मराठी माणूस आणि उद्योजकता

एखाद्या समाजाला स्वतःच्याच भूमीवर आपल्या भाषेसाठी, आपल्या सामाजिक अस्मितेसाठी संघर्ष करावा लागणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आज मराठी समाजावर हीच वेळ ओढवली आहे. याला कारणीभूत कोण आहे? अर्थात आपणच! आपली अनाठायी सहिष्णु वागणूक, राजकारण्यांची स्वार्थी वृत्ती, समाजधुरीणांची उदासीनता अशी अनेक कारणे यामागे आहेत. या सगळ्या कारणांसोबतच आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक बाजूकडे होत असलेले आपले दुर्लक्ष! दारिद्र्य आणि सज्जनपणा यांची आपण निष्कारणच जोडी जमवली आहे. श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणे हा आपल्याला दुर्गुण वाटतो. ठेविले अनंते तैसेचि रहावे किंवा अंथरूण पाहून पाय पसरावे अशा उक्ती आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने मनावर घेतल्या आहेत. अंथरूण पाहून पाय पसरावे हे ठीक आहे, पण मी एवढे अंथरूण मिळवीन की मला हवे तसे पाय पसरता येतील, ही महत्त्वाकांक्षा आपल्या मनात का येत नाही?
आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी प्रयत्न न करणे हा आपला जुना दुर्गुण आहे. मराठी सत्ता अटकेपार तलवार गाजवत असतानासुद्धा मराठी राज्य कर्जबाजारीच होते. महाराष्ट्रापासून वर जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतावर वर्चस्व मिळवूनही केवळ आर्थिक स्थैर्य व अर्थनिर्मिती करण्यात अपयश आल्याने देशाच्या राजकारणावरची महाराष्ट्राची पकड सुटली. पण तरीही आपण शहाणे झालेलो नाही. व्यापार, उद्योगधंदे यांच्याकडे आपण चार हात अंतर राखूनच पहात असतो. महिन्याच्या महिन्याला निश्चित उत्पन्नाची खात्री हीच आपल्या महत्त्वाकांक्षेची परमावधी. दहा ते पाच नोकरी करायची आणि रविवारी घरी बसून भय्यांची आणि गुजराथी-मारवाड्यांची मुजोरी कशी वाढत्ये, मराठी भाषेची कशी पिछेहाट होत्ये यावर चर्चा करायची हा आपला आवडता कार्यक्रम!
आज बाजारात पाहणी केली तर असे आढळते की बऱ्याच गाळ्यांचे मालक मराठी आहेत, पण त्या गाळ्यांत दुकान मात्र मारवाड्याचे आहे. हॉटेलचा मालक मराठी आहे, पण चालवणारा शेट्टी आहे. टॅक्सीचा मालक मराठी आहे, पण चालक भय्या आहे. स्वतः व्यवसायात उतरण्यापेक्षा आम्हाला दरमहा घरबसल्या मिळणाऱ्या भाड्याचे आकर्षण जास्त आहे. तो आपल्याला भाडे देतो याचा अर्थ तो किमान तेवढेच स्वतःसाठी मिळवत असणार. म्हणजे जर आपण धंदा केला तर दुप्पट उत्पन्न मिळेत की नाही?
नुसत्या अभिमानावर भाषा जगत नाही, त्या अभिमानातून आर्थिक बळ राहिले तरच भाषा सृदृढ होते. जो समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो. त्याला बाजारात प्राधान्य मिळते. ‘दाम करी काम’ हे वैश्विक सत्य भाषेच्या क्षेत्रातही लागू आहे. भारतातील मुख्य स्टॉक एक्स्चेंज महाराष्ट्रात असूनही शेअर बाजारातील सेवा इंग्रजीव्यतिरिक्त प्रथम गुजरातीमध्ये सुरू झाल्या. ब्रिटन आणि अमेरिकेच्या महाराष्ट्रातील व्हिसा कार्यालयांमध्ये गुजराती आणि पंजाबी भाषिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असते. मोठ्या हॉटेलांमध्ये अथवा बड्या दुकानांमध्ये स्वागत हिंदी वा इंग्रजीतून होते. ही सगळी मंडळी मराठीद्वेष्टी आहेत अशातला भाग नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांमध्ये मराठी माणसाचे प्रमाण अत्यल्प असते हे खरे कारण आहे. बाजाराला स्वतःची भाषा नसते. बाजाराची भाषा आणि दिशा आर्थिक लाभांवर अवलंबून असते.
बँकांमध्ये मराठीत फॉर्म मिळत नाहीत म्हणून आम्ही नुसता आरडोरडा करतो. पण दहा मराठी नोकरदारांचे मिळून होत नसतील एवढे व्यवहार एक मारवाडी व्यापारी त्या बँकेत करत असतो. कोणाला प्राधान्य मिळणार?
