एक क्षण स्तब्धता

या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
मी तम्हाला एक क्षण स्तब्ध राहण्याची विनंती करेन;
… त्यांच्या स्मरणार्थ जे अकरा सप्टेंबरला
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये मारले गेले….
… आणि त्यांच्यासुद्धा, जे त्या हल्ल्याच्या सूडापोटी
छळले गेले, तुरुंगात टाकले गेले, दिसेनासे झाले,
अत्याचारित आणि बलात्कारित झाले, आणि मारले गेले..
…अमेरिका आणि अफगाणिस्तान, दोन्ही देशातल्या पीडितांसाठी
आणि मी अजून एक विनंती करू शकत असेन तर…
… स्तब्धतेची – एक पूर्ण दिवस,
त्या हजारो पॅलेस्तीनींसाठी जे अमेरिकेच्या हातांनी
आणि पाठोपाठ दशकानुदशके इस्रायली फौजांच्या
अतिक्रमणाने मारले गेले.
… सहा महिन्यांची स्तब्धता,
त्या दीड दशलक्ष इराकींसाठी, ज्यांत विशेषतः लहान मुले होती,
जी अमेरिकेच्या अकरा वर्षांच्या नाकेबंदीमुळे
कुपोषण आणि उपासमारीने मारली गेली
मी या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी,
… दोन महिन्यांची स्तब्धता,
वर्णसंकरविरोधी धोरणाखाली जगणाऱ्या
दक्षिण आफ्रिकेतील त्या कृष्णवर्णीयांसाठी
ज्यांना होमलँड सेक्युरिटीने त्यांच्याच देशात परके बनवले होते.
… नऊ महिन्यांची स्तब्धता.
हिरोशिमा आणि नागासाकीतील मृतांसाठी,
जिथे मृत्यू आकाशातून कोसळला
आणि त्याने काँक्रीट, स्टील, माती आणि कातडीचा
एकेक थर सोलून काढला.
…एक वर्षाची स्तब्धता,
व्हिएतनाममधील लक्षावधी मृतांसाठी. त्या लोकांसाठी,
ज्यांना धगधगत्या इंधनाचा गंधही नाही
मात्र त्यातच त्यांच्या नातेवाईकांचे दहन झाले
आणि त्यांच्या मुलांचा जन्मही
… एक वर्षाची स्तब्धता,
कंबोडिया आणि लाओसमधील मृतांसाठी
जे एका छुप्या युद्धाचे बळी ठरले
श्श्श्श… काहीही बोलू नका…
… आपण मेलो आहोत हे त्यांना कळता कामा नये
… दोन महिन्यांची स्तब्धता,
कोलंबियातील मृत्यूंच्या दशकांसाठी,
ज्यांची नावे, त्यांच्या शवांचा ढीग करावा त्याप्रमाणे
कधीतरी घेतली गेली
आणि आता ती आमच्या जिभेवरून उतरली आहेत.

मी या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी,
… एक तासाची स्तब्धता, एल साल्वादोरसाठी
… एका दुपारीची स्तब्धता, निकारागुवासाठी
… दोन दिवसांची स्तब्धता, ग्वाटेमाल्टेकोंसाठी
ज्यातील कोणीही जिवंतपणी एका क्षणाचीही शांतता अनुभवली नाही
पंचेचाळीस सेकंदाची स्तब्धता, आक्तिआल, शियापास येथील मृतांसाठी
… स्तब्धतेची पंचवीस वर्षे, त्या शंभर दशलक्ष आफ्रिकनांसाठी
ज्यांची थडगी समुद्रात इतकी खोलवर सापडली
जितक्या उंच कुठलीही इमारत आकाशाला भेदू शकणार नाही,
ज्यांच्या अवशेषांची ओळख पटविण्यासाठी
कुठल्याही डीएनए चाचण्या किंवा नोंदीही नसतील
आणि त्यांच्यासाठी, जे दक्षिणेत, उत्तरेला, पूर्वेला आणि पश्चिमेला
सिकॅमोर वृक्षाच्या टोकांवर लटकवले गेले
… शंभर वर्षांची स्तब्धता.
कोट्यवधी भूमिपुत्रांसाठी, ज्यातल्या अर्ध्या-अधिकांच्या
जमिनी आणि जगणे ‘पाईनरिज’, ‘फंडेड नी’, ‘सँड क्रीक’,
‘फॉलन टिंबर्स’ किंवा ‘ट्रेल ऑफ टियर्स’ अश्या झगमगत्या
वास्तूंसाठी हिरावले गेले.
जी नावे आता आमच्या संवेदनांच्या शीतकांवरील
निरुपद्रवी मोहक कवितांमध्ये बंदिस्त झाली आहेत.
… तर तुम्हाला स्तब्धतेचा एक क्षण हवा आहे?
आणि आम्ही सर्वजण निःशब्द झालो आहोत,
आमच्या जिभा ओरबाडल्या गेल्या आहेत,
डोळ्यांची झापडं बंद झाली आहेत,
एक क्षणाची शांतता
आणि सारे कवी विश्रांती घेताहेत
ढोलांचे तुकडे विखरून पडले आहेत

