पुस्तक परिचय प्रेडिक्टेबली इरॅशनल… (लेखक – डॅन अर्ले)

माणूस जगतो, म्हणजे काय?
क्षणांपाठी क्षण, दिवसामागून दिवस आणि वर्षांनंतर वर्ष असा त्याचा प्रवास होणे म्हणजे जगणे असे सामान्यपणे मानले जाते. व्यावहारिक अर्थाने ते खरेही आहे. यासोबतच, माणूस जगतो म्हणजे क्षणोक्षणी तो निर्णयांची साखळी गुंफत जातो. ह्या क्षणानंतर तो असे जसे म्हटले जाते तसेच, ह्या निर्णयानंतर तो निर्णय, असे जगण्याचे स्वरूप असते.
आपण ‘जगात’ जगतो आणि त्यामुळे आपला आणि बाह्य जगाचा अप्रतिहत संबंध येत राहतो. या जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण वातावरणातून, शिक्षणातून आणि संस्कारांतून आकाराला आलेला असतो. कोणत्याही क्षणाला आपण नव्याने सामोरे जात नाही. निव्वळ स्मृतिसंचयाचा आधार घेतच आपली निर्णयप्रक्रिया काम करते. आणि असे करणे म्हणजे ‘तर्कशुद्ध विचार करणे असे आपण मानायला शिकलेलो आहोत आपली सगळी निवड आणि वर्तणूक या अर्थाने ‘साचेबद्ध, पॅटर्नाईज्ड, वहिवाटीच्या तथाकथित तर्कशुद्ध दृष्टिकोणाच्या आहारी गेलेली असते. यामुळेच आपल्या तार्किकतेसंबंधात ठोस भाकित करता यावे आणि ते नियमितपणे खरेही ठरावे, इतके आपण ‘प्रेडिक्टेबल’ बनलेलो असतो.
मात्र या तार्किकतेच्या खोलवर असाच एक अतार्किकतेचा प्रवाहही आपल्या चित्तात उपस्थित असतो. तो आहे याची जाणीवही आपल्याला नसते किंबहुना तसे काही नाही, आपण केवळ तर्कशुद्धच आहोत याविषयी आपली खात्रीच असते. यामागे, ‘अतार्किकता’ हे विशेषण, भूषण नसून निव्वळ दूषण आहे ही आपली पारंपरिक मानसिकता काम करते. परंतु खरेच ते तसे आहे का? माणसाच्या निर्णय-प्रक्रियेवर तार्किकतेपलिकडचे कोणकोणते घटक काम करतात? ते समजावून घेता आले तर माणूस समजायला मदत होईल का? असे प्रश्न घेऊन डॅन अर्लेचे प्रेडिक्टेबली इरॅशनल’ हे पुस्तक ‘अतार्किकतेचा’ आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने शोध घेते.
*********************************************************
एक साधे उदाहरण…. आपण टीव्ही घेण्याचा निर्णय निश्चित केला आहे. आता ‘क्ष’ कंपनीचा टीव्ही घ्यावा की ‘य’ कंपनीचा घ्यावा असा प्रश्न आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे. त्याविषयी आपल्याला काही निर्णय घ्यायचा आहे. या संदर्भात आपण खूप विचार केलेला आहे (खरे तर तशी समजूत करून घेतली आहे). कागदावर टिपणे मांडली आहे. आपल्या आर्थिक क्षमतांचा अंदाज घेतला आहे. विविध कंपन्यांची, त्यांच्या उपलब्ध उपकरणांची माहिती जमवली आहे, त्यांची आपापसांत तुलना करून झाली आहे, आधी खरेदी केलेल्यांशी मसलत झडली आहे…. नवीन टीव्ही घेणे’ यासंदर्भात तर्कशुद्ध असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि हळूहळू, ‘नेति नेति’ करत, आपले मन, विचार एकदोन मॉडेल्सवर येऊन स्थिरावलेले आहेत.
आता प्रत्यक्ष खरेदी.
