ही स्त्री कोण? (भाग २)

Women पासून Womanist आणि womanish रूपे आली. Womanish हा शब्द मुख्यतः अमेरिकन काळ्या माताकडून वयात आलेल्या पौगंडवयीन मुलींसाठी वापरला जाणारा बोलीभाषेतील शब्द आहे. पौगंडवयीन मुलींना पूर्ण स्त्रीत्वाकडे नेणारा या अर्थाने पण girlish च्या विरुद्ध अर्थी वापरला गेला.
हा अर्थ घेऊनच feminism ही संज्ञा आणि संकल्पना रुळली, नवा वैचारिक प्रवाह अस्तित्वात आला आणि स्थिरावला. पण feminism ही गोऱ्या स्त्रियांसाठीचा पक्षपात करणारी शब्दरचना असल्याने womanism ही संज्ञा आली. Womanism हा ‘त्या रंगाची स्त्री’ (women of color) आणि तिचे विदारक अनुभवविश्व यांचे वर्णन करण्यासाठी ही संज्ञा ॲलिस वॉकर41 या लेखिकेने तिच्या In Search of Our Mothers’ Gardens : Womanist Prose (1983) या लेखसंग्रहात प्रथम शब्दबद्ध केली, Womanist चेच प्रगत रूप womanish होय.
गौरेतर (not white) लोकांचा हीनदर्शक उल्लेख करताना अमेरिकेने Person of color 42(चे अनेकवचन People of color; Persons of color) ही संज्ञा जन्माला घातली. यात अ-गोरे (श्वेतेतर) आणि अल्पसंख्य या साऱ्यांचा (म्हणजे उरलेल्या जगाचा) समावेश करण्यात आला. Citizens of color ही संज्ञा मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांनी 1963 साली वापरली. नंतर 1980 च्या दशकात व नंतर महत्त्वाचे मूलगामी लेखक फ्रांझ फेनन यांच्या लेखनामुळे आणि प्रभावामुळे वंशवादी न्यायाधीशांनी या शब्दाला न्यायालयीन कामकाजात आणून आणखी ही पातळी गाठली. नंतरच्या सामाजिक तत्त्वज्ञानाच्या चर्चाविश्वात ही मूळ अर्थाने रुळली. Women of color चे मूळ या वादात आहे..
Womanist theology
Womanist ही संज्ञा इतकी लोकप्रिय झाली की युरोपीयन स्त्रीवादाच्या विकासक्रमात पुरुषी धर्मशास्त्रास जणू आव्हान म्हणून स्त्रीवादी धर्मशास्त्राची (Womanist theology)43 रचना झाली. अमेरिकेतील आफ्रिकन स्त्रीचे स्वातंत्र्य या नव्या धार्मिक सांक़ल्पनिक चौकटीने अधोरेखित केले. ही नवी चळवळ होती/आहे. ही चळवळ दोन पातळ्यांवर संघर्ष करते. एकीकडे ती परकीय गोऱ्या वर्चस्ववादाला आव्हान देते आणि दुसरीकडे स्वकीय काळ्या पुरुषप्रधानतेलाही आव्हान देते. काळ्यांची वेदना ती प्रगट करते. ही चळवळ कृष्णवर्णीय स्त्रीवादाशी (Black feminism) नाते सांगते. नंतरच्या विकासक्रमात स्त्रीवादी धर्मशास्त्राने आमचा स्त्रीवाद जगातील सर्व स्त्रियांशी संबंधित असून एकूण स्त्रीजातीचे दु:ख सांगणारा आहे”अशी व्यापक भूमिका घेतली. स्त्रीवादी धर्मशास्त्राचे मूळ सुप्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका जॅकलिन ग्रँट44 हिच्या लेखनात आढळते. जॅकलिनने स्त्रीवादी मांडणीत एक वेगळा इतिहासच रचला. दुसरी लेखिका आणि स्त्रीवादी सिद्धान्तकर्ती म्हणजे डेलोरेस विलीयम्स45
