समता पुस्तक-परिचय : द स्पिरिट लेव्हल

विषमता आणि चिंता

माणसे सतत एकमेकांशी तुलना करत असतात. उंची, वजन, रंगरूप अशा सुट्या गुणांपासून सुरू होत तुलना अखेर सामाजिक स्थानापर्यंत जाऊन पोचते. रॅल्फ वॉल्डो इमर्सन या अमेरिकन विचारवंत व साहित्यिकाने नोंदले, “प्रत्येक माणसाच्या नजरेत एकूण माणसांच्या प्रचंड श्रेणीपटातले स्वतःचे स्थान नेमके ठरलेले असते, आणि आपण सतत ही मोजपट्टी वाचायला शिकत असतो, याची खात्री आहे.’ (‘Tis very certain that each man carries in his eye the exact indication of his rank in the immense scale of men, and we are always learning to read it).

माणसे लहानलहान गावांमध्ये विखुरलेली असत आणि संपर्काची साधने कमी असत तेव्हा इमर्सनने नोंदलेल्या मोजपट्ट्या माणसांना सहज हाताळता येत असत. आता मात्र मोजपट्ट्या खरेच प्रचंड झाल्या आहेत. याचा एक परिणाम म्हणजे चिंताग्रस्त माणसांचे प्रमाण वाढत आहे.

हे अनेक देशांतील अभ्यास दाखवतात. उदाहरण म्हणून पाह, जीन टेंज (Jean Twenge) हिने अमेरिकेबाबत केलेला अभ्यास. टुंजने २६९ इतर अभ्यासांचे एकत्रीकरण केले. सारी मिळून ५२००० माणसे तपासली. उत्तर असे, की १९५२ ते १९९३ या काळात सचिंत माणसांचे प्रमाण बरेच वाढले आहे. वाढ इतकी आहे की १९८० नंतरचे सरासरी अमेरिकन मूल १९५० साली मनोरुग्ण मानले गेले असते! याला समांतर निष्कर्ष इतर देशांतले अभ्यासही काढतात.

सोबतच गर्वही वाढत आहे आणि स्वतःबाबतचे प्रेमही. ही चिंता, ताण यांच्यापासून रक्षण करणारी मानसिक बचाव-यंत्रणा आहे असे मानायला जागा आहे. ताण मोजता येतो. माणसे ताणात असली, की त्यांची शरीरे कॉर्टिझॉल (cortisol) हे द्रव्य जास्त प्रमाणात घडवतात. लाळेतले व रक्तातले कॉर्टिझॉलचे प्रमाण मोजता येते. ताण उत्पन्न करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांपैकी कोणता घटक जास्त ताण देतो याचा अभ्यास केला गेला. आपले सामाजिक मूल्यमापन होत आहे, ही भावना सर्वांत जास्त ताण उत्पन्न करते असे दिसले. मोजपट्टीवरले आपले स्थान धोक्यात येऊ शकते, ही ताण देणारी तीव्र भावना आहे. आल्फ्रेड आड्लर हा मानसशास्त्री म्हणत असे की स्वतःला कमी लेखणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. (To be human means feeling inferior). थॉमस शेफ (Thomas Scheff) या समाजशास्त्र्याच्या मते लाज ही कळीची सामाजिक भावना आहे. (Shame is the social emotion). ही मते सरासऱ्यांवर बेतलेली आहेत. मोजपट्टीवर उच्च माणसेही स्वतःला कमी लेखू शकतात, आणि पट्टीच्या तळाजवळही आत्मविश्वास भेटू शकतो. पण मोजपट्टीचा विचार आणि तिच्यावरचे आपले स्थान सुधारायची इच्छा, हे कधीच मनाच्या दूर नसते. ते सामाजिक स्थान एकूण क्षमतेचे, लायकी चे माप मानले जाते आणि त्या मोजमापात श्रीमंती, कमाई, सुखवस्तू असणे यांना महत्त्व येते.

