प्राचीन भारतातील विज्ञानाचा ह्रास का झाला?

प्राचीन भारतीय संस्कृती जगातल्या इतर सर्व संस्कृतींपेक्षा प्रगत होती आणि अण्वस्त्रांपासून (ब्रह्मास्त्र!) पुष्पक विमानापर्यंत सर्व काही आपल्याकडे कित्येक हजार वर्षांपूर्वीच होते असा एक समज सामान्य माणसाच्या मनात घट्ट रुजलेला दिसतो. हे खरे मानायचे तर मग असलेले सर्व गेले कुठे हा प्रश्न उद्भवतो. त्याचे उत्तर मुस्लिम आक्रमणात आणि ब्रिटिश राजवटीत शोधले जाते. ते कितपत बरोबर आहे? पुनरुज्जीवनवादी विचारसरणीची ही खेळी समाजाची सत्यापासून दिशाभूल करते. वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करता विज्ञानाची खरोखरच किती प्रमाणात झाली होती, ती कोणत्या कारणांनी थांबली असावी, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोण यांची अधोगती का झाली असावी, या प्रश्नांची उत्तरे ऐतिहासिक काळ, भौगोलिक सीमा, सामाजिक स्थिती यांचे संदर्भ तपासत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
प्राचीन भारत म्हणजे वायव्येला गांधारापासून पूर्वेकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला ‘हिंदुस्तान’ किंवा आजच्या भाषेत भारतीय उपखंड. त्यामुळे या संपूर्ण प्रदेशाचा सम्यक् विचार होणे गरजेचे ठरते.
हिदुस्थानच्या मानवी संस्कृतीच्या पहिल्यावहिल्या खुणा सापडतात त्या आजच्या पाकिस्तानातील मेहरगढ येथे. इ.स.पूर्व 5500 च्या ह्या अवशेषांमध्ये मातीच्या विटांची घरे, धान्य साठवायची कोठारे, तांब्याच्या खनिजांपासून बनवलेली हत्यारे आढळतात. जवाची (बार्ली) आणि गव्हाची शेते, खजुरांची लागवड, शेळ्यामेंढ्यांचे पालन ही या लोकांची वैशिष्ट्ये होती. इ.स.पूर्व 2600 पर्यंत गारगोटीच्या दगडापासून हत्यारे बनवणे आणि चामडे कमावणे या गोष्टी त्यांना करता येऊ लागल्या होत्या. जिवंत माणसाच्या तोंडातील दाताला ड्रिलिंग करून भोक पाडल्याची जगातली सर्वांत प्राचीन नोंद या उत्खननात मिळाली.
यानंतर प्रगत संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडतात त्या हडप्पा आणि मोहेंजदोडो (इ.स.पूर्व 3300-1700) इथल्या सिंधू संस्कृतीत, उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून या आर्यपूर्व संस्कृतीची कल्पना येते. शहरसदृश वस्त्यांमध्ये विटांनी बांधलेली भक्कम घरे, विहिरी, न्हाणीघरे, धान्य-कोठारे आणि सांडपाण्याच्या निचऱ्याचीही त्याची वैशिष्ट्ये. त्यांनी वजन करण्याची आणि मापनाची स्वतंत्र पद्धती विकसित केली असल्याचेही आढळले आहे. उत्खननाच्या सगळ्यांत खालच्या थरांत दगडाच्या जोडीला ब्रॉन्झची हत्यारेही सापडली. याचा अर्थ ही संस्कृती चाल्कोलिथिक काळात म्हणजे इ.स.पूर्व 3300 च्या दरम्यान स्थिरावली होती. इ.स.पूर्व 2500 च्या दरम्यान प्राण्यांनी ओढायचे नांगर वापरात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन हिंदुस्थानात या क्षेत्रात काय काय घडले ते पाहू या.
