मराठी भाषा आणि मुसलमान

फाळणीच्या जमातवादी राजकारणाने बोलीभाषा आणि मातृभाषांचे केलेले धार्मिकीकरण आणि राजकीयीकरण यामुळे भारतात भाषेचा प्रश्न हा राजकीय प्रश्न झालेला आहे. भाषावार राज्यनिर्मितीनंतर द्रमुक, अद्रमुक, अकालीपक्ष, शिवसेना यांसारख्या पक्षांनी भाषिक अस्मितेच्या भावनिक राजकारणाची भर घातल्याने गुंता वाढलेला आहे. फाळणीच्या काळातील धर्म-भाषा-राष्ट्र यांची सांगड घातली गेल्याने, सर्वांनी गृहीत धरले आहे की, भारतातल्या सर्व मुसलमानांची उर्दू ही मातृभाषा असून आणि घरी बोलतात ती ‘दखनी भाषा’ म्हणजे ती अडाणी, निरक्षर आणि तळागाळांतील मुसलमानांची ‘गावंढळ उर्दू भाषा आहे. ब्रिटिश इतिहासशास्त्राच्या प्रभावाखाली असणाऱ्या हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी इतिहासकारांनी भारतातले मुसलमान हे ‘परकीयच’ आहेत, अशी मांडणी लावून धरल्याने भारताबाहेरचा धर्म इस्लाम, उर्दू आणि इथले मुसलमान असे समीकरण तयार झाले आहे. त्यामुळे इथल्या मुसलमानांची भाषा कोणती, हा प्रश्न संवेदनक्षम झालेला आहे.

वास्तविक भारतातले ९० टक्के मुसलमान हे भारतातल्या धर्मांतरित जाती-जमातीचे वंशजच असून, बाहेरून आलेल्या आणि इथे स्थायिक झालेल्या मुसलमानांची सरासरी १० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. भारतातील मुस्लिम राजकारण्यांनी आणि मुस्लिम लीगने राजकीय स्वार्थासाठी ‘उर्दू ही मुसलमानांची भाषा म्हणून ‘प्रायोजित’ केली. उर्दू भाषेला मुसलमानांची ‘धर्मभाषा’ बनविण्याचा प्रयत्नही सर सय्यद यांच्या काळापासून सुरू झाला. तरीदेखील उत्तर भारतातील मुसलमानी राज्यकर्त्यांचे प्रदेश, उदा. लखनौ, रामगढ, दिल्ली, लाहोर, इ. आणि बिहार आणि मध्यप्रदेशातील काही भाग, हैद्राबाद सारखी संस्थाने सोडली तर बाकीच्या प्रदेशांतील मुसलमानांची भाषा ही उर्दू होती का, हा एक समाजशास्त्रीय प्रश्न आहे.

मुळांत उर्दूदेखील पूर्णपणे भारतीय भाषा असून, हिंदुस्थानात मोगल राज्यकर्त्यांच्या काळात बोलल्या जाणाऱ्या प्राकृत, खडीबोली, पंजाबी, मैथिली, बिहारी इ. भाषा बोलणाऱ्या जाती-जमाती आणि मुस्लिम सैनिक यांच्या व्यावहारिक देवाण-घेवाणीतून उर्दू भाषा निर्माण झाली. उर्दू भाषा भारताबाहेरील कोणतेही मुसलमान बोलत नाहीत. ही भाषा भारतीय उपखंडात अस्तित्वात आहे. अरबी आणि पर्शियन मिश्रित पुस्तकी व अभिजनवादी उर्दू ही ‘अशरफ’ मुस्लिमांनी तयार केली.

भारतातल्या ९० टक्के मुसलमानांच्या भाषेचा प्रश्न समाजशास्त्रीयदृष्ट्या गुंतागुंतीचा आहे. कारण भारतातले बहुसंख्य मुसलमान हे विविध प्रदेशांतील धर्मांतरित जाती-जमाती आहेत. उर्दूचे आणि धर्माचे राजकारण करणारा, ८० टक्क्यांपेक्षा जास्त अशरण मुसलमानांचा जनसमूह, पाकिस्तानांत गेला. भारतात राहिलेल्या मुसलमानांनी ‘अशरम मुसलमानांचे’ (वरिष्ठवर्णीय खानदानी आणि वरिष्ठवर्गीय) प्रमाण १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त कोठेही नाही. शुद्ध आणि पुस्तकी उर्दूचा आग्रह हा या अशरफ वर्गाचा असतो. बाकीचे ७० ते ८० टक्के मुसलमान हे या तळागाळांतील प्रदेशनिहाय कष्टकरी, व्यावसायिक बलुतेदारी जाती-जमातींतील आहेत. म्हणजे मूळच्या ओबीसी, बीसी, भटक्या, जाती जमातींचे वंशज आहेत. ग्रामीण आणि प्रादेशिक जनजाती आहेत. या मुस्लिम जनजाती, संबंधित भागातील ग्रामीण आणि प्रादेशिक संस्कृतीचे अविभाज्य घटक असतात. त्यांचा उपासनापद्धती ही इस्लामी असते.

