साहित्यातून विवेकवाद (1) स्टाईनबेक

[साहित्यातून विवेकवाद नावाने काही लेखांमधून काही साहित्यकारांचे लिखाण तपासणारी ही लेखमाला आहे. काही थोडे अपवाद वगळता मराठी साहित्य व्यक्तिगत व कौटुंबिक भावभावनांमध्येच गुंतलेले असते. अपवादापैकी वा.म.जोशींवर आजचा सुधारकने विशेषांक काढला होता (डिसें. 1990-जाने. 1991, अंक (1 : 9-10).
जरी लेखमाला मी सुरू करत आहे, तरी इतरांनाही या मालेतून साहित्य व साहित्यिक तपासण्यास आम्ही आवाहन करत आहोत. – नंदा खरे ]
मुंबईला शिकत असताना महिन्याकाठी एकदा तरी फोर्टात जात असे. स्वस्ताई होती. तीन रुपयांत जिवाची मंबई करता येत असे. तर त्या काळात, 65-66 साली आयुष्यात पहिल्यानेच इंपल्स बाईंग म्हणतात तसे मन की खुषी कारणाने साडेसात रुपयांचे एक पुस्तक घेतले. फ्लोरा फाऊंटनला पसजवळ फूटपाथवर एक जण बसायचा, मोठी पुस्तके मागे खिडकीच्या कट्ट्यावर मांडायचा. तर खिडकीतून पेंग्विनच्या द ग्रेप्स ऑफ रॅथने खुणावले. महागाची खरेदी चुटपुट लावून गेली. पुढच्या पत्रात घरी कळवावेसे वाटले, इतपत चुटपुट लागली.
ग्रेप्सचा लेखक जॉन स्टाईनबेक ओळखीचा होता. त्याची द विंटर ऑफ अवर डिस्कंटेट आणि ईस्ट ऑफ ईडन ही पुस्तके वाचलेली, आवडलेली होती. ग्रेप्स मात्र वेगळ्याच दर्जाचे आवडले. आजही सर्वाधिक प्रेमातल्या पुस्तकांमध्ये पहिले-दुसरे नाव ग्रेप्सचे असेल. पुढे अनेक वर्षे दरवर्षी एकदा ते वाचले जात असे. नागपुरात केबल टीव्ही आला त्या सुमाराला जॉन फोर्डने दिग्दर्शित केलेला काळा-पांढरा द ग्रेप्स ऑफ रंथ दाखवला जात असे. पंधरवड्याभरात तीनचारदा तो पाहिला. पुढे ग्रेप्सची श्राव्य आवृत्ती हाती आली. बारा कॅसेट्समध्ये संपूर्ण पुस्तक वाचले आहे. सुंदर वाचन आहे. तेही आज दोनदा ऐकून झाले आहे. एकूण सर्व माध्यमे मिळून पंचवीसतीस पारायणे झाली आहेत.
खरे तर ग्रेप्स हे सुगम साहित्य, ईझी रीडिंग नाही. “मी वाचकांच्या नसानसांच्या चिंधड्या उडवायचा प्रचंड प्रयत्न केला आहे’, असे स्टाईनबेकने पुस्तक लिहितानाच्या रोजनिशीत नोंदले आहे. एकटा ग्रेप्स पाहत बसलो असताना मला, “काय काहीतरी निम् पाहत बसतोस!” असे तरुण स्नेही म्हणाले आहेत. पण निम्, शुष्क, कटुगंभीर, हार्श ही सारी विशेषणे अगदी नेमकी असूनही ग्रेप्स अत्यंत सुंदर आहे. ते सौंदर्य सहज जाणवत नाही. वाचून झाल्यावर आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या घटनांच्या सोबतीने कादंबरीचे सत्य, म्हणून शिव, म्हणून सुंदर रूप जाणवत राहते. मला प्रेप्स का मोहवते, याची काही उदाहरणे देतो. खरे तर असे भाग सुटे करणे कादंबरीवर अन्याय करणारे आहे, पण पुढे सावरून घेता येईल, बहुतेक.
