ही स्त्री कोण? (भाग १)

[ बाईचे बाईपण, तिचे भोग, दुःख ह्या सर्वांचे मूळ शोधण्याच्या उद्देशाने त्या अर्थाच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्ती शोधण्याचा हा प्रयत्न. – संपादक ]
माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं
माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं
– बहिणाबाई (1880-1951)
स्त्री-पुरुष हे शब्द नेहमीच फारच सैलसर अर्थाने वापरले जातात. ते जरा नीटस अर्थाने वापरले गेले तर त्यांच्या उपयोजनातील संकल्पनात्मक गोंधळ संपण्याची शक्यता असतेच पण जरा शिस्तबद्धताही येते.
‘स्त्री’ला मराठीत पर्यायी शब्द आहे महिला, वनिता, बाई, इ. अनेकवचन बायका, बाया. हिन्दी/उर्दूमध्ये औरत, लौंडी इ. शब्दभेद आहे म्हणून अर्थभेद आहे, असे मात्र नाही. अर्थ सगळीकडे समान आहे. कारण सर्व धर्मसंप्रदायांमध्ये शोषणाचे अंतिम साध्य म्हणून स्त्रीचाच वापर होतो आणि युद्धातील गनिमी कावा म्हणूनही स्त्रीचाच हत्यार रूपाने वापर होतो. स्त्री/बाई शब्दाचा उच्चार संस्कृती व भाषांनुसार वेगवेगळा असेल पण अर्थ एकच असणार आणि तोच तर शोधावयाचा आहे.
‘स्त्री’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा पर्यायी इंग्लिश शब्द म्हणजे female किंवा woman. अनेक वचन wommn. हे दोन्ही पर्याय किंवा भाषांतरित शब्द म्हणून वापरता येतील. इतर भारतीय भाषांमध्येही हीच तुलना असल्याने ही मांडणी सर्वांना उपयोगी पडण्याइतपत व्यापक होऊ शकेल.
ही स्त्री कोण? म्हणजेच ‘स्त्री म्हमजे काय?’ हा एक मूलभूत प्रश्न आहे. या दोन्ही प्रश्नांमागील मूळ प्रश्न ‘माणूस म्हणजे काय? असा असून माणसाची व्याख्या कशी करावी, कोणत्या परिभाषेत करावी, तशीच का करावी, अन्य रीतीने का करू नये, असे केल्यास काय आणि तसे केल्यास काय, हे सारे प्रश्न उपस्थित होतात आणि ते सर्व तात्त्विक आहेत.
तत्त्वज्ञान स्त्रीकडे कोणत्या दृष्टिकोणातून पाहते, तत्त्वज्ञानाची म्हणजेच तत्त्ववेत्त्यांची स्त्रीबाबतची धारणा काय आहे? ते ‘स्त्री’ ही संकल्पना कोणत्या भाषिक साधनांच्या आणि संकल्पनांच्या साह्याने तयार करतात, ही फारच नाजूक आणि अवघड गोष्ट आहे. माणूस विचार करू लागण्याच्या प्राथमिक अवस्थेत शुद्ध तत्त्वचिंतन आणि स्वतंत्र धर्मचिंतन यात फारसा फरक होत नव्हता. भारतात तर धर्म, नीती आणि तत्त्वज्ञान यांची बेमालूम सरमिसळ झाली. परिणामी तत्त्वचिंतन आणि धर्मचिंतन यांची जणू जोडगोळी असल्याने धार्मिक विचार तोच तात्त्विक विचार’ अशी समीकरणे तयार होत गेली. त्यातून स्त्रीची मानवी प्रतिमा किंवा तिचे मानवीकरण हरपले. ही एक प्रकारची शोकांतिका आहे.
माणूस ही एक संकल्पना आहे. आणि ती संमिश्र संकल्पना आहे. या संकल्पनेचे दोन भाग आहेत : स्त्रीत्व आणि पुरुषत्व.2 ही संकल्पना ज्यावर आधारित आहे ते वास्तव म्हणजे प्रत्यक्षातील स्त्री आणि पुरुष हे दोघेही फरक करता येण्याजोगी आणि अलग करता येण्याजोगी वेगवेगळी अस्तित्वे आहेत. त्या दोघांमधून समान असलेले गणधर्म ‘त्व’ रूपात एकत्र केले जातात आणि मानव ही संकल्पना तयार केली जाते. म्हणून माणस ही संकल्पना स्पष्ट करताना फक्त पुरुष किंवा फक्त स्त्री, असे सांगता येत नाही. दोघेही माणसेच असल्याने माणूस ही संकल्पना उभयान्वयी बनते.
माणसाची ही दुपेडी संकल्पनाच स्त्री आणि पुरुषातील संघर्षाचे कारण बनली आहे. यात पृथ्वीवर प्रथम अस्तित्वात कोण आले? हा वादाचा मुद्दा होऊन तिथेच स्त्री विरुद्ध पुरुष असे राजकारण सुरू होते. जरी व्यवहारात बऱ्याच वेळा बाईमाणूस किंवा पुरुषमाणूस असे म्हटले जात असले तरी तो फक्त लिंगभेद दाखविणारा शब्द असतो, असे नाही. पुरुषमाणूस हा शब्द पुरुषालाच माणूसपण देणारा आणि बाईचे माणूसपण दडपणारा शब्द म्हणूनच वापरला जाणारा शब्द बनतो. त्याच वेळी ‘माणसाच्या पोटी माणूसच जन्मतो,’ असे म्हणताना हे जन्माला येणारे मानवी मूल मुख्यतः स्त्री किंवा पुरुष जातीचे असते, हे लक्षात ठेवलेले बरे.
