हिंदुधर्म आणि हिंदुत्व

(सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता) हे विसाव्या शतकाने जगाला दिलेले मूल्य. ‘आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत’ असे संविधानाच्या उद्देशिकेत नमूद केले आहे. इहवाद हा सेक्युलॅरिझमचा एक अर्थ असला, तरी, सामाजिक जीवनात धर्म न आणणे, सामाजिक व वैयक्तिक जीवन त्या अर्थाने परस्परमुक्त ठेवणे हा त्याचा खरा अर्थ होता. धर्मनिरपेक्षता ही आतापर्यंत पुरोगामित्व व विवेकवाद ह्यांची खूण समजली जात असे. धर्मचिकित्सेपासूनच सर्व चिकित्सांची सुरुवात होते असे मानण्यातून ह्या संकल्पनेची सुरुवात झाली. आता मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन, त्या शब्दाचा आजचा अर्थ, व्यक्तिगत जीवनातही धर्माचे पालन न करणे असा झाला आहे, कारण, पुरोगाम्यांच्या मते धर्मापासून मुक्ती ही सामाजिक जीवनाची पूर्वअट मानली जाते. परिणामी, आजची लढाई ही धार्मिक पुनरुज्जीवनवाद विरुद्ध धर्मनिरपेक्षता अशी असल्याचे गृहीत धरले जाते. ह्या पार्श्वभूमीवर आशिष नंदी ह्यांनी 1991 साली अशी मांडणी केली की ‘संघप्रणीत हिंदुत्वाशी लढण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचे शस्त्र अपुरेच आहे, त्यासाठी आपल्याला हिंदुधर्माचा व्यापक परिप्रेक्ष्यात विचार करून त्यातील बंडखोर परंपरांचा आधार घ्यावाच लागेल’. जागतिकीकरण व बाबरी मशिदीचा विध्वंस ह्या दोन घटनांना दोन दशके उलटल्यावर आज नंदींच्या ह्या वादग्रस्त पण विचारोत्तेजक मांडणीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ह्या विषयावरील चर्चेचे स्वागत आहे. -. का. सं.].
धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांविरुद्ध वेगवेगळ्या रूपांतील उठाव जगात सर्वत्रच होत आहेत. पर्यावरणवादी चळवळीतल्या काही घटकांनी, धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार हल्ला चढवला, ख्रिस्ती चर्चने पूर्व युरोपमधील धर्मनिरपेक्ष साम्यवादी सत्ता खाली खेचण्यात बराच हातभार लावला. तसेच, दक्षिण अफ्रिका, इराण, फिलिपाइन्स व दक्षिण अमेरिकी देशांमधील हुकूमशाही सत्ता उलथून टाकण्यात धार्मिक नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जागतिकीकरणामुळे विविध मानवी सभ्यतांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याविषयीची चिंता वाटणाऱ्या लोकांना विभिन्न धर्मांच्या परस्परसंवादातून नवीन वाट सापडते आहे. जगभरातील राजकारणात नैतिक मूल्यांच्या पुनःस्थापनेसाठी धर्म हे व्यवहार्य माध्यम बनण्याची शक्यताही त्यामुळे निर्माण झाली आहे.
बुडता धर्मनिरपेक्षतावाद
भारतात मात्र धर्मनिरपेक्षतावाद ओसरल्याचे फारसे चांगले परिणाम दिसून येत नाहीत. इथे धर्मनिरपेक्षतावादाची भाषा राजकारणात आदर व सत्तास्थान मिळव पाहणाऱ्या धूर्त वाचिवीरांनी अलगद उचलली आहे. त्याचवेळी धर्मनिरपेक्षतेच्या अवनतीमुळे एक महत्त्वाची संभाव्यता समोर आली आहे. हिंदुधर्म आणि हिंदुत्व हे आता समोरासमोर उभे ठाकले आहेत. परस्परांशी झुंजण्यासाठी ते अद्याप तयार नसले, तरी कधी ना कधी हे होणारच याची त्यांना कल्पना आहे. माझी खात्री आहे की हा अखेरपर्यंतचा संघर्ष असेल.