डेलोरेसनेच प्रथम Womanist theology हा शब्दप्रयोग तिच्या Womanist theology : A Black Womens ‘Voice46 या लेखात उपयोगात आणला. या धर्मशास्त्राची तिसरी मांडणी जेम्स हाल कोन47 यांच्या Black Theology and Black Power (1969) या ग्रंथात आढळते. त्यांनी काळ्यांसाठी असलेल्या चर्चमध्ये कोणता धर्मवाद पाळला जातो, गोऱ्या धर्मशास्त्रापासून त्याचे वेगळेपण व सारखेपणा काय आहे, याची चर्चा केली आहे. ही मांडणी व संबंधित ग्रंथाने खिश्चन जगतात वादग्रस्त ठरून पुस्तकाने मोठे वादळ उठविले. आजही राजकारणावर व धर्मकारणावर या मांडणीचा जबरदस्त प्रभाव आहे. कोन यांच्या मांडणीवर पँट हिने जोरदार टीका केली. तिच्या मते काळ्यांचे अनुभवविश्व, विशेषत काळ्या स्त्रीचे भीषण शोषण त्यांच्या मांडणीतून निसटले आहे. मुळात काळा पुरुष आणि काळी स्त्री यांच्या दुःखाची पातळीच अतिशय वेगवेगळी आहे. पुरुषापेक्षा काळ्या स्त्रीचे दुःख जास्त मूलगामी असून आजच्या काळ्या स्त्रीच्या द:खाचा दर्जा जीझसने त्याच्या काळात भोगलेल्या द:खासारखा आहे. म्हणून जीझस हा काळ्या स्त्रीचा ‘दैवी सहदु:खभोगी’ (divine co-sufferer) आहे. डोलोरेसने या दोघांच्या मांडणीला पाठिंबा देत Sisters in the Wilderness या पुस्तकात पुढील मांडणी केली.
“स्त्रीवादी धर्मशास्त्र हा प्रेषिताचा आवाज असून तो अखिल आफ्रिकन अमेरिकन जमातीचा, सर्व स्त्रीपुरुष, प्रौढ आणि बालके यांचा प्रतिध्वनी आहे…काळ्या स्त्रियांवर जबरदस्ती करणाऱ्या सर्व प्रकारच्या शोषक, दडपशाहीवादी शक्तींना आह्वान देणारा, आणि स्त्री व कुटुंब यांचे स्वातंत्र्य आणि कल्याण साधणारा, जीवनाची प्रत उंचावणारा विकासवादी विधायक जीवनमार्ग आहे.”
गोऱ्यांच्या वर्चस्ववादात आणखी एक गुंतागुंतीचा पदर म्हणजे गोरा वर्चस्ववाद केवळ गोऱ्या पुरुषांचा नव्हे; तर गोऱ्या स्त्रीच्या वर्चस्वाचाही आहे. गोरी स्त्री काळ्या स्त्रीला स्त्री म्हणून समदुःखसहाभागीदारीण म्हणून सहानुभूती दाखवीत नाही. तीसुद्धा काळ्या स्त्रीवर अधिकार गाजविते, ते ती काळी48 आहे, म्हणूनच. इथे स्त्री म्हणून स्त्रिया एकत्र येत नाहीत, तर पुरुषीपणामुळे, पुरुषी राजकारणामुळे त्यांचीही शोषक आणि शोषित अशी विभागणी होते.
भारतीय स्त्रीवाद आणि दलित स्त्रीवाद
भारतात दलित स्त्रीवाद (Dalit feminism) हा शब्दप्रयोग गेल्या दशकापासून चांगलाच रुळला आहे. या सिद्धान्ताचे वर्णन साधारणपणे ‘असंतोषाचे विधान’ अथवा – ‘बहिष्कृतांचे राजकारण’ असे करण्यात येते. गेल्या शतकाच्या सत्तरीच्या दशकात उगम पावलेल्या भारतीय स्त्रीवादाने (Indian feminism) दलित स्त्रीला चर्चाविश्वाच्या परिघाबाहेर ठेवल्याने त्याविरोधात बंडखोरी म्हणून दलित स्त्रीवाद विकसित झाला.
दलित स्त्रीवादाचे दोन मुख्य आक्षेप असे: पहिला मूलभूत आक्षेप-समाजातील सर्व जातीजमातीच्या व धर्माच्या स्त्रियांचे प्रश्न भारतीय स्त्रीवाद मांडत नाही. कारण : भारतीय स्त्रीवाद मुख्यत्वे ब्राह्मणी स्त्रीवाद या रूपातच विकसित झाला, त्याने जातीयतेचा आधार घेऊन दलित स्त्रीला वाळीत टाकले. ब्राह्मणी स्त्रीवादाने इतर सवर्ण स्त्रियांना परिघात सामावून घेतले, पण दलित स्त्री व तिची दु:खे यांचे अस्तित्वच नाकारले.