अनेक पिढ्या ज्या जमिनीच्या तुकड्यावर शेती केली, ती जमीन सोडून कुटुंबे जात असतात. पर्याय नसतो. भू-विकास बँकांनी थकबाकीच्या वसुलीचे फतवे काढलेले असतात.
घर सोडून जाताना घराची प्रमुख मा, ही सटरफटर सामान निवडत असते. काय न्यायचे, काय त्यागायचे, हे ठरवत असते. जुनी पत्रे, फिरक्या हरवलेले डूल, कोणत्याही घरात भेटणारा स्मरणिकांचा ढिगारा. प्रत्येक वस्तूसोबत वर्षे, दशके, पिढ्या मागे नेणाऱ्या आठवणी. पण हे स्मरणरंजन नाही. चिनी मातीच्या कुत्र्यांसोबत आपला वारसा, आपला इतिहास टाकून दिला जातो आहे. आणि हे जबरदस्तीने, अनिच्छेने होणारे विस्थापन आहे. आपण सगळे जण जगताना वस्तुरूप इतिहास रचत असतो. त्या वस्तूंशी भावबंध जुळत असतात. हे वैश्विक प्रकरण आहे. माझ्या धाकट्या नातीला एक तिच्या अंगठ्याच्या नखाएवढा हिरा सापडला, निळ्या प्लास्टिकचा स्फटिक. तिच्या चार वर्षांच्या आयुष्यातले दोन दिवस व्यापणारी सुंदर वस्तू. ती हा मणी धुवायला गेली, आणि तो बेसिनच्या जाळीतून नाहीसा झाला. हे घडले सकाळी. रात्रीच्या जेवणानंतर ती उठेना. जेवणही गप्पगप्पच झाले होते. आता तर उठवायला गेल्यावर रडू फुटले. “माझा हिरा गेला!” याला हसणे सोपे आहे, पण आपणही अशी वस्तूंशी नाळ जोडत बसतो. त्या सहजगत्या आल्यागेल्या तर दुखत नाही. कोणी जोरजबरी करून तश्या वस्तू हिसकणे, टाकायला लावणे, याने आपले खाजगी विश्व अतिक्रमित होत असते.
एकदा विस्थापित कुटुंबे रस्त्याकडेला पडाव टाकून असतात. विस्थापितांच्या लोंढ्याने बिथरलेला एक पोलीस येऊन दमदाटी करू लागतो. मा उसळते. “काय गुन्हा केला आहे आम्ही, की तू भोचकपणा करतो आहेस?” माणसांना गरिमा, डिग्निटी आवश्यक असते. तिच्यावरची अतिक्रमणे दुखतात. कुटुंबप्रमुख स्त्री-पुरुषांवर तर चिल्ल्यापिल्ल्यांची जबाबदारी असते. ते जास्त हळवे होतात. 1968 साली मी अमरावतीजवळ एका कामाचा प्रमुख होतो, माझी पहिलीच स्वतंत्र जबाबदारी. कंपाच्या विहिरीच्या नेमका वर एक मालक लोकांचा दिवा होता. त्याभोवतीचे किडे विहिरीत पडून पाणी दूषित होत होते. आम्ही दिवा हटवला. मालकांच्या चौकीदाराने त्याच्या साहेबाकडे शिकायत केली. ते येऊन रागवायला लागले. मी सौम्यपणे समजावून देत होतो, तर त्यांचा आवाज चढता. त्यात आमच्या भीमरावच्या आईने जोमदारपणे, “पोट्टे बीमार पडून राह्यले. तुम्ही राह्यते तर बी हेच करते.” असे म्हटले. साहेबांनी रागाने मला विचारले, “हू इज धिस वुमन?” म्हटले, “माझ्या स्टाफची आई.” साहेब मंदावले. मा पुढे बोलती बंद झाली.
स्टाईनबेकभर मला हा वैश्विक प्रकार भेटतो. कधीतरी ग्रेप्सचे भाषांतर करायचा मोह झाला. पण तिथले दारिद्रय, आपल्याकडले दारिद्र्य यांचा सांधा जुळवणे अवघड. बेत सोडला. पण बऱ्याच मेहेनतीने समांतर कादंबरी घडवता येईल, ग्रेप्सने प्रेरित, अशा नमुन्याची.