‘स्त्री’ किंवा ‘बाई’चा उगम, व्युत्पत्ती आणि अर्थ :
स्त्री किंवा बाई या शब्दाचा उगम पाहिला तर कारुण्याने मन भरून जाते. या व्याख्येतच तिची बंधने स्पष्ट होतात. संस्कृत भाषेनुसार “स्त्री म्हणजे जिच्यात शुक्र आणि रक्त यांचा संचार असतो ती व्यक्ती”–
“स्त्यायेते शुक्रशोणिते यस्याम् सा स्त्री!”6
या व्याख्येखेरीज अन्य व्याख्या इतक्या स्पष्टपणे दिलेल्या नाहीत. आयुर्वेदीय शब्दकोशात ‘साविणी’ चा अर्थ योनि अथवा योनिरोग, मराठी शब्दसागर मध्ये ‘स्त्री’ म्हणजे भार्या, बायको, मादी आणि ज्ञानशब्दकोशात’ ‘स्त्रिया’ म्हणजे मंगल, कल्याण आणि स्त्रीजन म्हणजे सर्जन, सृष्टी, रचना असे अर्थ दिले आहेत. आयुर्वेदीय व्याख्या बहुधा आपटेकृत व्याख्येवर आधारित असावी. (सवते ती ‘साविणी’ अथवा स्त्री)
मोनिअर विल्यम्सच्या शब्दकोशानुसार ‘स्त्री’चा उगम बहुधा सूत्री अथवा सोत्री या मूळ धातुसाधित रूपांपासून झाला असावा. त्यांचा मूळ अर्थ धारण करणारी’. स्त्रीम. स्त्रीस ही त्याची अन्य रूपे. स्त्रियश्चरितम म्हणजे स्त्रीचे चरित्र, स्त्रीकारक म्हणजे पती, स्त्रीषु म्हणजे स्त्रीपणानुसार, इ.इ. हाच अर्थ इतरही संस्कृत शब्दकोशांमध्ये दिला आहे. श्री. कृ.पां.कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तिकोशानुसार स्त्री म्हणजे बायको, बाई, (विशेषीकरणाने) स्वतःची पत्नी. या बाबत कुलकर्णीकृत व्युत्पत्तिकोशात इतर संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत. ते असे : वैदिक संस्कृतानुसार स्त्री = सूत्री (म्हणजे जन्मदात्री, ऋग्वेद 4-6-7), संस्कृत ‘स्त्री’संज्ञेचे वर्गमूळ स्त्रयै असे असून तिचा अर्थ विस्तरे असा आहे. सतरी = स्तरी = स्त्री असे ताडून पाहण्यास सुचविले आहे. (पण सतरी, स्तरी हे शब्द मला या व्युत्पत्तिकोशात सापडले नाहीत). पण अन्यत्र ‘सौरी’13 या शब्दाचा अर्थ म्हणून हिजडा, woman, wanton असा दिला आहे. विल्यम्सच्या संस्कृत शब्दकोशात ‘अडबायको’ असा एक शब्द आढळतो, त्याचा अर्थ पौगंडवयीन कुमारिका (A young woman, a miss, a girl entering her teens).
‘बाई’ हा शब्द पुल्लिंगी ‘बुवा’ 15 शब्दाचा प्रतियोगी म्हणून वापरला जातो. मराठीत बाई म्हणजे स्त्री किंवा महिला. संदर्भानुसार ‘बाई’चा अर्थ बदलतो. साधारणतः हा मराठी शब्द नावाच्या मागे आदरार्थी अर्थाने वापरण्याची पद्धती आहे. जसे की जिजाबाई, सईबाई, राणी लक्ष्मीबाई, तीजनबाई, मांगीबाई इत्यादी. नाव ठेवणे या प्रकारात काही वेळेस ‘बाया’ हेच नाव बनले. जसे बाया कर्वे.
काही वेळेस स्त्रीच्या घरातील स्थानानुसार बाई शब्द वापरला जातो. सासूबाई, सूनबाई, जाऊबाई, बहिणाबाई, विहीणबाई इत्यादी. बाईच्या अर्थाजवळचे शब्द म्हणजे ताई आणि माई. ताई म्हणजे मोठी बहीण तर माई म्हणजे चांगली सावत्र आई. काही ठिकाणी आईलाच आदराने बाई म्हटले जाते.
बाईचा अर्थ जास्त गुंतागुंतीचा केला तो पारशी जमातीने. जसे बाई जेरबाई, बाई फिरोझबाई इत्यादी. यात जेर हे मूळ नाव आणि नंतरचा ‘बाई’ हा उल्लेख स्त्रीत्व दाखविणारा. पण पहिला ‘बाई’, हा उल्लेख उगाच प्रतिष्ठा दाखविणारा मानला गेला. बाईपण डबल झाले. दुसरे म्हणजे मुंबईकर, विशेषतः गुजराथी, पारशी आणि इतर उच्चभ्रू लोकांनी ‘बाई’ म्हणजे कामवाली, मोलकरीण असा अर्थ ‘बाई’ला चिकटविला. आणि शब्दार्थ इतका खाली आणला की ‘बाई’ संज्ञेला आणि एकूणच बाईला अवकळा आली. नंतर तर बाईचा अर्थ आणखी खाली घसरून ‘कामवाली’चा अर्थ वेश्या, कॉलगर्ल असाही विकसित झाला.
