संपादकीय

सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण ह्या सूत्राभोवती ह्या विशेषांकातील लेख गुंफलेले आहेत. हा विशेषांक एरवीच्या अंकांपेक्षा काहीसा वेगळा आहे.

बालकांना निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा अधिनियम एप्रिल 2010 पासून लागू झाला. ह्या अधिनियमाच्या कलम 8 व कलम 29 नुसार भारतातील प्रत्येक मुलाला आता चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाचा हक्क मिळाला आहे. मात्र, हा अधिनियम लागू होऊन 18 महिने झाले असले तरी त्यात उल्लेख असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टाबाबत राज्यात पुरेसे विचारमंथन होताना दिसत नाही. अशाप्रकारचे मंथन व्हावे ह्या हेतूने 14 व 15 जानेवारी 2012 रोजी ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण’ हे दोन दिवसांचे निवासी संमेलन सेवाग्राम, वर्धा येथे आयोजित केले गेले होते. ह्या संमेलनात ह्या अधिनियमाशी संबंधित अशा सर्व समाजघटकांमध्ये काम करणारे शिक्षक, अधिकारी, कार्यकर्ते व तज्ज्ञ एकत्र आले होते. ह्या दोन दिवसांत जी मांडणी झाली व जे विचारमंथन घडून आले त्यावर आधारित लेखांचा संग्रह आता ह्या विशेषांकाच्या रूपात आपल्यासमोर आलेला आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणावर जे वैविध्यपूर्ण व विपुल लेखन देशी-परदेशी भाषांमध्ये झाले आहे ते पाहता आता अधिक तात्त्विक चर्चेची गरज (किंवा उपयोग!) काय आहे असे वाटू शकेल. मात्र नेमक्या एका दिशेने, नियोजित असे काम सामूहिकपणे करायचे असेल तर इतकी विविधता हीच एक अडचण भासू शकते व ह्या अडचणीवरील एका वेगळ्या, नेमक्या चर्चेची गरज जाणवते.

सर्जनशील बनवणारे शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोण विकसित करणारे शिक्षण, समतेसारख्या मूल्यावर आधारित समाज घडवायला उपयुक्त ठरणारे शिक्षण, मातृभाषेचे व मायबोलीचे जतन करायला आवश्यक असणारे शिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देणारे शिक्षण असे जे अनेक प्रकार समाजात व शैक्षणिक चर्चेत आढळतात ते एकाच व्यापक अशा दृष्टिकोणामध्ये सुसंगतपणे गुंफता येतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर हेही खरे आहे की अशाप्रकारे अनेक स्रोतांमधून मिळालेल्या दृष्टिकोणांचा, तत्त्वांचा, अनुभवांचा सुसंगत असा मेळ घालणे ही एक बऱ्यापैकी गुंतागुंतीची तात्त्विक भानगड आहे. शिवाय, असा मेळ घालताना सर्वच दृष्टिकोण व त्यांचे सर्वच पैलू आपापल्या जागी वेगवेगळ्या प्रकारे योग्यच आहेत असा गुळमुळीतपणा टाकून द्यावा लागतो. ज्या पैलूंचा मेळ घालता येत नाही ते वेगळेच राहू देणे किंवा ज्या पैलूंचा मेळ घालणे योग्य नाही असे वाटते ते स्पष्टपणे नोंदवणे ही खबरदारी घेतली नाही तर अपेक्षित असलेली स्पष्टता अशा प्रकारच्या मांडणीत येत नाही.

ह्या अधिनियमामुळे अश्या चर्चेला व कामाला एक नवीन चौकट मिळाली. एक नेमका अधिनियम व एक नेमका अभ्यासक्रमाचा आराखडा लोकांसमोर आला. प्रसारमाध्यमांमधून चर्चा होऊ लागल्या, लेख छापून येऊ लागले. प्रत्येक मुलाला चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळाले नाही तर आता कायदेशीर कारवाई करता येईल ही बाब व त्याची व्यवहार्यता चर्चिली गेली. प्रत्येक मूल शिकले पाहिजे ह्यासाठी आता सरकार कायद्याने बांधील आहे हे परत परत अधोरेखित केले गेले. अभ्यासक्रम आराखडा ही काय चीज असते व त्याला इतके महत्त्व का द्यायचे हे लक्षात येऊ लागले. ह्या दृष्टीने पाहता शिक्षण हक्क अधिनियम ही एक लक्षणीय घटना व एक संधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

सोमवारपासून मी काय करू?’ अशा अर्थाचे शीर्षक असलेले जॉन होल्ट या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञाचे एक इंग्रजी पुस्तक आहे. लांबलचक, उलटसुलट तात्त्विक चर्चा झाल्यावर आता नक्की काय करू हे शिक्षकांना, पालकांना समजत नाही ह्या बाबीकडे त्या नावाचा रोख आहे. शिक्षण हक्क अधिनियमाच्या वेगवेगळ्या पैलूंवर जी चर्चा होत आहे ती एकत्रितपणे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर वरील शीर्षकाची आठवण होते. ह्या सर्व चर्चेत एक प्रकारचा विखुरलेपणा जाणवतो. महत्त्वाचे मुद्दे कोणते, दुय्यम मुद्दे कोणते व पुढील महिन्यात, पुढील एका वर्षात नेमके काय करायचे हे अशा विखुरलेपणामुळे लक्षात येत नाही. ह्यामुळे अनेक शिक्षक व शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते गोंधळून जाऊ शकतात.

अशा संस्थांना, कार्यकर्त्यांना समजेल असा नेमका मार्गदर्शक-आराखडा तयार करण्याचे आणि तो सर्वांसमोर ठेवण्याचे काम या सम्मेलनाने केले. हे काम प्रत्यक्षात उतरायचे असेल तर त्याची विविध व्यासपीठांवर मांडणी आणि छाननीही व्हायला हवी.
प्रत्येक मूल शिकले पाहिजे व प्रत्येक मुलाला चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे हा आग्रह केवळ शिक्षणक्षेत्रातल्यांच्याच नाही तर आपल्या सर्वांच्याच मनात अग्रक्रमाने आहे, आणि ठरवले तर तसे घडणे शक्यही आहे असा विवेकपूर्ण विश्वास रुजावा, यासाठी ह्या अंकाची रचना झालेली आहे.

  • ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे काय?’,
  • ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मूल्यमापन कसे असावे?’,
  • ‘हे साधण्यासाठी काय करावे लागेल?”

ह्या विषयांवर या सम्मेलनातील सत्रांमध्ये मांडणी झाली. ती शक्य तेवढी स्पष्टपणे आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कायद्याचा आधार मिळालेला असला तरी आज हे सारे दूर आणि अप्राप्य वाटते ह्याची जाणीव आहे तरी, काही घडायचे असेल तर आधी त्याचे स्वप्न तर पाहावे लागते.
– संपादक

टीप : बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणाऱ्या कायद्याबद्दल हा अंक काढण्यात आला आहे. Act या शब्दाचा मराठी पर्याय अधिनियम असा आहे. कायदा हा शब्द अधिक रूढ व प्रचलित असला तरी तो Law या शब्दाचा पर्याय आहे, Act चा नाही. येथे शास्त्रीय पातळीवरून चर्चा केलेली असल्यामुळे अधिनियम हा पारिभाषिक शब्द जाणीवपूर्वक योजला
आहे. वाचकांनी दोहोंमधील भेद कृपया लक्षात घ्यावा. – कार्य. संपा. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.