घोड्यांची नांगरट संपून ट्रॅक्टर्स आले. या बदलाचे उत्कृष्ट वर्णन ग्रेप्समध्ये आहे. घोडा जिवंत असतो. तबेल्यात स्वस्थ उभा असतानाही फुरफुरतो. टापांची खटफट रात्रीही चालते. ट्रॅक्टरची किल्ली काढली की तो अचेतन होतो. एका समीक्षकाने या तुकड्यातली वाक्ये एकाखाली एक लिहून त्यांची बिब्लिकल लय स्पष्ट केली आहे. सोपे गेले हे, कारण ग्रेप्सची लय महाकाव्याची, धर्मग्रंथाची आहे.
त्यातला मानवतावादी केसी हा धर्मबाह्य झालेला धर्मगुरू येशू ख्रिस्तच आहे, हे अनेक समीक्षकांनी नोंदले आहे. बायबलमधला येशू वेश्येला स्वीकारतो आणि मनी चेंजर्सना देवळातून हाकून लावतो. केसी भावनिक प्रवचनानंतर मुली कश्या संभोगोत्सुक व्हायच्या ते सांगतो. प्रस्थापितांशी लढत मार खायला, मरायला केसी तयार होतो. मा आणि पा अपार दारिद्र्यातही माजी धर्मगुरू सोबत येतो आहे याने सुखावतात. हे अमेरिकन नाही. मानवी आहे.
स्टाईनबेक आपली माणसे बारकाईने तपासतो. 1920-30ची दुष्काळी डस्ट बोल इयर्स, त्यावर अमेरिकन अर्थव्यवस्थेचा अमानुष प्रतिसाद, त्यातून अमेरिकाभर आणि पढे जगभर पसरलेली महामंदी, सारे स्टाईनबेक तपासतो. आणि हा तपास ग्रेप्सने ना सुरू होत, ना संपत. आधी वार्ताहराच्या भूमिकेतून स्टाईनबेकने लेखमाला लिहिली. ती त्याच्या मृत्यूनंतर द हार्वेस्ट जिप्सीज नावाने प्रकाशित झाली. मग भटक्या शेतमजुरांच्या संघर्षांवर इन ड्रबियस बॅटल ही कादंबरी लिहिली. ती कोणाला कम्युनिस्ट वाटली, तर कोणाला नुसतीच रॅडिकल. हा सगळा 1920 ते दुसऱ्या महायुद्धाचा काळ. जिप्सीज लेखमाला, बॅटल कादंबरी, यांमुळे स्टाईनबेक सरकारच्या नजरेत भरला. एफबीआय आणि पोलिसांनी त्याच्या वार्तांकनात खरा भाग किती ते तपासले. सगळे खरे निघाल्यानेच स्टाईनबेक सुटला. तसाही तो सौम्य काळ. दुसऱ्या महायुद्धानंतरचा मॅकार्थीइझम काळ असता तर स्टाईनबेक नक्कीच तुरुंगात गेला असता, हाऊस अन्-अमेरिकन अॅक्टिव्हिटीज कमिटीच्या सौजन्याने. नंतर ग्रेप्स.
महायुद्धाच्या काळात तो सैन्यासोबत युरोपात गेला. त्या अनुभवातून वन्स देअर वॉज अ वॉर घडले. मग इतर काही पुस्तके रचली गेली, दविंटर ऑफ अवर डिस्कंटेंट, अमेरिका अँड द अमेरिकन्स’ मग स्टाईनबेकलाच वाटू लागले की आपला देश आपल्याला अनोळखी होऊ लागला आहे. तेव्हा एका ट्रकच्या सांगाड्यावर कॅरॅव्हॅन उभारली. एक कुत्रा सोबतीला घेतला. अमेरिकाभर भटकला. त्यातून ट्रॅव्हल्स विथ चाली घडले.
