ज्येष्ठ नागरिकांसाठी लिव्ह-इन-रिलेशनशिप मंडळ : एक विचार

रोज सकाळी फिरायला जाताना मला एक वृद्ध जोडपे हातात हात घालून कधी पाठमोरे तर कधी समोरून येताना दिसते. मनातल्या मनात मी ‘जोडी अशीच अभंग राहो’ ही सदिच्छा व्यक्त करते. आयुष्याची अशी रम्य पहाट किंवा संध्याकाळ सगळ्यांच्याच वाट्याला येईल असे नाही. विवाह करून सहचराचा हातात घेतलेला हात कधीतरी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर सुटू शकतो अन् मग सुरू होते उर्वरित जीवनाची त्याची/तिची एकाकी वाटचाल! हे एकाकीपण सहन करणे, निभावणे खूप कठीण असते. पण त्याला पर्यायही नाही असे वाटत असतानाच वर्तमानपत्रातून ‘ज्येष्ठ व्यक्तींसाठी Live-in-relationship मंडळ’ स्थापन होणार अशी बातमी वाचनात आली. श्री. अरविंद गोडबोले आणि त्यांचे सहकारी ह्यांनी ही कल्पना मांडली व त्याप्रमाणे पहिली प्राथमिक बैठक 22 जाने. 2012 रोजी झाली. सभेला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद
मिळाला. वेगवेगळ्या वयोगटाचे स्त्री-पुरुष, केवळ ज्येष्ठच नव्हे तर 30/35 वर्षांचे तरुणही उपस्थित होते.
सभेत हे मंडळ स्थापण्यामागचा हेतू व्यक्त करण्यात आला. सभा झाल्यावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून वाचकांच्या, वृत्तपत्र प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया येत होत्या. प्रतिकूल प्रतिक्रिया येणेही स्वाभाविकच आहे. परंतु तरुण भारत (नागपूर) चा अपवाद वगळता सर्वच वर्तमानपत्रांनी, चॅनेल्स्नी ही संकल्पना उचलून धरली. महाराष्ट्र टाइम्स ने हा विचार अगदी योग्य दृष्टिकोणातून वाचकांपर्यंत पोचवण्याचे काम केले.
प्रतिकूल प्रतिक्रियांपैकी कोणत्याही प्रतिक्रियेची गंभीर दखल घ्यावी असे मला वाटले नाही. ‘अशा मंडळाची गरजच काय?’, ‘पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आहे’, ‘बागेत जावे, नातवंडांबरोबर वेळ घालवावा, समाजकार्य करावे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे, वानप्रस्थाश्रमात कसे वागावे हे आपल्याकडे सांगितलेच आहे त्याप्रमाणे वागावे, एखाद्याला घरी शिक्षणासाठी ठेवावे, त्याचे करावे इ. सूचना, ‘ज्येष्ठ व्यक्ती जर अशा विवाहाशिवाय एकत्र राहात असतील तर तरुणांना ‘तुम्ही असे वागू नका’ असे कसे म्हणणार?’ ह्यांपासून ‘अंगवस्त्र ही कल्पना आपल्याकडे होतीच’ इथपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्या वाचून हसावे की रडावे हेच कळत नव्हते. कोणालाही या विषयाचे गांभीर्य जाणवले आहे असे व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून वाटले नाही.
एकाकीपण हे कोणत्याही कारणाने येऊ शकेल. सहचराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू, घटस्फोट, तरुणपणी ठरवून अविवाहित राहण्याचा घेतलेला निर्णय परंतु तो चुकला असे आयुष्याच्या उत्तरार्धात वाटणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता इच्छा असूनही विवाह न होणे इ. इ. एकटेपणाची समस्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे निर्माण झाली असे नव्हे. एकत्र कुटुंबातही ती होतीच! तुमच्या आजुबाजूला वावरणारे लोक असल्यावर तुम्ही एकटे नसताच असे नव्हे! गर्दीतही माणूस एकटा असू शकतो.
