सभ्यता आणि सुधारणा
आपण सभ्यता हे नाव कोणत्या स्थितीला देण्यात येते त्याचा विचार करू. ह्या सभ्यतेची खरी ओळख अशी आहे की लोक बाह्य वस्तूंच्या शोधात आणि शरीरसुखात सार्थकता मानतात. त्याची काही ‘उदाहरणे पाहू. एखाद्या देशाची माणसे समजा पूर्वी जोडे वापरीत नव्हती आणि आता युरोपचा जामानिमा करायला शिकली, तर ती जंगली अवस्थेतून सुधारलेल्या अवस्थेत आली असे मानले जाते. पूर्वी युरोपात माणसे सामान्य नांगराने आपल्यापुरती जमीन अंगमेहनतीने कसत असत त्याऐवजी आता वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या नांगराने एक मनुष्य पुष्कळ जमीन कसू शकतो आणि पुष्कळ पैसा साठवू शकतो. ही सुधारणेची खूण समजली जाते. पूर्वी माणसे, क्वचित एखादे पुस्तक लिहीत व ते अमूल्य मानले जाई. आज ज्याच्या मनात जसे येईल तसे तो लिहितो. छापतो आणि लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न करतो, ही सुधारणेची खूण आहे. पूर्वी माणसे जेव्हा लढू इच्छीत तेव्हा एकमेकांचे शरीरबळ आजमावून पाहात. आता काय, तोफेच्या एका गोळ्याने हजारो लोकांचे प्राण घेता येतात. ही सुधारणेची खूण आहे. पूर्वी माणसांना मारून ठोकून गुलाम करीत, आज तेच काम पैशाची व चैनीची लालूच दाखवून करतात. पूर्वी लोकांत नव्हते ते रोग आज उत्पन्न झाले आहेत आणि ते कसे नाहीसे करायचे याच्या शोधामागे डॉक्टर लोक लागले आहेत. त्यामुळे इस्पितळे वाढली आहेत. ही सुधारणेची खूण आहे. आणखी किती सांगू?… जर कोणी याहून वेगळे काही बोलू लागला तर तो वेडा आहे असे खुशाल समजा.
– महात्मा गांधी -हिंद स्वराज
सभ्यता, सुधारणा व विकास
महात्मा गांधींचे राजकीय कार्य त्यांना आपण दिलेल्या राष्ट्रपिता’ या पदवीला अनुरूपच आहे. पण त्यांचे सामाजिक व आर्थिक विचार इतर थोरा-मोठ्यांना पटलेच आहेत असे नाही. उदा. जवाहरलाल नेहरू यांचे विचार वेगळे होते…
1850 च्या अगोदर जगाच्या व्यवहाराला लागणारी ऊर्जा माणसे, बैल, घोडे देत होती व ती त्यांना अन्नामधनच मिळत होती. अन्न सौर ऊर्जेमळे (प्राणी व वनस्पती) बनत होते. सौर ऊर्जेला पूरक अशी विस्तव निर्माण करण्याची कला प्राचीन काळापासूनच अवगत असल्याने आकाशात सूर्यनारायण व पृथ्वीवर अग्नी आम्हाला लागणारी ऊर्जा देत होते. अजूनही देत आहेत. विस्तवदेखील लाकडी कोळसा व लाकडे जाळून मिळत असल्याने मूळ रायणच होते व आहेत; वनस्पती, प्राणी आणि मानवप्राणी यांच्यामार्फत.
1850 च्या आसपास उष्णता ही एक ऊर्जा आहे याचे ज्ञान झाले व दगडी कोळसा जाळून मोठ्या प्रमाणावर उष्ण वाफ तयार करता येते व त्या उष्णतेचे 20 टक्के रूपांतर आगगाडीच्या गतिमध्ये करता येते ही जाण कुतूहलातून, प्रयोगशीलतेतून, परिश्रमामधून व हुशारीमुळे आली आहे. हे सगळे शास्त्रज्ञ हावरट किंवा घमेंडखोर होते असे म्हणणे बरोबर नाही. आधुनिक विज्ञानप्रणाली युरोपमध्ये निर्माण झाली हा योगायोगाचा भाग आहे. त्यामुळे पौर्वात्य व पाश्चात्त्य असे जगाचे दोन भाग पाडणे पण बरोबर नाही. यातला एक आध्यात्मिक व दुसरा ऐहिक ही धारणा पण चूकच आहे.
दगडी कोळसादेखील सूर्यनारायणाचेच वरदान आहे. पण ही संपत्ती fixed de posit या स्वरूपाची आहे. दगडी कोळशाबरोबरच खनिज तेले यांचे पण तेच काम आहे. ही संपत्ती पण fixed deposit याच धर्तीची आहे. यातून निर्माण झालेल्या आगगाड्या, मोटरकार, जहाजे, विमाने, त्यातून निर्माण झालेली औद्योगिक क्रान्ती, आर्थिक विषमता, बदलती जीवनशैली, पर्यावरणावर विपरित परिणाम इ. बऱ्या वाईट गोष्टींचा आपण सामना करीत आहोतच.
महात्मा गांधींच्या विचारांवर प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे करता येईल, आज लोक बाह्य वस्तूंच्या शोधात व शरीरसुखात सार्थकता मानतात तर तसे ते पूर्वीही मानत होते. पूर्वी आमच्या विचारांत आध्यात्मिकता होती व आजही आहे. जग कधीच स्थिर नव्हते. बदलती जीवनशैली हा त्याचा भाग आहे. आगगाडीचा प्रवास, विमानाचा प्रवास, संगणक, तंत्रज्ञान, विमाने तयार करणे, जहाज तयार करणे, रेफ्रिजरेटर्स, एअर-कंडिशनर्स, सर्व-संस्कृतीशी ओळख, खेळ, गायन, वादन, तत्त्वज्ञानं या सर्व बाबी हाव व घमेंड’ या सदरात येत नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात राहायला आपल्याला आवडत नाही असेही नाही, परंतु बदलत्या जगाला तोंड देणे हे आपले नेहमीच कर्तव्य ठरलेले आहे.
वसंत म. केळकर
सी-25/फ्लॅट क्र.3, केंद्रीय विहार, सेक्टर 38, नेरळ, नवी मुंबई 400706.