आणि अर्थातच जास्त श्रेणीबद्ध, जास्त विषमता असलेल्या समाजांमध्ये हे सततचे मोजमाप चिंतेला जन्म देते. अशा समाजांची मोजपट्टी लंबीचवडी असते, आणि माणसे घसरण्याची शक्यताही जास्त असते. समाजातले सगळे जण साधारणपणे एकाच * पातळीवर आहेत, ही भावना संपते. स्वतःचे स्थान ठरवणे, ते घसरू न देणे, ते सुधारणे, ते सुधारल्यासारखे दाखवणे हे सारे अपार महत्त्वाचे ठरते. काय आहे यावर काय दिसते हे मात करू लागते. विनयाची जागा आत्मप्रौढी घेऊ लागते. स्वतःवरील टीकेबाबत हळवेपणा येतो. आत्मपरीक्षण अवघड होते. मैत्र्या कठीण होऊन बसतात. विकारी खिन्नता, संताप, हिंसा, गुन्हेगारी, व्यसने, सारे नेहमीचे होत जाते.

(धर्म, अध्यात्म वगैरे यांतून सुटका देणारे सल्ले देतात, “तुलना करू नकोस’, “जगन्नियंत्यावर विश्वास ठेव”, इत्यादी. यानेही अपेक्षित परिणाम साधतोच असे नाही. उलट “तू परमात्म्याचा अंश आहेस” याने बंधुभावाची जागा एक रचनात्मक परात्मभाव घेतो! बरे, बहतेक धर्म आणि अध्यात्मिक गुरू प्रस्थापित व्यवस्थेचाच पुरस्कार करतात. सर्व बाबा, बापू, महाराज श्रीमंत यजमानांकडेच उतरतात.

आचार्य/भगवान रजनीश समाजवादापासून सावध राहायला सांगतात. याने त्या धर्माची, अध्यात्माची विश्वासार्हताच मार खाऊ लागते.)
समाजात समता आणणे, विषमता कमी करणे, हा एक उपाय फ्रेंच राज्यक्रांतीच्या आधीही सुचवला जात असे. फ्रेंच राज्यक्रांतीने त्याला विचारप्रणालीचा दर्जा दिला. क्रांतीची घोषणा स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, ही नव्याने प्रस्थापित होत असेलल्या मानवतावादाची घोषणा होती. तो वाद कधी थेट राज्यावर आलेला नाही, कुठेही. आजही जगात पूर्णपणे समतावादी सोडा, जवळपास समतावादी म्हणता येईलसे देशही नाहीत. विषमतेचे दुष्परिणाम तपासून “म्हणून समतेकडे जावे” असे म्हणण्याचा एक प्रयत्न द स्पिरिट लेव्हल : व्हाय इक्वालिटी इज बेटर फॉर एव्हरिवन हे पुस्तक करते. (The Spirit Level : Why Equality is Better for Everyone, fars farcromitt वकेट पिकेट, पेंग्विन, २००९).

विल्किन्सन अर्थशास्त्रीय इतिहासानंतर साथ-शास्त्र (epidemiology) शिकलेला आहे. केट पिकेट मानवशास्त्र आणि पोषणशास्त्र शिकून साथ-शास्त्र शिकली आहे. ती यॉर्क विद्यापीठात साथ-शास्त्राची प्राध्यापक आहे, तर विल्किन्सन तेथे पाहुणा प्राध्यापक आहे. दोघेही इतर अनेक विद्यापीठे व संस्थांशीच संलग्न आहेत.

द स्पिरिट लेव्हल (यापुढे TSL) या पुस्तकातील मांडणी, तिच्यामागील संशोधने व त्यांचे निकर्ष यांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.

विषमतेचे माप

मुळात आपण आर्थिक विषमताच सहजपणे मोजू शकतो. शिक्षण, सत्तेत सहभाग इत्यादी बाबींची आकड्यांशी सांगड घालणे कठीण असते. आर्थिक अंगानेही दोन तव्हा सुचतात; कमाई आणि साठलेली श्रीमंती. पण कमाईतूनच श्रीमंती साठते या विचारातून वार्षिक उत्पन्ने हा विषमता मोजण्याचा पाया ठरतो. अर्थशास्त्र्यांनी विषमतेची अनेक मापे किंवा निर्देशांक घडवले आहेत. यांपैकी एक सोपा निर्देशांक कुझनेत्स प्रमाण (Kuznets Ratio) या नावाने ओळखला जातो. समाजातील सर्वांत श्रीमंत २०% लोकांच्या एकूण उत्पन्नाला सर्वांत गरीब  २०% लोकांच्या एकूण उत्पन्नाने भागले की कुझनेत्स प्रमाण मिळते. या प्रमाणाला आपण यापुढे विषमतेचे माप किंवा नुसते विषमता म्हणू.