हा जाणवणारा एकटेपणा दूर करण्याचे काही समाजमान्य मार्ग उपलब्ध आहेत का? या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी आपण एक मुद्दा लक्षात घेऊ या की ‘एकटेपणा’ सर्वांनाच समस्या वाटेल असे नाही. काही व्यक्तींना तो आवडू शकतो. संसार करता करता स्वतःसाठी जगायचे राहूनच गेले, स्वतःसाठी जगायचे असते हा विचारही सुचला नाही. तर आता तसे जगू या! जे जे करावेसे वाटत होते, उदा. भरपूर वाचन, प्रवास, कार्यक्रमांना जाणे प्रदर्शने पाहणे, नाटके/सिनेमे पाहणे लेखन करणे, निसर्गाचा आनंद लटणे. मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारणे, लोकांशी संवाद साधणे इ.इ. ते. ते करायला ही एक उत्तम संधी म्हणू त्याकडे पाहिले जाऊ शकते. ‘स्वातंत्र्य’ हे मूल्य जपणारी व्यक्ती असेल तर एकदा संसाराचा अनुभव घेतल्यावर, मांडलेला संसार व्यवस्थित पार पाडल्यावर पुन्हा त्या भानगडीत पडणारच नाही. शेवटी ‘स्वाधीन’ असण्याची मजा काही औरच असते. आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवण्याची गरजच नाही. ‘स्वातंत्र्या’प्रमाणेच मैत्री हे मूल्यदेखील महत्त्वाचे आहे. तुमचे काही जिव्हाळ्याचे, आतड्याचे मित्र/मैत्रिणी असू शकतात. त्यांच्याशी तुम्ही मनातले अगदी तळमनातले बोलू शकता.
तसेच मृत्यूप्रमाणे एकटेपणा देखील जीवनाचे एक अटळ वास्तव म्हणून स्वीकारून, व्यक्ती त्यावर मात करण्याचे स्वतःचे मार्ग शोधू शकते. परंतु मनाचा एवढा खंबीरपणा सरसकट सगळ्यांच्या ठिकाणी असतोच असे नाही. काहींना जीवनातील एकाकीपणा दूर व्हावा असेही प्रांजळपणे वाटू शकते. यावरील एक पर्याय बऱ्याच मोठ्या प्रमाणात समाजाने स्वीकारलेला आढळतो तो म्हणजे पुनर्विवाहाचा! तो ज्येष्ठ व्यक्तींसाठीही खुला आहे. परंतु पुरुषाच्या संदर्भात तो सहजगत्या केला जातो. मात्र एखाद्या एकट्या स्त्रीला एक/दोन अपत्ये असतील तर तिच्या पुनर्विवाहाचा विचार ना कुटुंबीयांच्या मनात येत, ना खुद्द त्या स्त्रीच्या!
वृद्धाश्रम’ हाही एक पर्याय सुचविला जातो. तुम्हाला समवयस्क, समदुःखी भेटतील, त्यांच्यात तुम्ही रममाण होऊ शकता असे म्हटले जाते. परंतु वृद्धाश्रम ह्या संकल्पनेला एक वेगळाच वास आहे. ‘आपण घरात अडगळ झालोत म्हणून आपल्याला येथे ठेवले’ हा विचार ज्येष्ठांच्या मनात येऊ शकतो. (आजकाल लग्न ठरविताना मुली मुलांना ‘तुमच्या घरात किती dustbins (ज्येष्ठ व्यक्ती) आहेत?’ हा प्रश्न विचारतात). आयुष्याच्या संध्याकाळी व्यक्तीला फक्त प्रेम, जिव्हाळा, आपुलका हवा असत. कोणातरा प्रेमाने दोन शब्द बोलले तर बरे वाटते.
यानंतरचा तिसरा पर्याय म्हणजे विनाशर्त सहजीवनाचा! (Live-in-relation ship, companionship) हे सहजीवन पुरुष-स्त्री, दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया ह्या कोणाचेही असू शकेल. जर हे सहजीवन स्त्री-पुरुष ह्यांचे असेल, दोघेही शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या संपन्न असतील तर त्यांनी परस्पर सहमतीने एकत्र राहायला काहीच हरकत नाही. उच्च न्यायालयाने तशी परवानगी दिलेली आहे. म्हणजे या रीतीने एकत्र राहण्यास कायद्याचा आधार आहे. त्यांच्यात शारीरिक संबंधही असू शकतील. अर्थात् तरुण वयात लैंगिक भावना जेवढी प्रबळ असेल तेवढी उतारवयात असण्याची शक्यता कमी! त्यापेक्षा भावनिक आधार फार मोलाचा असतो. एकमेकांना जिव्हाळ्याने समजून घेणे, एकमेकांवर प्रेम करणे ही गरज जास्त असते…
मग हा भावनिक आधार मुलामुलींच्याकडून नाही का मिळू शकणार? ह्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल. प्रत्येकाचे एक स्वतंत्र विश्व असते व त्यात” एका विशिष्ट मर्यादेपलीकडे इतरांना, प्रवेश नसतो. मुले येतात, ‘कसे आहात?’ विचारतात (तेही त्यांना वेळ असेल तर) अन् आपापल्या कामांत व्यग्र होतात. घरात बायको, मुले आहेत ह्याचेही त्यांना भान नसते, मग आईवडील तर खूप दूऽऽरचेच राहिलेत! त्यांनाही दोष देता येणार नाही. त्यांना काळाबरोबर धावलेच पाहिजे.
