज्ञानाविषयीची फारच थोडी पुस्तके आहेत. हा कोणाचा अपराध आहे? हा मातृभाषेचा अपराध आहे की नियोजनकारांचा?
-विनोबा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.