उत्तर भारतात गायिकेला बाई म्हणण्याची रीत आहे. पण ती खालचे स्थान दाखविणारी, गणिकेचा दर्जा देणारी गोष्ट आहे. कारण गाणेबजावणे, तवायफगिरी ही सारी उमराव, संस्थानिकांची मनोरंजनाची बाब होती. स्त्रीचे कामसामर्थ्य, कामुकता किंवा तिचे कामाकर्षण लक्षात घेऊन नंतर ‘बाई’ शब्दाला तोच अर्थ लावला गेला. मराठीत रखेलीला बाई म्हटले जाऊ लागले. जसे की बाई ठेवणे इत्यादी. ‘कीस बाई कीस’ मध्ये ‘बाई’चा अर्थ स्त्री असा आहे. ‘
‘बाई’चा सर्वांत प्रतिष्ठित अर्थ शिक्षिका16 असा आहे. “प्रिय बाई’ हे पुस्तक शिक्षिकेची कथा सांगते. शिक्षक-शिक्षिकेस आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे, जीवनाला आकार देणारे स्थान असते. पण चमत्कारिकपणा किंवा भाषेचा प्रवाहीपणा असा की मुख्याध्यापिकेस हेडबाई म्हटले जाते.
थोडक्यात, ‘बाई’चा अर्थ दोन मुख्य पातळीवर निश्चित केला जातो. स्त्रीचे जीवशास्त्रीय मादीपणाचे लैंगिक स्वरूप आणि तिचे समाजशास्त्रीय स्थान. हे दोन्ही अर्थ केंद्रस्थानी ठेवूनच हे अर्थ विकसित झाले असावेत. पण ही स्थाने एकमेकांशेजारी व समान पातळीवर न ठेवता एकावर दुसऱ्याचे आक्रमण करून निश्चित केले गेले असावे, असे दिसते. मादीत्वावर समाजशास्त्रीय अर्थाचे कलम झाले, असे म्हणता येईल. बाला, कन्या, मुग्धा, किशोरी, नवोढा, प्रौढा, जरा किंवा पुरंध्री, नितंबिनी ही विशेषणे किंवा अष्टनायिकांची नावे अथवा वात्स्यायनाने दिलेली नावे पाहता हे अर्थसंक्रमण लक्षात येऊ शकते. इंग्लिशमध्येही असे घडले असणार. बाई ही संज्ञा ऑक्सफर्ड17 शब्दकोशाने स्वीकारली असून “स्त्रीसाठी वापरला जाणारा नम्रतादर्शक शब्द आणि मोलकरीण’ असा अर्थ दिला आहे. ‘बाई’चा उगम बहुधा तुर्कीश भाषेत असा अंदाज व्यक्त केला आहे.
Woman
‘बाई’ किंवा ‘स्त्री’ आणि woman ही परस्परांची भाषांतरे आहेत. woman चे अर्थ विविध प्रकारचे आहेत. जुन्या इंग्लिशमधील witman या शब्दापासून woman हा शब्द बनला. “wif”चा मूळ अर्थ स्त्री असाच होता. त्यापासून wife हा शब्द बनवून स्त्रीचे वैवाहिक (adult female human) स्थान निश्चित केले गेले. wife म्हणजे wife-person. Wife म्हणजे woman). पण midwife म्हणजे मधली बायको नव्हे तर मदतनीस व्यक्ती.18
अन्य व्युत्पत्तीनुसार जुन्या इंग्लिशनुसार wimman (wimmen) पासून woman man हा शब्द बनला. त्यापासूनच wifman हा शब्द प्रचारात आला. नंतर डच भाषेत wif quean म्हणजे female human being या अर्थाने वापरला गेला. काही काळ woman म्हणजे womb-man असाही लावला गेला, पण तो अमान्य झाला.20
witman मधील man चा अर्थ आपण समजतो तसा पुरुष (adult males) असा नसून ‘अखिल मानवजात’ (mankind or the human race) असा होता. तशाच अर्थाने तो बऱ्याचदा वापरलाही जातो. जसे की man is rational animal या अॅरिस्टॉटल 21 च्या नावावर खपविल्या जाणाऱ्या प्राचीन व्याख्येत man 22 म्हणजे मानव, आज man म्हणजे person व्यक्ती असाही अर्थ केला जात आहे. 23
ग्रीक भाषेत woman ला पर्यायी शब्द होता. gyne 24, त्यापासून gynecology हा शब्द बनतो. gyné म्हणजे स्त्री, खरे तर बायकोच. बायकोचे मुख्य काम मूल निर्माण करणे. त्याकाळी नेहमीच युद्धे होत असत. म्हणून कायम मनुष्यबळाची गरज असे. साहजिकच स्त्रीला असे मनुष्यबळ निर्माती म्हणून खूप महत्त्व होते. तिची प्रसूती ही खूपच महत्त्वाची घटना होती. त्याचे शास्त्र ते प्रसूतिशास्त्र,
Woman या शब्दाशी वेगवेगळ्या भाषेतील समानार्थी व संबंधित इतर शब्द FEUG Eve, Frau, adult, better half, common-law wife, concubine, daughter of Eve, distaff, distaff side, domina, donna, dowager, doxy, fair sex, female sex, feme, feme covert, feminity, femme, frow, gentlewoman, girl, goodwife, goody, grown man, grownup, helpmate. helpmeet, kept mistress, kept woman, lady, lass, legalis homo, little, major, married woman, matron, mature man, milady, mistress, no chicken, old lady, old woman, paramour, playmate. rib. second sex. softer sex, squaw, unofficial wife, vrouw, wahine, weaker sex, weaker sex, weaker vessel, wedded wife, wife, womanhood, womankind, woman, womenfolk, womenfolks, dame, gentlewoman, lady, ma’am (मॅऽम्). या सर्व शब्दांमध्ये संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ आहेत, पण ते सारे स्त्रीशीच संबंधित आहेत. यातील Dame, madam हे दोन शब्द मनोरंजक आहेत, ते पाहू. कारण त्याभोवती स्त्रीचा दर्जा निश्चित करण्याचा निकष होता.
