बाजारबावरी

प्रसारमाध्यमांची मराठी भाषा फार बिघडून गेली असे माझे मत नाही. त्या त्या काळाप्रमाणे आणि माणसाप्रमाणे तिचा वापर होत असतो. त्यामुळे जुन्या काळच्या माणसाच्या परिचयाची मराठी दिसेनाशी झाली अथवा ती भलत्याच रूपात प्रकटू लागली की तक्रारी होऊ लागतात. तसे माझे नाही.
भाषेला सोवळे नेसवणाऱ्यांना तिचे विद्यमान कपडे तोकडे, अपुरे, विसंगत अन् चुकीचे वाटायला लागतात. ‘कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला’ येथपासून ‘जनतेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे’ येथपर्यंत मराठी भाषेचा वापर सदोष दिसू लागतो. ‘संपन्न हुआ’ या हिंदी क्रियापदाचा वापर जसाच्या तसा करणे आणि ‘सतर्क’ म्हणजे तर्कासह हे मराठीतील रूप माहीत करवून न घेता हिंदी धाटणीने वापरणे या चुका नक्कीच आहेत. पण चूक कधी सांगितलीच गेली नसल्याचा परिणाम पुनःपुन्हा तेच शब्दप्रयोग करण्यातून दिसू लागतो. मराठीत संपन्न म्हणजे समृद्ध, श्रीमंत असा अर्थ असतो हे जर लिहिणाऱ्याला अज्ञातच असेल, तर ती चूक तो सार्वत्रिक करीत राहणारच. अश्या चुका अर्थातच फार नसतात. असल्या तरी ठराविक असतात. मात्र अशी रूपे वारंवार डोळ्यांना दिसू लागली की ती प्रचलित होतात. मुख्य म्हणजे वर्तमानपत्रांत जे छापले ते पारखूनच छापलेले असते हा नियम भाषेच्या बाबतीतही लावला जातो. त्यामुळे वृत्तपत्रे जी भाषा छापतात तीही योग्यच असे वाचकांना वाटते.
सारी माध्यमे वेळ आणि स्थळ यांच्या सीमेत काम करतात. वेळ थोडा, जागाही थोडी. त्यामुळे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त माहिती देण्याची सक्ती माध्यमांवर असते. शिवाय ती ठराविक वेळी आणि जाहीर केलेल्या समयी द्यावीच लागते. त्यांपासून सुटकाच नाही. हा जाच म्हणा, बंधन म्हणा किंवा मर्यादा. या अंगभूत स्थलकालसंकोचाचा परिणाम भाषेवर होतो. माध्यमांची एकमेकांशी स्पर्धा फार वाढली आहे. 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या 24 तासांनी जन्मणाऱ्या दैनिकांच्या स्पर्धक आहेत. या वृत्तवाहिन्या एकमेकींच्याही स्पर्धक असतात. सर्वांत आधी अन् सर्वांत पुढे राहण्याच्या नादात दुर्लक्ष होते ते भाषेकडे. बातम्यांची संहिता पुढ्यात असते तेव्हा चुका कमी होतात. पण ‘लाईव्ह’ म्हणजे साक्षात प्रक्षेपण होत असताना डोक्यात जे विचार येतात ते जसेच्या तसे बोलले जात असल्याने मराठीचे व्याकरण गारद होते. एरवीच बोलीभाषेला व्याकरणबंद करणे माणसाला मंजूर नाही. त्यात घाई, उत्साह असला की भाषेत गडबड झालीच समजा. ‘आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं समजा. आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं म्हणणं असं की’, असे बोलणे गप्पांत अथवा बाजारात चालते. मात्र लाखो लोक बघत असताना माध्यमात ते नाहीच चालणार. परंतु या गोष्टीवर