आजचा सुधारक तर्फे परिसंवाद व वाचकमेळावा

आजचा सुधारक चे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 चे अंक मराठीकारण विशेषांक म्हणून काढण्यात आले होते. त्यांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने दि.20 नोव्हेंबर 2011 रोजी नागपूर येथील बाबुराव धनवटे सभागृहात ‘मराठी माणूस : गडचिरोली से सिलिकॉन व्हॅली’ ह्या विषयावर परिसंवाद व त्याला जोडून आ.सु. चा वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिसंवादासाठी शिवसेना आमदार अभिजित अडसूळ, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, दै.भास्करचे समूहसंपादक प्रकाश दुबे आणि अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पैकी अभिजित अडसूळ परिसंवादासाठी पोहोचू शकले नाहीत, तर अनिल शिदोरे ह्यांना वेळेवर दुसरे काम उद्भवल्यामुळे त्यांनी मनसेचे विदर्भ संघटक हेमंत गडकरी ह्यांना पाठवले.
परिसंवाद व वाचक मेळावा एकत्र घेण्याचा आसु चा हा पहिलाच प्रसंग होता. सुरुवातीला अनुराधा मोहनी ह्यांनी मराठीकारण म्हणजे महाराष्ट्र – मराठी माणूस – मराठी भाषा ह्यांचा परस्परसंबंध, हे स्पष्ट केले. आजचा सुधारक चा मराठीकारण विशेषांक ऑक्टोबर व नोव्हेंबर 2011 ह्या दोन महिन्यांत विभागून काढण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘मराठी’च्या अनेक पैलूंवर त्यामध्ये लेख लिहिण्यात आले. त्यामधूनच ह्या परिसंवादाची कल्पना पुढे आली. मराठी बोलणारा माणूस हा मराठी माणूसच आहे म्हणून त्याच्यामानसिकतेचा वेध घेण्यासाठी हा विषय ठरवण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. गडचिरोली ते सिलिकॉन व्हॅली हा मराठी माणसाचा सांस्कृतिक पैस आहे. इतक्या व्यापक अवकाशात तो विखुरलेला आहे. त्याला एकत्र सांधणारे दुवे – मराठी भाषा व मराठी संस्कृती हे आज कोणत्या अवस्थेत आहेत? एकविसाव्या शतकात त्यांची प्रस्तुतता काय आहे? भूतकाळात रमणाऱ्या व आपल्याच कोशात अडकलेल्या मराठी माणसाच्या सर्वंकष विकासाचे राजकारण, अर्थकारण व संस्कृतिकारण यांची दिशा काय असावी ह्यावर चर्चा करण्यासाठी हा परिसंवाद आहे. मराठीपणाचा मुद्दा घेऊन राजकारणात उतरलेल्या पक्षांना त्यासाठी मुद्दाम पाचारण करण्यात आले आहे असेही त्या पुढे म्हणाल्या.
परिसंवादाचे प्रास्ताविक नंदा खरे ह्यांनी केले. अन्न गोळा करणाऱ्या गडचिरोलीतील माणसापासून तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये औद्योगिकोत्तर जीवन जगणाऱ्यांपर्यंत सर्व मराठी माणसेच आहेत. असे सांगून विषयाची व्याप्ती त्यांनी स्पष्ट केली. आजचा सुधारक ह्या मासिकाबद्दल सांगताना ते म्हणाले की आगरकरांचा वारसा जपणारे हे मासिक आहे हे नावावरूनच दिसते. आसु जगभरातील लोकांचे चांगले विचार मराठी माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे. सर्वांना आस्था वाटणाऱ्या विषयांची चर्चा केली जाते. म्हणूनच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अमराठी विचारवंत यांना आमंत्रित केले आहे असे त्यांनी सांगितले.
हेमंत गडकरी ह्यांनी आपल्या भाषणात आपली माणसे आपली भाषा बोलायला कशी लाजतात ते सांगताना टोनी ग्रेग मुंबई म्हणतो, पण सिलिकॉन व्हॅलीमधील मराठी माणूस मात्र ‘बॉम्बे’च पसंत करतो असे उदाहरण दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका मराठी माणूस व मराठी भाषा यांच्यावरील अतिक्रमण दूर करणे ही आहे. मराठीचा आग्रह धरताना आम्ही द्वेष कुणाचाही करीत नाही. असे सांगितले. महाराष्ट्रात आपण इथल्या पाणीपुरीवाल्याशी, इथल्या पोलीस अधिकाऱ्याशी मराठीतच बोलले पाहिजे, असा आग्रह धरला नाही तर पुढच्या पिढीत कोणीही मराठी साहित्य वाचणार नाही. असा इशारा त्यांनी दिला. आपल्या पक्षाची स्थापना निव्वळ निवडणूक लढवण्यासाठी झाली नसल्याचे सांगतानाच उत्तर भारतीयांसारखी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याची सत्ताकांक्षा मराठी मनात का निर्माण होत नाही किंवा दिल्लीत मराठी माणसांचा दबावगट का तयार होत नाही. दक्षिण भारतातील हिंदीद्वेष चालतो तर आमचे मराठीप्रेम का खपवून घेतले जात नाही असे प्रश्न उपस्थित केले.