आणखी एक पर्याय आहे. तो मोठ्या शहरांतील तरुण पिढीकडून आचरणातही आणला गेलेला दिसतो. तो म्हणजे पुरुषवेश्या (gigolo)! तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काही तासांसाठी, दिवसांसाठी पुरुषांच्या सहवास मागू शकता. मजा करा, बाजूला व्हा! ह्यात कोणतीही भावनिक गुंतवणूक नाही. अशी सेवा (?) पुरविणारी केंद्रे आहेत. . ‘गार्गी-एक विचार’ ह्या चित्रपटात हा विषय अतिशय व्यवस्थितपणे मांडला आहे. मात्र या पर्यायाचा स्वीकार करण्याएवढे मानसिक सामर्थ्य सर्वसामान्य स्त्रीमध्ये असेल की नाही ह्याची मला शंका आहे. यांपैकी कोणता पर्याय स्वीकारावा हे ज्याने त्याने आपल्या mental make-up अनुसार ठरवावे. परंतु एखाद्याने विनाशर्त सहजीवनाचा पर्याय स्वीकारला तर त्याचे स्वागत करण्याची समाजाची तयारी असायलाच हवी…..
हे खरे आहे की सहजीवनाचा पर्याय स्वीकारताना, ज्या स्त्री-पुरुषाला तो स्वीकारणीय वाटतो त्यांची काही मानसिक, वैचारिक पूर्वतयारी असणे आवश्यक आहे.
प्रथम व्यक्तीने मोकळेपणाने स्वतःशी हे कबूल करावे की मला माझे उर्वरित जीवन अमुक एका व्यक्तीबरोबर व्यतीत करायला आवडेल. अर्थात् काही सामाजिक बंधने व स्वतःच स्वतःवर लादून घेतलेली काही मानसिक बंधने याच्या आड येऊ शकतात. ती दूर सारून सहजीवनाचा विचार स्वीकारण्यास तयार व्हावे लागते. येथेही स्त्री-पुरुष विषमता डोकावतेच! पुरुषाला कदाचित् ते सोपे जाईल. परंतु स्त्री मात्र पतिनिधनानंतर मुलांना लहानाचे मोठे करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करणे, त्यांच्या संसारात रममाण होणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानते. ‘स्वतःसाठी जगणे हा विचारच तिच्या मनात येत नाही. स्त्रिया हे सर्व नाईलाजाने का होईना स्वीकारतात व जगतात! त्यांना एकटेपणा जाणवत असेल हे मुलांच्या ध्यानातच येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ‘लोक’ नावाचा बागुलबोवा फेकून देता आला पाहिजे. ‘लोक काय म्हणतील?’ हा प्रश्न सतत आपल्या मानगुटीवर बसलेला असतो. लोक ‘अरं म्हणतील तसेच ‘बरं’ म्हणतील! दुःखातून लवकर बाहेर पडलात तर, या बाईचे नवऱ्यावर प्रेमच नव्हते’, असे म्हणतील तर दीर्घकाळ दुःखात राहिले तर, ‘किती काळ दुःखात राहायचे, आता सावरायला हवे स्वतःला’, असेही म्हणतील. ह्यामुळे लोकनिंदेला भीक घालू नये. लोकांना जेव्हा हे कळते की आपल्या टीकेने ह्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही तेव्हा ते तुमच्या वाटेला जाणार नाहीत. फक्त एक पथ्य पाळावे, स्वतःशी प्रामाणिक राहावे.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन व्यक्तीबरोबर सहजीवनाचा निर्णय अमलात आणताना आपण आपल्या भूतपूर्व पतीची/पत्नीची प्रतारणा करीत आहोत असे मानायचे कारण नाही. ही सल, अपराधीपणाची भावना, मनातून काढून टाकली पाहिजे.
या ठिकाणी अशीही शंका मनात येऊ शकते की हा सोबतीदेखील माझ्याआधी गेला तर? याचे उत्तर तुम्ही जीवनाचा कसा विचार करता यावर अवलंबून राहील. फेला अर्धा भरला आहे असेही म्हणता येते व अर्धा रिकामा आहे असेही!