स्वयंरोजगार, लहानमोठे व्यवसाय यांना तुच्छ लेखून केवळ पांढरपेशा नोकरीच्या मागे धावण्याच्या वृत्तीने आपण स्वतःभोवती कुंपण घालून घेतले आहे. तथाकथित हलकी कामे करूनच परप्रांतीयांनी इथे आर्थिक साम्राज्ये उभी केली आहेत याची जाणीवच मराठी माणसाला नाही.
नोकरी करणारा माणूस केवळ एकालाच (स्वतःला) रोजगार देतो, पण व्यवसाय करणारा माणूस स्वतःबरोबर इतर चारजणांना रोजगार देतो. रोजगार निर्मिती करणारा समाज अशी मराठी समाजाची ओळख व्हायला हवी.
व्यावसायिक क्षेत्रात मराठी टक्का मुळातच कमी आहे. जे आहेत तेसुद्धा विखुरलेले आहेत. त्यामुळे अमराठी व्यावसायिक लॉबिंग करून मराठी व्यावसायिकांना दडपण्याचा प्रयत्न करतात. मराठी व्यावसायिकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे व्यवसायात स्पर्धा असायचीच, पण ती निकोप ठेवावी. एखाद-दोन कामांमध्ये (उदा. ऑर्डर मिळवताना) संघर्ष झाला तरी तो विषय तिथेच सोडून द्यायला हवा. त्यावरून कटुता निर्माण होऊ देऊ नये. दूरदृष्टी ठेवून एकमेकांशी जुळवून घेतले तर बाजारपेठेवर मराठी वर्चस्व निर्माण करणे कठीण नाही. मराठी व्यावसायिकांनी एकत्र येऊन मराठी दबावगट (लॉबी) निर्माण करायला हवा.
यात अवघड काहीही नाही. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. माझे सगळे पुरवठादार मराठीच आहेत. स्वस्तः की महाग हा विचार मी केवळ मराठी पुरवठादारांच्या बाबतच करतो. अमराठी पुरवठादारांकडे मी जातच नाही. त्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले तरी प्रतिसाद देत नाही. राष्ट्रीय पातळीवरच्या दोन कंपन्यांकडून मी काही माल घेतो. त्यांच्याशी व्यवहार करतानाही मी कटाक्षाने मराठीचाच अवलंब करतो. त्यामुळे माझ्याशी काही काम असले की ते मराठी कर्मचाऱ्यालाच माझ्याकडे पाठवतात.
त्याचबरोबर, आपला अभिनिवेश (इगो) बाजूला ठेवून ग्राहकामुख धोरण ठेवले पाहिजे. वेळप्रंसगी थोडेफार पडते घेण्याची तयारी ठेवावी लागते. एकदम भरपूर नफ्याच्या मागे न लागता, गुणवत्ता राखून, जरा कमी नफ्यावर काम केल्यास लवकर जम बसतो, कमी नफ्यावर काम करणे सुरुवातीला अव्यवहार्य वाटले तरी दीर्घ पल्ल्याचा विचार करता तेच लाभदायक ठरते.
मराठी माणसात व्यावसायिक वृत्ती (प्रोफेशनल अॅटिट्यूड) नसते असा आरोप नेहमी केला जातो. बऱ्याच अंशी तो खराही आहे. विशेषतः सेवाक्षेत्रात याचा अनुभव जास्त येतो. दिलेली वेळ न पाळणे, काम अर्धवट करून उर्वरित काम रेंगाळत ठेवणे, आगाऊ पैसे घेऊन काम उशिरा सुरू करणे, वागण्या-बोलण्यात सौम्यपणा नसणे हे मराठी माणसातील काही ठळक दोष आहेत. व्यावसायिक वृत्ती (मूल्ये व नीतिमत्ता यांसहित) आत्मसात करण्यासाठी मराठी व्यावसायिकांनी प्रयत्न केले पाहिजेत.
व्यवसाय करताना कष्ट करण्याची, जोखीम पत्करण्याची तयारी, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे गुण अत्यावश्यक आहेत. मराठी माणूस या सगळ्याच आघाड्यावर मागे पडतो. हापूस आंबा या पदार्थांशी भय्यांचा काही संबंध असण्याचे कारण आहे का? पण आज मोठ्या शहरांमध्ये काय स्थिती आहे? भय्या आंबा व्यापाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आंब्याच्या धंद्यात कष्ट आहेत. आंबे व्यवस्थितपणे पेंढ्यात भरून ठेवणे, ते वेळच्यावेळी वर-खाली करणे, इ. कामे करावी लागतात. त्यांची या कष्टांसाठी तयारी असते. आपला ज्या वस्तूंशी कधीच संबंध आलेला नाही अशा वस्तूच्या व्यापारात उतरून जोखीम उचलण्यासही ते सज्ज असतात. त्यामुळे आज रत्नागिरी हापूसची महती जौनपूरच्या भय्याकडून ऐकण्याची वेळ कोकणच्या सुपुत्रांवर आली आहे.