ना कोणाचे नियंत्रण, ना दक्षता. जणू सारे काही स्वाभाविकच. बीबीसी अथवा सीएनएन या वाहिन्या बघताना मात्र अशा गफलती अगदी क्वचित ऐकायला मिळतात. त्याचे मुख्य कारण वय आणि अनुभव. मराठी खाजगी वाहिन्यांनी तारुण्य हा एक महत्त्वाचा निकष मानला आणि पत्रकारितेसाठी पोरसवदा, नवथर, अननुभवी तरुणतरुणींची निवड केली. त्यांची ऐनवेळच्या मुद्द्यांमुळे, विषयांमुळे बोबडी वळते, तारांबळ उडते. कामाच्या ताणामुळे वाचन कमी होते, भाषेवरील मांडही ढिली होते. वाचनात वैविध्य असल्यास भाषेचे वेगवेगळे पैलूही दिसतात. पत्रकारतेची भाषा साहित्यिक नसते. तिला कल्पनाशक्तीची जोड फार देताही येत नाही. त्या परंपरेचा दबाव आणि अनुभव, वाचन, निरीक्षण यांची कमी यामुळे बातमी कोणतीही असो, ती अगदी एकसाची, एकसुरी आणि अर्धीकच्ची वाटत राहते. म्हणूनही वृत्तवाहिन्यांमुळे भाषा बिघडल्याची भावना निर्माण होते. ‘हातपाय गाळून चालणार नाही’ असे म्हणायचे सोडून ‘हातापायातील ताकद गाळून चालणार नाही’ असे वाक्य बाहेर पडले की केवढा अर्थ बदलतो! ‘पाणी गाळून प्या’ या वाक्यातील ‘गाळून’ या शब्दाचा अर्थ त्या वाक्याला चिकटतो.
कोणतीही गोष्ट करताना पूर्वतयारी आवश्यक असते. तिचा अभाव खूप जाणवतो. गेल्या चारपाच वर्षांपासून अनेक शहरांत एफ.एम. (फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन) रेडिओची केंद्रे सुरू झाली आहेत. ती विशिष्ट गाणी, ठेका, लय, गती, शैली यांमुळे तरुणाईत खूप लोकप्रिय होतात. सलग अनेक तास एका गतीत बोलण्याची सक्ती तिथेही असते. रेडिओजॉकी असे त्या संवादकांना म्हणतात. त्यांच्या भाषेचा वारू असा सुसाट पळत असतो की वाटेतील भाषिक अडथळे तो यँव पार करतो. काही जॉकीज थोडी संहिता लिहून आणतात. मात्र ज्यांचा आत्मविश्वास दांडगा असतो ती मंडळी भन्नाट वेगाने जॉकीइंग करतात. तरुणांची भाषा बोलायची म्हणन इंग्रजी-हिंदी-मराठी यांचे मिश्रण एकवेळ ठीक मानले तरी व्याकरण तिन्ही भाषांचे वेगळे असते. त्याचे आक्रमण झाले की गमती, विनोद, चुका होणारच. ‘तुमच्या फ्रेंडला सांगा फ्रेंड शिप डे खाली, की आज तुम पुराना गुस्सा भुला दोगे और हमेशा हमेशा मेरे प्यारे दोस्त रहोगे. आणि आता ऐका या सुंदर गाण्याला.’ अशी भरधाव भाषा व्याकरण चिरडत चिरडत दिवसभर कानात शिरत असते. गाण्याला ऐका, गाण्याला म्हणा ही रूपे हिंदी आहेत. मस्ती, मौजमस्ती, यार, प्यार, आय लव्ह यू, लॉट्स ऑफ लव्ह, टेक केअर, गुड डे, रिलॅक्स, कूल अशा शब्दांची पखरण करीत जॉकी अखंड (म्हणजे दोन गाण्यांमध्ये) बडबड करतात. ‘जब वुई मेट या मुव्हीमधलं हे गाणं. करिनावरचं. लाईफमध्ये काही तरी सांगणारं’ असं बोलण्याने कदाचित रोजच्या गप्पांचा आभास निर्माण करता येईल. पण गप्पा जर जाहीर, सार्वजनिक होत असतील, म्हणजे प्रसारित होत असतील, तर त्या इतक्या बंधमुक्त असल्याच पाहिजेत का?