सुनीतिकुमार चटर्जी, डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या मते, हे बहुजन मुसलमान त्या त्या भागांतील बोलीभाषा किंवा दखनी भाषा बोलतात. डॉ. रणसुभे यांचे म्हणणे आहे की, हिंदी भाषक प्रदेशांतील मुसलमानांना महाराष्ट्र किंवा कर्नाटकाप्रमाणे दखनी बोलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. कारण हिंदी भाषा (पंडिती संस्कृतप्रचुर हिंदी नव्हे) ही दखनी किंवा उर्दू यांच्या जवळची आहे. त्यांच्या मते, ब्रज, अवधी, बुंदेलखंडी, छत्तीसगढी, मेवाडी, राजस्थानी इ. १८ बोलीभाषांपैकी एक भाषा स्वीकारत तो जगत आलेला आहे. (हिंदी साहित्यांतील मुस्लिम लेखकांचे योगदान-सूर्यनारायण रणसुभे मुस्लिम मराठी साहित्य पत्रिका द्वितीय, १९९२, नागपूर) भारतातल्या वेगवेगळ्या जाती-जमातींच्या धर्म-संकरामधून इथला बहुजन मुसलमानी समाज घडविला गेला आहे. परिणामी ते ‘दखनी’ म्हणून ओळखली जाणारी बोलीभाषा तरी बोलतात किंवा त्या त्या ग्रामीण परिसरांतील प्रादेशिक बोलीभाषा तरी बोलतात.

दखनी भाषेसंबंधाने हैद्राबादचे सुप्रसिद्ध अभ्यासक प्रा. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांनी केलेले संशोधन आणि मांडणी महत्त्वाची आहे. प्रा. श्री. रं. कुलकर्णी यांच्या मते, ही दखनी ‘मूळ दखनी भाषा’ हिंदी आणि उर्दू भाषांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या मते, ही दखनी भाषा सिद्ध, साधक, साधू, बैरागी यांनी निर्माण केली ती प्राकृत, तळागाळांतील जाती-जमातींच्या बोलीभाषांमधून परिणत झालेली भाषा असून विशिष्ट सांस्कृतिक निकड भागविण्याच्या दृष्टीने ती दक्षिण भारतात आली. त्यांच्या मते, शब्दसंपत्तीपासून ते व्याकरणापर्यंत मराठी भाषेच्या जन्मखुणा घेऊन दखनी भाषा जन्माला आलेली आहे. त्यांच्या मते लीळाचरित्रांत वर्णन केलेली ‘बैरागी भाषा’ ही तीच भाषा आहे. नाथ संप्रदायांतील साधूंनी दखनीचा वापर केलेला दिसून येतो. वारकरी संप्रदायाने देखील, उदा. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी मराठीबरोबरच दखनीतून कवने केली आहेत. 13 व्या शतकाच्या सुमारास दक्षिण भारतात सूफी संतांचे आगमन झाले. त्यावेळी इस्लामी अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार कोणत्या माध्यमांतून करावा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कारण त्यांच्या धर्माची भाषा ‘अरबी’ आणि पंथसाहित्य पर्शियन’ भाषेत होते. महाराष्ट्रातून आणि दक्षिण भारतातून संचार करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, आध्यात्मिक चर्चा आणि विचार यांच्या प्रचाराचे माध्यम म्हणून मराठीखेरीज ‘बैरागी भाषा’ प्रचलित आहे. सूफींनी धर्मप्रचारासाठी ही भाषा निवडली.