यापूर्वीसुद्धा कोकणातील आंब्याची कलमे गुजराती-मारवाडी व्यापारी मराठी मालकाकडून ठोक पद्धतीने विकत घ्यायचे. म्हणजे झाड मराठी माणसाचे, पण त्याला त्यावर्षी लागणाऱ्या आंब्यांची मालकी त्या व्यापाऱ्याची. व्यापारी दपटी-तिपटीने पैसा कमावतो आणि मराठी मालक घरबसल्या पैसे मिळाले यातच बेद्द खूष.
एखाद्या कटकट्या ग्राहकाला ‘घ्यायचं तर घ्या, नाहीतर निघा. “अशा पद्धतीचे उत्तर देण्यात आपल्याला भूषण वाटते. मग केवळ गोड बोलण्याच्या गुणावर एखादा अमराठी व्यापारी त्याला आपलासा करतो. तक्रार करणाऱ्या ग्राहकाचा आपल्याला राग येतो. ग्राहकाची तक्रार ऐकून घेतली, समजून घेतली तरी ग्राहकाला बरे वाटते. तक्रारी व्यववस्थितपणे नोंदवणे आणि त्वरित निवारणे एवढे केले तर ग्राहकच आपल्यासाठी विक्रेत्याचे काम करतो.
वाहतुकीचा व्यवसाय पंजाब्यांच्या हाती, लादीकाम राजस्थान्यांच्या हाती, हॉटेल व्यवसाय शेट्टींच्या हाती, हार्डवेअर बोहऱ्यांच्या हातात अशी स्थिती आहे. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात दगड आहेत. राजकारण्यांनी दिलेले, दगडफेक करण्यासाठी आणि उरलेले स्वतःच्या कपाळावर मारून घेण्यासाठी!
एखाद्या बागेत, चौपाटीवर चणेवाले, पाणीपुरीवाले परप्रांतीय दिसले की आपण हे भय्ये जिकडेतिकडे घुसतायत असे म्हणून नुसतेच चरफडत राहतो. पण आपल्याला चणे विकायला, पाणीपुरीची गाडी चालवायला कुणी बंदी घातली आहे का?
व्यवसायक्षेत्र लहान असो वा मोठे, मराठी माणूस मागेच. मोठ्या कंपन्यांचे राज्य वा जिल्हास्तरावरचे वितरक मुख्यतः अमराठीच असतात. दांडेकर, किर्लोस्कर अशा दोन-चार मराठी उद्योगपतींच्या पुढे मराठी नावांची यादी जातच नाही. आणखी किती दिवस चालणार आहे?
आर्थिक पाठबळ नसेल तर अभिमानाला शून्य किंमत आहे. भाषा आणि संस्कृती जगवायची असेल तर आपली भाषा व्यवहारभाषा व्हायला हवी. दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करणे आवश्यक झाले पाहिजे. त्यासाठी आर्थिक नाड्या आपल्या हातात यायला हव्यात. आज आर्थिक क्षेत्रात मराठी माणूस नगण्य आहे. त्यामुळे त्याच्या भाषेलासुद्धा नगण्य स्थान आहे.
कष्टांची तयारी आणि आर्थिक प्राबल्य या दोन गुणांमुळेच आज अमराठी लोक आपल्याला आपल्याच प्रांतात मागे रेटतायत. जोपर्यंत याबाबतीत आपण त्यांना तोडीस तोड उत्तर देत नाही तोपर्यंत परिस्थितीत बदल होणे अशक्य आहे. मराठी माणसाला आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली व्हायचे असल्यास व्यापार-उद्योगात पाय रोवण्याशिवाय पर्याय नाही.
कल्याण, गटप्रमुख (मराठी अर्थकारण),
मराठी अभ्यास केंद्र, ठाणे भ्रमणध्वनी : 9768026303. इ-मेल : sagar@marathivikas.org

[टीप : मागील अंकातील अशोक शहाणे यांचा मराठी तरीही अभिजात हा लेख त्यांच्या नपेक्षा ह्या पुस्तकातून पुनर्मुद्रित केला आहे ह्याचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. तसेच भाषा व राजकारण ह्या लेखात “मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अमेरिकेकडून होता’ याऐवजी “तो कुंपणावर होता” असे वाचावे. दोन्ही चुकांबद्दल दिलगीर आहोत.
– संपादक ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.