इस. पूर्व 1500 पासून लोखंड खाणीतून काढण्याचे तंत्र सापडले. नंतरच्या काळात चांदी, तांबे, शिसे, जस्त, कथील आणि सोनेही खाणीतून काढले जाऊ लागले. इ.स.पूर्व सहाव्या शतकापर्यंत औद्योगिक रसायनशास्त्रात भारत आघाडीवर पोचला होता. कापड, रंग, कातडी कमावणे, साबण, काच ह्या क्षेत्रांतही पुढारलेला देश म्हणून भारताची जगात ओळख होती. पोलादाला पाणी देण्याची क्रिया पूर्णत्वाला पोचली होती. अॅलेक्झांडरच्या आक्रमणानंतर पौरवाने-पोरसने-त्यांना नजराणा म्हणून तीस पौंड पोलाद दिले. एवढ्या गोष्टीवरूनच आपल्याकडच्या पोलादाचे जगाला किती अप्रूप होते हे लक्षात येते.
अलेक्झांडरच्या आक्रमणकाळापर्यंत भारत वैद्यकीय ज्ञानाबद्दल जगभर प्रसिद्ध झाला होता. इ.स.पूर्व पाचव्या शतकातल्या सश्रुतसंहितेत शस्त्रक्रिया, प्रसती, आहार, स्नान, औषधे, बालकांचा आहार, वैद्यकीय शिक्षण यांविषयी सविस्तर माहिती आहे. ब्राह्मण विरोध करत असले तरीही शस्त्रक्रिया शिकण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक आहे असेही सुश्रुत म्हणतो. मोतीबिंदू, अंतर्गळ, मूतखडा, सिझेरियन, हायनोप्लास्टी, स्क्रिन ग्राफ्टिंग, अशा शस्त्रक्रिया सुश्रुत करीत असे. जंतुविहीन शस्त्रक्रियेची तयारी करताना पाळायचे नियम त्याने तपशीलवार दिले आहेत. त्यांच्या संहितेत 1120 रोगांची नावे दिली आहेत आणि त्यांचे निदान रुग्णाचा इतिहास, मूत्रपरीक्षा आणि नाडीपरीक्षा यांच्या आधारे कसा करावा ते सांगितले आहे.
इ.स.दुसऱ्या शतकात होऊन गेलेला चरक हा कुषाण राजा कनिष्क याचा राजवैद्य होता. या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आयुर्वेदाच्या ज्ञानाचे संकलन करून चरकाने चरकसंहिता लिहिली. पचन, चयापचय आणि प्रतिकारशक्ती ह्या तोपर्यंत माहीत नसलेल्या संकल्पना त्याने मांडल्या. ही संहिता हा आजच्या आयुर्वेदाचा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो.
चरकाचाच समकालीन नागार्जुन हा संशोधक रसायनशास्त्रज्ञ होता. तक्षशिलेत वैद्यक शिकत असतानाच्या काळात बुद्धाच्या तत्त्वज्ञानाकडे वळला आणि नंतर लोकप्रिय ठरलेल्या महायान पंथाचा तो प्रमुख प्रवर्तक झाला. बहुतांशी वनस्पतींवर अवलंबून असलेल्या आयुर्वेदाला नागार्जुनाने रसचिकित्सेची जोड दिली, रसायन या शब्दाला आजचा अर्थ दिला. पारा या धातूच्या अभिक्रियांवर तर त्याने प्रभुत्व मिळवले होते. रसायनांचे धातू आणि उपधातू, द्रावक आणि द्राव्य असे वर्गीकरण त्याने केले.
यानंतरच्या काळात आयुर्वेदाच्या ज्ञानात फार मोठी आणि वेगळी भर पडल्याचे दिसत नाही. पण आठव्या शतकात बगदादचा खलिफा हरून अल रशीद याने त्याच्या राज्यात वैद्यकीय विद्यालये आणि रुग्णालये काढायचे ठरवले तेव्हा मार्गदर्शनासाठी येथल्या वैद्यांना नेले, याचा अर्थ गुणवत्तेत सातत्य टिकून राहिल्याचे लक्षण मानले पाहिजे. इ.स.च्या आठव्या शतकात माधव याने लिहिलेल्या ‘निदान’ या ग्रंथात मसूरिकेच्या म्हणजेच देवीच्या रोगाच्या (स्मॉल पॉक्स) प्रतिबंधासाठी देवी काढण्याचा’ उपाय सांगितला आहे. ‘देवी आलेल्या गाईच्या स्तनांवरील किंवा माणसाच्या अंगावरील फोडातील लस काढायची आणि दंडावर रक्त येईपर्यंत छेद देऊन ती रक्तात मिसळायची’ ही पद्धत वाचली की प्रायोगिक ज्ञानाच्या केवढ्या मोठ्या वारशाला आपण पारखे झालो याचे वाईट वाटते.