ब्रिटिश परंपरेत Dame हा एक अतिशय मानाचा किताब समजला जातो. पुरुषांना दिल्या जाणाऱ्या ‘Sir’ या किताबाला सममूल्य असलेला हा स्त्रियांसाठीचा किताब आहे. प्रथम हा किताब knight हा सन्मान मिळविणाऱ्या पुरुषाच्या पत्नीला दिला जात असे. नंतर तो स्वतंत्रपणे कर्तृत्ववान महिलांना दिला जाऊ लागला. केवळ 28 व्या वर्षी हा किताब लाभणारी एलन मॅकऑर्थर ही ब्रिटिश परंपरेतील आजपर्यंतची सर्वांत तरुण महिला असून ग्वेन डेव्हीसा ही सर्वांत वृद्ध महिला, 100 वर्षांची आजीबाई होती. Dame ला 17 व्या शतकात Lady हा पर्यायी किताब शोधण्यात आला.
Madam (medem)28 हा शब्द 1250-1300 दरम्यानच्या फ्रेंच भाषेतील ma dame पासून बनला असून घरमालकीण असा त्याचा मूळ अर्थ होता. त्याचा लाडिक उच्चार ‘मादाम’. मूळ फ्रेंच dame शब्दच नंतर इंग्लिशमध्ये आला असावा. Madam चे अनेकवचन madams. mesdames असे असून तो अधिकारी स्त्री, सत्ताधिकारी स्त्री या अर्थाने वापरात आला. नंतर नखरेल किशोरीला हे संबोधन गंमत म्हणून प्रचारात आले. गेल्या शतकात कुंटणखाना चालविणारी कुंटीण (the female keeper of a brothel)29 हाही अर्थ मिळाला. आता तो सन्मानाने शिक्षिकेसाठी सुद्धा उपयोगात आणला जातो. इंग्लिशमध्ये स्त्रीसाठी Mrs. Miss आणि Ms हे शब्द सामान्य वापरले आहेत. इंग्लिशमधील Mister हे उपपद knighthood किताबप्राप्त पुरुषासाठी राखून ठेवले गेले. 30 या Mister या शब्दाची दोन लघुरूपे म्हणजे Mr (Commonwealth English) किंवा Mr (American English)31. Mister चे साधारण रूप master हे झाले. Mister च्या विरुद्ध अर्थ सन्मानार्थी उपपदे म्हणून Mrs Miss आणि Ms ही रूपे आली. Mistress म्हणजे घरमालकीण (lady of the house), म्हणजेच विवाहित स्त्री. हा वापर 17 व्या शतकात सुरू झाला. बायबलनुसार स्त्री पुरुषाच्या बरगडीपासून झाली. (जेनेसीस, 2.21 ते 2.23). स्त्रीचे डोके म्हणजे सुद्धा पुरुषच.अशी बायबलची धारणा आहे खरी. मात्र नंतर स्त्रीला बऱ्यापैकी दर्जा देण्यात आला. मारियम, डेबोराह; हुल्डाह, नोहदीया, अॅना, इत्यादी मत्तयकृत शुभवर्तमानात स्त्रीला सौंदर्य, नाजुकपणा, सभ्यतेचे प्रतीक मानण्यात आले.
Female
Woman चा female हा पर्यायी शब्द आहे, त्यामागेही विदारक इतिहास आहे. तो लॅटिन भाषेतील पासून उगम पावतो, त्याचा अर्थ “ती, जी शोषली जाते”. इंग्लंडमध्ये 13 व्या शतकात मोठी प्लेगची साथ आली. या काळापर्यंत स्त्रीचे विश्व चूल आणि मूल असेच मर्यादित होते. घरमालकीण, मोलकरीण आणि विधवा अश्या तीनच अवस्था कायदेशीर होत्या. पण ही प्लेगची साथ इतकी व्यापक झाली की तिने जवळपास अर्धी लोकसंख्या म्हणजे पुरुष नष्टच केले. साहजिकच स्त्रीची आई व बायको या पारंपरिक लिंगभावी भूमिका बदलणे समाजधुरीणांना भाग पडले. स्त्रियांना उंबरठ्याबाहेरचे विशाल विश्व थेट खुले झाले. स्त्रीची संकल्पना अनेक अर्थांनी बदलली आणि स्त्रीच्या भूमिका स्पष्ट करण्यासाठी नवीच भाषा अस्तित्वात आली. femininity and womanliness, womanhood हे शब्द त्या भाषेचे अंग बनले.
Femininity मध्ये अविवाहित मुली आणि स्त्रिया यांच्यात आढळणाऱ्या अभिवृत्ती, वर्तनाचे ठराविक साचे आणि भूमिका यांचा गुणसमुच्चय अभिप्रेत आहे. Femininity म्हणजे स्त्रीत्व. ते केवळ स्त्रीतच अभिव्यक्त होते असे नाही, तर स्त्रीसह पुरुष आणि लिंगांतरित (transgender) यांच्यातही अभिव्यक्त होते. नाजुकपणा, करुणा आणि संवेदनशीलता ही स्त्रीत्वाची मुख्य लक्षणे ठरविण्यात आली.