दुर्दैवाने ह्या लढाईत हिंदुत्व विजयी झाले तर तो हिंदू धर्माचा अंत असेल. हिंदुधर्म ही एक श्रद्धा आहे. आज बहुसंख्य भारतीय ह्या श्रद्धेच्या बळावर जगत आहेत. मात्र हिंदुत्व ही एक विचारसरणी आहे. आज शहरी मध्यमवर्गीयांमध्ये वेगाने पसरत असली तरी ती आहे मुख्यतः उच्च वर्णीय-निम्नमध्यम वर्गीयांची. ही विचारसरणी हिंदुधर्मावर हल्ला करीत आहे. लोकशाही प्रक्रियेत जे प्रभावहीन होत आहेत, अशा अल्पसंख्यकांच्या भावनांना ती नेमकी पंखाखाली घेत आहे.
अल्पसंख्यत्वाची जी जाणीव हिंदुत्व गोंजारते, ती ह्या संतापावर आधारलेली आहे. आधुनिकतेची भुरळ पडून परंपरांमधून जे स्वतःच बाहेर पडले आणि आता मात्र ज्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटते आहे, अशांचा हा संताप आहे. आधुनिकतेची भुरळ पडणे स्वाभाविकच आहे, कारण तीमध्ये त्यांना केवळ चांगल्या आयुष्याचीच हमी दिलेली आहे असे नाही तर आधुनिक शिक्षण आणि आधुनिक व्यावसायिक कौशल्ये मिळवणाऱ्यांना सत्तेमध्ये विशेष स्थान मिळण्याचीही हमी तीत अंतर्भूत आहे. अर्थात, येथील साम्राज्यवादाचा अस्त झाल्यावर आधुनिकतेने, विशेषतः विकास नावाचा तिचा जो उपप्रकार आहे, त्याने आपला शब्द पाळला नाही, हे अलाहिदा.
ह्या पातळीवरील हिंदुत्व हे निम्नमध्यम वर्गातील एका भागाची विचारसरणी आहे. हे लोक आधुनिक भारताच्या वरच्या वर्गात झेप घेण्याची महत्वाकांक्षा तर बाळगतात, परंतु त्याचवेळी, उच्चवर्गीयांकडून आपण आशयाच्या नाही तर शैलीच्या कारणावरून पुन्हा खाली, शहरी सर्वहारांमध्ये ढकलले जाऊ अशी धास्तीही त्यांच्या मनात आहे. कारण हिंदुत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दृष्टीने, त्यांना ढकलून देणारे शैलीदार लोक म्हणजे दिखाऊ धर्मनिरपेक्षतावादी. दुसरीकडे ज्या सर्वहारांमध्ये आपण ढकलले जाऊ असे त्यांना वाटते, त्या वर्गाचे प्रतीक म्हणजे मुस्लिम.. त्यामुळे धर्मनिरपेक्षतावादी आणि मुस्लिम ह्या दोहोंबद्दलही त्यांच्या मनात वैराचीच भावना आहे. ह्या पातळीवरील हिंदुत्वाचे स्रोत हे इस्लामी पुनरुज्जीवनवादाहून मुळीच वेगळे नाहीत.
हिंदुत्वाचा जय झाला तर नेपाळ हे जगातील सर्वात मोठे हिंदू राष्ट्र होईल. मग हिंदुधर्म हा भारतातील बहुसंख्यकांची श्रद्धा किंवा जगण्याचे साधन म्हणून टिकाव धरणार नाही. तो स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाऊन कानाकोपऱ्यांत दडून बसेल. तसेच तथाकथित हिंदुधर्माच्या बाहेर विचित्र ठिकाणांमध्ये तो राहील. कदाचित थेट बाली देशामध्ये आणि भारतातील शीख व जैनांच्या काही प्रदेशांमध्ये तो वास करील. थायलंड व श्रीलंकेतील बुद्धधर्मात, दक्षिण भारतातील साम्राज्यपूर्व ख्रिस्ती धर्मामध्ये, आणि (अनेकांना ह्या गोष्टीचे वाईट वाटणार असले तरी) दक्षिण आशियाई देशांच्या इस्लामी पट्ट्यांमध्ये तो सुखेनैव राहील.
