भविष्य काबीज करा

[ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ह्या चळवळीने अमेरिकेत अल्पावधीतच वेग घेतला आहे. वॉल स्ट्रीट हा, अमेरिकेची आर्थिक सत्ता ज्या मूठभरांच्या हातात आहे, त्यांचा भाग आहे. अमेरिकेच्या बाबतीत, आर्थिक सत्ता म्हणजे सर्वकष सत्ता. ती मूठभरांच्या हातात न राहता सर्वसामान्यांच्या हातात यावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले यामध्ये तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता आणि आम्ही 99 टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करतो असा त्यांचा दावा होता. हे ह्या आंदोलनाचे अनन्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल, कारण भारतात वा अन्यत्रही, पुरोगामी चळवळींनी अशी भूमिका पूर्वी घेतली नव्हती. आम्ही आंदोलनकर्ते अल्पसंख्य असून इतरांचे (99 टक्क्यांचे) मार्गदर्शक आहोत, अशीच ती होती.
वॉलस्ट्रीटपर कब्जा करो या घोषणेने अमेरिकेतील मॅनहटन येथे, दि.17 सप्टेंबर 2011 ला सुरू झालेले, ह्या घोषणेवरूनच ओळखले जाणारे हे जनआंदोलन आता अनेक राज्यांत पसरले आहे. अर्थसत्तेचे केंद्र असलेल्या वॉलस्ट्रीटसोबत ज्ञानसत्तेचे केंद्र असणारी विद्यापीठे, (उदा.हार्वर्ड), कलाक्षेत्रातील ब्रॉडवे अशी जीवनाची सर्व क्षेत्रे काबीज करण्यासाठी आंदोलन प्रयत्नशील आहे. कामगार, कलावंत, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, युवक, विचारवंत, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, समलिंगी, मानवी हक्क कार्यकर्ते असे अनेकविध प्रवाह ह्या नेतृत्वविहीन अभिनव राजकीय चळवळीत सामील होऊन त्याला आकार देत आहेत.
प्रसारमाध्यमांनी ह्या लढ्याबद्दल सोयीस्कर मौन बाळगले असले तरी आमच्या वाचकांपर्यंत त्याची खबरबात आणि विश्लेषण पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ह्या पार्श्वभूमीवर मायकेल कॉफमन ह्या विचारवंत कार्यकर्त्याने 99 टक्के बनणे म्हणजे काय आणि ते कसे साध्य करावे याबद्दल रोचक शैलीत केलेले लेखन अनुवादित करून देत आहोत. – कार्य संपा. ]
‘आम्ही 99% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो’ ही उद्घोषणा ‘(वॉल स्ट्रीट पर) कब्जा करो’ आंदोलनाची सुरुवातीपासूनच खासियत राहिली आहे.
1960-70 च्या व्यापक युवक आंदोलनाच्या तुलनेत ही अगदी आगळीवेगळी बाब आहे. त्या काळात आम्ही एक मूलभूत चूक केली. अल्पसंख्य असण्यात आम्हाला केवळ समाधानच नव्हते, तर त्यात आम्हाला धमाल वाटत होती. इतरांपासून आपण वेगळे व ‘बाहेरचे’ आहोत, याचे आम्हाला कौतुक होते. त्यामुळे आमच्या नावडत्या संस्कृतीच्या विरोधात आम्हाला एक सामूहिक अस्मिता व ऊर्जा मिळाली हे जरी खरे असले, तरी त्यामुळे आम्ही समाजजीवनाचा मुख्य प्रवाह सरळसरळ उजव्या शक्तीन बहाल केला. त्यांची एकाधिकारशाही ‘कब्जा करो’ आंदोलनाने मोडीत काढली आहे.