दुसरा आक्षेप दलित पुरुषवर्गाने केवळ दलित पुरुषांची दु:खे मांडली. कारण : दलित पुरुषांनी पुरुषी व्यवस्थेचा (आणि मनुप्रणीत वर्णव्यवस्थेचा) आधार घेऊन दलित स्त्रीवर ‘स्त्रीजात’ म्हणून स्त्रीवर नियंत्रणे लादली आणि तिला शोषितच ठेवले.
साहजिकच भारतीय सवर्ण स्त्रीवादाने दलित स्त्रीला सामावून घ्यावे आणि दलित पुरुषांनी दलित स्त्रीची दु:खेसुद्धा चव्हाट्यावर आणावी, ही माफक अपेक्षा दलित स्त्रीवादाची आहे. दलित स्त्रीवादाने स्वतंत्र चूल मांडून स्वायत्त अस्तित्व राखण्याचे प्रयत्न यशस्वी केले आहेत. महिला विधेयकाभोवती हेच राजकारण फेर धरून नाचते आहे. अर्थात त्या खोलात शिरण्याचे येथे कारण नाही.
दलित स्त्रीवादाचा पहिला आक्षेप लक्षात घेता एक मुद्दा संक्षेपात असा नोंदविता येईल की (सवर्ण)स्त्रीला अन्य (दलित) स्त्रीला समजावून घेता आलेले नाही. (सवर्ण) भारतीय स्त्रीवाद समता व न्यायाची भाषा बोलत असेल तर आणि जात ही व्यापक, बलशाली व जबरदस्त पकड असलेले विषमतेचे व अन्यायाचे साधन असेल तर या जातिव्यवस्थेविरुद्ध (सवर्ण) भारतीय स्त्रीवाद खरा आवाज का उठवीत नाही? अर्थातच त्याची चर्चा येथे अपेक्षित नाही.
भारतीय समाजवास्तव अतिशय गुंतागुंतीचे, संकीर्ण आणि कल्पनेपलिकडे परिणामकारक आहे. हे वास्तव अनंत स्तरीय आहे. भारतात युरोप-पाश्चात्त्यांसारखी गुलामी नाही पण जन्मात जातवास्तव मात्र सर्वाधिक भीषण आणि सूक्ष्म आहे. यात मजूर, शेतकरी, शूद्र, शूद्रातिशूद्र आणि परिघाबाहेरचे आदिवासी असे अनंत स्तर आहेत आणि प्रत्येक स्तरावर पुरुषाची जोडीदारीण म्हणून स्त्रीसुद्धा अस्तित्वात आहे. पण शोषणाला ‘उपयुक्त वस्तू’ हाच तिचा दर्जा आहे. त्यामुळे भारतीय स्त्रीचा प्रश्न मुख्यत: दोन पातळ्यांवर हाताळला पाहिजे. पहिला व्यापक भारतीय स्त्री म्हणून आणि त्या त्या सामाजिक स्थानानुसार वर्णजातीनुसारचे स्त्रीचे प्रश्न, त्यामुळे भारतीय संदर्भात स्त्रीप्रश्न विशेषीकरणाने सुटू शकतो, असे एक उत्तर येते. साहजिकच सर्वकष भारतीय स्त्रीप्रश्न अथवा ‘सर्वंकष भारतीय स्त्रीवाद’ नावाची ज्ञानवस्तु अभ्यासविषय म्हणून निर्माण होऊ शकते का याचे ज्ञानशास्त्र आणि सत्ताशास्त्र रचणे भाग आहे.
स्त्रीप्रश्न ही संज्ञा तपासली तर तीन दृष्टिकोन मांडता येतील: एक, स्त्रीप्रश्न म्हणजे स्त्री हाच एक प्रश्न किंवा समस्या आहे. याचा अर्थ धर्म ते मोक्षमार्गातील अडथळा, दोन; स्त्रियांपुढील प्रश्न = स्त्रीची गुलामगिरी, आर्थिक, सामाजिक, ज्ञानशास्त्रीय स्वातंत्र्य, व्यक्तिवाद इत्यादी, तीन; समाजव्यवस्थाच स्त्रियांचे प्रश्न निर्माण करते. अर्थात याचा शोध स्त्रीअभ्यासकांनी आणि तज्ञांनी घ्यावयाचा आहे.