आपण दुकानात जातो आणि…. परतताना आधी ठरवलेल्यापेक्षा वेगळाच टीव्ही घेऊन येतो. कदाचित कंपनी तीच पण मॉडेल वेगळे असते, चाळीस इंचाऐवजी बावन्न इंच स्क्रीन असतो, बास बूस्ट असतो, जास्त डिस्काऊंट मिळाला म्हणून त्यासोबत साऊंड सिस्टीम आलेली असते…. पण काही ना काही वेगळे असते. आपला आधीचा सगळा तर्कशुद्ध विचार, आपली तार्किकता अचानक कुठे लयाला गेली? कोणत्या विचाराने, भावनेने आपल्यावर असा कब्जा केला की आधीच्या (वेळ घालवून केलेल्या) अभ्यासाला बदलणारा निर्णय आपण दुकानातल्या अर्ध्या तासाच्या कालावधीत घेतला? कोणत्या मिषाला भुलून आपण अनावश्यक असणारी खरेदी केली?
प्रसंग, उत्पादन वेगळे असेल परंतु आपल्या सगळ्यांना ‘अशा प्रकाराचा’ वैयक्तिक अनुभव असतो.
आणखी काही उदाहरणे.
आपली डोकेदुखी स्वस्तातल्या गोळीने बरी होत नाही मात्र तोच घटकपदार्थ असणाऱ्या पण महागड्या गोळीने आपल्याला लगेच आराम पडतो. अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये जेवणावर आपण हजारो रुपये सहज उधळतो पण एखादी अत्यंत साधी, स्वस्त गोष्ट घेताना आपण अचानक जीवघेणा चिंधीचोरपणा, घासाघीस करतो. जेव्हा एखाद्या गोष्टीकरता आपल्याला कपर्दिकही मिळणार नसते तेव्हा ती गोष्ट आपण अत्यंत मनापासून करतो, मात्र त्याच गोष्टीसाठी पैसे मिळणार अशी परिस्थिती उद्भवल्यावर आपण पाट्या टाकायला लागतो. शारीर-उद्दीपनाच्या अंतिम क्षणाला आपला विवेक, सारासार भान सगळे अचानक कसे लयाला जाते? संपूर्णपणे भयावह परिणाम होऊ शकतात ही कल्पना . असूनही आपण अविवेकी पर्यायांच्या आहारी जातो.
असे का होते?
*********************************************************
‘डॅन अर्ले हा माणूस ड्यूक युनिव्हर्सिटीत ‘बिहेवियरल इकोनॉमिक्स’या विषयाचा प्राध्यापक आहे. आपल्याकडे हा विषय अजून फार प्रसिद्धी पावलेला नाही. मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही शाखांशी संलग्न असणारी ही शाखा. ह्यात केवळ, माणूस अमुक एका प्रसंगात कसा वागेल किंवा वागतो याचा अभ्यास नसून असे वागण्यामागे त्याची निर्णय-प्रक्रिया काय, कशी होती हेही समजावून घेणे आहे. अर्थशास्त्र-इकॉनॉमिक्स या विषयाला माणसाच्या तार्किकतेचाच मूलाधार आहे. त्यातल्या बहुतांश संकल्पना, विचार, मांडणी आणि भाकिते ही माणसाची तार्किकता? गृहीत धरून विवेचित केलेल्या आहेत. प्रत्येक माणूस तार्किक विचार करतो. त्याच्यासमोर पर्याय ठेवले तर तो त्याच्या बुद्धीनुसार सर्वोत्कृष्ट पर्यायाचीच निवड करतो ह्या आधारावर अर्थशास्त्र, त्यातल्या संकल्पना काम करतात. प्रत्यक्ष जगण्यात मात्र अतार्किकतेचा मोठाच भाग असतो आणि स्वत:ला समजावून घेण्याच्या प्रक्रियेत या अतार्किकतेलाही समजावून घेणे गरजेचे आहे असे बिहेविअरल इकॉनॉमिक्स मानते.