ज्या हिंदी, मराठी गाण्यांसाठी या रेडिओ वाहिन्या सुरू झाल्या, ती मात्र तितकी भ्रष्ट झालेली नाहीत. ‘भाग बोस डी. के.’ हे दिल्लीबेली मधील गाणे व्यर्थी आहे. आणखी मोजकीच गाणी इंग्रजी शब्द व कल्पना घेऊन येतात. परंतु गेल्या पाच एक वर्षांतील हिंदी चित्रपटगीते खरोखर भन्नाट कल्पना सुंदर शब्दांत मांडणारी आहेत. त्यांचा ठेका व लय वेगवान असतो म्हणून कदाचित त्यांकडे दुर्लक्ष होत असावे. प्रेम, विरह, आसक्ती, दुरावा, आकर्षण आदी जुन्या चित्रपट-गीतांच्याच भावना अगदी नव्या शब्दांत त्यात छानपैकी मांडल्या जातात. मात्र त्या काळजीपूर्वक अथवा चवीने ऐकायला बहुधा वेळ नाही कोणाला. म्हणजे एकीकडे अत्यंत चांगली शब्दकळा, नवी वर्णने आणि दुसरीकडे भरताड, भ्रष्ट भाषा बोलणारे भन्नाट निवेदक-संवादक! त्यांना असंच बोलायची सक्ती असते म्हणे. म्हणजे कडेकोट स्टुडिओतील भाषा आणि बाजारातील भाषा यांमधील फरकच नाहीसा करायचा अशी योजना दिसते. बाजार स्टुडिओत आणायचा हे मालकांचे, चालकांचे उद्दिष्ट. काय कारण असावे?
भारताने बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था स्वीकारण्याला यंदा वीस वर्षे पूर्ण झाली. सरकार अनेक क्षेत्रांमधून स्वतःहन बाहेर पडले. सरकार म्हणजे काही कायदे, परवाने. नियम आणि अटी शर्ती. बाजाराला तसे पूर्ण मोकळे सोडलेले नसले तरी तो जे ठरवील तेच रुळेल असे तत्त्व प्रस्थापित झाले. त्याचा परिणाम मराठी भाषेवरदेखील झालेला दिसतो. म्हणजे भाषेचे कायदे, नियम, शर्ती, चौकटी ढिल्या झाल्या. मुक्त बाजारपेठेप्रमाणे भाषाही अनेक वेढ्यांतून मुक्त झाली. मुख्य म्हणजे व्याकरणाच्या अटी शर्ती यांपासून प्रत्येकाने स्वतःला वाटेल तशी तिची ‘मुक्तता’ करून टाकली. कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषणे, लिंग हे जाचक व्यवहार आणि कडेकोट बंधने ज्याने त्याने उधळून लावली. मराठी भाषा उन्मुक्त होऊन तिला अन्य भाषांचे संपर्क, संसर्ग, बाधा खूप झाली. जागतिकीकरणात जसे अनेक देश, भाषा, संस्कृती परस्परांच्या नजीक येतात आणि एकमेकांशी कशाचे तरी आदानप्रदान करू लागतात तसे हे नाही. घेण्यादेण्याचे व्यवहार स्वत्व आणि स्वाभिमान जपत व्हायचे सोडून उपकार, कृतज्ञता, उपकृतता यांच्या अमलाखाली ते होऊ लागले. चीनच्या वस्तूंनी बाजारच्या बाजार काबीज करावेत तशी मराठी भाषा अन्य भाषांच्या कह्यात जाते की काय असे वाटू लागले. इंग्रजी व हिंदी यांचा सहवास मराठीला नको तितका प्रिय वाटू लागला. एका जातीतील मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम जडल्यावर जसा पुरुषांचा संताप संताप होतो, तसा तो अनेकांचा होऊ लागला. त्यामुळे कटाक्षाने मराठीपण दाखवणारी एक चित्रवाणी वाहिनी, एक राजकीय पक्ष, अनेक संकेतस्थळे, सामाजिक जाळेवीण, चित्रपट, नियतकालिक जन्माला आली. आज मराठीत दोन प्रकार अगदी शेजारी शेजारी वावरताना आढळतात. पहिला, काटेकोर, प्रमाणित मराठीचा. दुसरा, अन्य-भाषा-प्रभावित मराठीचा. हे दोन्ही नमुने अगदी सहज कुठे बघायला मिळतील तर प्रसारमाध्यमांत. एकमेकांना खेटून किंवा पुढेमागे किंवा वरखाली. बिनघोर आणि निभ्रांत.