TSL चे लेखक त्यांच्या युक्तिवादासाठी दोन उदाहरणे वापरतात. एक उदाहरण तेवीस देशांचे आहे, तर दुसरे USA तील पन्नास प्रांतांचे आहे. देशांसाठी विषमतेचे माप वापरले आहे, तर USA च्या प्रांतांसाठी जिनी निर्देशांक (Gini Index) वापरला आहे. लेखकांच्या मते कोणताही निर्देशांक वापरला तरी निष्कर्षांत फरक पडत नाही. TSL मध्ये जागतिक बँकेची आकडेवारी वापरली आहे. २००२ सालच्या आकडेवारीतून २००४ साली बँकेने अहवाल घडवला. TSL साठी पन्नास सर्वांत श्रीमंत देश निवडले. त्या यादीतून ३० लक्षांपेक्षा कमी लोकसंख्येचे देश वगळले. उरलेल्यांपैकी ज्या देशांसाठी विषमतेची मापे उपलब्ध नव्हती ते देशही वगळले. अखेर तेवीस देश उरले.

हे तेवीस देश व (आपल्याला रस असल्यामुळे!) भारत, पाकिस्तान व चीन हे देश घेऊन त्यांच्यातल्या विषमतेची मापे खाली नोंदली आहेत. आपल्या देशांसाठी मापे २००८-०९ च्या अहवालातील आहेत.

मूळ तेवीस देशांच्या यादीतील विषमतेचे क्रम कंसांत नोंदले आहेत; सर्वांत विषम तो क्रमांक १, इ.

देश विषमतेचे माप विषमतेनुसार अग्रक्रम
ऑस्ट्रेलिया 7 5
न्यूझीलंड 6.8 6
कॅनडा 5.6 12
सिंगापूर 9.7 1
फ्रान्स 5.6 13
स्वित्झर्लंड 5.7 11
आयर्लंड 6.1 10
जपान 3.3 23
नेदरलँड्स 5.2 15
बेल्जियम 4.5 18
पोर्तुगाल 8 3
फिन्लंड 3.7 22
स्वीडन 3.9 20
ग्रीस 6.2 9
USA 8.6 2
इटली 6.7 8
ऑस्ट्रिया 4.8 17
नॉर्वे 3.8 21
डेन्मार्क 4.2 19
स्पेन 5.5 14
जर्मनी 5.2 16
UK 7.2 4
इस्त्राएल 6.8 7
भारत 5.6
पाकिस्तान 4.6
चीन 8

१) ढोबळमानाने सिंगापूर, USA, पोर्तुगाल व UK हे विषम देश, तर जपान, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन हे सम देश आहेत.
२) कम्यूनिस्ट म्हणवणारा चीन भारतापेक्षा विषम आहे

आसास निर्देशांक

सोबत एक आलेख आहे (आ.१) आडव्या अक्षावर दरसाल दरडोई उत्पन्न डॉलर्समध्ये नोंदले आहे. उभ्या अक्षावर आयुर्मान वर्षांमध्ये नोंदले आहे. आलेखात नेमक्या बिंदूंऐवजी देशांची नावे लिहिली आहेत. ही मोजमापे जराशी धूसर असतात हे यातून ठसवले आहे. उदा. त्रिनिदाद अँड टोबेगो या देशाच्या नागरिकांचे उत्पन्न सुमारे २०००० डॉलर्स आहे, तर आयुर्मान सुमारे ७० वर्षे आहे.