अर्लेने प्रिन्स्टन विद्यापीठात असताना केलेल्या प्रयोगांची आधारशिला ह्या पुस्तकाला आहे. प्रयोग कसे केले, का केले, त्यासाठी कुणाकुणाला निवडले, परीक्षणाच्या कोणत्या फूटपट्ट्या वापरल्या, त्यातून काय निरीक्षणे सामोरी आली हे सगळे या पुस्तकात आहे. तरीही हा विज्ञानग्रंथ नाही. सामान्य वाचकाने लांब राहावे असा दूरस्थपणा निर्माण करणारा कोरडा, विद्वज्जड, शब्दबंबाळ असा हा प्रबंध नाही. जगण्याबाबत कुतूहल असलेल्या प्रत्येक माणसाशी सहज जोडले जाणारे, जगण्याशी नाळ जुळलेले, ललित लिखाणाचा गंध असणारे आणि करुणेच्या स्पर्शाने ओलावलेले हे वाचनीय लिखाण आहे. स्वत: काम करताना आलेली मजा इतरांशी वाटून घ्यावी आणि त्यांनाही त्या मजेत सामील करून घ्यावे इतका सहज खेळकरपणा पुस्तकभर पसरून राहिलेला आहे.
पाश्चात्त्य वैज्ञानिकांचा मांडणीसंदर्भातला हा सुलभपणा, सहजपणा मला विशेष वाटतो. विज्ञानाचा रोजच्या जगण्याशी संबंध असतो, विज्ञानातल्या कित्येक संकल्पना रोजच्या व्यवहारात नकळतपणे आपण सामावून घेतलेल्या असतात. त्या कुणी आपल्या लक्षात आणून दिल्या, त्यामागची प्रक्रिया अधोरेखित केली तर त्यांतली खुमारी वाढते. ‘ ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्नही न करता सहज रुजून जाते. विषयाचे, माहितीचे, ज्ञानाचे ओझे होता कामा नये, ते तसे झाले तर कधीतरी फेकून दिले जाणारच, ह्याचे भान बहुतांश पाश्चात्त्य विज्ञानलेखकांना असते. ते तसे होऊ नये म्हणून ती मंडळी आग्रहाने प्रयत्न करताना दिसतात. सहज आठवणारे उदाहरण द्यायचे तर रिचर्ड फेनमन या नोबेल पारितोषिक विजेत्या भौतिकशास्त्रज्ञाचे देता येईल. त्याची भौतिकशास्त्रावरची व्याख्याने, विज्ञानाशी जवळीक नसलेल्या माणसानेही आवर्जून वाचावीत अशीच आहेत. त्याच जातकुळीतले हे लिखाण.
*********************************************************
हे पुस्तक वाचताना महानुभाव वाङ्मयाची आठवण होते. त्यांची स्वत:ची मांडणीची एक विशिष्ट पद्धत आहे. लीळा सांगताना, द्रष्टा, दृश्य-दृष्टांत आणि दाष्ीतिक अशान्तीन शीर्षकांखाली रचना असते. एकातून सूत्र व्यक्त होते, दुसऱ्यात घटना वर्णन केली जाते आणि शेवटी निष्कर्ष सामोरा ठेवला जातो. त्यातून आपण बोध घेणे, विचार, चिंतन करणे अपेक्षित असते. तसे काहीसे या पस्तकात आहे. यामध्ये अर्लेने विविध सहकाऱ्यांसोबत केलेल्या प्रयोगांची माहिती आहे. प्रत्येक प्रकरणाला विशिष्ट शीर्षक आहे. त्यातून नंतर वर्णन केलेल्या प्रयोगात कोणत्या अंतःसूत्राचा तपास घेतला जातोय, याकडे निर्देश केला गेलाय. काही शीर्षके….. सामाजिक संकेतांची किंमत, टाळाटाळ करत गोष्टी पुढे ढकलण्याचा प्रश्न आणि स्वसंयम, अपेक्षांचा परिणाम…. मात्र केवळ शीर्षक वाचून वेगळे काही लक्षात येते असे नाही.
यातली गंमत आहे ती शीर्षकाच्या खालच्या वाक्यात.
वरची तीन शीर्षके त्यासाठी पाहू.