मी या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी,
तुम्ह्यला एका क्षणाची स्तब्धता हवी आहे
तुम्ही असा शोक करताय
जणुकाही जग असे पुन्हा कधीच असणार नाही
आणि आमच्यापैकी उरलेले ते तसं असू नये अशी आशा करताहेत
जसे ते नेहमीच होते
कारण, ही 9/11 ची कविता नाही
ही 9/10 ची कविता आहे,
ही 9/9 ची कविता आहे,
9/8 ची कविता आहे,
9/7 ची कविता आहे,
ही 1492 ची कविता आहे
ही कविता याबद्दल आहे, की
अश्या कविता का लिहाव्या लागतात
आणि ही जर 9/11 ची कविता असेल तर ही :
1971, चिली, सप्टेंबर 11 ची कविता आहे,
1977, दक्षिण आफ्रिकेतील स्टीव्हन बिको, सप्टेंबर 12 ची कविता आहे,
1971, न्यूयॉर्क, अटिका तुरुंगातील बांधवांसाठी सप्टेंबर 13 ची कविता आहे.
1992, सोमालिया, सप्टेंबर 14 ची कविता आहे,

ही त्या प्रत्येक तारखेची कविता आहे, जी राखेच्या ढिगाऱ्यात कोसळत असते
ही त्या 110 गोष्टींची कविता आहे ज्या कधीच सांगितल्या गेल्या नाहीत
110 कथा, ज्या इतिहासाच्या पुस्तकांतून वगळल्या गेल्या
110 कथा, ज्यांच्याकडे सीएनएन, बीबीसी, द न्यूयॉर्क टाईम्स
आणि न्यूजवीकने दुर्लक्ष केले
या प्रकाराला हरकत दर्शविण्यासाठी ही कविता आहे

आणि अद्याप, तुम्हाला तुमच्या मृतांसाठी
एका क्षणाची स्तब्धता हवी आहे?
आम्ही तुम्हाला,
नोंद नसलेल्या थडग्यांचे, हरवलेल्या भाषांचे,
उखडलेल्या वृक्षांचे आणि इतिहासाचे,
अनामिक मुलांच्या चेहऱ्यांवरील शून्यात हरवलेल्या
दृष्टीचे अख्खे आयुष्य देऊ शकतो

मी या कवितेला सुरुवात करण्यापूर्वी
आम्ही कायमचे स्तब्ध होऊ शकतो
…. किंवा फारफारतर भुकेपर्यंत,
… धुळीने आमचे दफन होईपर्यंत
आणि तुम्ही अजूनही आमच्या अधिक स्तब्धतेसाठी विचाराल
तुम्हाला स्तब्धतेचा एक क्षण हवा असेल
तर मग तेलाचे पंप बंद करा,
इंजिने आणि दूरदर्शन संच बंद करा,
क्रूझ जहाजे समुद्रात बुडवून टाका,
रोखेबाजार कोसळू द्या,
झळाळते दिवे बंद करा,
आणि रेल्वेगाड्या रुळांवरून उतरू द्या

तुम्हाला स्तब्धतेचा एक क्षण हवा असेल,
तर टको बेलचा थडगो रचा
आणि कामगारांनी गमावलेला मोबदला, त्यांना परत द्या,
लिकर स्टोअर्स, टाऊनहाऊसेस, व्हाईटहाऊसेस, जेलहाऊसेस
आणि पेंटहाऊसेस जमीनदोस्त करा
तुम्हाला एका क्षणाची स्तब्धता हवी असेल,
तर ती सुपर बॉल संडेला, चार जुलैला
तेरा तासांच्या डेटन सेलच्या दरम्यान घ्या
किंवा पुढच्या वेळी, जेव्हा तुमच्या पांढरपेशा किळसेने
खोली भरलेली असेल, जिथे माझे सुंदर लोक जमा होतात
तुम्हाला स्तब्धतेचा एक क्षण हवा असेल,
मग तो आत्ताच घ्या,
… या कवितेची सुरुवात होण्यापूर्वी
इथे, माझ्या शब्दांच्या प्रतिध्वनीत,
दुसऱ्या हाताच्या संचलनादरम्यान छोट्याशा विरामवेळेत, मिठी देणाऱ्या दोन
शरीरांच्या मधल्या जागेत,
इथे तुमची शांतता आहे
ती घ्या
पण ती संपूर्ण घ्या… तिचे तुकडे करू नका
तुमच्या शांततेची सुरुवात गुन्हेगारीच्या टोकापासून होऊ द्या
पण आम्ही, आज रात्रभर आमच्या मृतांसाठी गात राहू
इमानुअल ऑर्टिझ, 11 सप्टें. 2002
[या कवितेतील सर्व संदर्भ पहिल्या जगाच्या, विशेषतः युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या इतर जगावरील अत्याचारांशी संबंधित आहेत. ते ज्याने त्याने स्वतःच शोधलेले बरे!
इमॅन्युएल ऑर्टिझ (जन्म 1974 हा चिकानो-प्युएर्तोरिकन-आयरिश-अमेरिकन कवी आहे. गणेश बिराजदार कलाशाखेचा विद्यार्थी आणि निर्माणचा सदस्य आहे. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.