नौकानयनाची विद्या इसवीसनपूर्व तिसऱ्या सहस्रकापासून विकसित होत गेली. जगातले पहिले बंदर म्हणजे गुजरातमधले लोथल. काळ आहे इसवीसनपूर्व 2400 च्या दरम्यान. भरती ओहोटीचे आणि साबरमती नदीच्या सतत बदलणाऱ्या प्रवाहाचे ज्ञान असल्यामुळे, गाळ साचू नये म्हणून ते मुख्य प्रवाहापासून दूर वसवले होते. या काळात उत्तर दिशा दाखवणारा ध्रुव तारा आणि इतर नक्षत्रे यांच्या स्थानानुसार नौकानयन होत असे.
मौर्यकाळात (इ.स.पूर्व चौथे शतक) अभियांत्रिकी, नगररचना, वास्तुरचना या क्षेत्रात चांगली प्रगती झाली होती. याच काळात भारतातला पहिला पाटबंधारा ‘सुदर्शन’ काठेवाडमधील गिरनारजवळ बांधला गेला आणि तो इ.स. 150 पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्षे टिकून होता.
कापसाची लागवड जगात प्रथम हिंदुस्थानातच इ.स. पूर्व तिसऱ्या सहस्रकात सुरू झाली. मोहेनजोदडोमधील लोक सुती कपडे वापरत असत असे दिसते. नंतरच्या काळात अरब प्रवाशांनी या ‘लोकरी’ला कातन म्हटले आणि त्यावरूनच इंग्रजीत ‘कॉटन’ हा शब्द आला. या कापसापासून तलम सुती वस्त्रे तयार करायची कला इतकी विकसित झाली होती की कापडाचे अख्खे ठाण अंगठीतून आरपार ओढून काढता येत असे.
0 ते 9 हे अंक आणि दशांशचिह्न हे भारतीय गणितज्ज्ञांचे जगाला योगदान आहे. त्यांना अरबी अंक असे म्हटले जात असले तरी त्याचे मूळ ब्राह्मी लिपीतील अंकांत आहे. अरबांना ते माहीत होण्याआधी हजार वर्षे अशोकाच्या एका शिलालेखात (इ.स.पू.256) ते आढळतात.
गणित आणि खगोलशास्त्र ह्यांतली त्या काळाच्या दृष्टीने अद्वितीय कामगिरी पाचव्या शतकातील आर्यभटाने केली. क्षेत्रफळ, आकारमान, बीजगणितीय संकल्पना, इ. गोष्टींचा ऊहापोह करून ‘पाय’ (TI) या गणितातल्या संज्ञेची किंमत 3.1416 इतकी (अचूकतेच्या बऱ्यापैकी जवळ) काढण्यात तो यशस्वी झाला होता. पृथ्वी गोल आहे, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, ग्रहणे ही राहू-केतू या राक्षसांमुळे होत नसून तो ‘सावल्यांचा खेळ’ आहे हेही त्याने सांगितले. आर्यभटाचे वैशिष्ट्ये म्हणजे तो ‘स्थानम् स्थानम् दश गुणम्’ अश्या दशमान पद्धतीचा वापर करू लागला. ही पद्धत तोपर्यंत ज्ञात नव्हती आणि आता ती जगभर प्रचलित आहे.
प्राचीन भारतातले विज्ञान कसे प्रगत होत गेले याची ही नुसती झलक सांगितली. आपण घेतलेली शास्त्रज्ञांची नावे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी दोन अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली ही माणसे त्यांच्या काळातले न्यूटन-डार्विन आईन्स्टाईन होती, म्हणूनच त्यांची नावे आजही टिकून आहेत. त्यांच्यामागेही शास्त्रज्ञांच्या फळ्या असणार आणि त्यांचाही एकंदर प्रगतीत सहभाग असणार. एवढी वैज्ञानिक प्रगती आणि ती व्हायला आवश्यक अशी सामाजिक स्थिती असताना वैज्ञानिक दृष्टिकोण नंतर का तगला नाही, ही प्रगती अचानक थांबून ह्रास का सुरू झाला हे तपासण्यासाठी इतिहास, धर्मग्रंथ आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती यांचा मागोवा घ्यावा लागतो.