हे लक्षात घेऊन स्त्रीत्व प्रकट करणारा पुरुष म्हणजे effeminate, स्त्रीत्वाशी निगडित कपडे वापरणारा cross-dresser, आणि असे सारे काही बाह्य रूपडे घेऊन फक्त पुरुषांच्या मनोरंजनासाठी वावरणारा पुरुष म्हणजे drag queen. आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीनुसार पुरुषी स्त्रैणभाव पुरुषामधील समलैगिकत्वाशी स्त्रीत्व (Femininity) जोडले जात असले तरी पुरुषामधील लैंगिकतेशी स्त्रीत्व अनिवार्यरीत्या जोडले गेलेले नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. femiphobia, effeminophobia. sissyphobia हे सारे शब्द अनेक समाजगटांमध्ये पुरुषामधील स्त्रैणत्व सूचित करण्यासाठी नकारात्मक हीनदर्शक शब्द या अर्थानेच वापरले जातात.
Feminine33 ही संज्ञा जुन्या फ्रेंच (14 वे शतक) भाषेतील femella, feminin. femenin किंवा femineus पासून आली असावी. Femina, feminine. female ही तिची रूपे म्हणता येतील. felare चा अर्थ चोखणे, fecund पासून म्हणजे सुपीक असा अर्थ बनतो. इतर वापरात नसलेले रूपसाधित शब्द असे : feminitude (1878); feminile “feminine”(1640s); feminility “womanliness”(1838); femality (effeminacy = female nature, 1754), feminality (quality or state of being female,1640), feminal आणि femineity चा म्हणजे quality or state of being feminine, from L.femineus “of a woman, pertaining to a woman.”
Rib
इंग्लिशमधील rib 34 या शब्दाचाही अर्थ येथे पाहणे उचित होईल. कारण या अर्थाशी, आदमच्या बरगडीपासून ईव्ह ही पहिली स्त्री निर्माण केली गेली, ही बायबलमधील कथा जोडलेली आहे. जुन्या इंग्लिशनुसार ribb असा मूळ शब्द आहे. प्रोटो-जर्मन भाषेतील rebjarif, ribb, ribba, Rippe पासून rib बनतो. 1543 मध्ये Rib joint असा अपशब्द वापरण्यात आला. Rib joint (brothel) बरगडीशी जोडणे; म्हणजे बरगडीवान पुरुषाशी स्त्रीने शारीरिक भिडणे, हा लिंगसंबंध सूचक शब्द आहे. नंतर 1589 च्या दरम्यान rib म्हणजे बायको असा अर्थ लाभला! पण अर्थातच केवळ विवाहित स्त्रीसाठीच तो राखून ठेवला गेला. त्यामुळे अविवाहित, परित्यक्ता, विधवा, कुमारिका यांना स्त्रीचा दर्जा जणू काही नाकारण्यात आला. ही अर्थातच विवाहसंस्थेची सुरुवात, महत्त्व तसेच अनिवार्यता ठरविण्याचा प्रयत्न होता, त्यामुळे हा अर्थ म्हणजे विवाहसंस्थेची मखलाशी होती.
Womb
‘गर्भ’ या शब्दाचा अर्थ पाहणे अनाठायी ठरणार नाही. संस्कृत ‘गर्भ’ चा मूळ धातू ‘गृ-भैन’35 असा असून ‘गर्भेषु वसति’म्हणजे गर्भाशयात वसती करणारा तो गर्भ असा अर्थ निघतो. त्याचप्रमाणे ‘गर्भ’ म्हणजे गाभ,स्त्रीच्या पोटातील पिंड, गोळा. आतील भाग, द्रव्य, सारांश असाही अर्थ आहे. मूळ धातू गृभ् (गर्भ, सगर्थ्य:). गर्बा = रासक्रीडेसारखा नाच, गर्बाचा ‘गर्भ’ या शब्दशी काही संबंध आहे का? असा प्रश्न कृ.पां. कुलकर्णी यांच्या व्युत्पत्तिकोशात विचारला आहे.
इंग्लिशमध्ये womb असा शब्द असून त्याचा अर्थ कशाचे मूळ, उगमस्थान असणे किंवा ओटीपोट belly. जुन्या इंग्रजीनुसार wamb, womb असा शब्द, प्रोटोजर्मनीत wambo असे आहे. womb हा uterus या वैद्यकीय तांत्रिक संज्ञेचे बोलीभाषेतील रूप असून उगम अज्ञात आहे. uterus या लॅटीन मूळ शब्दापासून uteri belly तथापि पासून womb पर्यंत कसा रूपप्रवास झाला ते सांगता येत नाही. प्रोटोइंडियन इंग्लिशमध्ये udero-abdomen, womb, stomach आणि संस्कृतमध्ये उदरम्7 असे बनते. इंग्लिशमध्ये wombrman म्हणजेच woman असाही शब्दप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला, पण तो वादग्रस्त ठरला. त्याच धर्तीवर स्त्री आणि पुरुषामध्ये केवळ गर्भाशयाचाच फरक
आहे, अशीही मांडणी करण्याची ट्रम आली होती.
इंग्लिशमधील hysteria या शब्दाशी स्त्रीचे जवळचे नाते आहे. गर्भाशयासंबंधीचा उन्माद हा अर्थ पुरुषी संस्कृतीने दिला असल्याचा स्त्रीवाद्यांचा आरोप असतो, तो खरा की खोटा, त्याची चर्चा येथे नको. पण अर्थ लक्षात घेणे जरूरीचे आहे, कारण एकूण मानवी लैंगिक व्यापाराशीच ते जोडले गेले आहे. ग्रीक hystera म्हणजे womb पर्यायाने hysterikos म्हणजे of the womb, suffering in the womb ओटीपोटात = गर्भाशयात मज्जातंतूचा बिघाड झाल्याने होणारा उन्मादक, प्रक्षोभक असा निष्पादित अर्थ आहे.38 गर्भाशयाशी जगातील सर्वच धर्मसंप्रदायांनी आणि विचारसरणीनी अनेक मिथके जोडली आहेत.