लिंग व लिंगभाव
या चर्चेतून आपण लिंग व लिंगभाव (Sex & Gender) हा मुद्दा विस्तारभयास्तव वगळत आहोत.49 येथे लिंग व लिंगभाव यातील फरक फक्त नमूद करता येईल. लिंगभावाशीच लैंगिकता जोडलेली आहे, असा समज आहे, त्यामुळे संक्षेपात हा फरक असा :
1) लिंग (Sex) म्हणजे शरीरशास्त्रीयदृष्ट्या व जीवशास्त्रीयदृष्ट्या या लिंगाचे तुम्ही आहात ते व ‘तसे’ असणे
2) लिंगभाव म्हणजे सामाजिकदृष्ट्या तुमची जी घडण मानसिक, बौद्धिक, वैचारिक जडणघडण होते ती.
3) लिंगभावाधारित आत्मपरिचय म्हणजे ‘तुम्ही नेमके कोणत्या लिंगभावाचे आहात’ या बद्दल तुमची स्वत:ची ठाम समजूत.
4) लिंगभावी भूमिका’ म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तुमची लिंगभावाधारित भूमिका .
लिंग व लिंगभाव निर्धारित भूमिका या लिंगांतरित (transsexual) व आंतरलिंगी (intersexuals) यांच्याबाबतीत मात्र वेगळे प्रश्न उभे करतात.त्यातून उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे लिंगभावांतरित (transgender) व्यक्तींचे जीवन!
लिंग व लिंगभाव यांच्याशी लिंगांतरित व आंतरलिंगी व्यक्ती जी मूल्ये जोडतात ती अतिशय भिन्न आहेत. ही मूल्यव्यवस्था आत्मपरिचयाशी संबंधित आहे. (अस्मिताबाजीशी नव्हे). वस्तुत: आत्मपरिचय हा मानसशास्त्रीय शब्द असूनही तो बहुधा साधारणपणे नेहमीच्या बोलण्यात व सर्व चर्चाविश्वातही वापरला जातो.
स्त्रीची धर्मशास्त्रीय आणि तात्त्विक प्रतिमा
जगातील धर्मशास्त्रे आणि भारतीय दर्शने स्त्रीची स्पष्ट प्रतिमा चितारू इच्छित नाहीत. उदाहरणार्थ पिता-माता-पुत्र ही त्रयी बऱ्याच धर्मांत आढळते. तीच त्रयी खिश्चन धर्मात पिता-पुत्र-पवित्र आत्मा अशी आहे. यांतील आत्मा हा स्त्रैण मानला गेला.(हिंदीत आत्मा हा शब्द स्त्रीलिंगी आहे.) ग्रीकांनी तो गोल + क्रूसच्या रूपात मान्य केला… हिंदुधर्मशास्त्र आणि पुराणकथांमध्ये अनंत पोकळीला हिरण्यगर्भ मानले गेले. विस्तारभयास्तव साऱ्या तपशिलात जाणे शक्यता नाही. पण ही पोकळी हीच एक गर्भाशय असून तिच्यात अगाध जल पसरले आणि विश्वाचे बीज रोवले गेले, ही संकल्पना प्रत्येक धर्मात आणि तत्त्वज्ञानात या ना त्या स्वरूपात आहेच.भारतीय दर्शनाशास्त्रासंबंधी पुरावा द्यावयाचा तर नासदीय1 सूक्तात एका विश्वव्यापी सलिलाची म्हणजे जलाची कल्पना केली असून त्यातून विश्वनिर्मिती सुचविली आहे. सांख्य तत्त्वज्ञानात तर थेटपणे प्रकृति-पुरुष संबंध सांगितला आहे, तथापि अद्वैत वेदान्ताने मायातत्त्वाची कल्पना केली. तिला भ्रम मानले पण व्यावहारिक पातळीवर तिला भौतिक अस्तित्व दिले. ही मानवी स्त्रीची नकारात्मक संकल्पना होती.(अर्थात शंकराचार्यानी वास्तव जीवनात मातेचे गुणगान केले आणि तिला अन्नपूर्णेचा दर्जा दिला.) असो. त्यातील बहुतेक सारी मिथके गूढ, रहस्यमय आहेत. स्त्रीचा गर्भाशय गर्भाने आपोआप कसा भरला जातो, याचे कुतूहल अतिप्राचीन आहे. युद्धात कामी येणारे योद्धे जन्माला घालण्यापासून विश्वाची जननी होणारी, जिच्या पोटी यावे अशी अगाध इच्छा प्रत्यक्ष ईश्वरालाही व्हावी अशी प्रेरणा देणारी स्त्री, म्हणूनच गूढ बनली आहे. परिणामी मुले निर्माण करणारी यंत्र ते प्रत्यक्ष ईश्वरी ही स्त्रीची अनेक रूपे रंगविली गेली. या गदारोळात स्त्रीचे मानव म्हणून अस्तित्व मात्र हरवले, हीच मोठी शोकांतिका “आहे.
