सभ्यता आणि सुधारणा

सभ्यता आणि सुधारणा
आपण सभ्यता हे नाव कोणत्या स्थितीला देण्यात येते त्याचा विचार करू. ह्या सभ्यतेची खरी ओळख अशी आहे की लोक बाह्य वस्तूंच्या शोधात आणि शरीरसुखात सार्थकता मानतात. त्याची काही ‘उदाहरणे पाहू. एखाद्या देशाची माणसे समजा पूर्वी जोडे वापरीत नव्हती आणि आता युरोपचा जामानिमा करायला शिकली, तर ती जंगली अवस्थेतून सुधारलेल्या अवस्थेत आली असे मानले जाते. पूर्वी युरोपात माणसे सामान्य नांगराने आपल्यापुरती जमीन अंगमेहनतीने कसत असत त्याऐवजी आता वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या नांगराने एक मनुष्य पुष्कळ जमीन कसू शकतो आणि पुष्कळ पैसा साठवू शकतो. ही सुधारणेची खूण समजली जाते. पूर्वी माणसे, क्वचित एखादे पुस्तक लिहीत व ते अमूल्य मानले जाई. आज ज्याच्या मनात जसे येईल तसे तो लिहितो. छापतो आणि लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न करतो, ही सुधारणेची खूण आहे. पूर्वी माणसे जेव्हा लढू इच्छीत तेव्हा एकमेकांचे शरीरबळ आजमावून पाहात. आता काय, तोफेच्या एका गोळ्याने हजारो लोकांचे प्राण घेता येतात. ही सुधारणेची खूण आहे. पूर्वी माणसांना मारून ठोकून गुलाम करीत, आज तेच काम पैशाची व चैनीची लालूच दाखवून करतात. पूर्वी लोकांत नव्हते ते रोग आज उत्पन्न झाले आहेत आणि ते कसे नाहीसे करायचे याच्या शोधामागे डॉक्टर लोक लागले आहेत. त्यामुळे इस्पितळे वाढली आहेत. ही सुधारणेची खूण आहे. आणखी किती सांगू?… जर कोणी याहून वेगळे काही बोलू लागला तर तो वेडा आहे असे खुशाल समजा.
– महात्मा गांधी -हिंद स्वराज

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.