‘सामाजिक संकेतांची किंमत’ – (सोबत दिलेले वाक्य) ज्या गोष्टींसाठी आपल्याला कपर्दिकही मिळत नाही त्या गोष्टी आपण आनंदाने करतो, मात्र त्याच गोष्टींसाठी कुणी पैसे देऊ केले की आपला त्यातला आनंद हरवून जातो. असे का?’
‘टाळाटाळ करत गोष्टी पुढे ढकलण्याचा प्रश्न आणि स्वसंयम’ – (सोबत दिलेले वाक्य) आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण आपल्याकडून का करून घेऊ शकत नाही?
‘अपेक्षांचा परिणाम’ – (सोबत दिलेले वाक्य) मन ज्याची अपेक्षा करते तेच मनाला का मिळते?
त्यात कुठेही कुणा एकाचा उल्लेख नाही तर एकत्र मानवसमूह म्हणून आपणा सर्वांना लागू पडणारे आणि जागे करणारे ते विधान आहे. हे वाक्य वाचताना महानुभावांच्या दार्टीतिकाची आठवण होते. ते जसे अनंत शक्यता सुचवणारे विधान असते तसेच हे. विनोबांच्या, सूचनात् इति सूत्रम्’ या व्याख्येत तंतोतंत बसणारी ही जशी सूत्रात्मक टीप. ह्यातून आपल्या आपल्यालाच कित्येक गोष्टी सामोऱ्या येऊ लागतात. प्रसंग आठवतात. नकळतच आपण त्यावर चिंतन करू लागतो आणि ते मनात घोळवतच प्रयोगाचे वाचन करायला लागतो.
आधी म्हटल्याप्रमाणे प्रयोगाच्या वर्णनातही कोणताही कर्कशपणा नाही.एका मित्राने दुसऱ्याला वर्णन करून गोष्ट सांगावी असा सगळा प्रकार.
थोडक्यात एक उदाहरण पाहू.
‘माणूस मोठ्या गोष्टींबद्दल फारसा अप्रामाणिक असत नाही मात्र छोट्या छोट्या गोष्टीतला अप्रामाणिकपणा त्याच्या लक्षातही येत नाही, जाणवतही नाही आणि फार महत्त्वाचाही वाटत नाही.’ हे तपासण्यासाठी रचना केलेला प्रयोग.
समजा, आपण एका ऑफिसमध्ये काम करतो आहोत. आपली मुलगी घरी आहे. तिला तिच्या गृहपाठासाठी शिसपेन्सिल हवी आहे. तिला बाहेर जाऊन ती पेन्सिल आणणे शक्य नाही म्हणून तिचा आपल्याला फोन आलाय की, बाबा येताना तू पेन्सिल घेऊन येशील का? नंतर विसरायला नको म्हणून आपण लगेच समोर असलेल्या पेनस्टँडमधने दोन पेन्सिली आपल्या बॅगमध्ये टाकून देतो आणि पुढच्या कामाकडे वळतो. अशी एखादी पेन्सिल घेणे याला थेट अप्रामाणिकपणा म्हणता येईल का? तर्ककर्कश पद्धतीने दोन्ही बाजू मांडता येतील. त्यांच्या त्यांच्या परिप्रेक्षातून त्या बरोबरही असतील, प्रश्न तो नाही. प्रश्न आहे तो मी अशी पेन्सिल घेऊन बॅगमध्ये टाकण्याचा निर्णय कसा घेतला, कोणत्या प्रभावाखाली घेतला, माझ्या मनातला कोणता कोपरा, कोणता जोरकस प्रवाह त्यासाठी जबाबदार होता?
हे सगळे सांगितल्यावर यासाठी निश्चित केलेल्या प्रयोगाची अर्ले रचना समजावतो. त्याने विद्यार्थी कसे निवडले, त्यांचे गट कसे केले, त्यांना वीस गणिते कशी घातली, त्यांच्या तपासणीसाठी कोणकोणत्या पूर्वअटी निश्चित केल्या. त्या निश्चित करताना त्यामागची भूमिका काय, काय टाळले गेले आणि कशाकडे लक्ष पुरवले गेले, तपासणीची प्रक्रिया काय…सगळे तो सविस्तर मांडतो.