अशा सातत्यानं स्वतःचा समाज तपासत त्यातून स्टाईनबेकने साहित्य रचले. कधी वार्ताहरकी, कधी लघुकथा, कधी कादंबरी. त्याक्षणी, त्या मुद्याला योग्य वाटेल तो साहित्यप्रकार. निष्ठा साहित्यप्रकारावर नाही. साहित्यावरही नाही. ती मुळात आणि अंतिमतः माणसांवरच. हे मुद्दाम नोंदतो, कारण एखादा साहित्यप्रकार इतरांपेक्षा थोर मानणे, एखाद्याच साहित्यप्रकारात राहणाऱ्या साहित्यिकाला व्रतस्थ साधक मानणे, असला बालिशपणा मराठीत फार दिसतो. माणसांचे जगणे प्राथमिक, त्याचे साहित्यात उतरवले जाणे दुय्यम, हे स्पष्ट व्हायलाच हवे.
द ग्रेप्स ऑफ रेंथ या नावाचे मूळही खास अमेरिकन द बॅटल हिम् ऑफ द रिपब्लिक मध्ये आहे (कर्ती : जूलिया वॉर्ड हो. The Battle Hymn of the Republic, Julia Ward Howe) ओळी अश्या –
Mine eyes have seen the glory of the coming of the Lord
He is trampling out the vintage where the grapes of wrath are stored
He hath loosed the fareful lightning of his terrible swift sword
His truth is marching on.
अमेरिकन धर्मभीरुता आणि सोबतच देव आपल्याला त्रास देणाऱ्याचे पारिपत्य करील हा विश्वास, दोन्ही बाबी द बॅटल हिम् अधोरेखित करते. स्टाईनबेक बहुधा स्वतः निरीश्वरवादी-अज्ञेयवादी होता. परंतु आपली माणसे समजून घेण्याच्या गरजेमुळे तो वादापुरता ईश्वरवादी, प्रोव्हिजिनल डेइस्ट झाला. ई.ओ.विल्सन हा ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ एका समांतर प्रेरणेतून वादापुरता ईश्वरवादी झाला, त्याच्या बऱ्याच आधीचा हा प्रकार.
पण याचा अर्थ स्टाईनबेकने स्वतःला अमेरिकन सरासरीत किंवा लघुतम साधारण दर्जात ढाळले, असा मुळीच नव्हे. तो स्पष्टपणे डाव्या विचारांचा होता. 1929 पासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगाला पछाडणाऱ्या महामंदीचे मूळ आधीच्या दशकात उद्ध्वस्त झालेल्या शेतीत आहे, हे त्याला जाणवत होते. त्या उद्ध्वस्त होण्यात निसर्गाइतकाच भाग नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या बँका आणि भांडवली संस्थांचा होता, हेही . तो जाणतो. ग्रेप्स लिहिताना “त्या हावरट हरामीना’ (ग्रीडी बास्टईना) लाज आणण्याचा त्याचा हेतू होता, हे त्याची रोजनिशी सांगते.