हे सारे मूळ अर्थ आणि व्युत्पत्ती तपासता स्त्रीची संकल्पना कशी आकार धारण करीत जाते, हे लक्षात येते. असे म्हणता येईल की, स्त्रीची संकल्पना मुख्यत: दोन घटकांभोवती केंद्रित होते, असे दिसते. प्रथम तिचे मादी असणे आणि नंतर तिचे माता होणे.
Womanism and feminism
हे दोन शब्द केवळ वेगवेगळे शब्द नव्हेत, त्या वेगळ्या संकल्पना आहेत. यांच्या आधारे या संकल्पना रचल्या गेल्या त्या परिस्थितीही भिन्न आहेत. वेगवेगळ्या समाजरचनांमधून त्यांचा उगम झाला आहे. अर्थात त्या खोलात जाण्याचे इथे कारण नाही, आपण फक्त या शब्दांचे मूळ, व्युत्पत्ती पाहातो आहोत, त्यामार्गाने काही अर्थबोध होतो का याचा तपास करावायचा आहे. ही या लेखाची मर्यादा आहे.
इथे आणखी एक महा आहे. तो स्त्रीवादाचा. स्त्रीवादाने हे पूर्णपणे आणि ठळकपणे अधोरेखित केले आहे की स्त्री ही सामाजिक रचना आहे. स्त्री जशी जीवशास्त्रीय रचना आहे तशीच ती सामाजिक रचना आहे. स्त्रीचे स्त्री असणे, हेच एक राजकारण आहे. प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका सिमॉन द बोवा ने तिच्या ‘सेकंड सेक्स’ या ग्रंथात ही भूमिका मांडली. नंतर 1960-70च्या दशकात ‘व्यक्तिगत ते राजकीय’ (The Personal is Political)40 ही स्त्रीवादी मांडणी पुढे आली. (तिला नंतर राजकीय ते व्यक्तिगत (The Political is Personal ) अशी जोड मिळाली. बोवाचीच मांडणी आधारभूत ठरून . Womanism विकसित झाला, असे म्हटल्यास फार चुकीचे होणार नाही. .
Feminism हा शब्द Female या शब्दापासून बनतो आणि Womanism हा या Woman पासून बनतो. Womanism हा शब्द धर्मशास्त्रीय चर्चाविश्वात वापरली जाणारी संज्ञा आहे. काहीजण womanism आणि black feminism या दोन्ही संज्ञा समानार्थी वापरतात, कारण दोघांचे चर्चाविषय जवळपास एकच व समान आहेत. पण black feminism ही चमत्कारिक संज्ञा होईल. कारण मुळात ती feminism पासून वेगळेपण दाखविते, म्हणून तशी वापरणे भाषिकदृष्ट्या कितपत योग्य आहे, याचा विचार तज्ञांकडून होणे अनिवार्य आहे. हा समान विषय पुरुषांकडून केले जाणारे विविध पातळीवरील – शोषण’ हा असला तरी त्यातही सूक्ष्म फरक आहे.
Womanism अशा स्त्रियांची चळवळ आहे की जी काळ्या स्त्रिया आणि काळे पुरुष या दोघांचीही दु:खे कवेत घेते आणि त्यांच्या सर्वकष कल्याणाचा विचार करते. साहजिकच feminism पेक्षा womanism ला ही चळवळ अधिक प्राधान्य दिते. त्यामुळे ही चळवळ White” feminism या शब्दात feminism चा थेट उल्लेख करते.
आपण साधारणपणे प्राथमिक व ढोबळ भाषांतर म्हणून feminism आणि womanism यांचे अनुक्रमे ‘गोरा स्त्रीवाद आणि काळा स्त्रीवाद’ असे म्हणू. ज्यास feminism म्हणतात त्या गोऱ्या स्त्रीवादाने स्त्रीमुक्तीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ उच्चकुलीन, उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गीय गोऱ्या स्त्रीच्याच अनुभवविश्वाचा विचार केला आणि काळी स्त्री त्या चर्चाविश्वातून पूर्णपणे वगळूनच टाकली, हा काळ्या स्त्रीवादाचा मुख्य आक्षेप होता. एवढेच नव्हे अनुषंगाने काळी मुलगी (आणि काळा पुरुष) परिप्रेक्ष्याबाहेर बहिष्कृत केली. त्यामुळे feminism अपुरा, चुकीचा, दिशाभूल करणारा, गैरसिद्धान्त आहे. उलट काळ्या स्त्रीवादावर आणि काळ्यांच्या कुटुंबरचनेवर या गोऱ्या स्त्रीवादाचा विपरीत परिणाम झाला, असा आरोपच काळा स्त्रीवाद करतो.

संदर्भ/टिपण/माहिती :
1 महाराष्ट्र टाईम्स मध्ये 1998 साली भारतीय तत्त्वज्ञानातील स्त्रीदर्शन या माझ्या कॉलममध्ये ही भूमिका मी मांडली आहे.
2 येथे ‘त्व’ आणि ‘पणा’ यात फरक करता येईल. पुरुषत्व म्हणजे पुरुषीपणा नव्हे आणि स्त्रीत्व म्हणजे स्त्रीपणा नव्हे. पुरुषीपण स्त्रीमध्येही असते आणि स्त्रीत्व पुरुषात असू शकते. त्व’मध्ये केवळ असणे असते तर ‘पणा’मध्ये अहंकार, सामर्थ्याची प्रखर जाणीव असते व ती प्रगट करण्याची लालसा असते.