इ.स.पूर्व दहाव्या शतकात इतर देशांशी जलसंपर्क वाढला. व्यापार आणि उद्योगधंदे यांना चालना मिळाली. आर्थिक संपन्नता आली. तीमुळे समाजाच्या एका वर्गाला भरपूर मोकळा वेळ मिळायला लागला. यातून ज्ञान आणि कला यांचा विकास तर झाला, परंतु समाज सुखवादी आणि जडवादी झाला. ‘धर्मस्य ग्लानिर्भवति’ अशी स्थिती आली. नैतिक बंधने काचू लागली. अशा वेळी समाजहितैषी तत्त्वचिंतक नैतिक मूल्यांचा पुनःशोध घेऊ पाहातात. (गौतम बुद्धाला समकालीन असलेल्या कफ्यूशियसच्या चीनमध्ये किंवा बुद्धानंतरच्या काळात प्रोटॅगोरसच्या ग्रीसमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती होती.) जैन-बुद्धकालीन हिंदुस्थानात एक प्रकारे नैतिक अराजक माजले होते. त्यातून नीतिशास्त्रीय संशयवाद निर्माण झाला. सुखवादाच्या या प्रतिक्रियेतून जैन आणि बौद्ध या निवृत्तिपर विचारधारा समर्थ झाल्या. त्यांतून आधीच्या काळातल्या रूढी, परंपरा, कर्मकांडे यांसह सर्वच व्यवहारांची चिकित्सा होऊ लागली. या चिकित्सक प्रतिक्रियेने एकीकडे पारंपरिक बंधनांना छेद दिला आणि दुसरीकडे वैचारिक औदार्य दाखवले. परंपरेच्या साखळ्यांतून समाज मुक्त असेल तर विज्ञानाचा प्रसार झपाट्याने होतो. भगवान बुद्धांनी हे विचाराचे आणि कृतीचे स्वातंत्र्य भारतीय समाजाला देऊ केले. संशयवादातून निरीश्वरवादापर्यंतचा बुद्धाचा प्रवास या वैचारिक मोकळेपणाची साक्ष देतो. बौद्धविचारात शब्दप्रामाण्याचा किंवा व्यक्तिप्रभावाचा दुराग्रह नव्हता. कोणत्याही घटनेचे निरीक्षण करून, त्यामागील कार्यकारणभाव समजून घेऊन, वारंवार प्रयोग करून सत्य प्रस्थापित करणे आणि हे करताना कोणत्याही श्रद्धेपासून तटस्थ राहणे ही विज्ञानाची पद्धती आहे. (पाश्चात्त्य देशांतही जी विज्ञानाची प्रगती झाली ती श्रद्धा आणि अतिमानवी शक्ती नाकारून किंवा त्याबाबत तटस्थ राहूनच झाली.) या काळात ब्राह्मी लिपी प्रचलित झाली आणि तीमुळे असलेले ज्ञान ग्रंथस्वरूपात जतन करणे शक्य झाले. (त्याआधी ज्ञानाचा प्रसार श्रुति स्मृती म्हणजे ऐकणे आणि लक्षात ठेवणे अशा मौखिक पद्धतीने होत होता) विचारस्वातंत्र्यावर धर्माचे कोणतेही बंधन नसल्यामुळे नवीन विचारांना किंवा प्रयोगांना विरोध झाला नाही. याच्या नेमकी उलट परिस्थिती ख्रिस्ती धर्मप्रसारात घडली. म्हणून इसवीसनाच्या पूर्वी ग्रीक तत्त्ववेत्त्यांनंतर पुढची चौदाशे वर्षे विज्ञानाची प्रगती युरोपात खुंटलेलीच दिसते.
