जगविस्तीर्ण मन : मानवता, यंत्र आणि आंतरजाल एकत्रित करणारे

World Wide Mind : The coming integration of humanity, machines and the internet लेखक मायकेल कोरोस्ट (प्रकाशक फ्री प्रेस, 2011) हे पुस्तक हल्ली वाचले. मेंदूतील प्रक्रियांचा शोध आणि त्याचा होऊ घातलेला परिणाम या विषयावर हे पुस्तक आहे.
गेल्या वर्षी, ‘आता यंत्रे मन ओळखू शकणार’ अशी बातमी वृत्तपत्रांतून आली होती. काही वृत्तपत्रीय अग्रलेखही त्यावर आले होते. हे यंत्र मनातलेच ओळखणारे असल्याने थापा मारणे दुरापास्त होईल असे काहीसे त्यावर लिहिले होते. यंत्र पुढील काही वर्षांत तयार होईल अशी ती बातमी होती. मेंदूतून विविध विद्युतचुंबकीय लहरी निघत असतात. त्यांचे मोजमाप करण्याची ईईजी तंत्राने ओळखण्याची रीत कित्येक दशके वापरली जात आहे. (मूळ शोध शतकभरापूर्वीचा). या लहरी एवढ्या क्षीण असतात की त्यांचे मोजमाप दुरून करणे शक्य नसते. या लहरींच्या अभ्यासाने हाती फारसे काही लागत नाही हेदेखील माहिती होते. मन ओळखणारी यंत्रे येणार ही बातमी वाचून ती एक अतिशयोक्ती असावी असे मला वाटले होते. या पुस्तकाच्या निमित्ताने या बातमीतले है तथ्य हाती लागेल असे वाटले होते आणि ते तसे झालेही.
या पुस्तकाचा लेखक हा एक बहिरा माणूस होता. कानातील कॉक्लियामध्ये बिघाड असल्याने येणारे हे बहिरेपण होते. म्हणजे नेहमीसारखे आवाज वाढवून देणारे यंत्र लावून उपयोग होणार नव्हता. तर कॉक्लियाचे रोपण करणे जरुरी होते. अशा वेळी कानात एक इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवतात. जे आवाजाची स्वतंत्रपणे मोजमाप करते आणि थेट मेंदूला संदेश देते. मेंदूला संदेश पाठवणाऱ्या संवेदना-तंतूंना छेडण्याचे काम हे यंत्र करते. हे यंत्र जवळपास दीड इंच आत बसवावे लागते. मेंदूच्या अगदी जवळ किंवा मेंदूतच म्हणाना. हे यंत्र संवेदना-तंतूंना काही आवाजानुसार काही लहरी पाठवते. हळूहळू मेंदू या लहरींतून अर्थ काढायला लागतो आणि शेवटी त्यातून आवाजाची जाण तयार होते.
असेच काहीसे यंत्र आंधळ्यांसाठी बनवले जात आहे. अंध व्यक्तीच्या जिभेच्या संवेदना-तंतूंना कॅमेऱ्यातून येणारा संदेश पाठवला जातो. मेंदू या संदेशावरून समोरच्या वस्तूंचे ज्ञान मिळवतो. अर्थात हे ज्ञान डोळ्यांमुळे मिळणाऱ्या ज्ञानाच्या तुलनेत तोकडे असले तरी समोर खड्डा आहे, भिंत आहे की रस्ता निर्धोक आहे असे प्राथमिक शाम त्यातून मिळते.
एकीकडे मेंदूत संदेश पाठवणारी यंत्रे आपण तयार करायला लागलो. तर दुसरीकडे एका आंतरजालाच्या प्रादुर्भावामुळे एक क्रांती येत आहे. लेखक यावर एक उदाहरण देतो. त्याचा मोबाईल फोन एका दिवसासाठी बिघडल्यावर अचानक सुनेपण आल्यासारखे झाले. अशा फोनमुळे स्वतःच्या दृष्टिपथात नसलेल्या कित्येकांच्या संपर्कात आपण राहतो. मेंदूत काम करणाऱ्या यंत्रांना आपण आंतरजालावर जोडले तर त्याचा परिणाम जगविस्तीर्ण मनात होईल असे काहीसे लेखकाचे म्हणणे आहे.