भारतकुमार राऊत ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक झाले आणि त्यांनी या दैनिकाची भाषाच बदलून टाकली. त्यांच्या कारकीर्दीत ‘मेडिकल कॉलेजांची फी वाढ सुप्रीम कोर्टाकडून रद्द’ अशी इंग्रजी-मराठी शीर्षके झळकू लागली. ह्या प्रश्नाला बोली विरुद्ध ग्रांथिक असे स्वरूप देण्यात आले. तरुणांसाठी हे दैनिक वाचनीय करण्याच्या नादात त्याची चांगली, सभ्य व पोक्त भाषा थिल्लर, बाजारू करण्यात आली. पुढे राऊत हे मराठीभक्त शिवसेनेत जाऊन खासदार काय होतात, त्याच्या कित्येक वर्षे चाललेल्या सदरात ते अगदी शुद्ध मराठीच काय लिहितात, सारेच अगम्य! अनेक दैनिके काही मराठी शब्द पहिल्या पानावर छापून गोंधळ करतात. मुसळधार पाऊस झाला, प्रश्न ऐरणीवर आला आहे, हा मुद्दा कळीचा झाला, वेठीला धरले, तोंडाला पाने पुसली असे अनेक शब्द आजच्या पिढीला माहीत नाहीत (मसळ व ऐरण) आणि त्यांचे अर्थही माहीत नाहीत. काही वर्तमानपत्रांत तर एकाच पानावर पारंपरिक मराठी आणि भेसळीची मराठी बातम्यांमध्ये वाचायला मिळते. ट्रक-मालमोटार, इन्स्पेक्टर-निरीक्षक, ऑफिस कार्यालय, चॅनल-वाहिनी, टी.व्ही.-चित्रवाणी, सी.ई.ओ.-मुख्य कार्यकारी अधिकारी असे कैक. याचा अर्थ असा की प्रत्येक वृत्तपत्रांचे स्वतःचे एक ‘स्टाईल बुक’ म्हणजे शब्दशैली असते, तीच बेपत्ता झाली आहे. मनाला वाटेल तसे शब्द प्रत्येक जण वापरत सुटला आहे. उद्दाम बाजार जसा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उधळतो, नीतिनियम झुगारतो, तसेच हे. म्हणजे वृत्तपत्रांच्या कचेऱ्यांतही बाजार घुसला.
बाजारातील अती अवलंबन, नफातोटा यांचाच सतत विचार. यांमुळे कमी माणसांत जास्त काम करवून घेण्याचा प्रघात सर्व माध्यमांत पडला आहे. एकाने लिहिलेली बातमी वरिष्ठाने वाचून तींत दुरुस्ती करणे होत होते म्हणून पूर्वी चुका कमी व्हायच्या. सध्या अशी यंत्रणाच नसते, असली तरीही तिच्या हाती तेवढा वेळ नसतो. त्यामुळे काढघाल, दुरुस्त्या, फेररचना वरवरच्या होतात अथवा होतच नाहीत. ‘विविध पातळीवर’, ‘अनेक सोसायर्टीमध्ये’, ‘चार फाईल सापडत नाहीत’, ‘दोन हजार लोकं आली’, ‘दहा कार्यालयात काम’ असे अनेकवचनांचे गैरप्रकार यामुळे वारंवार दिसू लागतात. अशा चुका नेहमी डोळ्यांना दिसतात पण त्या चुका असल्याचे अनेक वाचकांना जाणवत नाही. अखेर लोकांच्या वापरातही असे शब्दप्रयोग, वाक्यप्रयोग होत राहतात आणि होत राहतील.