या संदर्भात, मला वाटते, अपत्यांची भूमिका हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अपत्यांना आपल्या आई-वडिलांच्या ठिकाणी कोणीही अन्य व्यक्ती नको असते. अपत्ये जर विवाहित असतील तर तुम्ही त्यांच्याशी विचारविनिमय करून, त्यांना तुमचे सहजीवन कसे असेल हे समजावून सांगू शकता. तेवढी वैचारिक परिपक्वता त्यांच्यात असायला हवी. ‘यु टर्न’ ह्या नाटकाचा हाच विषय आहे.
कोणतेही परिवर्तन, बदल हा एका रात्रीतून घडून येत नाही हे मला मान्य आहे. त्यासाठी आधी विचार व्यक्त करावा लागतो, तो व्यक्तिगत पातळीवर स्वीकारावा लागतो, अन् मग तो समाजाच्या पातळीवर स्वीकारला जातो. विनाशर्त सहजीवनाच्या बाबतीत अजून आपण पहिल्याच टप्प्यावर आहोत.
ह्या संदर्भात समाजाची भूमिकाही महत्त्वाची आहे. नवीन विचार समाजाने निदान समजावून तरी घ्यायला हवा. यासाठी वैचारिक भूमी नांगरून घ्यायला हवी. आपली जी कुटुंबाची चौकट आहे ती थोडी लवचीक करावी लागेल. दोन ज्येष्ठ स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणे हाही कुटुंबाचाच एक प्रकार आहे असे मानायला हवे.
हा सगळा प्रश्न समाजातील कोणत्या वगाचा आह! आतश्रामताचा नाहा तसच अतिगरिबांचाही नाही, तर तो मध्यमवर्गाचा आहे. ज्याला नीतिमूल्यांची चाड आहे, जो नवीन विचार स्वीकारायला उत्सुक आहे परंतु परंपरेचे जोखड फेकूनही देऊ शकत नाही अशा मध्यमवर्गाचा.
तसेच ही समस्या केवळ स्त्रियांचीच आहे असे नाही तर पुरुषांचीही आहे. आज साधारण पन्नासच्या पुढच्या वयाची स्त्री विवाहासाठी राजी नसते. हे मला समर्थनीय या कारणासाठी वाटते की आज स्त्रीला स्वतःचे भान आले आहे, आर्थिक स्वातंत्र्य आहे, वैचारिक/सामाजिक प्रगल्भता आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने कोणत्याही नात्यात ती गुंतून पडण्यास तयार होणार नाही. आता कोठे ती जरा मोकळा श्वास घेतेय!
विनाशर्त सहजीवन या पर्यायाची शिफारस करीत असताना हाच एकमेव पर्याय आहे असे मला म्हणायचे नाही. हा पर्याय व्यक्तींनी स्वीकारल्यास मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करेन. दोघांनी एकत्र राहावे, कोणीही कोणावर वर्चस्व गाजवू नये, एकमेकांच्या उपस्थितीचे परस्परांवर दडपण येता कामा नये. मला वाटते ह्या वयात एवढी प्रगल्भता दोन्ही पक्षी असायला हरकत नाही. जेव्हा असे वाटेल की आपले सह-अस्तित्व हे एकमेकांना त्रासदायक होते आहे तेव्हा ‘सायोनारा’! तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी खूष! अन् हे स्वतंत्र होणे घटस्फोट मिळविण्यापेक्षा नक्कीच सोपे राहील.
अशा रीतीने सहजीवन जगू इच्छिणाऱ्या समविचारी स्त्री/पुरुषांची परस्पर ओळख व्हावी, मैत्री व्हावी यासाठी – ‘Live-in-relationship मंडळ’ एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, काही कार्यक्रमांची आखणी करणार आहे. त्यातून जर कोणाची कोणाशी तार जुळली तर मंडळ तसा करार करून घेईल. या दृष्टीने कार्यकारिणीची सभा घेऊन सर्वानुमते त्याचे स्वरूप ठरवतील व ते जाहीर करतील. आज जवळ जवळ दीडशे सर्वसाधारण सभासदांनी नोंदणी केलेली आहे. मुंबई, ठाणे, वाशी इ. ठिकाणांहून अतिशय उत्साहवर्धक, हुरूप वाढविणारा प्रतिसाद मिळतोय. त्या ठिकाणी ह्या मंडळाचे एक उपकेंद्रही नजीकच्या भविष्यात सुरू करण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाच्या वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!
कर्मयोग, धंतोली, नागपूर – 440012, इ-मेल : sunitideo51@gmail.com भ्र.ध्व. : 9822577565

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.