मेंदूची रचना : मेंदूची रचना खूप गुंतागुंतीची आहे. इतकी की त्याचा थांगपत्ता लागणे अगदी दुरापास्त आहे. संगणक आणि मेंदू यांत खूप फरक आहे. एवढे की मूलतः त्यांची रचना भिन्न आहे हे दिसते. संगणकात गणित करणाऱ्या काही चिपा असतात. मेंदूत हे काम न्यूरॉन्स करत असावेत. या न्यूरॉन्सची संख्या 100 अब्ज एवढी आहे. एवढ्या सगळ्या न्यूरॉन्सचे एकमेकांशी अतिशय गुंतागुंतीचे संबंध आहेत. कुणाची जोडणी कुणाबरोबर आणि कशी आहे हे शोधणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. न्यूरॉन्सची जोडणी आणि त्यात असलेली माहिती आणि वहनयंत्रणा हे सर्व कळले तर मेंदू कसा चालतो याबद्दलचे ज्ञान होऊ शकेल. पण सध्या ही माहिती आपल्याला नाही. आणि नजिकच्या भविष्यकाळात ती उपलब्ध होणार नाही.
मेंदूच्या कुठल्या भागात काय चालते हे साधारण माहिती आहे. मेंदूच्या या विभागांची नोंदणी सत्तर ऐंशी वर्षांपर्वी झाली होती. आजही ही नोंदणी कायम आहे. यात बदल झालेला नाही. आजचा संशोधनाचा भाग मेंदूतील संदेशवहन यंत्रणेत केलेली छेडखानी असा आहे. ही छेडखानी करण्यासाठी मेंदूत काही इलेक्ट्रोड बसवावे लागतात. हे इलेक्ट्रोड संदेशवाहिन्यांना संदेश देतात वा त्यांच्याकडून घेतात. या इलेक्ट्रोडपासून जी माहिती मिळते त्यावर संशोधन चालले आहे.
मेंदूत न्यूरॉन्सची संख्या अब्जावधी आहे. तर त्यांच्या दरम्यान असलेल्या जोडण्यांची संख्या त्याच्या काही पटीत आहे. मेंदूत घातलेले इलेक्ट्रोड्स् मात्र अगदीच तुटपुंजे आहेत. उदा. कॉक्लियर ट्रान्सप्लांटमध्ये चोवीस इलेक्ट्रोडचा वापर केला जातो. असेच काही इलेक्ट्रोड मेंदूत घालून त्यास नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालू आहे.
साधारणपणे कुठलाही धडधाकट माणूस असे इलेक्ट्रोड घालून घेण्यास नकार देणार आणि कायदाही, त्याची संमती असल्यावरही हे प्रयोग करू देणार नाही. पण असे काही रोगी आहेत की ज्यांचा मेंदू पूर्णपणे कार्यरत असला तरी पण कुठल्याही प्रकारचा संदेश पाठवू शकत नाही. अशा काही रुग्णांना उपचार म्हणून हे प्रयोग केले जातात. याशिवाय उंदरांवर हेच प्रयोग केले जातात. ज्यावरून बरीच माहिती मिळत गेली आहे. मेंदूवर नियंत्रण वा मेंदूकडून संदेश ग्रहण : इलेक्ट्रोड घालून संदेश ग्रहण करायला लागल्यापासून काही संदेशनाक्षमता कशी येते. मेंदूचे संदेशग्रहण कसे होते याबद्दलचे ज्ञान आता होऊ लागले आहे. उदा. जेव्हा आपण काही बघत असतो तेव्हा डोळ्याकड़न मेंदूला जाणाऱ्या संदेशांपेक्षा मेंदूकडून डोळ्यांकडे जाणारे संदेश जास्त संख्येने जातात हे लक्षात आले. याचा अर्थ असा लावता येईल की ‘काय’ बघायचे हे मेंदू डोळ्याला सांगत असतो आणि त्या ‘काय’शी जुळणारी संवेदना डोळ्याला प्राप्त झाली की डोळे फक्त अमुक संवेदना मिळाली असा छोटासा संदेश परत पाठवतात.
पूर्वी लिहिल्याप्रमाणे इलेक्ट्रोडची संख्या अगदी कमी तर न्यूरॉन्सची खूप जास्त. इलेक्ट्रोड हे त्यामानाने मोठे. त्यामुळे एका इलेक्ट्रोडमागे शेकडो न्यूरॉन्स असणार. त्यांच्यातल्या एखाद्या न्यूरॉनवर संदेशवहनाचा परिणाम करता येणार अशी सारी गोम आहे. पण हे थोडे अनुमानधपक्याने पुढे चालू आहे. असे लक्षात येते आहे की अशा प्रकारच्या योजनेने भरपूर माहिती मिळत आहे.