लेखनासाठी त्यांनी स्वतःच्या परिचयाची ‘फारसी’ (पर्शियन) लिपी निवडली. त्यांनी ‘दखनी’ भाषेतील लेखन ‘फारसी’ आणि देवनागरी लिपीतूनही केल्याचे दिसते (संदर्भ श्री. रं. कुलकर्णी – दखनी भाषेची ध्वनिव्यवस्था – पंचधारा – आक्टो.-डिसेंबर १९९४ – (२) दखनी भाषा – मराठी भाषा संशोधन प्रकाशन – मुंबई)

चातुर्वण्याधिष्ठित विषमतेच्या झालेल्या अतिरेकामुळे सूफींच्या समतेच्या आणि बंधुत्वाच्या शिकवणीच्या प्रभावामुळे, शूद्र आणि अतिशूद्र, बलुतेदारी चौकटीतील उपेक्षित आणि भटक्या जाती-जमातींतील अनेकांनी इस्लामचा स्वीकार केला. अशा प्रकारे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जाती-जमातींच्या धर्मसंकरांमधून व धर्मांतरांतून ग्रामीण भागांतील आणि शहरांतील बहुजन मुसलमान हे या प्रक्रियेतून निर्माण झालेले आहेत. हेच तळागाळांतील जनसमूह दखनी भाषा बोलतात. केवळ महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांचे जीवन, भाषा, साहित्य उदाहरण म्हणून घेतले तरी इथल्या बहुजन मुसलमानांचे प्रादेशिक संस्कृतीशी असणारे नाते स्पष्ट होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांचा अपवाद सोडून बाकीचे महाराष्ट्रातील मुसलमान किमान १५ व्या शतकापासून दखनीच्या बरोबरीने मराठीचा वापर करीत आहेत. श्रीगोंद्याचे संतकवी बाबा शेख महंमद यांनी म्हटले आहे की,
याति मुसलमान । महाराष्ट्री वचनें ऐकती आवडीनें ।

शेख महमदांची मराठी काव्यरचना पाहा,
ओम नमोजी अव्यक्त रामा । परात्पर तू मेघश्यामा ।

साधारणपणे १५ व्या शतकापासून महाराष्ट्रांतील वेगवेगळ्या भागांत मराठीतून काव्यरचना करणारे ४२ मुस्लिम मराठी संतकवी होऊन गेले. त्यांचा कालखंड १५ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते १८ व्या शतकापर्यंतचा आहे. १८ व्या शतकात आणि उत्तर पेशवाईच्या काळात मुस्लिम मराठी शाहीर, हे शाहिरी कवने करताना दिसतात, त्यांनी रिबायती (मोहरमच्या काळातील गाणी), पोवाडे, भेदिक गीते यांत महत्त्वाची भर टाकली आहे. त्यांनी कलगीतुऱ्याची शाहिरीदेखील केलेली दिसून येते. शहा अली, मदरशा, त्याचा शिष्य लाडनशा, हसेनखान शाहीर, शाहीर सगनभाऊ, जान महंमद भाई, लहरी हैदर असे अनेक मुस्लिम मराठी शाहीर होऊन गेले.

श्री. रा. चिं. ढेरे यांनी ‘मुस्लिम मराठी संतकवी’ या त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या पुस्तकांतून त्यांची माहिती मराठी वाचकांना करून दिली आहे. तसेच नागपूरकडील मराठीचे अभ्यासक प्रा. अ.ना.देशपांडे यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास – भाग ३ रा, व्हीनस प्रकाशन-१९७३’ या पुस्तकांतून मुस्लिम मराठी संतकवी व शाहीर यांचा परिचय करून दिला आहे. या लेखांतील संदर्भ या दोघांच्या लिखाणांतून घेतलेले आहेत.

एक सर्वसाधारण विधान असे करता येईल की संत एकनाथांच्या काळापासून (१५३३ ते १६४५) मुस्लिम मराठी संतकवींनी मराठीतून लिहायला सुरुवात केली. या ४२ संतकवींपैकी, अगदी ५/६ संतकवींच्या मराठी रचनाच तेवढ्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांची सारांशरूपाने माहिती देऊन श्री. ढेरे यांनी म्हटले आहे की, याशिवाय कितीतरी मुसलमान मराठी संतकवी आहेत की, ज्यांची नावे केवळ शिल्लक आहेत, परिचय आणि काव्य लप्त झाले आहे. (रा.चि.ढेरे – पृ.१३७).