प्रत्यक्ष व्यवहारात स्त्री-पुरुषाचा संबंध नेहमीच विविध नातेसंबंधाने येतो. स्त्रीची मुख्य भूमिका आई, बहीण, पत्नी आणि मुलगी अशा जीवशास्त्रीय क्रमाने विकसित होते. हे अर्थातच पुरुषाच्या संदर्भात खरे आहे. पुरुषही बाप, भाऊ, पती आणि मुलगा या क्रमाने जीवनात येतो. इतर नाती-वहिनी, मेव्हणी, काकू, मामी, नात, सून अथवा उलटे दीर, मेव्हणा, काका, मामा, जावई इत्यादी नाती लग्नसंबंधाने निर्माण होतात. कुटुंब ही कृत्रिम मानवी सामाजिक रचना असून नातीही कृत्रिमच असतात. या साऱ्या नात्यांमध्ये लैंगिकतेचे काही विधिनिषेध (Rules and Taboos) तयार केले जातात, तथापि आई, बहीण आणि मुलगी यांच्याबाबतचे लैंगिकतेचे निषेध वगळता इतर नात्यांमध्ये पुरुषांकडून लिंगसंबंध प्रस्थापित होऊ शकतात. ते नैतिक असतील किंवा अनैतिक असतील पण त्यांना अवकाश नक्कीच असतो. उंबरठ्याच्या आतील कामहिंसेत (domestic sex + voilence) तर कसलेच निषेध पाळले जात नाहीत.
कुटुंबाबाहेर स्त्री-पुरुष यातील कोणत्याच नात्याने बांधलेले नसतात, तेथे ते केवळ व्यक्ती म्हणून एकत्र येऊ शकतात, येतातही. पण दुर्दैवाने तेथेही नात्याचा अडसर टाकला जातो. कुणीतरी ताई, दादा, काका, मामा होतातच. या अडसरातूनच सामाजिक अभिसरण नावाचे कूट सुरू होते. प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला भेटणारी प्रत्येक स्त्री आणि पुरुष अशा रीतीने केवळ माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून भेटतच नाही. ती कोणत्या तरी नात्याचे जू मानेवर ठेवूनच भेटतात.
केवळ भीतीपोटी कोणते तरी नात्याची ढाल घेऊन स्त्रीपुरुष भेटत असतील तर तिथे समजावून घेण्याची जाणीव विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे साहजिकच ‘माणूस’ समजावून अभिसरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही, ही ज्ञानशास्त्रीय गोची आहे. समजावून घेणे, मत मांडणे किंवा प्रतिक्रिया देणे हे एक प्रकारे मूल्यमापनच असते. त्यासाठी देणाऱ्याकडे काहीएक निकष किंवा तराजू असावा लागतो. नीतिशास्त्राच्या भाषेत मूल्यमापनाचे नैतिक मापदंड असणे आवश्यक आहे. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते आणि साहित्यिक बलँड रसेल त्याच्या The Problems of Philosophy या प्रसिद्ध पुस्तकात एक वचन दिले आहे. ते असे,
“What Peter seys about Paul
Tells us more about Peter
Than about Paul”
म्हणजे
“पीटरचे पॉलविषयीचे मत आपल्याला पॉलविषयी जेवढे सांगते त्यापेक्षा पीटरविषयी अधिक सांगते.”
याचा अर्थ “इतरांविषयी काहीतरी बोलणे म्हणजेच काम
इतरांपेक्षा स्वत:विषयीच जास्त सांगणे होय.”