त्याला माणसांची जमिनीशी नाळ जुळलेली असते, हे माहीत होते. ईस्ट ऑफ ईडन मध्ये आपला आजा दर अपत्यासाठी, दर नव्या कुटुंबीयासाठी एकेक पंचवीस एकराचा तुकडा कसा घेत असे हे तो सांगतो. ती जमीन माणसांना धार्जिणी नाही. वेळप्रसंगी ती माणसांचे सर्व यत्न-प्रयत्न विफळ करते, पण देते तेव्हा छप्पर फाड के देते, हेही स्टाईनबेक नोंदतो. धूळपेरणीनंतर पाऊस न आल्याने पिकाचे काय होते, जमिनीचे धुळीत रूपांतर कसे होते, याचे प्रेप्समधील वर्णन तर अप्रतिम आहे. जॉन फोर्डने चित्रपटातही ते वर्णन जिवंत हक्-श्राव्य केले आहे. पण हे कोंदण झाले. त्यातले रत्न आहे ते माणसांचे जगणे. त्या जगण्यात आपदा-विपदा येणारच. त्यांतून सुटायला लागते ते एकमेकांना धरून राहणे; स्पर्धा तिथे मारक ठरते. स्पर्धात्मकतेइतकेच सहकार्यही मानवी आहे, हे न समजणारा भांडवलवाद झपाट्याने अमानुष होतो. तो माणसांना, त्यांच्यातल्या सहकार्याला घाबरू लागतो. ग्रेप्समधला हा उतारा स्टाईनबेकच्या शब्दांत पाहा –
दोन माणसं चवड्यांवर बसून बोलतात. त्यांची बायकापोरं ऐकतात. तुम्ही, बदलाला, क्रांतीला भिणारे तुम्ही; लक्ष द्या. त्या चवड्यावर बसून बोलणाऱ्यांना एकमेकांपासून दूर करा. त्यांना एकमेकांना भ्यायला लावा. एकमेकांबद्दल साशंक करा. एकमेकांबद्दल त्यांच्यात घृणा उत्पन्न करा. तुम्ही ज्याला घाबरता त्याचं हे प्रतीकरूप आहे. तुमच्या मनातल्या भीतीची ही मूलपेशी आहे. कारण इथे “माझी जमीन मी गमावली” हे दुभंगतं. त्यातून तुम्ही ज्याचा दुस्वास करता ते घडतं, “आमची जमीन आम्ही गमावली.” धोका इथे आहे. ही दोन माणसं एका माणसाइतकीच गोंधळलेली आहेत. एकेकटी आहेत. आणि या पहिल्या ‘आम्ही’तून आणिकच धोकादायक गोष्ट . उपजते. “माझ्यापाशी थोडं अन्न आहे” आणि “माझ्यापाशी अन नाही” यांची बेरीज होते. जर उत्तर “आमच्यापाशी थोडं अन्न आहे” असं आलं, तर सांभाळा. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि तिला दिशा आहे. थोडा गुणाकार होईल, आणि उत्तर येईल, “ही जमीन आमची आहे. हा ट्रॅक्टर आमचा आहे.” दोन माणसं. एका ओढ्याजवळ बसलेली. एका शेकोटीजवळ बसलेली. शेजारी पातेल्यात काही घास अन्न रटरटत असलेली. शेजारी डोळ्यांचे दगड झालेल्या बायका. मागे ऐकत असलेली मुलं; न समजणारे शब्द त्यांच्या आत्म्यांवाटे ऐकणारी. रात्र दाटून येते. “बाळाला सर्दी झाली आहे. ही घोंगडी घे. लोकरीची आहे. माझ्या आईची होती. तुझ्या बाळाला घे.” यावर बॉब टाका. ही सुरवात आहे मी’ पासून आम्ही ची.
तुम्ही माणसांना हव्या असलेल्या वस्तूंवर मालकी गाजवता. लक्षात घ्या. तुम्ही कार्य आणि कारण यांत फरक करू शकलात तरच स्वतःला वाचवू शकाल. तुम्ही जर पेन, मार्क्स, जेफर्सन, लेनिन, ही कारणं नव्हती; परिणाम होते, हे समजू शकलात, तरच वाचाल. पण हे तुम्हाला समजणार नाही. मालकीचा गुण हा असतो. ‘मी’ मध्येच गुंतून, थिजून राहणं. त्यातून ‘आम्ही’ घडतच नाही.
या उताऱ्यात थॉमस पेऽन, कार्ल मार्क्स, थॉमस जेफर्सन, व्लादिमिर इल्यिच लेनिन यांचे नुसते उल्लेखच नाहीत तर त्या सर्वांच्या विचारांची प्रतिबिंबे आहेत.पण हे राजकीय निबंधाचे, पत्रकाचे उदाहरण नाही, उलट राजकारण कसे मुळात मानवी व्यवहारांतून उपजते, याची जाण इथे आहे. त्यात कुटुंबाने मानवजातीला सातत्य मिळते याचा उल्लेख आहे. सर्वच राज्यकर्ते प्रजेला बिचकून का असतात याचे स्पष्टीकरण आहे. सर्व मानवी व्यवहारांना निसर्ग आणि त्यातून पुऱ्या होणाऱ्या गरजा यांचे कोंदण आहे हे सुचवले आहे. जेमतेम पानभर उताऱ्यात इतके सारे भरूनही तो उतारा कादंबरीतला आहे, निबंधातला नाही.
