नक्षलवाद, लोकशाही व देशाची अखंडता

नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराविरुद्ध लोकप्रतिनिधी बोलत नाहीत कारण त्यांना जिवाची भीती असते व निवडणुका जिंकायच्या असतात. विकासकामांना विरोध हे नक्षलवाद्यांचे अजूनही प्रभावी हत्यार असले, तरी यामागील गणिते परिस्थिती बघून ठरवली जातात. जनतेने विकासकामात सहभागी होऊ नये असे बजावणाऱ्या नक्षलवाद्यांना कंत्राटदारांनी केलेली कामे चालतात, कारण त्यांतून खंडणी मिळते. त्यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागाचा पायाभूत विकास झाला तर जनता पाठीशी राहणार नाही, अशी भीती या चळवळीला सतत वाटत आली आहे. यामुळे अशा प्रकरणांत खंडणी उकळताना अतिशय सावध पावले उचलली जातात. नक्षलग्रस्त भागाचा विकास झाला तर आदिवासी प्रगत होतील व कोणताही प्रगत माणूस या चळवळीकडून होणाऱ्या नरसंहाराबाबत शांत बसणार नाही याची जाणीव नक्षलवाद्यांना आहे; म्हणूनच त्याना विकास नको आहे. या साऱ्या बाबी लक्षात घेतल्या तर ज्या उद्देशाने ही चळवळ सुरू झाली तोच नाहीसा झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. खंडणीखोरांची संघटित टोळी असे स्वरूप झालेली ही चळवळ आता राजकीय उद्दिष्टांच्या गप्पा करत लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याचे स्वप्न बघू लागली आहे, म्हणूनच देशाची अखंडता धोक्यात आली आहे.
[ देवेंद्र गावंडे यांच्या नक्षलवादाचे आव्हान या पुस्तकातून ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.