स्त्रीविषयी पुरुष जे सांगतो त्यात स्त्रोपेक्षा तो स्वत:विषयाच अधिक सांगत असतो. तो स्वत:ला मान्य असलेली मूल्यव्यवस्था स्पष्ट करतो. याचा अर्थ असा की त्यालाही तशाच प्रतिक्रिया दिल्या तर तो ही तशीच प्रतिक्रिया देईल, जशी ती स्त्री देईल. या देण्यातून पुरुष त्यांची स्वत:ची नैतिक, सांस्कृतिक पातळी तो स्पष्ट करीत असतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
पण अर्थात पुरुषाने स्त्रीविषयी मादीपासून देवीपर्यंत काहीएक म्हणणे, हे जसे पुरुषाने स्त्रीला समजावून घेणे असते; तसे स्त्रीनेही स्त्रीला समजावून घेतले पाहिजे. बहुधा . तसे घडत नाही. जे काही स्त्रीने स्त्रीला समजावून घेणे असते, त्यात विषमताच कशी चालू ठेवावी, याचे प्रशिक्षणच असते. उदाहरणार्थ सुनेला घरच्या रीतीभाती सासूने समजावून देणे. तेव्हा स्त्री समजावून घेणे ही पुरुषाची जबाबदारी आहेच पण स्त्रीचीही आहे.
समजावून घेणे’ ही फार जटिल गोष्ट आहे, पण गूढ नक्कीच नाही. स्त्रीला पुरुषाला, पुरुषाने स्त्रीला, पुरुषाने पुरुषाला आणि स्त्रीने स्त्रीला समजावून घेण्याची जबाबदारी ही व्यापक अर्थाने माणसाने माणसाला समजावून घेणे असते. त्यासाठी प्रथम प्रत्येक माणसाने माणूस होणे आवश्यक आहे.
संदर्भ/टिपण/माहिती :
41 ॲलिस वॉकर Alice Malsenior Walker (जन्म 09 फेब्रुवारी 1944): कृष्णवर्णीय ललित लेखिका, कवयित्री, कार्यकर्ती. तिने वंश आणि लिंगभेदाविरुद्ध उत्कृष्ट लेखन के ले. तिच्या The Color Purple (1982) या लेखसंग्रहास पुलित्झर पुरस्कार मिळाला.
42 http://en.wikipedia.org/wiki/ Person_of_color
43 http://en.wikipedia.org/wiki/Womanist_theology
44 जॅकलिन ग्रँट Jacquelyn Grant (जन्म 19 डिसेंबर 1948, White Women’s Christ and Black Women’s Jesus : Feminist Christology and Womanist Response, या ग्रंथाची संपादिका आणि Perspectives on Womanist Theology या ग्रंथाची लेखिका. 1986 सालच्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या Ministry Award पुरस्काराची विजेती. ती आणि तिचे पती रेव्हरंड जॉन कॉलिअर अॅटलांटा येथे राहतात. 12 ऑगस्ट 2003 रोजी जगप्रसिद्ध The History Makers या संस्थेने तिची ‘इतिहास रचयिती’ म्हणून मुलाखत घेतली.
45 डेलोरेस विलियम्स Deloress. Williams, या न्यूयॉर्क येथील Union Theological Seminary (स्थापना 1836) संस्थेत धर्मशास्त्र आणि संस्कृती अध्यासनावर प्रोफेसर पॉल टिलिख हे पद भूषवीत आहे. या पदावर नेमणूक झालेली ती पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला आहे. 1996 साली हा मान तिला मिळाला. http:// www.utsnyc.edu
46 Christianity and Crisis 47 (March, 1987) & Black Theology: A Documentary History, Vol 2, 1980-1992 ed. James H. Cone and Ge$rauds wilmore (NY: Orbis Books, 1993), p.265-272. http://christ.org.tw/ bible_and_theology/Review/ Womanist_Theology.htm
47 जेम्स हाल कोन James Hall Cone (जन्म 05 ऑगस्ट 1938), न्यूयॉर्क येथील Union Theological Seminary (स्थापना 1836) संस्थेत शिस्तबद्ध धर्मशास्त्र (Systematic Theology) अध्यासनावर चार्लस ऑगस्टस् ब्रिग विशेष प्रोफेसर हे पद भूषवीत आहेत.
48 म्हणजे जातिव्यवस्थेत सवर्ण स्त्री निम्नजातीय स्त्रीवर जशी अरेरावी करते, तशी!
49 या संदर्भात ‘बायजा’ या द्वैमासिकात 2007-9 या दरम्यान ‘गोष्ट लिंगभावाची’ या सदरात माझे बारा लेख प्रसिद्ध झाले आहेत.
50 www.theosophia.co.il
51 ऋग्वेद 10.129

(एस.एन.आर्ट्स, डी.जे.एम.कॉमर्स व सायन्स कॉलेज, संगमनेर, अहमदनगर-422605 (Email : madshri@hotmail.com)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.