श्री. ढेरे आणि अ.ना.देशपांडे यांनी बेदरच्या बहामनी घराण्यांतील संत शहा मुंतोजी ब्रह्मणी – जो ‘ज्ञानसागर’ किंवा ‘मृत्युंजय’ या नावांनी ओळखला जात होता त्या मुस्लिम मराठी संताबद्दल लिहिले आहे. हा संत कादरी संप्रदायाचा असूनही आनंद संप्रदायाचा दीक्षित होता. त्याच्या ९ मराठी रचना प्रसिद्ध आहेत. सिद्धसंकेत, अद्वैतप्रकाश, प्रकाशदीप वगैरे. दुसरा संतकवी शेख सुलतान याच्याबद्दल श्री. ढेरे यांनी म्हटले आहे की, शेख सुलतान हा मुसलमान असल्यामुळे त्याच्या घरातली भाषा दखनी हिंदी असणार. त्याची थोडी रचना हिंदीत आहे (बाकीची रचना मराठीत आहे) मालोजी राजे यांच्या आश्रयाला असणाऱ्या श्रीगोंद्याचे बाबा शेख महंमद यांचा कालखंड १६ व्या शतकाचा उत्तरार्ध असून त्यांनी हिंदी (म्हणजे दखनी) फारसी यांमधूनही रचना केलेली होती. याचा अर्थ असा की, लिहिण्यासाठी त्यांना मराठीचाच वापर केलेला होता. हुसेन अंबरखान नावाचा एक संतकवी होऊन गेला. त्याचा कालखंड १६१८ चा आहे. त्याचा ‘गीता टीका’ हा अध्यात्मातील महत्त्वाचा मराठी ग्रंथ आहे. ‘अलमखान’ नावाच्या एका संतकवीने म्हटले आहे की,
“अवो शारदे जननी वेदमाता । तुझें स्मरण कीर्तनी गीत गातां ।
अलमखान म्हणे आरंभासि येई । अपुले कृपेचे मजला प्रेम देई ।”

मंगळवेढ्याच्या लतीफ शाहने लिहिले आहे,
आतां पूजा कोठे वाहूं।
पाहतां देहीच जाला देवू ।।

शहामुनी हा पेडगाव येथील एक प्रसिद्ध संतकवी होऊन गेला. त्याचा जन्म १७४८ च्या सुमाराचा आहे. त्याचा ‘सिद्धान्तबोध’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

या मुस्लिम मराठी संतकवींचे लिखाण प्रामुख्याने मराठीत आहे. परंतु काहींनी लिहिलेली दखनी भाषेतली कवनेदेखील प्रसिद्ध आहेत. बाबा शेख महंमद यांनी म्हटले आहे,
इन तत्त्व सीधा । चराचर पैदा ।
हिंदू-मुसलमान किस कहूं जुदा ।
जाहीर बातीनमें । कुदरतमें खुदा संगमे अल्लाह ।
तैसा मौजुदा ।

शहा मुतबजी ब्रह्मणीने दखनीत म्हटले आहे.
शहा मुतबजी ब्रह्मणी ।
जिनमें नहीं मना मानी ।।
पंचीकरण का खोज किये।
हिंदू मुसलमान येक कर दिये ॥

महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मुसलमान संतकवीच तेवढे ‘दखनीत’ लिहीत नव्हते. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांनी दखनीतून विपुल कवने लिहिली आहेत. हीच दखनी भाषा काही ग्रामीण भागांतील बहुजन मुसलमान बोलत होते. कोकणांत दखनीच्या बरोबरीने कोकणी, विदर्भात विदर्भातील बोलीभाषा वैदर्भी, अहिराणी वगैरे भाषा बोलत होते.

नमुन्यादाखल संत एकनाथ, तुकारामांची दखनी कवने देत आहे. संत एकनाथांचे पुढील काव्य पहा,
अल्ला तूही रे । नबी तूही रे …
मेरा साहेब उंच माडी कापड धुवा न जाय ।
हस्त का सावज गिर गिर गया तो फिर फिर गोते खाय ।
कपडा फाटे चमडा टूटे हो गये सब सायास ।
एका जनार्दन का बंदा दलिका दरबेश ।।

संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली दखनी कवने नमुन्यादाखल पाहा –
“इमान तो सब ही सखा, थोडी तो भी ल्येकर ज्या”
सांतो पांचो मार चलावे, उतार सो पीछे खावे
गावंढळ सो क्या लेवे, हगवनि भरी नहीं थोवे ।
(पाहा. तुकाराम महाराजांची गाथा – महा. शासन)