भारताच्या इतिहासाचे सामान्यपणे तीन कालखंड पाडता येतात. पहिला वैदिक विचारांचा प्रभाव असणारा, सामान्यपणे इ.स.पूर्व पाचव्या शतकापर्यंतचा. दुसरा बौद्ध विचारांचा प्रभाव असणारा. साधारणपणे इ.स.सातव्या-आठव्या शतकापर्यंतचा आणि तिसरा हिंदू धर्माचा आठव्या शतकानंतरचा. वैदिक विचारांच्या विरोधातून बौद्ध-विचार विकसित झाला, तर बौद्ध-विचार उखडून टाकण्याच्या प्रेरणेतून आज जो हिंदू-धर्मविचार म्हटला जातो, तो बळावला. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माचे नवनिर्माण केले असेही म्हणता येते. त्यातला महत्त्वाचा मुद्दा अर्थातच जन्माधारित जातीच्या उच्चनीचतेचा होता आणि तो समतावादी बौद्धविचारांच्या विरोधी होता. विरोध करण्याची भूमिका इतकी टोकाची द्वेषमूलक होती की तीतून आधीच्या काळात प्रगत झालेले विज्ञानही सुटले नाही. भारतात झालेली विज्ञानाची सारी प्रगती त्यामुळेच कुंठित झाली. बौद्ध काळातले सगळेच विज्ञानाचे अभ्यासक बौद्ध धम्मविचारांचे अनुयायी नव्हते. पण स्वतंत्र विचार करण्याची मुभा आणि प्रयोगांचे स्वातंत्र्य त्यांना बौद्ध विचारांच्या राज्यकर्त्यांकडून मिळाले म्हणूनच ते काही करू शकले. या संपूर्ण काळात बौद्ध धर्माला राजाश्रय होता. त्यामुळे काही बौद्ध अनुयायांना सत्ता आणि संपत्तीची चटक लागली होती. त्यातून अंतर्गत मतभेद निर्माण होऊ लागले होते. मत्ता आणि सत्तेच्या समर्थनामुळे धर्मपालनात काही विसंगती उद्भवू लागल्या होत्या. चौथ्या शतकाच्या प्रारंभी (इ.स.320) गुप्त घराणे प्रबळ झाले. ब्राह्मण्यवादी दृष्टीने हे राजे अधिक सहिष्णु होते. याच काळात सरंजामी राज्यपद्धती अस्तित्वात आली आणि बहरली. वर्गभेद करणारी एक व्यवस्था तीही राजकीय, ही वर्गभेद करणाऱ्या दुसऱ्या व्यवस्थेला पोषकच ठरणारी. साहजिकच गुप्त राजवट स्थिरावताच ब्राह्मण्यवादी व्यवस्थेने उचल खाल्ली. आपली संपत्ती आणि सत्ता वाढवायला सुरुवात केली. बौद्ध विचारांनी ज्या ज्या गोष्टींना प्रोत्साहन दिले आणि पुरस्कार केला त्या सगळ्या हीन आणि वाईट ठरवणे सुरू झाले. पण स्मृतींमध्ये सांगितलेली बंधने सगळीकडे प्रत्यक्षात येण्यासाठी, आद्य शंकराचार्याचा उदय होण्यासाठी, नववे शतक उजाडावे लागले.
आद्य शंकराचार्य हे अफाट आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्त्व होते. विरोधकांच्या भूमिकेतील विसंगती हेरून त्यावर विदारक प्रकाश टाकण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. गहन तत्त्वज्ञानाचा सोप्या भाषेत प्रसार करण्याचे कसब, संघटनाचातुर्य, अविश्रांत भ्रमंतीची क्षमता याद्वारे अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले ते अजूनही पूर्णपणे पुसता आलेले नाही हे खरेच आहे. त्यांच्या काळात हिंदू हा आजच्या अर्थाने एक धर्म नव्हता तर ती अनेक पंथांची भेसळ होती. ह्या विविध पंथांच्या उपास्य देवतांच्या स्तुतीची स्तोत्रे रचली आणि सगळ्या धर्मांत समरसता आणली. धर्मप्रसारासाठी आणि रक्षणासाठी त्यांनी देशाच्या चार टोकांना चार पीठे स्थापन केली. ती आजही आहेत आणि ह्या पीठाधिपतींना आजही शंकराचार्य हीच पदवी आहे. त्या काळात धार्मिक वादविवादात अशी एक प्रथा होती की हरलेल्या व्यक्तीने जिंकलेल्या व्यक्तीच्या तत्त्वज्ञानाचा किंवा धर्माचा स्वीकार करायचा. शंकराचार्यांनी बौद्ध तत्त्वज्ञांना वादात पराभूत करून नष्टप्राय केले. त्यांना हिंदुधर्म स्वीकारणे भाग पाडले, पण वेदांचा अधिकार मात्र नाकारला.
