मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी

आपल्या देशातील मध्यमवर्गाने गेल्या शतकात सर्व क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीय शोधांपासून तर स्वातंत्र्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्रांत नेतृत्व पुरवले. वैचारिक क्रांतीच्या उंबरठ्यावर समाजाला ह्या मध्यमवर्गानेच नेऊन ठेवले. मात्र पुढे अचानक काय झाले… मध्यमवर्गीय सुखवस्तू झाले, केवळ व्यावहारिक यशाच्या मागे लागले आणि ते मिळताच आपली जबाबदारी पार पाडेनासे झाले. सामाजिक नीतिमत्तेच्या कालातीत मूल्यांना ते विसरले की काय? उच्चशिक्षणाचे भाग्य लाभलेल्या ह्या वर्गाने मिळकतीचे सोपे पण लबाडीवर आधारलेले मार्ग शोधून काढले, आणि त्यातच त्यांच्या अस्मितेची आहुती पडली. नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण होण्याची गरज प्रतिपादन केली होती. विचारक्षम आणि संवेदनक्षम मध्यमवर्ग ती गरज पूर्ण करू शकला असता तर देशातील स्वातंत्र्योत्तर परिस्थितीचे चित्र निश्चितच वेगळे दिसले असते. पण मध्यमवर्ग त्यात अपुरा पडला. एवढेच नव्हे तर आपली सामाजिक जबाबदारी न ओळखता आल्याने तो समाजाला योग्य दिग्दर्शन करू शकला नाही. स्वतःच अभिजन बनण्याची स्वप्ने पाहत ह्या मध्यमवर्गाने, म्हणजे महाजनांनी, व्यावहारिक यश मिळविण्यासाठी अप्रामाणिकपणावर. आधारलेल्या नवनव्या क्लुप्त्या शोधन काढल्या. त्यातच आपले सामाजिक स्थान खऱ्या अर्थाने ह्या वर्गाने गमावले. एक प्रकारची भीरुता ह्या वर्गात निर्माण झाली.
आपला अप्रामाणिकपणा उघडकीला येऊन समाजात आपली नाचक्की होऊ नये ह्या एकाच बाबीची काळजी हा वर्ग घेऊ लागला. त्याचे मुळातील वैचारिक अधिष्ठान संपले, त्याबरोबर नैतिक अधिष्ठानही त्याने गमावले.
तारतम्य, खंड 4 मधून:

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.