वास्तविक असे करणे हे अत्यंत लज्जास्पद होते. त्याचाच परिणाम गेल्या तीस वर्षांत सामाजिक विषमता वाढण्यात व सामाजिक सेवांचा ह्रास होण्यात झाला आहे. तेव्हाची परिस्थिती आजच्यापेक्षा पुष्कळ बरी होती. बहुतांश लोक, आज आपण ज्यांना उदारमतवादी म्हणू त्या विचारांचे होते आणि अनेकांची तेव्हाची विचारसरणी अशी होती, की जी आज डावीच म्हणवली जाईल. आजच्या टी-पार्टी-सरकारने श्रीमंतांवर कमी कर बसवावा व गरिबांच्या कल्याणाची कामे आपल्या तिजोरीतून करू नयेत असे मानणारा एक आधुनिक गट, टी-पार्टीची आणि विविध देशांच्या सरकारांमध्ये बसलेल्या त्यांच्या भाईबंदांची मुक्ताफळे ऐकून त्या काळचे पुराणमतवादीदेखील शहारले असते. जगाचा सामाजिक व आर्थिक देखावा बदलून टाकण्यासाठी पुरोगामी शक्तींना तेव्हाचा काळ अतिशय अनुकूल होता. हे खरे आहे की व्हिएतनाम युद्ध थांबवण्यात आम्ही सहाय्यभूत ठरलो, स्त्रीवाद, समलिंगींचे हक्क, पर्यावरण यांवरील तगडी आंदोलने आम्ही छेडली, मुख्य प्रवाहाच्या विचाराला ज्यांनी दिशा दिली त्या नागरी-हक्क आंदोलनांना आम्ही पाठबळ दिले, परंतु त्याचबरोबर, आम्ही अनेक बाबतीत अपयशीही ठरलो.
‘कब्जा करो’ आंदोलनाची आता नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे आणि नव वामपंथाच्या पलीकडे (New Left) जाण्याची तिच्यात ताकद आहे. 1970 च्या दशकाच्या मध्यात अमेरिकेतल्या उजव्यांनी स्वतःला ‘नैतिकदृष्ट्या बहुसंख्य’ घोषित केले. तेव्हापासून, दोन बाबतीत त्यांच्यासारखी हिम्मत कुणीच दाखवू शकले नव्हते. एक : अल्पसंख्य असून स्वतःला बिनदिक्कतपणे बहुसंख्य घोषित करणे; दोन : जेव्हा खरेखुरे बहुसंख्य युद्ध, विषमता, भेदभाव ह्यांची नैतिकता प्रश्नांकिल करीत होते, तेव्हा नैतिकतेचे व्यासपीठ काबीज करून, (एका खोट्या) नैतिक उंचीवरून जगाला संबोधित करणे.
तात्पर्य असे, की ‘आम्हीच 99% आहोत’ असे जाहीर करून ‘कब्जा करो’ आंदोलनाने ‘आम्ही बहुसंख्य आहोत’च्याही पुढे मुसंडी मारली आहे आणि हे प्रत्यक्षात आणून दाखवणे हेच आज ह्या आंदोलनाच्या पुढचे सगळ्यात मोठे आह्वान आहे. कारण ‘आम्ही 99% आहोत’ असे म्हणणे वेगळे हो! आणि प्रत्यक्षात तसे असणे वेगळे.
नव्व्याण्णव टक्के बनण्याची आठ सूत्रे
1. नव्याण्णव टक्के बनणे म्हणजे आपणच मुख्य प्रवाह असल्याचा सरळसरळ दावा करणे होय. अर्थात्, मुख्य प्रवाह असण्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. ती चांगलीच गोष्ट आहे. उलट आपल्या कल्पना चांगल्या व न्यायपूर्ण आहेत असे जर आपल्याला वाटत असेल, तर मुख्य प्रवाहाने त्या स्वीकाराव्यात अशीच इच्छा आपण मनात बाळगली पाहिजे. कमी ऊर्जा खाणारी शाश्वत अर्थव्यवस्था आज आवश्यक व व्यवहार्य दोन्ही आहे हे जर आपल्याला पटत असेल. तर आपल्यलाा तो सद्यस्थितीचा भाग बनवता आला पाहिजे. समतावादी समाज अधिक मानवी, कमी हिंसक व अधिक उत्पादनशील असतो याबाबत जर आपली खात्री असेल तर तो सगळ्यांचा आदर्श बनावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे.
2. मुख्य प्रवाह’ असण्याचा दावा करणे याचा अर्थ मुख्य प्रवाह ज्याला ‘वास्तववादी’ म्हणतो, त्यामध्ये स्वतःला अडकवून घेणे नव्हे. कारण सामाजिक, आर्थिक व राजकीय वास्तव हे आपण सामूहिकपणेच निर्माण केलेले असते. उदा. – हवामान बदलाचे भयावह परिणाम रोखण्यासाठी किंवा जगभरातील लोकांना सुरक्षित पेयजल पुरविण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करणे हे आजच्या मुख्य प्रवाहाच्या दृष्टीने ‘वास्तववादी’ नसेलही, परंतु युद्धासाठी किंवा खाजगी बँकांना जमानत भरून सोडवून आणण्यासाठी शेकडो अब्ज रुपये खर्च करणे मात्र असू शकेल. तात्पर्य असे की, वास्तववादी काय आहे याची नव्याने व्याख्या करणे हेच आपले काम आहे.