वरची गोष्ट तपासताना, त्याने विद्यार्थ्यांचे तीन गट केले. गणिते तीच. पहिल्या गटाची गणिते विद्यार्थी आणि परीक्षक दोघांनीही तपासली आणि बरोबर उत्तरांसाठी त्यांना योग्य उत्तरांसाठी निश्चित केलेले पैसे देण्यात आले. हा कंट्रोल ग्रुप. दुसऱ्या गटाने स्वत:ची गणिते स्वत:च तपासली आणि किती बरोबर आली ते सांगून, उत्तरपत्रिका देऊन योग्य पैसे घेतले. ह्यात परीक्षकांचा सहभाग नव्हता. विद्यार्थ्यांनी स्वत:च गणिते तपासायची होती…. तिसऱ्या गटाला आणखीनच मुभा होती त्यांनी गणिते स्वत:च तपासायची होती. नंतर त्यांना दिलेला पेपर आणि उत्तरपत्रिका दोन्ही फाडून टाकायचे होते. त्या सगळ्याचा कोणताही पुरावा नंतर राहणार नव्हता.ते सांगतील तितकी उत्तरे बरोबर. त्यासाठी असणारे पैसेही तिथल्या डब्यातून त्यांनी आपले आपण घ्यायचे होते आलेली निरीक्षणे अर्लेने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तपासली. निष्कर्ष काढले.
वर घेतलेल्या उदाहरणात पहिल्या आणि दुसऱ्या गटाने सोडवलेली गणितांची संख्या आणि त्यांना मिळालेले पैसे साधारण सारखेच होते मात्र तिसऱ्या गटाने एकदम उंच उडी मारली होती. त्यांच्या मते त्यांनी जवळपास सगळी गणिते बरोबर सोडवली होती आणि त्यानुसार त्यांनी पैसे घेतले होते. आपले कृत्य कुणाच्याही नजरेस येणार नाही, आपणाला शिक्षा होणार नाही याची हमी मिळताक्षणी आपण अयोग्य, अनैतिक गोष्ट करायला प्रवृत्त होतो असा काहीसा याचा निष्कर्ष होता. हा निष्कर्ष आपल्या व्यक्तित्वाच्या एकसंधतेतल्या वैगुण्यावर नेमके बोट ठेवणारा आहे.
या टप्प्यापर्यंत अर्लेचा प्रयोग हा एका विवक्षित गटापुरता मर्यादित राहतो. तदनंतर तो जे सविस्तर चिंतन प्रकट करतो ते मुदलातून वाचण्यासारखे आहे. आपल्या मनातले गंड, ग्रह, पूर्वकल्पना, आपल्यावर असणारे प्रभाव सगळ्यांवर तो प्रकाश टाकतो. या चिंतनानंतर ही अतार्किकता कशी टाळता येईल याबद्दल अर्ले याबद्दल काही सूचना कस्तो.
पुस्तकाच्या शेवटच्या काही पानामध्ये अर्लेने हॉवर्ड मेरिलँड मधल्या जज डेनिस स्वीने यांच्या, ‘वकिलांची कोर्टरूममध्ये वर्तणूक कशी असावी याविषयी काही मार्गदर्शक सूचना’ या पुस्तकाचा उल्लेख केला आहे, त्यात स्वीने म्हणतात, ‘आपल्या आया ह्या सूचना ऐकून म्हणतील की ह्यातले बहुतांश नियम, सूचना सभ्य आणि चांगल्या पद्धतीने वाढवलेल्या सगळ्याच मुलामुलींनी पाळायला हवीत असे आहेत किंबहुना ती ते पाळत असणे अपेक्षितच आहे. आपल्या आयांवर असणाऱ्या इतर जबाबदाऱ्यांमुळे त्या (आया) राज्यातल्या सगळ्या कोर्टरूम्समध्ये उपस्थित असणे अशक्य आहे म्हणून मी (त्यांच्यावतीने) हे नियम मांडतो आहे.’ हे सगळे पुस्तकच स्वीने यांच्या म्हणण्यासारखे आहे. वाचून संपल्यानंतर हे आम्हाला माहितीच होते सगळे, असे वाटू शकते, मात्र हे माहिती होते हे म्हणण्यासाठी हे पुस्तक वाचावे लागते हे महत्त्वाचे.