3 पण नंतरच्या ज्ञानाच्या प्रवासात स्त्रीत्व आणि पुरुषत्व अशी स्वतंत्र तत्त्वे स्वीकारली जातात आणि स्त्री ही स्वतंत्र संकल्पना आणि पुरुष ही स्वतंत्र संकल्पना बनते. त्यानुसार स्त्रियांचे जग आणि पुरुषांचे जग अशी नवी रचना अस्तित्वात येते. मग एकमेकांच्या जगात एकमेकांना प्रवेश निषिद्ध होण्यापर्यंतची वेळ येऊन ठेपते. ही अर्थात शोकांतिका आहे.
4 समजा केवळ ‘बाई’ असा शब्द वापरला गेला तर तो केवळ तिची उपभोगक्षमताच स्पष्ट करणारा शब्द म्हणूनच वापरला जाणारा शब्द बनतो. उदा. “तिथे एक माणूस. उभा होता” आणि “तिथे एक बाई उभी होती” अशी दोन विधाने केल्यास मनात कोणती प्रतिमा येते? हे तपासून पाहा.
5 अर्थात ‘जन्माला येणारे मानवी मूल स्त्री किंवा पुरुष असते’, या गृहीततत्त्वाला आता छेद बसला आहे. ते मूल उभयलिंगी किंवा बहुलिंगीसुद्धा असू शकते, असे सिद्ध झाले आहे. अॅनी फाऊस्टो स्टर्लिंग Anne Fausto Sterling (जन्म 1944) या विदुषीने या संबंधात खूपच काम केलेले आहे. तिचे “The Five Sexes : Why Male and Female are Not Enough” या लेखात आणि The Sciences. Myths of Gender : Biological Theories about Women and Men. New York : Basic Books. 2nd edition या पुस्तकात आणि इतर सर्व लेखनात बहुलिंगीत्व, त्याच्याशी संबंधित इतर सिद्धान्तांची मांडणी केली आहे.
6 संस्कृत-हिन्दी शब्दकोश, पान 1138, वा.शि.आपटे, नाग पब्लिकेशन्स, दिल्ली. पुनर्मुद्रण 1988
7 आयुर्वेदीय शब्दकोश, खंड दुसरा, पान 1968, संपादक – आयुर्वेदाचार्य वेणीमाधव जोशी व आयुर्वेद विशारद नारायण हरी जोशी, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृति महामंडळ, मुंबई 1968
8 मराठी शब्दसागर, पान 870 संपादक, प्रा. जोशी व प्रा. देशपांडे, योगेश्वर प्रकाशन, डोंबिवली.
9 ज्ञानशब्दकोश, पान 888, संपादक – मुकुंदीलाल श्रीवास्तव, बनारस ज्ञानमंडळ लिमिटेड, बनारस, तृतीय संस्करण, माघ पौर्णिमा 2030
10 Sanskrit-English Dictionary : Etymological and Philologically arranged with… By Monier Monier-Williams, Emst Leumann. Carl Cappeller page 1260
11 इंटरनेटवरील एक संस्कृत शब्दकोश : http://www.srimadbhagavatam. org/downloads/Sanskrit Dictio nary.html आहे.
12 मराठी व्युत्पत्तिकोश, पान 804-5, श्री. कृ.पां.कुलकर्णी, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे 2004 पुनर्मुद्रण
13 मराठी व्युत्पत्तिकोश, पान 804, श्री. कृ.पां.कुलकर्णी, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे 2004 पुनर्मुद्रण
14 पुरवणी, मराठी व्युत्पत्तिकोश, पान 899, श्री. कृ.पां.कुलकर्णी, शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे 2004 पुनर्मुद्रण
15 ‘बुवा’ हा ‘बाई’ च्या विरुद्ध अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. जसे की भास्करबुवा बखले, जोशीबुवा, किंवा यशवंतबुवा जोशी. इथे गंमत अशी की आडनाव बुवा असेल तर त्या कुटुंबातील महिलांना बुवाबाई म्हणावे लागते. ‘बुवा’ला हिंदीत खान किंवा खां म्हणतात. बिस्मिल्लाखां, बडे गुलाम
अलिखां किंवा खांसाहेब.
16 पण या धर्तीवर शिक्षकास ‘बुवा’ का म्हटले जात नाही, कुणास ठाऊक (बुवा!/बाई!)
17 http://oxforddictionaries.com/ definition/bai
18 http://stfubinarists.tumblr.com/ post/4497181947/okay-more on-the-etymology-of-woman
19 http://www.etymonline.com/ index.php?term=woman
20 http://stfubinarists.tumblr.com/ post/4497181947/okay-more on-the-etymology-of-woman
21 अॅरिस्टॉटल – ग्रीक तत्त्ववेत्ता इ.स.पू.384 ते 322
22 जसे की All men by nature desire to know OR Man is a rational animal! – Aristotle :
23 http://old.theshtick.org/languagel woman
24 gynecology सारखीच ग्रीक भाषेततील अन्य प्रसिद्ध संज्ञा म्हणजे philogynia. त्या शब्दापासून Philogyny हा शब्द तयार होतो. सिसिरो (इ.स.पू. 106 ते 43) या रोमन तत्त्ववेत्त्या व इतिहासकाराच्या मते ग्रीक तत्त्वज्ञानात Philogyny म्हणजे स्त्रियांवर अतिरिक्त प्रेम करणे, म्हणजे जवळपास बायल्याच ! या अर्थाने वापरला गेला आणि हा स्वीद्वेषासारखाचा एक मानसिक.आजार आहे. http://en.wikipedia.org/wiki/ Philogyny.