बुद्धाने आपला धर्म रुजविण्यासाठी जेवढा काळ घालवला त्याच्या एक तृतीयांश काळात त्यांनी भारतातला बौद्धधर्मच उखडून टाकला. बुद्धामुळे समतेचा पुरस्कार करणारी, दलितांना मुक्तता देणारी एक विचारप्रणाली घडली तर शंकराचार्यांमुळे समाजव्यवस्थेला दगडासारखे काठिन्य आले. बुद्धाने मानवी बुद्धीला, विवेकाला सर्वश्रेष्ठ मानले. शंकराचार्य मानवी बुद्धीचे श्रेष्ठत्व मान्य करत नाहीत कारण ती जगाइतकीच मिथ्या आहे. शंकराचार्यांनी ‘विज्ञानाला विरोध करू या’ या पद्धतीने विरोध केला नसला, तरी त्यांच्या विचारांच्या क्षेत्रात विज्ञानाला स्थानच नव्हते.
दर्शनाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष जीवनाला मिथ्या मानणारे शंकराचार्य समाजधारणेच्या क्षेत्रात मात्र नव्या हिंदु धर्मव्यवस्थेचे निर्माते ठरले. त्यांनी ‘कलिवयं’ म्हणून सांगितलेल्या बंधनांत जसा नियोग, गोहत्या, वानप्रस्थ, अश्वमेध अशा गोष्टींचा समावेश होता, तसा आपल्याकडच्या आधुनिक समाजसुधारणेच्या काळात ‘सप्तबंदी’ म्हणून नावाजलेल्या सिंधुबंदी, स्पर्शबंदी, वेदोक्तबंदी, व्यवसायबंदी, शुद्धिबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या बंधनांचाही समावेश होता. आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या नव्या धर्माच्या प्रसाराबरोबर या आचारसंहितेचाही (‘कोड ऑफ कंडक्ट’) प्रचार अत्यंत कडवेपणाने केला.
सिंधुबंदीमुळे समुद्रप्रवासावर बंदी आली, व्यापार खुंटला आणि त्याबरोबर विचारांचे आदानप्रदानही. पुढच्या काळात आढळणाऱ्या भारतीय समाजाच्या कूपमंडूक वृत्तीचे मूळ या सिंधुबंदीत आहे. टिळक आणि गांधींनाही परदेशप्रवासानंतर प्रायश्चित्त घ्यायला लागले ते याच बंदीमुळे!
स्पर्शबंदीमुळे ‘खालच्या’ ठरवलेल्या जातींचा स्पर्शही चालेनासा झाला आणि अस्पृश्यता अस्तित्वात आली. त्यामुळे पांढरपेशा म्हटले जाणारे व्यवसाय तथाकथित उच्चवर्णीयांनी आपल्याकडे ठेवले. त्यांतही कमीत कमी शारीरिक श्रम करावे लागतात, ते म्हणजे गणित आणि ज्योतिष हे विषय ब्राह्मणांकडे राहिले. जिथे अस्तन्या वर सारून हात बरबटवून घ्यायची गरज होती ते सगळे व्यवसाय हलक्या दर्जाचे आणि पाखंडी लेखले गेले. यात कुणबी, माळी, तेली, लोहार, सुतार, चांभार, कुंभार, न्हावी, गवळी, महार, मांग, पारधी असे सगळे व्यवसाय आले. ही श्रमांची कामे ते व्यवसाय करणाऱ्या लोकांवर लादली गेली. कारण व्यवसायबंदीमुळे वेगळा व्यवसाय करायचे स्वातंत्र्यच गेले. वेदातल्या काही मंत्रांत रथ बनवणाऱ्या सुताराच्या कौशल्यालाही दाद दिली आहे. वेदकाळातली श्रमांची ही प्रतिष्ठा नवनिर्माणाच्या प्रयत्नांत पार नाहीशी झाली. बौद्धिक आणि शारीरिक श्रमांची ताटातूट झाली.