माध्यमांमधील मराठी भाषेच्या वापराकडे बघताना सामाजिक पैलूंची दखलही घ्यावी लागते. एकेकाळी ब्राह्मण, प्रभू, मराठा अशा उच्च जातीयांच्या हातात असलेली पत्रकारिता आता मध्यम, मागास व अनुसूचित जातींच्या पत्रकारांच्या हातात गेली आहे. पूर्णपणे नसली तरी बहुसंख्येने नक्कीच. अशा जातिवर्गांमधून येणाऱ्या पत्रकारांना मराठी भाषेचीच नव्हे, तर पत्रकारितेची पार्श्वभूमी नाही. मान्य आहे तरीही जी स्वीकृत भाषा आहे, तिचा वापर योग्य रीतीने करूनच त्यांना पुढे जावे लागेल. त्यांच्या हातून होणाऱ्या चुका आरंभीच्या काळात म्हणून क्षम्य मानल्या तरी प्रसारण, प्रक्षेपण व प्रकाशन यांच्या बाबतीत त्या क्षम्य नाहीत. संपूर्ण समाजाने जी माध्यमिक भाषा स्वीकारलेली आहे तिचा वापरच सर्वांना लाभदायक ठरणार आहे. भाषेच्या शुद्धाशुद्धतेला ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा मोठा पदर आहे. बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये शुद्ध-अशुद्ध एकवेळ चालेल; पण छापील अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात तसे उचित नाही.
जगात सर्वत्रच माध्यमांची भाषा ठराविक व किंचित एकसाची असते. तिची शब्दशंख्याही मर्यादित असते. साहित्यिक, अलंकारिक, सांकेतिक, क्लिष्ट, अवघड असे तीत काही नसते. ठोस वार्ता (हार्ड न्यूज) आणि सौम्य वार्ता (सॉफ्ट न्यूज) हे भेद मात्र सध्या ठोस वार्ता सर्वांत आधी टी.व्ही.मुळे मिळते. साहजिकच दैनिक वृत्तपत्रे स्पर्धेत मागे पडतात. म्हणून सध्या श्लेष, यमक, अन्योक्ती, अतिशयोक्ती असे अलंकार दैनिक पत्रांमध्ये मथळ्यांपासून आढळ लागले आहेत. त्याचबरोबर म्हणी, वाक्प्रचार, संतवचने दिसेनाशी होत आहेत. टीव्हीच्या बातम्यांना पार्श्वसंगीत देण्याचा प्रघात पडला. दैनिक पत्रांच्या बातम्यांनाही विविध रंग, चौकटी, रिव्हर्सस्क्रीन, फिकट रंगांचे टंक अशा सजावटी मिळू लागल्या. या साऱ्यामुळे पुन्हा भाषेच्या प्रभावाकडे दुर्लक्ष होत आहे. संगणकाधीन रचनेचे सौंदर्य खुलवले असले तरी वृत्तपत्रे खरी समृद्ध होतात ती नेमक्या पण वैविध्यपूर्ण शब्दसंपत्तीने, ‘थेंबे थेंबे तळे साचे प्रमाणे पुढे कधीतरी मराठी डौलदार आणि देखणी होत स्वबळावर पत्रकारिता टिकवेलच…..
फोन 3422316988, ईमेल – jaidevdole@yahoo.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.