मराठी प्रदेशातील बहुजन मुसलमानांनी लेखनासाठी मराठीच स्वीकारलेली होती. घरी ते ‘दखनी’ किंवा प्रादेशिक बोलीभाषा बोलत होते.
परंतु फाळणीच्या राजकारणांत सर्वांचे सारे लक्ष हे मुस्लिम लीग, तिचे समर्थक अशरफ वर्गाचे मुसलमान, त्यांचा प्रचार ‘इस्लाम, उर्दू आणि मुसलमान’ आणि हिंदुत्ववाद्यांचा प्रचार ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिन्दी’ यावरच केंद्रित झालेले होते. त्यामुळे इथल्या सर्व मुसलमानांची भाषा उर्दूच आहे, हे गृहीतक प्रस्थापित झाले. उत्तर भारतातील तळागाळातील म्हणजे ग्रामीण भागांतील ‘बिगर अशरफ’ जनजाती ज्या बोलीभाषा उदा. व्रज, अवधी, बुंदेलखंडी, वगैरे बोलत होत्या, मराठी प्रदेशात वैदर्भी, अहिराणी, कोंकणी भाषा बोलत होत्या, त्या वास्तवाकडे दुर्लक्ष झाले. दक्षिण भारतांतील मराठी प्रदेशांत बोलली जाणारी ‘दखनी’ भाषा ही वेगळी आहे. हे कोणी लक्षांतच घेतले नाही. फखरद्दीन निज़ामी यांचे दखनीतील सुप्रसिद्ध खंडकाव्य ‘पद्मराव कदमराव’ हे १४५३ साली लिहिले गेले होते. त्या खंडकाव्यात अरबी किंवा फारसी भाषेतील शब्द बोटांवर मोजण्याइतके असून त्यांत कानडी, तेलगू, मराठी आणि भटक्या जाती-जमातीतील भाषांतील शब्दांच भरणा आहे. दखनी या सर्व बोलीभाषांतन विकसित झाली आहे.

खडीबोलीप्रचुर हिन्दीचे ‘संस्कृतीकरण’ आणि साध्या सरळ उर्दूचे ‘पर्शियनीकरण हे फाळणीच्या राजकारणामुळे सुरू झाले. १९७० नंतर धार्मिक अस्मितेचे आणि भाषिक अस्मितेचे राजकारण सुरू झाल्यापासून, उत्तर भारतातील देवबंदी मुल्ला-मौलवींनी उर्दूचा प्रचार सुरू केला. त्यात महाराष्ट्रात मराठी मुसलमानांची व्यवहार-भाषा मराठी आणि बोलीभाषा दखनी असताना, हमीद दलवाईप्रणीत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने इथल्या मुसलमानांनी ‘उर्दू’ टाकून देऊन मराठी स्वीकारावी असा प्रचार सुरू केला. त्यांना विरोध करणाऱ्या मुल्ला-मौलवी आणि राजकारणी मुसलमानांनी १९७० नंतर महाराष्ट्रभर उर्दू संस्था सुरू केल्या. मुंबईस्थित कोकणी मराठी अभ्यासक अबुल कादर मुकादम यांच्या मते, १९७० पर्यंत कोकणातील मुसलमान, रत्नागिरीसारख्या शहराचा अपवाद सोडल्यास, कोकणीच बोलत असे. माझ्या बालपणात सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या अँग्लो-उर्दू शाळेचा अपवाद सोडल्यास सर्वच मराठी शाळाच होत्या. स्वतः हमीद दलवाईना उर्दू चांगले बोलता येत नसे. हे वास्तव होते.

धार्मिक अस्मितेचे राजकारण सुरू झाल्यापासून महाराष्ट्रांत मुस्लिम राजकारण्यांनी उर्दूचा आग्रह सुरू केला आहे. निवडणुका जिंकण्यासाठी – धर्म, भाषा, आणि अस्मितेच्या राजकारणामुळे – हे घडते आहे. खुद्द महाराष्ट्र-शासन एखाद्या मुस्लिम व्यक्तीने किंवा संस्थेने मराठी माध्यमाची अनुदानित शाळा, प्रशाला मागितली तर त्यांचा अर्ज मंजूर करीत नाही. उर्दू शाळेला मात्र मान्यता देते! विस्तारभयास्तव हा मुद्दा सविस्तरपणे घेत नाही. यावरून परिस्थितीचे चित्र स्पष्ट होते. तरी परंतु ग्रामीण भागांतील बहुजन मुसलमान दखनीच बोलतात. शहरी मुसलमानांचे उर्दकरण होत आहे. परंतु मुस्लिम संस्थांची १२ वी नंतरची महाविद्यालये मराठी माध्यमांचीच आहेत!!