ठीक आहे, निसर्ग आणि अर्थव्यवस्था यांच्या एकत्रित परिणामांमधून माणसे देशोधडीला लागली. सुरुवातीला कुटुंब, अगदी भारतीयांच्या ओळखीतले तीन पिढ्यांचे एकत्र कुटुंब, हा माणसांना सांधणारा दुवा होता. विस्थापनाच्या, प्रवासाच्या, नव्याने रुजण्याच्या प्रयत्नांच्या, त्यासाठी तात्पुरती रोजीरोटी कमावण्याच्या, अशा अनेक आघातांनी कटंबेही खिळखिळी होऊ लागली. कोणी पोलिसांच्या हडेलहप्पीत मारले गेले. कोणी इतरांमागे पोलिसी ससेमिरा लागू नये म्हणून आपणनच सुटे झाले. कोणी स्वार्थत्यागाने अलगविलग झाले, तसे कोणी स्वार्थानेही सुटे होत पळून गेले. अशा पळपुट्यांमध्ये होता मा चा जावई, आपल्या गरोदर पत्नीला सोडून जाणारा. सगळे कुटुंब दैन्याच्या, अभावाच्या एकेक पातळ्या उतरत तगून राहायचा प्रयत्न करत होते. अमेरिकन मध्य-पश्चिमी राज्ये अवर्षणाने झोडपली गेली इथून सुरू झालेली कहाणी ढग-फूट पाऊस आणि ओढ्या नाल्यांना पूर येण्यापर्यंत आली. कथेच्या केंद्रस्थानी जोड (Joad) कुटुंब होते, पण ते एकटे नव्हते. तसली शेकडो कुटुंबे आपापल्या कर्मकथा नोंदत भिरभिरत होती. अखेर मा ची मुलगी रोज ऑफ शरन (उच्चारी रोजाशान) बाळंत झाली. पण मूल मेले. सगळे जण धडपडत, भीगी बिल्ली स्थितीत एका पडक्या गोदामात पोचले. कोपऱ्यात एक मरणासन्न म्हातारा आणि त्याचा मुलगा होते. बापाच्या तोंडात सहा दिवस अन्न गेले नव्हते. मा आपल्या मुलीला कोरडे करण्यात, ऊब देण्यात गुंतलेली असताना परका मुलगा ओरडतो – स्टाईनबेक ऐका –
“तो मरतो आहे, मी सांगतो, उपासमारीनं मरतो आहे, मी सांगतो.”
“श्श” मा म्हणाली. पा आणि जॉनकाका असहाय्यपणे आजारी माणसाकडे पाहत होते. मा ची नजर रोज ऑफ शेरनच्या नजरेला भिडली, आणि पुन्हा पा व जॉनकडे गेली. दोन्ही बायका एकमेकींमध्ये खोलवर डोकावल्या. मुलगी धापा टाकू लागली.
म्हणाली, “हो.”
मा मंद हसली. “मला माहीत होतं तू करशील. माहीत होतं.” तिनं मांडीवरल्या आपल्या हातांकडे पाहिलं, घट्ट गुंतलेले हात.
रोज ऑफ शरन कुजबुजली, “बाहेर जाता का- सगळे-बाहेर?” छतावर पाऊस टपटपत होता.
मा पुढे वाकली आणि हातानं मुलीच्या कपाळावरच्या बटा मागे सारल्या आणि मुलीच्या कपाळाची पापी घेतली. आता मा झटकन उठली. “चला, सगळे जण. त्या लहान खोलीत चला.”
रूथीनं बोलायला तोंड उघडलं. “श” मा म्हणाली, “श्श, आणि चल.” त्या परक्या मुलालाही धरून बाहेर पडून मानं दार लोटून घेतलं.