हिंदुधर्माचा ही अस्त हिंदुत्वाचे पुरस्कर्ते मोठ्या आनंदाने साजरा करतील. हिंदुधर्माबद्दल, म्हणजे तो मुळात जसा आहे तशा हिंदुधर्माबद्दल, त्यांना नेहमीच लज्जित आणि अवहेलित झाल्याची भावना वाटत आली आहे. मी पुनःपुन्हा सांगू इच्छितो की हिंदुत्व ही एक श्रद्धा व विचारसरणी आहे, तीही ज्यांच्यासाठी हिंदुधर्म संपला आहे त्यांच्यासाठी. ज्यांची स्वाभाविक श्रद्धा लोप पावली, त्यांनी मागाहून ही विचारसरणी अंगीकारली. हिंदुधर्म ह्या मातीतूनच उगवला होता, पण हिंदुत्वाची उभारणी मात्र एकोणिसाव्या शतकात पुनर्बाधणी केलेल्या हिंदुधर्माच्या तत्त्वांवर करण्यात आली. ही पुनर्बाधणी हिंदुधर्माला ज्यांनी सेमेटिक जातीपेक्षा कमी लेखले, आणि आपला धर्म ज्यांना कडेकोट, चिरेबंदी, सुघटित, पुरुषी आणि साम्राज्यवादी राष्ट्राची विचारधारा पेलू शकेल असा हवा आहे, त्यांनी केलेली आहे.
अखेरची चपराक
सद्यःस्थितीतील हिंदुत्व म्हणजे पाश्चात्त्य साम्राज्यवादाने हिंदुधर्माला तिरीमिरीत मारलेली अखेरची चपराक आहे. हे हिंदुत्व म्हणजे, सर्व प्रकारचे धर्म आकर्षक बांधणी करून व्यवस्थितपणे उपभोक्त्याच्या हातात दिले जावेत अशा प्रकारे, मॉलमध्ये ठेवण्यासाठी बनवलेले उत्पादन आहे.
आशेची बाब ही की, हिंदुत्वाला भौगोलिक मर्यादा आहेत. शहरी आणि निमपाश्चात्त्य भागांच्या पलीकडे ते पोहोचणार नाही. हिंदुधर्म जेथे अधिक लवचीक आहे आणि आपल्या स्वतःचा, स्वतःला नको असणारा भाग म्हणन जेथे मसलमानांकडे बोट दाखवता येत नाही (कारण तेथील समाज बराच एकजिनसी आहे) अशा दक्षिण भारतातही हिंदुत्व पोहोचणार नाही. हिंदुधर्म जेथे अधिक आत्मविश्वासपूर्ण आहे, प्रसारमाध्यमांनी निव्वळ सरकारच्या भाषेत पोपटपंची करण्यास नागरिकांना शिकवलेले नाही अशा ग्रामीण उत्तर भारतातही तो तग धरणार नाही. त्याचप्रमाणे जेथे स्वधर्म आणि स्वभाव ह्यांच्यामध्ये पक्के पाय रोवून उभे असलेले हिंदू स्वतःला मागासलेले, अंधश्रद्ध आणि सनातनी म्हणवून घेण्यातच अभिमान बाळगतात, अशा ठिकाणीही तो टिकाव धरू शकणार नाही.
ह्याच कारणामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदूंची नैतिक व शारीरिक सुधारणा करणे हेच आपले आद्य कर्तव्य मानले आहे. पण त्यांना भारतमातेच्या भूमीवरील खाचखळग्यांत आयुष्य कंठणारे आजचे पतित व हतवीर्य हिंदू काही फारसे भावत नाहीत. गेल्या किमान एका सहस्रकापूर्वी अस्तित्वात असलेले हिंदूच त्यांना प्रिय आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवाक्यात असते तर, भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी खाकी चड्डी घालायला लावली असती. त्यांच्या दृष्टीने आदर्श भारतीय म्हणजे वासाहतिक पोलीस सार्जंटचाच सावळ्या त्वचेतील अवतार! फक्त बायबलऐवजी गीता वाचणारा.
म्हणून तर कैलासवासी श्री. नथुराम गोडसे ह्यांनी आधुनिकतावादी, कृतक धर्मनिरपेक्ष जवाहरलाल नेहरू ह्यांच्या केसालाही धक्का न लावता, ‘प्रतिगाम्यांचे शिरोमणी’, ‘राष्ट्रद्रोही’, “सनातनी’ मोहनदास करमचंद ह्यांना ठार केले. ह्या घटनेनंतर नेहरू फक्त एवढेच म्हणू शकले, की ‘तो एक माथेफिरू होता. गोडसे माथेफिरू नव्हता, तो हिंदुत्वाचा खरा शत्रू कोण ते जाणत होता, हे मान्य करणे आधुनिकतावादी पंतप्रधानांना जडच गेले असणार!
