पत्रसंवाद

अरुंधती डांगे, 9, लक्ष्मी-सदा अपार्टमेंट, विकासनगर, वर्धा रोड, नागपूर मोबा.9371458002
आजचा सुधारक या मासिकाचे दोन्ही मराठीकारण विशेषांक वाचले. संपूर्ण लेखकवर्गाने अत्यंत कळकळीने मराठीकारणासंबंधी आपले विचार मुद्देसूद रीतीने मांडले आहेत आणि हे खरोखरीच फार आवश्यक होते.
‘मराठी भाषेला सध्या अत्यंत दुर्गती प्राप्त झाली असून, तिच्या या अवस्थेला बरीच कारणे जबाबदार आहेत’, असे म्हणण्याची किंवा चर्चा करण्याची सध्या पद्धत – ज्याला आपण फॅशनही म्हणू शकतो – आलेली आहे.
माझी आई आजारी असेल तर त्यामागे परकीय शक्तीचा हात असला पाहिजे, असे न मानता, तिची सेवा आणि योग्य तो औषधोपचार करून तिला ठणठणीत बरी करणे हे मी माझे जिव्हाळ्याचे काम समजते – कर्तव्य समजत नाही. जर ती माझी आई आहे आणि तिला वाचवण्याची धडपड करण्यात मला आनंद मिळतो आहे, तर मी माझ्या भावाकडे किंवा बहिणीकडे तरी मदतीचा कटाक्ष का टाकावा?
ती माझी आहे ना, मग तिच्या सेवेसाठी मी इतरांकडून मदतीची अपेक्षा का करावी? जर तिची अशी दयनीय अवस्था झाली असेल, तर मी इतरांना दोष देणे योग्य राहील का? त्या तिच्या अवस्थेसाठी मीच कारणीभूत नसेन कशावरून? त्यासाठी इतरांवर आरडाओरडा करण्यापेक्षा मी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहणे जास्त योग्य ठरणार नाही का? जेव्हा एखाद्या आईला अनेक कर्तबगार अपत्ये आहेत, तेव्हा तिच्या दुर्दशेला शेजारी-पाजारी जबाबदार कसे असतील? तिची ही अशी अवस्था व्हावी, ही गोष्ट तिच्यासाठी लाजीरवाणी नसून तिच्या तथाकथित कर्तबगार मुलांसाठी लाजीरवाणी आहे, हे त्या मुलांना स्वतःला उमगायला नको?
इतर मुलांना मराठी भाषा ‘चांगली यावी’, यासाठी मी प्रयत्न करणे हे उत्तम, पण माझ्या घरातल्या माझ्या दोन मुलांची मराठी भाषा ‘चांगली असावी’, यासाठी मी धडपडणे जास्त उत्तम नाही का? आपली मातृभाषा ही आपल्याला शिकून येत नाही, ती आपल्यामध्ये – आपल्या तनमनामध्ये आईच्या दुधासारखी झिरपलेली असावी लागते. माझ्या आईची थोरवी माझ्या मुलांपर्यंत पोचवण्याचे माझ्याइतके उत्तम माध्यम असताना मी इतर कोणाकडे का पाहू? व्याकरणशुद्ध प्रमाणभाषा शिकवत असताना ती रूक्ष न वाटता रसाळ कशी वाटेल याची काळजी मीच घ्यायला हवी.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.