मिनिटभर त्या कुजबुजत्या गोदामात रोज ऑफ शेरन शांत बसली. मग आपलं थकलेलं शरीर सावरत उठून तिनं चादर अंगाभोवती लपेटली. कोपऱ्यात जाऊन त्या माणसाच्या शुष्क चेहेऱ्याकडे पाहिलं, त्याच्या विस्फारलेल्या, घाबरलेल्या डोळ्यांत पाहिलं. सावकाशीनं ती त्या माणसाजवळ पडली. त्यानं मान नकारार्थी हलवली. रोज ऑफ शेरननं चादर हटवून छाती उघडी केली. “तुम्हाला करायलाच हवं” म्हणत त्याच्याजवळ सरकली. “ह” ती म्हणाली, “हं.” तिनं हातानं त्याच्या डोक्याला आधार दिला. बोटं त्याच्या केसांतून फिरवली. तिनं गोदामाच्या दूरच्या भागाकडे पाहिलं. तिच्या
ओठांवर एक गूढसं स्मित पसरलं.
आता तर बाँब हवाच, ना? साल्यांजवळ थोडंसंही अन्न नाही, पण एकमेकांच्या शरीरांनी एकमेकांना मदत करताहेत. हे जर चालवून घेतले तर उद्या आपल्या लाईफ, लिबर्टी अँड परसूट ऑफ हॅपिनेस चे काय?
तर मित्र हो, पुस्तक संपवताना स्टाईनबेकने अमेरिकेच्या राज्यघटनेच्याच धोतराला हिसडा दिला. खरे आहे का हे? नाही, कारण आज कोणतीच राज्यघटना एका नागरिकाच्या परसूट ऑफ हॅपिनेससाठी इतरांची लाईफ घ्यायला सांगू शकत नाही. तसे करण्याची लिबर्टी कोणतीच राज्यघटना आपल्या नागरिकांना देत नाही. तात्त्विक चर्चामध्ये तुम्ही लाख सांगायचा प्रयत्न करा, की शेतकऱ्यांनी शेती सोडून इतर धंदे-पेशे स्वीकारायला हवे. तुम्ही लाख सांगा, की तसे करून, सेवाक्षेत्रात शिरून राष्ट्रीय सकल उत्पाद वाढते. ज्या क्षणी तुमची आकडेमोड कोणाच्यातरी जिवावर उठते, त्याक्षणी तुमचा शासनकर्ते होण्याचा अधिकार संपतो. कोणीतरी अडाणचोट, अशिक्षित, रोजाशान कोणातरी भुकेल्याला आपले स्तन्य दूध देते. तिची मा तिला बळ पुरवते. तिची भावंडे, आणि त्या भुकेल्याचा मुलगा आपला लाईफचा हक्क मागू लागतात; मग तुमच्या परसूट ऑफ हँपिनेसला खीळ का बसेना.
तत्वचर्चा आणि राज्यघटनांच्या वरचे स्थान माणुसकी आणि बंधुभावाचे आहे. आणि हे सांगतो तो स्टाईनबेक, जिथे सांगतो ते द ग्रेप्स ऑफ रॅथ.
स्टाईनबेक फारसा शिकलेला नव्हता. त्याचे वाचन आणि निरीक्षण मात्र अफाट होते. त्याच्या कथा-कादंबऱ्यांची नावे शेक्सपियर, ब्लेक, मिल्टन, द बॅट्ल हिम् अशा विविध ठिकाणांमधून येतात. स्वतःची खूण म्हणून तो एक पंख असलेले डुकार काढत असे. पुराणकथांमधला पंख असलेला घोडा पेगॅसस (Pegasus), म्हणून स्टाईनबेकचे स्व-प्रतीक पिगैसस (Pigasus). त्याच्या पुस्तकांमधला एक मोठा संच कॅलिफोर्नियातल्या बेकार, मिश्रवंशी उडाणटप्पूचा आहे (टॉर्टिया फ्लॅट, कॅनरी रो, स्वीट थडे). त्याला रूढार्थाने समाजातल्या चिखलात लोळण्याचा अनुभव होता, डुक्करानुभव होता. पण त्या फटीचर वासूनाका कथांत त्याला किंग आर्थरच्या राऊंड-टेबलचे नाईट्स दिसत असत. त्यामुळे त्याने मूळ नाईट्सच्या दिलदार साहसकथांचेही पुस्तक लिहिले, एका अर्थी टॉर्टिया फ्लॅटची झकपक आवृत्ती ती. एक सामान्य माणूस फ्रान्सच्या जुन्या राजघराण्यातला आहे असे कळल्याने त्याला फ्रान्सचा राजा केले जाते, अशी एक गोष्टही स्टाईनबेकने लिहिली (द शॉर्ट रेन ऑफ किंग पिपिन द फोर्थ). सामान्य माणसांमधल्या राजा
आदमी चा शोध, हा स्टाईनबेकचा स्थायीभाव.