एक महत्त्वाचा मुद्दा वाचकासाठी मांडतो आहे. तो म्हणजे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे या शहरांतील बोटांवर मोजण्याइतके वरिष्ठ वर्णीय म्हणजे अशरफ मुसलमान कवी आणि लेखक हे उर्दू किंवा इंग्रजीतून लिहिताना दिसतात. त्यांमध्ये उत्तर भारतातील उर्दू भाषक लेखक मुंबईसारख्या शहरांत आढळतील. परंतु मूळचे – महाराष्ट्रातील मराठी, वैदर्भी, कोकणी, मराठवाडी मुसलमान हे आपले वैचारिक लेखन, ललित लेखन, कथा कादंबऱ्या, कविता मराठीतूनच लिहीत आहेत. कोकणात तर स्वातंत्र्यपूर्वकाळापासून कोकणी मुसलमानांनी केवळ मराठीतून (कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मकथा) विपुल लेखन केले आहे. सध्याही ते मराठीतूनच लिहीत आहेत. कोकणात मराठीतून लिहिणाऱ्या लेखकांची संख्या ५० च्या पेक्षाही जास्त आहे. विस्तारभयास्तव त्यांची नावे व पुस्तके देता येत नाहीत. रत्नागिरीहून गेली २५ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘आकाशगंगा’ या साप्ताहिकातून त्यांची माहिती उपलब्ध होईल. कवी खावर, लेखक अल् नासिर काझी, सुप्रसिद्ध मुंबईस्थित नाटककार शफाअत खान हे कोकणचेच आहेत.

अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य पररिषद १९९० साली स्थापन झाली. तेव्हापासून मराठीतून लिहिणाऱ्या मुस्लिम मराठी साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ मिळाले. उर्दूचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातून मराठीतून लिहिणाऱ्या विदर्भातील साहित्यिकांची संख्या मोठी आहे. नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अमरावती या शहरांतून अनेक जण लिहीत आहेत. नागपूरच्या डॉ. जुल्फी शेख, डॉ. बानो सरताज काजी, प्रा. शेख हाशम, प्रा. जावेद पाशा, पटेल सय्यद जब्बार, कवी अझीम नवाज राही ही काही नावे आहेत. मराठवाडा हा पूर्वीच्या मोगलाईचा परिसर असला तरी मराठवाड्यांतील मुसलमानांची लेखन-भाषा मराठीच आहे. प्रा.फ.म. शहाजिंदे, सय्यद अल्लाउद्दीन, फर्दा डी.के. शेख, बशारत अहमद, डॉ. शेख इकबाल, हे मराठवाड्यांतीलच आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तर मुसलमान फक्त मराठीतूनच लिहितात. अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संमेलनाला हजर राहणाऱ्या मुस्लिम मराठी कवी, लेखक, यांची संख्या आता ३०० (तीनशे) पर्यंत गेली आहे. मुस्लिम मराठी पत्रकारांची संख्याही मोठी आहे. सुरेश भटानंतर मराठी गझला मुस्लिम मराठी गझलकारांनीच लोकप्रिय केल्या आहेत. कवी ए. के. शेख, इलाही जमादार,जहीर शेख, शेख इकबाल, मुबारक शेख हे प्रसिद्ध गझलकार आहेत. प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी त्यांच्या भूमी प्रकाशन, लातूर मधून २००४ साली “मुस्लिम मराठी साहित्य – परंपरा, स्वरूप आणि लेखसूची” प्रसिद्ध केली. त्यामध्ये १८१ मुस्लिम मराठी साहित्यिकांची नावांची यादी दिलेली आहे.

याचा अर्थ असा की, धर्मवादाच्या नावाखाली, मुस्लिम धर्मगुरू उर्दूचा प्रचार करीत असले आणि अस्मितेच्या राजकारणासाठी मुस्लिम राजकारणी ‘उर्दू’ला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत असले तरी, महाराष्ट्रातील मुसलमानांची लेखनभाषा मराठीच राहिली आहे. उलट त्यांचा मराठीचा वापर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातून उर्दूतून किंवा इंग्रजीतून लेखन करणाऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील मुसलमान घरी दखनी किंवा उर्दूही बोलत असेल. परंतु लिहितो आणि भाषण करतो ते मराठीतून! त्याचे मराठीतून लिहिणे १५ व्या शतकापासून चालू आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.