3. मुख्य प्रवाहाकडे जाण्यासाठी सेतू उभारणे – नव्व्याण्णव टक्के बनण्यामधले हे सगळ्यात मोठे आह्वान आहे. त्यासाठी 99 टक्क्यांना आपला संदेश पोहोचवावा लागेल. ते, 99 टक्के बनण्याच्या आपल्या आदर्शाशी एकरूप होतील, अशी काही व्यवस्था तयार करावी लागेल. आगामी काळात आपल्याला हे सेतू उभारायचे आहेत. ते काम आपल्याला स्वतःकडेच घ्यायचे आहे. नवीन सामाजिक व आर्थिक दृष्टी घेऊन आपण बाहेरून येत आहोत. अशा परिस्थितीत, 99 टक्क्यांमधील आपली भावंडे जगाकडे तशाच नजरेने बघत असतील अशी अपेक्षा आधीपासून आपल्याला करता येणार नाही.
सेतू उभारण्याचे हे कौम अनेक प्रकारे करता येईल. जिथे लोक जमतात अशा, किंवा जिथे लोक आपले म्हणणे मनापासून ऐकून घेतील अशा ठिकाणी. उदा. उपासना स्थळे, शाळा, सेवा केंद्रे, कामाच्या जागा, कामगार संघटना, क्लब, वृद्धाश्रम, समाजमंदिरे, प्रसारमाध्यमे इ. जाऊन आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल. आपल्याशी सहमत नसलेल्या, इतकेच काय तर आपले भयावह चित्र उभे करणाऱ्या अनेकांना
आपल्याला तोंड द्यावे लागले. परंतु ह्या सर्वांमध्ये आपले काम आहे सहिष्णुतेला प्रतिष्ठा मिळवून देणे, इतरांना खलनायक न बनवणे आणि आपल्या कल्पना, सगळ्या समूहांना ज्यांच्याशी एकरूप होता येईल अशा भाषेत मांडणे, ज्यायोगे त्यांना, त्यांची-आपली समान स्वप्ने त्यांच्या अवतीभोवतीच्या इतरांनाही दाखवता येतील.
4. सेतू बांधणे याचा अर्थ, ज्यांचे आपल्याशी अनेक बाबतीत मतभेद आहेत परंतु मुख्य विषयांबाबत सहमती आहे अशा व्यक्ती व संस्था ह्यांच्याशी जोडून घेणे असाही होतो. हे आपल्याला थोडे कठीण वाटू शकेल, पण साध्य करता येईल. एखादी कामगार संघटना एखाद्या पर्यावरण-विरोधी उद्योगाला पाठिंबा देत असली, तरी सामाजिक आर्थिक विषमतेच्या मुद्द्यावर आपण त्यांच्यासोबत असू शकतो. एखादे चर्च गर्भपाताचा हक्क नाकारत असले, तरी सार्वजनिक आरोग्यासाठी वैश्विक उष्मा कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील याबाबत आपल्याशी संवाद साधू शकतील. विद्यार्थ्यांची एखादी संघटना युद्धावर होणाऱ्या खर्चाचे समर्थन करील. पण सर्वांसाठी शिक्षण ह्या मुद्द्यावर त्यांची साथ घेता येईल. आपल्या लक्षात आले असेल की ज्या बाबतीत आपले मतभेद आहेत. ते निःसंशय महत्त्वाचेच मद्दे आहेत. ‘कब्जा करो’ आंदोलनातील लोकांसाठी तर ते जिव्हाळ्याचेच आहेत. परंतु आपल्याला जर खरोखर 99 टक्के व्हायचे असेल तर त्यांमध्ये, आपल्याशी मूलभूत गोष्टींमध्ये मतभिन्नता असलेल्या अनेक व्यक्तींचा अंतर्भाव होतो हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. त्यांच्याशी निकोप चर्चा कशी होईल व समान उद्दिष्ट साध्य करायला त्यांच्याबरोबर काम कसे करता येईल, हा खरा प्रश्न आहे. एकत्र काम करताना आपण काही बाबतीत त्यांच्याशी असहमत असू शकतो. पण त्याच वेळी त्यांच्याशी आपल्याला संभाषणही सुरू ठेवता आले पाहिजे, तेही परस्परांचा आब राखून, आपल्या कल्पना ह्या बहुसंख्यकांच्या कल्पना असाव्यात असे जर आपल्याला वाटत असेल आणि त्या तशा बनतील याबाबत खात्री असेल, तर इतरांवर दीर्घकाळपर्यंत प्रभाव टाकण्याची आपल्यात कुवत आहे, याचीही खात्री बाळगावी लागेल. नळ्याण्णव टक्क्यांमध्ये कितीही मतभेद असले, तरी त्यांच्यातील एकजुटीमुळेच ते उर्वरित एका टक्क्याचा थरकाप उडवू शकतात!