आजचा सुधारक च्या उज्ज्वल परंपरेची, नागपूरकर असूनही आपल्याला कल्पना नव्हती हे कबूल करून त्यांनी आपण वर्गणीदार होत असल्याचे जाहीर केले.
प्रकाश दुबे ह्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी मराठी भाषक तर नाहीच, पण मराठी आहे का? असा प्रश्न उपस्थित करून रतन टाटांना आपण मराठी मानणार का? असा प्रश्न केला. मराठी माणूस म्हणजे फक्त मराठी मातृभाषा असलेला माणूस नव्हे हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन फार चांगल्या रीतीने विशद केले. सी.पी.अँड बेरारमधून नागपूर वेगळा केल्यावरही त्या विधान मंडळात 80% प्रतिनिधी मराठी होते. मधुकर दिघे हे उत्तर प्रदेशात सर्वाधिक काळ राहिलेले दुसऱ्या क्रमांकाचे वित्तमंत्री होते. वि.स.खांडेकर, नामदेव ढसाळ ह्यांच्या साहित्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. अमराठी लोकही त्यांचे वाचक आहेत. हिंदी पत्रकारितेचे मेरुमणी बाबूराव विष्णू पराडकर हे, तसेच, स्टेट्स्मनचे नामांकित पत्रकार अरुण साधू हे दोघेही मराठी मातृभाषा असलेले होते, परंतु त्यांनी मराठीपणाच्या सीमा ओलांडल्या. याप्रमाणे अनेक उदाहरणे देऊन त्यांनी मनसेच्या ‘मराठीवर अमराठी माणसांचे अतिक्रमण’ ह्या सिद्धान्ताचे खंडन केले. हे सांगण्यासाठी त्यांनी बिहारचे उदाहरण दिले. आपले पोट भरायला लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. असे अनेक गरीब लोक बिहार, उ.प्र.मधून मुंबईत आले होते. परंतु आता तर तेही कमी झाले आहे. बिहारमध्ये नीतिशकुमारांचे राज्य आल्यापासून बिहारी माणसांना तेथेच रोजगार मिळू लागला. त्याचा परिणाम म्हणून मुंबईत किरकोळ कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. याउलट तुमच्या कोकणचा मात्र विकास झालेला नाही. ज्या कॉ. कृष्णा देसाईंचा 25 वर्षांपूर्वी तुमच्या मुंबईत खून झाला, त्यांना आपल्य कुटुंबाचे पोट भरण्यासाठी कोकणातून मुंबईला यावे लागले होते. तीच परिस्थिती, तीच मनिऑर्डर अर्थव्यवस्था अजूनही कोकणात आहे. फक्त तलवारीने लढता येत नाही म्हणून तुम्ही निःशस्त्र अशा सामान्यांवरच हल्ला करता असा टोलाही त्यांना मनसेला लगावला.
डॉ. यशवंत मनोहर आपल्या अध्यक्षीय भाषणात असे म्हणाले की ह्या परिसंवादाच्या निमित्ताने राजकीय पक्ष व विचारवंत यांचा परस्परसंवाद होण्याची चांगली संधी होती. त्यातून वैचारिक तफावत कमी होऊन उभयताना विधायक भूमिका घेता आली असती. परंतु अडसूळ व शिदोरे ह्या दोघांनीही ही संधी गमावली आहे.
गडचिरोली ते सिलिकॉन व्हॅली ह्या विषयाचा परामर्श घेताना ते म्हणाले, की गडचिरोलीसारख्या मागासलेल्या भागात भाषेपेक्षा जगण्याचे प्रश्न अधिक तीव्र आहेत. ते सुटल्यावरच त्यांना भाषेच्या,अस्मितेच्या प्रश्नाकडे वळता येते.