वेदोक्त बंदीमुळे ज्ञानाचा अधिकार फक्त ब्राह्मण-क्षत्रियांनाच राहिला. इतरांना वेदोक्तबंदी झाली याचा अर्थ वेदच नव्हे तर सर्वच प्रकारच्या औपचारिक बौद्धिक शिक्षणाला ते मुकले. वेदांच्या ज्ञानाअभावी बहुजनांचे काहीच नुकसान होणार नव्हते, पण विद्यार्जनाचा अधिकार गेल्यामुळे तांत्रिक कौशल्याचे औपचारिक शिक्षण बंद झाले. त्यामुळे तांत्रिक निष्कर्षांच्या अभावी (टेक्निकल कन्क्लुजन्स) यंत्रशास्त्राची प्रगती होऊ शकली नाही. आजच्या भाषेत बोलायचे तर थिअरीशिवाय प्रैक्टिकल आणि पॅक्टिकलशिवाय थिअरी व्यर्थ झाली. याचे एक उदाहरण म्हणून आपण वैद्यकशास्त्र घेऊ.
आयुर्वेदीय उपचारांचे दैवी, मानुषी आणि आसुरी असे तीन प्रकार मानले जातात. दैवी उपचारांमध्ये विविध प्रकारचे रस येतात. मानुषी उपचारांमध्ये फळे-फुले मुळे काष्ठौषधी येतात. तर शस्त्रक्रिया किंवा सर्जरी हा आसुरी किंवा राक्षसी उपचार समजला जातो. आयुर्वेदातला हा भाग प्रक्षिप्त म्हणजे नंतर घुसवला गेला असावा. कारण वैदिक किंवा बौद्ध काळात शस्त्रक्रिया आसुरी उपचार गणली गेली असती तर सुश्रुताला किंवा जीवकाला मिळाली तशी प्रतिष्ठा मिळालीच नसती. हिंदू धर्माच्या पुनर्रचनेच्या काळात आसुरी गणले गेले म्हणून म्हणून शस्त्रक्रियेचे तंत्र तथाकथित खालच्या जातींच्या लोकांकडे गेले. तीच गोष्ट प्रसूतिशास्त्राची. सुलभ प्रसूतीचे ज्ञान आणि तंत्र वैदिक आणि बौद्ध काळात जगात श्रेष्ठ गणले जात होते. सिझेरियन शस्त्रक्रियाही चांगलीच परिचयाची होती. पण नंतरच्या काळात प्रसूतितंत्र ‘घाणेरडे’ समजले गेले आणि म्हणूनच खालच्या म्हटल्या जाणाऱ्या जातींच्या स्त्रियांकडे ‘सुईणपण’ आले. ब्रिटिशांच्या सत्ताकाळापर्यंत ही स्थिती अशीच राहिली. आजही अनेक खेड्यांमध्ये बाळंतपणाचे काम या सुईणीकडेच असते.
विज्ञानाचा विकास हा विचारांच्या प्रसारातून होतो आणि नेमकी हीच गोष्ट खालच्या म्हटल्या जाणाऱ्या जातींपासून दूर ठेवली गेली. वरच्या जातींच्या बाबतीत काय झाले? स्वतःकडे असलेले ज्ञान (ते वरचढ होतील या भीतीपोटी?) शिष्यांनाही पूर्णपणे द्यायचे नाही, शिष्यवर्गही मोठा ठेवायचा नाही, संगळ्याच गोष्टी ग्रंथात लिहायच्या नाहीत, लिहिल्या तरी लिपी तरी वेगळी वापरायची किंवा उलगडायला कठीण अशा कूटभाषेत लिहून ठेवायचे, अशा ज्ञानप्रसारासाठी प्रतिकूल असलेल्या क्षुद्र वृत्तीमुळे असलेले ज्ञानही पूर्णांशाने तथाकथित उच्चवर्णीयांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत आलेच नाही. आज अशिक्षित लोकांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. कारण गेली कित्येक शतके समाजाचा मोठा वर्ग औपचारिक शिक्षणापासून वंचित राहिला आहे. औपचारिक शिक्षण नसेल तर एखाद्या विषयाबद्दलचे इतरांचे विचार किंवा अनुभव विद्यार्थ्यांना शिकता येत नाहीत आणि त्यामुळे त्यांची दृष्टी विस्तारत नाही. ज्ञान असेल तर ते फक्त वेद-पुराणात, या ज्ञानावरही अधिकार असेल तर तो फक्त ब्राह्मणांचा असे निश्चित झाले. त्यामुळे विशेषतः शूद्रांचा लेखन-वाचनाचा संबंधच येईनासा झाला. कालांतराने अशा शिक्षणाची आवश्यकता असते हेच विसरायला झाले.