उदाहरणार्थ उंदरांवर केलेल्या प्रयोगात त्यांना स्वप्नात काय वा कुठल्या प्रकारचे दिसत असावे याबद्दल अंदाज केला जातो. मेंदूत एका भागात एक विशिष्ट प्रकारचा संदेश निर्माण झाल्यावर दुसऱ्या भागात त्याचा अमुक परिणाम होतो असा निष्कर्ष काढता येऊ लागला आहे. ही एक मोठी पायरी समजायला हवी. अर्थात हा प्रयोग उंदरावर होऊ शकतो. माणसावर नाही.
याच प्रयोगाचा पुढचा भाग म्हणजे आपण मोठ्या जनावरांच्या मेंदूत चिपा बसवून त्यांना नियंत्रित करू शकतो का? हेच पुढे माणसाच्या दिशेने जाणार का?
आज होणाऱ्या या प्रयोगांची परिणती भयकारी विज्ञानकथेत होणार नाही असे आज तरी वाटते. लेखकाच्या मते यातील कित्येक गोष्टी सैद्धान्तिक दृष्ट्या अशक्यप्राय आहेत. एका माणसाचा अनुभव दुसऱ्या माणसाला या मार्गाने कदाचित देता येईल असे लेखकाला सुचवावेसे वाटते. अशा अनुभव-ट्रान्स्प्लांटमुळे मनांचे एकत्रीकरण होऊ शकते. त्यातून जगविस्तीर्ण मनाची संकल्पना लेखक मांडतो.
या पुस्तकात या विज्ञानाच्या प्रगतीबरोबर चालत जाणारी एक कथा आहे. या कथेत निःशब्द संवेदना ग्रहण करणारी कार्यशाळा आहे. स्पर्शातून, हावभावातून, देहबोलीतून आपल्या भावना व्यक्त होत असतात. या अभिव्यक्तीला जास्त अर्थपूर्ण करण्यासाठी ही कार्यशाळा चालली होती. एका बाजूला मानवमानवातील असे संवाद तर दुसऱ्या बाजूला मेंदूतून थेट मेंदूकडे जाणारे तंत्रज्ञानात्मक यंत्रात्मक संदेशवहन अशी काही बरोबर चालणारी कथा लेखक मांडतो. या कथेतील परिणामांबद्दल लेखक सांगतो तेव्हा मोट खुबीने त्यातील तरतम भाव येतो.
मन ओळखणारे यंत्र : लेखकाने एका कॉन्फरन्समध्ये हे यंत्र पाहिले. डोक्याबाहे टोपीसदृश मापन-यंत्रणा बसवली जाते. एका पटलावर काही अक्षरे झळकत असतात. बसणाऱ्याच्या मनात काय चालले आहे हे या यंत्राने सांगितले जाते. बसणाऱ्याला या प्रयोगात काम करायचे असते. उदा, बसणाऱ्याचे नाव यंत्राला समजून घ्यायचे असेल तर पहिले अक्षर आले की बसणाऱ्याच्या मनात आता कसे बरोबर आले असे भाव येतात. ते भाव यंत्र टिपते आणि मग दुसरे अक्षर ज्यावेळी येते त्यावेली तसाच भाव येतो. मग ते अक्षर नक्की केले जाते. मग पढचे असे चालते. अश्या रीतीने यंत्र मनातले नाव शोधून काढते. हे यंत्र थोडेसे खोटे ओळखणाऱ्या यंत्रासारखे वाटले.
लेखक स्वतः या विषयातील एक तज्ज्ञ आहे. न्यूरॉलॉजी, इंस्ट्रूमेंटेशन आणि संगणकीकृत माहितीचे गणन अशा दोन तीन विशेष भागांतून या विषयावर काम चालते. लेखकाला लिहिण्याची हातोटी चांगली जमली आहे. पुस्तक किचकट न बनवता सोप्या , शब्दांत माहिती देण्यास त्यास जमले आहे. त्याचबरोबर ही माहिती वाचताना कंटाळा येणार नाही याची पुरेपूर उपाययोजना पुस्तकात दिसते.
बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स,
कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (प.) 400 601

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.