असा एक राजा माणूस भेटला, एड् रिकेट्स ऊर्फ डॉक्. जीवशास्त्राच्या प्रयोगशाळांना वेगवेगळ्या माशांचे, प्राण्यांचे नमुने पुरवणे, हा डॉक्वा पोटापाण्याचा उद्योग. तो टॉर्टिया फ्लॅट व त्या कुटुंबातल्या पुस्तकांमध्ये पात्र म्हणून येतो. द लॉग फ्रॉम द सी ऑफ कॉर्टेझ चा तर तो सहलेखकही आहे. स्टाईनबेक ट्राऊट माशांच्या शेतीतही काम करत असे. एकूणच त्याचे जीवशास्त्राचे ज्ञान अनौपचारिक पण विस्तृत होते. काही समीक्षक स्टाईनबेकला प्राण्यांच्या गोष्टी लिहिणारा मानत असत, कारण त्याच्या लघुकथांमध्ये तश्या कथा आहेत. त्याच्या कादंबऱ्यांमध्येही प्राण्यांच्या वागणुकीची सच्ची आणि सुंदर वर्णने आहेत. पण स्टाईनबेकचे जीवशास्त्र पूर्णपणे अनौपचारिक होते.
ई. ओ. विल्सन मात्र हार्वर्डचा प्राध्यापक आहे. मुंग्या आणि इतर सामाजिक कीटकांचा तो अग्रगण्य अभ्यासक आहे. टॉम वूल्फ विल्सनबद्दल म्हणतो, “एक नवा डार्विन आहे. त्याचं नाव आहे ई. ओ. विल्सन”.
विल्सन स्टाईनबेकपेक्षा एका पिढीने लहान. स्टाईनबेकचा जन्म 1902, तर विल्सन 1929 चा. तसे दोघांमध्ये साम्य नाही. विल्सनचे एक वाक्य आणि वृत्ती यांमधून मात्र स्टाईनबेकशी त्याचा सूर जुळवता येतो. विल्सन म्हणाला –
कार्ल मार्क्स बरोबर होता, समाजवाद चालतो’. फक्त त्याने जीवजात चुकीची निवडली. [ मुंग्यांमध्ये चालतो, माणसांमध्ये अडचणी येतात ].
विल्सनची ख्याती आहे ती सोशिओबायॉलाजी या शास्त्राचा जनक म्हणून. तो या शास्त्राची भूमिका मंडतो –
मानवासकट सर्व सजीवांच्या सामाजिक वागणुकीच्या सर्व अंगांचा जीवशास्त्रीय पाया पद्धतशीर वैज्ञानिक रीतीने अभ्यासणे, म्हणजे सोशिओबायॉलाजी. या अभ्यासाचा वर्तनशास्त्र (Ethology), परिसरशास्त्र (Ecology), जनुकशास्त्र (Genetics) यांच्यातून मिळालेल्या ज्ञानापासून संपूर्ण समाजाच्या जीवशास्त्रीय गुणधर्माबाबतची सामान्य तत्त्वे निष्पादित करणे, हा हेतू असतो.
मुंग्यांमध्ये जर समाजवाद असतो, तर तसली वागणूक माणसांत दिसणे आश्चर्याचे नाही. जीवशास्त्र्यांना तरी हे मत पटायला अडचण नाही; विल्सनला नाही, आणि स्टाईनबेकला तर नव्हतीच.
193, शिवाजीनगर, मश्रूवाला मार्ग, नागपूर 440 010

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.