येथे हे मुद्दाम नमूद केले पाहिजे की मंदिरे लुटण्यासाठी गजनीचा महमूद आला तो इ.स. 1008 मध्ये, शंकराचार्यप्रणीत नवी धर्मव्यवस्था सुरू झाल्यानंतर सुमारे 200 वर्षांनी, राज्यविस्तारासाठी मुहम्मद घोरी आला तो 1192 मध्ये. तोपर्यंत नव्या हिंदू धर्माला साडेतीनशे वर्षे होऊन गेली होती. दिल्लीकेंद्रित सुलतानी राजवट सुरू झाली ती 1206 मध्ये कुतबुद्दीन ऐबकाने दिल्ली घेतली तेव्हापासून. कोणतीही राजवट प्रस्थापित झाल्याशिवाय ती प्रजेवर बंधने घालत नाही. या दृष्टीने विचार केला तर मुस्लिम आक्रमणाचा विज्ञानाच्या ह्रासासी काहीही संबंध नाही हे स्पष्ट होईल.
हिंदुधर्माला संस्थात्मक स्वरूप द्यायच्या आदिशंकरांच्या प्रयत्नाला फारसे यश मिळाले नाही. पण ‘कलिवर्ण्य कल्पना चांगलीच रुजली. पुढे शंकराचार्यांच्या अद्वैतमताला काहीसा विरोध दर्शवत 12 व्या शतकात रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत मत मांडले. 13 व्या शतकात मध्वाचार्यांनी द्वैतसिद्धान्त मांडून वेदान्तधर्माचे चक्क आजच्या भक्तिपंथात रूपांतर केले! पण शंकराचार्यांची ‘संकराचार्य’ अशी खिल्ली उडवणाऱ्या मध्वाचार्यांच्या अनुयायांनीही ‘कलिवर्म्य’ कल्पना तशीच टिकवून ठेवली. त्यामुळे विज्ञानाची प्रगती थांबली ती थांबलीच. जुन्या ग्रंथांमधील चुका काढण्यावर बंदी आली. त्यामुळे त्या सुधारायची शक्यताच उरली नाही. या काळात विद्वान लोक नव्हते असे नाही. पण कठोर धर्मव्यवस्थेत त्यांच्या बद्धीला वाव मिळायचा तो ‘शास्त्रार्था’परता. शास्त्रार्थ याचा अर्थ आधी लिहिलेल्या शास्त्रांचा (विज्ञान नव्हे तत्त्वज्ञान) अर्थ लावणे. जे काही वादविवाद होत असतील ते जुन्या गोष्टींचा अर्थ लावण्यावरून, नव्याच्या शोधावरून नव्हे! त्यामुळे भाषेची प्रगती झाली, काव्याचा आशय आणि दर्जा सुधारला तरी विज्ञानाच्या क्षेत्रात काही घडायची शक्यताच नाहीशी झाली. विज्ञान नेहमीच भौतिक जगाबाबत असते. पण जग ही माया आणि ब्रह्म हेच सत्य अश्या विचारसरणीच्या प्रसारामुळे भौतिक जगातल्या गोष्टींबद्दल अनास्था निर्माण झाली. ‘ठेविलें अनंतें…’ अशा पद्धतीने भौतिक गरजाच गोठवल्या तर शोध कुठून येणार? तत्त्वज्ञानात आणि भजनकीर्तनात रमणाऱ्या ‘साधूं’चीच पैदास होणार त्यामुळेच बाराव्या शतकातला भास्कराचार्यांचा अपवाद वगळता सहाव्या शतकानंतर एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतात विज्ञानाच्या क्षेत्रात काहीही नवे घडलेले दिसत नाही…
[साधनावरून परवानगीने संपादित साभार – का.सं.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.