अर्ले प्रयोगांच्या निष्कर्षांतून सामोरे येणारे सार सांगताना म्हणतो, ‘ज्या खेळातल्या सगळ्या गोष्टी, सगळे प्रवाह समजून घेणे अशक्य आहे अशा खेळातली आपण प्यादी आहोत. आपली अशी भाबडी कल्पना आहे की, या खेळाला आपण दिशा देऊ शकतो, मार्ग दाखवू शकतो. तसे निर्णय घेण्याची आपली क्षमता आहे, आपण त्या स्थितीत आहोत. मात्र ही कल्पनाच आहे. हा भ्रम आहे. हे वास्तव नाही. आपली तार्किकता जशी ठोकळेबाज, साचेबद्ध आहे तशीच आपली अतार्किकताही ठोकळेबाजच आहे. तिची तिची स्वत:ची वहिवाट, पद्धत आहे. त्याबद्दलही भाकीत करता येते आणि ते बहुतांश सत्यही ठरते.’
ह्या विधानाने आपल्याला ठेच लागू शकते. आपली तार्किकता साचेबद्ध आहे हे एकवेळ आपण स्वीकारू मात्र आपली अतार्किकताही साचेबद्ध आहे हे आपल्याला तत्क्षणी पटणे अवघड आहे. आपण प्यादी आहोत आणि आपल्या हातात काही नाही हे अर्लेचे म्हणणे अनेकांना ‘फेटॅलिस्ट’ वाटू शकते. मात्र ते तसे नसून तेही त्याचे एक निरीक्षणच आहे हे लक्षात घ्यायला हवे. आता सगळे संपले, काही करायची गरज नाही, जे सामोरे येईल ते भोगू अशी कल्पना करून घेण्याचे कारण नाही, अर्ले तसे मुळीच सुचवत नाही. याउलट अतार्किततेची नकारात्मक बाजू कोणती, अतार्किकतेचे आपल्याला काय तोटे होऊ शकतात, त्याला छेद कसा देता येईल, जगाकडे, त्याचबरोबर, आपल्या आणि जगाच्या आपापसातल्या संबंधाकडे वेगळ्या प्रकारे कसे बघता येऊ शकेल, आणि ते साधले तर आपल्याला रोजच्या जगण्यात, साधेसाधे निर्णय घेण्यात त्याचा फायदा कसा होऊ शकेल, आपण आपल्यालाच जास्त चांगले समजावून कसे घेऊ शकू हे आपल्या निरीक्षणांमधून तो मांडू बघतो
याठिकाणी अर्लेच्या पूर्वायुष्याबद्दल एक मुद्दा मांडावासा वाटतो. तरुणपणी अर्ले एका भीषण बाँबस्फोटात जखमी झाला. जवळपास सत्तर टक्के भाजला. त्यावरच्या उपचारासाठी त्याच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली. कित्येक शस्त्रक्रियांना त्याला सामोरे जावे लागले. भाजल्यानंतर भयानक पद्धतीने बदलल्या जाणाऱ्या ड्रेसिंग्जचा त्याला रोज अनुभव घ्यावा लागला. अवघे अस्तित्व उद्ध्वस्त करण्याची शक्यता असणारी वेदना त्याने सहन केली. ती सहन करताना या अतार्किकतेवर त्याचे लक्ष गेले आणि त्याचा अभ्यास करण्याचे त्याने निश्चित केले. ज्याचा उगम वेदनेतून होतो तिथे करुणेचे वास्तव्य असतेच. अतार्किकतेच्या या विश्लेषणात माझ्या लेखी डॅन अर्लेच्या या सहनशीलतेचा फार मोठा वाटा आहे.
******************************************************************************************************************************************
प्रेडिक्टेबली इररॅशनल — लेखक : डॅन अर्ले, हार्पर प्रकाशन (प्रथम प्रकाशन 2008), अमेरिका
11, कृष्णाई, श्रीनाथ सोसायटी, मयूर कॉलनी, पुणे 411029.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.