हिंदुधर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुत्व हे ह्या श्रद्धेला अधूनमधून धक्का देणाऱ्या एखाद्या रोगाच्या साथीसारखे आहे. हिंदुधर्माने गेल्या काही शतकांत अशा अनेक रोगांच्या साथी पचवल्या आहेत. आणखीही पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आता असे पहा, गांधींनी जिला सैतानी म्हटले, अश्या आधुनिक संस्कृतीलाही हिंदुधर्म पुरून उरलाच ना— तेही शतकभरापेक्षा अधिक काळासाठी वसतीला असलेल्या….
आपल्यातली अर्धवट संघटित अशी वाट चकलेली कोकरे हिंदधर्म सोडन गेली. ती मुख्यतः तीन कारणांनी. एक तर आजची सर्वव्यापी, जगड्व्याळ बाजारपेठ, दुसरे म्हणजे ‘सुरक्षित राष्ट्राची’ संकल्पना आणि तिसरे म्हणजे आजचे अंगावर येणारे शहरीकरण व औद्योगिकीकरण. ह्या गोष्टींची आह्वाने आपला जुना हिंदुधर्म पेलू शकणार नाही असे वाटून घेऊन आणि आधुनिकतेच्या झगमगाटाला भुलून कट्टर हिंदुत्वाच्या आश्रयाला गेलेली ही मंडळी जेव्हा हिंदुधर्मात परत येतील, म्हणजेच वरील गोष्टींपासून पळ न काढता त्यांना सरळपणे तोंड देतील, तेव्हाच हिंदुत्व नष्ट होईल.
तुम्ही आशावादी असा की निराशावादी, भारतात राहणार असाल तर तुम्हाला एकच पर्याय आहे. तो, पारंपरिक श्रद्धांची जागा घेणाऱ्या गुळमुळीत, झिलईदार धर्मनिरपेक्षतावादाचा नाही, तर हिंदुधर्मातील घातक रूढीविरुद्ध बंड करणारे जे सामाजिक घटक आधीपासूनच त्यामध्ये आहेत, त्यांच्याशी नाते जोडण्याचाच आहे.
विद्रोहाच्या ह्या परंपरा धर्म, सभ्यता आणि राज्ये यांच्या मर्यादा ओलांडून सर्वदूर पोहोचल्या आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे सांस्कृतिक अस्तित्वाचा संघर्ष केवळ देशातच नाही तर जगभरात सर्वत्रच उफाळून आला आहे. प्रत्येक ठिकाणी त्या संघर्षाला त्याच्याच समूहातील अनेक लोकांकडून, संघर्ष सोडून देण्याचा सल्ला ऐकून घ्यावा लागत आहे. दुनियादारीची अशी अपेक्षा आहे की संस्कृतीने आपले स्वत्व सोडून आधुनिक जगाशी जुळवून घ्यावे व विश्वव्यापी (सरधोपट) संस्कृतीचा भाग बनावे. तथापि, सामाजिक नवरचनाकारांना वाटले होते, तेवढ्या काही ह्या स्थानिक संस्कृती ‘सालस’ व ‘आज्ञाधारक’ निघाल्या नाहीत. त्यांनी आपल्या अस्तित्वाचा संघर्ष सुरूच ठेवला आहे.
नैसर्गिक मृत्यू
हिंदुत्वासही कदाचित स्वाभाविक मृत्यू येईल. पण तसे म्हणावे तर थंड प्रदेशात एकाच हिवाळ्यात ज्यांची वासलात लागते, अश्या अनेक गोष्टी उष्ण कटिबंधात बराच काळ तग धरून राहतात. तेव्हा इतर विचारसरणींइतकाच स्वाभाविकपणे त्याला मृत्यू येईल असेही म्हणवत नाही. कदाचित, हिंदुत्वाला काहीसा अस्वाभाविक मृत्यू देण्यासाठी गांधीयुगोत्तर हिंदुधर्माला लोकशाही पद्धतींची मदत घ्यावी लागेल….किंवा असे तर नसेल की दयामरणाच्या ह्या पद्धतीलाच राजकारण असे संबोधीत असावेत……..
शिरपूर, धुळे (फोन : 9881442448) anumohoni@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.