ढोबळमानाने आलेखातून दिसते, की उत्पन्नासोबत आयुर्मानही वाढते, पण एका मर्यादेनंतर उत्पन्न वाढूनही आयुर्मान फारसे वाढत नाही. याचे कारणही सुचते, की एखादा देश श्रीमंत होऊ लागला की सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारतात. स्वच्छ अन्न व पाणी मिळू लागते. सांडपाणी व कचरा सुरक्षित तऱ्हेने हटवले जातात. साथीचे रोग हटतात, कारण वैद्यकीय सेवा जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. या साऱ्या सोई एका विशिष्ट दर्जापुढे गेल्या, की मग मात्र श्रीमंतीतून आयुर्मान वाढणे मंदावते. घटत्या परताव्याचा नियम (Law of diminishing returns) या नावाने हा प्रकार अनेक सामाजिक प्रक्रियांमध्ये ओळखला जातो. TSL च्या लेखकांनी निवडलेला तेवीस देशांचा नमुना असा गरिबीच्या रोगांपासून मुक्त झालेला आहे. या तेवीस देशांसाठीचा उत्पन्न-आयुर्मान आलेख तपशिलात पाहिला (आ.२) तर लक्षात येते, की उत्पन्न वाढण्याचा आयुर्मान वाढण्याशी संबंध उरलेला नाही.

तर TSL च्या लेखकांनी या तेवीस देशांसाठी एक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्देशांक (Index of Health and Social Problems) घडवला (यापुढे आसास!). यासाठी दहा घटक मोजले गेले.

१. आयुर्मान (Life Expectancy)
२. कुमारवयात गर्भधारणा (Teenage births)
३. लठ्ठपणा (Obesity)
४. मानसिक आजार (Mental Illness)
५. खून (Homicides)
६. कारावास (Imprisonment rates)
७. परस्पर अविश्वास (Mistrust)
८. वर्गबदल-सोय (Social Mobility)
९. शिक्षण (Education)
१०. बालमृत्यू (Infant Mortality)

(वर्गबदल सोय म्हणजे जन्मजात सामाजिक स्थान बदलता येण्याची सोय. हा एक मोजायला कठीण घटक आहे. हा घटक आणि आयुर्मान यांबाबत माप जास्त तर समस्या कमी असा प्रकार आहे. त्यामुळे यांची व्यस्त मापे (reverse coded) वापरली आहेत. सर्व घटक आंतरराष्ट्रीय संस्थांनी घडवलेल्या अहवालांतील आहेत, व स्रोत तपशिलात नोंदले आहेत.

इस्राएल व सिंगापूर या देशांसाठी आठापेक्षा कमी घटकांची मापे उपलब्ध असल्याने ते निर्देशांकातून वगळले आहेत. इतर एकवीस देशांपैकी तेरा देशांसाठी नऊ, तर पाच देशांसाठी आठ घटकांची मापे उपलब्ध झाली. सांख्यिकीय तंत्रे वापरून या देशांसाठीच्या अनुपलब्ध मापांचे अंदाज बांधले गेले.)

या साऱ्यांतून जो आलेख घडला (आ.३) तो आसास व विषमता यांच्यात थेट संबंध दाखवतो;

म्हणजे विषमता जास्त तेथे समस्या जास्त! याच देशांचे आसास उत्पन्नाशी मात्र असंबद्ध असल्याचे दिसते (आ.४).

आलेख आणि सांख्यिकी

TSL मधील सर्व आलेख खालच्या डाव्या कोपऱ्यात सुरू होतात. आडव्या अक्षावरील मापे उजवीकडे वाढत जातात, तर उभ्या अक्षावरील मापे वरच्या दिशेने वाढत जातात. अशा आलेखांत डावीकडे खाली सुरू होऊन उजवीकडे वर जाणारी रेषा दोन मापांचा थेट संबंध दाखवते; म्हणजे आडवे माप जास्त तर उभेही माप जास्त. याउलट डावीकडे वरून सुरू होऊन उजवीकडे खाली जाणारी रेषा व्यस्त संबंध दाखवते, की आडवे माप जास्त तर उभे माप कमी.

या रेषा संबंधसूत्र (Corelation Theory) वापरून काढल्या जातात. हे गणिती शास्त्र आहे व त्यात ‘मेरी मर्जी’ प्रकार नाही. माहितीचा, मापांचा संच ठरला, की संबंधाचा आलेखही ठरलाच.

जेव्हा मापबिंदू आ.३ सारखे आलेखाच्या जवळ दाटलेले असतात तेव्हा निकटचा संबंध आहे, असे ठरते. उलट जर आ.४ सारखे मापबिंदू विखुरलेले असतील तेव्हा सबंध नाही, किंवा असलाच तर क्षीण आहे, असा निष्कर्ष निघतो.

१९३, मश्रुवाला मार्ग, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर ४४००१०.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.