25 Grady Ward. Moby Thesaurus. second edition
26 Dame Ellen Patricia MacArthur डेम एलन पॅट्रीशिया मॅकऑर्थर (जन्म: 08 जुलै 1976) ही सुप्रसिद्ध जलतरणपटू याट्सवुमन म्हणून लोकप्रिय आहे. याट्समधून अखंड विनाथांबा 71 दिवस 14 तास 18 मिनिटे 33 सेकंद या वेळात जगप्रवास करण्याचा विश्वविक्रम 08 फेब्रुवारी 2005 साली नोंदविला. त्या वर्षीची ती सर्वात वेगवान याट्सपटू होती. http://en.wikipedia.org/wiki/ Around_the_world_sailing_record
27 ग्वेन डेव्हीस Dame Gwen Lucy Ffrangcon-Davies, (जन्म: 25 जानेवारी 1891, मृत्यू: जानेवारी 1992) ही सुप्रसिद्ध ब्रिटिश अभिनेत्री असून तिने हॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत प्रथम गायिका म्हणून पदार्पण केले.1924 मध्ये प्रसिद्ध अभिनेते सर जॉन गिलवूड यांच्या (रोमिओ)बरोबर तिने ज्युलिअटची भूमिका साकारली. ब्रिटीश दूरचित्रवाणीवर 1991 साली सादर झालेल्या शेरलॉक होम्स मालिकेतील The Master Blackmailer या रहस्यपटात शंभराव्या वर्षी तिने शेवटची भूमिका अदा केली. त्यानंतर वर्षभरात तिचे निधन झाले. तिच्या या देदीप्यमान कारकिर्दीची दखल घेऊन 1991 साली तिचा Dame Commander of the British Empire या किताबाने सन्मान करण्यात आला.
28 Collins English Dictionary – Complete & Unabridged 10th Edition, 2009 © William Collins Sons & Co. Ltd. 1979, 1986 © Harper Collins Publishers 1998, 2000, 2003, 2005, 2006, 2007, 2009
29 Dictionary of American Slang and Colloquial Expressions by Richard A. Spears. Fourth Edition. Copyright 2007.
Published by McGraw Hill.
30 अर्थात नंतर अनोळखी पुरुषासाठीही हे उपपद वापरले जाऊ लागले.
31 लघुरूपापुढे पूर्णविराम असणे हे (American English) चे, तर पूर्णविराम नसणे हे (CommonwealthEnglish) चे लक्षण आहे.
32 http://en.wikipedia.org/wiki/ Femininity
33 http://www.etymonline.com/index.php?term=feminine, http://en.wikipediaorg/wiki Female. hup:// en.wiktionary.org/wiki/feminine
34 http://www.etymonline.com/ index.php?lerm=rib
35 संस्कृत-मराठी शब्दकोश, वा.शि.आपटे, पृ.400, श्री सत्गुरु पब्लिकेशन्स, दिल्ली, पुनर्मुद्रण 2007
36 मराठी व्युत्पत्तिकोश, श्री. कृ.पां. कुलकर्णी, पान 245
37 http://en.wikipedia.org/wiki/ Uterus, http://www.etymonline.com/ index.php?search=womb
38 http://www.etymonline.com/ index.php?search= hysteria
39 सिमॉन द बोवा:1908 ते 1986, अस्तित्ववादी तत्त्ववेत्ती, विदुषी, लेखिका, सिद्धान्तकर्ती.
40 हे घोषवाक्य प्रथम स्त्रीवादी लेखिका आणि विश्लेषक कॅरोल हॅनीश हिच्या Notes From the Second Year : Women’s Liberation निबंधात 1970 साली वापरले गेले.त्यामुळे या घोषणेचा मान कॅरोलला देण्यात आला. तथापि आपल्या लेखसंग्रहाचे शीर्षक म्हणून शूलमीथ फायरस्टोन आणि अॅनी केईडट या संपादिकांनी स्वतंत्रपणे वापरल्याचा खुलासा हॅनीशने 2006 साली केला. http://mindthegapuk. wordpress.com/2008/01/27/the personal-is-political
एस.एन.आर्टस, डी.जे.एम.कॉमर्स व सायन्स कॉलेज,
संगमनेर, अहमदनगर-422605 (Email : madshri@hotmail.com)

अभिप्राय 1

  • tumhi mahiti dili ti changali ahe. pan aurat ye word arbi word pasun originated ahe. tyacha meaning stree cha private part jo sex kiva sambhogh sathi use hoto. japasun ha word mughalani banavila tyacha meaning stree fakt sex sathi layak ahe baki tiche astitve nahi. ti nich., kamjor ani kai kamachi nahi. ha word specially mughalani 16 th madhe bharatat anala. mughalani bharatiyana mulapasun halavale hote. amache mandir, bhasha, granth, sanskriti, veshbhusha, stree or mahilache sthan and stutuse udhavasta kele. ani word anun ter tyani apali hadach par keli.
    aurat ha word woman / ladies vaparanya layak nahi. tyamule bakichya word cha apaman hoil. ha sex samadhi asalyamule thodya pramanat wife la yevu shakato baki konalahi yevu shakat nahi. ha hindi word nahi. ha word zabaradastine hindi ghusadala gela ani use karat ahe. please hindi madhe tumhi je lihile aurat te delete karun tithe stree, mahila nari ye word use kara. please

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.