5. आपल्या मागण्या स्पष्ट नसल्याबद्दल टीका करणाऱ्या व सतत नकारघंटा वाजवणाऱ्या लोकांची पर्वा करायची गरज नाही. ‘कब्जा करो’ आंदोलनाची सगळ्यात मोठी शक्ती ही त्याने सामाजिक विषमतेवर आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक व मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चेची धुमाळी उडवून दिली आहे. एका महिन्यात हा मोठाच विजय म्हणावा लागेल. आता आपल्या कामाचा मोठा भाग म्हणजे ही चर्चा पुढे नेणे, हाच आहे.
6. त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पर्यायांबद्दल खुली चर्चा सुरू ठेवणेदेखील आपल्यासाठी आवश्यक आहे. उत्तरे मिळवण्यात काहीही वावगे नाही. सामाजिक-आर्थिक विषमता दूर करण्याकरता व्यवहार्य उपाययोजना काय असू शकतात? याहून अधिक लोकशाहीवादी समाज कसा असेल? राजकीय लोकशाहीचे सबलीकरण व अर्तव्यवस्थेवरील नियंत्रणांचे लोकशाहीकरण कसे करता येईल? अर्थव्यवस्थेचे कोणते घटक खाजगी सेवाक्षेत्रांच्या पलीकडे – सार्वजनिक सेवांमध्ये ठेवावे लागतील? हवामानबदल आणि आर्थिक विषमता ह्यासारख्या विषयांवर श्रीमंत देशांनी काही कृती करावी वा किंमत मोजावी यासाठी काय करता येईल? सार्वजनिक धोरणांद्वारे सहकारी संस्था, सार्वजनिक मालकीच्या संस्था, लघु-उद्योग आणि ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था अशी विभिन्न आर्थिक प्रतिमाने (मॉडेल्स) उभी करण्यास कसे उत्तेजन देता येईल? आज सत्ता व प्रभाव ही बड्या कॉर्पोरेट्स्ची एकाधिकारशाही बनली आहे. वर उल्लेखलेल्या पर्यायी प्रतिमानांपर्यंत ते कसे पोहोचतील? शाश्वत अर्थव्यवस्थेची सुनिश्चिती करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, आणखी असे बरेच काही…
7. ध्रुवीकरणाचा आग्रह धरणाऱ्या आणि हिंसेचे व मालमत्तेच्या विध्वंसाचे समर्थन करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. (त्या मालमत्तेचे मालक किती जुलमी आहेत हा प्रश्न गैरलागू आहे.) हिंसा किंवा विध्वंस म्हणजे व्यापक सामाजिक चळवळी संपवण्याचा मार्ग. आंदोलनांचे खच्चीकरण. आंदोलनाचे जनसामान्यांपासून तुटणे होय. आपण 99 टक्के बनण्यात ही मोठी बाधा आहे.
9. आपल्याला अभिप्रेत परिवर्तन घडवून आणण्याच्या आपल्या क्षमतेवर विश्वास असू द्या. बहुसंख्यकांना आपल्या बाजूला वळवण्याच्या आपल्या ताकदीवर विश्वास असू द्या. सहिष्णुता आणि सहसंवेदना ह्या गुणांना आपण प्रतिष्ठा मिळवून देऊ ह्यावर विश्वास असू द्या सेतू बांधण्याची आणि चिकाटीने हृदयपरिवर्तन घडवण्याची आपल्याकडे शक्ती आहे ह्यावर विश्वास असू द्या. नवीन उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आपण असू ह्यावर विश्वास असू द्या. आपण खरोखर 99 टक्के बनू शकतो ह्यावर विश्वास असू द्या!
– अनुवाद – अनुराधा मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.