ह्या भाषा किंवा अस्मितांचे महत्त्व काय ह्याचा विचार करताना ते म्हणाले, की ‘मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे’ असे डॉ. आंबेडकर म्हणत असत. लहान अस्मितांनी मोठ्या अस्मितांमध्ये विलीन व्हावे अशी त्यांनी शिकवण दिली. मराठीला खालचे स्थान देण्यासाठी आपण स्वतःच तर जबाबदार नाही? इंग्रजांना दोष देऊन काय साध्य होणार आहे? उलट इंग्रजांच्या संपर्कात आल्यामुळे आपल्या भाषेत अनेक नवीन शब्दांची, कल्पनांची भर पडली. नाही तर आपल्या धर्मशास्त्राने आपल्याला केवळ संकुचितपणाच शिकवला होता. इंग्रजी शिकण्यात वाईट काहीच नाही. उलट ह्या जगातील जास्तीत जास्त भाषा आपल्या मुलांना याव्यात अशीच आपण इच्छा केली पाहिजे. आज आपण अमराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याच्या गोष्टी करतो. परंतु इतर प्रदेशातील लोकांनी मराठी माणसांना तेथून हाकलून दिले, तर ते आपल्याला चालेल का? म्हणून अस्मितांचा आग्रह धरताना फार विचारपूर्वक, स्वतःचे नुकसान न करून घेता धरला पाहिजे.
मराठी समृद्ध करायची असेल तर निव्वळ तिच्याविषयी अभिमान बाळगून होत नाही. त्यासाठी विज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत यावे लागते. संशोधन व्हावे लागते. आज इंग्रजीचे महत्त्व कशामुळे वाढते आहे ह्याचे उत्तर शोधताना त्यांनी केलेली मेहनत लक्षात घ्यायला हवी. मराठीसाठीही अशीच मेहनत घेऊन आपले वैचारिक धन परिपुष्ट करून ते आपल्या मुलांना द्यावे लागेल. आज मराठी किती दीनवाणी आहे! मराठीतील कोशवाङ्मय लोकांपर्यंत पोहोचलेले नाही; विश्वकोशासारखा महाप्रकल्प मराठीत झाला याची त्यांना सुतराम कल्पना नाही. संविधान माहीत नसल्यामुळे मूलभूत हक्कांशी त्यांचा परिचय नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. याबाबतीत आम्हाला कितीही वाईट वाटून काही उपयोग नाही. शासनाने हे लोकशिक्षण केले पाहिजे. ज्यादिवशी लोकांना त्यांच्या भाषेतून त्यांचे हक्क समजतील, त्या वेळी ते ते संघर्ष करून ते प्राप्त करतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांचे व त्यांच्या भाषेचे सबलीकरण होईल असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणानंतर भरत मोहनी ह्यांनी आभार मानले. त्यानंतर तेथेच वाचक मेळावा घेण्यात आला. ह्या मेळाव्यात सर्वप्रथम आ.सु.चे जुने वाचक अनंतराव अमदाबादकर ह्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आ.सु.च्या कामगिरीबद्दल संतोष व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. त्यावर दिवाकर मोहनींनी त्यांना “आमच्याकडून अपेक्षा काय आहेत त्या सांगा – तुम्ही एवढ्यावर समाधानी असू नये असे आम्हाला वाटते” असे म्हटले. इतरही काहींची भाषणे झाली. डॉ. यशवंत मनोहरांनी आ.सु.चा विवेकवाद समाजाच्या बुद्धिवादी वर्गापुरता सीमित न राहता, समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत झिरपत जावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर संजिवनी कुळकर्णीनी बुद्धिवादी वर्गालाही विवेकवादाची गोडी लावण्याची आवश्यकता आहे असे निदर्शनास आणून दिले. प्रा. किशोर महाबळ यांनी खालीलप्रमाणे चार सूचना केल्या –
1. आ.सु.चा प्रत्येक अंक विशेषांक असावा. त्याचे स्वरूप seminar ह्या इंग्रजी मासिकाप्रमाणे असावे – एक अंक एका विषयाला वाहिलेला, याप्रमाणे. 2. राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपण बोलावतो तेव्हा त्यांना अत्यंत टोकदार, नेमके प्रश्न विचारावे व त्यांचे उत्तर देण्यास बाध्य करावे.
3. मराठीतील नवीन लेखक आ.सु.ने समोर आणावे.
4. आ.सु.च्या पहिल्या पानावरील उताऱ्यांचे संकलन करावे.
ह्या चारही मुद्द्यांवर नंदा खरे आणि रवीन्द्र रु.पं. यांनी समर्पक उत्तरे दिली. वाचक मेळाव्याचे सूत्रसंचालन संजीवनी कुलकर्णी ह्यांनी केले. सभागृहाच्या बाहेर आ.सु.चे खंड व किरकोळ अंक ह्यांची विक्री व वर्गणी स्वीकृती ह्यांसाठी स्टॉल लावण्यात आला होता. तो सुरेश मानमोडे ह्यांनी सांभाळला. कार्यक्रमास श्रीमती लीला चितळे, पराग चोळकर, प्र.ब.कुळकर्णी, प्रबोध देशमुख, रवीन्द्र देवघरे, प्रवीण बर्दापूरकर, सुधीर देव, विलास भोंगाडे, अॅड. हर्षवर्धन निमखेडकर, हिराचंद विकमसी इ. नागपुरातील मान्यवर उपस्थित होते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.